Monday, July 12, 2021

शाळेतील मित्रांच्या मैत्रीची सहल

शाळेतील मित्रांच्या मैत्रीची सहल

दि. ७ आणि ८ जुलै २०२१

गेल्याच आठवड्यात सतीश आणि शरदसह शांती रिव्हर रिसॉर्ट पाहून आलो होतो. रिसॉर्टचा परिसर, तेथे असलेल्या सोई सुविधा, रूम्स पाहून आपल्या मित्रांसाठी अतिशय सुयोग्य रिसॉर्ट आहे याची खात्री झाली. येथील वातावरण, अंबियन्स आणि जेवण याची पडताळणी केली होती. रिसॉर्टचे मालक प्रवीण भोजने यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्याच वेळी शरदने आगाऊ रक्कम देऊन रिसॉर्ट बुकिंग केले.
बुधवारी, सात जुलैला, कोणी कुठच्या गाडीतून यायचे याची खबरदारी शरदने घेतली होती. सकाळी बरोबर साडेसहा वाजता दिलीप काळे गाडी घेऊन माझ्या हजर घरी हजर झाला. कुणाल दादरला तयारच होता. रामकृष्ण मुतालिकला मुलाने कुणालच्या दारात सोडले. दोघांना गाडीत घेतले. जीवन गौड सायन नाक्यावर भेटला आणि सुरू झाली स्वप्नवत सफर...
शाळेत एका बेंच वर बसणारे रामकृष्ण आणि जीवन  तब्बल  ४७ वर्षांनी एकमेकांना भेटले होते... एकमेकांना कडकडून भेटतांना त्यांना शाळेतील त्या बेंचची आठवण झाली होती...

दिलीप काळे एक गहन व्यक्तिमत्व.... शाळेत गाडीने येणारा दिलीप रस्ते माहीत नाहीत; अशा पद्धतीने गाडी चालवत होता. डाव्या बाजूला वळू की उजव्या बाजूला असा घोषा करणाऱ्या दिलीपची नस आणि नस कुणाल जाणून होता. त्यामुळे त्याच्या रस्त्याबाबतच्या प्रश्नांना कुणाल काहीच उत्तरे देत नव्हता. त्याने मला बळीचा बकरा बनविला होता.

दिलीप साठी CNG पेट्रोल पंप शोधत होतो. पनवेल जवळ पंपाला वळसा मारताना, तंदुरी चहाची टपरी लागली... कुल्हड मधली चरचरलेली तंदुरी चहा पिऊन मित्रांसोबतच्या सफरीचा आनंद भन्नाट झाला.
 वक्तशीर शरद, "कुठपर्यंत पोहोचलात" असे सर्वांचे मॉनिटरींग करत होता. मुंबई पुणे जुन्या हायवेवरून CNG शोधत मार्गक्रमण केल्यामुळे बाकीच्या तीन गाड्या एक्सप्रेस वे वरून पुढे निघून गेल्या होत्या. शेडुंग टोल प्लाझा जवळ आम्ही सर्वजण एकत्र आलो. सर्वांच्या गळाभेटी झाल्या. मित्र भेटीचा आनंद अपरिमित असतो याचा प्रत्यय आला...  सर्वांना एकत्र आणण्याचा सर्वात मोठा वाटा शरदचा होता.

दहिवली गावात अंडी घेऊन सर्व लवाजमा रिसॉर्ट वर पोहोचला. हिरवळीने नटलेल्या कर्जत मुरबाड रस्ताच्या चोहीकडे सह्याद्रीच्या पर्वत रांगा, झाडे वेली फुलांनी डवरल्या होत्या.  निर्जन रस्त्यावरून निवांतपणे जाताना, गाडीच्या काचा उघडून स्वच्छंदीपणे बागडणाऱ्या प्राणवायूला छातीत भरून घेत होतो... वाऱ्याची झुळूक आणि पक्षांच्या किलबिलाटाचे संगीत मनात आनंदाच्या तारा छेडीत होत्या.. निसर्गाची साथ आणि मित्रांची बात सफरीची रंगत वाढवीत होती.
या सहलीमध्ये माझे शाळकरी मित्र रामकृष्ण मुतालिक, कुणाल ठाकूर, दिलीप काळे, माधव केळकर, नागेश सोपरकर, विकास होशिंग, शरद पाटील, नरेंद्र मोहिते, अजित तोडणकर, अशोक वारीक, दिनेश नाडकर्णी, जीवन गौड, कैलास गौड, संजय कोळवनकर,निशिकांत क्षिरे,सतीश कामेरकर, प्रमोद दातार  हे सामील झाले होते.
 
