Showing posts with label मुंबई ते कन्याकुमारी सायकलिंग. Show all posts
Showing posts with label मुंबई ते कन्याकुमारी सायकलिंग. Show all posts

Saturday, July 4, 2020

कन्याकुमारी सायकलिंग... एक ध्येयपूर्ती

०६.११.२०१९

कन्याकुमारी सायकलिंग... एक ध्येयपूर्ती

मुंबई ते कन्याकुमारी सायकलवारी करायचा प्रस्ताव आला. परंतु दिवाळीच्या दिवसात सायकलिंगसाठी मुंबई बाहेर जायचे, याला मन तयार होईना. वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी एव्हढी मोठी सायकल सफर करावी का हा सुद्धा विचार आला. 

आतापर्यंतच्या आयुष्यात कुटुंबासमवेत दिवाळी साजरी केली होती. ह्या वर्षी निसर्गसोबत साजरी करायची. तसेच वय शरीराला असते, मनाला नाही. सारे काही शक्य आहे, हे मनाने ठरविले. कुटुंबाला सर्व विचार सांगून परवानगी मिळविली.

कन्याकुमारीचा सायकल कार्यक्रम हातात आला तेव्हा लक्षात आले, दररोज साधारण 150 किमी सायकलिंग करायचे होते. तसेच मध्ये खंडाळा, कात्रज आणि खंबाटकी घाट सुद्धा लागणार होते. पुढील रस्ता सुद्धा चढउताराचा आणि कठीण होता.

मनाची तयारी झाली होती, आता शारीरिक तयारीसाठी जोरदार सायकलिंग सराव सुरू केला. दोन वेळा खंडाळा घाट चढलो.  एका दिवसात शिर्डी आणि वज्रेश्वरीपर्यंत सायकलिंग केले. मुंबई ते अलिबाग राईड केली. परंतु या वेळी कन्याकुमारीला समानसह सायकलिंग करायचे होते, ते सुद्धा कोणतीही सपोर्ट व्हेईकल न घेता. ध्येय खडतर होते, त्या साठी कठोर परिश्रम करावे लागणार होते.

मुबंई ते पुणे सायकलिंग करताना, खंडाळा घाटात सायकलच्या मागील चाकाची एक तार तुटली. सायकल तशीच चालवत पुण्यापर्यंत आलो. तेथे सायकल दुरुस्त करून पुण्यापासून सायकलिंग करायला तयार झालो. सोबत असलेले समान खूपच जास्त आहे, याची कल्पना आल्यावर, काही समान पुण्यात काढून ठेवले. 


पुण्याहून निघताना, सकाळी दोनदा  सायकल पंचर झाली.  त्यामुळे सकाळी पाच ऐवजी, सायकल सफर सुरू करायला सहा वाजले. 

कात्रज आणि खंबाटकी घाट ओलांडताना सायकलिंगचा कस लागला होता.

पहिल्याच दिवशी १४६ किमी राईड झाली होती. दोन घाट ओलांडून एव्हढी राईड करणे फक्त दोस्तांच्या सहकार्यानेच शक्य झाले होते.

 त्यानंतर संकेश्वर, धारवाड, दावनगिरी, सिरा, बंगलोर ,सेलम, दिंडीगुल, कोवीलपट्टी आणि कन्याकुमारी असा एकूण १७६० किमी चा खडतर प्रवास ११ दिवसात सायकलने पूर्ण केला होता.
प्रवासात सायकल पंक्चर होणं, तार तुटणे,  कडक ऊन, विरुद्ध दिशेने वाहणारे जोरदार वारे, मधून मधून कोसळणारा धुवाधार पाऊस, हवामान खात्याने सूचित केलेले वादळ आणि हायवेला असलेली वाहनांची प्रचंड वर्दळ, रस्त्याची कामे, चढउताराच्या घाट्या यामुळे आम्हा सर्वांच्या ताकदीची कसोटी  लागली होती. या सफरीत शारीरिक ताकदीपेक्षा मानसिक कणखरपणा जास्त महत्वाचा ठरला.

 "प्रदूषणमुक्तीचा" संदेश घेऊन सायकलिंग करत कन्याकुमारीच्या स्वामी विवेकानंद स्मारकाला भेट देणे हे आमचे स्वप्न होते. ते  विक्रमी वेळेत पूर्ण केल्याचे यश स्वामी विवेकानंदाना अर्पण केले. इप्सित ध्येय साध्य झाल्याचा आनंद सर्वांच्या चेह-यावर ओसंडून वाहत होता. आप्तस्वकीय कुटुंब, मित्रमंडळी, हितचिंतक यांच्या सदिच्छे मुळेच हे यश मिळाले होते.

आता पुढील शंभर वयाच्या आयुष्यात सायकलने भारत भ्रमण,  नर्मदा परिक्रमा, युरोप सायकलिंग टूर, अंटार्टीक सफर, चद्दर ट्रेक, स्काय डायव्हिंग.... असं बरंच काही उराशी बाळगून आहे.... या साठी तुमचे आशीर्वाद आणि प्रेरणा सतत मिळणार आहे, याची खात्री आहे.

मुंबईच्या सकाळ वृत्तपत्राने सुद्धा आमच्या उपक्रमाची दखल घेतली.


आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार.


श्री सतीश विष्णू जाधव

Kanyakumari Cycling 05.11.2019 कन्याकुमारी दर्शन आणि प्रदूषणमुक्तीचा संदेश ०५.११.२०१९

०५.११.२०१९
कन्याकुमारी दर्शन आणि प्रदूषणमुक्तीचा संदेश


आज दि. ४ जुलै, स्वामी विवेकानंदांचा ११८ वा स्मृतीदिन आहे. या दिवशी "कन्याकुमारी दर्शन" हा लेख स्वामीजींच्या चरणकमलावर अर्पण करतोय.

