Saturday, July 11, 2020

भयसापळा आणि मोहसापळा

 भयसापळा आणि मोहसापळा
(संतोष कारखानीस यांच्या ब्लॉग वरून संकलित)

         आपण नको त्या गोष्टीत का अडकून पडतो, याचा उत्कृष्ट उलगडा करणारा एक दृष्टांत संत ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेला आहे.


    पोपट पकडण्याची एक खास पद्धत आहे. एका आडव्या टांगलेल्या दोरीत बऱ्याच नळ्या ओवलेल्या असतात. या प्रत्येक नळीला पोपट आकर्षित होईल असे काहीतरी खाद्य चिकटवलेले असते. 
    
जेव्हा पोपट नळीवर बसतो, तेव्हा त्याच्या वजनाने नळी गोल फिरते व पोपट उलटा लटकतो. उलटे लटकताच पोपट स्वाभाविकपणे पायात नळी गच्च पकडतो. ही अवस्था पोपटाने कधीच अनुभवलेली नसते. नळी सोडली की आपण पडू, असेच त्याला वाटत राहते.

 खरे तर नळी सोडल्यानंतर पडू लागताच पंखांचा वापर करून एक गिरकी घेऊन तो सहज उडू शकणार असतो.  पण हे "ज्ञान‘ त्याला होत नाही व तो नळी अधिकच गच्च पकडून लटकलेल्या अवस्थेत  राहतो व पकडणाऱ्याच्या हाती सापडतो.  याला  भयसापळा  असे म्हणता येईल.
 "जेव्हा आपला पोपट झाला आहे असे वाटते"  व तरीही आपण त्या परिस्थितीतून सुटूच शकत नाही, तेव्हा आपण कशाला भीत आहोत ते नेमके पाहावे.
 "हा आधार गेला तर," अशी भीती असते तेव्हा जर काही काळ निराधार व्हायची तयारी दाखवली, तर आपणही उडून जाऊ शकत असतो. 
पडायची शक्‍यता ज्याला जराही नको वाटते, तो उडू शकत नाही!

----------------------------------------------------------------------------------------

           माकडे पकडायची देखील एक खास पद्धत आहे.

 एक मडके मातीत पुरून ठेवतात. मडक्‍यात एक फळ असते.  माकड ते फळ काढण्यासाठी मडक्‍यात हात घालते. मडक्‍याचे तोंड हे अगदी नेमक्‍या आकाराचे बनविलेले असते;  असे की फळ सोडून दिले तर माकडाचा हात बाहेर निघू शकेल. पण फळासकट हात बाहेर काढायला जावे, तर हाताचा आकार वाढल्याने हात अडकतो.

  माकडाच्याने फळ सोडवतही नाही आणि त्यामुळे हातही मडक्याबाहेर काढता येत नाही.  निर्णय न घेता येण्याच्या या  अवस्थेत माकड मनाने अडकते व   शरीराने मडक्‍यापाशी.
  
 या सापळ्याला  मोहसापळा असे म्हणता येईल.
 आपले ज्या परिस्थितीत "माकड‘ झाले असेल, त्यात असे काय आहे की ज्याचा मोह आपल्याच्याने सोडवत नाहीये.

 हे जर बघता आले तर कदाचित ती गमावणूक वाटते तेवढी मोलाची नसेलसुद्धा !

थोडेसे सोडून देऊन संपूर्ण सुटता आले तर वाईट काय? 

निदान या मर्यादित अर्थाने "फलत्याग" नक्कीच मुक्तिदायक नाही काय?

----------------------------------------------------------------------------------------

एक जण कमरेइतक्या पाण्याच्या हौदात  उतरून बराच थयथयाट करतोय.  हातांनी पाणी खळबळवतोय. या हौदानं माझी काहीतरी मूल्यवान वस्तू गिळलीय म्हणून मी संतापलोय.

