Sunday, October 4, 2020

श्री हरिहरेश्वर सायकलिंग दिवस २

श्री हरिहरेश्वर सायकलिंग दिवस २

२७ सप्टेंबर,२०२०

पहाटे साडेचार वाजता कुणाल चहा आणि बिस्किटे घेऊन आला. आज लांबचा पल्ला असल्यामुळे विजय आणि मी पहाटे चार वाजता उठलो होतो.   प्रवासात खाण्यासाठी संध्याने राजेळी केळ्यांचा घड दिला होता.   सर्व तयारी करून सव्वा पाच वाजता कुणालला राम राम करून श्री हरिहरेश्वरकडे सायकल सफर सुरू केली. 

अलिबाग पर्यंत रस्त्यावर लाईट असल्यामुळे दहा मिनिटात अलिबाग बायपास वरून आक्षी गावाकडे वळलो. आता अंधारात सायकल हेड लाईट लावून सायकलिंग करत होतो. रस्ते खडबडीत असल्यामुळे खूपच हळू आणि सावधगिरीने पेडलिंग करत होतो.

 आमच्या स्वागताला गावागावात कुत्र्यांच्या फौजा उभ्या होत्या.  कुत्र्यांना चुकविण्याचे टेक्निक विजयला सांगितले. कुत्रे सायकल मागे भुंकत पळू लागले की वेग न वाढविता, चक्क सायकल थांबविणे. त्यामुळे धावणारे कुत्रे मागच्या मागे पळत सुटतात. पहाटे सायकलिंग करताना हे तंत्र खूप उपयोगाला येते.

तासाभरात रेवदंडा पुलावर पोहोचलो. आता छान उजाडलं होत. मासेमारी बोटी रेवदंडा खाडीतून जेट्टीकडे येत होत्या. बोटींच्या शिडावर लावलेले विविध झेंडे सकाळच्या वाऱ्यावर फडकत होते. 

ढगा आडून उगवणाऱ्या सूर्यनारायणाच्या सोनेरी प्रभा खाडीच्या जलातून तरंगत आमच्याकडे येत होत्या. पाण्यावर उठणाऱ्या तरंगांना सुवर्ण छटा लाभल्या होत्या. काळे मेघ सूर्याला व्यापण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु पूर्वेला उगवणारा दिवाकर त्याला भेदून धरेकडे धाव घेत होता किरणांच्या रूपाने. पश्चिमेला असणारे पांढरे ढग सोन्याची आभूषणे लेऊन भास्कराचे स्वागत करीत होते.

रेवदंडा पूल ओलांडल्यावर कोरलाई गाव लागले. गावाच्या प्रवेशद्वारालाच मोठे चर्च आहे. रविवारची मास प्रे चालू होती. विशेष म्हणजे संपूर्ण प्रार्थना मराठीतून सुरू होती आणि रस्त्यावर जागोजागी लाऊड स्पीकर लावून प्रार्थना ऐकविली जात होती. हे कोरालाई गाव पूर्वी पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होते. येथील गावकऱ्यांची  भाषा सुद्धा पोर्तुगीज मिश्रित आहे. 

कोरलाई ओलांडले आणि काशीद बीचकडे सफर सुरू झाली. कोलमंडळे गाव सोडले आणि काशीद घाटी सुरू झाली. पावसामुळे घाटातील  रस्ता एकदम ओबडधोबड झाला होता. मध्येच बऱ्यापैकी डांबरी रस्ता लागल्यावर वेग वाढविला की अचानक ऑफ रोडिंग सुरू व्हायचे, उतारावर ताबडतोब वेग कमी करून सीटवरून थोडे वर उठून शरीराला आणि विशेष करून माणक्यांना बसणारे हादरे टाळावे लागत होते. 

