Thursday, August 27, 2020

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प राईड

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प राईड

२५ ऑगस्ट, २०२०


दोन वर्षांपूर्वी विजयदुर्ग किल्यावर गेलो होतो, तेव्हा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प खाडीच्या पलीकडे दिसत होता. या प्रकल्प परिसराला भेट देण्याचे तेव्हाच नक्की केले होते. आज सायकलिंग करत जैतापूरला जाण्यामुळे माझ्या बकेटलिस्ट मधील एक इच्छा पूर्ण होणार होती.

सकाळीच वाल्ये गावातून सुरुवात करून कोंडये घाटी रस्ता निवडला. या घाटी रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल आहे. मनात गाणे गुणगुणत अतिशय हळू गतीने चढ चढत होतो. तेव्हढ्यात झाडीतून फुरऱ्... फुरर्... आवाज आला. सायकल थांबवून झाडीत नजर टाकली तर झाडीत रानगव्याचे दर्शन झाले. शिंगाखालील  माथ्याचा भाग पांढरा शुभ्र, तेज नजर, बाकदार शिंग आणि चेहऱ्यावरील राकट भाव जंगलाच्या शूर सरदारासारखे भासले. नजरेला नजर झाली.  त्याला कॅमेऱ्यात कैद करणार तेव्हढ्यात  रानगवा घनदाट रानात गायब  झाला. 

जंगलाच्या प्रत्येक प्राण्यांची, पक्षांची, कीटकांची एक सिमीत हद्द असते. त्या हद्दीत राहूनच त्यांची दिनचर्या सुरू असते. त्यामुळे त्यांच्या प्रदेशात शिरताना त्यांना त्रास होणार नाही, त्यांचे स्वतंत्र अबाधित राहील अशीच आपली वागणूक हवी.

काळ्या मुंग्यांची अतिशय शिस्तबद्ध रांग तुरुतुरु चालताना दिसली. सायकल थांबवून त्या रांगेला कोणताही अडथळा येणार नाही याची काळजी घेऊन रस्ता ओलांडला. 

टी टी टीव... टी टी टीव..., चूक चूक...,  कुहू कुहू... असे वेगवेगळ्या पक्षांची गायकी ऐकून मन मोहून गेले. आज वारा पडला होता.  समोर दिसणाऱ्या दरीतून पांढऱ्या शुभ्र ढगांचे पुंजके हिरव्यागार झाडांना स्पर्श करीत वर वर येत होते. घाटी चढताना दमछाक होत होती. एव्हढ्यात दवबिंदूंची बरसात सुरू झाली. हाताच्या केसांवर पडणारे दवबिंदूंचे थेंब मोत्यासारखे चमकत होते. 

वर चढण्याचा भार कमी व्हावा म्हणून झिक झ्याक सायकलिंग करत होतो.  रस्त्याच्या किनारीच्या भागावर शेवाळ जमा झाल्यामुळे सायकल ग्रीप सोडून घसरू लागली. समर्पयामीच्या आदित्यने ट्रेनिंग दिल्याप्रमाणे चाकातील हवा थोडी थोडी कमी केली. त्यामुळे शेवाळात सुद्धा  रस्ता पकडून सायकलिंग दमदारपणे सुरू होती.   कोंबडीच्या पिलासारखा चिव चिव आवाज काढत रस्त्यावरून तुरु तुरु धावणाऱ्या लाव्हा पक्षांचे दर्शन झाले. त्यांचे   तुरुतुरु धावणे परिकथेतील सात बुटक्यांसारखे भासले.
घाट चढून आलो. मजल दरमजल करीत कोंडीये गावाजवळील हायवेला आलो आणि सायकलची हवा टॉप अप केली. हायवेची सफर सराईतपणे पार करून हातीवले गावाजवळील उदयच्या चहा टपरीवर आलो. जान्हवी वहिनीच्या हातचा फक्कड चहा घेऊन जैतापूरकडे सायकल सफर सुरू झाली. येथून जैतापूर २९ किमी आहे. जुवाटी तिठ्या वरून जैतापूरकडे जाणाऱ्या रस्त्याला वळसा घेतला. 
हा रस्ता राज्य महामार्ग आहे. या वर्षी पडलेल्या भरपूर पावसामुळे, बऱ्याच ठिकाणी रस्ता ओबडधोबड झाला होता. निसर्गात सफर सुरू होती. प्रथम काशींगे त्या नंतर महाळूनगे गाव लागले. काशींगे गावाचा परिसर नयनरम्य फुलांनी फुलला होता. तर महाळूनगेला मोठा सॅटेलाईट टॉवर उभा होता. चौके फाटा येथून २१ किमी होता. सुंदर वातावरणात सायकल सफरीचा आनंद घेत होतो.
'डोंगर' गावात जाणारा फाटा लागला. त्याचवेळी हमरस्त्यावरील समोरच्या डोंगरावर हापूस आंब्यांची मोठी बाग लागली. अतिशय सुबक पद्धतीने एका रांगेत कलमे लावली होतो. उभी आडवी आणि तिरक्या रेषेत दिसणारी कलमी झाडांची  रांग त्या वाडीच्या मालकाची कलात्मकता दाखवीत होती. 

