Thursday, October 28, 2021

लडाख सायकलिंग भाग ४दि. ०३ ते ०५ऑगस्ट

लडाख सायकलिंग भाग ४

दि. ०३ ते ०५ ऑगस्ट

नामग्याल कुटुंबाच्या सदिच्छा घेऊन श्योक गावाकडे सायकल सफर सुरू केली.


श्योक गाव येथून ४६ किमी वर होते.  २० किमीवर लँड स्लाईडिंगवाला नाला पार करायचा होता. ज्यामुळे गेले सहा दिवस रस्ता बंद होता. 

सुरुवातीलाच छान उतार लागला. संजय गोप्रोने निसर्गाचे चित्रिकरण करत होता. जुक बॉक्स वर गाणे लागले होते, "आ मेरी मंजिल बता, या जिंदगी को..."  परमेश्वराकडे एकच मागणे... निसर्गाचे सान्निध्य अखेरपर्यंत मिळावे... तासाभराची सफर झाली आणि अघम आर्मी कॅम्प जवळ पोहोचलो. येथे परमिट तपासले गेले. जवळच्या कॅन्टीनमध्ये चहा साठी थांबलो. 

उत्तराखंडच्या एक नवविवाहित जोडप्याची भेट झाली. मुलगा सायकलिस्ट होता. बायकोला म्हणाला "आपण सुद्धा सायकलने फिरुया". आमच्यासह आवर्जून फोटो काढले. येथेच वर्दी मिळाली, "रस्ता खुल गया है, संभालके जाना" या रस्त्याने आज गाड्या पण यायला सुरुवात झाली होती. आर्मीवाल्यांनी एका मोठ्या दगडावर "ओम" लिहिले होते.     सायकलसह तेथे फोटो काढला. "ओम ची साथ है... तो क्या बात है". 

पुढचा रस्ता श्योक नदीच्या किनाऱ्याने डोंगराच्या कपारी कपारीतून होता. चढाचा रस्ता संपल्यावर नदीकिनारी वाळूचे पठार लागले. आज संजय खुशमिजाज मोड मध्ये होता. वाळूत सायकल उभ्या करून चक्क आडवा झाला आणि गाणे म्हणू लागला... " जब जब बहार आयी... मुझे तुम याद आये..." बायको पूजाला लडाखला घेऊन यावे... असेच विचार त्याच्या मनात येत असावेत. इथेच सायकलचे नाव संजयने "राणी" ठेवले.
ज्या ठिकाणी ढगफुटी होऊन रस्ता वाहून गेला होता तेथे आलो. रस्ता कुठेच दिसत नव्हता. माती, दगड, चिखल आणि थंडगार वाहते पाणी... यातून समानासह सायकल चालवणे मोठे आव्हान होते. अशा ठिकाणी बुटाऐवजी सँडल्स कामी येतात. 

 सायकल घातली पाण्यात... आणि बजरंगबलीचे नाव घेत जोरकस पेडलिंग केले... धाप लागली पण दम सोडला नाही... एका ठिकाणी सायकल लटपटली पण मोठे टायर असल्यामुळे सावरली सुद्धा...  प्रयत्नपूर्वक पार झालो... जसे वाहत्या नदीतून  श्री रामाला केवटने पार केले होते...  "तुम अगर साथ देनेका वादा करो... मै यूही मस्त नगमे लुटाता रहूं..." सायकलला म्हणालो.
 
 थोडी विश्रांती घेऊन मार्गक्रमण सुरू झाले. श्योक नदीच्या किनाऱ्याने चढ उताराचा वळणावळणाचा ... दोन ठिकाणी लँड स्लाइडिंगचा... बर्फासारख्या थंड पाण्याचा रस्ता होता... आता श्योक गावाचा घाट सुरू झाला. तीन किमी घाट एकदम अंगावर येणारा होता... श्योक एक किमी असताना घाटात विश्रांती घेऊन माईल्स स्टोन जवळ फोटोशूट केले. पुन्हा नव्या दमाने पेडलिंग करून घाट पार केला. जवळच एक हॉटेल लागले.. भूक लागली होती. या हॉटेलमध्ये जेवणासाठी काहीही नव्हते म्हणून आणखी दोन किमी पुढे आलो. तेथील कटपा गेस्ट हाऊस मध्ये पडाव टाकला.
 श्योक गावात फिरायला निघालो. येथूनच गलवान व्हॅली सुरू होते. श्योक नदीच्या पलीकडे आर्मीचा कॅम्प होता. तेथून १६० किमी अंतरावर भारत आणि चीन सैन्यात झटापट झाली होती. मनोमन शहिद संतोष बाबूला आणि १९ शहिद जवानांना वंदन केले. लेह कडून श्योक गावाकडे येणारा रस्ता सैनिकांना रसद पोहोचविण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. 
 
गावात बरेच होम स्टे आहेत.  आपण दमलेलो असतो म्हणून  गावाच्या सुरुवातीलाच होम स्टेच्या किमती जास्त सांगितल्या जातात. त्यामुळे चार ठिकाणी चौकशी करूनच कुठे राहायचे ते नक्की करायला हवे. उंच टेकाडावर श्योक मॉनेस्ट्री होती. परंतु थंड वारे सुटले होते... त्यामुळे मॉनेस्ट्री कडे जाणे टाळले. रात्रीच्या जेवणा अगोदर सायकलची तेलमालिश केली. वातावरण खूपच थंड झाले होते अंमळ लवकरच झोपी गेलो. 

आज एकूण ५० किमी राईड झाली होती...
आतापर्यंतच्या राईड मधली अतिशय निसर्गरम्य अशी आजची राईड होती.

सकाळी हेवी ब्रेकफास्ट करून डुरबूक कडे प्रस्थान केले. गाव सोडले आणि खडी चढाई सुरू झाली. वातावरण आल्हाददायक होते. अतिशय दमदारपणे तासाभरात ही चढाई चढलो. पास वरील चौथऱ्याला चारी बाजूने पताका फडकत होत्या. पुढे उतार लागला. परंतु लँड स्लाईडीगचा प्रदेश होता. त्यामुळे दगडगोट्या मधून अतिशय सावधगिरीने पेडलिंग करावे लगत होते. काही ठिकाणी तर सायकल ढकलण्याशिवाय पर्याय नव्हता. 
 दोन तास राईड करून निमगो गावात पोहोचलो. येथे लामा मंडळी प्रेयर व्हीलचे बांधकाम करीत होते. त्यांनी आंबा आणि द्राक्ष ज्यूसने आमचे स्वागत केले. अतिशय योग्य वेळी आम्ही हायड्रेट झालो होतो. आता डुरबुककडे राईड सुरू झाली. 
 
 पुढचा चढ उताराचा रस्ता असला तरी अतिशय धुळीचा होता त्यामुळे तोंड झाकून रायडिंग करत होतो. डुरबुकच्या आधी एक किलोमीटर वर पतियाळा ब्रिगेडचा कॅम्प आहे. त्यांचे स्लोगन होते, "कर्म ही धर्म" आणि त्या खाली लिहिले होते, "बजरंग बली की जय" खर आहे; मारुतीरायाचे नाव घेतले की अंगात वीरश्री संचारते. येथे यशवंत पिसाळ पाटील हा मराठी जवान भेटला. अशा ठिकाणी मराठी "फौजी" भेटल्याचा खूप आनंद झाला. 
 
तासाभरात डुरबुकला पोहोचलो. येथे लेह वरून चांगला  पास मार्गे येणारा रस्ता मिळतो. डुरबुकच्या चारही बाजूला हिमालयाच्या पर्वतरांगा पसरल्या होत्या आणि शिखरे पांढऱ्या शुभ्र ग्लेशियरने चमचमत होती. येथे मिलिटरी पोस्ट होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्राफिक होती. जेवणाची विश्रांती घेतली, ड्रॅगन रेस्टॉरंट मध्ये ऑम्लेट मॅगी वर ताव मारला.

येथे एका आयर्लंडच्या सायकलिस्टची भेट झाली. पठ्ठ्या सोलो सेल्फ सपोर्ट राईड करत होता. पेंगोन्ग लेक वरून आला होता आणि  चांगला पास क्रॉस करून लेह कडे निघाला होता. 

