Friday, January 14, 2022

मुंबई सिक्कीम - दार्जिलिंग टूर..... ३ जानेवारी २०२१

मुंबई  सिक्कीम-दार्जिलिंग टूर

३ जानेवारी २०२१

सकाळीच गंगटोकच्या ड्रीफ्ट हॉटेल मधून मॉर्निंग वॉकला निघालो.



शहरातील वळणावळणाच्या आणि चढत जाणाऱ्या रस्त्यावरून फेरफटका मारणे म्हणजे इथल्या थंड वातावरणाशी एकरूप होणे होते.
  

गुरुद्वारा आणि बौद्ध मंदिर (गुरू कुंभ टाकलुंग मॉंनेस्ट्री)  समोरासमोरच होते. 
  

वळणावर मिलिटरी गंजू लावा द्वार होते. आणखी वर चढून गेल्यावर भोलेबाबा सिद्धेश्वर शिव मंदिर लागले. या कौटुंबिक सहलीसाठी तीनही देवतांचे आशीर्वाद मिळाले होते.

 साधारण ४ किमी चढून गेल्यावर महात्मा गांधी मार्केट परिसर लागला. मार्केट बंद होते. खास टुरिस्टना फिरण्यासाठी तसेच खरेदीसाठी हा परिसर आहे. येथे गाड्याची रहदारी नाही. पुन्हा खाली उतरायला सुरुवात केली. आता अक्षरशः धावतच खाली उतरू लागलो. वेगळा मार्ग अवलंबला... पायऱ्याने खाली उतरू लागलो. वाटेत सिलिगुडी बस स्टँड लागला. स्थानिकांची खूप गर्दी होती या स्टँड जवळ...

 सरकारी बस स्टँड MG मार्केटच्या वर आहे. सिक्कीमची राजधानी गंगटोक हे शहर पूर्व हिमालयाच्या कुशीत वसलेले अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे.  येथे विनाकारण कोणीही हॉर्न वाजवत नाही. तसेच नागरिक स्वच्छतेची विशेष काळजी घेतात. शहराच्या मुख्य परिसरात फिरताना कोठेही कचरा आढळला नाही. महत्वाचे म्हणजे येथे प्लास्टिक बॅन तर आहेच, तसेच बिसलेरीच्या प्लास्टिक बाटल्या सुद्धा निषिद्ध आहेत.  येथील नळाला येणारे पाणी शुद्ध आहे आणि सर्वजण त्याचाच वापर करतात. हे खूपच भावले. 


सकाळचा नास्ता हॉटेलवर करून साडेदहा वाजता दोन ईनोव्हा गाडीने लाचुंगकडे सफर सुरू झाली.
दोन दिवस लाचुंगला राहणार होतो. त्यामुळे आवश्यक तेवढे कपडे घेऊन; एक्सट्रा लगेज हॉटेल वर ठेऊन दिले. येथून लाचुंग ११० किमी आहे. या मिलिटरीच्या नियंत्रणात असणाऱ्या टुरिस्ट गावासाठी लागणाऱ्या परमिटची व्यवस्था टूर ऑपरेटर चंद्राने आधीच करून ठेवली होती. आज ५५०० फूट उंची वरून ९००० फुटावरील लाचुंगला जाणार होतो... 

गाड्या डोंगरातील वळणावळणाच्या रस्त्याने वर वर चढू लागल्या...


डोंगर माथा पांढऱ्या शुभ्र बर्फाने झाकला गेला होता... थंडीत खास बर्फाची मजा घेण्यासाठीच ही सहल होती. छोट्या रस्त्यावरून एकदम हळूहळू गाड्या पुढे जात होत्या. रस्त्यात लागणारी प्रेक्षणीय स्थळे पाहणार होतो. 

दिड तासात बटरफ्लाय धबधब्याकडे पोहोचलो... अतिशय मनमोहक स्थळ...


बर्फाचं थंडगार दुधाळ जलप्रपात वातावरणातील थंडावा आणखी वाढवत होता. चारही बाजूला हिरवी टच्च झाडी आणि हुरहूरणारी थंडी ... धबधब्या समोरच्या व्हीव पॉईंटवर चढून गेलो. झोम्बणाऱ्या वाऱ्याला अंगावर घेत धबधब्याच्या लोकेशन वर फोटो काढले...