येथूनच नाणार फाटा लागला. नाणार प्रकल्प सध्या बंद स्थितीत आहे. उजवीकडे जाणार फाटा थेट राजापूरला जात होता. पुढे विलये तिठा, पडवे आणि त्यानंतर मुरगुले वाडी ही गावे लागली. पुढे कोंबे गावाची हद्द सुरु झाली.

 हॉटेल वजा टपरी दिसल्यामुळे हायड्रेशन ब्रेक घ्यायचे ठरविले. बाजूच्या रेशन दुकानावर बऱ्याच महिला मास्क लावून धान्य घेण्यासाठी सोशल डिस्टनसिंग पळून रांगेत उभ्या होत्या. चहा टपरीत स्पेशल चहाची ऑर्डर दिली आणि गावचे नाव विचारले. "साखरकोंबे" हे गावचे नाव ऐकून खूप गंमत वाटली. मालकाला सांगितले,  'चहात दोन चमचे साखर घाला'. गावांची अशी आगळीवेगळी नावे;  ही त्या त्या गावाची जुनी ओळख  देत असावीत. याच टपरीवर गावाकडची खोबरे चिक्की मिळाली. खोबरे, वेलची, खजूर आणि गूळ घालून बनविलेली चिक्की खूप चविष्ट होती. 

येथून दहा किलोमीटर जैतापूर आहे. त्यामुळे पुढचा ब्रेक जैतापूरला घ्यायचे ठरवून पुढची सफर सुरू केली.  वाटेत अनसुर, करेल गावे लागली करेलला शंकराचे  माणेश्वर मंदिर आहे. पुढे मीठगव्हाणे गाव लागले. पूर्वी मिठाची मोठी कोठारे असावीत या गावात. यानंतर जांभळगाव लागले. येथे बाप्पाच्या आरतीचे सूर कानावर येत होते. त्यानंतर वाघ्रण गाव लागले. परममित्र शरदच्या पाटीलच्या अलिबागमधील गावचे नाव सुद्धा वाघ्रण आहे. 
पुढे माडबन आणि अणुऊर्जा प्रकल्पाकडे जाणार फाटा लागला. या फाट्यावरून एकाबाजूला जैतापूर चार किमी दुसऱ्या बाजूला माडबन चार किमी अणुऊर्जा चार किमी आणि लाईट हाऊस चार किमी आहेत. क्षणभर विचार केला. प्रथम जैतापूर गावात जायचे नक्की केले.

मधल्या रस्त्यात कुवेशी, नंतर दळी आणि होळी गाव लागले. कोण कुलपती वेशीवर आला..., काय दळण दळल... आणि कशाची होळी केली... हे यां गावात थांबलो असतो तर नक्कीच शोधून काढले असते.

माझा सायकालिस्ट मित्र मितेश शिवलकरचे आणि प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकरचे जैतापूर हे गाव. खाडीच्या किनाऱ्यावर वसलेले निसर्गरम्य गाव.
 या गावात शिरताच बाजारपेठ लागली. पुढे पुरातन वेताळ देवाचे मंदिर लागले. त्यानंतर गावाची सायकल सहल सुरू झाली. 
 

चिंचोळ्या रस्त्यातून सायकलिंग करताना छोट्या छोट्या वाड्या लागत होत्या. नारळ, आंबा, केळी पोफळी, फणस या झाडांची रेलचेल होती. गावातील जेट्टी आणि बाजारपेठेतील जेट्टी यांना भेट दिली.
 भरतीची वेळ होती. दूरवर मासेमारी जहाज नांगरली होती. जैतापूरचे विशाल आणि मनमोहक खाडीचा भाग दिसत होता. एका बोटीवर भगवा झेंडा फडकत होता. त्याच्या पलीकडे नाटे गावतील भगवती मंदिर दिसत होते. 
 
 जेट्टीवर सायकल सह फोटो काढले. उजव्या बाजूला रत्नागिरीला जाणाऱ्या कोष्टल हायवेवरील खाडी पूल होता.  खाडीच्या पलीकडे नाटे गाव दिसत होते. खाडीत समोर एक बेट होते, त्यावर सुद्धा तीस चाळीस  घरे दिसत होती. या गावात नावेनेच जाता येते.
 

 पुढे कधी जैतापूरला राहणे झाले तर या बेटावर  सायकलिंग करायला खूप आवडेल.
 
 बाजारपेठेतील जेट्टीवर गेलो. पावसामुळे फेरी सर्व्हिस बंद होती. पायऱ्या पायऱ्यांची जेट्टी एकदम खाडीत लुप्त झाली होती. भरतीच्या पाण्यात जेट्टीच्या शेवटच्या तीन पायऱ्या बुडाल्या होत्या. पाण्यात सायकल उभी करून तिचे फोटो काढले. 
 

