Showing posts with label अध्यात्म. Show all posts
Showing posts with label अध्यात्म. Show all posts

Saturday, July 11, 2020

भयसापळा आणि मोहसापळा

 भयसापळा आणि मोहसापळा
(संतोष कारखानीस यांच्या ब्लॉग वरून संकलित)

         आपण नको त्या गोष्टीत का अडकून पडतो, याचा उत्कृष्ट उलगडा करणारा एक दृष्टांत संत ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेला आहे.


    पोपट पकडण्याची एक खास पद्धत आहे. एका आडव्या टांगलेल्या दोरीत बऱ्याच नळ्या ओवलेल्या असतात. या प्रत्येक नळीला पोपट आकर्षित होईल असे काहीतरी खाद्य चिकटवलेले असते. 
    
जेव्हा पोपट नळीवर बसतो, तेव्हा त्याच्या वजनाने नळी गोल फिरते व पोपट उलटा लटकतो. उलटे लटकताच पोपट स्वाभाविकपणे पायात नळी गच्च पकडतो. ही अवस्था पोपटाने कधीच अनुभवलेली नसते. नळी सोडली की आपण पडू, असेच त्याला वाटत राहते.

 खरे तर नळी सोडल्यानंतर पडू लागताच पंखांचा वापर करून एक गिरकी घेऊन तो सहज उडू शकणार असतो.  पण हे "ज्ञान‘ त्याला होत नाही व तो नळी अधिकच गच्च पकडून लटकलेल्या अवस्थेत  राहतो व पकडणाऱ्याच्या हाती सापडतो.  याला  भयसापळा  असे म्हणता येईल.
 "जेव्हा आपला पोपट झाला आहे असे वाटते"  व तरीही आपण त्या परिस्थितीतून सुटूच शकत नाही, तेव्हा आपण कशाला भीत आहोत ते नेमके पाहावे.
 "हा आधार गेला तर," अशी भीती असते तेव्हा जर काही काळ निराधार व्हायची तयारी दाखवली, तर आपणही उडून जाऊ शकत असतो. 
पडायची शक्‍यता ज्याला जराही नको वाटते, तो उडू शकत नाही!

----------------------------------------------------------------------------------------

           माकडे पकडायची देखील एक खास पद्धत आहे.

 एक मडके मातीत पुरून ठेवतात. मडक्‍यात एक फळ असते.  माकड ते फळ काढण्यासाठी मडक्‍यात हात घालते. मडक्‍याचे तोंड हे अगदी नेमक्‍या आकाराचे बनविलेले असते;  असे की फळ सोडून दिले तर माकडाचा हात बाहेर निघू शकेल. पण फळासकट हात बाहेर काढायला जावे, तर हाताचा आकार वाढल्याने हात अडकतो.

  माकडाच्याने फळ सोडवतही नाही आणि त्यामुळे हातही मडक्याबाहेर काढता येत नाही.  निर्णय न घेता येण्याच्या या  अवस्थेत माकड मनाने अडकते व   शरीराने मडक्‍यापाशी.
  
 या सापळ्याला  मोहसापळा असे म्हणता येईल.
 आपले ज्या परिस्थितीत "माकड‘ झाले असेल, त्यात असे काय आहे की ज्याचा मोह आपल्याच्याने सोडवत नाहीये.

 हे जर बघता आले तर कदाचित ती गमावणूक वाटते तेवढी मोलाची नसेलसुद्धा !

थोडेसे सोडून देऊन संपूर्ण सुटता आले तर वाईट काय? 

निदान या मर्यादित अर्थाने "फलत्याग" नक्कीच मुक्तिदायक नाही काय?

----------------------------------------------------------------------------------------

एक जण कमरेइतक्या पाण्याच्या हौदात  उतरून बराच थयथयाट करतोय.  हातांनी पाणी खळबळवतोय. या हौदानं माझी काहीतरी मूल्यवान वस्तू गिळलीय म्हणून मी संतापलोय.

 "अरे तू शांत हो म्हणजे पाणी स्थिर होईल आणि मग तुला तळ दिसेल व वस्तूही सापडेल !" कोणीतरी समजावत आहे. पण तो  ऐकूनच घ्यायला तयार नाही.