नागेश सोपरकर, प्रमोद दातार, निशिकांत क्षिरे, जीवन गौड आज ४७ वर्षानंतर भेटले होते. त्यांचा शाळेतील चेहरा आणि आताचा चेहरा यात काहीच बदल झालेला नव्हता. 
शांती रिव्हर व्हीव रिसॉर्ट वर ठरल्याप्रमाणे सकाळी दहा वाजता पोहोचलो. रेस्टरन्ट मध्ये सर्व स्थानापन्न झाले. आणि सुरू झाला एकमेकांच्या भेटीचा कार्यक्रम...

 योग जुळुनी आला  आपल्या सर्व मित्र भेटीचा,

खरंच आहे केवढा  क्षण हा आनंदाचा...

असेच पुन्हा पुन्हा वाटे सर्व मित्र भेटू,

देऊ घेऊ आनंद  सुख दुःख आपसात वाटू ...

जपू मनातून हे  खऱ्या मैत्रिचं नातं

कृष्णसुदामा जरी  नसले कलीयुगात..

मैत्रीचे हे बंध  सारे जपून ठेवू..  

असेच भेटूनी नाचत गात राहू

पटतंय आणि जमतंय का  तुम्हीच बघा,

भेटीगाठी व्हाव्यात  हृदयात हवी जागा...

जीवनाच्या या वळणावर  पुन्हा पुन्हा भेटून घेऊ

आठवणी आणि आनंद  चिरकाल साठवून ठेऊ...

डोळे  आले  भरून  ... 

 मैत्रीचा महापूर पाहून...

आनंदाच्या अश्रूंना पारावार राहिला नव्हता...

जीवनातल्या  घडीला  आसमंत लहान होता...

हीच प्रार्थना जगंनियंत्याला ....

दे आरोग्यदायी दीर्घायुष्य मित्र जगताला...

फक्त मैत्रीसाठी..... आणि मित्रांसाठी...

माझे सर्वस्व अर्पण त्यांच्या भेटीगाठी साठी...

जीवन आणि रामकृष्ण एका कोपऱ्यात गप्पा मारत बसले होते... तर प्रमोद आणि निशिकांत बँक ऑफ इंडिया मधून सेवानिवृत्त झाले तरी बँकेला कवटाळून बसले होते...

शरदच्या आवाहनाप्रमाणे प्रत्येक जण निळे कपडे घालून आले होते... त्यामुळे शाळेतील गणवेशाची आठवण झाली. विशेष म्हणजे सर्वांनी ड्रेसकोड पाळला होता.  निळा टीशर्ट  घातलेली खूप मंडळी होती. त्या निळ्या रंगाच्या सुद्धा खूप वेगवेगळ्या छटा होत्या. हसतमुख प्रमोद दातारचा टीशर्ट खूपच ढगळ होता. 
आज सतीश कामेरकर फुल्ल फॉर्म मध्ये होता.  वारं प्यालेल्या वारू सारखी त्याची गत झाली होती. त्याच्या कॉलेज मधील पहिल्या प्रेमाची कशी खांडोळी झाली, तो किस्सा अप्रतिमच...

बुलेट रायडर दिनेश नाडकर्णी सुद्धा भरभरून बोलत होता... शाळेतील हॉस्टेलचे लाईफ आणि  मुलामुलींशी केलेली दंगामस्ती सांगताना त्याचे पांढरे गोबरे गाल लालेलाल झाले होते. 