 बाजारपेठेत मांजरेकर खानावळीत जेवण घेऊन तडक माडबनकडे निघालो. जैतापूर सारखेच निसर्गरम्य माडबन गाव समुद्र किनारी वसलेले आहे. नावाप्रमाणेच माडांच्या झाडांतच हे गाव आहे. माडबन पर्यटनस्थळ आहे. चौपाटीवरून समोर विजयदुर्ग किल्ल्याचे दर्शन होते. किल्ल्याच्या उंच बुरुजावर भगवा झेंडा डौलाने फडकत होता.
 
 समुद्रांच्या लाटांचे उसळणे  मनाला भावले. भरती असल्यामुळे चौपाटीचा किनारा फेसळलेल्या  पाण्याने झाकला गेला होता. 
 
 माडबन गावातून पुन्हा मुख्य रस्त्यावर येऊन अणुऊर्जा प्रकल्पाकडे प्रस्थान केले. तीन किमी सायकलिंग करीन प्रकल्पाच्या गेट जवळ पोहोचलो. गेट बंद होते. 
गेटजवळ सायकल थांबवून तेथील  सुरक्षा रक्षकांबरोबर वार्तालाप सुरू केला. आत प्रकल्पाची कामे सुरू होती. प्रत्यक्ष हे स्टेशन चालू व्हायला किती काळ लागेल , याचे उत्तर मिळले नाही. पाण्याची बाटली भरून घेतली. सुरक्षा रक्षकांचे आभार मानून परत मागे फिरलो. 
 
 आता दुपारचे साडेतीन वाजले होते आणि परतीचा प्रवास अंधार पडायच्या आत पूर्ण करायचा होता. त्यामुळे तीन किमी वरील माडबन लाईटहाऊसकडे न वळता परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. 
 
 संध्याकाळच्या तिरप्या सुर्यकिरणांमुळे सायकलची सावली लांबवर पाडू लागली होती. आकाशातील ढगांचे पुंजके,  छोट्या छोट्या तळ्यात आंघोळ करायला उतरण्याचा प्रयत्न करीत होते. तसेच काही ढग झुडपांबरोबर लपंडाव करीत होते. 
पडवे गावात चहासाठी हायड्रेशन ब्रेक घेतला. येथे दुकान मालकाने आस्थेने चौकशी केली. सायकल वरून संपूर्ण राजापूर फिरल्याबद्दल त्यांना खूप आनंद झाला. पुन्हा सलग दीड तास सायकलिंग करत हातीवले हायवेला दुसरा हायड्रेशन ब्रेक घेतला. ११० किमी सायकलिंग करून संध्याकाळी साडेसहा वाजता घर गाठले.

आजच्या सायकल सफरीमध्ये गावांच्या नावाच्या गमती जमतीची मजा घेतली. जैतापूर खाडी, माडबन समुद्र, तेथून दिसणारा विजयदुर्ग किल्ला आणि निसर्गरम्य परिसर यांचा आनंद भरभरून लुटला. 

 सतीश जाधव
 आझाद पंछी..

Tuesday, August 25, 2020

धुतपापेश्वर राईड

धुतपापेश्वर राईड

२३ ऑगस्ट, २०२०

धुतपापेश्वर मंदिराचे नाव बऱ्याच वर्षांपासून ऐकून होतो  पण पाहणे झाले नव्हते. त्यामुळे आज धुतपापेश्वर राईड करायची हे नक्की केले.

वाल्ये गावातून राईड सुरू झाली. आज कोंडये गावाकडे जाणारा चढाचा रस्ता निवडला होता. चिंचोळा रस्ता आणि पावसात डांबर-खडीची धूप झाल्यामुळे रस्ता ऑफ रोडिंग झाला होता. गियर एक बाय दोन लावून अतिशय संथ गतीने घाट चढून गेलो. अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. डोंगराच्या वर सपाटीला पोहोचताच, जोरदार पाऊस सुरू झाला. पावसाच्या जलधारा मध्ये घाम आणि शीण दोन्हीही वाहून गेला. 

पठाराच्या दोन्ही बाजूला बेधुंद हिरवळ आणि काजूची झाडे दिसत होती. पाणथळीमध्ये पडलेले झाडांचे प्रतिबिंब निसर्गाचे आगळे वेगळे प्रतिरूप दाखवत होते.  

आणखी दोन चढ-उतार केल्यावर वाल्ये गावाची हद्द संपून पन्हाळे गाव सुरू झाले. वेशिवरच्या एका टपरीवर पाचसहा वयस्क बसले होते. त्यांना रामराम करताच, सर्वांनी ऊभे राहून मला प्रति नमस्कार केला. सायकलने घाट चढून आल्याचे आश्चर्य सर्वांच्या चेहऱ्यावर जाणवत होते. धुतपापेश्वरला जाणार हे सांगितल्यावर, एक आजोबा म्हणाले, 'सायकलने',  'हो' म्हणताच त्यांनी तोंडभरून आशीर्वाद दिले.

