Wednesday, September 4, 2024

सायकल सफर डेबरिंग ते सूमडो... प्राणवायूची कमतरता आणि अडचणी सोडविण्याची सुसंधी...दि. १९ जुलै २०२४

सायकल सफर डेबरिंग ते सूमडो... प्राणवायूची कमतरता आणि अडचणी सोडविण्याची सुसंधी...

दि. १९ जुलै २०२४

सोकर हॉटेल मध्ये रात्री जेवल्यावर संजय आणि परेश ताबडतोब झोपायला खोलीवर गेले...

 हॉटेलचा चालक संजीवबरोबर थोडावेळ गप्पा मारत बसलो... बर्फ वृष्टी सुरू झाल्यावर ऑक्टोबर ते जुन पर्यंत  लडाखचे रस्ते टुरिस्ट साठी बंद होतात... या वेळी हॉटेल बंद करून संजीव गोव्यामध्ये एका तीन तारांकित हॉटेल मध्ये काम करतो... त्याला विचारले अतिशय चांगला पगार, सुखासोई गोव्यात असताना... तू डेबरिंग मध्ये का येतोस... त्याने दिलेले उत्तर एकदम मार्मिक होते... 

टुरिस्ट लोकांची सेवा करण्याचे आणि चार लडाखी कुटुंबांना काम देऊन त्यांच्या  पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्याचे भाग्य मिळते... तसेच माझ्या मातृभूमीच्या... लडाखच्या सेवेसाठी आणि उन्नतीसाठी मी पुन्हा पुन्हा लडाख मध्ये येतो... गोव्याच्या पैशापेक्षा माझी लडाखी माणसे मला अतिशय प्रिय आहेत... 

खरचं परदेशात जाणारी आपली मुले असा विचार करतात काय... 

सायकल सफरी मध्ये भेटणारी माणसे... आपल्याला जीवनाचं तत्त्वज्ञान शिकवत असतात... संजीवला आश्वासन दिलं... माझ्या सर्व सायकलिस्ट मित्रांना तुझ्या  होम स्टेची नक्की शिफारस करेन... 

रात्री नऊ वाजता रूमवर आलो...  थोडावेळ ध्यानस्थ झालो...  संजय जोरजोरात श्वास घेत होता...  त्याला प्राणवायू  कमी पडत होता... अजून काहीकाळ लागणार होता त्याला वातावरणाशी एकरूप होण्यासाठी... 

रात्री गरम व्हायला लागले... म्हणून जाकीट कानटोपी ग्लोव्हज काढून टाकले... खिडकीची काच थोडी उघडली... दोघेही  निवांत झोपी गेले होते... 

पांग आणि डेबरिंग येथे  होम स्टे बाथरुमसह होत्या. तसेच आंघोळीसाठी विनंती केल्यावर गरम पाणी सुद्धा मिळाले होते... तसेच दोन्ही ठिकाणी सोलर  लाईट असल्यामुळे सायंकाळी सात ते अकरा दरम्यान इन्व्हर्टरवर लाईटची व्यवस्था होती... त्याच दरम्यान टॉर्च, पॉवर बँक, सायकल लाईट आणि मोबाईल चार्ज करुन घ्यावे लागत होते...  हॉट स्पॉट मार्फत गुगल पे द्वारे पैसे ट्रान्सफॉर्मर करण्याची सुविधा होती... आणि विनंती केल्यावर व्हॉट्स ॲप कॉल आणि  मेसेज पाठवता येत होते... म्हणूनच पोष्ट पेड सिमकार्ड नसून सुद्धा तुम्हा सर्वांना आमची ख्याली खुशाली कळवता येत होती... 

सकाळी पाच वाजता उठलो... प्रातर्विधी आटपून तासभर मेडीटेशन केले... येथे पहाटेच टकटकीत ऊजाडते... सात वाजता खोलीला जाग आली होती... 

संजीवचा सहकारी... नाष्टा किती वाजता लावायचा हे विचारायला आला... आम्ही हॉटेल मध्ये आल्यावर पराठे आण... सर्व कार्यक्रम आटपून बाहेर आल्यावर सायकलची मरम्मत सुरू झाली... डिझेलिंग आणि सिलिकॉन ऑईलींग करून सायकल रेडी झाल्या... 

बहारदार आलू पराठा... संजीवने अतिशय कलात्मकरित्या मेजावर आणला असता त्याचा फोटो तुम्हा सर्वांना पाठवण्याचा मोह आवरता आला नाही... पराठा मोठा असल्यामुळे तिघांनी अर्धा अर्धा खाल्ला... आणि उरलेला बांधून घेतला... 

संजीव म्हणाला... साठ किमी वर असलेल्या  सूमडो गावी जाण्यासाठी तुम्हाला लवकर निघायला हवे होते... मध्ये  पन्नास किमी वर मुद गाव लागेल तिथे सुद्धा राहण्याची व्यवस्था होईल... तसेच  वीस किमी वर असलेल्या  सोकर तलावा जवळ खाण्याची व्यवस्था होईल... 

बरोबर सव्वा नऊ वाजता सायकल वारी सुरू झाली... सूमडोकडे...  आता मनाली लेह हायवे सोडून माहेच्या रस्त्याला लागलो होतो...

 

रस्ता एकदम टकाटक होता... आणि गाड्यांची रहदारी कमी झाली होती... हळू हळू संजय मागे पडू लागला... त्याला मानसिक ऊर्जा देण्यासाठी... पुढे जाऊन पुन्हा मागे येत होतो... काही वेळाने लक्षात आले... तो खूपच मागे पडतो आहे...


त्यामुळे सतत त्याच्या मागे राहून त्याला मोटिव्हेट करत होतो... डांबरी रस्ता रोलिंग टाईप होता...
आताची राईड सुद्धा पंधरा हजार फुटावरुन सुरू असल्यामुळे वातावरण विरळ होते... त्यामुळे सतरा किमी वरील नोरबू गावात पोहोचायला दोन तास लागले होते...

तेथील नोरबू टपरी धाब्यावर उकडलेली अंडी आणि मॅगी ऑर्डर दिली... खुर्चीत बसल्या बसल्या संजय झोपी गेला होता... 