बोटींचा बादशाह कुणाल ठाकूर बोलायला लागला की फक्त ऐकत राहावे... त्याचे बोटीवरचे किस्से... रबराच्या बायका... वेगवेगळ्या देशात केलेली धमाल.. समुद्री चाचे... या  अनुभवाचा खजिनाच तो आम्हाला भरभरून देत होता...

कंदापोहे आणि उपमा, सोबत आमलेट पावाचा नास्ता झाल्यावर सर्वांनी रूम कडे प्रस्थान केले. जाताजाता रेस्टोरंटच्या पायरीवर सर्वांचा गृप फोटो काढला. 

आता सुरू झाली स्वीमिंग पूल वरची मस्ती... मिस्कील कैलास गौड... प्रत्येकाला शब्दांच्या दातांनी चावत होता.  कैलास बरोबर जीवन, कुणाल, दिनेश, दिलीप, नागेश, अशोक, विकास, संजय पोहायला  तलावात उतरले होते.  डुंबत असताना सुद्धा कुणालचे किस्से सुरू होते. मग सुरू झाली मैफिल डीजे वर नाचण्याची... सतीश कामेरकर एकदम जोशात होता. दिनेश आणि सतीशची नाचण्याची जुगलबंदी सुरू झाली.
त्यांच्या बरोबर विकास, नरेंद्र,  माधव सुद्धा डान्स मध्ये सामील झाले. नाचता नाचता विकास तलावाच्या एकदम किनाऱ्यावर गेला, त्याला म्हणालो, "विकास पाण्यात पडलास तर चालेल, मोबाईल पडता कामा नये". सतीश कामेरकरने तलावात उडी मारली आणि पाण्यातच एका पायावर डान्स करू लागला.  आमचाच गृप असल्यामुळे तलावाच्या काठावर सुद्धा मदिरा आणि चकण्या आस्वाद माझे सवंगडी घेत होते. 

 शरद पाण्याच्या घसरगुंडीवर चढून फोटोग्राफी करत होता. प्रमोद, रामकृष्ण आणि निशिकांत खुर्च्यात बसून संपूर्ण वातावरणाचा तसेच बालपणात गेलेल्या  मित्रांच्या अवखळपणाचा आनंद लुटत होते. 

शब्दांच्या पलीकडलं,  नातं असं मैत्रीचं

जरी नसे रक्ताचं,  आहे मात्र खात्रीचं

शब्दांतही बांधता न येणारं, फुलांसारख दरवळणारं

एकमेकांना समजणारं, नातं असं मैत्रीचं...

मैत्रीचं नातं हे इतर नात्यांपेक्षा खरोखर वेगळ असतं. आम्ही सर्व शाळकरी मित्र १९७४ नंतर नव्यानं  एकमेकांच्या जवळ आलो होतो. म्हणूनच मधल्या काळातील प्रत्येकाच्या जीवनात झालेल्या घडामोडींचे कथन आम्ही ऐकणार होतो सांगणार होतो. या शाळकरी मैत्रीचा योग जुळून आला तो शरद पाटीलच्या अथक प्रयत्नामुळे... आणि म्हणूनच दिनेश सतत म्हणत होता... *शरद शतशः प्रणाम*  तर अशोकने ऑडिशन दिली, "दोन सतीश, शरद शतशः प्रणाम" 

या कार्यक्रमाच्या औचित्याने अशोक वारीकने मदीरेचा प्रश्न सोडवला होता, तर चकणा आणि पाणी याची जबाबदारी कुणालने ठाकुरने स्वीकारली होती.  बीअर अजित तोडणकरने स्पॉन्सर केली होती... माधव केळकर स्वतःचा ब्रँड ओल्ड मंक रम घेऊन आला होता. फक्त सतीश कामेरकरसाठी काजू मात्र आणता आले नाहीत... परंतु शेंगदाण्याने त्याचा प्रश्न सोडवला होता.
SSC ला शाळेत पहिला आलेला नागेश आणि
आता सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेला आणि रोटरी क्लबचा अध्यक्ष असलेला नागेश सोपारकर, हा जीवनप्रवास नागेशने खुमासदार पद्धतीने सांगितला... सेक्स बद्दल त्याची परखड मते एकदम भावली... त्याचा एकच मतितार्थ होता...तारुण्य मनात असत, मग ते शरीरात पसरत.... उगाच नाही म्हणत... पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा...

