Friday, April 12, 2024

टकलू टकली की पाठशाला सायकल राईड...

टकलू टकली की पाठशाला सायकल राईड...

 आज घरातली कामे आटपायची असल्यामुळे... सकाळी राईड न करता मेडीटेशन नंतर चोवीस सूर्यनमस्कार केले...

न्याहरी झाल्यावर निघालो बाजारहाट आणि बँकेची कामे करण्यासाठी सायकल घेऊन...

कांदे बटाटे आणणे, ज्वारी बाजरी आणि बेसनचे पीठ आणणे, परिसच्या सायकलची सीट बदलणे, हळू फिरणाऱ्या पंख्यासाठी कपॅसिटर आणणे... ही बाजाराची कामे... तसेच बँक पास बुक अपडेट करणे, लोन स्टेटमेंट घेणे, जुने बँक खाते बंद करणे... ही बँकेची कामे आटपली...

वाटेत परममित्र विकास कोळीचा फोन आला...  परेल येथील कॅनशाळा मुंबई पब्लिक स्कूल  (कॅन्सरग्रस्त मुलांची शाळा) येथून मेडल आणि ट्रॉफी स्विकारण्याचे काम मिळाले... कॅन्सर झालेल्या मुलांची वेगळी शाळा आहे हे पहिल्यांदा कळले... टकलू टकली की पाठशाला असे या शाळेचे विशेष नाव आहे... ४ फेब्रुवारी ते १० मार्च दरम्यान ५०० किमी पेक्षा जास्त अंतर सायकलिंग करून विकासला मेडल आणि ट्रॉफी मिळाली होती... याच दिवसात विकासने मुंबई ते अयोध्या सायकल वारी पूर्ण केली होती... त्यामुळे Super Hiros Fighting the Cancer हा बहुमान त्याला मिळाला होता...

विकासच्यावतीनं एखाद्या कॅन्सरग्रस्त मुलाकडून मेडल स्वीकारायचे योजले होते...

 उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे मुलांची भेट झाली नाही... त्यामुळे या सायकल वारीचे संयोजक आणि रिजनल हेड डॉ सचिन तावरे  यांच्या हस्ते पदक आणि ट्रॉफी स्वीकारली..


तसेच  उन्हाळ्याची सुट्टी संपल्यावर  कॅनकिड्स सुपर होरोंना  भेटायचे ठरविले...

लहान वयातच कॅन्सरग्रस्त झालेल्या या मुलांसाठी मनाचा एक कोना अतिशय हळवा झाला होता... आजची वीस किमी राईड या लहान सुपर हिरोंना अर्पण...

मंगल हो... !!! 






Monday, April 1, 2024

अयोध्या वारी...दिवस पहिला... २६ फेब्रुवारी २०२४

अयोध्या वारी...

दिवस पहिला... २६ फेब्रुवारी २०२४

सकाळीच नागपूर स्टेशनमध्ये आगमन झाले. येथील परममित्र दिलीप वरकड आणि प्रदीप देशपांडे यांनी इतर सायकलिस्ट मित्रांसोबत रेल्वे स्टेशनमध्येच गुलाबपुष्प देऊन सर्वांचे स्वागत केले... अरुण नेवसेच्या नागपूरच्या मित्रांनी शुभेच्छासह सुकामेवा पाकीटे  दिली.

नागपूर शहर सायकल वारी सुरू झाली... वाटेत प्रथम नागपूरचे ग्रामदैवत श्री रामाचे दर्शन घेतले...

तेथून झीरो पॉइंटकडे आलो... भारताचा केंद्रबिंदू किंवा मध्य ह्या स्थळाला म्हणतात... 

तेथून हायकोर्ट इमारत आणि  विधानभवन पाहिले... येथील विधानभवनात महाराष्ट्र सरकारचे हिवाळी अधिवेशन भरते... 

