Wednesday, October 14, 2020

भरत भेट सायकल राईड

भरत भेट सायकल राईड

१३ ऑक्टोबर, २०२०

आज कुठे जायचे काहीच नक्की नव्हते. विजयला सुट्टी असल्यामुळे मोठा पल्ला मारायचा हेच डोक्यात होते. सकाळी मुंबई वरून सुरुवात करून पाहिला टप्पा पनवेल अडीच तासात पार केला. तेथून आमच्याकडे तीन पर्याय होते. उरण, कर्नाळा अभयारण्य किंवा कोपर (अलिबाग). 

दोघांनी ठरविले, कोपर गावात नितीन थळे (विजयचा शाळकरी मित्र) याला भेट द्यायची. नितीनला फोन करून जेवायला तुझ्याकडे येतोय, हा निरोप दिला. उन्हाचा कडाका वाढला होता. त्यामुळे भरपूर पाणी पिऊन तसेच हॅन्डग्लोवज आणि स्किनर पाण्याने भिजवून पुढची राईड सुरू झाली. 

पनवेलच्या बाहेर पडून पळस्पे गोवा हायवे पर्यंत प्रचंड ट्राफिक लागली. मोठे मोठे कंटेनर डाव्या बाजूने ओव्हरटेक करत असल्यामुळे डाव्या बाजूच्या पांढऱ्या पट्ट्याच्या आतून राईड करावी लागत होती. दिवसासुद्धा टेल लॅम्प लावून सायकलिंग करत होतो. हायवेला कंटेनरवाले, बसवाले सम्राट असतात तर सायकलिस्ट सेवक. त्यामुळे त्यांच्या पासून चार पावले लांब राहणे शहाणपणाचे असते किंवा आपण थांबून त्यांचा मार्ग प्रशस्त करणे यातच आपली सुरक्षा असते.

पळस्पे फाट्याला पोहोचलो. येथूनच गोवा राष्ट्रीय महामार्ग सुरू होतो. पळस्पेच्या पुढे असलेले शिरढोण हे स्वतंत्रता संग्रामचे आद्य क्रांतिकारक  वासुदेव बळवंत फडके यांचे जन्म गाव. त्यांनीच इंग्रजांच्या विरुद्ध सशत्र क्रांतीचा मार्ग अवलंबिला होता. अठराव्या शतकात त्यांनी मातंग, रामोशी कोळी, धनगर समाजातील तरुणांना एकत्र करून  सशस्त्र  संघटना स्थापन केली आणि इंग्रजांविरुद्ध युद्ध आरंभले. काही काळ त्यांनी पुणे शहर अधिपत्याखाली आणले होते. 

शिरढोण येथील त्यांचे जन्मघर आता राष्ट्रीय स्मारक झाले आहे.

 मुंबईतील मेट्रो सिनेमाजवळच्या चौकाला वासुदेव बळवंत फडक्यांचे नाव दिलेले आहे.

उन्हात सायकलिंग सुरू होती आणि जिताडा मासा आणि फेमस लपेटा डिशसाठी प्रसिध्द असलेले  साई पॅलेस हॉटेल मागे पडले.  त्या नंतर क्षणभर विश्रांती हॉटेल पासून कर्नाळा अभयारण्याची घाटी सुरू झाली.  हा रस्ता चौपदरी आणि काँक्रीटचा केल्यामुळे घाट सोपा झाला होता, परंतु उन्हाच्या कडाक्यामुळे जबरदस्त दमछाक होत होती. दर दहा किमीवर हायड्रेशन ब्रेक घ्यावा लागत होता. कर्नाळा पार केल्यावर ताराखोप गावाजवळील एका झाडाखाली विजयने बसकण मारली. उन्हामुळे तो कासावीस झाला होता. भरपूर पाणी प्यायल्यावर त्याला तरतरी आली.

पेण पार केले आणि वडखळ बायपास रस्त्यावरून पेडलिंग सुरू झाली. अतिशय खडबडीत रस्ता आणि मोठया गाड्यांमुळे  धुळीचे प्रचंड लोट वातावरणात पसरले होते. डोळ्यावर गॉगल आणि तोंडावर मास्क  लावून सुद्धा घुसमट होत होती. मोठी गाडी बाजूने गेली की धुळीपासून बचावासाठी सायकल थांबवावी लागत होती. पेण ते वडखळ हा सात किमी रस्ता पार करण्यासाठी तब्बल पाऊण तास लागला. 

