Saturday, July 4, 2020

Kanyakumari Cycling 05.11.2019 कन्याकुमारी दर्शन आणि प्रदूषणमुक्तीचा संदेश ०५.११.२०१९

०५.११.२०१९
कन्याकुमारी दर्शन आणि प्रदूषणमुक्तीचा संदेश


आज दि. ४ जुलै, स्वामी विवेकानंदांचा ११८ वा स्मृतीदिन आहे. या दिवशी "कन्याकुमारी दर्शन" हा लेख स्वामीजींच्या चरणकमलावर अर्पण करतोय.

 सकाळी लक्ष्मण आणि मी लवकर उठून सायकलसह कन्याकुमारीच्या त्रिवेणी संगमावर सूर्योदय दर्शन घेतले. 

सूर्याचा तांबूस गोळा स्वामी विवेकानंद स्मारकावर विलसत होता. कन्याकुमारी मंदिराच्या मागच्या बाजूला सूर्योदय दर्शनासाठी जनसागर लोटला होता. तेथून सकाळची सायकल रपेट मारावी म्हणून जवळच्या सनसेट पॉइंटवर सुद्धा गेलो. कन्याकुमारीची खासियत आहे  की सूर्योदय आणि सूर्यास्त पॉईंट जवळ जवळ आहेत.  
 कन्याकुमारी हे भारतातील एकमेव ठिकाण आहे, जिथे  एकाच ठिकाणी सूर्य उगवतो आणि तेथेच मावळतो. तसेच येथेच तीन समुद्रांचा त्रिवेणी संगम होतो. 

 सकाळचा सायकल सैर सपाटा करून हॉटेलवर आलो. बाकीची मंडळी तयारच होती. समोरच्याच कन्याकुमारी ट्राफिक पोलीस चौकीला भेट दिली. वरिष्ठ पोलीस अधिकारी श्री. पी. अंबरसु यांनी आमचे स्वागत केले.

 प्रदूषण मुक्तीचा संदेश घेऊन आम्ही मुंबई पुण्याहून कन्याकुमारीला आलोय, हे सांगितल्यावर त्यांना आनंद झाला. "प्रदूषण मुक्त भारत" या बॅनरसह पोलीस अधिकाऱ्यांबरोबर फोटो काढले. त्यांच्या कडून कन्याकुमारीतील शाळा कॉलेजची माहिती घेतली. 
तेथून सेंट थॉमस एच. आर. सी. शाळेला भेट दिली. शाळेतील वरिष्ठ अध्यापक श्री सुघीलन यांची भेट घेतली. आमचा प्रदूषण मुक्तीचा उद्देश सांगितला. तसेच १० वी,१२ वी च्या वर्गामध्ये मुलांपर्यंत हा संदेश द्यायचा आहे,  हे सांगितल्यावर श्री सुघीलन आम्हाला १२ वीच्या वर्गावर घेऊन गेले. तेथे दिपकने सर्व मुलांशी सुसंवाद साधला. 

तसेच प्रदूषणाची माहिती आणि सायकलिंग करून पर्यावरण कसे प्रदूषण मुक्त करू शकतो, हे अतिशय खुमासदार पद्धतीने मुलांना सांगितले. वर्गातील एक विद्यार्थिनीने हेच भाषण सर्व मुलांना तामिळमध्ये सांगितले. सुघिलन यांनी सर्व संभाषणाचे व्हिडीओ शुटिंग सुद्धा केले.

श्री सुघीलन आणि इतर शिक्षकांसह गेट जवळ फोटो काढले.

 सुघीलन यांनी त्याच्या इयर बुक मध्ये आमच्या उपक्रमाची नोंद घेतली. 

येथून कन्याकुमारी स्टेशनला भेट दिली. भारताच्या दक्षिण टोकाचे शेवटचे स्टेशन "कन्याकुमारी", येथे आमच्या सर्व ग्रुपचा सायकलिंसह फोटो काढला.

आता नागरकोईलकडे प्रस्थान केले. कन्याकुमारीचे जिल्हाधिकारी श्री. प्रशांत वडनेरे यांनी आमच्या उपक्रमाची दखल घेऊन आम्हाला चहापानासाठी आमंत्रित केले होते.