 सकाळी लक्ष्मण आणि मी लवकर उठून सायकलसह कन्याकुमारीच्या त्रिवेणी संगमावर सूर्योदय दर्शन घेतले. 

सूर्याचा तांबूस गोळा स्वामी विवेकानंद स्मारकावर विलसत होता. कन्याकुमारी मंदिराच्या मागच्या बाजूला सूर्योदय दर्शनासाठी जनसागर लोटला होता. तेथून सकाळची सायकल रपेट मारावी म्हणून जवळच्या सनसेट पॉइंटवर सुद्धा गेलो. कन्याकुमारीची खासियत आहे  की सूर्योदय आणि सूर्यास्त पॉईंट जवळ जवळ आहेत.  
 कन्याकुमारी हे भारतातील एकमेव ठिकाण आहे, जिथे  एकाच ठिकाणी सूर्य उगवतो आणि तेथेच मावळतो. तसेच येथेच तीन समुद्रांचा त्रिवेणी संगम होतो. 

 सकाळचा सायकल सैर सपाटा करून हॉटेलवर आलो. बाकीची मंडळी तयारच होती. समोरच्याच कन्याकुमारी ट्राफिक पोलीस चौकीला भेट दिली. वरिष्ठ पोलीस अधिकारी श्री. पी. अंबरसु यांनी आमचे स्वागत केले.

 प्रदूषण मुक्तीचा संदेश घेऊन आम्ही मुंबई पुण्याहून कन्याकुमारीला आलोय, हे सांगितल्यावर त्यांना आनंद झाला. "प्रदूषण मुक्त भारत" या बॅनरसह पोलीस अधिकाऱ्यांबरोबर फोटो काढले. त्यांच्या कडून कन्याकुमारीतील शाळा कॉलेजची माहिती घेतली. 
तेथून सेंट थॉमस एच. आर. सी. शाळेला भेट दिली. शाळेतील वरिष्ठ अध्यापक श्री सुघीलन यांची भेट घेतली. आमचा प्रदूषण मुक्तीचा उद्देश सांगितला. तसेच १० वी,१२ वी च्या वर्गामध्ये मुलांपर्यंत हा संदेश द्यायचा आहे,  हे सांगितल्यावर श्री सुघीलन आम्हाला १२ वीच्या वर्गावर घेऊन गेले. तेथे दिपकने सर्व मुलांशी सुसंवाद साधला. 

तसेच प्रदूषणाची माहिती आणि सायकलिंग करून पर्यावरण कसे प्रदूषण मुक्त करू शकतो, हे अतिशय खुमासदार पद्धतीने मुलांना सांगितले. वर्गातील एक विद्यार्थिनीने हेच भाषण सर्व मुलांना तामिळमध्ये सांगितले. सुघिलन यांनी सर्व संभाषणाचे व्हिडीओ शुटिंग सुद्धा केले.

श्री सुघीलन आणि इतर शिक्षकांसह गेट जवळ फोटो काढले.

 सुघीलन यांनी त्याच्या इयर बुक मध्ये आमच्या उपक्रमाची नोंद घेतली. 

येथून कन्याकुमारी स्टेशनला भेट दिली. भारताच्या दक्षिण टोकाचे शेवटचे स्टेशन "कन्याकुमारी", येथे आमच्या सर्व ग्रुपचा सायकलिंसह फोटो काढला.

आता नागरकोईलकडे प्रस्थान केले. कन्याकुमारीचे जिल्हाधिकारी श्री. प्रशांत वडनेरे यांनी आमच्या उपक्रमाची दखल घेऊन आम्हाला चहापानासाठी आमंत्रित केले होते.

कन्याकुमारीपासून नागरकोईल २० किमी आहे. आता बॅक वॉटरच्या किनाऱ्याने सायकल सफर सुरू झाली. नारळ आणि केळींनी हा प्रदेश बहरला होता. दुपारचे ऊन सुद्धा या हिरवळीने सुसह्य वाटत होते. 

दुपारी अडीचच्या दरम्यात IAS वडनेरे साहेबांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचलो. भेटायला खूप मंडळी रांगेत असल्यामुळे आम्हाला अभ्यागत कक्षात थांबावे लागले. या दरम्यात नागरकोईल आणि कन्याकुमारी मधील काही पुढारी आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांच्या भेटी झाल्या. त्यांनी आमचा संकल्प समजल्यावर आमचे कौतुक केले.

वडनेरे साहेबांना भेटल्यावर  त्यांच्याशी मराठीत बोलणे सुरू झाले. १५ वर्षांपासून तामिळनाडूमध्ये स्थायिक झालेले वडनेरे साहेब अजूनही मराठीपण जपून आहेत. त्यांनी पुष्पगुच्छ देऊन आमचा सन्मान केला आणि प्रदूषणमुक्त भारत ही संकल्पना घेऊन कन्याकुमारीला भेट दिल्याबद्दल आमचे कौतुक केले. 

तसेच सायकलवारीसह पर्यावरणाच्या या अतिशय चांगल्या उपक्रमाबद्दल आम्हाला प्रशस्ती पत्रक दिले.

"भारताच्या प्रदूषणमुक्तीसाठी केलेल्या परिश्रमाचे चीज झाले." ही भावना सर्वांच्या मनात निर्माण झाली. हीच संकल्पना घेऊन भारत भ्रमंतीचा विचार सुद्धा मनात आला.