गोव्याकडे जाणारा रस्ता बायपास करून पोयनाड रस्त्यावर आलो. मध्ये धरमतरची खाडी लागली.

अचानक आभाळ भरून आले. सोसाट्याचा वारा सुटला, विजा कडकडू लागल्या आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. उन्हाने अंगाची झालेली काहिली अचानक आलेल्या सुखद गराव्याने पार नाहीशी झाली. विजयची कळी खुलली. परंतु नुकत्याच ओल्या झालेल्या रस्त्यावर काळजीपूर्वक सायकल हाकत होतो. 

पाऊस सुरू झाला, त्यामुळे गॉगल काढून सायकलिंग सुरू होती. माझ्या सायकलला मडगार्ड नसल्यामुळे हिरवे टीशर्ट पाठीमागून चिखलाच्या ठिबक्यांनी माखून गेले. पोयनाडला नितीनच्या मुलांना मिठाई घेतली. 

पेझारी गाव ओलांडून MIDC रस्त्यावरून मार्गक्रमण सुरू झाले. या रस्त्यावर बिलकुल रहदारी नव्हती. रस्त्याच्या बाजूने जाणारा भलामोठा पाईप सतत आम्हाला साथ करीत होता. अतिशय छोटा परंतु एकदम सुस्थितीत रस्ता असल्यामुळे सायकलिंग करायला मजा येत होती. एक मोठा अवघड चढ लागला. तो पार करताच कोपर गावाची वेस लागली. गावात शिरलो आणि पाच मिनिटातच नितीनच्या घरी पोहोचलो. दारातच आमच्या स्वागताला नितीन उभा होता. विजयला शाळकरी मित्र नितीन भेटताच,  भरत भेटीचा  आनंद झाला होता.   घरात वहिनीने स्वागत केले. मुलाच्या हातात विजयने खाऊ दिला.

हातपाय धुवून फ्रेश झालो आणि चिखलाने माखलेले टीशर्ट कडून दुसरे टीशर्ट घातले. पोटात भुकेचा प्रचंड डोंब उसळला होता. नितीनचा उपवास असल्यामुळे तो अगोदरच जेवला होता. आमच्या जेवणाची सामिष व्यवस्था होती.  घोळीचे कालवण आणि कोळंबीचे सुंगट असा खास बेत होता. पोळी, भात, कालवण आणि कोळंबी मनसोक्त खाल्ली. भोजन झाल्यावर नितीनने वाडीत तयार झालेली छोटी परंतु अतिशय स्वादिष्ट सिताफळे खायला दिली. 

घरात आल्यापासून,  बोलका आणि हसमुख नितीन त्याच्या विविध व्यवसायाबद्दल सांगत होता. घरा बाजूलाच दळण दळण्याची चक्की आहे.

 तांदूळ, गहू, डाळी आणि मिरच्या साठी वेगवेगळ्या घरघंट्या आहेत. सतत काहीतरी काम करण्यात सर्व कुटुंब कार्यरत होते.

नितीन राहण्याचा आग्रह करत होता. परंतु थोड्या गप्पाटप्पा मारून चहा घेऊन  चार वाजता सायकलिंग सुरू केली.  वाघरण, पेंडांबे मार्गे रेवसला जाणारा शॉर्टकट रस्ता आम्ही पकडला. मित्र शरदच्या वाघरण गावाला खूप वेळ भेट दिलेली आहे. त्या आठवणी जागृत झाल्या. ऊन कमी झाले होते. तसेच झाडांमधून जाणारा रस्ता सुखकारक होता. तासाभरात रेवसला पोहोचलो. 

अजूनही रेवस मुंबई लॉन्च सुरू झाली नव्हती, त्यामुळे साडेपाचच्या कारंजा लॉन्च साठी वाट पाहत बंदरावर थांबलो. रेवस कारंजा लॉन्च मध्ये तिकीट तपासणारा 'पूर्वज' भेटला. त्याने सायकलचे भाडे घेतले नाही. करंजा धक्क्यावर उतरताच समोरच दगडांचा बंधारा दिसला. त्या लोकेशन वर फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. 