  टकटक गावाकडे राईड सुरू झाली. रस्तासुद्धा टकाटक होता. दोन्ही बाजूला हिरवळ आणि हळूहळू चढत जाणाऱ्या रस्त्याच्या एका बाजूला लांबवर पाण्याचा पाट वाहत होता. त्याच्या पलीकडे जंगली घोड्यांचा कळप निवांतपणे चरत होता.  अतिशय सुंदर हिरव्यागार वातावरणाचा लाभ घेणे खूपच आनंददायी होते. येथे दोघांनी डान्स सुरू केले. १४ हजार फुटावर असल्यामुळे दमछाक झाली... आता चक्क हिरवळीवर पहुडलो... निळ्याशार आकाशातील पांढरेशुभ्र ढग न्याहाळू लागलो. आमचा डान्स पाहण्यासाठी ढगांनी सुद्धा आकाशात दाटी केली होती. थोडी मौजमस्ती करून पुढे निघालो. 

अर्ध्या तासात टकटक गावात पोहोचलो. छोट्याश्या टपरीवर कॉफी प्यालो, येथे राहण्याची व्यवस्था नव्हती म्हणून आणखी पुढे निघालो. मुगलेबला पोहोचलो. येथील माऊंटन होम स्टे मध्ये राहण्यासाठी खूपच जास्त पैसे मागितले. मालकिणीची परवानगी घेऊन तेथे टेंट लावले. त्यामुळे टेंटसह रात्रीचे जेवण आणि सकाळचा नास्ता याचे परहेड तीनशे रुपयांमध्ये काम झाले. हे गाव १४५०० फुटावर असल्यामुळे वातावरणातील विरळपणा जाणवत होता.  डुरबुक ते मुगलेब या १४५०० फुटवरील पट्ट्याला चांगथांग प्लाटू म्हणतात. 

टेंट झाडाखाली लावला. वारा सुटल्यामुळे थर्मल आणि टीशर्टने सर्व अंग झाकून घेतले. होमस्टेच्या मागे छोटा ओढा होता. तेथे फेरफटका मारला. सायंकाळ झाली होती आणि आकाशाचे सुंदर प्रतिबिंब छोट्या तलावाच्या पाण्यात पडले होते. 

रात्री वारे सुटले होते.. त्यात पाऊस पडू लागला.. टेंट भक्कम बांधून पडद्यावर मोठे मोठे दगड ठेवले होते. तरीसुद्धा भन्नाट वाऱ्याने टेंट फडफडत होता. टेंटच्या आतल्या बाजूनेसुद्धा बॅगा रचून ठेवल्या होत्या. पावसाचा ताशासारखा ताड ताड आवाज  येत होता.  बराच वेळ गाणी ऐकत बसलो होतो. रात्री बाराच्या दरम्यात पाऊस निवळला तेव्हा निद्राधीन झालो.  सकाळी टेंटच्या बाजूची सर्व जमीन ओली असल्यामुळे सर्व बॅगा दिदीच्या घरात ठेवल्या आणि नंतर टेंट डिसमेंटल केला... रात्रीच्या पावसात टेंट मध्ये झोपणे हा सुद्धा रोमांचकारी अनुभव होता. 

सकाळी नाश्ता  करून  पेंगोंग लेककडे राईड सुरू झाली. हळू हळू चढत जाणारा रस्ता होता. दिड तास राईड केल्यावर एक अवर्णनीय ठिकाणी पोहोचलो. "First View Of  Pangong Lake" या व्हीव पॉईंट वरुन.... लुकुंग १ किमी असा माईल स्टोन असलेल्या जागेवरून निळाशार पेंगोंगचे दर्शन झाले होते.
   आनंदाला पारावार उरला नाही. एका मोठ्या स्थळाकडे आम्ही सायकलने पोहोचलो होतो. पहिल्यांदा पेंगोंग लेक पाहिले तेव्हा स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते... सायकलने येथपर्यंत येऊ असे... सायकल सफारीतील महत्वाचा माईल्स स्टोन गाठला होता.
 भरपूर फोटोग्राफी केली. खजूर खाऊन आनंद साजरा केला. येथून पेंगोंग लेक चार किमी आहे. येथून रस्ता उताराचा होता.  भन्नाट वारे सुटले होते, त्यामुळे अंगात विंडचिटर चढविले. आकाशात ढगांनी दाटी केली होती. पाऊस पडण्याची चिन्हे होती. म्हणून जोरदार परंतु सावधगिरीने पेडलिंग करत होतो.  हेडविंड असल्यामुळे चार किमी जायला अर्धा तास लागला. 
 आता प्रत्यक्ष पेंगोंग लेक जवळ पोहोचलो होतो.  तलावाच्या या किनाऱ्यावर फक्त आम्ही दोघेच होतो. सायकलला लावलेल्या पताका जोरदार फडकत होत्या. जणूकाही अटकेपार झेंडे लावले होते. सायकलसह फोटो काढले तसेच तलावात उभे राहून सुद्धा काढले. अर्धा तास तलावासोबत गप्पा मारल्या... सायकलसुद्धा वाळूत निवांत उभ्या होत्या. 
कोणतीही कुरकुर न करता सायकलने दिलेली साथ तिच्या प्रेमात भर पडून गेली... याच ठिकाणी तिला नाव दिले... "सखी"...

मुख्य रस्त्यावर आल्यावर नैनिताल, अलमोरा, कौसानी चा माईल स्टोन दिसला... जगात प्रसिद्ध असणाऱ्या पेंगोंग तलावाजवळ हा बोर्ड का बरे लावला असावा... कोणाला सुचलं असेल बरं... काही क्लू असेल तर सांगा... 

येथून पेंगोंगचा थ्री इडियट व्हीव पॉईंट चार किमी वर होता. तलावाच्या बाजूचा रस्ता चढ उताराचा आणि ऑफ रोडिंग होता. धापा टाकताच १४००० फुटावरच्या पेंगोंग तलावाच्या व्हीव पॉईंट ला पोहोचलो... जेथे थ्री ईडीयट चित्रपटातील शेवटचा शॉट चित्रित झाला होता. आता या पॉईंटवर  चित्रपटात वापरलेली स्कुटर, हेल्मेट आणि तीन मित्रांचे पाठमोरे बसायचे बाकडे  या प्रत्येकी दहा-दहा वस्तू  रांगेत मांडल्या होत्या.  येथील पेंगोंग लेक साईडवर सायकल घेऊन जायला तेथील विक्रेत्यांनी मज्जाव केला.  एकंदरीत या सर्व गोष्टीमुळे पेंगोंगच्या प्राकृतिक सौंदर्याला अडथळा निर्माण झाला होता. थ्री ईडीयट हा चित्रपट ज्याच्या जीवनावर आधारीत आहे...  मुलांना घडविणारा शास्त्रज्ञ श्री सोनम वांगचुक यांना भेटण्याची प्रबळ इच्छा झाली...

या परिसरात बऱ्याच टुरिस्ट गाड्या आल्या होत्या.  एका हॉटेल मध्ये जेवत असताना प्रमोद दातार हे पुण्याचे गृहस्थ भेटले. आमच्या बरोबर फोटो काढण्यासाठी त्यांच्या टूरमधील इतरांना पण बोलावले. "आम्हाला चालताना पण दम लागतो आणि तुम्ही येथे... लडाखमध्ये सायकल वर फिरताय... कसं काय जमत बुवा..."  संजय म्हणाला, "तुम्ही नियमित सायकल चालवायला लागा, बघा तुम्हालाही शक्य होईल".

येथे राहण्यासाठी टुमदार हटमेंट्स कम हॉटेल्स होते. दोघांना एक रात्र राहण्यासाठी अडीच हजार रुपये मोजण्याची आमची तयारी नव्हती. त्यामुळे पुढे बारा किमीवर तलावा किनारी असलेल्या स्पंगमीक गावाकडे जायचे नक्की केले.