 "अरे तू शांत हो म्हणजे पाणी स्थिर होईल आणि मग तुला तळ दिसेल व वस्तूही सापडेल !" कोणीतरी समजावत आहे. पण तो  ऐकूनच घ्यायला तयार नाही.

"हौदाचा तळ रिकामाच आहे आणि मी केलेला थयथयाट व्यर्थ होता,  हे स्वतःला कळू न देण्यासाठी तर तो पाणी फेसाळलेलं ठेवत नसेल?"

---------------------------------------------------------------------------------------

"दमलास?  चल परत जाऊ.

 आज इतकं पुरे. पुन्हा कधीतरी जाता येईलच.

"नाही गुरुजी...  मी दमलोय;  पण आपण इतके वर आलोय, आज शिखरावर पोहोचायचंच !  कधी एकदा पोहोचतोय आणि मग तुम्ही ते सत्य सांगताय, असं झालंय मला.‘‘

"माझं वचन नीट आठव. ही मोहीम पुरी होईपर्यंत, जर माझी आज्ञा तू निरपवादपणे पाळलीस, तर ते सत्य सांगेन‘ असं म्हणालो होतो.‘‘

"होय गुरुजी. पण आता शिखर जवळ आलं असेल. इतकं वर आल्यावर सोडून द्यायचं म्हणजे...‘‘

"कितीही वर आलो असू !  तरी मी सांगतो म्हणून, हे सगळे कष्ट वाया जाऊ द्यायला तू तयार आहेस का नाही ?‘‘

"ठीक आहे गुरुजी. मी आजची सगळी धडपड वाया जाऊ द्यायला तयार आहे. म्हणत असाल तर परत जाऊ या.‘‘

""शाबास ! आता मी तुला ते सत्य सांगतो‘‘.

""पण शिखर न येताच ?‘‘

""तसं नव्हे. तू परतीला तयार झालास म्हणून !

 ते सत्य हे आहे...  की शिखर असं नाहीच. ही अंतहीन चढण आहे आणि ज्या तळापासून आपण निघालो ना, तेच खरं पोहोचण्याचं स्थान होतं !  
तू उत्तीर्ण झालास. चल आता तिथं जाऊ, जिथं आपण असतोच; फक्त "पोहोचलो" असं वाटत नसतं इतकंच !

----------------------------------------------------------------------------------------

पोपटानं एकदा तरी आधार सोडून पाहावा...

माकडानं एकदा तरी फळ सोडून पाहावं...

थयथयाट करणाऱ्यानं एकदा तरी खळबळ थांबवून तळ पाहावा...

चढणाऱ्यानं एकदा तरी शिखराचा हट्ट सोडून पाहावा...

 हे जमायला अवघड नसतं. पटायला अवघड असतं.

भयसापळा, मोहसापळा हे माणसाच्या मनातूनच तयार झालेले असतात. त्यामुळे त्यातून बाहेर पडणे अवघड नसते; पण सुटकेचा हा मार्ग सोपा असला तरी पटायला अवघड असतो.

----------------------------------------------------------------------------------------

माकडें मुठीं धरिलें फुटाणे । 

गुंतले ते नेणे हात तेथें ॥१॥

काय तो तयाचा लेखावा अन्याय ।

हित नेणे काय आपुलें तें   ॥ध्रु.॥ 


शुकें निळकेशीं गोवियेले पाय । 

विसरोनि जाय पक्ष दोन्ही ॥२॥


तुका म्हणे एक ऐसे पशुजीव ।

न चले उपाव कांही तेथें ॥३॥ 


वरील तुकोबांच्या गाथेतील अभंगात,  मानवी मनाचे अत्यंत मार्मिक विश्लेषण दिले आहे.

जय जय रामकृष्ण हरी

सतीश जाधव

15 comments:

  1. Daring,Will power, Patience, cool & use of potential mind leads to success

    ReplyDelete
  2. फारच छान विश्लेषण दाखले देऊन केले आहे.कोणत्याही मनुष्य (प्राण्याने) संकटसमयी शक्तीपेसखा युक्तीचा वापर करून स्वतःची सुटका करून घ्यावी, ह्यातच शहाणपण आहे व यशस्वी जीवनाचे रहस्य दडलेले आहे.धन्यवाद!!!