आमचे महिला मंडळ एकदम खुश होते. अशा स्थळावर फोटोग्राफीला बहर येतो. या परिसरसतील विविध रंगसंगतीच्या फुलपाखरांमुळे धबधब्याला बटरफ्लाय नाव पडले होते.

आता थंडी वाढू लागली होती. ढगाळ वातावरणामुळे  सूर्यदर्शन नव्हते. तिस्ता नदीच्या धिखू खोला पुलावर आलो... पुढे बांधलेल्या धरणामुळे नदी एकदम स्तब्ध झाली होती.


हिरव्यागार पाण्यात पडलेल्या डोंगर, ढगांचे प्रतिबिंब म्हणजे निसर्ग स्वतःला स्वतःच्या आरशात न्याहाळलो आहे, असे भासले...

मंगशिला गावाजवळील हॉटेल तिमोन मध्ये ऑथेंटीक सिक्कीमी जेवण मिळाले.  येथील पुलके पुरी एव्हढे बारीक होते. सिक्कीम मधील मुख्य अन्न भात असल्यामुळे पोळी हे येथील पक्वान्न आहे. परंतू चायनीज पदार्थ सर्रास मिळतात.

चुमाथांग कडे पुढील सफर सुरू झाली. सायंकाळच्या सूर्याची सोनेरी किरणे ढगांना सुवर्ण साज चढवत होती.

डोंगराच्या कपारी कपारीतून जाणारा रस्ता बऱ्यापैकी दुतर्फा होता. डोंगर चढायचा आणि उतरून परत दुसरा डोंगर चढायचा अशी सफर सुरू असताना मियांचू नाल्याजवळ पोहोचलो.

डोंगराच्या कपारी कपारीतुन खाली कोसळणाऱ्या ह्या धबधब्या जवळ जाताच थंडीची लहर धावून आली. याच्या थंडगार पाण्याचे थेंब अंगावर शिरशिरी आणत होते... परंतु नात शबरी या वातावरणाशी एव्हढी एकरूप झाली होती की तीला थंडी जाणवतच नव्हती. 
         अर्ध्या तासात चुंगथांग गावात पोहोचलो... गावाच्या वेशीवर रंगीबेरंगी पताका फडकत होत्या. ६००० फुटावर वसलेले हे गाव स्ट्रीट लाईट ने सजलेले होते.


गावात देवीचा वार्षिक उत्सव सुरू असल्यामुळे पंचक्रोशीतील बऱ्याच भाविकांच्या गाड्या डोंगराच्या  कडेला उभ्या होत्या... हळू हळू या गर्दीतून वाट काढत बाहेर पडलो... 

अंधार पडायला सुरुवात झाली आणि गाडीचा वेग आणखी कमी झाला... चुंगथांग ते लाचुंग  फक्त २१ किमी राहिले होते... रस्त्याच्या दोन्ही बाजूला आता ग्लेशियर दिसू लागले होते...काही ठिकाणी आजूबाजूची झाडे झुडपे, दरीच्या कडेला असलेले रेलिंग सुद्धा बर्फाने आच्छादले होते... सायंकाळच्या संधीप्रकाशातील धुक्याची चादर रस्तासुद्धा भुरकट करत होती... वर चढत जाणरा   खडबडीत रस्ता... चमकणारा बर्फ, धुक्यातील वाट, गाडीच्या काचा बंद करून सुद्धा बोचणारी थंडी... यात गाण्यांच्या मस्तीत चालणारी सावध गाडी... मानलं पाहिजे दोन्ही सारथ्यांना... तेव्हाच दोघांना पायलट ही उपाधी दिली... विमान चालविणे सुद्धा एव्हढे खडतर नसावे...

थोडा वेळ मार्गक्रमण केल्यावर एका वळणावर गाडी थांबली. एका मागोमाग एक बऱ्याच गाड्या थांबल्या होत्या. वाहतुकीच्या शिस्तीचे काटेकोरपणे पालन करत होत्या... हॉर्न नाही की गाड्यांच्या दोन रांगा नाही... भारताचा भाग असलेल्या सिक्कीममध्ये रहादरीची ही शिस्त पाहून खूप अभिमान वाटला... जवळपास पाऊण तास एकाच जागेवर उभे होतो.