 रस्ता फक्त दगडांचाच होता पाहिले पाच किमी चढाचा रस्ता दम काढत चढून गेलो. आता उतार आणि ऑफ रोडिंग मोठमोठया दगडांचा रस्ता, काही ठिकाणी पाण्याचे ओहळ, रस्ते डायव्हर्ट केलेले.. .  त्यात सायकल घातली...  सायकल सुसाटत निघाली... पुढचे शॉक ओबसोर्बर रिलीज केले होते.  सीटवर न बसता थोडे पुढे झुकून हँडल व्यवस्थित पकडून, नजर रस्त्यावर फोकस करून सायकल पळवू लागलो. अक्षरशः संपूर्ण शरीर लहान मुलांच्या खुळखुळ्या प्रमाणे खुळखुळत होते. MTB सायकल रस्ता पकडून उडत उडत चालली होती. कॅननडेल या ब्रँडची सायकल दिल्याबद्दल समर्पयामीच्या मयुरेशची प्रकर्षाने आठवण झाली. मनोमन त्याचे आभार मानले.  संजयच्या हायब्रीड सायकलला ऑफ रोडिंगमध्ये वेग घेता येत नव्हता.  अतिशय सावधगिरीने संजय सायकल चालवत होता. 

संजय म्हणाला, "असेच रस्ते असतील आणि पेंगोंगच पहायचे असेल तर आपण झंस्कार व्हॅलीत सायकलिंग करूया".  त्याला होकार दिला, पण आतलं मन सांगत होतं, आपण सायकलिंगसाठी आलोय आणि कार्यक्रमाचा रूट ठरविला आहे... असो... मित्र बरोबर असल्यामुळे त्याच्या पण शब्दाला मान देणे आवश्यक होते.  त्याची अडचण लक्षात येत होती... त्याची हायब्रीड सायकल असल्यामुळे त्याला काही लिमिटेशन्स आहेत. आदित्य काकाने सांगितलं होतं, " लडाख मध्ये तुम्हाला चांगल्या रस्त्यासोबत ऑफ रोडिंग, चढउताराचे, दगडधोंड्याचे, नाले-ओढे रस्त्यात वाहणारे, चिखलाचे, मोठमोठे पत्थर असणारे,लँड स्लाईडिंगवाले अशा बऱ्याच प्रकारच्या रस्त्यांना सामोरं जावं लागेल... आणि त्याला MTB  सायकल हाच पर्याय आहे. अशा रस्त्यावर MTB सुद्धा खूप सांभाळून चालवावी लागते. 

स्पंगमीक गावात येई पर्यंत चार वाजले होते. दिस्किट होम स्टे मध्ये जेवण नाश्त्यासह सहाशे प्रत्येकी अशी व्यवस्था झाली. आल्या आल्या वेल कम ड्रिंक म्हणून दिदीने गरमागरम चहा दिला. सोलरवर तापलेले गरम पाणी आंघोळीला मिळाले. आज चार दिवसानंतर आंघोळ करत होतो. कपडे धुण्याचा पण घाट घातला. 

मस्त फ्रेश होऊन स्पंगमीक जवळील पेंगोंग तलावाकडे निघालो. ऊन होते पण हवेत गारठा सुद्धा होता, त्यामुळे थर्मल घालून पेंगोंग किनारी पोहोचलो. निळाशार विस्तीर्ण पसरलेल्या पेंगोंग तलावातील लाटा जणूकाही आभाळाची निळाई घेऊन किनाऱ्याकडे धावत होत्या. त्यांच्या भेटीला मुंबईतून दोन सायकल वेडे आले होते. 

बराच वेळ तलावाच्या सान्निध्यात रममाण झालो... लाटांची गाज... वाऱ्याचा साज... आणि उन्हाचा मसाज... अंगावर घेत किनाऱ्यावर निवांत बसलो होतो... किती वेळ झाला कळलेच नाही... संजय गोप्रो घेऊन पेंगोंगला डोळ्यासोबत कॅमेऱ्यात सुद्धा कैद करत होता.

उद्या येथूनच चुशूल मार्गे सो मोरीरी तलावाकडे प्रस्थान करायचे होते. त्यामुळे पुढचा रस्ता चालू आहे काय... कोठून जातो याची चौकशी करायला गावातील पोलीस चेकपोस्टकडे पोहोचलो. येथे समजले, गलवान व्हॅलीत झालेल्या तणावामुळे चुशूल वरून सो मोरीरीकडे जाणारा रस्ता टुरिस्ट साठी बंद केला आहे... सो मोरीरीचे परमिट दाखविले तसे पोलीस म्हणाला परमिटवर तुमचा रूट खारू वरून आहे. चुशूलचे परमिट यात दिलेले नाही... किंबहूना तुमचे परमिट पेंगोंग व्हीव पॉईंट पर्यंत आहे. यात स्पंगमीक सुद्धा नाही... परंतु गावकऱ्यांच्या विनंती मुळेच स्पंगमीक पर्यंत टुरिस्ट ना येऊ देतो. आमचा भ्रम निरास झाला होता.  ऑन लाईन परमिट मध्ये असलेल्या सर्व लडाख प्रदेशाचे परमिट काढले होते. जो प्रदेश ऑन लाईन मध्ये नाही त्या साठी लेह तहसील कार्यालयातून स्पेशल परमिट घ्यावे लागते, हे माहीत झाले. सर्व सायकलिस्टनी ही बाब अवश्य लक्षात ठेवावी. 

आता आम्हाला स्पंगमीक कडून मागे फिरून डुरबुक मार्गे,चांगला पास ओलांडून खारू पर्यंत मागे जावे लागणार होते. आलेल्या रस्त्यावरून मागे सायकलिंग करत जाणे आणि खारू ला पोहोचणे याला तीन दिवस लागले असते. नेमकी आठवड्याने सुटणारी स्पंगमीक लेह बस उद्या निघणार होती. तिने परतीचा प्रवास करायचा नक्की केले... 

 सफरीच्या अनुभवात चांगली भर पडली होती... यामुळे,  पुढे येणाऱ्या सायकलिस्ट ना नक्कीच लाभ होईल. जवळच्या बुद्धा गेस्ट हाऊस मध्ये चहा प्यायला थांबलो. प्रचंड वारे सुटले होते. प्रत्येक घरावर लावलेले झेंडे वाऱ्याच्या दिशेने फडफडत होते. 
 
 हॉटेल मध्ये बसून चहा पिता पिता काचेमधून जगप्रसिद्ध पेंगोंग लेक  डोळ्यात सामावून घेत होतो. बकेट लिस्ट मधील एक इच्छा पूर्णत्वाला गेली होती...


सतीश जाधव
मुक्त पाखरे...

Friday, October 15, 2021

लडाख सायकलिंग भाग ३दि. ३१ जुलै ते ०२ ऑगस्ट

लडाख सायकलिंग भाग ३

दि. ३१ जुलै ते ०२ ऑगस्ट
सकाळी BRO कॅम्प मध्ये आलूपराठा आणि गरमागरम चहा मिळाला. सर्व BRO चे जवान आणि अधिकाऱ्यांचे आभार मानून चांगमार वरून राईड सुरू केली. जवान, जय भगवान देव आम्हाला सोडायला गेट पर्यंत आला होता. त्याच्या मनीचे भाव जाणले... गेट जवळ त्याच्या हातात सायकल देऊन एक राऊंड मारून यायला सांगितले... जय एव्हढा खुश झाला की , "वापस आते समय हमारे BRO कॅम्प मे जरूर रुकाना" असे प्रेमाचे आमंत्रण दिले... प्रसंगी वज्रापेक्षा कठोर होणारे हे आर्मीचे जवान, माणसांच्या सहवासाला किती आसुसलेले असतात याचा अनुभव आला.

एक किमी पुढे चांगमार गावाच्या वेशिजवळ आलो. येथे श्योक नदीच्या जोरदार प्रवाहाने एक छोटा पूल वाहून नेला होता. BRO ने तातडीने हा पूल बांधला होता. मुख्य नदीला येऊन मिळणाऱ्या ओढे आणि नाल्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर दगड माती रस्त्यावर आणली होती. त्यामुळेच BRO ना रस्त्याची डागडुजी सतत करावी लागते. 

