Tuesday, October 6, 2020

धुवाधार राईड...

धुवाधार राईड.....

घोडबंदर लूप...

६ ऑक्टोबर २०२०

खूप दिवसापासून घोडबंदर लूप मारायचे डोक्यात होते. विजयने नुकतीच हरिहरेश्वर राईड दिमाखात पूर्ण केली होती. त्यामुळे तो नवनवीन आणि दमदार  राईड करण्यासाठी आतूर होता. 

सकाळी पावणे पाचला घरातून निघालो. विजय बरोबर पाच वाजता दादर सेनाभवन जवळ तयारीतच होता. आझाद पंछी गृपवर लाईव्ह लोकेशन टाकून सुरू झाली, धुवाधार राईड. पाऊस संपल्यातच जमा होता. त्यामुळे साधारण तीस किमी वेगाने सायकली पळत होत्या. 

कमी रहदारी, निवांत रस्ता आणि सुखद वातावरणात हेडलॅम्पच्या प्रकाशात जोरदार पेडल मारत होतो. काल घरी बनविलेला मेथीचा लाडू सकाळीच खाल्ल्यामुळे घोड्याची ऊर्जा आली होती.  विजय सुद्धा आयुर्वेदिक मसालेदूध पिऊन आला होता. त्यामुळे तो सुद्धा कसदार मल्लासारखा माझ्या मागे भिडला होता. 

माहीम कॉजवे वरून पश्चिम द्रुतगती महामार्गावर आलो आणि सायकलचा वेग आणखी वाढला. आम्ही आता वाऱ्याशी स्पर्धा करत होतो. पार्ले - अंधेरी केव्हा मागे पडले, कळलेच नाही. बरोबर सहा वाजता दिंडोशी फ्लॅओव्हर ओलांडून, मालाड फ्लाय ओव्हर जवळ हायड्रेशन ब्रेक घेतला. पाच  मिनिटात  अतुल ओझा आम्हाला जॉईन झाला.

आता सुरू झाली, तिहेरी राईड. अतुलने रोडिओ सायकल आणली होती. पेडलिंग करताना त्याच्या सायकल मधून सतत टक... टक... आवाज येत होता. पण पळायला एकदम भारी होती. दहिसर टोल नाक्याजवळ तुफान ट्रॅफिक होती. सर्व रहदारी चुकवत  कॉर्नर लेन मधून सायकल बाहेर काढल्या. आता अतुल लीड करत होता. घोडबंदर नाक्यावर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे डाव्या लेन मधून उजव्या लेन मध्ये सायकली आणताना हात दाखवत खूपच सावधगिरी बाळगावी लागली. 
घोडबंदर फाउंटन हॉटेलकडे उजव्या बाजूला वळसा मारून घोडबंदर घाट चढू लागलो. 

अहाहा... डोंगराआडून सूर्याचे दर्शन झाले. आसमंत तांबूस सोनेरी रंगाने उजळून निघाले होते. 

या लोकेशन वर ४० नंबरचा बोर्ड लागला. काय बरे सांगत असावा हा बोर्ड... साठी पार केली पण चाळीशीची रग आहे, असेच काही तरी सांगत असावा काय?  सूर्याच्या दर्शनाने आणखी ऊर्जा मिळाली आणि त्याच तडफेत घाट चढून गेलो. 

आता उतारावर सायकलचा वेग चौपट झाला. तडक गायमुख चौपाटी गाठली. हायड्रेशन ब्रेकसाठी आम्ही थांबलो. 

येथे ठाण्याचा सायकलिस्ट भाग्येश बोनवटेची भेट झाली.  याच्या सोबत आणखी दोन सायकलिस्ट मित्र होते. हसतमुख भाग्येशने चहा ऑफर केली. एकदम भावला भाग्येश. त्या तिघांना मेथीचा (भूकलाडू) लाडू दिला. आमचा निरोप घेताना माझ्याबरोबर राईड करायचे आश्वासन भाग्येशने दिले. 

