Friday, July 3, 2020

Mumbai to Kanyakumari Cycling (Eleventh Day) 04.11.2019 मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस अकरावा) ०४.११.२०१९ कोविलपट्टी ते कन्याकुमारी सायकलिंग

मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस अकरावा)
०४.११.२०१९
*कोविलपट्टी ते कन्याकुमारी*

कोविलपट्टीच्या जयलक्ष्मी हॉटेल कडून सकाळी सहा वाजता राईड सुरू केली, येथून कन्याकुमारी फक्त १३० किमी होते. मुंबई कन्याकुमारी राईडचा आजचा शेवटचा दिवस होता. सर्वजण रिलॅक्स होते.  हॉटेलजवळ  सायकल बरोबर फोटो काढले. सायकलिंनी या सफरीत अतिशय प्रेमळ आणि अप्रतिम साथ दिली होती. आज सांगता सुद्धा झकास होणार होती.

"प्रदुषणमुक्त भारत" ही संकल्पना व उद्देश घेऊन निघालेली  मुंबई - पुणे - कन्याकुमारी" ही दिर्घ पल्ल्याची सायकलवारी आता अखेरच्या टप्प्यात आली होती. 

सूर्य दर्शन झाले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळ आणि झाडे डोलत होती. आजचे सूर्यदर्शन एक वेगळी ऊर्जा घेऊन आले होते. 

जीवनप्रवासात रेल्वेने, बसने, गाडीने पळती झाडे पहिली होती. आज पळणारी झाडे सायकल पाहणार होती.  शेतात दिसणारे दोन उंच पाम झाडे रग्बीच्या गोल पोष्ट सारखी भासली. त्यांच्या मधोमध दिसणारा सकाळचा सूर्य आम्हाला खेळायला बोलावत होता. 

पहिला टप्पा तिरुनेलवेली ४५ किमी वर होता. उजव्या बाजूला छोटे छोटे डोंगर दिसत होते. त्या माईल स्टोन जवळ सायकलने थोडा वेळ विश्रांती घेतली. 

आता सायकल, चाकाजवळ पसरलेल्या हिरवळीशी हितगुज करू लागली. "बघ, तुझ्या भेटीला मुंबईवरून आले. आता येतेस का,  स्वामी विवेकानंदांना भेटायला".  हिरवळ हसत म्हणाली, अग बाई, मी आहेच तुझ्या बरोबर कन्याकुमारी पर्यंत.  हिरवळीला हाताने हळूच कुरवाळत, हसतच सायकलवर स्वार झालो. खूप गम्मत वाटली दोघांच्या संभाषणाची....

नऊ वाजे पर्यंत ३५ किमी राईड झाली होती. वाटेतील थमिला रेस्टॉरंट मध्ये नाश्त्याला थांबलो. इडली, डोसा, मेंदूवडा, केळीच्या पानावर आला. सोबत चहा घेऊन पुढची राईड सुरू झाली. 

आज कोणाला घाई नव्हती. पण संध्याकाळच्या आत जर कन्याकुमारीला पोहोचलो तर सनसेट पॉईंट आणि कन्याकुमारी "झिरो किमी माइल स्टोन" वर फोटो काढता येतील, ही गोष्ट सोपनने सर्वांच्या कानावर घातली.

वाटेत स्पॉटेड डिअर सॅनच्युअरी लागली. आता कन्याकुमारी गाठायचे वेध लागले होते. त्यामुळे फक्त सॅनच्युअरीबाहेर फोटो काढून निघण्याच्या तयारीत होतो. तेव्हढ्यात मोटारसायकल वरून चहा विकणारा तामिळी आमच्या जवळ आला. त्याच्याशी हावभावाने संवाद केला. "तुई मुई इंडिया" त्याला कळले. सन्मान म्हणून त्याने आम्हा सर्वांना प्रेमाने चहा पाजला. 

मनातील भाव आणि संकल्प समोरच्याला भावाले की माणसे खूप जवळ येतात आणि गोड आठवणी देऊन जातात.

सकाळी दहा वाजता, आमच्या पासून ९८ किमी वर कन्याकुमारी होते, तर तिरुनेलवेली १५ किमी होते.  येथे अभिजीतने माईल स्टोनवर चक्क झोपून फोटो काढला.