"हौदाचा तळ रिकामाच आहे आणि मी केलेला थयथयाट व्यर्थ होता,  हे स्वतःला कळू न देण्यासाठी तर तो पाणी फेसाळलेलं ठेवत नसेल?"

---------------------------------------------------------------------------------------

"दमलास?  चल परत जाऊ.

 आज इतकं पुरे. पुन्हा कधीतरी जाता येईलच.

"नाही गुरुजी...  मी दमलोय;  पण आपण इतके वर आलोय, आज शिखरावर पोहोचायचंच !  कधी एकदा पोहोचतोय आणि मग तुम्ही ते सत्य सांगताय, असं झालंय मला.‘‘

"माझं वचन नीट आठव. ही मोहीम पुरी होईपर्यंत, जर माझी आज्ञा तू निरपवादपणे पाळलीस, तर ते सत्य सांगेन‘ असं म्हणालो होतो.‘‘

"होय गुरुजी. पण आता शिखर जवळ आलं असेल. इतकं वर आल्यावर सोडून द्यायचं म्हणजे...‘‘

"कितीही वर आलो असू !  तरी मी सांगतो म्हणून, हे सगळे कष्ट वाया जाऊ द्यायला तू तयार आहेस का नाही ?‘‘

"ठीक आहे गुरुजी. मी आजची सगळी धडपड वाया जाऊ द्यायला तयार आहे. म्हणत असाल तर परत जाऊ या.‘‘

""शाबास ! आता मी तुला ते सत्य सांगतो‘‘.

""पण शिखर न येताच ?‘‘

""तसं नव्हे. तू परतीला तयार झालास म्हणून !

 ते सत्य हे आहे...  की शिखर असं नाहीच. ही अंतहीन चढण आहे आणि ज्या तळापासून आपण निघालो ना, तेच खरं पोहोचण्याचं स्थान होतं !  
तू उत्तीर्ण झालास. चल आता तिथं जाऊ, जिथं आपण असतोच; फक्त "पोहोचलो" असं वाटत नसतं इतकंच !

----------------------------------------------------------------------------------------

पोपटानं एकदा तरी आधार सोडून पाहावा...

माकडानं एकदा तरी फळ सोडून पाहावं...

थयथयाट करणाऱ्यानं एकदा तरी खळबळ थांबवून तळ पाहावा...

चढणाऱ्यानं एकदा तरी शिखराचा हट्ट सोडून पाहावा...

 हे जमायला अवघड नसतं. पटायला अवघड असतं.

भयसापळा, मोहसापळा हे माणसाच्या मनातूनच तयार झालेले असतात. त्यामुळे त्यातून बाहेर पडणे अवघड नसते; पण सुटकेचा हा मार्ग सोपा असला तरी पटायला अवघड असतो.

----------------------------------------------------------------------------------------

माकडें मुठीं धरिलें फुटाणे । 

गुंतले ते नेणे हात तेथें ॥१॥

काय तो तयाचा लेखावा अन्याय ।

हित नेणे काय आपुलें तें   ॥ध्रु.॥ 


शुकें निळकेशीं गोवियेले पाय । 

विसरोनि जाय पक्ष दोन्ही ॥२॥


तुका म्हणे एक ऐसे पशुजीव ।

न चले उपाव कांही तेथें ॥३॥ 


वरील तुकोबांच्या गाथेतील अभंगात,  मानवी मनाचे अत्यंत मार्मिक विश्लेषण दिले आहे.

जय जय रामकृष्ण हरी

सतीश जाधव

Thursday, July 9, 2020

गुरू

*गुरू*
(व्हाट्स अँप वरून साभार)

तो धिटाईने वृद्ध गुरु समोर उभा होता. गुरु अनुभवी नजरेने त्याचे निरीक्षण करत होते.
कोवळं वय, असेल साधारण नऊ-दहा वर्षाचा. त्याला डावा हातच नव्हता. एका अपघाताने तो हिरावून घेतला होता म्हणे.

 तुला माझ्या कडून काय हवे आहे?"  गुरूने त्या मुलाला विचारले.