 "प्रदूषण मुक्त भारत" ही संकल्पना, सायकल चालविल्यामुळे खऱ्या अर्थाने कार्यान्वित करता येईल आणि पाश्चिमात्य देशांप्रमाणे प्रदूषण मुक्ती आणि सुदृढ शरीरयष्टी यासाठी सायकलींचे वारे देशात वाहू लागतील,  हा दुर्दम्य आशावाद बाळगून कन्याकुमारीकडे निघालो.

मुंबई ते कन्याकुमारी ही लेखमाला स्वामी विवेकानंदांच्या चरणकमलावर अर्पण करतोय.

सतीश विष्णू जाधव

Friday, July 3, 2020

Mumbai to Kanyakumari Cycling (Eleventh Day) 04.11.2019 मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस अकरावा) ०४.११.२०१९ कोविलपट्टी ते कन्याकुमारी सायकलिंग

मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस अकरावा)
०४.११.२०१९
*कोविलपट्टी ते कन्याकुमारी*

कोविलपट्टीच्या जयलक्ष्मी हॉटेल कडून सकाळी सहा वाजता राईड सुरू केली, येथून कन्याकुमारी फक्त १३० किमी होते. मुंबई कन्याकुमारी राईडचा आजचा शेवटचा दिवस होता. सर्वजण रिलॅक्स होते.  हॉटेलजवळ  सायकल बरोबर फोटो काढले. सायकलिंनी या सफरीत अतिशय प्रेमळ आणि अप्रतिम साथ दिली होती. आज सांगता सुद्धा झकास होणार होती.

"प्रदुषणमुक्त भारत" ही संकल्पना व उद्देश घेऊन निघालेली  मुंबई - पुणे - कन्याकुमारी" ही दिर्घ पल्ल्याची सायकलवारी आता अखेरच्या टप्प्यात आली होती. 

सूर्य दर्शन झाले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळ आणि झाडे डोलत होती. आजचे सूर्यदर्शन एक वेगळी ऊर्जा घेऊन आले होते. 

जीवनप्रवासात रेल्वेने, बसने, गाडीने पळती झाडे पहिली होती. आज पळणारी झाडे सायकल पाहणार होती.  शेतात दिसणारे दोन उंच पाम झाडे रग्बीच्या गोल पोष्ट सारखी भासली. त्यांच्या मधोमध दिसणारा सकाळचा सूर्य आम्हाला खेळायला बोलावत होता. 

पहिला टप्पा तिरुनेलवेली ४५ किमी वर होता. उजव्या बाजूला छोटे छोटे डोंगर दिसत होते. त्या माईल स्टोन जवळ सायकलने थोडा वेळ विश्रांती घेतली. 

आता सायकल, चाकाजवळ पसरलेल्या हिरवळीशी हितगुज करू लागली. "बघ, तुझ्या भेटीला मुंबईवरून आले. आता येतेस का,  स्वामी विवेकानंदांना भेटायला".  हिरवळ हसत म्हणाली, अग बाई, मी आहेच तुझ्या बरोबर कन्याकुमारी पर्यंत.  हिरवळीला हाताने हळूच कुरवाळत, हसतच सायकलवर स्वार झालो. खूप गम्मत वाटली दोघांच्या संभाषणाची....

नऊ वाजे पर्यंत ३५ किमी राईड झाली होती. वाटेतील थमिला रेस्टॉरंट मध्ये नाश्त्याला थांबलो. इडली, डोसा, मेंदूवडा, केळीच्या पानावर आला. सोबत चहा घेऊन पुढची राईड सुरू झाली. 

आज कोणाला घाई नव्हती. पण संध्याकाळच्या आत जर कन्याकुमारीला पोहोचलो तर सनसेट पॉईंट आणि कन्याकुमारी "झिरो किमी माइल स्टोन" वर फोटो काढता येतील, ही गोष्ट सोपनने सर्वांच्या कानावर घातली.

वाटेत स्पॉटेड डिअर सॅनच्युअरी लागली. आता कन्याकुमारी गाठायचे वेध लागले होते. त्यामुळे फक्त सॅनच्युअरीबाहेर फोटो काढून निघण्याच्या तयारीत होतो. तेव्हढ्यात मोटारसायकल वरून चहा विकणारा तामिळी आमच्या जवळ आला. त्याच्याशी हावभावाने संवाद केला. "तुई मुई इंडिया" त्याला कळले. सन्मान म्हणून त्याने आम्हा सर्वांना प्रेमाने चहा पाजला. 

मनातील भाव आणि संकल्प समोरच्याला भावाले की माणसे खूप जवळ येतात आणि गोड आठवणी देऊन जातात.

सकाळी दहा वाजता, आमच्या पासून ९८ किमी वर कन्याकुमारी होते, तर तिरुनेलवेली १५ किमी होते.  येथे अभिजीतने माईल स्टोनवर चक्क झोपून फोटो काढला.

उन्हे चढण्याअगोदर जास्तीत जास्त अंतर कापायचे होते. आता जंगलातील, छोट्या छोट्या घाटींचा रस्ता सुरू झाला. वाहनांची वर्दळ तुरळक होती. मी आणि लक्ष्मण पुढे होतो. काही ठिकाणी डोंगर पोखरून सपाट रस्ते बनविले होते.

 लांबवर मदुराई वरून कन्याकुमारीला जाणारी रेलगाडी दिसत होती, त्यात तिची कु...क, कु...क शिट्टी ऐकू येत होती.

जसे काही आम्हाला खुणावत होती. "या, लवकर या, स्वामी विवेकानंदांच्या भेटीला कन्याकुमारीला" एखाद्या चित्रपटातील दृश्य वाटावे, असे चित्र होते. 
 
स्वामीजींच्या "विश्व बंधुत्व" या संकल्पनेला आमची "प्रदूषण मुक्त भारत" ही संकल्पना भेटायला निघाली होती.