कारंजा वरून मोरा जेट्टी वर जाताना, भाऊ दिलीपचे घर लागते,  त्याला फ्लाईंग भेट द्यायचे ठरले. परंतु नेमका तो घरी नव्हता. तरीसुद्धा पुतण्या आदिनाथची भेट झाली. 

सध्या त्याचे वर्क फ्रॉम होम चालू आहे. सायंकाळी सात वाजताची शेवटची लॉन्च पकडण्यासाठी मोरा बंदराकडे प्रस्थान केले.

पंधरा मिनिटे मोरा जेट्टीवर अगोदर पोहोचल्यामुळे आम्ही दोघे निवांत झालो होतो. जेट्टीवर मस्त वारे वाहत होते. तासभराची लॉन्च राईड करून भाऊच्या धक्क्यावर उतरलो. पी डिमेलो रोडवरून सायकलिंग करीत परेल पर्यन्त आल्यावर जी डी आंबेकर रोडजवळ विजयला रामराम केला. त्या नंतर दहा मिनिटात घर गाठले. 

आज १२० किमी राईड झाली होती. मुंबई, पनवेल, कर्नाळा अभयारण्य, पेण, वडखळ, पोयनाड, कोपर, पेझारी, रेवस, कारंजा, मोरा आणि भाऊचा धक्का असा धक्कादायक सायकल प्रवास केला होता.

 घरातून निघताना कुठे जायचे काहीच ठरविले नव्हते. विजयला शाळेतील मित्राची आठवण झाली आणि आजची अनपेक्षित सायकल सफर झाली. विजयला भरत भेटीचा आनंद झाला होता. तर मला खूप वर्षांनी पुतण्या आदिनाथ भेटला होता. 

 दुर्मिळ झालेल्या मित्रांच्या, नातेवाईकांच्या  प्रत्यक्ष गाठीभेटी घेणे, सायकलिंगमुळे सहज शक्य होते, याचेच हे उदाहरण आहे. सायकलिंगमुळे किती आनंददायी घटना घडतात याचा खासा अनुभव आम्ही घेतला होता.


सतीश जाधव
आझाद पंछी....

7 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. व्वा व्वा !!!! क्या बात है, भरत (नितीन थळे ) भेटीचा वेगळाच आनंद लुटला राम (विजय) आणि शत्रुघ्न (सतिश)(सध्याच्या वयांचा विचार न करता) या दोघा भावांनी. त्यांच्या बरोबर जर लक्ष्मण असता तर "भरत भेटी" ला 'चार चांद' लग जातें; लेकिन क्या करें लक्ष्मण तो गोवा में बैठा है ना !!!! असो ....
    (रामायणातील मूळ 'भरत भेटी'मध्ये राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या भेटीला भरत वनात गेला होता. आपण थोडे उलट समजू या.)

    अतिशय छान, नेहमी प्रमाणे ओघवते जीवंत वर्णन.
    घरापासून ते घरापर्यंतच्या विविधतेने नटलेल्या वातावरणाची मजा घेत, अनपेक्षितपणे घडून आलेली "भरत भेट" एकदम झकास वाटली.

    नेहमी प्रमाणे लिखाण आणि फोटोंची जुळणी छान.

    दोघांचेही खूप खूप अभिनंदन आणि पुढील सफरीसाठी भरपूर शुभेच्छा !!!!
    ..... लक्ष्मण

    ReplyDelete
  3. लक्ष्मण भावा !!!

    अतिशय उत्तम आणि समर्पक प्रतिक्रिया.

    या भरत भेटीत लक्ष्मण सुद्धा हवा होता!!!

    वेळोवेळी तुम्हाला मिस करतो.

    आता गोवा टूरला तुम्ही असणारच आहात !!!

    तेव्हा कृष्ण सुदामा भेटीचा कार्यक्रम करूया 😊👍



    ReplyDelete
  4. खूपच छान वर्णन

    ReplyDelete