मालकाचे नाव सुद्धा नोरबू होते... त्याने विचारले... कुठून आलात... ताबडतोब "बंबईसे आया मेरा दोस्त दोस्त को सलाम करो" गाणे म्हणत डान्स सुरू झाला... त्यात परेश सुद्धा सामील झाला. 

त्या धाब्यावर तिबेटीयन मेंढा (न्यान) चे शिंग होते... ते शिंग सायकल वर ठेऊन फोटो काढले...

गाणे सुद्धा गायले...  हे सर्व संजयला रिलॅक्स करण्यासाठी होते... नोरबू म्हणाला येथून सुमडो चाळीस किमी आहे...  मध्ये नऊ किमीचा सोकर घाट आहे... तुम्ही नाही पोहोचू शकणार... त्याची इच्छा होती आम्ही तिथेच राहावे... आमचा प्लॅन बी तयार होता... 

नाष्टा करून नोरबु गावातून पुढे प्रस्थान केले... काम करता करता  भगवंताचे नाव घेणारा तिबेटी पहिला... त्याच्या  पाणीदार काळ्याभोर चेहऱ्यावर तेजाचे वलय होते... आणि "ॐ मणिपद्मे हूँ" या मंत्राचा जप सुरू होता... 

रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे गाड्यांसाठी वाळवंटातून तात्पुरता मार्ग तयार केला होता... त्यात मार्गावर एक डिझेल टँकर मातीत रुतून बसला होता... त्याला JCB ने बाहेर काढण्याचे जोरदार प्रयत्न सुरू होते...

पुढील चार किमी अंतरावरील सोकर गाव येई पर्यंत संजय एकदम थकला होता... आम्हाला सतत पुढे पुढे जा म्हणत होता... खुप दमलो आहे आता सायकलिंग करू शकणार नाही असा त्याचा घोषा सुरू झाला... सायकल ढकलत पुढे निघाला होता...


त्याचा माईंड गेम सुरू झाला होता... त्याच्या मनाने कच खाऊ नये म्हणून सतत त्याच्याशी बोलत होतो... पुढील चार किमी अंतर त्याने कसेबसे कापले... परेश मात्र निवांत पेडलिंग करत होता...

परेशला सांगितले आता पुढे जाऊन एखादी जीप मिळते का बघ... 

घाट नऊ किमीचा होता आणि आम्ही सोळा हजार फुटांवर जाणार होतो... एक अवघड शॉर्ट कट घाटी वर सायकल ढकलत चढलो... मातीवरून सायकल स्लीप होत होती... म्हणून पेडलींग करणे अशक्य होते... घाटावर मुद वरून येणाऱ्या दोन लगेज जीप आल्या... त्यांच्याशी बोलणे केल्यावर घाटाच्या टॉप पर्यंत घेऊन जाण्याचे तो आठशे रुपयात तयार झाला... पुढे सूमाडो गावापर्यंत उतारच होता... तीनही सायकल लगेजसह जीपमध्ये चढविल्या चढाचा रस्ता ऑफ रोडींग होता.. आम्ही ड्रायव्हर शेजारी न बसता... मागच्या बाजूला सायकल सांभाळत उभे राहिलो... वळणार आमचा तोल जात होता परंतु ब्रेक दाबून ठेवल्यामुळे सायकल हलत नव्हत्या...  वीस मिनिटात जीपने आम्हाला सोकर पास टॉप वर सोडले... 

प्रचंड वारे वाहत होते... लडाख मध्ये असलेल्या प्रत्येक घाटाच्या टॉपवर देवाची मूर्ती असते आणि दगड रचून प्रचंड पताके लावलेले असतात... लोकल गाड्या या टॉपला प्रदक्षिणा घालतात... फोटो कडून आम्ही सुद्धा प्रदक्षिणा घातली...

आता सुरू झाली डाऊन हील सायकल वारी... डांबरी रस्ता एकदम झकास होता... दोघेही पुढे झाले... मी किंचित मागे होतो... सायकल मधून घार घुर आवाज येऊ लागला... पाहिले तर मागचे मडगार्ड चाकाला घासत होते.... म्हणून ते काढून ठेवले... पुन्हा थोड्या वेळात चटाक पटाक आवाज येऊ लागला... पाहिले तर  सायकल फ्रेमला बांधलेली प्लॅस्टिक टॅग स्पोक मध्ये अडकत असल्यामुळे आवाज येत होता... टॅग सरळ केला... थोड्याच वेळात मागचा गियर अडकू लागला आणि खाड खुड आवाज येऊन चेन पडली... काहीतरी मेजर प्रॉब्लेम आला आहे याची जाणीव झाली... दोघेही बरेच पुढे गेले होते...

सायकल निरीक्षण करताना लक्षात आले मागचा डिरेलर हॅंगर  वाकडा झाला आहे... त्यामुळे दोन्ही पुली मधून चेन सटकत होती... सायकल उलटी केली...... टूल किट मधून पक्कड काढून हॅंगर सरळ करण्याचा प्रयत्न केला... पण तो सरळ  होईना...  चाक बाहेर काढल्या शिवाय हॅंगरचे  काम करता येणार नव्हते... दोघांना सायकल ब्रेक डाऊन झाली म्हणून निरोप देणे सुद्धा आवश्यक होते...

 तेव्हढ्यात एक कँपर टॉप वरून खाली आली... तिला थांबवून सायकल ब्रेक डाऊन झाली आहे... पुढील गावा पर्यंत सोडणार का ही विनंती केली... त्या कँपर मध्ये दोघेजण होते... तयार झाले आणि सायकल लोड करायला मदत सुद्धा केली... संजय आणि परेश अजून मी खाली येत नाही म्हणून वर चढायला निघाले होते... दोघेही वाटेत भेटले... सायकल ब्रेक डाऊन झाली आहे... पुढच्या गावात भेटूया म्हणून निरोप दिला... सायकलला प्रॉब्लेम कसा आला... या पेक्षा तो सोडवता कसा येईल याचे विचारचक्र सुरू झाले...