आज सर्वजण वेगळ्याच मूड मध्ये होते. लक्ष्मणच्या तुटलेल्या तिरंग्याचीची काठी नामदेव जोडून देत होता.

 दिपकचे नवीन बूट माईल स्टोनच्या पांढऱ्या रंगापेक्षा चमकत होते, तर विकासाच्या एका पायाची निकॅप गायब होती. सतत राईड करून त्याचा उजवा पाय बरा झाला होता. 

नामदेव आणि विकास या दोघांच्या खांद्यावर, त्यांचे गुरू सोपान यांनी  हात ठेऊन माईल स्टोनवर फोटो काढला.

 पण  सोपानरावांनी आपले हात दोघांच्या डोक्यावर ठेवल्याचा भास मला झाला.  

सोपानरावांसोबतच विकास आणि नामदेव यांनी  सायकलिंग केले होते. सोपानरावांचा सायकलिंगचा वसा दोघांनी मनापासून पाळला होता.  मॅरेथॉन आणि सायकलिंग मुळे सोपानरावनी एका वर्षात १६ किलो वजन कमी केले होते. आता आणखी ते, काही चांगले संकल्प करणार आहेत आणि  विकासच्या गळीसुद्धा उतरवणार आहेत.

अडीच वाजता पोदिगय हॉटेल आले. हॉटेलमध्ये स्वच्छता आणि नीटनेटकेपणा जपला होता. हॉटेल मध्ये सर्व महिला काम करत होत्या.

 पानावर शाकाहारी जेवण आले. दोन भाज्या, रस्सम भात, पापड आणि ज्याला हवे त्यांना तळलेली मासळी आली.

 मालकाला बऱ्यापैकी हिंदी येत होते. वाढायला सुद्धा सर्व महिलाच होत्या. हॉटेलमध्ये महिलांची साथ असली की,  जेवणाला एक वेगळीच गोडी येते. त्यामुळे विकास मासे खाऊन दमत नव्हता. या हॉटेलचे छप्पर नारळाच्या झावळ्यांचे असल्यामुळे आता मस्त थंडावा होता. जेवणानंतर खोबरा चिक्की खायला मिळाली. 

येथून ५० किमी कन्याकुमारी होते. दिवसा उजेडी साडेपाचच्या आत कन्याकुमारीला पोहोचण्यासाठी आता जोर मारावा लागणार होता.

शेवटच्या दिवशी एक महत्वाची गोष्ट घडली.
तामिळनाडू शासनाच्या पर्यावरण मंत्रालय व वन मंत्रालया मार्फत 'लझाऊर' गावाच्या वनक्षेत्रांत वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरू होता.  आम्ही "प्रदूषण मुक्त भारत" हा संदेश घेऊन वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात आम्ही सामील झालो. 

आमच्या मुंबई-पुणे-कन्याकुमारी  सायकल वारीतून देण्यात येणा-या संदेशाची  या दोन्ही मंत्रालयांनी अतिशय सकारात्मक दखल घेतली.  तसेच महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाशीदेखील त्यांनी आमच्या उपक्रमाबाबत संपर्क साधलेला होता.

या दोन्ही मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आमच्या स्वागताला कन्याकुमारीला उपस्थित होते.

साडेचार पर्यंत कन्याकुमारी पासून १७ किमी अंतरावर होतो. तासाभरात हे अंतर कापणे शक्य होते, परंतु मधल्या गावांजवळच्या  छोट्या छोट्या चढाच्या पुलावरून जाण्याने दमछाक होत होती. पण आता आम्ही " मंझील के पास" आल्यामुळे पायात बळ संचारले होते. 

सूर्य अस्ताला जाण्याची तयारी करत होता. पण तो डुंबण्या अगोदर कन्याकुमारीला जायचे होते. सर्वजण जोशात दौडू लागले, बरोबर साडेपाचला कन्याकुमारीच्या शेवटच्या माईल स्टोन वर पोहोचलो आणि सर्वानी जल्लोष केला.  त्या माईल स्टोन जवळ भरपूर फोटोग्राफी केली. तेथून  अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंद महासागर समुद्रांच्या त्रिवेणी संगमावर आलो. 

 मावळत्या सूर्याला नमस्कार केला. भारताचा रस्ता तेथे संपला होता, आमचे ध्येय साध्य झाले होते. खडतर परिश्रमाला फळ मिळाले होते. आनंदाच्या भरात सर्वांनी सायकल हातात घेऊन फोटो काढले. 


मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफरीमध्ये लक्ष्मण सतत माझ्या बरोबरच होता. आज शेवटच्या दिवशी सुद्धा त्याने माझी साथ दिली होती. सर्वांच्या पुढे आम्ही दोघांनी कन्याकुमारी प्रथम गाठली होती. या पूर्णत्वाचा आनंद लक्ष्मणच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.

मी दोन्ही हात पसरवून सागरांच्या  त्रिवेणी संगमाला कवेत घेतले.  

डोळ्यात अश्रू तरळले, पण ते आनंदाचे, ध्येयपूर्तीचे आणि संकल्प सिद्धीचे होते. ११ दिवसात १७६० किमी सायकलिंग;  एक खडतर पण आनंददायी सफर पूर्णत्वास गेली होती.

सोपानराव नलावडे, विकास भोर, नामदेव नलावडे, दिपक निचित, अभिजित गुंजाळ आणि लक्ष्मण नवले याची साथ होती म्हणूनच सतत ऊर्जा मिळत होती. एकजुटीमुळेच संकल्प सिद्धीस गेला होता.  या घवघवीत यशामध्ये सर्वात मोठा वाटा मित्रांचा होता.