 भूस्खलनामुळे बराच मोठा ढिगारा रस्त्यावर पडला होता...तो हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. वाहतूक सुरू झाली तरी कोणीही हॉर्न वाजवत नव्हते... स्वयंशिस्त हा सिक्कीमच्या टुरिझमचा पाया आहे... विशेष म्हणजे  गाडीतील कोणाला नैसर्गिक विधीसाठी जायचे असेल तर... जंगलात.. झाडाजवळ.. रस्त्यात कुठेही ड्रायव्हर गाडी थांबवत नाहीत... तर जेथे टॉयलेटची व्यवस्था आहे तेथेच थांबवतात... अर्जुन ड्रायव्हर म्हणाला, 'वर्षातून एकदा आमचे सेमिनार होते'. तेव्हा टुरिस्टशी कसे वागायचे तसेच नैसर्गिक साधन संपत्तीचे रक्षण कसे करायचे आणि पर्यावरण प्रेम या बाबत माहिती दिली जाते. विनाकारण कोणताही ड्रायव्हर हॉर्न वाजवत नाही. पर्यावरण प्रदूषित होऊ न देण्याचे महत्व सिक्कीमच्या प्रत्येक नागरिकाने जाणले आहे.  हे भारताचे भाग्यच म्हटले पाहिजे...

सात वाजता लाचुंग हेरिटेज हॉटेल वर पोहोचलो. हॉटेल अंधारात गुडूप झाले होते... हॉटेलची लाईट गेली होती... प्रचंड गारठा पडला होता... जनरेटर पण नव्हते. कन्हय्या ट्रॅव्हलला सांगून बाजूला असलेल्या  ताशी गारहिल हॉटेल मध्ये व्यवस्था झाली... हिटर पण मिळाले.  त्यावेळी  -१ तापमान होते. सर्वांसाठी हिटरची व्यवस्था झाल्यामुळे रात्रीचे -८ तापमान सुध्दा सुसह्य झाले होते... 

दोन जानेवारीला सकाळी ७ वाजता समुद्र सपाटीवरील मुंबईत होतो आणि आज तीन तारखेला रात्री सात वाजता (३६ तासात)  ९००० फुटावरच्या लाचुंग गावात पोहोचलो होतो... वातावरणातील प्रचंड बदल शरीराने स्वीकारण्यासाठी मनाची शक्ती कामी येणार होती...

सतीश जाधव
मुक्त पाखरे...

Tuesday, January 4, 2022

लडाख सायकलिंग भाग ४.... दि. ०३ ते ०५ ऑगस्ट २०२१

लडाख सायकलिंग भाग ४
दि. ०३ ते ०५ ऑगस्ट २०२१

नामग्यालच्या कुटुंबाच्या सदिच्छा घेऊन श्योक गावाकडे सायकल सफर सुरू केली. श्योक गाव येथून ४६ किमी वर आहे आणि २० किमी वर लँड स्लायडिंगवाला नाला पार करायचा आहे. ज्यामुळे गेले सहा दिवस रस्ता बंद होता. 
सुरुवातीलाच छान उतार लागला. संजय गोप्रोने निसर्गाचे चित्रिकरण करत होता. जुक बॉक्स वर गाणे लागले होते, "आ मेरी मंजिल बता, या जिंदगी को..."  परमेश्वराकडे एकच मागणे... निसर्गाचे सान्निध्य अखेरपर्यंत मिळावे...

 तासाभराची सफर झाली आणि अघम आर्मी कॅम्प जवळ पोहोचलो. येथे परमिट तपासले गेले. जवळच्या कॅन्टीनमध्ये चहा साठी थांबलो. उत्तराखंडच्या एक नवविवाहित जोडप्याची भेट झाली.
मुलगा सायकलिस्ट होता. बायकोला म्हणाला "आपण सुद्धा सायकलने फिरुया". आमच्यासह आवर्जून फोटो काढले. येथेच वर्दी मिळाली, "रस्ता खुल गया है, संभालके जाना" या रस्त्याने आज गाड्या पण यायला सुरुवात झाली होती. आर्मीवाल्यांनी एका मोठ्या दगडावर "ओम" लिहिले होते. सायकल सह तेथे फोटो काढला. "ओम ची साथ है तो क्या बात है". 

पुढचा रस्ता श्योक नदीच्या किनाऱ्याने डोंगराच्या कपारी कपारीतून होता. चढाचा रस्ता संपल्यावर नदीकिनारी वाळूचे पठार लागले. आज संजय खुशमिजाज मोड मध्ये होता. वाळूत सायकल उभ्या करून चक्क आडवा झाला आणि गाणे म्हणू लागला... " जब जब बहार आयी... मुझे तुम याद आये..." बायको पूजाला लडाखला घेऊन यावे... असेच विचार त्याच्या मनात असावेत. इथेच सायकलचे नाव संजयने "राणी" ठेवले.