 पुढे उतारा वरच्या मुद गावातील धाब्यावर पोहोचलो... तिथेच गाडी थांबवून ड्रायव्हरच्या मदतीने  सायकल  खाली उतरवली... ड्रायव्हरला विचारले... किती पैसे देऊ... तर त्याने चटकन खिशातून शंभर रुपये काढून मला देऊ लागला... आणि म्हणाला मेरे पास इतना ही है... त्याला म्हणालो आपको कितना पैसा देऊ... त्याने हात जोडले... आणि त्याने समोरच असलेल्या BROच्या कॅम्प मध्ये जीप वळवली... हा अनुभव अतिशय अनपेक्षित होता... 

तेव्हढ्यात संजय आणि परेश पोहोचले होते... सर्ली वरील सर्व सामान काढून... तिला उलटी केली...

आणि मागील चाक काढून पकडीने वाकडा झालेला हॅंगर सरळ केला... सायकल गियर मध्ये टाकून तपासणी केली पण एक आणि दोन नंबरच्या गियरमध्ये चेन अडकत होती... त्या दोन गियर मध्ये सायकल न चालविण्याचे ठरविले... टेस्ट राईड घेतली... 

मुद गावाजवळील धाब्यावर चहा बरोबर सोबत आणलेले पराठे खाल्ले... वाटेत एक किमी वर गरम पाण्याचे झरे लागले...

 

तेथे फोटोग्राफी करून चार किमी वरील सुमडो गावात पोहोचलो... सर्लीने छान साथ दिली... सायंकाळचे सहा वाजले होते...

डेबरिंग ते सुमडो ह्या ५९ किमी सायकल राईडसाठी तब्बल नऊ तास लागले होते... यावरून लडाख मधील सायकलिंग किती जिकरीची आहे... याची कल्पना येते...

सुमडो गावात तीन चार होम स्टे पाहिले पण ते त्यांचे टॉयलेट बाथरूम बाहेर होते... त्यामुळे ते नाकारले... शेवटी सेल्फ कंटेन्ड रूम मिळाला... पण त्याने तीन पट जास्त पैसे सांगितले... तरीसुद्धा तो स्वीकारला... रात्री भर कडाक्याच्या थंडीत घराबाहेर लघवीला जाणे कठीण होते... घर मालकाने आंघोळीला गरम पाणी देण्याचे कबूल केले... या गावात इलेक्ट्रिसिटी आहे त्यामुळे चोवीस तास लाईट मिळणार होती... तसेच बाजूला असलेल्या मॉनेस्ट्री मधून वायफाय उपलब्ध झाले होते...

रात्री हॉटेल मध्ये दाल चावल आणि फुलगोभी भाजी जेवताना... मालकाला विचारले गावात फक्त तुमच्याच होम स्टे मध्ये सेल्फ कंटेन रूम का... तो म्हणाला.. येथील गावकरी अजून प्राचीन जगात वावरत आहेत... त्यांना घरात संडास ही संकल्पना मान्य नाही... पण त्यामुळे कुटुंबासह येणाऱ्या टुरिस्टचे वांदे होतात... ते त्यांना समजतच नाही... 

सूमडो हे गाव तिबेट मधून स्थलांतरित झालेल्या  विस्थापितांसाठी वसविलेले गाव आहे... त्यांच्या साठी  एस एस सी पर्यंत शाळा आणि हॉस्पिटल सुविधा सरकारने दिलेली आहे... गावात मोठे बुद्ध मंदिर मॉनेस्ट्री सुद्धा आहे... परंतु जुनी माणसे काळाप्रमाणे बदलायला तयार नाहीत... त्यामुळे बरेच टुरिस्ट सो मोरिरी किंवा हानलेला जातात...

संजयला आणखी विश्रांती घेण्याची गरज होती... त्यामुळे आणखी एक दिवस सूमडोला राहायचा विचार आहे... संजयला घेऊन ही सायकल वारी पूर्ण करण्याचा निर्धार आहे...

आलेल्या अडचणी सोडवत पुढे मार्गक्रमण करणे... हेच जीवनाचे तत्त्वज्ञान आहे...

सर्व अडचणी... प्रयत्नांची पराकाष्ठा करून सोडविल्यावर... मिळणारा आनंद अपरिमित असतो...



जय श्री राम

Tuesday, September 3, 2024

पांग मधील हुडहुडी थंडीची रात्र... सकाळी सुरू झाली पांग कडून डेबरिंग कडे सायकल सफर... १७ आणि १८ जुलै २०२४

पांग मधील हुडहुडी थंडीची रात्र...

सकाळी सुरू झाली पांगकडून डेबरिंगकडे सायकल सफर... 

१७ आणि १८ जुलै २०२४

पांग मध्ये सूर्य अस्ताला गेला आणि थंडी वाढली... सहा डिग्री सेल्सियास तापमान होते... जेवल्यावर संजय आणि परेश  झोपण्यासाठी रूमवर गेले...  सोनम दिदी कडून हॉट स्पॉट घेऊन दिवसभराचे वृत्त पोष्ट केले... त्यासाठी एक चहा प्यावा लागला...

रूममध्ये आलो तर संजय आणि परेश झोपण्याच्या तयारीत होते... पण त्यांच्या डोक्यात किणकिण सुरू असल्यामुळे दोघेही अंथरुणात तळमळत होते... एकदम १५ हजार फूट उंचीवर आल्यामुळे शरीर त्या वातावरणाशी एकरूप व्हायला थोडा वेळ घेणार होते... संजय तर उठून बसला होता... आणि परेश इकडून तिकडे वळवळत होता... माझ्या पण डोक्यात घंट्या वाजत होत्या... दोघांना उठवले आणि सतत भरपूर पाणी प्यायला सांगितले... 

अंथरुणात पडल्यावर माझ्या हृदयाचे ठोके वाढल्याची जाणीव झाली... पायाच्या अंगठ्याच्या नखातून सुद्धा हृदयाची धकधक  जाणवत होती... रात्री दर तासानी उठून लघवीला जात होतो आणि पाणी पीत होतो... परेश आणि संजयपण तेच करत होते... रात्री तापमान २ डिग्री सेल्सियस झाले होते... जवळपास तीन लिटर पाणी प्यायलो...