सतीश विष्णू जाधव

Saturday, June 27, 2020

Mumbai to Kanyakumari Cycling (Tenth Day) 03.11.2019. मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस दहावा) ०३.११.२०१९ दिंडीगल ते कोविलपट्टी सायकलिंग

मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस दहावा)  

 03.11.2019

दिंडीगल ते कोविलपट्टी सायकलिंग

सकाळी सहा वाजता स्ट्रेचिंग आणि प्रार्थना करून दिंडीगल वरून कोविलपट्टीकडे प्रस्थान केले. आज जवळपास दीडशे किमी स्ट्रेच होता.


सकाळीच सूर्य दर्शन झाले. प्रभात समयी "मित्राच्या" भेटीचा आनंद अपरिमित होता. नवा दिवस, नवीन ऊर्जा आणि ध्येयपूर्तीकडे प्रस्थान करण्याचे प्रशस्त कार्य या आदित्याच्या आगमनाने सहज सोपे झाले होते.

सात वाजता अन्नलक्ष्मी हॉटेलमध्ये नास्त्यासाठी थांबलो. आज खुप दिवसांनी पोंगलचा (तमिळ खिचडी) मस्त आस्वाद घेतला. हॉटेलमध्ये सर्व महिला काम करत होत्या.
आता मदुराई जवळ येऊ लागले. अभिजीतला मदुराईच्या मीनाक्षी मंदिराचे दर्शन घ्यायचे होते. हायवे पासून आत 27 किमी वर मीनाक्षी मंदिर होते परंतु कन्याकुमारीचा  पल्ला मोठा होता, त्यामुळे मदुराई शहरात जायचे टाळले. 

मी स्टेटस अपडेट करत होतो. सकाळीच पुण्याच्या मनोजचा फोन आला. 'कन्याकुमारीला रस्ता संपतो, तेथे डेड एन्डचा फोटो काढा'.

वाटेत सत्यमंगलम टायगर रिजर्व लागले. नऊच्या दरम्यात लक्ष्मणला झोप येऊ लागली. एक डेरेदार झाडाखाली पथारी मांडून लक्ष्मण झोपी गेला. मी सहलीचे निवांत लेखांकन करत बसलो होतो.

बाराच्या आसपास 78 किमी सायकलिंग झाले होते. वाटेत कामधेनू हॉटेल लागले.  गरमागरम  कांदा भाजी तळली जात होती. भोंडा, केळा भजी आणि गरम कांदाभजी आम्ही हादडली. इथे एक बर होतं, सांबर आणि चटणी हवी तेंव्हाढी घ्या, भरपेट खा.  पांढरी आणि लाल चटणी फर्मास होती. त्या नंतर घेतलेला चहा म्हणजे पर्वणी होती.
 येथील चहा बनवायची पद्धत एकदम निराळी. चहाची पावडर एका कापडी पोटलीत घालून उकळत्या पाण्यातील, छोट्या पाण्याच्या भांड्यात डुंबवून ठेवतात, त्यानंतर काचेच्या छोट्या ग्लासात साखर टाकून त्यावर ती चहाची पोटली धरून चहाचा अर्क ग्लासात  मिसळतात. त्यानंतर दुसऱ्या भांड्यातले गरम दूध त्या चहाच्या ग्लासात ओततात. मग एका ग्लासातून दुसऱ्या ग्लासात चहा, साखर, दुधाचे मिश्रण फेसाळत ओतले जाते.  वर टॉपिंगला आणखी चहाचा अर्क टाकून, तो ग्लास पाण्यात बुडवून प्यायला देतात. तमिळ चहा बनविण्याची पद्धत अतिशय झकास होती. शेवटी चहाच्या ग्लासाचे बुड पाण्यात बुडवितात कारण कपाच्या बुडाला लागलेला चहा तुमच्या अंगावर सांडू नये. मानले या पद्धतीला...
अजून 80 किमी राईड करायची होती. आम्ही जोर मारला आणि पुढे सर्वांना गाठले. तामिळनाडू मधील रस्ते अतिशय चांगले होते, त्यामुळे जोरदार राईड सहज होत होती. रस्त्याला रहदारी सुद्धा कमी होती.
दोनच्या सुमारास वाहीकोलम गावातील  घरगुती हॉटेल मध्ये गेलो. येथे सर्व महिला काम करत होत्या. मसालेदार तळलेले काणे मासे आणि रस्सम भात खाल्ला वर  चिक्की खाल्ली. 

दुपारी साडेतीन वाजता टिफिन हॉटेल लागले. चहा साठी थांबलो. येथे सर्व तमिळी... त्यांना दुसरी कोणतीही भाषा येत नाही, त्याच्याशी मुक्याच्या भाषेत हावभावने काय हवे ते सांगितले. माणसे हसतमुख होती. किती पैसे झाले, या साठी नोटा काढून दाखवल्या.

विरदूनगर गावात साडेचारला पोहोचलो. तेथे चहा पीत असलेल्या नागरिकांनी आमची आस्थेने चौकशी केली. पर्यावरणाचा संदेश सर्व भारतात पसरावा, हे सांगितल्यावर त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी चहा आणि गोड बनपाव खायला घातला. त्यांनी आपुलकीने केलेल्या चौकशी आणि स्वागतामुळे आमचा उद्देश साध्य होतोय याची निश्चिती झाली.

याच मंडळींनी तमिळ भाषेमध्ये "तूई मुई इंडिया" म्हणजे पोल्युशन फ्री इंडिया हे सांगितले. एक तमिळ वाक्य शिकलो होतो. मला वाटते... अशा प्रकारे भारत भ्रमण केले तर भारतातील विविध भाषा, संस्कृती आणि खानपान याचा आस्वाद नक्कीच घेता येईल.