अर्ध्या तासात श्योक नदीला ओलांडणाऱ्या विशाल लोखंडी ब्रिज जवळ आलो. मागच्या वर्षी नदीला पूर आला तेव्हा जुना ब्रिज ढासळला होता. BRO ने आता तेथे नवीन लोखंडी पूल बांधून त्याचे नाव दुर्गा ब्रिज ठेवले आहे. प्रचंड वेगाने वाहणाऱ्या नदीमध्ये कोणताही पिलर न बांधता लोखंडी रोपच्या सहाय्याने हा झुलता ब्रिज बांधला आहे. या पुलाच्या मधोमध थांबलो... वाऱ्याच्या झोताबरोबर पूल हलत होता. आम्ही जणूकाही झोपाळ्यावरच बसलो होतो. पलीकडच्या बाजूला पुलाचे लोखंडी रोप कसण्यासाठी हिमालयाच्या कपारीत मोठमोठया भिंती बांधल्या होत्या. ह्या भिंतीचा दुहेरी फायदा होता. डोंगरावरून होणारी लँड स्लाईडींग अडवली जाणार होती. तसेच पुलाचे संरक्षण होणार होते. 

सकाळी ९  वाजता सुद्धा कडक ऊन जाणवत होते.  दोन्ही सायकली रस्त्यावर आडव्या करून संजयने रस्त्यावरच बसकण मारून हायड्रेशन ब्रेक घेतला. मागे असलेला बडा हिमालय आणि त्याच्या माथ्यावर भटकणाऱ्या ढगांमुळे एक छान पैकी लँडस्केप चित्र तयार झाले होते... संजयने सायकल आणि हिमालय याच्या लोकेशन वर कमरेवर हात ठेवून विजयी विराच्या अविर्भावात फोटो काढले.  दोन्ही हात पसरून निसर्गाला कवेत घेण्याचा आनंद काही औरच होता. 

ऊन, वारे, थंडी या सर्वांचा अनुभव एकाच वेळी घेत होतो. वातावरण अतिशय आल्हाददायक होते. दोन दोस्त एकदम मजेत आणि वेगात पेडलिंग करत होते. पाऊण तासात बोगडांगच्या  अलीकडे मिलिटरी "चेकपोस्ट ९" जवळ पोहोचलो.  येथे परमिट तपासले गेले. जवळच असलेल्या जवानांच्या कॅन्टीनमध्ये समोसा, जिलेबी आणि चहाचा आस्वाद घेतला. येथे बंगलोरहून  आलेल्या मोटरसायकलिस्ट सरोजची भेट झाली. जम्मू वरून निघालेला सरोज लेह मार्गे आज  तुरतुकला जाणार होता. संपूर्ण लडाख फिरून मनाली मार्गे चंदीगड पर्यंत राईड करणार होता. सोलो राईड हा त्याचा शौक आहे. असे निसर्गात रममाण होणारी माणसे " मै जिंदगीका साथ निभाता चला गया" अक्षरशः जीवन मजेत जगत असतात. 

एक छोटीशी घाटी चढल्यावर पोस्ट ९ चे वॉर मेमोरियल लागले. या ठिकाणी पाकिस्तान विरुद्ध १९७१ चे युद्ध झाले होते. आपली सीमा बोगडांग पर्यंत होती. या युद्धात तुरतुक आणि पुढे त्याक्षी पर्यंतचा भूभाग भारताने पादाक्रांत केला. हा  सियाचीनचा भूभाग  १२ हजार फूट उंचीवर आहे. मुख्य स्मारकाकडे जाताना सुद्धा धाप लागत होती. वाटेत बर्फावर चालणाऱ्या स्की-कार  वर पांढरे थर्मल घातलेल्या जवानांचे स्मारक होते.  युद्धात शाहीद झालेल्या आपल्या जवानांच्या स्मृती प्रित्यर्थ हे शाहीद स्मारक बांधण्यात आले आहे. अशा दुर्गम ठिकाणी आपले सैनिक देशाच्या संरक्षणासाठी आपले प्राण समर्पण करतात... त्या शूर हृदयांना मानाचा मुजरा... सियाचीन वॉरीयर्स यांचे ब्रीद आहे, "Courage and Fortitude"  शहीद झालेल्या जवानामध्ये मराठा रेजीमेंटचे सुद्धा सैनिक आहेत. मराठी नावे वाचताना ऊर भरून आले.  अशा स्थळांना प्रत्येक भारतीयाने आवर्जून भेट द्यायला हवी. 

आता उताराचा रस्ता सुरू झाला. समोरून येणारे हेडविंड मागे ढकलत होते . एका बाजूला श्योक नदी तर दुसऱ्या बाजूला अक्राळविक्राळ हिमालय ... तासभराची राईड झाली आणि "रॉक फॉल" एरिया सुरू झाला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दगडांचे ढीग पडले होते. त्यांना सुद्धा व्यवस्थितपणे रस्त्याच्या किनारपट्टीला रचून BRO ने कलात्मकता दाखविली होती. डोंगर कपारी फोडून रस्ते बनविले होते. त्यामध्ये सायकलिंग करताना प्रचंड आकाराच्या अजगराच्या जबड्यात जात आहोत असा भास झाला.

चढ उताराच्या रस्त्यावरून जवळपास दिड तास राईड केली. गराडी गावात मुसाभाईच्या "बाल्टि कॅफे" मध्ये पेटपूजा करायला थांबलो. चटपटीत बोलणाऱ्या मुसाभाईने पटकन ऑम्लेट  आणि चपाती नाश्ता दिला. मुसा म्हणाला "यहा का लोकल ब्रो धान का  "किसीर डोसा" जरूर खाना. हे धान्य गव्हासारखे पण राखाडी रंगाचे असते. येथील लग्नसमारंभात ब्रो चे पीठ उकडवून त्याचा "जान" हा पदार्थ बनवितात, त्याला मख्खन बरोबर खातात. 

मुसा बरोबर गप्पात आम्ही रंगलो. त्याचे दादाजी नदीवरचा मालाचा गंडोला (गराडी) ओढण्याचे काम करायचे. ती जागा दाखविली. त्यामुळेच या गावचे नाव गराडी पडले आहे. हे गराडी गाव मुसाच्या परिवारातील माणसांचे आहे. 
 
 मुसा त्याचा बगीचा दाखवायला  घेऊन गेला. जरदाळूच्या  बगिच्यात आम्हाला सोडले. तुम्ही हवे तेवढे जरदाळू खा... बरोबर सुद्धा न्या... याच बागेत सफरचंद अक्रोड आणि द्राक्षाची झाडेसुद्धा होती. संपूर्ण शेती सेंद्रिय खतापासून केली होती. मुसाने उन्हाळ्यात राहण्यासाठी बांधलेले बांबूचे घर सुद्धा दाखविले. बांबूच्या या घरात उन्हाळ्यात थंडावा असतो. त्याच्या शेतात कांदा, बटाटा, तौमेटो, कोबी, फ्लावर इत्यादी सर्व प्रकारच्या भाज्या पिकविल्या जातात. लेह बेरीचे झाड पाहिले. हे डायबिटीज वर उत्तम औषध आहे. त्याच्या बागेत होणारी डिलीशियस सफरचंद मिलिटरीचे अधिकारी घेऊन जातात.  अतिशय अप्रतिम आहेत ही सफरचंद...

 मुसाने माशांची फार्मिंग सुद्धा केली आहे. येथील नदीत मिळणारे ट्रोट माश्यांची मशागत चष्मेशाही मधून पाणी येणाऱ्या एक  छोट्या तलावात केली होती. जेव्हा गावात दावत असते तेव्हा या माशांचा फडशा पडला जातो. एका छोट्या गावात राहणाऱ्या मुसाचे हे पर्यावरण पूरक वैभव पाहिले की आपल्यापेक्षा किती तरी पट समृद्ध आहे याची जाणीव होते. या परिसरात मॅगपई पक्षी मोठया प्रमाणात दिसले. कावळ्याच्या प्रजातीतील पण शेपूट आणि पंखाच्या मधील भाग पांढरा असलेले पक्षी उडताना झकास दिसतात.
 
 वाटेत बोगडांग गाव लागले. येथे मशीनद्वारे गव्हाचे दाणे रोपापासून वेगळे केले जात होते. हे गाव पूर्वी POK मध्ये होते. येथील भाषा बाल्टि आहे. हा प्रदेश पूर्वी गिलगीट बाल्टिस्तानचा भूभाग होता. येथील लहान लहान मुले त्यांच्या सायकली सह आम्हाला साथ देत होते. 
 