पहाटे पाच वाजता संजय म्हणाला मी साडेतीन पर्यंत जागा होतो... परेशची स्थिती पण तीच होती... दोघांना सांगितले आपले होमस्टे चेकआउट  दुपारी बारा पर्यंत आहे... त्यामुळे पुन्हा निवांत झोपा... वाटलच तर आणखी एक दिवस येथेच राहू... पण सकाळी ऊन आल्यावर तुम्ही नॉर्मल व्हाल...

सकाळी आठ वाजता आम्ही सर्व ठिकठाक झालो... पुढे जाण्याच्या तयारीला लागलो... सोनम दिदीकडे नाष्टा केला... पुन्हा येण्याची दिदीने विनंती  केली... सकाळीच तिच्या कडून हॉटस्पॉट घेऊन... सर्वांना खुशाली कळविली... दिदीने चॉकलेटस् भेट दिली...

आता सफर सुरू झाली पांग वरून डेबरिंगकडे...

सुरुवातच ऑफ रोडिंग घाटाने झाली... धूळ, माती दगडाचे रस्ते... त्यात गाड्यांची रहदारी सुद्धा सुरू झाली होती... काही ठिकाणी रात्री लॅंड  स्लाईड झाल्यामुळे रस्ता सफाईचे काम  चालू  होते...

दगडधोंड्या मधून सामानासह घाट चढण्यासाठी पायात  ताकद आणि मनाची प्रचंड कणखरता लागते... बऱ्याच वेळा थांबावे लागले... पण घाट पूर्ण केला... 

मोरे टॉपवर आलो... प्रचंड वारे सुटले होते... तेथे कारने आलेल्या इस्त्रायली टुरिस्टची ओळख झाली..

आम्ही लडाख मध्ये सेल्फ सपोर्ट सायकलिंग करतोय यांचा त्यांना खूप आनंद झाला... 

आता सोळा हजार फुटांवरील पस्तीस किमीची  मोरे प्लेनची सायकल सफर पार करायची होती. मागच्या दोन लडाख सफरीच्या वेळी मोरे प्लेन बॅकविंडमुळे तरंगत पार केला होता... पण आज वारा लहरी झाला होता... कधी मागून, कधी पुढून, कधी बाजूकडून वारा वहात होता... दोन वेळा चक्रवात पण पाहायला मिळाला... त्यामुळे मार्गक्रमण करायला कष्ट पडत होते... 

प्रत्येकाने तीन तीन लिटर पाणी सोबत घेतले होते... चिक्की आणि लाडूचा स्टॉक होता... मोरे प्लेनवर  एकही स्टॉल किंवा हॉटेल नव्हते... त्यामुळे वाटेत थांबत चिक्की, लाडू आणि सोनम दिदीने दिलेल्या गोळ्या खात आणि पाणी पीत... सफर पूर्ण झाली... 

४४ किमी अंतर पार करायला सात तास लागले होते...

डेबरिंग ते माहे बायपास वरच सोकर हॉटेल होते... हॉटेल चालक संजीवने रूम दाखविले...  डबल बेडरूम मध्ये आणखी एक गादी टाकून दिली...


सोकर हॉटेल मध्ये जेवण घेतले आणि रिलॅक्स झालो...डेबरिंग सुद्धा १५७५० फूट उंचीवर आहे... परंतु १६ हजार फुटांवरून खाली आल्यामुळे वातावरणाशी समरस झालो होतो... 

आता हळू हळू सूर्य अस्ताला गेला... त्यामुळे वातावरणातला गारवा वाढला होता... पण आज सायकलिंग केल्यामुळे  सर्व स्वस्थ होतो...

आजची संपूर्ण सायकलिंग पंधरा हजार फुटांच्यावर होती... त्यामुळे  उमलींगला सफर व्यवस्थित पूर्ण होणार याची खात्री झाली...

जय श्री राम...

Monday, September 2, 2024

लडाख मधील उमलींगला पास सायकल वारी...सायकल रेल्वेने आणि बसने कशी न्यायची...१५ ते १७ जुलै २०२४...

लडाख मधील उमलींगला पास सायकल वारी... १५ ते १७ जुलै २०२४

सायकल रेल्वेने आणि बसने कशी न्यायची...

दोन दिवस अगोदर वांद्रा टर्मिनसला जाऊन चंदीगड एक्स्प्रेस ट्रेनच्या लगेज मध्ये सायकल टाकण्याबाबत चौकशी केली...

कळले की... चंदीगड एक्स्प्रेसची  लगेज बोगी खाजगी ठेकेदाराला दिली आहे... लगेज प्रमुखाच्या मदतीने ठेकेदार तिवारी याचा परिचय झाला... अतिशय गोडबोल्या तिवारी म्हणाला रेल्वेमध्ये सायकल चाळीस किलो समजली जाते... त्याप्रमाणे प्रती किलो ४० रुपये प्रमाणे पैसे द्या... म्हणजे एका सायकलचे १६०० रुपये द्यावे लागणार होते.

तिवारीला म्हणालो... हे तर खूप जास्त आहेत. लगेज अधीक्षक यांनी माझी ओळख निवृत्त रेल्वे अधिकारी म्हणून तिवारीला करून दिली. तेव्हा तिवारी एका सायकलचे ६०० रुपये मागू लागला... त्याला सांगितले मागच्या वेळी मुंबई ते चंदीगड साठी रेल्वेला ३५० रुपये दिले होते...  हो ना करता तो एका सायकलसाठी ४०० रुपये घेण्यास तयार झाला...

त्यानंतर सायकल लोडिंग अनलोडींग साठी १०० रुपये मागू लागला... त्याला म्हणालो... सायकल पॅकिंग, लोडिंग, अनलोडींग सर्व आम्हीच करणार आहोत...

प्रत्यक्ष सायकल लगेज मध्ये लोड करताना... संजयची, परेशची आणि माझी अशा तीनही सायकल व्यवस्थितपणे बंजी कॉर्डने बांधून लगेज मध्ये ठेवल्या... त्याची कसलीही रीसिट तिवारीने दिली नाही... अनलोडिंग साठी चंदीगड येथे कोणाशी संपर्क करायचा याची विचारणा केली असता... चंदीगडचा   ठेकेदार हरविंदरसिंग यांचा नंबर मिळाला... हरविंदरला तातडीने फोन लावला आणि सायकलची माहिती दिली...