    ReplyDelete
  3. संगीत मैत्रीण लता हिचे अभिप्राय

    खरंच सर खूप छान सांगितलंत काही वेळा कळत असून ही वळत नाही त्यावेळी हे भयसापळा व मोहसापळा जे तुकारामांनी सांगितलेले आठवावे त्यामुळे जमेल ही आणि पटेल ही ,सकारात्मक पद्धतीने गोष्टींकडे पाहिले तर दोन्ही गोष्टी सहज होऊ ही शकतील👍👍👍👍👍👍👌👌👌👌💐💐💐धन्यवाद सतीश सर🙏🙏🙏🙏🙏

    ReplyDelete
  4. माझी गाण्याची सहकलाकार वर्षाचे अभिप्राय !!!

    जय जय रामकृष्ण हरी, अतिशय चपखल वर्णन आहे मानवी मनाचे, संसारी मोहसापळ्यात आपण सर्व अडकले आहोत

    ReplyDelete
  5. पंडित मॅडम यांचे अभिप्राय !!!

    खूप छान... खरच आहे... मानवी मनाचे सुंदर विश्लेषण... या मोह सापळ्यात माणूस शेवटपर्यंत अडकतो... आणि हाती काहीच गवसत नाही

    ReplyDelete
  6. Khare aahe mama moh aani bhiti yachya katrit aapan adakalo aahot vrtamanat lobh aahe and in future bhiti maze kase hoiel

    ReplyDelete
  7. मित्र, सखाराम कुडतरकर याचे अभिप्राय !!!

    मित्रा तू लिहिलेले आहेस ते अगदी वास्तवास धरुन आहे.इतकी उत्तम मांडणी केली आहेस, उदाहरणे सहज पटण्यासारखी आहेत पण आचरणात आणणे फार कठीण असते.खूपच छान ! 👌

    ReplyDelete
  8. सखाराम,👍

    या सापळ्यांची एक गम्मत आहे....

    हे आपल्या जीवनाची गती आणि मती कुंठित करतात....

    म्हणूनच संत वचनातून बोध घेऊन धाडस करायचे असते...

    हल्ली एक जाहिरात दाखविली जाते....

    "डर के आगे जीत है" ...

    म्हणूनच म्हटले आहे...

    *"किती जगला या पेक्षा कसा जगला"*

    हेच जास्त महत्वाचे आहे.

    😊🙏😊🙏😊

    ReplyDelete
  9. सोगो गायक वर्षा चे अभिप्राय!!!

    Sir, me bhay sapla ani moh sapla donhi sodaycha prayatna kartey ani tyatach tumcha lekh wachla. 👌👌👍👍🙏🙏. Tyamule strength milali.
    Daring Kele ahe. Baghu Kay hote pudhe. Thnks a lot..🙏😊

    ReplyDelete
    Replies
    1. अप्रतिम.....😊🙏

      वर्षां,

      खूप गोष्टी आपण विनाकारण धरून ठेवलेल्या असतात...

      तसेच विनाकारण कशाला तरी घाबरत असतो...

      संतांच्या अशा रुपकातून सापळ्यातून सुटण्यासाठी ऊर्जा मिळते....

      Keep It Up😊🙏

      Delete
  10. संगीत मैत्रीण नीताचे अभिप्राय !!!

    सतीश, मित्रा
    मोहसापळा आणि भयसापळा वाचलं....
    अजून काहीतरी मिळवण्याची आस,
    काहीतरी गमावण्याची भीती,
    कुठे आणि कधी थांबावं हें न कळण...

    आणि कळलं तरी मान्य करण्याची तयारी नसणं.....

    ही मानवी मनाची वृत्ती.......

    खूप सुंदर उदाहरणांनी मंडलयस.. अगदी सोप्या भाषेत... 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻🌹

    ReplyDelete