"सर, मला तुमच्या कडून ज्युडो-कराटेची विद्या शिकायची आहे !"

शरीराला एक हातच नाही आणि ज्युडो शिकायचं आहे? अजब मुलगा दिसतोय.
"कशाला?"

"शाळेत मला मुलं त्रास देतात. थोटक्या म्हणून चिडवतात.  मोठी माणस नको तितकी कीव करतात. 

त्यांच्या या वागण्याचा त्रास होतो !  मला माझ्या हिमतीवर जगायचंय !  कोणाची दया नको. हात नसताना मला माझं रक्षण करता आलं पाहिजे !"

"ठीक !  पण मी आता तो  'शिक्षण' देणारा गुरु राहिलो नाही. मी आता वृद्ध झालोय आणि आत्मचिंतनात मग्न असतो. तुला माझ्याकडे कोणी पाठवलं ?"

"सर, मला एक हात नसल्याने खूप जणांनी  'विद्यार्थी' म्हणून नाकारलं. त्यातल्याच एकाने तुमचे नाव सांगितले. "तुला फक्त तेच शिकवू शकतील, कारण त्यांना खूप वेळ असतो आणि त्यांच्याकडे एकही विद्यार्थी नाही!" असे ते म्हणाले होते.

'तो उन्मत्त शिक्षक' कोण हे गुरूंनी तात्काळ ताडले. अश्या अहंकारी माणसांमुळेच ही विद्या गुंड प्रवृत्तीच्या हाती गेली, याचे त्यांना नेहमीच वाईट वाटे.

ठीक आहे !  आज पासून तुला मी माझा 'शिष्य' करून घेत आहे.  या शिष्यत्वाचे नियम तुला आज पहिल्यांदा आणि शेवटचे सांगतो.  लक्षात ठेव !  आपल्या गुरूवर पूर्ण विश्वास ठेवायचा.  मी माझ्या लहरी प्रमाणे शिकवीन ते शिकून घ्यायचे.

 ज्युडो-कराटे ही खूप घातक विद्या आहे. तिच्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो !  म्हणून ही विद्या फक्त आत्मरक्षणासाठीच वापरायची. नेहमी नम्र रहायचे. समजले ?"
"हो सर, समजले. मी आपल्या या आज्ञांचे पालन करीन."   मुलाने गुरूच्या पायावर डोके ठेवले.
आपल्या एकुलत्या एक शिष्याच्या शिक्षणास गुरूंनी आरंभ केला.

एकच डाव गुरूंनी त्याला शिकवला आणि तोच  तोच डाव त्याच्याकडून सराव करून घेऊ लागले. सहा महिने हेच चालू राहिले. एक दिवशी मुलाने गुरूचा चांगला मूड बघून हळूच विषय काढला.

"सर, सहा महिने झालेत. एकच डाव तुम्ही माझ्या कडून करून घेत आहात. नवीन डाव असतीलच ना?"

"आहेत ! अनंत डाव आहेत !  ते आत्मसात करायला, तुला तुझं आयुष्य कमी पडेल !  पण तुला मी शिकवतो आहे त्याचीच गरज आहे  आणि इतकेच तुझ्यासाठी पुरेसे पण आहे !"

गुरुवचनावर विश्वास ठेवून तो शिकत राहिला.

  ०००००००


बऱ्याच  दिवसानंतर ज्युडोचे सामने जाहीर झाले. गुरूंनी आपला एकमेव शिष्य यात उतरवला.

पहिले दोन सामने त्या शिष्याने सहज जिंकले !

पहाणारे आश्चर्यचकित झाले. एक हात नसलेला मुलगा जिंकलाच कसा ?  कोण गुरु असावा ?

तिसरा सामना थोडासा कठीण होता, पण त्या मुलाच्या  सफाईदार आणि वेगवान हालचालींनी तो ही सामना त्यानेच जिंकला !

आता त्या मुलाचा आत्मविश्वास बळावला. आपणही जिंकू शकतो, ही भावना त्याला बळ देत होती.
बघता बघता तो अंतिम सामन्यात पोहोचला.