कोंडये गावाच्या चढउताराची वाट पार करून हायवेला आलो. पाऊस अजूनही लपंडाव खेळत होता. कोंडये गावाचा चढ लागला आणि पेडलिंग करताना घामाच्या धारा वाहत होत्या. पुन्हा उताराला पावसाचा मारा सुरू झाला. अतिशय मजेत सफर सुरू होती. "सुहाना सफर और ये मौसम हसी" हे गाणे आपसूकच ओठावर आले. हायवेच्या दोन्ही बाजूला पसरलेली झाडे आणि भाताची शेती पाहून सायकल थांबविली आणि गाणे गात निसर्गाबरोबर संवाद साधला. 

भाताची हिरवीगार पाने डोलून साथ देत होती. लाल पिवळी गवतफुले एकमेकांशी दांडिया रास करीत डोलत होती. फुलांच्या ओढीने फुलपाखरे त्यांच्याशी हसत खेळत लपंडाव करीत होते. जगाला आनंद देण्यासाठी उमललेली ही क्षणभंगुर फुले, चिरकाल मनाच्या गाभाऱ्यात दरवळत होती.

जुवाटी फाटा पार केला, त्या नंतर जैतापूरला जाणारा हातीवले फाटा लागला. फाट्यावरच्या उदय जानवलकरच्या टपरीवर आलो.  अर्धा डझन केळी घेतली. दोन खाल्ली आणि बाकीची पाठपिशवीत ठेवली. केळी म्हणजे सायकलिंग साठी बूस्टर डोस असतो. 
आरेकर वाडी बस स्टॉप पार केल्यावर टोल नाका लागला. तेथून पुन्हा चढला सुरुवात झाली. हॉटेल अंकिता पॅलेस हॉटेलपर्यंत चढ चढल्यावर उतार सुरू झाला. हायवे सोडून उजव्या बाजूला गंगातीर्थाकडे वळसा घेतला. 

राजपुरचे गंगातीर्थ ऐतिहासिक महत्वाचे आणि पवित्र स्थळ आहे. 
छत्रपती शिवाजी महाराजांनी विजयापुरच्या (बिजापूर) बादशहावर स्वारी करून राजापूर ताब्यात घेतल्यावर या गंगातीर्थाला भेट दिली होती. कविवर्य मोरोपंतांनी भेट देऊन  राजापूरच्या गंगेचे महात्म्य सांगणारे  "गंगा प्रतिनिधीर्थ कीर्तन" काव्य रचले आहे. गंगातीर्थाच्या जीर्णोद्धारासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी भरीव देणगी दिली आहे. 

दर तीन वर्षांनी आगमन होणाऱ्या गंगातीर्थाला महाराष्ट्राच्या इतिहासात मनाचे स्थान आहे. येथे एकूण चौदा कुंड आहेत, त्यातील काशीकुंड आणि मूळ गंगा कुंड  'प्रमुख कुंड' आहेत.

चौदाव्या शतकात राजा रुद्रप्रताप यांनी चौदा कुंडांचे बांधकाम केले. विशेष म्हणजे या कुंडांतील प्रत्येक जलाचे तापमान वेगवेगळे आहे. 

या गंगातीर्थाला सवाई माधवराव पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर यांनी भेटी दिल्या आहेत. जेव्हा गंगा अवतीर्ण होते तेव्हा येथे मोठी यात्रा भरते. भारतवर्षातील अनेक भाविक या गंगा 
तीर्थाला भेट देतात. सध्याच्या परिस्थितीमुळे मंदिर बंद होते. बाहेरून सायकलसह फोटो काढून उन्हाळे गावाकडे प्रस्थान केले. 

या उन्हाळे गावात गरम पाण्याची पवित्र कुंड आहेत. बाजूलाच ग्रामदैवत महालक्ष्मीचे भव्य मंदिर आहे. 


हिच्या चरणामधून या पवित्र गरम झऱ्यांची निर्मिती झाली आहे. भाविक या कुंडात स्नान करणे म्हणजे मातेचा कृपा प्रसाद मानतात. अर्जुना नदीच्या वाढलेल्या पाण्यामुळे गरम पाण्याचे कुंड भरून गेले होते. 

जवळच स्वामी समर्थांचा मठ आहे. तेथे स्वामी समर्थांच्या पादुका आहेत. उन्हाळे गाव आणि मठ नारळी, पोफळी, आंबा, फणस, काजूंच्या झाडांमध्ये वसलेले आहे. बाजूने वाहणारी अर्जुना नदी, हिरवागार निसर्ग, रम्य शांत वातावरणामुळे मन भावविभोर झाले.

 खरच... सायकलिंगमुळे कोकणातील निसर्गरम्य तिर्थस्थळे पाहण्याचा योग जुळून आला होता. येथून जवळच कोकण रेल्वेचे राजापूर स्टेशन आहे. 
 