ज्या ठिकाणी ढगफुटी होऊन रस्ता वाहून गेला होता तेथे आलो. रस्ता कुठेच दिसत नव्हता. माती , दगड, चिखल आणि थंडगार वाहते पाणी... यातून समानासह सायकल चालवणे मोठे आव्हान होते. अशा ठिकाणी बुटाऐवजी सँडल्स कामी येतात. 

 सायकल घातली पाण्यात... आणि बजरंगबलीचे नाव घेत जोरकस पेडलिंग केले... धाप लागली पण दम सोडला नाही... एका ठिकाणी सायकल लटपटली पण मोठे टायर असल्यामुळे सावरलीसुद्धा...  प्रयत्नपूर्वक पार झालो... जसे वाहत्या नदीतून  श्री रामाला केवटने पार केले होते... "अगर तुम हो साथ.. तो क्या है बात.. "सायकलला म्हणालो.
 
 थोडी विश्रांती घेऊन मार्गक्रमण सुरू झाले. श्योक नदीच्या किनाऱ्याने चढ उताराचा वळणावळणाचा... दोन ठिकाणी लँड स्लाइडिंगचा.. बर्फासारख्या थंड पाण्याचा रस्ता... आता श्योक गावाचा घाट सुरू झाला. तीन किमी घाट एकदम अंगावर येणारा होता... श्योक एक किमी असताना घाटात विश्रांती घेऊन माईल्स स्टोन जवळ फोटोशूट केले. पुन्हा नव्या दमाने पेडलिंग करून घाट पार केला. जवळच एक हॉटेल लागले.. भूक लागली होती. या हॉटेल मध्ये जेवणासाठी काहीही नव्हते म्हणून आणखी दोन किमी पुढे आलो. तेथील कटपा गेस्ट हाऊस मध्ये पडाव टाकला. कटपा हे नाव सध्या भारतभर प्रसिद्ध आहे...
 
 श्योक गावात फिरायला निघालो. येथूनच गलवान व्हॅली सुरू होते. श्योक नदीच्या पलीकडे आर्मीचा कॅम्प होता. तेथून १६० किमी अंतरावर भारत आणि चीन मध्ये झडप झाली होती. मनोमन शाहिद राम बाबू ला वंदन केले. लेह कडून श्योक गावाकडे येणारा रस्ता गलवान व्हॅली मधील सैनिकांना रसद पोहोचविण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. 
 
गावात बरेच होम स्टे आहेत.  आपण दमलेलो असतो म्हणून  गावाच्या सुरुवातीलाच होम स्टेच्या किमती जास्त सांगितल्या जातात. त्यामुळे चार ठिकाणी चौकशी करूनच कुठे राहायचे ते नक्की करायला हवे. उंच टेकाडावर श्योक मॉनेस्ट्री होती. परंतु थंड वारे सुटले होते... त्यामुळे मॉनेस्ट्रीकडे जाणे टाळले. रात्रीच्या जेवणा अगोदर सायकलची तेलमालिश केली. वातावरण खूपच थंड झाले होते अंमळ लवकरच झोपी गेलो. 

आज एकूण ५० किमी राईड झाली होती... आतापर्यंतच्या राईड मधली अतिशय निसर्गरम्य अशी आजची राईड होती.

सकाळी हेवी ब्रेकफास्ट करून डुरबूक कडे प्रस्थान केले. गाव सोडले आणि खडी चढाई सुरू झाली. वातावरण आल्हाददायक  होते. अतिशय दमदारपणे तासाभरात ही चढाई चढलो. पास वरील चौथऱ्याला चारी बाजूने पताका फडकत होत्या. पुढे उतार लागला. परंतु लँड स्लाईडीगचा प्रदेश होता. त्यामुळे दगडगोट्या मधून अतिशय सावधगिरीने पेडलिंग करावे लगत होते. काही ठिकाणी तर सायकल ढकलण्या शिवाय पर्याय नव्हता. 