ज्या शिक्षकाने, त्या मुलास म्हाताऱ्या गुरुंकडे पाठवले होते, त्या अहंकारी माणसाचा शिष्यच, त्या मुलाचा अंतिम फेरीतील प्रतिस्पर्धी होता !

प्रतिस्पर्धी त्या मुलाच्या मानाने खूपच बलवान होता. वयाने, शक्तीने, अनुभवाने सरस होता. या कोवळ्या वयाच्या पोराला तो सहज धूळ चारणार  हे स्पष्ट दिसत होते.

 पंचांनी एकत्र येऊन विचार केला.
"हा सामना घेणे आम्हास उचित वाटत नाही. कारण प्रतिस्पर्धी विजोड आहेत. एक बलवान आणि एक दिव्यांग आहे. हा सामना मानवतेच्या आणि समानतेच्या दृष्टिकोनातून आम्ही थांबवू इच्छितो.

 " प्रथम विजेतेपद विभागून देण्यात येईल !  अर्थात दोन्ही प्रतिस्पर्धी यास तयार असतील तरच."  मुख्य पंचाने आपला निर्णय जाहीर केला.

"मी या चिरगुट पोरापेक्षा श्रेष्ठ आहे यात दुमत असण्याचे कारण नाही.  हे सगळ्यांना स्पष्ट दिसतच आहे. तेव्हा मला विजेता आणि या पोराला उपविजेता म्हणून घोषित करावे!"  तो प्रतिस्पर्धी उग्रपणे म्हणाला.

"मी लहान असेन. तरी मला हे  लढाई न करता दिलेले  जेतेपद नको आहे !  माझ्या गुरूंनी प्रामाणिकपणे लढण्याचे शिक्षण दिलेले आहे.  मी ठरलेला सामना खेळून जे माझ्या हक्काचे जेतेपद आहे ते स्वीकारीन !"
त्या लढवय्या मुलाचे उत्तर ऐकून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

जाणकारांच्या कपाळावर मात्र आठ्या पडल्या. कारण हे ओढवून घेतलेले संकट होते. थोडे कमी जास्त झाले तर?  आधी एक हात नाही, अजून एखादा अवयव गमावला जायचा !  मूर्ख मुलगा !
सामना सुरु झाला.

--- आणि सगळी मंडळी आश्चर्याने स्तिमित झाली. त्या एका अनमोल क्षणी त्या अपंग मुलाची जीवघेणी थ्रो केलेली किक, त्या बलवान प्रतिस्पर्ध्याला चुकवता आली नाही. तो रिंगणाबाहेर फेकला गेला.

परफेक्ट थ्रो, परफेक्ट टाईमिंग, नेमका लावलेला फोर्स! अप्रतिम! केवळ अप्रतिम!

 ०००० ०००० ०००० ०००० ०००० ०००० ००००
                                                                                                                                               
गुरुगृही पोहचल्यावर, त्या मुलाने आपल्या उजव्या हातातली विजयाची ट्रॉफी गुरुजींच्या पायाशी ठेवली. त्यांच्या पायावर डोके ठेवून  गुरुजींबद्दल  आपली परमपूज्य भावना व्यक्त केली.

"सर, एक शंका आहे. विचारू?"
"विचार."
"मला फक्त एकच डाव / मूव्ह येते. तरीही मी कसा जिंकलो ?"

"तू दोन गोष्टी मुळे जिंकलास!"
"कोणत्या  सर?"
"एक तू घोटून, न कंटाळता केलेला सराव ! त्यामुळे तुझा तो डाव 'सिद्ध' झाला आहे, आत्मसात झाला आहे ! त्यात चूक होणे अशक्य होते !"

"आणि दुसरे कारण ?"

"दुसरे कारण हे,  त्याहून महत्वाचे आहे.

प्रत्येक डावाला एक प्रतिडाव असतो ! तसाच या डावाचाही एक उतारा डाव आहे !"

"मग तो, माझ्या अनुभवी प्रतिस्पर्ध्यास  माहीत नव्हता का ?"

"तो त्याला माहित होता ! पण तो हतबल झाला.

 कारण -----कारण या प्रतिडावात, हल्ला करणाऱ्या प्रतिस्पर्ध्याचा डावा हात धरावा लागतो !"