 आता सुरू झाली राजापूरकडे सायकल राईड.  अर्जुना नदीच्या पैल तीरावर राजापूर शहर वसलेले आहे. हे शहर ऐतिहासिक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या "आज्ञापत्रात" राजपुरचा उल्लेख आहे.  महाराजांच्या दूरदर्शीपणामुळेच इंग्रजांना समुद्र किनारची बंदरे वापरासाठी न देता तीस किमी आत  खाडी मध्ये व्यापारासाठी राजापूर बंदर वापराची परवानगी दिली होती. जेणे करून त्यांच्या सर्व व्यापारउदिमावर बारकाईने नजर ठेवता येईल.
 
राजापूर शहरात प्रवेश केला आणि खाडी 
किनाऱ्याने  दोन किमी आत आल्यावर खाडी ओलांडून घुतपापेश्वर घाट चढायला सुरुवात केली. चार किमीचा अतिशय कठीण चढ होता. सुरुवातीला  एक बाय दोन आणि नंतर एक बाय एकवर गियर लावून घाट पार केला. येथे  पावसाच्या साथीमुळे  न थांबता,  न थकता, एका दमात घाट पार केला. 

धोपेश्वर गावात प्राचीन धुतपापेश्वर मंदिर आहे. श्री शंकराचे स्वयंभू शिवलिंग धबधब्या खालील छोट्या गुंफेत आहे. 
तसेच  या शिवलिंगावर धबधब्याचा जलाभिषेक होत असतो. यालाच कोटीतीर्थ म्हणतात. आज पडत असलेल्या जोरदार पावसामुळे धबधब्याला खूप पाणी होते, त्यामुळे शिवलिंगपर्यंत जाणे अशक्य होते.

ह्या निसर्गरम्य धबधब्याच्या तीन स्टेप्स आहेत. त्याचा धीरगंभीर आवाज, आजूबाजूला घनदाट अरण्य, खाली जाणारी खोल दरी, नारळ, पोफळी केळीच्या बागा,  हे अप्रतिम वातावरण पाहिल्यावर शिवशंकर महाराज येथे का आले असावेत, याची प्रचिती येते.
धबधब्याच्या बाजूला धुतपापेश्वराचे मंदिर सुद्धा आहे. मंदिर खुले होते. परंतू एकच कुटुंब देवदर्शनाला आले होते. मुख्य गर्भ गृह बंद होते.धबधब्याचे व्हिडीओ आणि फोटो काढून बाहेर आलो. 

मंदिराबाहेर एक अवलिया श्री वसंत ठाकूर यांची भेट झाली. 
यांच्या डाव्या हाताची नखे चार फूट लांब आहेत. यामुळे त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद आहे

एक नकलाकार, पक्षांचे, प्राण्यांचे, फिल्मी कलाकारांचे आवाज काढणारा, शिट्टीने गाणी म्हणणारा, तांदळावर दीडशे अक्षरे, गाईच्या केसावर गणपती काढणारा हा असामी जगावेगळा आहे. गेली ३५ वर्ष घालविली आहेत त्याने नखे वाढविण्यात.
 बाळासाहेब ठाकरे, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन यांचा फॅन आहे. सर्वांचे हुबेहूब आवाज काढण्यात पटाईत.  समर्थ रामदास स्वामींचा शिष्य समजतो स्वतःला, त्यामुळे पायात चप्पल घालत नाही, ब्रम्हचारी आहे आणि धोपेश्वर गावात आई सोबत राहतो. तसेच सतत नामस्मरण करीत असतो.
 
त्याच्या समवेत तासभर होतो. प्रत्येक क्षण मला हसवत होता, त्याच्या नकलांच्या साथीने.  निसर्गावर प्रेम करणारा, प्रचंड सकारात्मक दृष्टोकोन असणारा  हा माणूस ध्येय वेडा आहे. 

त्याला माहित आहे, चांगले बोलण्यामुळे आणि तसेच वागण्यामुळेच सांसारिक पाश नसताना सुद्धा  खूप मोठा मित्रपरिवार आहे त्याचा. वेडीच माणसे जगावेगळे छंद जोपासू शकतात, याची जाणीव झाली. 

सायकल भ्रमंती करताना अशी माणसे भेटणे हे खरंच माझे भाग्य होते.

वसंत ठाकूर यांनी सांगितलेले काही विचार  : - 

ज्या घरात म्हातारे आई वडील राहतात 

तो सर्वात मोठा  श्रीमंत माणूस. 

माणूस कमावलेल्या पैशाने श्रीमंत होत नाही

तर जमवलेल्या माणसांनी श्रीमंत होतो.

फुले नित्य फुलतात, ज्योती अखंड उजळतात

आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात.

कारण सांगणारे लोक कधीही यशस्वी होत नाहीत

आणि यशस्वी होणारी माणसे कधीही कारण सांगत नाहीत.