 'तमिलची रेस्टॉरंट'  पर्यंत 115 किमी सायकलिंग झाले होते. संध्याकाळचे 6 वाजले होते. अजून 45 किमी जायचे होते. लक्ष्मणच्या डोक्यात आराम करायचे विचार होते, पण मी त्याला होकार देत नव्हतो. शेवटचे दोन दिवस संपूर्ण सायकलिंग लवकर लवकर करायचे असे मी ठरविले होते. हे लक्ष्मणच्या गळी उतरविण्यासाठी  'मौनं सर्वार्थ साधनं' हा मंत्र अवलंबला. 
नाऊडूपट्टी गावापर्यंत लक्ष्मणाला रेटले. 
शेवटी त्याला सांगितले,  'आता फक्त 13 किमी राहिले आहे सायकलिंग करूया' लक्ष्मण माझ्या मौनाचा अर्थ समजला होता, त्यामुळे तो हसत होता. राईड पूर्ण करायचे ठरले. रात्री साडेआठ वाजता कोविलपट्टीच्या जयलक्ष्मी हॉटेलमध्ये पोहोचलो. 163 किमी राईड झाली होती.

आजची सायकल सफर लांब पल्ल्याची होती, परंतु जनमाणसांच्या भेटीगाठी, त्यांचे आदरतिथ्य आणि नितांत सुंदर परिसर, हवा हवासा वाटणारा निसर्ग यामुळे सहज सोपी वाटली.

 या कोविलपट्टीवरून कन्याकुमारी फक्त 140 किमी आहे.  "याच साठी केला होता अट्टहास, शेवटचा दिन गोड व्हावा" तुकोबांच्या या अभंगाचा प्रत्यय उद्या येणार होता.
सतीश विष्णू जाधव

Monday, June 8, 2020

Mumbai to Kanyakumari Cycling (Day Nine) 02.11.2019 Selam to Dindigal मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस नववा) सेलम ते दिंडीगल

 02.11.2019

मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस नववा)  

सेलम ते दिंडीगल सायकल राईड

सकाळी साडेसहा वाजता सेलम जवळच्या 'अन्नामार हॉटेल' कडून राईड सुरू झाली. आज राईड सुरू करतानाच सुर्योदयाचे दर्शन झाले होते. 
सोपान, नामदेव आणि विकासने पंढरपूर सायकल वारीचे भगवे टीशर्ट घातले होते. विकासचा पाय दुखत होता. पण जिद्द कायम होती. दोन्ही पायाला नी-कॅप लावून आज सायकलिंग करत होता.
 दिंडीगल येथे आजचा मुक्काम होता.  सर्वजण एकत्र राईड करत होते. आज मी आणि लक्ष्मण लीड करत होतो. 
 
साडेसात वाजता सेलमच्या मुख्य चौकात पोहोचलो.  16 किमी राईड राईड झाली होती.

पुढच्या तासाभरात एकूण 30 किमी राईड झाली आणि नामक्कल गावात पोहोचलो. तेथील   टपरीवजा उडुपी हॉटेल मध्ये डोसा ऑर्डर केला. त्याच डोसा तव्यावर आम्लेट सुद्धा बनवले जात होते. शाकाहारी लक्ष्मणची गोची झाली, त्याने इडली ऑर्डर केली. मी डोसा आणि डबल आम्लेट ऑर्डर केले. इथली कॉफी मस्त होती. 

पुढे कन्याकुमारीच्या एका माईल स्टोन जवळ पंढरपूर वारकरी सोपान, नामदेव आणि विकासचे विठोबा स्टाईल फोटो काढले.
 नामदेवराव तर पुंडलिकाच्या आवेशात विठोबाला द्यायची वीट हातात असल्यासारखे, त्या माईल स्टोनवर एक हात वर करून उभे होते. तर दिपकचा त्या माईल स्टोनवर 'लाफिंग बाबा' आवेशात फोटो काढला. आज खऱ्या अर्थाने पळत सुटणारे सायकल स्वार निसर्गाचा, फोटोग्राफीचा आनंद घेत होते.

साडेअकराच्या  सुमारास नामक्कल टोल प्लाझाला पोहोचलो.  75 किमी राईड झाली होती. आज सुद्धा जेवणा ऐवजी इडली डोसा खात होतो.

ऊन चढले होते, दर अर्ध्या तासाने हायड्रेशन ब्रेक घ्यावा लागत होता. या हायवेवर धाबे तुरळक होते. एका हायड्रेशन ब्रेकमध्ये पोलीस अधिकाऱ्याने आम्हाला बलुशाही आणि चिवडा खायला दिला.
 मुंबई कन्याकुमारी  सायकल राईड करत  "प्रदूषण मुक्त भारत"  हा संदेश सर्वाना देत असल्याबद्दल त्या पोलीस अधिकाऱ्याने आमचे कौतुक केले. त्या पोलीस अधिकाऱ्यांचे नाव सुद्धा लक्ष्मण होते, हे विशेष.

पुढे गेलेल्या सोपान आणि कंपनीला आम्ही करूर शहराच्या अलीकडेच गाठले.
 आता भरगच्च नारळाच्या वाड्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला भरभरून लागत होत्या. या नारळांच्या झाडांखालची जमीन सुद्धा हिरवीगार दिसत होती. जणूकाही हिरवळीची दुलई अंथरली होती.

तीनच्या दरम्यान 120 किमी राईड झाली होती.  करूर शहर जवळ आले होते.  विकासच्या लक्षात आले, सोपनच्या सायकलचे मागचे चाक व्होबल करते आहे.    थांबून तपासताच समजले, चाकामधील एक तार तुटली आहे. कन्याकुमारी अजून 400 किमी होते, त्यामुळे सायकल दुरुस्त करण्यासाठी  लक्ष्मण, विकास, सोपान आणि मी करूर शहरात घुसलो.  दोन सायकलची दुकाने सापडली, पण नवीन तार सापडली नाही. सोपनने पुढे तशीच राईड करायचे ठरविले. 
 