काशीद बीच सुरू झाला.  जवळपास तीन किमी रस्ता समुद्र किनाऱ्याने एक सलग सापटीवरून आमची सायकलिंग सुरू होती.  डाव्या बाजूला फणसाड अभयारण्याचा हिरवागार परिसर आणि उजव्या बाजूला निळेशार समुद्राचे पाणी, या मधून वळणावळणाच्या वाटेने जाताना अतिशय धीम्या गतीने सायकल चालवीत होतो. दूरवर दिसणाऱ्या मासेमारीच्या बोटी किनाऱ्याकडे येत होत्या, रविवारचा बाजार घेऊन. सकाळपासून दोन तास सायकलिंग झाली होती. काशीद चौपाटीवर हायड्रेशन ब्रेक घेतला. 

थोड्या वेळातच नांदगाव बाजारपेठ लागली. तुरळक दुकाने उघडली होती. गाव लागले की स्पीडब्रेकरचे राज्य सुरू होते. वेगात असलेली सायकल स्पीड ब्रेकर जवळ आली की ब्रेक कंट्रोल करून दोन्ही हाताने हँडल भक्कमपणे पकडून पलीकडे जावे लागते. आम्हा दोघांच्या हायटेक सायकल आणि सस्पेंशन असल्यामुळे,  शरीराला कोणताही  त्रास  होत नव्हता. खरचं समर्पयामिने दिलेली कॅननडेल सायकल माझी खास काळजी घेत होती.

नांदगाव सोडले आणि पुन्हा घाटीचा रस्ता सुरू झाला. रस्ता लहान होता परंतु रहदारी तुरळक असल्यामुळे सायकलिंग करणे सुलभ झाले होते. आताचा घाट बऱ्यापैकी दमछाक करणारा होता. उन्हे वाढायच्या आत मुरुड गाठायचे असल्यामुळे दोघांनी जोर मारला. घाटाच्या टॉपला येताच मुरुडच्या सिद्दी सरदाराचा राजवाडा लागला. येथूनच मुरुडचा विहंगम समुद्रकिनारा दृष्टीक्षेपात आला. समुद्रातील पद्मदुर्ग दिसू लागला. उतारावर सायकलचा वेग वाढला. मुरुडच्या वेशिवरच कोटेश्वराचे भव्य मंदिर आहे.
उंच सखल, वेडावाकडा, ओबडखाबड रस्त्यावरून साडेतीन तास राईड झाली होती. आता भरपेट नास्ता करणे आवश्यक होते. मुरुडच्या समुद्र किनाऱ्यावरील टपरीवजा काळभैरव टी स्टॉल जवळ विसावलो आणि चटपटीत बुर्जी पावची ऑर्डर दिली.  

कुणालला तसेच घरी फोन करून मुरुडला सुखरूप पोहोचल्याची वर्दी दिली. बुर्जी पाव, कांदापोहे आणि मसाला चहा घेऊन मुरुड जंजिऱ्याच्या दिशेने राईड सुरू केली. 'एकदारा' पूल ओलांडला आणि जंजिरा घाटी सुरू झाली. या रस्त्यावर वडाची खूप झाडे आहेत. या झाडांच्या पारंब्या  रस्त्यावर पसरल्या होत्या. जटा वाढलेल्या एखाद्या ध्यानस्थ साधू सारखी ही झाडे भासत होती.
चढ चढून आलो आणि लांबवर समुद्रात मुरुड-जंजिरा किल्ला नजरेस पडला. किनाऱ्यावर वसलेले राजपुरी गाव सुद्धा दिसू लागले. राजपुरी गावात पोहोचलो. जंजिऱ्यावर जाणारी बोट सर्व्हिस बंद होती. तेथून पेडलिंग करत आगरदांडा जेट्टीवर पोहोचलो. येथून पुढची सफर बार्झ मधून होती. या मोठ्या बोटीतून कारसुद्धा पलीकडच्या दिघी बंदरात  पोहोचवली जाते. या दहा मिनिटाच्या बोट सफरीची खासियत म्हणजे सुसाट वाहणारे वारे. 

