Saturday, August 22, 2020

पाऊस वारे... नटलेले झरे... सायकल राईड

पाऊस वारे... नटलेले झरे... सायकल राईड

२१ ऑगस्ट २०२०

पहिल्यांदाच सायकलची चाके काढून फ्रेम काररॅकला लावून कारने मुंबई राजापूर प्रवास केला होता. आज सकाळीच सायकल असेंबल केली. आता सुरू झाली राजापुरातील वाल्ये गावातून सायकल सफर. कुठे जायचे, कुठपर्यंत जायचे याचा काहीच थांग नव्हता. मनाला मोकाट सोडून, छोट्या रस्त्यावरून हुंदडणे हाच एक कलमी कार्यक्रम होता. 

वातावरणात सुखद गारवा होता. ओलसर वाट आणि दोन्ही बाजूला पसरलेली हिरवळ मनाला अल्हाद देत होती. गावाच्या वाटांचे एक मस्त असते. रहदारी नाही वर्दळ नाही, फक्त आणि फक्त निसर्ग.
हा निसर्ग, कधी झुळझुळ वाहणाऱ्या  ओढ्याच्या खळखळटात दिसतो. तर कधी पक्षांच्या विविधअंगी किलबिलाटात दिसतो. फुलपाखरांच्या रंगीबेरंगी पंखात दिसतो, तर कधी खारुताईच्या झुबकेदार शेपटीत दिसतो. हंबरणाऱ्या गाईंच्या तांड्यात दिसतो, तर कधी देवळाच्या नादमय घंटीत दिसतो. ही निसर्गाची सर्व रूपे पाहताना मन मोहरून जाते.

वाटेत कोकणातल्या हिरवाईने हिरवटलेला मैलाचा दगड लागला. मैलाच्या दगडाभोवती लालपिवळ्या गवतफुलांनी फेर धरला होता. आपल्या पांढऱ्या रंगाचा मुलामा निसर्गाला अर्पण करून, हिरवी दुलई अंगावर ओढून तो फुलांशी हितगुज करत होता. 
हे पाहून  सायकल त्याच्या पुढे नतमस्तक झाली आणि म्हणाली,  "किती भाग्यवान आहेस तू, कोकणच्या वातावरणात तुही रंगून गेलास."  माईल स्टोन हसला आणि म्हणाला, "अग वेडे, तुझं नशीब थोर म्हणून थोड्याच कालावधीत कन्याकुमारीला जाऊन पण आलीस."  दोघांचा सुसंवाद सुरू असताना बाजूच्या कातळावरून पडणाऱ्या पाण्याचा स्वाद घेत होतो. 

 पावसाचा पाण्याने ओघळणाऱ्या आणि लाल रंगाने माखलेल्या गावागावातून जाणाऱ्या छोट्या पाऊल वाटा सह्याद्रीचा रांगडेपणा सांगत होत्या. राकट देशा... महाराष्ट्र देशाचे अंतरंग काटेरी फणसासारखे रसाळ आहे,  हेच त्या वाटे भोवतालची हिरवीगच्च आंबा, काजूची झाडे;  शेगला, अळूची रानवट रोपटी सांगत होती. 

वेडावाकडा आणि चढ उताराचा रस्ता महामार्गाकडे निघाला होता. या रस्त्यावरून चढला एक बाय दोनवर गियर सेट करून चढ चढावा लागत होता. तर उताराच्या भन्नाट वेगावर ब्रेकने नियंत्रण ठेवावे लागत होते.
 वाल्ये गावच्या वेशीवर खळखळत वाहणारा ओढा लागला. दगडावरून उसळी घेणाऱ्या पाण्याचे थेंब अंगावर घेण्यासाठी समोरच्या हिरवळीवर बसकण मारली. एव्हढ्यात पावसाची बरसात सुरू झाली.  वरून कोसळणाऱ्या जलधारा आणि ओढ्याच्या पाण्याचा मारा यामध्ये अंग अंग रोमांचले.
 
 आता शेजवली गावातून राईड सुरू झाली. गावात गणपतीची लगबग दिसली. परंतू एका घरातील दोन किंवा तीन माणसेच बाप्पाची मूर्ती घेऊन येत होते. अजूनही गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर संशयाचे सावट होते.  हेल्मेट घालून सायकलिंग करणाऱ्या नवख्याकडे आश्चर्याने पहात होते. 
 
शेजवली गावच्या शाळेच्या फळ्यावर एक  कविता लिहिली होती. क्षणभर थांबून कविता वाचली 

 "देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे...
 
एक दिवस घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे" 

 कविवर्य विंदा करंदीकर यांची कविता पाहून, निसर्गाकडून भरभरून मिळालेला आनंद शब्दरूपाने सर्वांकडे पोहोचविण्याची उर्मी उफाळून आली. शेजवलीचा रस्तासुद्धा चढ उताराचा होता. तसाच पावसाचा शिडकावा कधी हलकासा तर कधी भरात येत होता.