मितभाषी रामकृष्ण मुतालिक जीवनप्रवासात खुपच सकारात्मक भासला... त्याच्या मंद स्मितामध्ये आपुलकीचा भाव जाणवला... 

जीवन गौडच्या पोलिसी जीवनातील एक गोष्ट जाणवली तो म्हणजे पोलिसीखाक्या त्याच्याकडे अजिबात नाही. पोलीसा मधील माणुसकी असलेला माणूस आमचा मित्र आहे याचा खूप आनंद झाला. 
स्विमिंग पुलावर कुणालचे किस्से पुन्हा चालू झाले. कुणालच्या अनुभवाच्या बोलण्यातील तडफ आणि  सच्चेपणा पटकन जाणवतो. बोटीवरील खडतर जीवनाची खूप जवळून ओळख झाली...

कैलास गौडच्या खोड्या काढणे चालूच होते... शाळेत असताना पट्टीचा पोहणारा कैलास... सांसारिक भवसागर सुद्धा सहज पार करून गेला आहे... मधल्या काळात मरणाच्या दारातून परत आलेल्या कैलासने आता स्वतःच्या तब्बेतीची काळजी करणे आवश्यक आहे.  कैलास... तुझासारखी माणसे मित्रपरिवारासोबत समाजाचे सुद्धा भूषण असतात... त्यामुळे तुझे दीर्घायुष्य सर्वांच्या भल्यासाठी आहे... पण तू दीर्घायुषी होणे, हे निव्वळ आणि निव्वळ तुझाच हातात आहे... तू डॉक्टर आहेस... त्यामुळे तुला सर्व कळते...
दुपारी सामिष जेवण झाले... सर्वजण रूमवर आले.  अशोक, शरद, कुणाल, विकास, प्रमोद यांनी झोपाळ्यावर बसून गप्पांची मैफिल सुरू केली... त्यात नंतर दिनेश, कैलास, दिलीप झाले. 

सहा वाजता शरदची वर्दी आली आता पळसदरीच्या बॅक वॉटर ओढ्याकडे जायचे आहे. या नाल्यात एक जर्मन शेफर्ड मस्त डुंबत होता... सर्वांना एकत्र आणून येथे सुद्धा फोटो सेशन झाले. पाऊस सुरू झाला आणि या नितांत सुंदर वातावरणात गाण्यांची मैफिल सुरू झाली. दिनेश, संजय आणि सतीश यांनी बहारदार गाणी सादर केली. खरच... निसर्ग रम्य वातावरणात दोस्तांची साथ जेव्हा असते... तेव्हाच  सुखाची परिभाषा कळते... तेथील कठड्यावर बसून चुटकुले, गप्पा आणि गाणी या मध्ये तासाभराचा वेळ कसा गेला कळलेच नाही.
संजयचे, " बेचैन करुनी अशी जाऊ नको" हे गाणे भाव खाऊन गेले.
आता संध्याकाळचे सेशन रेस्टॉरंट मध्ये सुरू झाले. येथेसुद्धा दिनेश नाडकर्णी फुल फॉर्म मध्ये होता... कुणाल बोलत असताना, दिनेश त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत होता... ज्याला जे हवे ते पेय येथे उपलब्ध होते..  नागेश ग्रीन सलाड चा भोक्ता होता. जीवनने पेरू आणि आंबा ज्यूस आणले होते, मदिरा प्राशन न करणाऱ्यांसाठी...   कुणालने आणलेले वेफर्स चणा डाळ मूग डाळ सर्वांना सर्व केली. आता हिरीरीने प्रत्येक जण गप्पात सामील होत होता.  कुणालाच्या बोटीवरील गोष्टी ऐकून दिनेश चेकाळला होता. सहा महिने घरदारापासून लांब बोटीवर राहणे किती खडतर असते हे समजले. गप्पांच्या ओघात संजयच्या कवितांचा कार्यक्रम राहूनच गेला. 