दिघी जेट्टीवरून पुढची सफर सुरू झाली. सुरुवारीलाच चार पदरी सिमेंट काँक्रीट रस्ता लागला, तेव्हा मन एकदम आनंदित झाले.  सागरी महामार्गाची ही झलक होती. जेमतेम अर्धा किमी गेलो आणि खड्ड्यात रस्ता हरवून गेला. चढ सुरू झाला, त्यात ऑफ रोडिंग रस्ता. अशा वेळी कस लागतो.  जेव्हा चढाचा रस्ता खडबडीत असतो तेव्हा पेडल करताना जास्त जोर काढावा लागतो. घाटाच्या टॉपला पोहोचलो.  दमछाक झाली होती.

 थोडावेळ विश्रांती घेऊन उतारावर सुद्धा सावधगिरी बाळगत वेगात सायकलिंग सुरू झाली. वेळास गावच्या मारुती मंदिराला वळसा घालून वडगाव  फाट्यावर आलो. येथून एक रस्ता म्हसळा गावाकडे जातो. दिवेआगार येथून तीन किमी अंतरावर होते. 

दिवेआगारकडे राईड सुरू झाली. दोन्ही बाजूला नारळ पोफळीच्या झाडांची दाटी आणि गच्च हिरव्यागार वनराईने नटलेला वळणावळणाचा रस्ता इंद्राच्या दरबारातील नृत्य करणाऱ्या कामनीय अप्सरेसारखा भासत होता. 

दुपारचा एक वाजला होता. जेवणासाठी हॉटेलची, खानावळीची चौकशी सुरू केली. गावच्या बाजारपेठ परिसरात अजूनही खानावळी सुरू झाल्या नव्हत्या. खूप फिरल्यावर प्रसन्न महेश हॉटेल सापडले. जेवणाची पार्सल सर्व्हिस मिळेल असे मालकाने सांगितले. विजयने सांगितले आम्ही समोरच्या झाडाखाली बसतो, प्लेट मध्ये जेवण द्या. आम्ही मुंबईवरून सायकलिंग करतोय, तसेच आमचा अवतार पाहून मालकाला दया आली. आमची हॉटेलमध्येच जेवणाची व्यवस्था झाली. सुरमई फिश फ्राय जेवण घेऊन सागर किनाऱ्याने श्रीवर्धनकडे प्रस्थान केले. 

दिवेआगार ते श्रीवर्धन हा सोळा किमी रस्ता खाचखळग्याचा असला तरी सागराचे मनोहारी दर्शन सतत होत होते. डोंगराळ  रस्ता, दमट वारे आणि सागर लहरींचे किनाऱ्याशी होणारे मिलन, फेसाळत उठणाऱ्या लाटा, दूरवर दिसणारे क्षितिज यामुळेच समुद्र महामार्गावरून सुरू असलेली सायकल सफर सुसह्य आणि मनोहारी झाली होती. 

जेवणानंतर दुपारच्या वेळी पेडलिंग करणे जिकरीचे होते.  त्यामुळे मंदगतीने सायकलिंग सुरू केले. एका चढावर विजयला पेंग येऊ लागली. तेव्हा  डेरेदार वृक्ष पाहून अर्ध्या तासाची छोटी वामकुक्षी घेतली. श्रीवर्धनला पोहोचायला सायंकाळचे चार वाजले होते.  आता चहा ब्रेक घ्यायचे ठरले. 

श्रीवर्धनमध्ये शिरताना "आपले सहर्ष स्वागत आहे" हे  भल्या मोठ्या कमानीवर लिहिलेले वाक्य वाचून खूप आनंद झाला. समुद्र किनारी वसलेले श्रीवर्धन गाव अतिशय गजबजलेले होते. बाजारपेठेतून जाणारा मुख्य रस्ता एकदम चिंचोळा होता.  चहाच्या शोधात समुद्राकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या दर्गे यांच्या छोट्याश्या हॉटेलमध्ये थांबलो. 


हॉटेलातील मिठाईच्या वासाने तोंडाला पाणी सुटले.  नुकतीच बनविलेली  मावा मिठाई समोरच्या कपाटात ठेवली होती. विशेष म्हणजे या हॉटेल मध्ये येणारा प्रत्येक गिऱ्हाईक मिठाई खात होता. आम्ही सुद्धा मिठाई मागविली. अतिशय मुलायम आणि खुसखुशीत होती मिठाई.  मन तृप्त झाले. 