वाटेत दक्षिण दावणगिरी लोणी स्पंज डोसाची ट्रीट मिळाली... अतिशय स्वादिष्ट आणि लुसलुशीत स्पंज डोसा जिभेवर ठेवताच विरघळून जात होता...


बाजूलाच असलेल्या चहावाल्या दादांनी चहाचे पैसे घ्यायला नकार दिला... नागपूरची नवीन ओळख मिळाली...

अयोध्या वारी सुरू झाली नागपूरच्या  स्वातंत्रवीर सावरकर चौकातून...  तेथे भेट झालेल्या सेलिब्रिटी आणि जगप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी DD TV साठी  मुलाखत घेतली...


आणि अयोध्या वारीला शुभेच्छा दिल्या... येथेच नर्मदा परिक्रमा पायी करणारे समाजसेवक श्री संजय कठाळे यांची ओळख झाली...

तेथून सर्वजण दिलीपच्या वरकडच्या घरी निघालो. दिलीपच्या घरचा पाहुणचार एकदम फर्मास होता... त्याच्या घरातील कलात्मकता एकदम भावली... मेडल्स ट्रॉफी आणि प्रमाणपत्रांनी घराचा एक कोनाडा व्यापला होता...


तसेच घराला घरपण देणारे कुटुंबीय आणि त्यांनी केलेला पाहुणचार एकदम फर्मास होता... टुमदार मोठ्या माडीपेक्षा दिलीपचे मन खूप मोठे आहे... याचा प्रत्यय आला...

नागपूर दर्शनासाठी स्थानिक सायकलिस्ट संजय आणि अर्चना बोंगीलवार, विश्वास चाटी, जयंत मेंधी आणि उदय पानवलकर यांनी सायकल साथ दिली... यावेळी खूप गप्पा झाल्या... सर्व सायकलिस्ट मित्रांना मुंबई वारी करण्याचे आमंत्रण दिले...

तेथून जागतिक विक्रमवीर आणि अल्ट्रा सायकलिस्ट डॉ. अमित समर्थाच्या घरी गेलो... एव्हढा मोठा माणूस... नागपूरची शान... आम्हाला "कूछ मिठा हो जाय" ची ट्रीट दिली...

सर्वांना सह्या दिल्या... आणि   झेंडा फडकवून नागपूर ते अयोध्या सायकल वारीसाठी शुभेच्छा दिल्या...

स्वातंत्रवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्तानं... नागपुरात वीर सावरकरांना आदरांजली वाहताना... सेलिब्रिटी आणि प्रतिथयश शेफ विष्णू मनोहर यांची भेट... तसेच अल्ट्रा सायकलिस्ट डॉ. अमित समर्थ यांनी केलेला फ्लॅग ऑफ आणि नागपूरचे सायकलिस्ट यांनी केलेले स्वागत... तसेच दिलीप वरकड व प्रदीप देशपांडे यांनी केलेला पाहुणचार... अरुण नेवसेच्या नागपूरच्या मित्रांनी शुभेच्छासह सुकामेवा पाकीट देणे... या सर्व गोष्टी वारीच्या आरंभाचा शुभसंकेत होता...

दुपारचे बारा वाजले नागपूर वरून पुढे प्रस्थान करायला... देवलापार गावापर्यंत जवळपास पासष्ट किमी सायकल सफर करायची होती... रामसेनेची  अयोध्यावारी एकदम झोकात सुरू झाली होती...

उन्हे चढली होती... त्यामुळे पेडलींगचा वेग अंमळ कमी झाला होता... दर दहा किमी अंतरावर हायड्रेशन साठी थांबावे लागत होते...

  चाळीस किमीवर एका ट्रक मधून दोन रामभक्त उतरले... आणि चहापान घेण्यासाठी आग्रह करू लागले... खंडाळा गावाजवळच्या  धाब्यावर थांबल्यावर... दोघांतील एकजण मालिशवाला निघाला...  राजेश नागपुरे... त्याने सर्वांच्या पायाला ऍक्युप्रेशर करून जबरदस्त मालिश केली...  छोट्या पेन्सिलच्या साहाय्याने पायाच्या बोटांच्या नसा दाबून संपूर्ण पायाचे मसल रिलॅक्स केले होते राजेशने... 