दुसऱ्या दिवशी सकाळीच रेस्टॉरंट किचन मध्ये जाऊन कडक चहा बनविला. मित्रांसाठी काय पण... त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद माझ्या साठी ऊर्जा होती.

नाश्त्याला मिसळ आणि भुर्जी पावचा बेत होता... निवांत नास्ता झाल्यावर पुन्हा पोहोण्याच्या तलावावर सर्वांचे आगमन झाले. आजचा दिवस संजय कोळवनकरचा होता... त्याची संघर्षमय जिवनगाथा ऐकताना मनोमन त्याच्या कर्तृत्वाला साष्टांग दंडवत घातला... संजयची गाथा ऐकून कैलास सुद्धा खूपच प्रभावित झाला होता. कामगारांच्या उन्नतीसाठी आणि समाजसेवेसाठी समर्पित असलेले संजयचे व्यक्तिमत्व, तसेच त्याची झालेली जडणघडण सर्वांना अवगत होण्यासाठी त्याची बायोपिक बनविण्याचे कैलासने ठरविले आहे. एकसे बढकर एक अशी व्यक्तिमत्वे मित्रांच्या रूपाने माझ्या जीवनात आहेत याचा मला खूप अभिमान आहे.
दुपारी सामिष जेवण होते. संजय, विकास यांना लवकर जाण्याची घाई होती. त्यामुळे दोन गाड्या पुढे निघाल्या... माधव  नवीन गाडी घेणार होता म्हणून तो सुद्धा लवकर निघाला. बाकी आम्ही निवांत होतो. हॉटेल मालक प्रविणने उरलेल्या सर्वांना कॉफी पाजली. 

या मित्रभेट कार्यक्रमाला न आलेले माझे सवंगडी प्रकाश परांजपे, अशोक परब, सतीश जोशी, अजय हर्डीकर, केशव रेडकर, मकरंद चव्हाण, रवींद्र चुरी, संजीव पणशीकर, शरद शिंदे, शिरीष देसाई,सुहास राऊत, विजय गवाणकर, अरुण देसाई, शरद राणे, उमेश नाडकर्णी या सर्व मित्रांना खूप मिस केले होते. 

सर्वांच्या भेटी झाल्यामुळे आनंदाला पारावार राहिला नव्हता. 

आज माझी गत, " अजी सोनियाचा दिनु, वर्षे अमृताचा धनु " अशी झाली होती. 
सर्व मित्रांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि  सकारात्मक ऊर्जा घेऊन घरी परतलो. ही ऊर्जा मला लेह सायकलिंग साठी कामाला येणार आहे...

सतीश जाधव
मुक्त पाखरे.....

Sunday, June 13, 2021

ऋणानुबंध राईड... १३ जून २०२१

ऋणानुबंध राईड... १३ जून २०२१

ठाण्याला सायकल राईड करत जाणे आता परिपाठ झाला आहे. छोटसं कारण ही ठाण्याला जायला पुरते. सायकलचा तुटलेला स्पोक बदलण्यासाठी उद्या राईड करायचे ठरविले.

मग परममित्र डॉ. राजेश कांबळेला भेटायचे पण नक्की केले. समर्पयामिची नवीन सायकल शॉपी आता उपवन जवळ उघडल्यामुळे सोईचे झाले होते. सायकलची बारीक सारीक कामे या शॉपीवर करणे सोपे झाले होते. 