 दोन तास राईड करून निमगो गावात पोहोचलो. येथे लामा मंडळी प्रेयर व्हीलचे बांधकाम करीत होते. त्यांनी आंबा आणि द्राक्ष ज्यूसने आमचे स्वागत केले. अतिशय योग्य वेळी आम्ही हायड्रेट झालो होतो. आता डुरबुक कडे राईड सुरू झाली. 
 
 पुढचा चढ उताराचा रस्ता असला तरी अतिशय घुळीचा होता त्यामुळे तोंड झाकून रायडिंग करत होतो. डुरबुकच्या आधी एक किलोमीटर वर पतियाळा ब्रिगेडचा कॅम्प आहे. त्यांचे स्लोगन होते, "कर्म ही धर्म" आणि त्या खाली लिहिले होते, "बजरंग बली की जय" खर आहे मारुतीरायाचे नाव घेतले की अंगात वीरश्री संचारते. येथे यशवंत पिसाळ पाटील हा मराठी जवान भेटला. अशा ठिकाणी मराठी "फौजी" भेटल्याचा अतिशय आनंद झाला. 
 
तासाभरात डुरबुकला पोहोचलो. येथे लेह वरून चांगला  पास मार्गे येणारा रस्ता मिळतो. डुरबुकच्या चारही बाजूला हिमालयाच्या पर्वतरांगा पसरल्या होत्या आणि शिखरे पांढऱ्या शुभ्र ग्लेशियरने चमचमत होती. येथे मिलिटरी पोस्ट होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्राफिक होती. जेवणाची विश्रांती घेतली, ड्रॅगन रेस्टॉरंट मध्ये आमलेट मॅगी वर ताव मारला.

येथे एका आयर्लंडच्या सायकलिस्टची भेट झाली. पठ्ठ्या सोलो सेल्फ सपोर्ट राईड करत होता. पेंगॉनग लेक वरून आला होता आणि  चांगला पास क्रॉस करून लेह कडे निघाला होता. 

  टकटक गावाकडे राईड सुरू झाली. रस्तासुद्धा टकाटक होता. दोन्ही बाजूला हिरवळ आणि हळूहळू चढत जाणाऱ्या रस्त्याच्या एका बाजूला लांबवर पाण्याचा पाट वाहत होता. त्याच्या पलीकडे जंगली घोड्यांचा कळप निवांतपणे चरत होता.  अतिशय सुंदर हिरव्यागार वातावरणाचा लाभ घेणे अपरिहार्य होते. येथे दोघांनी डान्स सुरू केले. १४ हजार फुटावर असल्यामुळे दमछाक झाली... आता चक्क हिरवळीवर पहुडलो... निळ्याशार आकाशातील पांढरेशुभ्र ढग न्याहाळू लागलो. आमचा डान्स पाहण्यासाठी ढगांनी सुद्धा आकाशात दाटी केली होती. थोडी मौजमस्ती करून पुढे निघालो. 

अर्ध्या तासात टकटक गावात पोहोचलो. छोट्याश्या टपरीवर कॉफी प्यालो, येथे राहण्याची व्यवस्था नव्हती म्हणून आणखी पुढे निघालो. मुगलेबला पोहोचलो. येथील माऊंटन होम स्टे मध्ये राहण्यासाठी खूपच जास्त पैसे मागितले. मालकिणीची परवानगी घेऊन तेथे टेंट लावले. त्यामुळे टेंटसह रात्रीचे जेवण आणि सकाळचा नास्ता याचे परहेड तीनशे रुपयांमध्ये काम झाले. हे गाव १४५०० फुटावर असल्यामुळे वातावरणातील विरळपणा जाणवत होता.  डुरबुक ते मुगलेब या १४५०० फुटवरील पट्ट्याला चांगथांग प्लाटू म्हणतात. 
टेंट झाडाखाली लावला. वारा सुटल्यामुळे थर्मल आणि दोन दोन टीशर्टने सर्व अंग झाकून घेतले. होमस्टेच्या मागे छोटा ओढा होता. तेथे फेरफटका मारला. सायंकाळ झाली होती आणि आकाशाचे सुंदर प्रतिबिंब छोट्या तलावाच्या पाण्यात पडले होते. 