उन्हे चढण्याअगोदर जास्तीत जास्त अंतर कापायचे होते. आता जंगलातील, छोट्या छोट्या घाटींचा रस्ता सुरू झाला. वाहनांची वर्दळ तुरळक होती. मी आणि लक्ष्मण पुढे होतो. काही ठिकाणी डोंगर पोखरून सपाट रस्ते बनविले होते.

 लांबवर मदुराई वरून कन्याकुमारीला जाणारी रेलगाडी दिसत होती, त्यात तिची कु...क, कु...क शिट्टी ऐकू येत होती.

जसे काही आम्हाला खुणावत होती. "या, लवकर या, स्वामी विवेकानंदांच्या भेटीला कन्याकुमारीला" एखाद्या चित्रपटातील दृश्य वाटावे, असे चित्र होते. 
 
स्वामीजींच्या "विश्व बंधुत्व" या संकल्पनेला आमची "प्रदूषण मुक्त भारत" ही संकल्पना भेटायला निघाली होती.

आज सर्वजण वेगळ्याच मूड मध्ये होते. लक्ष्मणच्या तुटलेल्या तिरंग्याचीची काठी नामदेव जोडून देत होता.

 दिपकचे नवीन बूट माईल स्टोनच्या पांढऱ्या रंगापेक्षा चमकत होते, तर विकासाच्या एका पायाची निकॅप गायब होती. सतत राईड करून त्याचा उजवा पाय बरा झाला होता. 

नामदेव आणि विकास या दोघांच्या खांद्यावर, त्यांचे गुरू सोपान यांनी  हात ठेऊन माईल स्टोनवर फोटो काढला.

 पण  सोपानरावांनी आपले हात दोघांच्या डोक्यावर ठेवल्याचा भास मला झाला.  

सोपानरावांसोबतच विकास आणि नामदेव यांनी  सायकलिंग केले होते. सोपानरावांचा सायकलिंगचा वसा दोघांनी मनापासून पाळला होता.  मॅरेथॉन आणि सायकलिंग मुळे सोपानरावनी एका वर्षात १६ किलो वजन कमी केले होते. आता आणखी ते, काही चांगले संकल्प करणार आहेत आणि  विकासच्या गळीसुद्धा उतरवणार आहेत.

अडीच वाजता पोदिगय हॉटेल आले. हॉटेलमध्ये स्वच्छता आणि नीटनेटकेपणा जपला होता. हॉटेल मध्ये सर्व महिला काम करत होत्या.

 पानावर शाकाहारी जेवण आले. दोन भाज्या, रस्सम भात, पापड आणि ज्याला हवे त्यांना तळलेली मासळी आली.

 मालकाला बऱ्यापैकी हिंदी येत होते. वाढायला सुद्धा सर्व महिलाच होत्या. हॉटेलमध्ये महिलांची साथ असली की,  जेवणाला एक वेगळीच गोडी येते. त्यामुळे विकास मासे खाऊन दमत नव्हता. या हॉटेलचे छप्पर नारळाच्या झावळ्यांचे असल्यामुळे आता मस्त थंडावा होता. जेवणानंतर खोबरा चिक्की खायला मिळाली. 

येथून ५० किमी कन्याकुमारी होते. दिवसा उजेडी साडेपाचच्या आत कन्याकुमारीला पोहोचण्यासाठी आता जोर मारावा लागणार होता.

शेवटच्या दिवशी एक महत्वाची गोष्ट घडली.
तामिळनाडू शासनाच्या पर्यावरण मंत्रालय व वन मंत्रालया मार्फत 'लझाऊर' गावाच्या वनक्षेत्रांत वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरू होता.  आम्ही "प्रदूषण मुक्त भारत" हा संदेश घेऊन वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात आम्ही सामील झालो. 

आमच्या मुंबई-पुणे-कन्याकुमारी  सायकल वारीतून देण्यात येणा-या संदेशाची  या दोन्ही मंत्रालयांनी अतिशय सकारात्मक दखल घेतली.  तसेच महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाशीदेखील त्यांनी आमच्या उपक्रमाबाबत संपर्क साधलेला होता.

या दोन्ही मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आमच्या स्वागताला कन्याकुमारीला उपस्थित होते.

साडेचार पर्यंत कन्याकुमारी पासून १७ किमी अंतरावर होतो. तासाभरात हे अंतर कापणे शक्य होते, परंतु मधल्या गावांजवळच्या  छोट्या छोट्या चढाच्या पुलावरून जाण्याने दमछाक होत होती. पण आता आम्ही " मंझील के पास" आल्यामुळे पायात बळ संचारले होते. 