आम्ही तिघांनी मेथी लाडू, तसेच विजयने आणलेले आयुर्वेदिक मसाले दूध आणि हाइड & सिक बिस्किटे फस्त केली. फोटो काढून नव्या जोमाने ठाण्याकडे राईड सुरू झाली. 

ठाण्यात शिरताच रहदारीने गाठले. परंतु विजयच्या डोक्यात वेगाची नशा होती. त्यामुळे वेग तिळमात्र सुद्धा कमी झाला नाही. पवई बायपासला अतुलला टा टा केला. विक्रोळीला आल्यावर पाच मिनिटांचा पॉवर ब्रेक घेतला. पाणी पिऊन जोमदार राईड सुरू झाली. ट्राफिकमध्ये मोटार सायकलच्या पुढे सायकल पळत होत्या. दादरला विजयला बाय बाय केले.  घरातून निघताना जो वेग होता त्याच वेगात साडेनऊ वाजता घरी पोहोचलो. 

अशा प्रकारे धुवाधार राईडची सांगता झाली. हायड्रेशन ब्रेक सोडून चार तासात ९५ किमी राईड झाली होती. उरलेले ५ किमी,  सायकलिंग करत बँकेत जाऊन भरून काढले. जवळपास ताशी २४ किमी वेगाने आज सायकल पळाली होती.

MTB कमी वेगात पळते. ह्या विधानाचा भ्रमनिरास झाला होता. समर्पयामीचा  मयुरेश एकदा म्हणाला होता, "वेग सायकल मध्ये नसतो, तर तो डोक्यात असतो".

खूप राईड केल्यावर जाणले आहे, भारतातील रस्त्यांसाठी MTB सायकलच सुयोग्य आहे.


सतीश जाधव
आझाद पंछी.....

20 comments:

  1. सतिष सर
    सुंदर राइड सुंदर लिखाण सुंदर वर्णन
    आता बोर्ड 30चाच दिसायला हवा
    चाळीशी खूपच जास्त वाटते
    खूप खूप शुभेच्छा

    ReplyDelete
  2. सतीश सायकल स्वारीचा खूप आनंद घेतलास. मन प्रसन्न झाले. तू सायकल स्वारी करतोस ह्याचा आपल्या ग्रुपला सुद्धा आनंद होतोय अणि झाला.

    ReplyDelete
  3. सुंदर पहाट ची मजा आणि गुलाबी थंडीची चाहूल गेलेली, अता नाही घेणार तर कधी मग. मोहिमा अश्याच पार पाडाव्या लागतात, वाऱ्याच्या वेगाने तर कधी अंधारा इतके शांत राहून.
    जय सायकलिंग 💪🛴🚵

    ReplyDelete
  4. सुंदर वर्णन ....
    स्वप्निल नागरे

    ReplyDelete
    Replies
    1. स्वप्नील
      असेच प्रोत्साहन मिळो 👍👍

      Delete
  5. मित्राचे अभिप्राय...

    धुवाधार राईड सारखेच धुवाधार लिखाण 👌💐

    ReplyDelete
  6. अतिशय छान, एकदम झकास, चाबूक !!!!!
    नेहमीप्रमाणे सर्वसमावेशक !!!!!
    साडेचार तासात ९५ किलोमीटर, खरोखर एकदम भारी वेग. म्हणजेच ख-या अर्थाने "धुवाधार राईड" यात तिळमात्र शंका नाही !!!!!
    आशेच वा-याशी स्पर्धा करा पण काळजीपूर्वक, हे सुध्दा लक्षात असूद्या.
    तिघांचेही खूप खूप अभिनंदन !!!!!
    पुढील लिखाण आणि नवनवीन सफरिंसाठी भरपूर शुभेच्छा !!!!!
    ..... लक्ष्मण

    ReplyDelete
  7. लक्ष्मण भाऊ 😊

    एकदम उमदे अभिप्राय...

    तुम्हाला खूप मिस करतो...

    नवीन मुंबई गोवा सफर आता तुमच्या बरोबरच करायची आहे.👌👍

    ReplyDelete
  8. सहज सोप्या भाषोतील सुंदर प्रवास वर्णन

    ReplyDelete