या शहरातील "ताशी स्वीट बेकरी" मध्ये लक्ष्मण आणि मी मिठाईचा आस्वाद घेतला. विकास आणि सोपान पुढे गेले होते. 
तामिळनाडूचे  रस्ते एकदम मस्त होते. रस्त्यावर रहदारी कमी असल्यामुळे वायू प्रदूषण नव्हते.
उन्हाचा चटका जाणवत होता. मी आणि लक्ष्मण दमलो होतो. पुढे पाच किमी हायवेला आलो आणि जोरादार स्प्रिंट मारायला सुरुवात केली. रस्त्यात सर्वजण भेटले. आम्हाला पुढे जाऊन हॉटेल बुकिंगची कामगिरी मिळाली. दिंडीगलच्या भर चौकात "सुकन्या इन रेसिडन्सी"  हे छान पैकी हॉटेल मिळाले. रात्री आठ वाजता बाकीची मंडळी सायकलिंग करत हॉटेलवर पोहोचली. बेसमेंटमध्ये सायकल पार्किंगसाठी जागा होती.

170 किमी राईड उन्हामुळे खडतर झाली होती, परंतु कन्याकुमारी आता जवळ आल्यामुळे आम्हा सर्वांचा आत्मविश्वास बुलंद झाला होता.

सतीश विष्णू जाधव

Monday, May 25, 2020

Mumbai to Kanyakumari Cycling ( Day Eighth) 01.11.2019 Bangalore to Salem मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस आठवा) बंगलोर ते सेलम

मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस आठवा)  01.11.2019

बंगलोर ते सेलम

बंगलोरच्या सिंदूरी हॉटेल मधून सकाळी सहा वाजता सेलमसाठी सायकल राईड सुरू झाली. कनकपुरा विभागातून मधून बाहेर पडून नाईस हायवे जवळ यायला अर्धा तास लागला. 

आज सुद्धा नाईस टोल नाक्यावर आम्हाला अडवले. कालचा सीन पुन्हा रिपीट झाला. दिपकने फोनाफोनी सुरू केली आणि दहा मिनिटात रवी साहेबांनी पाठविलेली पोलीस व्हॅन आमच्या मदतीला हजर झाली. या पोलीस व्हॅनचे एस्कॉर्ट घेऊन आम्ही सर्वजण हायवे वरून रुबाबात निघालो.  बंगलोरमध्ये असलेल्या दिपकच्या ओळखीमुळेच बंगलोर शहरातून आम्ही सर्व सहजपणे बाहेर पडलो. ट्रॅफिकमुळे, जुन्या हायवे वरून राईड करत बंगलोर  बाहेर जायला आम्हाला तीन तास लागले असते ते नाईस रोड मुळे तासाभरात झाले.
 
नाईस रोडवरून 25 किमी राईड झाल्यावर बंगलोरच्या उपनगरातील ट्राफिक मध्ये आलो. या ठिकाणी सोपानराव, विकास, नामदेव, अभिजित आणि दीपक पुढे निघाले. मी आणि लक्ष्मण चहा साठी मागे थांबलो.

चहा घेऊन दहा मिनिटात आम्ही सायकलिंग सुरू केली.  बंगलोर शहराच्या बाहेर आलो आणि सायकलचा वेग वाढला. आज जवळपास दोनशे किमी रायडिंग होते. बराचसा रस्ता उताराचा  होता. तसेच आज वातावरण ढगाळ असल्यामुळे ऊन जाणवत नव्हते

बंगलोर मधून बाहेर पडल्यावर हायवे अतिशय सुस्थितीत होता. त्यामुळे सायकली 25 किमी वेगाने धावत होत्या.   अकरा वाजेपर्यंत आम्ही 80 किमी अंतर कापले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडांची रेलचेल होती. आज सुद्धा ढगांचे वेगवेगळे रंग पाहायला मिळाले. ढगांच्या मागे सूर्याच्या किरणांची होणारी बरसात मन मोहून टाकत होती.  निळ्याभोर नभात पांढऱ्या ढगांचे पुंजके फेर धरून नाचत होते.

रस्त्यात कन्याकुमारी 603 किमी हा माईल स्टोन लागला. कन्याकुमारी आता आवाक्यात आली आहे याची जाणीव झाली. मी आणि लक्ष्मणने आज आघाडी मारली होती. हिरव्यागार झुडपात दिपस्तंभासारखा दिसणाऱ्या माईल स्टोनला पाहून फोटो काढायचा मोह टाळता आला नाही. लक्ष्मणने तर दहा बारा फोटो काढले. मी  त्या माईल स्टोनवर स्वार झालो होतो. इच्छित ध्येय्याकडे मनाचा वारू वायुगतीने पोहोचला होता. 