मुंबई गोवा हमरस्त्यावर आलो. हा हायवे सिमेंट काँक्रीटचा  चार पदरी झाला आहे. या प्रशस्त महामार्गावरून सायकलिंग करताना त्यावर पडलेल्या पावसाच्या पाण्यात निसर्गाचे प्रतिबिंब परावर्तित होत होते. हायवेवर असलेल्या मैलाचा दगडावर सायकल थांबवून आरश्यासारख्या रस्त्यासह फोटो काढला.
 या हायवेला सर्व्हिस रस्ता सुद्धा आहे. पांढऱ्या पट्ट्याच्या आतून सायकल हाकणे अतिशय सुखरूप होते. हायवेला दर दहा फुटावर झाडे लावली आहेत. कालांतराने हा प्रशस्त हायवे सुद्धा हिरवाईने भरून जाईल याची खात्री आहे.   रस्ते प्रशस्त करताना पर्यावरणाचे भान आहे याचा आनंद झाला. 

मधूबन हॉटेल जवळील नदी ओलांडून खारेपाटण म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश केला. तेथे ट्राफिक पोलिसांनी अडवून चौकशी केली. खारेपाटण बाजारात जातोय हे कळल्यावर सोडून दिले. खारेपाटण बाजाराला एक फेरफटका मारला. भैरोबा मंदिराकडे आलो, सोशल डिस्टनसिंगमूळे मंदिरात जाणे टाळले.  
  
  तीस किमी राईड करून रिमझिम पावसाच्या धारा अंगावर घेत घरी परतलो. या परतीच्या प्रवासात मनाच्या पटलावर काही ओळी आल्या...

आवडेल मलाही पाऊस व्हायला …

एकट्या मनाची सोबत करायला …

कोणाच्यातरी चेहऱ्यावरचं हसू व्हायला …

मन तरुण असेल तर...

जगण्याची आहे नशा…

म्हणूनच सगळे विसरा

आणि निसर्गात पाय पसरा ....
पाऊस वाऱ्यात... नटलेल्या झऱ्यात... कोकणातील पहिल्या दिवसाची सायकल सफर अतिशय अप्रतिम झाली होती.

सतीश जाधव
आझाद पंछी...

9 comments:

  1. Superb सर, असं वाटतंय की आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर ride करतोय

    ReplyDelete
  2. पावसात जशी धरती हिरवाईने नटली तसे तुझे लिखाण शब्दालंकाराने नटले

    ReplyDelete
  3. नमस्कार सर,

    20 तारीख, 'मुम्बई ते राजापूर' - निसर्गाचा आनंद घेत प्रवास आणि लगेच दुस-याच दिवशी म्हणजे 21 तारीख ..... कोकणातील सायकल सफर !!!!
    खूप छान आणि एकदम झकास !!!!

    "पाऊस वाऱ्यात... नटलेल्या झऱ्यात... कोकणातील पहिल्या दिवसाची सायकल सफर अतिशय अप्रतिम झाली होती."
    निश्चितच अतिशय अप्रतिम यात काहीही शंका नाही.

    विंदांच्या कवितेच्या ओळींप्रमाणेच कोकणातील निसर्ग सौंदर्य तुम्ही तुमच्या camera मध्ये टिपून आणि डोळ्यांत साठवून नंतर तुमच्या स्वत:च्या नेहमीच्या शैलीत अप्रतिमरित्या शब्द-बंधीत केले आहे. आणि हा संपूर्ण शब्द-प्रपंच करताना कल्पनांची भरारी आणि निसर्गाशी हितगुज करतानाची वेगवेगळ्या उपमांची मुसाफिरी खूप भावली.

    'मैलाचा दगड आणि सायकल'च्या गप्पा वाचताना गम्मत वाटली.

    शेजवली गावच्या गावक-यांची गणपती बाप्पा संदर्भातील करोनाच्या भीतीपोटी सतर्क लगबग आणि शाळेच्या फळ्यावरील विंदांच्या कवितेच्या ओळी, मुंबई गोवा हमरस्त्याची माहिती आणि इतरही बरेच काही.....

    सर्व फोटो एकदम चाबूक !!!!! आणि त्यांची मजकूरानूप मांडणी सुध्दा खूप छान.

    पुढील सफरीसाठी भरपूर शुभेच्छा !!!!

    ReplyDelete
  4. गावातील निसर्ग तर खुप अप्रतिम असतो. म्हणजे तुम्हाला चांगली निसर्गाची साथ मिळाली. मस्त सफर लिहायला शब्दच नाहीत. सुंदर

    ReplyDelete
  5. खुप सुंदर लिहिलंय मामा ❤️

    ReplyDelete