येथून तुरतुक 7 किमी अंतरावर होते. वाटेत लँड स्लाइडिंगचा रस्ता लागला. संपूर्ण रस्ता दगडगोट्यांनी आणि वाळूनी भरलेला, त्यात ओढ्याचे वाहणारे थंडगार पाणी... यातून सायकल पेडलिंग करणे म्हणजे तारेवरची कसरत होती.
ती पूर्ण करत तुरतुकच्या वेशिजवळ पोहोचलो. "Well Come to Turtuk"या माईल्स स्टोनने आमचे स्वागत केले. येथे भारत सरकार टुरिझम खात्यातर्फे मोठे हॉटेल बांधले जात आहे. येथे जवळ विमानाची धावपट्टी सुद्धा तयार होते आहे. ज्या टुरिस्ट ना थेट नुब्रा व्हॅली मध्ये यायचे आहे त्यांना ही पर्वणी आहे. 

तुरतुक नाल्याजवळ पोहोचलो तेथे दिल्ली वरून कार घेऊन आलेले चार तरुण भेटले. सोबत आणलेल्या गॅस सीलेंडर वर ही मुले  मॅगी बनवत होती. मॅगी मध्ये आम्हाला पण सामील केले. लडाख मधील सायकल सफरीचे त्यांना अप्रूप वाटत होते.
 संजयने "कारपो होम स्टे" मध्ये राहण्याची व्यवस्था केली. रूमवर सामान टाकून उडन ब्रिज कॅफे मध्ये केशर चहा प्यायलो या सोबत मध सुद्धा देण्यात आले होते. अतिशय उत्साहवर्धक होती हा चहा. आता संध्याकाळ झाली होती म्हणून आणखी एक दिवस  तुरतुक मध्ये राहण्याचा निर्णय घेतला.

सकाळीच तुरतुक मधील मॉनेस्ट्री पाहायला गेलो. संपूर्ण गावात मुस्लिम वस्ती आहे आणि त्यात उंच टेकडीवर ही बौद्ध मॉनेस्ट्री आहे. नाल्यावरील लाकडी पूल ओलांडून भर गावातून मॉनेस्ट्रीकडे जायचा रस्ता होता. पुढे जरदाळूच्या बगीचातुनच ही वाट जात होती. येथे जरदाळू म्हणजे रानमेवा होता. हवे तेवढे काढा आणि खा. टप्पोरे टप्पोरे जरदाळूने अर्धी सॅक भरली. साधारण दोन किमी चढाचा रस्ता पार करून मॉनेस्ट्री मध्ये पोहोचलो. १९७१ च्या युद्धात जेव्हा तुरतुक भारताचा भाग झाला तेव्हा येथे असलेल्या लामाने हे बौद्ध मंदिर बांधले. मंदिरातून  संपूर्ण तुरतुक गाव आणि बाजूने वाहणारी श्योक नदी चा परिसर अतिशय विहंगम दिसत होता. मंदिराच्या चारही बाजूला पवित्र पताका लावल्या होत्या. 

तुरतुक मधील प्रसिद्ध "याबगो राजवटीच्या" राजाच्या राजवाड्यात गेलो. आता ह्याला राजवाडा आणि म्युझियम असे स्वरुप आहे. सध्याचा राजा याबगो मोहम्मद खान यांची भेट झाली. १३ व्या शतकात याबगो राजवट उदयाला आली. तुरतुक हे गाव व्यापार उदिमासाठी अतिशय मोक्याचे ठिकाण होते. चारही बाजूला जाणार सिल्क रस्ता तुरतुक मार्गे जात होता. चीन, तिबेट, अफगाणिस्तान, रशिया आणि भारत यांना जोडणारा रस्ता येथूनच होता. बाल्टिस्तनात तयार होणारे रेशीम (पष्मीना) याच मार्गे सर्व देशात जात असे. त्यामुळे बाल्टिस्तनाचा याबगो राजा काही महिने तुरतुक मध्ये वास्तव्य करत होता. आता राजाचे वंशज तुरतुक मध्ये आहेत आणि त्याचे राज्य बाल्टिस्तान POK मध्ये आहे. मोहम्मद खान यांचे म्हणणे आहे की, गिलगीट बाल्टिस्तान अतिशय निसर्गरम्य प्रदेश असून; हा स्वतंत्र देश होता;  ना की तो काश्मीरचा भाग होता.  म्हणून त्याला POK न म्हणता POB म्हणायला हवे. म्युझियम मध्ये राजाचे भरजरी कपडे, आभूषणे, शस्त्रे, भांडी, फोटो सर्व पाहायला मिळाले. 
नास्ता करायला होम स्टे मध्ये आलो. आज दिदींने किसीर डोसा आणि समीक (दही मध्ये लोकल हर्बल घालून बनविलेली चटणी) आणि आमलेट तसेच गुडगुड चहा आणि साखरेचा चहा असा मस्त बेत होता. भरपेट किसीर डोसा खाल्ला. गराडीच्या मुसाची आठवण झाली. 

आता सुरू झाली सायकल राईड त्याक्षी गावाकडे... हे भारताच्या सीमेवरच गाव; तुरतुक पासून चार किमी वर आहे.  येथे मिलिटरी चेकपोस्ट आहे. चेकपोस्ट पासून त्याक्षी हे मूळ गाव येथून दिड किमीवर पहाडात आहे. पहाडी रस्ता पूर्णतः खड्ड्याखुड्ड्याचा आणि दुर्गम चढाचा होता. येथे दोन मोटरसायकलिस्ट भेटले त्यांनी त्याक्षी गावापर्यंत आम्हाला सोडले. गावातून एक किलोमीटर चालत गेल्यावर, एका शाळेत पोहोचलो. ती शाळा पाकिस्तानने बांधलेली आहे आणि आता भारतीय मुलं येथे शिकत आहेत. जवळच चहा नास्त्याचे निसर्गरम्य हॉटेल होते. समोर मोठी दरी त्या पलीकडच्या डोंगरावर एका बाजूला भारतीय बंकर तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानी बंकर दिसत होते.  "बॉर्डर विव्ह कॅफे" हॉटेलवाल्याच्या प्रांगणात तिरंगा फडकत होता. तेथे जोरदार सिंहगर्जना केली...
"भारतमाता की जय", जी पाकिस्तानी बंकर पर्यंत ऐकायला गेली असेल.  हॉटेल मध्ये एप्रिकोट सूपचा स्वाद घेतला. खाली दरीत दिसणारी श्योक नदी भारत ओलांडून POK मध्ये जात होती. मनोमन इच्छा झाली... लवकरच हा POK भारताच्या अधिपत्याखाली यावा मग येथूनच सायकलिंग करत गिलगीट बाल्टिस्तान मध्ये जाता येईल. चेकपोस्ट पासून पुढे चार किमी वर थांग गाव आहे. परंतु ते टुरिस्ट साठी खुले झालेले नाही. 
त्याक्षी गावाची लोकवस्ती साधारण हजार भर आहे. येथील लोक सरकारी नोकरीत आहेत, तसेच आर्मीसाठी पोर्टर म्हणून काम करीत असतात. येथे आक्रोड, जरदाळू आणि सफरचंदाच्या बागा आहेत. आता बरेच टुरिस्ट या गावाला भेट देतात. येथे होम स्टे ची सुद्धा व्यवस्था आहे. गव्हाची शेती प्रमुख आहे. भारत POK सीमेवरील निसर्गरम्य गाव म्हणून याला आता बरीच प्रसिद्धी मिळाली आहे. 

Pok मधील गिलगीट परिसरात K2 हे जगातील दोन नंबरचे उंच शिखर आहे. खरोखरच भारताचे हे अति उत्तरेकडचे टोक लडाखला जाणाऱ्या प्रत्येक भारतीयाने पाहिले पाहिजे. 

त्याक्षी गावातून खाली उतरताना मोटरसायकलने भारत भ्रमण करणारे यु ट्युबर किरण-सचिन दाम्पत्याची भेट झाली. सायकलिंग करत येथवर आलोय, यांचे त्यांना खूप अप्रूप वाटले. त्यांनी यु ट्यूब साठी छोटीसी मुलाखत पण घेतली. वळणावळणाच्या पहाडी रस्त्याने परतीची सायकलिंग सुरू झाली. आमचे एक सायकलिस्ट सहकारी डॉ. भगत तुरतुक ते कन्याकुमारी अशी सायकल सफर करणार आहेत. त्यानी ती सफर त्याक्षी पासून सुरू करावी... तेथील तिरंग्याला वंदन करून...