रात्री वारे सुटले होते.. त्यात पाऊस पडू लागला.. टेंट भक्कम बांधून पडद्यावर मोठे मोठे दगड ठेवले होते. तरीसुद्धा भन्नाट वाऱ्याने टेंट फडफडत होता. टेंटच्या आतल्या बाजूनेसुद्धा बॅगा रचून ठेवल्या होत्या. ताशासारखा ताड ताड आवाज पावसाचा येत होता.  बराच वेळ गाणी ऐकत बसलो होतो. रात्री बाराच्या दरम्यात पाऊस निवळला तेव्हा निद्राधीन झालो.  सकाळी टेंटच्या बाजूची सर्व जमीन ओली असल्यामुळे सर्व बॅगा दिदीच्या घरात ठेवल्या आणि नंतर टेंट डिसमेंटल केला... १४५०० फुटावर रात्रीच्या पावसात टेंट मध्ये झोपणे हा सुद्धा रोमांचकारी अनुभव होता...

सकाळी नास्ता करून पेंगॉन्ग लेककडे राईड सुरू झाली. हळू हळू चढत जाणारा रस्ता होता... दिड तास राईड केल्यावर एक अवर्णनीय ठिकाणी पोहोचलो. "First View Of  Pangong Lake" या व्हीव पॉईंट वरुन.... लुकुंग १ किमी असा माईल स्टोन असलेल्या जागेवरून निळाशार पेंगांगचे दर्शन झाले. आनंदाला पारावार उरला नाही. एका मोठ्या स्थळाकडे आम्ही सायकलने पोहोचलो होतो. पहिल्यांदा पेंगांग लेक पाहिला तेव्हा स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते... सायकलने येथपर्यंत येऊ असे... सायकल सफारीतील महत्वाचा माईल्स स्टोन गाठला होता... 

 भरपूर फोटोग्राफी केली. खजूर खाऊन आनंद साजरा केला. येथून पेंगोंग लेक चार किमी आहे. पुढील रस्ता उताराचा होता.  भन्नाट वारे सुटले होते, त्यामुळे अंगात विंडचिटर चढविले. आकाशात ढगांनी दाटी केली होती. पाऊस पडण्याची चिन्हे होती. म्हणून जोरदार परंतु सावधगिरीने पेडलिंग करत होतो.  हेडविंड असल्यामुळे चार किमी जायला अर्धा तास लागला. 
 आता प्रत्यक्ष पेंगोंग लेक जवळ पोहोचलो होतो.  तलावाच्या या किनाऱ्यावर फक्त आम्ही दोघेच होतो. 
सायकलला लावलेल्या पताका जोरदार फडकत होत्या. जणूकाही अटकेपार झेंडे लावले होते. सायकलसह फोटो काढले तसेच तलावात उभे राहून सुद्धा फोटो काढले. अर्धा तास तलावासोबत गप्पा मारल्या... सायकलसुद्धा वाळूत निवांत उभ्या होत्या. कोणतीही कुरकुर न करता सायकलने दिलेली साथ तिच्या प्रेमात भर पडून गेली... याच ठिकाणी तिला नाव दिले... "सखी"...

मुख्य रस्त्यावर आल्यावर नैनिताल, अलमोरा, कौसानी चा माईल स्टोन दिसला... जगात प्रसिद्ध असणाऱ्या पेंगोंग तलावाजवळ हा बोर्ड का बरे लावला असावा... कोणाला सुचलं असेल बरं...

येथून पेंगोंगचा थ्री इडियट व्हीव पॉईंट चार किमी वर होता. तलावाच्या बाजूचा रस्ता चढ उताराचा आणि ऑफ रोडिंग होता. धापा टाकताच १४००० फुटावरच्या पेंगोंग तलावाच्या व्हीव पॉईंटला पोहोचलो... जेथे थ्री ईडीयट चित्रपटातील शेवटचा शॉट चित्रित झाला होता. आता या पॉईंटवर  चित्रपटात वापरलेली स्कुटर, हेल्मेट आणि तीन मित्रांचे पाठमोरे बसायचे बाकडे  या प्रत्येकी दहा-दहा वस्तू  रांगेत मांडल्या होत्या.  येथील पेंगोंग लेक साईडवर सायकल घेऊन जायला तेथील विक्रेत्यांनी मज्जाव केला.  एकंदरीत या सर्व गोष्टीमुळे पेंगोंगच्या प्राकृतिक सौंदर्याला अडथळा निर्माण झाला होता. थ्री ईडीयट हा चित्रपट ज्यांच्या जीवनावर आधारीत आहे... त्या, नेपाळी मुलांना घडविणारा शास्त्रज्ञ श्री सोनम वांगचुक यांना भेटण्याची प्रबळ इच्छा झाली...