विशेष म्हणजे या गाडीचा  लगेज डबा चंदीगड येथेच उघडणार होता... त्यामुळे आम्ही निश्चिंत झालो...‌ टुरिंग सायकलिंग करताना... जेव्हा रेल्वेने सायकल घेऊन जायची असते तेव्हा अगोदर स्टेशनवर जाऊन सर्व माहिती काढणे अतिशय आवश्यक असते... याची प्रचिती आली...

दुसऱ्या दिवशी गाडीने अंबाला सोडल्यावर संजय रेल्वे डब्यांच्या आतून सायकल ठेवलेल्या लगेज डब्याकडे निघाला... बाकीचे समान चंदीगड स्टेशनला उतरविण्याची जबाबदारी माझ्यासह परेशने स्वीकारली...

गाडीने अंबाला सोडले आणि धुवाधार पाऊस सुरू झाला... गाडीतले सामान हळूहळू दरवाजा जवळ नेऊन ठेवले... बंदिस्त वातानुकूलित डब्यापेक्षा दरवाजातून दिसणारे पावसाळी वातावरण आणि वाऱ्याने डोलणारी विस्तीर्ण शेते पाहून मन भावविभोर झाले... 

कितीतरी वेळ डोळ्यासमोरून सरकणारी  पळती झाडे पाहताना जणू काही निसर्गाशी लपंडाव खेळत होतो... वाऱ्याच्या झोताने दरवाज्यातून आत येणारे पावसाचे तुषार डोळ्याच्या पापणीवर पडत होते आणि गालावरून घरंगळत ओठांना स्पर्शून हनुवटीवर थबकत होते...  प्रत्येक क्षणाचा एक मध असतो... त्या क्षणांचा मध टिपत मदहोश झालो होतो... जे आपल्याकडे असते ते आपल्याकडे चालत येते... यालाच निसर्गावरचे प्रेम म्हणतात काय...

या बेधुंद क्षणांचा आनंद लुटत असताना चंदीगड कधी आले ते कळलेच नाही... तातडीने सर्व सामान उतरवले... आणि तडक संजयला मदत करायला लगेज डब्याकडे निघालो...

संजयने व्यवस्थित सायकल उतरवून घेतल्या होत्या... सर्व सामान सायकलवर लावून चंदीगड स्टेशनच्या पुढच्या बाजूने तडक स्टेशन बाहेर पडलो... खाजगी लगेज ठेकेदार असल्यामुळे सायकलसाठी गेटपास सुद्धा मिळाला नाही... 

चंदीगड स्टेशन वरून बस स्टँड सेक्टर ४३ कडे जायचे होते. हा आंतरराज्य बस स्टँड १४ किमी अंतरावर होता...  गुगल मॅप लावून चंदीगडमध्ये बस स्टँडकडे सायकल सफर सुरू झाली... चंदीगड अतिशय सुनियोजित शहर असल्यामुळे येथे सायकल ट्रॅक आहेत आणि त्यावरून आरामात सायकलिंग करता येते. वाटेत एका धाब्यावर पनीर पराठा आणि पकोडे खाल्ले... ISBT बस अड्ड्यावर पोहोचायला पाच वाजले होते... 

हा बस स्टँड अतिशय स्वच्छ होता... आता वातावरण उबदार झाले होते... सहा वाजता दिल्ली वरून लेहला जाणारी बस आली... परंतु त्याच्या  टपावर कॅरीयर नव्हते आणि डिकी सुद्धा अतिशय छोटी होती... 

याची माहिती अगोदरच मिळाल्यामुळे चंदीगड ते मनाली हिमसुता व्होल्व्हो बसची तिकीट काढली होती... रात्री नऊ वाजता बस कंडक्टर मनोज कुमारची भेट घेतली... बरोबर साडेनऊ वाजता हिमसुता बस स्टँडवर आली. सायकलींचे पुढचे चाक काढून तीनही सायकल उलट्या करून डिकी मध्ये सहज राहिल्या... सोबत पॅकिंग म्हणून पनियार बॅग आणि सॅक सायकलला लावून ठेवल्या... 

सायकलींसाठी लगेज तिकीट काढले ते आमच्या तिकिटाच्या अर्धे म्हणजे रू. ५६०  होते... सरकारी बस असल्यामुळे रीतसर लगेज तिकीट मिळाले... बसचे तिकीट मुंबईवरून महिनाभर आधी ऑन लाईन काढल्यामुळे पुढच्या सीट मिळाल्या होत्या... बस वाहकाने प्रत्येकाला एक एक पाण्याची बाटली दिली... आणि सुरू झाली थंडगार बस सफर मनालीकडे...

सर्ली सुखावली होती... प्रथमच ती हिमाचल प्रदेशात प्रवेश करणार होती... हिमसुता  सुसाटत निघाली होती... ISBT बस स्टँड समोरच खाऊगल्ली गाड्यावर गरमागरम चाऊमिन आणि लस्सी प्यायल्यामुळे पोट सुखावले होते... परंतु ड्रायव्हरला भूक लागल्यामुळे हायवेवरील दुर्गा धाब्यावर तासाभरातच बस थांबली...

 पुढे थंडी सुरू होणार होती म्हणून धाब्यावर दाल खिचडी खायचे ठरविले... हॉटेल मालकाने राजमा करी भातात मिक्स करून दोन प्लेट दालखिचडी दिली... दालखिचडीचा नवा अवतार पाहून हसायला आले... परंतु बऱ्याच दिवसांनी राजमा राईस खाल्ल्याचा आनंद मिळाला...

हिमाचलमध्ये बस शिरल्यावर रात्री थंडी वाजणार म्हणून आधीच कानटोपी आणि विड चीटर काढून ठेवले होते... रात्री परेशला थंडी वाजायला लागली तेव्हा त्याने गाडीतील AC कमी करण्यासाठी ड्रायव्हरला सांगितले... ड्रायव्हर म्हणाला AC कमी केला तर गाडीतील मागच्या प्रवाश्यांना कुलिंग मिळणार नाही आणि ते उलट्या करायला लागतील. AC गाडीत उलट्या होत नाहीत... ही माहिती प्रथमच मिळाली...

