Sunday, December 28, 2025

कीर्तावनी... वारी आडवटंच्या विठोबाची... दिनांक २६.१२.२५

कीर्तावनी... वारी आडवटंच्या विठोबाची... दिनांक २६.१२.२५

घुमान वारीचे आयोजक आणि माझे परममित्र सूर्यकांत भिसे यांचे आमंत्रण मिळाले... मुंबईत होणारा कीर्तावनी नाटकाचा प्रयोग बघण्याचे... त्यांचा मुलगा स्वामीराज याची प्रमुख भूमिका होती... 

पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या पु.ल. कट्टा या उपक्रमाअंतर्गत सादर झालेला कीर्तावनी  हा प्रयोग  एक वैचारिक आणि भावनिक उत्सव होता.

खुल्या आकाशाखाली, शब्द-सूर-संवेदनेचा अद्भुत संगम अनुभवायला मिळालेला कीर्तावनीचा मुंबईतील पहिला प्रयोग मनावर दीर्घकाळ ठसा उमटविणारा होता....

तमाशातील नर्तिका आणि कीर्तनकार यांच्या भेटीतून उलगडणारा कीर्तन आणि बतावणी म्हणजेच कीर्तावनी हा खुल्या रंगमंचावरील प्रयोग  थेट अंतर्मनाला भिडतो...

तेराव्या शतकातील ज्ञानदेव-नामदेवांच्या संतवाणीपासून ते सोळाव्या शतकातील तुकाराम महाराजांच्या वैचारिक प्रवाहांपर्यंतची संत परंपरा अत्यंत प्रभावीपणे उभी केली होती...

त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले व्हावेत म्हणून झालेल्या ऐतिहासिक प्रयत्नांची मांडणी मनाला स्पर्शून गेली... एकनाथ महाराजांचा बुरगुंडा प्रचंड भावला...

आजच्या काळाशी संतवाणीची घट्ट सांगड घालताना हे नाटक समाजाला आरसा दाखवते. शब्द, संगीत, नृत्य आणि अभिनय यांचा सुरेख समतोल साधत प्रत्येक प्रसंग डोळ्यात अंजन घालणारा होता...

 ऋचिका खोत आणि स्वामीराज भिसे यांचा अभिनय, गाणे आणि नृत्य यांची ताकद अनुभवताना रंगमंच सादरीकरणा बरोबर... शब्द, सूर आणि भावनांनी उजळून निघालेला जिवंत अनुभव होता... तुकाराम महाराजांचे स्वर्गावरोहण आणि सध्या त्यावर चाललेला वाद याचे अतिशय मार्मिक विवेचन किर्तवली मध्ये अनुभवता आले...

अभ्यासपूर्ण मांडणी, आशयाची प्रखरता आणि सादरीकरणातील सहजता यामुळे सलग १ तास ५० मिनिटांचा हा प्रयोग पाहताना मन विठ्ठल नामात रंगून गेले… आणि हा रंगानुभव अखंड चालत रहावा असे वाटत होते...

संतपरंपरेची उज्ज्वल मशाल वर्तमानकाळात तेजाने पेटवणारा ‘कीर्तावनी’ प्रहसन मन समृद्ध करून गेले...

कीर्तावनी या आशयघन आणि संवेदनशील रंगानुभवासाठी मंचावर दिसणाऱ्या कलाविष्कारामागे अनेक हातांची, अनेक मनांची आणि अनेक विचारांची एकत्रित ताकद उभी होती...

लेखन आणि दिग्दर्शनाच्या माध्यमातून संतपरंपरेचा वैचारिक प्रवास प्रभावीपणे उलगडणाऱ्या ऋचिका खोत, तसेच संशोधन सहाय्यातून आशयाला खोली देणाऱ्या कीर्तनकार स्वामीराज भिसे यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे...

दिग्दर्शन सहाय्यासाठी ज्ञानराज होले यांचे समर्पित सहकार्य संपूर्ण सादरीकरणात जाणवले...

संगीतदिग्दर्शन आणि संगीतसाथ यांच्या रूपाने ऋषिकेश देशमाने, सामिरण बर्डे आणि ज्ञानराज होले यांनी शब्दांना सूर दिले आणि भावनांना लय मिळवून दिली...

रंगमंचावर सजीव होणारे अभिनयविश्व ऋचिका खोत आणि स्वामीराज भिसे यांनी ताकदीने उभे केले होते...

नृत्यदिग्दर्शनातून हालचालींना अर्थ आणि सौंदर्य देणाऱ्या वैष्णवी निवाळकर, दृश्यभाषेला आकार देणाऱ्या प्रसाद आव्हाड यांच्या चित्ररचनेने आणि प्रकाशयोजनेतून वातावरण घडवणाऱ्या राम सईदपुरे  व अक्षय ओगले यांच्या कामामुळे सादरीकरण अधिक प्रभावी आणि भावनात्मक झाले...

पोस्टर डिझाइनसाठी नीरज सबनीस यांचे सर्जनशील योगदानही तितकेच महत्त्वाचे होते...

खरं तर  जगन्नीयंत्याचे विशेष आभार मानले पाहिजेत... कारण अशा कलाकृती समाजाच्या सामूहिक संवेदनशीलतेतूनच आकार घेतात...

कीर्तावनीसाठी योगदान देणाऱ्या प्रत्येकास मनःपूर्वक शुभेच्छा. अशीच अभ्यासपूर्ण, प्रेरणादायी आणि समाजाशी संवाद साधणारी कला निरंतर घडत राहो, हीच सदिच्छा...

नाट्यप्रयोगाच्या समारोपानंतर स्वामीराजची आपुलकीने गळाभेट घेतली… आणि ऋचिकाला भरभरून आशीर्वाद दिले...

 संपूर्ण टीमने लोककलेचा केलेला आदर...  तसेच कीर्तन आणि बतावणी यांच्या सुरेल संगमातून समाजप्रबोधन घडविणाऱ्या  विचारांना दिशा देऊन मनांना स्पर्श केला...

या अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी सादरीकरणासाठी प्रत्येक कलाकार, सूत्रधार आणि पडद्यामागील सहकाऱ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा!

अशा आशयघन, संवेदनशील आणि समाजाशी संवाद साधणाऱ्या कलाकृतीसाठी रंगमंच, कलाकार आणि प्रेक्षक तिघेही एकत्र आले... हीच या संध्याकाळची सर्वात मोठी कमाई होती... 

राम कृष्ण हरी...

सतीश जाधव

7977690693

2 comments:

  1. भिसे गुरुजी यांचे अभिप्राय...

    खूप छान जाधव सर
    आपल्या लेखणीने कीर्तावनी च्या टीमला नक्कीच बळ मिळेल. माझ्या विनंती नुसार आपण कार्यक्रम पाहिला. आपला मी आभारी आहे..
    तुमचे आशीर्वाद असेच त्यांच्या पाठीशी राहावेत हीच सदिच्छा!
    🙏

    ReplyDelete
  2. मित्र धनंजय किराणे यांचे अभिप्राय...

    खुपच छान शब्दांकन!

    ReplyDelete