कालचा दिवस गेला,

उद्याचा दिवस अजून यायचा आहे,

आजचा दिवस तुमच्या हातात आहे,

चला कामाला लागा.

आजची डोंगर दऱ्यातील ५० किमी सायकल राईड  राजापूर परिसरातील प्रसिद्ध स्थळे, तीर्थक्षेत्र पाहण्यासाठी होती. पण त्या अनुषंगाने नकळत राजापूरच्या  धेय्यवेड्या माणसाची पण मैत्री झाली.

सतीश जाधव
आझाद पंछी...

 

Sunday, August 23, 2020

गवत फुला रे गवत फुला... राईड

गवत फुला रे गवत फुला... सायकल राईड

२२ ऑगस्ट, २०२०

सकाळी चहा बिस्कीट आणि कोकणफेम कुरमुरा लाडू खाल्ला आणि पडलो बाहेर सायकल सफरीवर. 

गावागावातून राईड करायची होती.  म्हणून हायवेला जाणारा रस्ता टाळून डावीकडे वळलो. सुरुवात चढाने झाली. छोटी घाटी चढत होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सोनतल, तिरडा, शिरवट ही गवतफुले पसरली होती. कोकणात आज येणाऱ्या बाप्पाच्या डोक्यावर मखरला हीच सोनतल गवतफुले लावली जातात. 

घाटी संपली आणि वाल्ये गावची हद्द संपून बंदीवडे गाव सुरू झाले. वाटेत भारद्वाज पक्षी बसला होता. मला पाहताच पंख फडफडत उडून गेला.  त्याने उडताना हवेत सूर मारल्या सारखी पोज घेतली. त्या बरोबर त्याच्या करड्या पंखांची पांढरी टोके एकत्र आली,  ती अतिशय विलोभनीय दिसत होती.  जणूकाही विमानातून बाहेर पडणाऱ्या धुरासारखी भासली.  खंड्या (किंग फिशर) चे दर्शन झाले.  त्याची अणकुचीदार चोच शरीराच्या मानाने खूप मोठी होती. सुतार पक्षी झाडाच्या एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर कलाबाजी करत होता.

बंदीवडे गाव ओलांडल्यावर पुन्हा घाटी सुरू झाली. एक मुलगा हातात काहीतरी घेऊन चालला होता. त्याच्या टीशर्टच्या मागे ऋषी नाव लिहिले होते. त्याच्या जवळ पोहोचल्यावर मला आनंद झाला. त्याला म्हणालो, 'काय ऋषी, सोलतोयस नारळाची किशी, चाललास कुठे खुशी खुशी..." ऋषी म्हणाला, "गणपती आनूक चाललंय". 

बुलबुल पक्षांची जोडी दिसली. किलबिलाट करत, एकमेकांशी मस्ती करत होते. चढाच्या एका वळणार मोठा सरडा, रस्त्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला तुरुतुरु पळताना दिसला.  झाडाच्या खोडावर चढला. सायकल थांबवून हसत त्याच्याकडे पाहिले. तो माझ्याकडे एकटक पहात होता. मला स्माईल देत टाटा करत होता. निसर्गातील निरागस प्राणी जगत सुद्धा निसर्गाचे वेगळे रुप दाखवत होते. 

  हा घाट बऱ्यापैकी उंच होता. घाट संपवून वरच्या टोकावर आलो.  समोरील विस्तीर्ण सह्याद्री डोंगर हिरव्याटच्च झाडांनी व्यापून गेला होता. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमारेषा असलेल्या जगबुडी नदीचे विशाल पात्र तसेच खारेपाटण गाव आणि त्याच्या जवळ असलेला पूल ह्या सड्यावरून विहंगम दिसत होता. डोंगराचा उतार आंबा, काजूंच्या झाडांनी बहरून गेला होता.
  
 काळ्या राखाडी ढगांनी आकाश भरलेले होते. माळढोक पक्षांचा थवा आकाशात विहार करीत होता. त्यांना पाहून आपल्याला उडता आलं असत तर काय बहार आली असती, हा विचार आला. हे सर्व पाहिल्यावर घाट चढताना लागलेला दम क्षणात नाहीसा झाला.
  

 आता डोंगरावरील सडा लागला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरव्या गवतावर लाल, पिवळ्या, निळ्या गवतफुलांचा बहर आला होता. हिमालयातील व्हॅली ऑफ फ्लॉवर काय किंवा सातारचे कास पठार काय, माझा कोकण कणभरही कमी नाही फुलांच्या  विविधतेमध्ये.
 

आता प्रिंदावन गावात प्रवेश केला. घरातून गणपतीच्या आरतीचा गजर ऐकू येत होता. रस्त्यावरील टपरीवजा दुकाने बंद होती. त्यानंतर पुन्हा चढाचा रस्ता सुरू झाला. आजुबाजुला कलमी आंब्याच्या वाड्या दिसत होत्या. प्रत्येक कलमाच्या खाली पिवळ्या फुलांनी फेर धरला होता. 