ब्रम्ह मुहूर्तावर पहाटे चार वाजता गाडी मनाली बस अड्ड्यावर पोहोचली... गुलाबी थंडी जाणवत होती... बसच्या डिकीत शिरून टॉर्चच्या प्रकाशात सामान आणि सायकली बाहेर काढल्या... सायकल असेंबल करून तासाभरात तयार झालो... पुढील शोध मोहिमेसाठी... 

परममित्र सतीश आंबेरकरने मनालीत राहायची व्यवस्था केली होती... प्रथम लेहच्या प्रवासाची माहिती घेण्यासाठी बस स्टँड बाहेर आलो... एका जीपच्या ड्रायव्हरला विचारले लेहसाठी गाडी कुठे मिळेल... त्याने पल्लेदार भाषण ठोकले... मनाली आणि लेहच्या टॅक्सी युनियन यांच्या वादामुळे मनाली वरून लेहला जाणाऱ्या पॅसेंजर गाडीला रिकामे परत यावे लागते त्यामुळे तुम्हाला प्रत्येकी तीन हजार रुपये भाडे लागेल आणि सायकल साठी एक हजार लगेज द्यावे लागेल... वर म्हणाला... बोलावू काय गाडी... आम्ही हळूच तेथून सटकलो... पुढे रस्त्यात काही तरुण बसले होते... त्याच्याकडे लेह बसची चौकशी केली... त्यांनी सांगितले मॉल रोडला लेहसाठी गाडी मिळेल... त्यांच्या कडून मानली-लेह टॅक्सी मालक रिंकू सिंग यांचा नंबर मिळाला...

 पुन्हा बस स्टँडवर येऊन रिंकुला फोन लावला... रिंकू म्हणाला आता सहा वाजता माझी टेम्पो ट्रॅव्हलर निघते आहे लेहला... लेहचे भाडे त्याने माणशी २५०० रुपये सांगितले... आणि सायकल फुकट न्यायचे कबूल केले... त्यावर आम्हाला पीकअप करण्यासाठी स्वतःची जीप घेऊन बस स्टँडवर  आला... त्यामुळे मनालीला न थांबता पुढे प्रस्थान करायचे नक्की केले... पुन्हा चाके काढून सायकल जीपच्या टपावर बांधल्या...

पाच मिनिटात सामानासह टॅक्सी स्टँडकडे पोहोचलो... लेहला जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरच्या टपावर इतर प्रवाशांचे सामान बांधाबांध सुरू होते... रिंकू म्हणाला आणखी तीन प्रवासी येणार आहेत त्यांचे सामान टपावर टाकले की त्यावर तुमच्या सायकल बांधूया... तो पर्यंत तुम्ही फ्रेश व्हा... जवळच सुलभ शौचालय होते... विशेष म्हणजे तेथे आंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था होती... आंघोळीसह प्रातर्विधी आटपले... पुढे माहीत नव्हते कधी गरम पाण्याने आंघोळ करायला मिळेल ते... 

समोरच्या टपरीवर बनब्रेड आणि आम्लेटसह चहा नाष्टा झाला... त्यानंतर संजय टेम्पो ट्रॅव्हलर गाडीच्या टपावर चढला आणि टपावरच्या सामानावर ड्रायव्हरच्या मदतीने सायकली व्यवस्थितपणें बांधल्या... 

आता सुरू झाली सफर लेहकडे... तेव्हढ्यात सतीश आंबेरकरचा फोन आला... त्याला सांगितले... आम्ही आता लेहकडे प्रस्थान करतोय... त्यामुळे तुझ्या होटेलवाल्याकडे  थांबता येणार नाही... तसेच हॉटेल मालक भोला ठाकूर याला सुद्धा निरोप दिला... पुढच्या वेळी नक्कीच तुझ्या हॉटेलमध्ये येऊ...

सर्ली अचंबित झाली होती... इतक्या तातडीने तिला अटल टनल पाहायला मिळणार म्हणून... मनात असणारी दुर्दम्य इच्छाशक्ती शरीराला किती प्रेरित करते याचा प्रत्यक्ष अनुभव घेत होतो... काल रात्री दहा वाजता बसने सुरू झालेली सफर आता लेहला जाऊन थांबणार होती... न दमता... न थकता... 

दहा हजार फुटावरील नऊ किमीचा अटल टनल दहा मिनिटात पार झाला... या अटल टनलमुळे रोहतांग पास बायपास होतो... आणि जवळपास तीन तासांचा प्रवास कमी होतो...

त्यामुळे आता केलॉंग येथे थांबण्याची गरज लागत नाही...  सिसू जवळच्या पट्टासियो धाब्यावर चहासाठी थांबलो... येथे गाडीत असलेल्या जसबिर सिंगची ओळख झाली... मिलिटरी मध्ये पोर्टरच्या पोष्टसाठी त्याची निवड झाली होती... देशासाठी काम करणाऱ्या जवानांबाबत मनात अपरीमित आदर असल्यामुळे त्याला भरपूर शुभेच्छा दिल्या... त्याच्या सोबत फोटो पण काढला... 
वातावरणात विरळता आली की पर्वत उघडे बोडके होत जातात... आणि आसमंताचा निळेभोरपणा डोळ्यांना सुखावतो..

पुढची सर्व ठिकाणे १४ हजार फुटांच्यावर होती... त्यामुळे डोक्यात किणकिण सुरू झाली होती... ही किणकिण म्हणजे वातावरणात प्राणवायूची कमतरता आहे याचा संदेश होता... हाच तर माईंड गेम होता... दीर्घ श्वास आणि सतत पाणी पिणे हा त्याच्यावर जालीम उपाय होता... सरचू येथील पोलिस पोष्ट वर गाडीचे कागदपत्र आणि प्रवाशांची तपासणी झाली.

मधल्या गावाची नावे सुद्धा डोक्याला झिंग आणणारी होती ब्रांडी पुल, व्हिस्की नाला, झिंग झिंग बार... त्यातच पंधरा हजार फुटवरील बारालच्छा पास आणि साडे पंधरा हजार फुटावरील नाकीला पास लागला... 

