डॉ चितळे यांच्याशी झालेला १२ ऑगस्टचा संवाद...
१२ ऑगस्टचा तो संवाद आज पुन्हा पुन्हा कानात घुमतोय…
“Don’t worry… Cycling कर...” म्हणणारे डॉ. चितळे, तुम्ही सुखरूप परत या… आम्ही वाट पाहतोय...
काही फोन कॉल्स आपण सहज करतो… काही संवाद आठवणीत राहतात… आणि काही संवादांना काळ अचानक असा अर्थ देतो, की त्यातील प्रत्येक शब्द पुन्हा पुन्हा ऐकताना मन भरून येतं...
(एक आठवण… जी आज मनाला अधिकच स्पर्शून जाते…माझ्या Kashmir to Kanyakumari (K2K) World Record सन्मान सोहळ्यात डॉ. मिलिंद चितळे यांच्यासोबतचा हा जिव्हाळ्याचा क्षण. १२ ऑगस्टला फोनवर त्यांच्याशी झालेला संवाद आज पुन्हा पुन्हा आठवतोय… त्यांचा आश्वासक आवाज, मित्रत्वाचा जिव्हाळा आणि दिलेली सकारात्मक ऊर्जा अजूनही मनात ताजी आहे.आज एकच प्रार्थना... डॉ. चितळे आणि त्यांची पत्नी सुखरूप परत यावेत.)
१२ ऑगस्ट २०२६.
त्या दिवशी माझे मित्र डॉ. मिलिंद चितळे यांच्याशी मोबाईलवर बोलणे झाले होते. सुदैवाने तो संवाद माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवला गेला.
आज तो संवाद ऐकताना त्यांच्या आवाजातील आत्मविश्वास, आपुलकी, सकारात्मकता आणि माझ्याविषयीची काळजी मनाला अक्षरशः हेलावून जाते...
माझ्या अपघातानंतर पाठीच्या मणक्याला झालेल्या दुखापतीबद्दल आमचे बोलणे सुरू होते...
त्यांना सांगितले की डॉ. दळवी यांनी तपासणी करून मला धीर दिला आहे. हळूहळू सायकलिंग सुरू करायला सांगितले आहे आणि महिन्यानंतर पुन्हा एक्स-रे करून पुढची दिशा ठरवायची आहे.
डॉ. चितळे प्रत्येक गोष्ट शांतपणे ऐकत होते. आणि मग त्यांनी मला जे सांगितले, ते आजही कानात घुमत आहेत...
“काही प्रॉब्लेम नाहीये… Don’t worry. Cycling कर..."
त्यांच्या आवाजात वैद्यकीय सल्ल्यासोबतच आपुलकीचा ओलावा होता. एका ट्रेकरचा, एका माउंटेनिअरचा, एका साहसप्रेमी माणसाचा दुसऱ्या साहसप्रेमी मित्रासाठी जिव्हाळा त्या शब्दांत होता...
ते म्हणाले, “ज्यांना सायकलिंगची किंवा ट्रेकिंगची आवड असते, त्यांना ‘हे करू नको, ते बंद कर’ असं सांगितलं की त्यांचा जीव गुदमरतो. त्यांना सांगायला हवं... तू हे सगळं कर… पण योग्य काळजी घेऊन कर.”
किती सुंदर विचार...
माझ्यासारख्या सायकलप्रेमी माणसाच्या मनाची अवस्था त्यांनी अगदी अचूक ओळखली होती.
माझ्या दुखापतीनंतर काही दिवस सायकलपासून दूर राहण्याची वेळ आली होती. मी त्यांना हसतच म्हणालो, “एकदम दहा दिवस असंच झालं ना माझं!”
आणि आमच्या दोघांच्याही बोलण्यात सहज हास्य उमटलं. त्यांनी मला पुढे Core Muscle Strengthening करण्याचा सल्ला दिला. अक्षरशः शब्दही समजावून सांगितला...
“C-O-R-E… Core Muscle...”
आज हा छोटासा तपशीलसुद्धा आठवताना डोळे भरून येतात.
कारण त्या संवादात डॉक्टरांच्या भूमिकेसोबतच एक जिवलग मित्र होता… एक विश्वास देणारा मार्गदर्शक होता… आणि प्रत्येक शब्दातून नवी उमेद, धैर्य आणि सकारात्मक ऊर्जा देणारा माणूस होता.
एक साहसवेडा माणूस दुसऱ्या साहसवेड्या माणसाला पुन्हा उभं राहायला सांगत होता.
संवाद पुढे जात असताना त्यांना म्हटलं,
“आता एकदा तुम्हाला भेटायला यायचंय. जितेंद्र म्हणत होता आपण जाऊया, जरा गप्पा मारू डॉक्टर चितळेंशी.”
डॉ. चितळे आपल्या नेहमीच्या उत्साही शैलीत म्हणाले, “Yes, yes… चालेल, चालेल!”
मी म्हटलं, “तुमचा वेळ घेऊन मग येईन!”