जुवाटी गावात प्रवेश केला. रस्त्याच्या बाजूला भाताची पाती तरारून आली होती. मध्ये मध्ये पावसाचा शिडकावा होत होता. जुवाटी तिठ्या वरून जैतापुर अणुऊर्जा प्रकल्पाकडे रस्ता जात होता. येथून जैतापूर २५ किमी आहे. 

अडीच तास राईड झाल्यामुळे जैतापूरला न जाता हायवेला यायचे नक्की केले. वाटेत रयत शिक्षण संस्थेचे आबासाहेब मराठे डिगरी कॉलेज लागले. संपूर्ण परिसरात शुकशुकाट होता. तेथुन हातीवले हायवेला आलो.  

हातीवले वरून राजापूर दहा किमी अंतरावर होते. राजापूरच्या घाटीत छानसा धबधबा आहे. त्यामूळे राजापूर खाडीपर्यंत जायचे नक्की केले. 

 टोल नाक्यापर्यंत चढ चढून उतार सुरू झाला. सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावरील उतारावर सायकल रॉकेट सारखी पळत होती. राजापूरच्या खाडी पुलावर आलो. राजापूर पर्यंत समुद्राच्या भरतीचे पाणी येते. सह्याद्रीतून वाहणारी अर्जुना नदी पावसाळ्यात खाडीच्या पाण्याला समुद्रापर्यंत ढकलत नेते. पंधरा दिवसांपूर्वी हा अर्जुना नदीवरील पूल,  पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे जवळपास सहा तास बंद ठेवण्यात आला होता. तयार होणाऱ्या एक्सप्रेस वे वर आता खूप उंचावर नवीन पूल तयार होतो आहे. 

परतीच्या प्रवासात राजापूर घाट चढत धबधब्यावर आलो. हायड्रेशन ब्रेक घेतला. धबधब्याकडे फोटो काढूले. हायवे वरून राईड करत हातीवले, कोंडीये गाव पार करून वाल्ये गावाकडे वळसा घेतला.

आजची ८० किमी सफर गावागावातून होती. गवतफुलांच्या प्रदेशातून होती. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतून होती.

एक मावळा घोड्याऐवजी सायकल वरून या पावन भूमीला वंदन करीत होता. वाऱ्यावर डोलणाऱ्या गवत फुलांचा आस्वाद घेत होता.


क्षणभंगुर हे आयुष्य तुमचे...

क्षणभंगुर ही नाती...

क्षणा क्षणाला आनंद देता...

अनंत जगण्यासाठी...


सतीश जाधव
आझाद पंछी...

Saturday, August 22, 2020

पाऊस वारे... नटलेले झरे... सायकल राईड

पाऊस वारे... नटलेले झरे... सायकल राईड

२१ ऑगस्ट २०२०

पहिल्यांदाच सायकलची चाके काढून फ्रेम काररॅकला लावून कारने मुंबई राजापूर प्रवास केला होता. आज सकाळीच सायकल असेंबल केली. आता सुरू झाली राजापुरातील वाल्ये गावातून सायकल सफर. कुठे जायचे, कुठपर्यंत जायचे याचा काहीच थांग नव्हता. मनाला मोकाट सोडून, छोट्या रस्त्यावरून हुंदडणे हाच एक कलमी कार्यक्रम होता. 

वातावरणात सुखद गारवा होता. ओलसर वाट आणि दोन्ही बाजूला पसरलेली हिरवळ मनाला अल्हाद देत होती. गावाच्या वाटांचे एक मस्त असते. रहदारी नाही वर्दळ नाही, फक्त आणि फक्त निसर्ग.
हा निसर्ग, कधी झुळझुळ वाहणाऱ्या  ओढ्याच्या खळखळटात दिसतो. तर कधी पक्षांच्या विविधअंगी किलबिलाटात दिसतो. फुलपाखरांच्या रंगीबेरंगी पंखात दिसतो, तर कधी खारुताईच्या झुबकेदार शेपटीत दिसतो. हंबरणाऱ्या गाईंच्या तांड्यात दिसतो, तर कधी देवळाच्या नादमय घंटीत दिसतो. ही निसर्गाची सर्व रूपे पाहताना मन मोहरून जाते.

वाटेत कोकणातल्या हिरवाईने हिरवटलेला मैलाचा दगड लागला. मैलाच्या दगडाभोवती लालपिवळ्या गवतफुलांनी फेर धरला होता. आपल्या पांढऱ्या रंगाचा मुलामा निसर्गाला अर्पण करून, हिरवी दुलई अंगावर ओढून तो फुलांशी हितगुज करत होता. 
हे पाहून  सायकल त्याच्या पुढे नतमस्तक झाली आणि म्हणाली,  "किती भाग्यवान आहेस तू, कोकणच्या वातावरणात तुही रंगून गेलास."  माईल स्टोन हसला आणि म्हणाला, "अग वेडे, तुझं नशीब थोर म्हणून थोड्याच कालावधीत कन्याकुमारीला जाऊन पण आलीस."  दोघांचा सुसंवाद सुरू असताना बाजूच्या कातळावरून पडणाऱ्या पाण्याचा स्वाद घेत होतो. 