नाकिला आणि बारालच्छा पास वर वाहणाऱ्या प्रचंड वाऱ्यामुळे तेथे उभे राहणे सुद्धा कठीण होते... बाणाच्या अणकुचीदार अग्रासारखे सू सू करत वारे अंगात शिरत होते... आणि ते वारे पचविणे हाच वातावरणाशी एकरूप होण्याचा राजमार्ग होता...

गाडीतील जवळपास सर्वजण खोकत होते... खोकणे हा सुद्धा मेंदूला प्राणवायू कमी पडतो आहे याचे लक्षण होते... प्राणायाम आणि मेडिटेशन करत असल्यामुळे संजय आणि माझ्यावर काहीच परिणाम झाला नव्हता... 

दोन परदेशी मुली सतत पाणी पीत होत्या... प्रत्येक चेकपोस्ट वर त्यांना पासपोर्ट दाखवावा लागत असल्यामुळे त्यांना गाडीच्या खाली उतरावे लागत होते... तेव्हा संजय, परेश आणि मी खाली उतरून वातावरणाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करत होतो... 

दुपारी साडेचार वाजता १५३०० फुटावरील पांग येथे पोहोचलो... आज येथेच थांबून वातावरणाशी एकरूप होणार होतो... सायकलसह सर्व समान पांग येथे उतरवले...  सोनम गेस्ट हाऊसच्या मालकीणीने सुहास्य वदनाने स्वागत केले... 

त्या होमस्टे मधील हॉटेलात दोन लडाखी मुले डोके दुखतं म्हणून आडवे झाले होते... वातावरणातील कमी प्राणवायूचा त्रास कोणालाही होऊ शकतो...  आणि येथे आपले कणखर मन शरीराला साथ देते... 

सोनम हॉटेल मध्ये ब्रेड आमलेट आणि कडक चहा प्यायल्यावर आम्ही तिघे तरतरीत झालो... तिघांनीही आधी मानली लेह सायकलिंग केली असल्यामुळे मनाने बळकट होतो...

 खाण्याचे  बिल देण्याच्या बहाण्याने दिदी कडून गुगल पे साठी हॉट स्पॉट  मागून घेतला आणि सर्वांना व्हॉट्स ॲप वरून खुशाली कळविली..

सोनम दिदीने आज रात्री राहण्यासाठी तीन बेडचा रूम दाखवला आणि त्याचे भाडे साडेतीन हजार रुपये सांगितले... संजय म्हणाला तीनशे रुपयाच्या  कॉमन डॉरमेटरी मध्ये राहूया... परंतु सायकल सुरक्षित ठेवणे आणि सर्व लाईट, पॉवर बँक आणि मोबाईल चार्ज करण्यासाठी वेगळा रूम घेणे आवश्यक होते... दिदीला रूमसाठी पंधराशे रुपयात पटविले... तिची एकच अट होती... माझ्या हॉटेलात जेवण आणि नाष्टा घेणे... ही गोष्ट आम्हाला सुद्धा मंजूर होती...

ऊन कमी झाल्यावर थंडी वाढते म्हणून ताबडतोब सायकलला लावलेले रॅपर काढून सायकल असेंबल केली...  सायकल वरून छोटीशी रपेट मारून सायकल ओके आहे याची तपासणी केली...

बरोबर सात वाजता जनरेटरवर लाईट आली... आता संजयची कामगिरी सुरू झाली... इलेक्ट्रिक किटली वर पाणी गरम करून गिरनार इन्स्टंट सॅचेच्या सहाय्याने मस्त चहा बनविला... आणि आजच्या दिवसाचे सेलिब्रेशन केले...

चंदीगड वरून पांग पर्यंत पंधरा हजार फुटावर पोहोचलो होतो... न थांबता... आणि एकदम टकाटक... 

रात्री फ्राईड राईस आणि चहा पिऊन आजच्या दिवसाची सांगता केली... दिदी पण खुश आणि आम्ही पण खुश...

प्रचंड मानसिक बळ असेल तरच असे चौकटी बाहेर जाऊन जीवनाचा आनंद घेता येतो... आणि हे तुम्ही सर्वजण करू शकता... याची खात्री आहे...

जय श्री राम...

Tuesday, August 20, 2024

अंबरीश गुरव आणि शतकी राईड... दि. २० ऑगस्ट २०२४

अंबरीश गुरव आणि शतकी राईड...

दि. २० ऑगस्ट २०२४

काल संध्याकाळी विजयचा फोन आला... उद्या मुलुंड पर्यंत राईड करायची काय... मंगळवारी विजयला सुट्टी असते... त्यामुळे मंगळवार खास त्यांच्यासाठी राखून ठेवलेला असतो... 

राखी पौर्णिमेच्या निमित्ताने घरात कौटुंबिक कार्यक्रम होता... खूप नातेवाईक म्हणजे भरपूर गप्पा... रात्री उशिरा पर्यंत कार्यक्रम चालणार हे ठरलेले होते... तरीही विजयला आश्वासन दिले... भेटूया सकाळी सहा वाजता... महेश्वरी उद्यानाजवळ... सायकलिंग म्हटले की तहान भूक आणि झोप सुद्धा हरपते...

काल सायंकाळी नारळी पौर्णिमेनिमित्ताने  नवनीतने वरळी कोळीवाड्यात सागराला सोन्याचा नारळ देण्याचा कार्यक्रम पहायला बोलावले होते... तेथे अंबरीशची भेट झाली... अंबरीश सुद्धा मुलुंडला सायकलिंगसाठी यायला तयार झाला...

आज सकाळी सहा वाजता माटुंगा महेश्वरी उद्यानाजवळ विजयची भेट झाली... अंबरीश नुकताच वरळीवरून निघाला असल्यामुळे त्याने सायकलिंग करत पुढे जाण्यासाठी सांगितले...

पावसाचा  भुरभुरत वर्षाव सुरू होता... तो सुद्धा थांबत थांबत पडत होता... सायनला वर्षाव तर कुर्ला सुके... पुढे घाटकोपरला पाऊस धारा तर विक्रोळीला  तेज वारा... पावसाने भिजलो आहे की घामाने... याचा पत्ता लागत नव्हता... पावसामुळे सायकलिंगची सावधानता वाढली होती... बऱ्याच ठिकाणी साचलेल्या पाण्यातून सायकल चालविताना खड्डे टाळण्यासाठी अतिशय हळू मार्गक्रमण सुरू होते...