आज सायकलिंगच्या बरोबरीने ट्रेकिंग सुद्धा झाले होते. तुरतुक मध्ये आजचा मुक्काम होता. तसेच ज्या रस्त्याने आलो त्याच रस्त्यावर पुन्हा परतीचे सायकलिंग टाळण्यासाठी तुरतुक वरून कॅम्पर करायचे नक्की केले. या साठी गावात फेरफटका मारला. जरदाळू आणि सफरचंदाचा फार मोठा व्यापार तुरतुक गावातून चालतो.  लाकडी पुलावर फोटो काढले. 

कापरो हॉटेलची मालकीण बानू हिने घरातील मेहमान आहेत असेच समजून आमचे जेवणखाण आणि राहण्याची व्यवस्था केली. "आपके दोस्त आये तो यह रुकनेके लिये बोलना" अशी विनंती सुद्धा केली.  बानू दिदीने स्कॉर्पियो गाडीची व्यवस्था करून दिली.
सकाळी नास्ता करून, कादिरच्या स्कॉर्पिओ गाडीवर सायकल बांधून अघम पर्यंत प्रवास करणार होतो. गाडीची सफर सुद्धा एन्जॉय करत होतो. गराडी, हुंडर या गावातून जाताना सर्व आठवणी जागृत होत होत्या. दिस्किटला चहा साठी थांबलो येथे गराडी च्या मुसा भाईची भेट झाली.  सायकल शॉपीवाला सोनम ची आठवण झाली. लांबूनच मैत्रेय बुद्धाला नमन केले. खालसर वरून एक फाटा खरडूनगला मार्गे लेहला जातो तर दुसरा पेंगोंग सो कडे जातो.  येथे पोलिसांनी अडवले आणि पेंगॉन्ग रस्ता बंद असल्याचे सांगितले. अघम पर्यंत जाऊन पुढे सायकलिंग करणार आहे हे सांगितल्यावर सोडले. अघम ते श्योक रस्ता लँड स्लाइडिंग मुळे एक आठवडा बंद होता. परंतु सायकलींना अशा रस्त्याची सवय झाली होती. अघम गावच्या सिमेवर पोहोचायला दुपारचे तीन वाजले होते. भूक लागली होती. 

जवळच असलेल्या टपरी वजा "ज्योमसा कॅफे" मध्ये पराठा आमलेट खाता खाता मालक नामग्याल याला कुठे राहायची व्यवस्था आहे का, तसेच गावात कायकाय पाहण्यासारखे आहे याची चौकशी केली.  गावातच त्याच्या घरातच व्यवस्था होईल हे सांगितले. तसेच येथून अकरा किमीवर पहाडातील तंगीयर गावात खूप जुनी मॉनेस्ट्री बघण्यासारखी आहे असे सांगितले. आम्ही लडाख मध्ये सायकलिंग करतोय, याचा नामग्याल ला  आनंद झाला होता.  पुढे एक किमी वर अघम गावात कादिरने आम्हाला सोडले. नामग्यालच्या घरातच एका खोलीत आमची राहण्याची व्यवस्था झाली. 
थोड्या वेळातच नामग्याल त्याची मारुती इको गाडी घेऊन आला. त्याच्या बरोबर  तंगीयरची जुनी मॉनेस्ट्री पाहण्यासाठी निघालो.  नामग्याल पंजाब युनिव्हर्सिटी मधून सोशियालॉजी मध्ये मास्टर्स करतोय. आता व्हेकेशन मध्ये घराचा हॉटेल व्यवसाय सांभाळतोय.  घरात आई वडील आणि दोन बहिणी आहेत. श्योक नदीच्या किनारी वसलेले चांगमा आणि पोपलारची खूप झाडे असलेले हे अधम गाव फक्त चार घरांचे आहे. गावातील सर्व एकमेकांचे नातेवाईक आहेत. जवळच्या पाच गावांचा मिळून एक सरपंच आहे. दुर्गम ठिकाणी वसलेले एव्हढे छोटे गाव पण शिक्षणाबद्दल अतिशय जागरूकता बघून खूप आनंद झाला. 

वाटेत लेह बेरीची झाडे लागली. याची पाने वाळवून त्याचा चहा बनवितात त्याला " सिबाक थोन टी" म्हणतात. लेह बेरी च्या बियापासून तेल काढतात. ते मार लागणे, जखम होणे, सूज येणे या साठी औषधी तेल म्हणून वापरतात. लेहबेरीच्याफळापासून ज्यूस बनवितात. हे तेल आणि ज्यूस फक्त स्पिती व्हॅली मध्ये उपलब्ध होते. 
 पूर्वी चरवाहे लोकांच्या बकऱ्या खायला स्नो लेपर्ड यायचे त्यांना पकडण्यासाठी आतल्या बाजूला मोठा आणि वर छोटा आकार असलेला एक चंबूसारखा खड्डा वाटेत लागला.
याला नेपाळी भाषेत 'शंगडोम' म्हणतात. यात एक बकरी ठेऊन स्नो लेपर्डला आकर्षित केले जाते. पण खड्यात पडल्यावर त्याला बाहेर पडता येत नसे. आता वन्य प्राण्यांना पकडणे मारणे प्रतिबंधित आहे. 
 
अकरा किमी चा वळणावळणाचा घाटातील रस्ता अतिशय दयनीय अवस्थेतील होता. जसे काही आम्ही होडीत बसलो आहोत. या गाडीत तंगीयार गावात राहणाऱ्या भाजीवाल्या महिलांना सुद्धा घेतले होते. विरंगुळा म्हणून या महिला नेपाळी गाणी म्हणत होत्या. 

तंगीयार गावात पोहोचलो. मॉनेस्ट्री उंच पहाडावर होती साधारण पाचशे मीटर्सची चढाई होती. पलीकडे ग्लेशियर दिसत होते. वाटेत रंगटंग ची झाडे लागली. याची पाने खाल्ली तर नशा येते. हिमाचल मधील अफूच्या झाडांसारखा हा प्रकार असावा. वाटेत गुंफा पण लागल्या. पूर्वी लोक गुंफेत रहात होते.  घाटी चढून १४ हजार फुटारच्या प्राचीन मॉनेस्ट्री जवळ आलो.  जुन्या मॉनेस्ट्रीच्या बाजूलाच नवीन मॉनेस्ट्री बांधली आहे. चौदाव्या शतकात बांधलेली जुनी दगडी  मॉनेस्ट्री अजूनही भक्कम अवस्थेत आहे. मंदिरात भगवान गौतम बुद्ध आणि दलाई लमा याच्या मूर्ती आहेत. तसेच लडाखी धर्मगुरू बाकुलर एम्बोचे यांचा फोटो आहे. मंदिराच्या आसपास असलेल्या घरांची पडझड झालीय. येथील कुटुंब आता नदीकिनारी स्थलांतरित झाली आहेत. 
मॉनेस्ट्रीच्या प्रदक्षिणेला स्कोरा म्हणतात. "ओम मणी पद्मे हुम" हा पवित्र बौद्ध मंत्र आहे. हा मंत्र म्हणत प्रदक्षिणा केली जाते. नवीन मॉनेस्ट्रीच्या दरवाज्यावर वूड कारविंग गंदारी, तिबेटीयन आणि लडाखी संस्कृतीचे दर्शन देतात. दसऱ्याच्या कालावधीत येथे उत्सव असतो त्याला "तंगपेचुवा" म्हणतात. तंगीयार गावातील प्राचीन मॉनेस्ट्री पाहून आजच्या दिवसाचे चीज झाल्याचे समाधान मिळाले. रात्री नामग्यालच्या समवेत हर्बल थुप्पा खाण्याचा योग आला. त्याच्या समवेत मॉनेस्ट्री पहिली याचा त्याला खूप आनंद झाला होता. 
अघम गावात येताच पुढचा रस्ता खुला झाल्याची बातमी मिळाली... 
भगवान बुद्धाच्या घेतलेल्या भेटीमुळे, परमेश्वरानेच आमचा पुढचा मार्ग सुकर केला होता.... 