हायवेच्यामध्ये  वेगवेगळ्या फुलांची हिरवीगार झाडे मस्त डेरेदार झाली होती. या ठिकाणी सुद्धा रस्त्यावर गतप्राण झालेली फुलपाखरे आणि चतुर दिसले. नभात ढगांची लठ्ठालठ्ठी चालू होती. ते वाऱ्याच्या साथीने लपंडाव खेळत होते. निळ्याभोर गगनाकडे पाहताना  "बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात..., भेट आपुली स्मरशी काय तू मनात..." हे भावगीत तरळले. 
आकाशाकडे झेपावणारे उंच उंच कल्पतरूंचे वृक्ष, नभाच्या निळ्या पांढऱ्या रंगात हिरवळ पेरत होते. रस्त्याचा राखाडी, झाडांचा हिरवा, ढगांचा पांढरा आणि नभाचा निळा रंग निसर्गाच्या नयनरम्य दर्शनाची रंगत वाढवत होते. भावविभोर करणारे, हे निसर्गाचे रूप पाहणे म्हणजे पर्वणीच होती. 
छोटीशी घाटी लागली, एका दमात घाटी चढलो आणि काय... त्या घाटाच्या माथ्यावर रसरशीत सीताफळ अवतरली. दोन मोठी सीताफळ फस्त करून नव्या दमान पुढची राईड सुरू झाली.
आता निसर्गाच्या रंगात पहाडी रंग सामील झाला. निसर्गाला कवेत घेऊन पुढची राईड सुरू केली.
 तामिळनाडूचे हत्ती जंगल लागले.  आता उतारावर भन्नाट वेगाने धावत होत्या सायकली. येथेच जपायचे असते. वेगावर नियंत्रण ठेऊन, बाजूने जाणाऱ्या गाड्यांवर लक्ष देऊन, एकाग्र चित्ताने सायकल पळवावी लागते. सोबत समान असल्यामुळे उतारावरच सायकल सांभाळायला कसब लागते.  उतारावर तातडीने ब्रेक लावणे अतिशय धोक्याचे असते.
 
 उतार संपला आणि आम्ही तामिळनाडू मध्ये शिरलो. अटकूरकी गावात नानखटाई आणि डोसा खाल्ला. सोबत  चहा घेतला. दुपारी दोन वाजता कृष्णगिरी टोल प्लाझा येथे पोहोचलो. सतत काहीतरी खात असल्यामुळे जेवणाची इच्छा नव्हती. तसेच आज मोठी राईड होती आणि जेवल्यावर सुस्ती येते. त्यामुळेच मी आणि लक्ष्मण ड्रायफ्रूट चिक्की इत्यादी एनर्जी पदार्थ खात होतो. 
 
 बाकीची मंडळी पुढेच होती.  उताराचा रस्ता संपून आता सरळ रस्ता होता. रहदारी थोडी कमी झाली होती.

दुपारी तीन वाजता कावेरीपट्टणम पर्यंत मी आणि लक्ष्मण आलो होतो. येथून सेलम 98 किमी आहे. लक्ष्मण चुळबुळ करत होता, थोडीशी पेंग आली होती त्याला. परंतु अंधार पडायच्या अगोदर सेलम गाठायचे होते. म्हणून थोडा वेळ थांबून, फ्रेश होऊन पुढील राईड सुरू केली. आता रस्ता सरळसोट होता आणि हेडविंड सुद्धा नव्हते, त्यामुळे वेगात सायकल धावत होत्या.

रस्त्यावरच्या उन्हामुळे मृगजळाचा भास होत होता. हायवेच्या दोन्ही बाजूला रानवाट फुलांचे ताटवे नेत्रसुख देत होते.  खळाळत वाहणारी नदी, छोटे छोटे तलाव, उंच उंच नारळाची झाडे, डेरेदार केळीच्या लागवडी, एका बाजूला दिसणारे हिरवटलेले डोंगर, हे पाहिल्यावर इथेच, या निसर्गात मुक्काम ठोकण्याची मनोमन इच्छा झाली. 
आजूबाजूला असणारी कौलारू घरे सुद्धा हिरव्यागर्द झाडांच्या वाड्यांमध्ये वसली होती. किती सुंदर जनजीवन आहे इथले. फुले, फळे, पक्षी, प्राणी यांच्या सहवासात जगणारी माणसे निरामय जीवन जगतात याची जाणीव झाली.
एक लक्षात आले, एक दिवसात खूप जास्त राईड, या सर्व आनंदापासून लांब ठेवते. फक्त एका ठिकाणाहुन दुसऱ्या ठिकाणी भोज्या करायला पळावे लागते. ज्यांच्याकडे वेळेची वानवा आहे त्यांनी हे करावे. पण निसर्गप्रेमी, अशा सायकलिंग पासून लांब राहील हे नक्की.

सायकलिंगचा उद्देश शरीर स्वास्थ्य तर आहेच पण त्याच बरोबर निसर्ग दर्शन, फोटोग्राफी, जनजीवनाची जवळून ओळख तसेच आपण घेतलेले प्रदूषण मुक्तीचे ध्येय सुसंवादावाटे जनमानसात पोहोचविणे, हा आहे.  नक्कीच, पुढील नियोजित सायकल सफारी याच उद्देशानेच होतील.

सायंकाळी साडेसहा वाजता सेलम पासून 20 किमी अंतरावर पोहोचलो. आता शेवटचा पॅच मारायचा होता. उरलेसुरले ड्रायफ्रूट खाल्ले. लक्ष्मणने अभिजीतला फोन केला. सर्व मंडळी सेलमच्या अलीकडे 15 किमी वर हॉटेल अन्नामार मध्ये उतरली होती. पेडलिंगला  सुरुवात केली आणि 15 मिनिटात अन्नामार हॉटेल गाठले. 

अभिजित प्लॅनिंग मास्टर आहे. गुगल वर सर्च करून राईड करता करता, स्वस्त आणि मस्त हॉटेल शोधून काढत होता. आम्ही अंघोळ करून फ्रेश होई पर्यंत हॉटेल खालच्या रेस्टॉरंट मध्ये जेवणाची व्यवस्था दिपकने केली होती. 

आज एकूण 203 किमी राईड झाली होती. माझ्या सायकलिंग करियर मधली सर्वात मोठी राईड होती आजची.

सतीश विष्णू जाधव