या परिसरात बऱ्याच टुरिस्ट गाड्या आल्या होत्या.  एका हॉटेल मध्ये जेवत असताना प्रमोद दातार हे पुण्याचे गृहस्थ भेटले. आमच्या बरोबर फोटो काढण्यासाठी त्यांच्या टूरमधील इतरांना पण बोलावले. "आम्हाला चालताना पण दम लागतो आणि तुम्ही येथे.. लडाखमध्ये सायकल वर फिरताय.. कसं काय जमतं बुवा.."  संजय म्हणाला, "तुम्ही नियमित सायकल चालवायला लागा, बघा तुम्हालाही शक्य होईल".

येथे राहण्यासाठी टुमदार हटमेंट्स कम हॉटेल्स होते. दोघांना राहण्यासाठी अडीच हजार रुपये मोजण्याची आमची तयारी नव्हती. त्यामुळे पुढे बारा किमी वर तलावा किनारी असलेल्या स्पंगमीक गावाकडे जायचे नक्की केले.

 रस्ता फक्त दगडांचाच होता पाहिले पाच किमी चढाचा रस्ता दम काढत चढून गेलो. आता उतार आणि ऑफ रोडिंग मोठमोठया दगडांचा रस्ता, काही ठिकाणी पाण्याचे ओहळ, रस्ते डायव्हर्ट केलेले.. .  त्यात सायकल घातली...  सायकल सुसाटत निघाली... पुढचे शॉक ओबसोर्बर रिलीज केले होते.  सीट वर न बसता थोडे पुढे झुकून हँडल व्यवस्थित पकडून, नजर रस्त्यावर फोकस करून सायकल पळवू लागलो. अक्षरशः संपूर्ण शरीर लहान मुलांच्या खुळखुळ्या प्रमाणे खुळखुळत होते. MTB सायकल रस्ता पकडून उडत उडत चालली होती. कॅननडेल या ब्रँडची सायकल दिल्याबद्दल समर्पयामीच्या मयुरेशची प्रकर्षाने आठवण झाली. मनोमन त्याचे आभार मानले.  संजयच्या हायब्रीड सायकलला उताराच्या ऑफ रोडिंगमध्ये वेग घेता येत नव्हता.  अतिशय सावधगिरीने संजय सायकल चालवत होता. 