सतीश जाधव
मुक्त पाखरे

सोगो संगीताचा आनंदघन"" हम तुम साहिर के संग" २६ सप्टेंबर २०२१

"सोगो संगीताचा आनंदघन"

"हम तुम साहिर के संग" २६ सप्टेंबर २०२१
कार्यक्रम करायचा म्हटले की नियोजन हे आलेच... ही प्रक्रिया सुरू होते तीन महिने अगोदर... कोविड मुळे सर्व गोष्टी थांबल्या होत्या. परंतू महिनाभर अगोदर सरकारी नियम थोडे शिथिल झाल्यावर आठवड्यातून तीन दिवस तालीम सुरू झाली. सर्वजण हिरीरीने प्रॅक्टिस करू लागले. 

भायखळ्याच्या हॉलचे वैशिट्य म्हणजे स्टेज, पडदे खुर्च्या, लाईट्स यांचे परिपूर्ण  आयोजन... सोबत चहा-कॉफी डिस्पेन्सर सुद्धा... त्या बरोबर बिस्किटे...  जेव्हा सर्व गायक मित्र-मंडळींची भेट होते तेव्हा आनंदाला पारावार राहत नाही... तालीम सुद्धा प्रत्येकजण मनापासून करतात... काही कलाकार पुन्हा प्रॅक्टिस करता यावी म्हणून उशिरापर्यंत थांबतात... आवाज कसाही असो... पण ज्याला गाण्याची आवड आहे आणि मेहनत करायची तयारी आहे अशा सर्व मनपा कलाकारांना या संगीत शाळेत घडविले जाते... त्याच्या आवाजाचा पोत पाहून गाणे दिले जाते.. मग प्रॅक्टिस करता करता त्याला घडविले जाते... रंगीत तालमी मध्ये अंतिम शो चे फिलिंग सर्वांमध्ये उतरते.

मुख्य शो चे पण अजब होते. सद्य परिस्थितीत हॉल मिळणे कठीण होते. म्हणूनच कोविड काळात कार्यरत असलेले पडद्यामगाचे  कलाकार म्हणून सर्व मनपा गायकवृंदाचा कोविड वरीयर्स म्हणून सन्मान करण्या निमित्ताने नेहमीचा हॉल मिळवीला.  ऐन वेळेला बॅकड्रॉप म्हणून भव्य LED ची व्यवस्था झाली. सर्व कलाकार चॉकलेटी रंगाच्या विविध छटा असलेल्या वेशात दोन वाजल्या पासूनच यायला लागले होते. 

प्रत्येकाला कामे वाटून दिली होती. गाण्याची स्क्रिप्ट देणे. चहा पाण्याची व्यवस्था, मेकअप, स्टेजवरील तयारी, गायक कलाकारांचे व्यवस्थापन, बसण्याची तसेच लाईट्सची व्यवस्था, या सर्व कामामध्ये काटेकोरपणा आणि सुसूत्रता होती. गम्मत म्हणजे पडेल ते काम प्रत्येक कलाकार करायला सज्ज होता. यावेळचे सुत्रसंचालन दोन कसलेल्या कलाकारांकडे सोपवले होते. 

रंगदेवतेची पूजा झाली... आणि संगीत मैफिलीला सुरुवात झाली... जवळपास १४ नवीन कलाकारांनी प्रथमच सोगोच्या स्टेज वर आपले गाणे सादर केले.  साहिरच्या विविध गाण्याच्या वेगवेगळ्या रंगछटा सर्व कलाकारांनी गायल्या.

या वेळच्या मध्यंतर पर्यंतच्या आणि मध्यंतर नंतरच्या गाण्यांमध्ये एक चढती भाजणी होती... त्यामुळे एक गोष्ट झाली... ती म्हणजे नृत्य करण्याची  हौस दोन्ही हाफ मध्ये भागवीता आली... बऱ्याच जुन्या जाणत्या कलाकारांनी पहिल्या हाफ मध्ये कला सादर केली... विशेष म्हणजे सर्व नवीन कलाकार सुद्धा पट्टीचे निघाले... आधी कसून केलेल्या सरावा मुळे सर्व नवीन कलाकारांमध्ये आत्मविश्वास जाणवला... जुन्या कलाकारांनी तर या संगीत मैफिलीला एक वेगळी उंची दिली. ताना, मुरक्या, आलाप, चेहऱ्याचे भाव, साथीदाराला नेत्र कटाक्ष देणे... या मध्ये प्रत्येक जण माहीर झाले होते. प्रत्येक कलाकाराला मिठाई आणि गुच्छ देऊन सत्कार करण्याची आयडिया एकदम भन्नाट.  सुत्रसंचालनाची खुमारी अतिशय वेगळी होती. सवाल जवाब अशी जुगलबंदीच होती. पण हो... या साठी सुद्धा खूप कसून पूर्व तयारी केली होती... 

एकंदरीत संपूर्ण कार्यक्रम आनंदाचा कौटुंबिक सुखसोहळा होता... कलाकारांबरोबर त्यांच्या कुटुंबाने.. आप्तस्वकीय... मित्र... सर्वांनी कार्यक्रम एन्जॉय केला... खूप महिन्यांनी झालेला "हम तुम साहिर के संग"  हा कार्यक्रम म्हणूनच विशेष लक्षात राहील.

# कार्यक्रमाचे अंतरंग #

सोगोच्या संगीत कार्यक्रमानिमित्त त्याचे जाणवलेले अंतरंग :- 

तालमीला नवे जुने कलाकार येतात तेव्हा प्रॅक्टिस सह एकमिकांना भेटणे हा सुद्धा उद्देश असतो...

 वैयक्तिक सुखद गोष्टी शेअर केल्या जातात... आणि कलाकार भेटल्यामुळे अंतरंगीचे दुःख पार नाहीसे होते... 
 
प्रत्येकाचे वाढदिवस साजरे करणे... स्वतःचे अथवा  मुलामुलींचे लग्न सेलिब्रेट करणे म्हणजे आनंदाचे प्रक्षेपण असते...

सर्वांमध्ये एक समान धागा आहे तो म्हणजे "मैत्रीचा" यात स्त्री-पुरुष, लहान-मोठा असा भेद नाही...

कार्यक्रम आणि प्रॅक्टिस यामुळे;  व्याधी, आजारपण, शास्त्रकिया त्यामुळे आलेले नैराश्य पळून जाते....

 निकटवर्तीयांचा मृत्यू; त्यामुळे कोसळणारे पहाडाएव्हढे दुःख, शीतल करण्याचे जालीम औषध म्हणजे सोगो मित्रपरिवार आहे....
 
येथे तयार झालेले कलाकार वेगवेगळ्या क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करत आहेत.. गायन, संगीत, वाद्यवादन, नाटक, सूत्रसंचालन, टीव्ही शो, यु ट्यूब इत्यादी क्षेत्रांत चमकत आहेत... आता तर घरगुती कौटुंबिक कार्यक्रमात सुद्धा सोगो कलाकार हिरीरीने भाग घेतात. कार्यक्रमाची जबाबदारी पार पाडतात. सोसायटीतील सार्वजनिक कार्यक्रमात सुद्धा आपली चमक दाखवितात... या मुळे कलाकारांचा सोगो बाहेरील मित्र परिवारात सुद्धा वाढ होत आहे...

येथील कलाकारांचे सुप्त गुण प्रचंड विकसित झाले आहेत.. कोणाही मध्ये आता स्टेजची भीती राहिलेली नाही.. माहीत नसलेले गुण उभारून आले आहेत..
हे सर्व टॅलंट पाहिल्यावर आपले कुटुंबीय, मित्रपरिवार सुद्धा भारावून जातात... 

घरातली मंडळी, कुटुंबीय सुद्धा आता गायला लागले आहेत.  सोगो कलाकारांसोबत गणपती, नवरात्रीत सर्व कार्यक्रमात भाग घेत आहेत... त्यांना सुद्धा इंस्पायरेशन मिळत आहे...

 घरच्यांसाठी चर्चा करायला गीत-संगीत हा एक नवीन विषय; आनंदाचे वाटप करण्यासाठी मिळाला आहे...
 
 यामुळे नव-नवीन संकल्पनांचा उदय होतोय आणि कल्पकता वाढीस लागते आहे...
 
 व्याधी मुक्त होण्याचे औषध म्हणजे सोगो...
 