येथून हरिहरेश्वरकडे शेवटचा १९ किमीचा लॅप सुरू झाला.  या मार्गावर मध्येमध्ये गावे असल्यामुळे स्पीडब्रेकर लागत होते. आता जोर मारणे आवश्यक होते. हरिहरेश्वर घाट सुरू झाला. दमछाक झाली तरी अंधार पडण्यापूर्वी हरिहरेश्वर गाठायचे हा ध्यास घेतला होता. सायंकाळी तेजोगोल अस्ताला जाण्याच्या तयारीत होता. नाभतील मेघांच्या कडा सुवर्ण मुलामा लेऊन सजल्या होत्या. आमचा मार्ग प्रशस्त करून श्री हरिहरेश्वराच्या भेटीसाठी बळ देत होत्या. 
घामाने ओथंबून आम्ही परमेश्वराच्या पायरीपाशी पोहोचलो. दोन्ही बाजूला बंद असलेल्या दुकानांच्या  चिंचोळ्या मार्गातून सायकलसह मंदिराजवळ पोहोचलो.

 बरोबर साडेसहा वाजता गुरुजीनी देवाचा दिवा लावण्यासाठी  मंदिर उघडले. देवदर्शनासाठी मुंबई वरून सायकलिंग करत आलो आहोत हे कळल्यावर,  अहो आश्चर्यम... गुरुजींनी आम्हाला देवाचे,  श्री हरिहरेश्वराचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात बोलावले. देवाच्या दरबारात फक्त आम्ही दोघेच होतो... निव्वळ भारावलेल्या अवस्थेत.
 
सूर्यास्त झाला आणि देवाचा दिवा लागला. आमच्या कठोर परिश्रमला फळ आले होते.  गेली सात महिने मंदिर बंद आहे, परंतु आजच्या १२० किमी च्या कठोर परिश्रमाने केलेल्या तेरा तासाच्या राईडमुळे श्री हरिहरेश्वराने आम्हाला दर्शन दिले होते. इतकेच नव्हे तर मंदिराजवळ असलेल्या खडपा लॉज मध्ये राहायची व्यवस्था सुद्धा झाली. फ्रेश होऊन, आठ वाजता जेवून निद्रादेवीच्या कधी आधीन झालो, हे कळलेच नाही. 

आजची राईड सर्वार्थाने अतिशय विशेष होती. सकाळी साडेपाच वाजता सुरू केलेली राईड सायंकाळी साडेसहा वाजता पूर्ण झाली होती. जवळपास संपूर्ण ऑफ रोडिंग रस्त्याने केलेली राईड, शरीराचा आणि मनाचा कस लावणारा होती. परंतु अनपेक्षित देव दर्शनाने श्रमसाफल्याचा अपरिमित मानसिक आनंद मिळाला होता. श्री हरिहरेश्वराने आमची सायकल सफर पावन केली.

आजच्या सफरी निमित्ताने निसर्गाचे स्तवन स्फुरले...

आम्ही आनंदे  रोज गातो नाचतो 
पहिला की शेवटचा कोण मोजतो

दिनक्रम आमचा रोज मजेचा
प्रभात संध्या आनंदाचा

निसर्ग आमचा साथीदार
मौज मजा असे बहारदार

लाल केशरी संध्याकाळी
लेऊन सारी नवी नव्हाळी

कळ्यांची फुले फुलताना
वाऱ्यासंगे सुगंध वाहताना

शीळ वाजवीत वाहे पवन शीत 
पानापानांत गातसे मधुरसे गीत

तेज मंद  केशरी लालिमा नवा 
उगवता चंद्रमा  उडे पक्षी थवा

हृदयस्थ आहे निसर्ग-ईश्वर
अवचित भेटे हरिहरेश्वर
 

सतीश जाधव
आझाद पंछी ...

5 comments:

  1. खरंच आज खूप खडतर प्रवास झाला. पण हरिहरेश्वरच्या दर्शनाने सार्थकी लागला 👍

    ReplyDelete
  2. सतीश सुरेख लिखाण.

    ReplyDelete