आता तुम्हांला समजले असेल की, एक सामान्य, डावा हात नसलेला मुलगा कसा जिंकला ?

oooo  oooo  oooo  oooo oooo

ज्या गोष्टीला आपण आपली कमजोरी समजतो, तिलाच जो आपली शक्ती बनवून जगायला शिकवतो, विजयी व्हायला शिकवतो, तोच खरा गुरु !

आतून आपण कोठे ना कोठे 'दिव्यांग' असतो,  कमजोर असतो.

त्यावर मात करून जगण्याची कला शिकवणारा 'गुरु' हवा आहे.

आहे का तुमच्या पहाण्यात असा कोणी ?

सतीश जाधव

Wednesday, July 8, 2020

उपनिषद

उपनिषद
(ज्ञानसाधना पुस्तकालय आणि संतोष कारखानीस यांच्या ब्लॉग मधून संकलित)


 वेदांची मांडणी तीन भागात करता येते.

कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड. 

वेदांच्या ज्ञानकांडाचे नाव 'उपनिषद' आहे.

एकूण एकशेबारा उपनिषदे प्रसिद्ध आहेत. 

उपनिषदांत अत्यंत थोड्या शब्दात जीवनाचे सार सांगितले आहे.

ईश्वराचे स्वरूप आनंदमय आहे. हा जीव मुळात ईश्वर असल्याने त्याची सर्व धडपड आनंद मिळविण्यासाठीच असते. 

 हा आनंद अंतर्यामी शोधता येतो. माणसाला  आनंदमय स्वरूपाचा शोध आणि बोध उपनिषदांमुळे होतो.


****************************************************************************


उपनिषद् हे मानसशास्त्राची भाषा बोलतात !

उपनिषद् हे आजच्या काळात सुखी जीवनाचा मूलमंत्र देतात ! 
चिंता मुक्त जीवनासाठी सहाय्यक ठरतात !

समुपदेशक आहेत आपली उपनिषदे ! 

आपण उपनिषदांत सांगितलेली खालील प्रार्थना नेहमी करतो.

ॐ असतो मा सद्गमय ||.

तमसो मा ज्योतिर्गमय ||.

मृत्योर्मा अमृतं गमय ||.

ॐशांति: शांति: शांति: ||.

अर्थात:

 हे ईश्वरा आम्हास;
असत्याकडून सत्याकडे, 

अंधारकडून प्रकाशाकडे, 

मृत्यूकडून अमरत्वाकडे घेऊन जा...

ही प्रार्थना केवळ अध्यात्मिक नसून 

psychological   principal आहेत.

मनाला नकाराकडून होकाराकडे, 

निराशेतून आशेकडे, 

दुःखातून सुखाकडे घेऊन जाण्याची एक
मानसोपचार पद्धती आहे.


******************************

छांदोग्य उपनिषदातील एका श्लोकात 

मोठ्या मनाचा व्हावे...

तापणाऱ्या सूर्याची निंदा करु नये...

बरसणाऱ्या मेघाची निंदा करू नये...

ऋतूची निंदा करू नये...

पशूची निंदा करू नये...

लोकांची निंदा करू नये...

मीच सर्व आहे अशी उपासना करावी...
असे सांगितले आहे.  याचाच अर्थ  सारखी तक्रार करण्यापेक्षा सकारात्मक विचार करावेत, हा आहे.


***********************************************************************


*आपल्याला प्रसन्न व्यक्तिमत्वाची माणसं आवडतात.*

 आपण रडक्या लोकांना, सारखी तक्रार करणाऱ्यांना  टाळू लागतो कारण त्यांचा परिणाम आपल्यावर ही होत असतो.

*प्रसन्न व्यक्तिमत्वाचे धनी असलेले मित्र हवेहवेसे वाटतात ....*

मानवी मनावर एक अस्पष्ट रुपात चिंता, भिती आणि निराशेचे सावट पसरले आहे, हे आपण सर्वत्र पाहतो.

मनाला प्रफुल्लित करण्यासाठी उपनिषदात सांगितलेल्या गोष्टी आणि प्रार्थना अतिशय प्रभावी आहेत, याची जाणीव होते.
  