 नवनवीन कलाकारांचा उदय होतोय सोगो मुळे...
 
 कलाकारांचे वक्तृत्व सुधारलय.. आत्मविश्वास वाढला...
 
 नवीन कपडे घालण्याचा सोस पूर्ण करता येतो...
 
 मुख्य कार्यक्रमात एकाच रंगाच्या निकशामुळे कौटुंबिक बॉंडिंग  वाढले ...
 
 सर्वांच्या कपड्यांचा  एक रंग पाहून इतरांना अप्रूप वाटते...
 
 सर्व जोडले गेले आहेत निव्वळ मैत्रीच्या धाग्याने...
 
 स्त्री पुरुष भेद कमी झाला आहे...
 
मैत्रीचे स्नेहाचे नाते सख्ख्या नात्यापेक्षा दृढ झाले आहे...

 प्रत्येकाच्या जीवनात  दुःखद घटना घडत असतात पण ते ते पचवण्याची ताकद सोगो ने दिलीय ...
 
 दुःख निवारण्याची सुखद गोळी आहे सोगो...
 
 नवीन क्षेत्रांत घवघवीत यश... इतरांकडून कौतुक...
 
 रिटायरमेंट नंतर एक पोकळी निर्माण होते.. तीसुद्धा भरून निघालीय... 
 
 सो गो म्हणजे आनंदाचे प्रक्षेपण....
 
 जीवनाचा नवा अर्थ सापडलाय..
 
सजण्या-धजण्या साठीचे ठिकाण हक्काचे ठिकाण...
 
 ताणतणाव विसरणे...
 
 संगीतात मशगुल होऊन रिलॅक्स होणे...
 
तारुण्य टिकविण्याचे साधन म्हणजे सोगो...

गंभीर शस्त्रक्रिया झालेले कलाकार सोगो मुळे लवकर बरे झाले आहेत...

स्वतःच्या तब्बेतिकडे लक्ष देण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील झालाय...  खूप वर्ष आनंदी जीवन जगायचंय प्रत्येकाला...  सोगोच्या संगतीने...
 
निर्माण झालेला ऊर्जा स्रोत इतर क्षेत्रांत सुद्धा चपलखपणे वापरता येऊ लागलाय..
 
मुख्य कार्यक्रमा अनुषंगाने :-

 प्रत्येकाच्या कामाचे वाटप त्यामुळे बंधुभाव वाढीस लागतो... कोणतही काम करण्याची प्रत्येकाची तयारी...
 
 लहान मोठे पद,  प्रतिष्ठा; समान पातळीवर आणली सोगोने...
 
कार्यालयात कोणत्या पदावर आहे या पेक्षा,  तो माझा मित्र किंवा मैत्रिणी आहे याचा आदरभाव वाढीस लागला आहे...
 
बोलताना प्रत्येकाच्या डोळ्यात प्रेमभाव दिसतो..
 
आपली वैगुण्ये विसरली जातात...
 
स्वतःला आहे तस स्वीकारण्याची कला प्राप्त झाली आहे...
 
त्यामुळे इतरांचे दोष सुद्धा दुर्लक्षित केले जातात...
 
आनंदी जीवन घडविण्याचा कारखाना सोगोने उघडलाय..
 
प्रत्येकाच्या तारुण्याला बहर आला आहे...

 जीवन जगण्याची कला प्राप्त झालीय...
 
 कुटुंबला सुद्धा विरंगुळा मिळण्याचे साधन; मुख्य कार्यक्रम...
 
 करोना सारख्या मोठ्या अवघड परिस्थितीतून मानसिकरीत्या सावरण्याची कला अवगत झाली...
 
 सोगो आता जिव्हाळ्याचे कुटुंब झाले आहे...
 
 एकमेकांना भेटलं; की फक्त गाणे आठवत...
 
 एक नवीन विषय इतर मित्रांमध्ये चर्चेला मिळतो.
 
आता वयाचे बंधन संपले आहे...

वेळेला मदतीचा हात पण सोगो देतंय...

जीवनाचा अर्थ समजू लागलाय...

कलाकार म्हणून उभारी आलीय.. कार्यक्रमात नाचणे बगडणे...  हे एक स्ट्रेस मॅनेजमेंट आहे...

स्वतःवर विनोद करण्याची कला अवगत झालीय...

स्वतःची कमतरताच स्ट्रॉग पॉईंट कसे बनवायचे हे उमजलय...

स्वतःवर प्रेम करायला शिकलाय प्रत्येक जण...

मित्राला मित्र म्हणून पाहणे... एकदम निरपेक्ष भावनेने...
 
सोगो म्हणजे आनंदाचा खजिना आहे.... जीवनभर पुरणारा...


सोगो ने बढती बदली रिटायरमेंट सुद्धा पाहिलीय कलाकारांची...

 नवरा , बायको, नात, नातू,  मूले, आई,  बाबा, आजी, आजोबा; तसेच आप्तस्वकीय आणि मित्रमंडळी सोगो कलाकारांचं  कौतुक करतात या पेक्षा मोठा आनंद काय असू शकतो...
 
आपण सर्व आनंदाचे भुकेले आहोत... त्याची गुरू किल्ली सापडली आहे सोगो मधून...

आनंदी जीवन जगण्यासाठी प्रभावी माध्यम ... 

सोगो कलाकारांच्या व्हिडीओ क्लिप देश, परदेशात सुद्धा पोहोचल्या आहेत....

परदेशात राहणारे स्वजन अतिषय जवळ आले आहेत... तिकडंन सुद्धा कौतुक होतंय...

युट्युब, इन्स्टाग्राम, फेसबुक येथून सुद्धा प्रचंड लाईक्स मिळत आहेत..

कार्यक्रमाची पूर्व तयारी :- 

मेकअपमन,  लाईटवाले, led स्क्रीनवाले, साउंड सिस्टीमवाले,  फोटोग्राफर , व्हिडीओग्राफर, सायनाचे रंगमंच कामगार, कराओके एडिटर आणि कंपोजर, कट आऊट, बॅनर, प्रॉप, नास्ता आणि चहा बनविणारे, सर्व कामे करणारे, देणगीदार, हॉल मिळवण्यासाठी आयडिया देणारे हे सर्व पडद्यामगाचे कलाकार आहेत...

 गाणी मॅनेजमेंट:-
 
गाण्याच्या सिक्वेस, त्याची वेळ, पहिला आणि दुसरा अंतरा सुरू होण्याच्या टाइम, सुत्रसंचालकांना दिलेला वेळ,  सुरुवात, माध्यतर, समाप्ती या सर्वांचा सेकंद-सेकंदाचा अभ्यास म्हणजे phd होईल.... यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणारे कार्यालयीन अधिकारी कर्मचारी यांचा सुद्धा मोठा हात आहे कार्यक्रम बहारदार करण्यासाठी...

कल्पक थीम निवडणे:- 

थीम ठरविणे, गाणी निवडणे, ती नेट वरून डाउनलोड करणे, कलाकारांना त्याच्या गायकी प्रमाणे गाणी वाटप, त्यांना एनकरेज करणे. गाण्यातील हरकती, चढउतार, पट्टी आणि जागा दाखविणे. ही म्हणजे प्रयोगशाळा आहे....

प्रॅक्टिस हॉल :- 

आता जो प्रॅक्टिस साठी हॉल बनविला आहे, "उसका क्या कहना"..  टाईल्स, रंग, जुन्या शोचे कट आऊट चहा, कॉफी, बिस्कीटची इन्स्टंट व्यवस्था... 

टेबल, खुर्च्या, लॅपटॉप, मोठा स्क्रीन, प्रोजेक्टर, साऊंड सिस्टीम ही तर प्रॅक्टिससाठी  पर्वणी आहे...

सर्वाचा सकारात्मक भाव आणि संगीताची आस्था येथे काम करते...
आता पर्यंत १०० पेक्षा जास्त कलाकार जॉईन झाले आहेत.
 ही या सर्व व्यवस्थेची पोचपावती आहे...

सोगो संगीताचा "आनंदघन" बरसतो आहे सर्वांवर...
 या संगीत सागरात चिंब भिजतो आहे प्रत्येक कलाकार... आणि सोगोला साथ देणारे पडद्यामगाचे किमयागार....
सतीश जाधव
मुक्त पाखरे...