Monday, January 26, 2026

२६ जानेवारी... प्रजासत्ताक दिवस राईड...

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या विरार राईड बाबत आशिषने विचारणा केली... त्याला तात्काळ होकार दिला... पेडल वरियर्सचे बरेच सदस्य रेल्वेने जाणार होते... माझी सुद्धा सहमती होती... विचार केला होता... विरारवरून परतीची राईड करायची.. 

जितेंद्र नुकताच दुबई एन्जॉय करून आला होता.. म्हणाला आपण जाता येता सायकलिंग करूया... आणि मग जयेशच्या साथीने  कार्यक्रम नक्की झाला... 

विरार लूप मारायचा आणि दिडशे किमी पूर्ण करायचे... GRM 300 साठीची तयारी आणि नेट प्रॅक्टिस अशी ही राईड होणार होती... 

सकाळी साडेचार वाजता घरून पेडलिंग सुरू झाले... वांद्र्याला जयेश भेटला आणि जितेंद्र अंधेरी येथे साथीला आला... 

घोडबंदर ओलांडले चाळीस किमी राईड पूर्ण झाली होती... वाटेत जैन ढाबा लागला... गंमत म्हणजे तेथे कुल्हड चहा 42 रुपये होता... पुढे छान उडुपी हॉटेल लागले...  तेथे मस्त इडली वडा सांबार हाडदले... कडक चहा घेऊन पुढची सफर सुरू झाली... 

विरार फाट्यावर पोहोचलो... तेथून आशिषला फोन लावला... म्हणाला लवकर या... कार्यक्रम आटपत आलंय... तिघांनी जोर मारला आणि विरार पूर्वेला कार्यक्रम स्थळी पोहोचलो... वाटेत सरिता जालोरी हिची भेट झाली...

जितेंद्र वाडे भेटला... कार्यक्रम स्थळी आशिष आणि कुणाल ओमी यांची भेट झाली... 

विरार पर्यंत राईड करत आल्याबद्दल मेडल आणि नाष्टा मिळाला... सपाटून भूक लागली होती... फिट इंडिया आणि कच्छी मंडळ यांच्या तर्फे स्वातंत्रदिन राईड आयोजित केली होती... इव्हेंट आयोजकांची भेट घेतली... आणि परतीची सफर सुरू झाली...

विरार फाट्यावरील नुकतेच प्राणप्रतिष्ठा झालेले द्वारकाधीशाच्या मंदिराला भेट दिली... तुडुंब गर्दी होती मंदिर परिसरात... बाहेरूनच कलश आणि मंदिराचे दर्शन घेतले... आणि.मुंबईकडे निघालो...

आता ऊन वाढले होते... परंतु जिद्द कमी झाली नव्हती...  घोडबंदर येथे तिळाचे लाडू  आणि नीरा यांचा समाचार घेतला... 

जितेंद्राला सायंकाळी सत्संग साठी जायचे असल्यामुळे 100 किमी पूर्ण करून त्याने दहिसरला मेट्रो पकडली... दहिसर जवळील गोकुळ आनंद मध्ये  जयेशच्या साथीने डाळखीचडी खाल्ली... आणि भन्नाटात 150 किमी राईड पूर्ण करून घर गाठले... घरी यायला चार वाजले होते... 12 तासात 150 किमी पूर्ण झाले होते

लांब पल्ल्याची सायकलिंग करताना मनाची तयारी, नियोजनाची शिस्त आणि संघभावनेची ताकद यांची  सांगड घालणे आवश्यक असते...

वेळेची मर्यादा, उन्हाचा तडाखा किंवा थकवा हे अडथळे वाटतात...  मात्र स्पष्ट उद्दिष्ट, सोबत असलेली योग्य साथ आणि अंतर्मनातील जिद्द यांमुळे प्रत्येक अडथळा संधीमध्ये रूपांतरित होतो...

पूर्ण पेडलिंगच्या निर्णयामुळे मार्गात मिळणारा साधा चहा सुद्धा अमृतासारखा भासतो...

शेवटच्या टप्प्यातील थकवा सुद्धा मित्रांच्या साथीमुळे ऊर्जावान बनतो...आणि मग  पुढील मोठ्या ध्येयाची तयारी होते...

100, 150 किंवा 300 किमी सायकलिंग म्हणजे सातत्य, संयम आणि आत्मविश्वासाची परीक्षा असते...

एकमेकांना वेळेवर होकार देणे, मार्गावर भेटणाऱ्या सहकाऱ्यांना, मित्रांना प्रोत्साहन देणे आणि कार्यक्रमस्थळी मिळालेल्या सन्माना बरोबर  परतीच्या प्रवासातही तितक्याच उत्साहाने पेडल मारणे... हीच खरी सायकलिंग संस्कृती आहे...

मनात अढळ विश्वास, पायात सातत्याची ताकद आणि डोळ्यांसमोर स्पष्ट ध्येय असेल, तर कोणतेही अंतर मोठे वाटत नाही...

आजची प्रत्येक राईड उद्याच्या मोठ्या आव्हानासाठीची नेट प्रॅक्टिस ठरते... पेडल फिरत राहिले की आत्मविश्वास आपोआप वेग घेतो... आणि मग प्रत्येक सायकलिस्ट स्वतःच्या मर्यादा ओलांडताना दिसतो. 

सतीश जाधव... सायकलिस्ट 

7977690693


2 comments:

  1. खूप छान वाटले तुम्हाला भेटून सतीश सर, फार सुंदर लेख लिहिला आहेत 🎉🥳🤗

    ReplyDelete