आज हे वाक्य मनाला सर्वाधिक चटका लावतं.
कारण त्यानंतर त्यांनी सहज सांगितलं...
“मी चाललोय आता कैलासला २३ तारखेला.”
मी विचारलं, “कैलास मानसरोवरला?”
त्यांचे उत्तर आले “हो.”
आणि मग पुढचा संवाद त्यांच्या अफाट अनुभवाची साक्ष देणारा होता... ते यावेळी तब्बल ७० जणांचा समूह घेऊन जाणार होते.
नेपाळमार्गे, तिबेटमधून कैलास मानसरोवर यात्रा.
आणि त्यांनी सहज सांगितलं... “आता माझी २९वी कैलास मानसरोवरची ट्रिप आहे ही!”
मी उत्स्फूर्तपणे म्हणालो, “क्या बात है! क्या बात है!”
त्या क्षणी मला कुठे कल्पना होती की हा संवाद काही दिवसांनी माझ्यासाठी इतका अमूल्य ठरेल!
मी त्यांना विचारलं, “जाणार कधी आणि येणार कधी?”
त्यांनी सांगितलं, “२३ ऑगस्टला जाऊन ६ सप्टेंबरला परत येणार”
त्यांना शुभेच्छा दिल्या “All the best!”
आणि शेवटी सहज म्हटलं, “भेटूया मग… यात्रेवरून आल्या नंतरच भेटू आपण.”
त्यांनीही नेहमीच्या प्रसन्न आवाजात उत्तर दिलं...
“Yes, yes… OK.”
फोन ठेवताना पुन्हा एकदा मी म्हटलं..
“All the best! Thank you.”
संवाद संपला.
पण आज वाटतं… तो संवाद संपलेला नाही.
त्यातील प्रत्येक शब्द अजून माझ्याशी बोलतो आहे.
त्यांचा आवाज अजूनही सांगतो आहे
“Don’t worry…”
डॉक्टर… आता हेच शब्द आम्ही तुम्हाला सांगतोय...
प्रिय डॉ. चितळे,
त्या दिवशी तुम्ही मला धीर दिलात... माझ्या मनातील भीती दूर केलीत... मला पुन्हा सायकलकडे जाण्याचा आत्मविश्वास दिलात...
आज मात्र परिस्थितीने भूमिका बदलल्या आहेत.
आज आम्ही सर्वजण तुमच्यासाठी प्रार्थना करत आहोत.
आज तुम्हाला सांगायचं आहे...
डॉक्टर… Don’t worry!... तुम्ही पर्वतांचे माणूस आहात... कठीण वाटा पार करणं तुम्हाला माहीत आहे... हिमालयाच्या असंख्य वाटांनी तुमची पावलं अनुभवली आहेत... कैलासाच्या मार्गाशी तुमचं नातं तब्बल २९ यात्रांचं आहे... तुमची जिद्द, तुमचा अनुभव आणि लाखो शुभेच्छांची ताकद तुमच्यासोबत आहे.
आमच्या मनात एकच प्रार्थना आहे
“डॉ. मिलिंद चितळे सुखरूप परत यावेत.”
१२ ऑगस्टला मी तुम्हाला म्हटलं होतं... “भेटूया मग यात्रेवरून आल्या नंतर…”
डॉक्टर… ती भेट अजून बाकी आहे... जितेंद्रसोबत तुमच्याकडे यायचं अजून बाकी आहे... तुमच्यासोबत निवांत गप्पा मारायच्या अजून बाकी आहेत... तुमच्या २९व्या कैलास यात्रेच्या कथा ऐकायच्या अजून बाकी आहेत.
आणि माझी सायकल पुन्हा लांबच्या सफरीवर निघाल्यावर तुम्हाला सांगायचं आहे... “डॉक्टर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे Cycling चालू आहे!”
म्हणून…
परमेश्वरा, आमची ही एकच प्रार्थना स्वीकार.
डॉ. मिलिंद चितळे यांना सुरक्षित ठेव.
त्यांच्या प्रत्येक पावलाला संरक्षण दे.
संकटातून त्यांना सुखरूप बाहेर काढ.
आणि त्यांना त्यांच्या कुटुंबीयांमध्ये, मित्रांमध्ये आणि आप्तेष्टांमध्ये सुरक्षित परत आण.
आम्हाला पुन्हा एकदा त्यांचा तो प्रसन्न आवाज ऐकू दे ... “Yes, yes… चालेल, चालेल!”
डॉक्टर… तुम्ही सुखरूप परत या... आम्ही तुमची वाट पाहतोय...
१२ ऑगस्टचा तो फोन अजून संपलेला नाही… त्याचा शेवट आपल्या प्रत्यक्ष भेटीनेच व्हायचा आहे.
सतीश विष्णू जाधव
सायकलिस्ट
while reading I was crying
ReplyDelete🙏🙏🙏🙏
ReplyDeleteबाबा ते नक्की परत येतील 🙏
ReplyDelete