सूर्य अस्ताला जाण्याची तयारी करत होता. पण तो डुंबण्या अगोदर कन्याकुमारीला जायचे होते. सर्वजण जोशात दौडू लागले, बरोबर साडेपाचला कन्याकुमारीच्या शेवटच्या माईल स्टोन वर पोहोचलो आणि सर्वानी जल्लोष केला.  त्या माईल स्टोन जवळ भरपूर फोटोग्राफी केली. तेथून  अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंद महासागर समुद्रांच्या त्रिवेणी संगमावर आलो. 

 मावळत्या सूर्याला नमस्कार केला. भारताचा रस्ता तेथे संपला होता, आमचे ध्येय साध्य झाले होते. खडतर परिश्रमाला फळ मिळाले होते. आनंदाच्या भरात सर्वांनी सायकल हातात घेऊन फोटो काढले. 


मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफरीमध्ये लक्ष्मण सतत माझ्या बरोबरच होता. आज शेवटच्या दिवशी सुद्धा त्याने माझी साथ दिली होती. सर्वांच्या पुढे आम्ही दोघांनी कन्याकुमारी प्रथम गाठली होती. या पूर्णत्वाचा आनंद लक्ष्मणच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.

मी दोन्ही हात पसरवून सागरांच्या  त्रिवेणी संगमाला कवेत घेतले.  

डोळ्यात अश्रू तरळले, पण ते आनंदाचे, ध्येयपूर्तीचे आणि संकल्प सिद्धीचे होते. ११ दिवसात १७६० किमी सायकलिंग;  एक खडतर पण आनंददायी सफर पूर्णत्वास गेली होती.

सोपानराव नलावडे, विकास भोर, नामदेव नलावडे, दिपक निचित, अभिजित गुंजाळ आणि लक्ष्मण नवले याची साथ होती म्हणूनच सतत ऊर्जा मिळत होती. एकजुटीमुळेच संकल्प सिद्धीस गेला होता.  या घवघवीत यशामध्ये सर्वात मोठा वाटा मित्रांचा होता.


सतीश विष्णू जाधव

2 comments:

  1. मित्राचे अभिप्राय...

    आतापर्यंत ट्रेकिंग करताना हिमालयाच्या शिखरांची उंची गाठण्याचे ध्येय असायचे पण यावेळेस ...
    ध्येय होते लांब पल्ल्याचे.अकरा दिवसात सायकलवरून 1760 किलोमीटरचा पल्ला गाठायचा...
    प्रदूषण मुक्त भारत ही संकल्पना घेऊन भारतमातेच्या दक्षिण दिशेच्या अंतिम टोकापर्यंत सायकल चालवत जायचे. वाटेत प्रदूषण मुक्तीचे महत्व लोकांना सांगत स्वतःच्या उदाहरणाने पटवून द्यायचे. खूपच आव्हानात्मक होती ही ध्येयपूर्ती .
    शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचताना केलेला अथक प्रयत्न वाचताना डोळ्यासमोर येतो . ऊन, पाऊस , वारा यांची आनंदी करणारी मोलाची साथ कधी झालीच त्रासदायक तर सोबत असणाऱ्या मित्रांच्या साहाय्याने त्यावर केलेली मात .अखेरीस ध्येय प्राप्ती झाली अन् कृतार्थ तेच्या क्षणांचे यथार्थ चित्रण केले आहे .वाचताना
    सफलतेच्या त्या आनंदाचे क्षण आपणही जगतो.
    आनंदी मन आणि ध्येयपूर्तीच्या अत्यानंदाने एक ऊर्जा प्राप्त होऊन पुढच्या संकल्पाची नांदी नक्कीच सुरू झाली असेल !!
    अशाच अनेक ध्येयपूर्तीसाठी खूप खूप शुभेच्छा!!!

    ReplyDelete
  2. सायकल सफरीमधील सर्वोच्च आनंदाचा हा क्षण अत्यंत अनमोल आहे, आणि या ब्लॉगमधून तुम्ही तो दोन्ही करांनी मुक्तपणे उधळला आहेत۔ तुमच्यासोबत हा प्रवास करायला खूप मजा आली۔

    ReplyDelete