 मानसिक थकवा घालव्यासाठी उपनिषद् हे अध्यात्मिक आणि वैज्ञानिक साधन आहे.
  
बोटभर दिसणाऱ्या रुईची/मंदार  झाडाची शेंग उघडते,  त्यामधून दुरडीभर म्हाताऱ्या उडत जातात. दिसायला अतिशय लहान दिसणाऱ्या या शेंगेत जसा मोठा साठा असतो तसेच उपनिषदात कमी शब्दामध्ये जीवनाचे संगीत आणि तत्वज्ञान ठासून भरलेले आहे. जसजसे उकलत जावे तसतसे त्याचा आकार वाढत जातो.

अत्तराच्या बाटलीचे तोंड उघडे करताच परिसर दरवळून निघतो तसा या उपनिषदांचा प्रभाव होतो. थेंबभर अत्तर वातावरण सुगंधी करते.  

तसेच आहे हे उपनिषद् ! 

अतिशय कमी शब्दांमध्ये जीवनाचे रहस्य व्यक्त करतात.

उपनिषद ही भारतीय तत्त्वज्ञानाचा व संस्कृतीचा मुळ स्त्रोत आहेत. 

श्रीमद्भगवद्गीता हा महान ग्रंथ या उपनिषदांचा सार आहे !


*************************************************

उपनिषदांमध्ये "दिव्य बालक नचिकेत" याची एक गोष्ट आहे.

पिता प्रसिद्धीसाठी महायज्ञ करतो पण दान स्वरूपात मरतुकड्या आणि भाकड गायींचे दान करतो. 

पुत्र नचिकेत यावर लोभी पित्याला प्रश्न करतो...

 चांगल्या दानाची, श्रेष्ठ दानाची अपेक्षा धरतो.

लोभी  चिडलेला पिता म्हणतो, "तूच त्या योग्य आहेस. जा मी तुझेच यमदेवाला दान केले आहे." 

 हा नचिकेत सदेह यमाकडे पोहोचतो. वेळेच्या आधी आणि सदेह स्वतः होऊन आलेल्या नचिकेतला पाहून यमदेव आश्चर्यचकित होतात. त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला वरदान मागण्यासाठी आग्रह धरतात. नचिकेत मात्र केवळ आत्मज्ञान मागतो !
स्वतःहून सदेह यमाकडे गेलेला बाल नचिकेत ! 

यम हे नाव घेताच माणूस थरारुन जातो, घाबरून जातो. 

नचिकेत जगातील सारे ऐश्वर्य, सुख-समृद्धी, राज्य, वैभव न मागता केवळ आत्मज्ञान मागतो !  

जे आत्मज्ञान माणसाला परमसुख मिळून देणारे आहे ! 

ते आत्मज्ञान यमदेव  त्याला सहज देत नाहीत !

त्याच्यासाठी त्याच्या परीक्षा घेतल्या जातात. 
त्याला प्रलोभने दिली जातात.

पण हा बाल नचिकेत मात्र केवळ आत्मज्ञानासाठी अडून बसतो ! 

मरणाला जिंकणाऱ्या नचिकेताची गोष्ट  कठोपनिषदामध्ये सांगितली आहे.


********************************************************

ॐ सहनाववतु ।

सहनौभुनक्तु ।

सहवीर्यं करवावहै ।

तेजस्विना वधीतमस्तु मां विद्विषावहै ।

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥

ही प्रार्थना आपण नेहमी म्हणतो. हा शांतीपाठ उपनिषदामधील आहे... जो आपणा सर्वांना परिचित आहे.

अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती आहेत, पण त्यांचा प्रत्यक्ष उगम किंवा मूळ स्रोत  माहीत नसतो.
सध्याच्या काळात वाढलेल्या चिंता आणि धावपळ पाहता मनःशांतीची सर्वांना आवश्यकता आहे. 

*त्यामुळे ही उपनिषदे मनन करावीत, अशी माझी विनंती आहे.*

|| शुभम भवतू || 

 ||  ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥


सतीश जाधव

कलावती आईंच्या ग्रंथातील उतारा.