"ज्याची आपण इच्छा करतो... तेच आपल्याकडे चालत येते" या उक्तीचे प्रत्यंतर आले ... रात्रभराचा प्रवास आणि सकाळी नागपूर फिरून सायकलिंगला सुरुवात... यामुळे आलेल्या शिथिलतेला ऊर्जेत परिवर्तित करण्यासाठीच या मर्कटसेनेला हनुमंताच्या रूपाने भेटला होता राजेश... जवळपास पाऊण तासाचा ब्रेक झाला होता...

अंधार पडायच्या आधी थांबणे आवश्यक होते... त्यामुळेच पन्नास किमी अंतरावरील मनसर येथे थांबण्याचा निर्णय झाला...  मनसर येथील सरपंच कैलास नरुळे यांनी गावातील राम मंदिरात राहण्याची व्यवस्था केली .. तसेच जवळील पांडेजीच्या मेसमध्ये जेवणाची सुद्धा व्यवस्था केली... आज नागपूर दर्शनासह एकूण ७५ किमी राईड झाली होती...

वातावरणात गारवा होता... राममंदिर परिसरातील हनुमान मंदिराच्या व्हारांड्यावर झोपण्यासाठी पुजाऱ्याने भलेमोठे जाजम टाकले... अयोध्येला निघालेली वानरसेना महाबली हनुमंताच्या देखरेखीखाली होती... वारीच्या पहिल्याच दिवशी भेटलेल्या प्रत्येक रामभक्ताने आमची काळजी घेतली होती... 

ज्या वाटेने आम्ही निघालो होतो... तीच्यावरचा प्रवास हा स्वतःच स्वतःचे सार्थक होता... 

कृतार्थ मनाने झोपेच्या अधीन झालो...

जय श्री राम...

Thursday, March 21, 2024

खोपोली सायकलिंग... दि २१ मार्च २०२४

खोपोली सायकलिंग...

मुंबईहून खोपोलीसाठी नवनीत वरळीकर बरोबर सकाळी पाच वाजता सुरू केलेली राईड... साडेदहा वाजता पूर्ण झाली...

आजची राईड विविधतेने नटलेली आणि रंगीबेरंगी होती...

 कळंबोलीला सायकलिस्ट मित्र रोहितची आंबेरकर याची भेट...


वाटेत विमान खऱ्याखुऱ्या विमानाला भेट...

तसेच महडच्या वरद विनायकाचे दर्शन... 

खोपोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आशिर्वाद... आणि जिरेटोप मानवंदना... 

तसेच खोपोली नाक्यावर सायकलिस्ट मित्र सचिन बोराना आणि सुप्रसिद्ध रमाकांत हॉटेलचे मालक उदय साखरे यांची भेट...

खोपोली बाजारात मिळालेली विलायती चिंच... तर बालपणात घेऊन गेली...

तसेच बारीक मेथीची भाजी... एकदम टवटवीत होती...
भेंडी सुद्धा हिरवी रसरशीत मिळाली...

पहाटेच्या ब्रम्हमुहूर्तावर सुरू केलीली 89 किमीची नुसती सायकल राईड नव्हती... 

तर सायकलिस्ट मित्रांच्या भेटीगाठी... 

स्थळ दर्शन...  

देवदर्शन... 

छत्रपतींना मानवंदना...  

खोपोलीचा गावरान बाजारहाट... 

सचिनने दिलेली ट्रीट... 

आणि धम्माल फोटोग्राफी... 

या सर्वांचा परिपाक होता... 

यालाच तर टुरिंग सायकलिंग म्हणतात...

सायकलद्वारे काय काय करता येते त्याचेच हे प्रात्यक्षिक होते...