संजय म्हणाला, "असेच रस्ते असतील आणि पेंगोंगच पहायचे असेल तर आपण झंस्कार व्हॅलीतच सायकलिंग करूया".  त्याला होकार दिला,  पण आतलं मन सांगत होतं, आपण सायकलिंगसाठी आलोय आणि कार्यक्रमाचा रूट आधीच ठरविला आहे... असो... मित्र बरोबर असल्यामुळे त्याच्या पण शब्दाला मान देने आवश्यक होते.  त्याची अडचण लक्षात येत होती... त्याची हायब्रीड सायकल असल्यामुळे त्याला काही लिमिटेशन्स आहेत. आदित्य काकाने सांगितलं होतं, " लडाख मध्ये तुम्हाला चांगल्या रस्त्यासोबत ऑफ रोडिंग, चढउताराचे, दगडधोंड्याचे, नाले-ओढे रस्त्यात वाहणारे, चिखलाचे, मोठमोठे पत्थर असणारे, लँड स्लायडिंगवाले अशा बऱ्याच प्रकारच्या रस्त्यांना सामोरं जावं लागेल... आणि त्याला MTB  सायकल हाच पर्याय आहे. अशा रस्त्यावर MTB सुद्धा खूप सांभाळून चालवावी लागते. 
स्पंगमीक गावात येई पर्यंत चार वाजले होते. दिस्किट होम स्टे मध्ये जेवण नास्त्यासह सहाशे परहेड अशी व्यवस्था झाली. आल्या आल्या वेल कम ड्रिंक म्हणून दिदीने गरमागरम चहा दिला. सोलरवर तापलेले गरम पाणी आंघोळीला मिळाले. आज चार दिवसानंतर आंघोळ करत होतो. कपडे धुण्याचा पण घाट घातला. 
  मस्त फ्रेश होऊन स्पंगमीक जवळील पेंगोंग तलावाकडे निघालो. ऊन होते पण हवेत गारठा सुद्धा होता, त्यामुळे थर्मल घालून पेंगोंग किनारी पोहोचलो. निळाशार विस्तीर्ण पसरलेल्या पेंगोंग तलावातील लाटा जणूकाही आभाळाची निळाई घेऊन किनाऱ्याकडे धावत होत्या.
त्यांच्या भेटीला मुंबईतून दोन सायकल वेडे आले होते. 
बराच वेळ तलावाच्या सान्निध्यात रममाण झालो... लाटांची गाज... वाऱ्याचा साज... आणि उन्हाचा मसाज... अंगावर घेत किनाऱ्यावर निवांत बसलो होतो... किती वेळ झाला कळलेच नाही... संजय गोप्रो घेऊन पेंगोंगला डोळ्यासोबत कॅमेऱ्यात सुद्धा कैद करत होता.
   उद्या येथूनच चुशूल मार्गे सोमोरीरी तलावाकडे प्रस्थान करायचे होते. त्यामुळे पुढचा रस्ता चालू आहे काय... कोठून जातो याची चौकशी करायला गावातील पोलीस चेकपोस्ट कडे पोहोचलो. येथे समजले, गलवान व्हॅलीत झालेल्या तणावामुळे चुशूल वरून सोमोरीरी कडे जाणारा रस्ता टुरिस्ट साठी बंद केला आहे... सोमोरीरीचे परमिट दाखविले तसे पोलीस म्हणाला परमिटवर तुमचा रूट खारू वरून आहे. चुशूलचे परमिट यात दिलेले नाही... किंबहूना तुमचे परमिट पेंगोंग व्हीव पॉईंट पर्यंत आहे. यात स्पंगमीक सुद्धा नाही... परंतु गावकऱ्यांच्या विनंती मुळेच स्पंगमीक पर्यंत टुरिस्ट ना येऊ देतो. आमचा भ्रम निरास झाला होता.  ऑन लाईन परमिट मध्ये असलेल्या सर्व लडाख प्रदेशाचे परमिट काढले होते. जो प्रदेश ऑन लाईन मध्ये नाही त्या साठी लेह तहसील कार्यालयातून स्पेशल परमिट घ्यावे लागते, हे माहीत झाले. सर्व सायकलिस्टनी ही बाब अवश्य लक्षात ठेवावी. 

आता आम्हाला स्पंगमीक कडून मागे फिरून डुरबुक मार्गे,चांगला पास ओलांडून खारू पर्यंत मागे जावे लागणार होते. आलेल्या रस्त्यावरून मागे सायकलिंग करत जाणे आणि खारू ला पोहोचणे याला तीन दिवस लागले असते. नेमकी आठवड्याने सुटणारी स्पंगमीक लेह बस उद्या निघणार होती. तिने परतीचा प्रवास करायचा नक्की केले... 
   सफरीच्या अनुभवात चांगली भर पडली होती... यामुळे, पुढे येणाऱ्या सायकलिस्टना नक्कीच लाभ होईल. जवळच्या बुद्धा गेस्ट हाऊस मध्ये चहा प्यायला थांबलो. प्रचंड वारे सुटले होते. प्रत्येक घरावर लावलेले झेंडे वाऱ्याच्या दिशेने फडफडत होते. 
 हॉटेल मध्ये बसून चहा पिता पिता काचेमधून जगप्रसिद्ध पेंगोंग लेक  डोळ्यात सामावून घेत होतो. बकेट लिस्ट मधील एक इच्छा पूर्णत्वाला गेली होती...
पेंगोंगकडे पाहताना काहीतरी मनात घोळत होत... त्यानां शब्दात पकडण्याचा प्रयत्न केला...

निसर्ग  खरा मित्र
 भेटे तो सर्वत्र
 
आहे एक  सखी
नामाची साथ मुखी
 
 मनी तिचाच विचार
 राहतो सदा निरंतर
 
 निसर्गास भेटवते
 शरीरस्वास्थ्यही जपते
 
 आनंदगान मनी झिरपते
 ओढ त्याची अविरत असते
 
 जे जे हवे ते जीवनी जो देतो
 तेथेच सदासर्वदा जीव विसावतो

खूप छान मनाचे मनोरम रमणे....
लाभो सदासर्वदा आनंदी जगणे...

मिळो जे वांछील जाच्ये त्याला...
हिच प्रार्थना असे त्या  जगंनियंत्याला...

मुक्त पाखराचे हे गान...
विसरून जाई देहभान...

सतीश जाधव
मुक्त पाखरे...