आज मोबाईल कव्हर घ्यायचे विसरल्यामुळे मोबाईल रुमालात गुंडाळून ठेवला होता...  त्यामुळे वाटेत फोटो काढले जात नव्हते... मुलुंडला पोहोचता पोहोचता... अंबरीशने आम्हाला गाठले होते...  

मुलुंड म्हाडा कॉलनीतील भटाची चहा टपरी आमचा हायड्रेशन पॉइंट होता... भटाने बनविलेला फर्मास उकाळा पिताना मोबाईल बाहेर काढला तर आतापर्यंत २५ किमी राईड झाली होती...  अंबरीश म्हणाला आज शंभरी गाठायची काय... तात्काळ होकार दिला... 

 आज सुट्टीच्या दिवशी घरगुती कामे आटपायची असल्यामुळे विजय घराची वाट धरणार होता... पन्नास किमी वर समाधान मानणार होता... 

परतीची राईड सुरू झाली... आणि विक्रोळी सर्व्हिस रोडवर दिपक नीचितची भेट झाली... फिटनेस फ्रिक दिपक ५८ किमी मॅरेथॉनची तयारी करतोय... हिमालयात सहकुटुंब फिरताना त्याचा डावा हात दुखावला होता... त्यामुळे दोन महिने पोहणे बंद होते... पण चालणे, धावणे सुरू आहे... अशी चळवळी माणसे नेहमीच कार्यरत असतात... उत्तम फिटनेस आणि काळ्या केसांमुळे तो आणखी तरुण दिसायला लागला आहे... 

दिपक एकदा बोलायला लागला की ब्रह्मदेवाला सुद्धा शक्य नसते त्याला थांबविणे... पण हाडाचा शिक्षक असलेल्या  दिपकचे बोलणे नेहमी ऐकत रहावेसे वाटते... आम्हाला शंभरी गाठायची आहे... हे समजल्यावर त्याने रजा घेतली...

कुर्ल्याच्या प्रियदर्शनी पार्ककडून फ्री वे कडे वळलो... वडाळ्याला विजयने कलटी मारली आणि घरी गेला...  अंबरीश बरोबर आता राईड सुरू झाली... BPT मधून फ्री वे खालून जाणाऱ्या रस्त्यावर गाड्यांची रहदारी कमी असल्यामुळे झकास राईड सुरू होती... 

गेटवे ऑफ इंडिया गाठले तेव्हा ६२ किमी राईड झाली होती...

तेथेच अंबरीशच्या सायकल मधील  मागच्या चाकातली हवा कमी झाली होती... रेडिओ क्लब कडून मुख्य रस्त्यावर येऊन पेट्रोल पंपावर चाकात हवा भरली... 

तेथून नेव्ही नगरचे शेवटचे टोक गाठले... पुन्हा हवा कमी झाल्यामुळे सायकल पंचर झाली आहे हे नक्की झाले...   RC चर्च जवळील दुसऱ्या पेट्रोल पंपावर पुन्हा हवा भरली आणि कैलास परबत जवळच्या सायकल शॉपवर सायकल आणली... मागच्या चाकात  दोन तीन ठिकाणी बारीक बारीक तारा सापडल्या... दोन ठिकाणी ट्यूब पंचर झाली होती.. नवी प्रेस्टा  ट्यूब दुकानात उपलब्ध नव्हती... त्यामुळे दोन पंचर पॅच लाऊन सायकल तयार झाली... 

भूक लागली होती... त्यामुळे ncpa जवळील मनिज् मध्ये नाष्टा करायचे ठरले... मनिज्  कडे नाष्टा करायला आलो... तेव्हा समजले ट्यूबने दगा दिलेला आहे... आता सायकल ढकलण्याशिवाय पर्याय नव्हता.. डोसा आणि उत्तपा नाष्टा करून अंबरीश सायकल ढकलत ncpa चौपाटी वरून रमतगमत वरळीला निघाला...

 माझा थोडासा हिरमोड झाला होता... पण अंबरीशने ठरविलेले टारगेट पूर्ण करण्याचे मनावर घेतले होते... मग निघालो गिरगाव चौपाटी वरून पेडर रोड मार्गे सुसाटत वरळीला... तेथून सिद्धिविनायक मंदिर गाठले... आज मंदिरात खूप गर्दी होती... म्हणून तेथे ट्रॅफिक जाम झाली होती... त्यात कोणीतरी VIP येणार म्हणून पोलिसांनी रस्ते बंद केले होते... सायकलसह कसाबसा सटकलो आणि वांद्रे सिलींक गाठले... 

सीलिंकच्या अलीकडच्या वळणावर महर्षी व्यास मुनींचा ध्यानमुद्रेतला मोठा पुतळा आहे... तो पाहिला आणि पुन्हा अंबरीशची आठवण झाली... तेथून घरी येई पर्यंत १०० किमी पूर्ण झाले होते...

 पण अंबरीश डोक्यातून जात नव्हता... कसं घडवलंय परमेश्वराने या माणसाला... अतिशय मितभाषी... पण जेव्हा बोलतो तेव्हा ते नेमक आणि मार्मिक असतं... दापोली सायकलिंग क्लबची धुरा गेली पाच वर्ष समर्थपणे सांभाळत असलेला अंबरीश अजातशत्रू आहे... इतरांसाठी त्याचा मदतीचा हात सतत तत्पर असतो... त्याला कधीही रागावलेला पाहिला नाही... प्रत्येक घटनेवर त्याची अतिशय सौम्य आणि मृदू प्रतिक्रिया असते... आणि सदा हसतमुख...

आज त्याच्या ट्यूबने दगा दिला... पण चौपाटी वरून चालताना... त्याच्या चेहऱ्यावर निराशेचा लवलेश नव्हता... मस्तपैकी निसर्गाचा आनंद  घेत तो एकदम मजेत मार्गक्रमण करत होता... असं व्यक्तिमत्त्व माझ्या जीवनात मित्र म्हणून लाभणं हे माझं भाग्यच आहे...

निव्वळ त्याच्या साठीच आज १०० किमी राईड पूर्ण केली होती...


तेरा तुझको अर्पण...

जय श्री राम....