 पावसाचा पाण्याने ओघळणाऱ्या आणि लाल रंगाने माखलेल्या गावागावातून जाणाऱ्या छोट्या पाऊल वाटा सह्याद्रीचा रांगडेपणा सांगत होत्या. राकट देशा... महाराष्ट्र देशाचे अंतरंग काटेरी फणसासारखे रसाळ आहे,  हेच त्या वाटे भोवतालची हिरवीगच्च आंबा, काजूची झाडे;  शेगला, अळूची रानवट रोपटी सांगत होती. 

वेडावाकडा आणि चढ उताराचा रस्ता महामार्गाकडे निघाला होता. या रस्त्यावरून चढला एक बाय दोनवर गियर सेट करून चढ चढावा लागत होता. तर उताराच्या भन्नाट वेगावर ब्रेकने नियंत्रण ठेवावे लागत होते.
 वाल्ये गावच्या वेशीवर खळखळत वाहणारा ओढा लागला. दगडावरून उसळी घेणाऱ्या पाण्याचे थेंब अंगावर घेण्यासाठी समोरच्या हिरवळीवर बसकण मारली. एव्हढ्यात पावसाची बरसात सुरू झाली.  वरून कोसळणाऱ्या जलधारा आणि ओढ्याच्या पाण्याचा मारा यामध्ये अंग अंग रोमांचले.
 
 आता शेजवली गावातून राईड सुरू झाली. गावात गणपतीची लगबग दिसली. परंतू एका घरातील दोन किंवा तीन माणसेच बाप्पाची मूर्ती घेऊन येत होते. अजूनही गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर संशयाचे सावट होते.  हेल्मेट घालून सायकलिंग करणाऱ्या नवख्याकडे आश्चर्याने पहात होते. 
 
शेजवली गावच्या शाळेच्या फळ्यावर एक  कविता लिहिली होती. क्षणभर थांबून कविता वाचली 

 "देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे...
 
एक दिवस घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे" 

 कविवर्य विंदा करंदीकर यांची कविता पाहून, निसर्गाकडून भरभरून मिळालेला आनंद शब्दरूपाने सर्वांकडे पोहोचविण्याची उर्मी उफाळून आली. शेजवलीचा रस्तासुद्धा चढ उताराचा होता. तसाच पावसाचा शिडकावा कधी हलकासा तर कधी भरात येत होता.

मुंबई गोवा हमरस्त्यावर आलो. हा हायवे सिमेंट काँक्रीटचा  चार पदरी झाला आहे. या प्रशस्त महामार्गावरून सायकलिंग करताना त्यावर पडलेल्या पावसाच्या पाण्यात निसर्गाचे प्रतिबिंब परावर्तित होत होते. हायवेवर असलेल्या मैलाचा दगडावर सायकल थांबवून आरश्यासारख्या रस्त्यासह फोटो काढला.
 या हायवेला सर्व्हिस रस्ता सुद्धा आहे. पांढऱ्या पट्ट्याच्या आतून सायकल हाकणे अतिशय सुखरूप होते. हायवेला दर दहा फुटावर झाडे लावली आहेत. कालांतराने हा प्रशस्त हायवे सुद्धा हिरवाईने भरून जाईल याची खात्री आहे.   रस्ते प्रशस्त करताना पर्यावरणाचे भान आहे याचा आनंद झाला. 

मधूबन हॉटेल जवळील नदी ओलांडून खारेपाटण म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश केला. तेथे ट्राफिक पोलिसांनी अडवून चौकशी केली. खारेपाटण बाजारात जातोय हे कळल्यावर सोडून दिले. खारेपाटण बाजाराला एक फेरफटका मारला. भैरोबा मंदिराकडे आलो, सोशल डिस्टनसिंगमूळे मंदिरात जाणे टाळले.  
  
  तीस किमी राईड करून रिमझिम पावसाच्या धारा अंगावर घेत घरी परतलो. या परतीच्या प्रवासात मनाच्या पटलावर काही ओळी आल्या...

आवडेल मलाही पाऊस व्हायला …

एकट्या मनाची सोबत करायला …

कोणाच्यातरी चेहऱ्यावरचं हसू व्हायला …

मन तरुण असेल तर...

जगण्याची आहे नशा…

म्हणूनच सगळे विसरा

आणि निसर्गात पाय पसरा ....
पाऊस वाऱ्यात... नटलेल्या झऱ्यात... कोकणातील पहिल्या दिवसाची सायकल सफर अतिशय अप्रतिम झाली होती.

सतीश जाधव
आझाद पंछी...