कन्याकुमारीपासून नागरकोईल २० किमी आहे. आता बॅक वॉटरच्या किनाऱ्याने सायकल सफर सुरू झाली. नारळ आणि केळींनी हा प्रदेश बहरला होता. दुपारचे ऊन सुद्धा या हिरवळीने सुसह्य वाटत होते. 

दुपारी अडीचच्या दरम्यात IAS वडनेरे साहेबांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचलो. भेटायला खूप मंडळी रांगेत असल्यामुळे आम्हाला अभ्यागत कक्षात थांबावे लागले. या दरम्यात नागरकोईल आणि कन्याकुमारी मधील काही पुढारी आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांच्या भेटी झाल्या. त्यांनी आमचा संकल्प समजल्यावर आमचे कौतुक केले.

वडनेरे साहेबांना भेटल्यावर  त्यांच्याशी मराठीत बोलणे सुरू झाले. १५ वर्षांपासून तामिळनाडूमध्ये स्थायिक झालेले वडनेरे साहेब अजूनही मराठीपण जपून आहेत. त्यांनी पुष्पगुच्छ देऊन आमचा सन्मान केला आणि प्रदूषणमुक्त भारत ही संकल्पना घेऊन कन्याकुमारीला भेट दिल्याबद्दल आमचे कौतुक केले. 

तसेच सायकलवारीसह पर्यावरणाच्या या अतिशय चांगल्या उपक्रमाबद्दल आम्हाला प्रशस्ती पत्रक दिले.

"भारताच्या प्रदूषणमुक्तीसाठी केलेल्या परिश्रमाचे चीज झाले." ही भावना सर्वांच्या मनात निर्माण झाली. हीच संकल्पना घेऊन भारत भ्रमंतीचा विचार सुद्धा मनात आला.

 "प्रदूषण मुक्त भारत" ही संकल्पना, सायकल चालविल्यामुळे खऱ्या अर्थाने कार्यान्वित करता येईल आणि पाश्चिमात्य देशांप्रमाणे प्रदूषण मुक्ती आणि सुदृढ शरीरयष्टी यासाठी सायकलींचे वारे देशात वाहू लागतील,  हा दुर्दम्य आशावाद बाळगून कन्याकुमारीकडे निघालो.

मुंबई ते कन्याकुमारी ही लेखमाला स्वामी विवेकानंदांच्या चरणकमलावर अर्पण करतोय.

सतीश विष्णू जाधव

3 comments:

  1. माझे मित्र डॉ हेमंत यांनी पाठविलेले अभिप्राय....

    कन्याकुमारीची स्पृहणीय सफर यशस्वी करणा-या संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन

    तुमच्या चिकाटीला, जिद्दीला सलाम

    तुमच्या अत्यंत जिगरबाज कर्तबगारीवर सुचलेल्या कांही पंक्ति पेश करतो

    अकरा दिवसात मुंबई ते कन्याकुमारी

    स्पृहणीय दमदार सायकल सवारी

    पर्यावरणस्नेहाची पताका खांद्यावरी

    निसर्ग संवर्धनाचा संदेश दिशा चारी

    पसरवे ही दख्खनची विजयवारी

    समर्पयामिया वाटे अभिमान भारी

    हृत्पुर्वक अभिनंदन वर्षती सारी

    उपक्रम अभिनव ऐसे घ्यावे वारंवारी

    आजीवन स्मरणीय हो कर्तबगारी

    क्षण क्षण होवू दे आता नवोन्मेषकारी

    🙏 🙏 🙏 🙏 🙏

    ReplyDelete
  2. मित्राचे अभिप्राय...

    अतिशय सुंदर लिखाण, सूर्योदय आणि सूर्यास्त एकाच ठिकाणी पाहणे एकदम नेत्रसुखद, तू ते स्वतः अनुभवलेस, खूप छान, वडणेरे साहेबांची भेट, कॉलेज च्या विद्यार्थ्यांशी सुसंवाद आणि प्रदूषणमुक्त भारत हा संदेश तुम्ही पोहोचवता, फार स्तुत्य काम करत आहात तुम्ही, सर्व फोटो झकास.

    ReplyDelete
  3. तुमची सगळी उत्तुंग स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप-खूप शुभेच्छा!

    ReplyDelete