सकाळी सहा वाजता लोअर परेल वरून राईड सुरू केली. रस्ता ओला होता. नुकताच पाऊस पडून गेला होता. ओल्या  रस्त्यामुळे लो गियरवर सायकल मार्गक्रमण करत  होती.
         एकटे राईड करणे म्हणजे तल्लीनता असते. सकाळच्या वातावरणात जुकबॉक्सवर किशोरजींचे "जीवन से भरी तेरी आँखे" हे अतिशय आवडणारे गाणे लागले होते. या गाण्यातील अंतऱ्यात आलेली  "रंगो  छंदोमे समायेगी किस तरह से इतनी सुंदरता" ही ओळ अंतर्मुख करून गेली... विचारांचे वारू चौखूर उधळले.
         
 "निसर्गाचे अनंत रंग आपल्या डोळ्यात सामावू शकत नाहीत, एव्हढा प्रचंड आनंद या सृष्टीत सामावला आहे". फक्त आणि फक्त निसर्गावरचे प्रेमच या आनंदाला जवळ आणू शकते.... असेच काहीसे विचार मन पटलावर तरळत होते. एकांतातली हीच तल्लीनता जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचे आणि प्रत्येक प्रसंगाला सामोरे जायचे  सामर्थ्य देत होते.

गाण्याच्या धुंदीत आणि पहाट वाऱ्याच्या मस्तीत राईड सुरू होती. पाखरांचा पूर्वेकडे झेप घेणारा थवा   किरणांच्या साथीने भविष्याचा वेध घेत होता. 

दीड तासात समर्पयामिच्या उपवन मधील नवीन शॉपीमधे पोहोचलो. कॅडबरी जंक्शनच्या पुढे राजेशची भेट झाली. 

आज रविवार म्हणजे सायकलिस्ट मित्रांच्या भेटीचा दिवस... प्रथम हसतमुख  बलजीत आला. त्याचा खास मित्र नटखट ब्रिजेशने आज सुट्टी घेतली होती. पाठोपाठ प्रविणकुमार आले. सायकलिंगमुळे खूपच स्लिम ट्रिम झाले होते. त्यांची झुबकेदार मिशी भारदस्त आहे. उत्सवमूर्ती यशवंत जाधव आले.  बलजीत आणि प्रवीण कुमार यांना लवकर निघायचे असल्यामुळे समर्पयामिच्या लोकेशनवर फोटो सेशन झाले. 

इतक्यात फ्रिलांस सायकलिस्ट अनिल वामोरकर यांची एन्ट्री झाली. संयमी पण बोलकं व्यक्तिमत्व मनाला भावलं. "तुम्हीच जाधव काय !!!" "तुमचे ब्लॉग वाचतो, खुप आनंद झाला तुम्हाला भेटून" ही त्यांची पहिली प्रतिक्रिया... 

मिस्कील आणि भारदस्त अडव्होकेट अंबर जोशी आला.  अंबर म्हणजे हास्याचा खजिना आहे. तो बोलायला लागला की आपण फक्त ऐकत राहायचे. कोर्टात तो प्लास्टिकच्या खुर्चीतुन कसा पडला, याचे बहारदार वर्णन अंबरने केले. स्वतःवर विनोद करण्याचे कसब त्याच्या कडून शिकावे. जो स्वतःवर विनोद करतो, तो सर्वांना प्रिय असतो. निरंजन कार मधून आला. आज तो घाईत दिसत होता. 

चैतन्यमयी सिद्धार्थ बागाव नवीन सायकलसह शॉपीवर आला.
  नवीन सायकल बद्दल भरभरून बोलत होता. आम्ही बोलत असताना हिरेन पटापट सायकलची कामे करत होता. तो खरं तर सायकलचा डॉक्टर आहे. राजेशला काहीतरी काम असल्यामुळे तो घरी निघाला. 

सिध्दार्थच्या मनात नवीन सायकल बद्दल ट्रीट द्यायचे होते. आणि आडनाव बंधु यशवंत जाधव मला न्याहरी दिल्याशिवाय सोडणार नव्हते.

नौपड्यातील गोखले उपहारगृहामध्ये मिसळपावचा स्वाद चाखायला आलो. येथे बसण्याची व्यवस्था होती. आजची ट्रीट सिद्धार्थने दिली. या उपहार गृहामागेच अनिल राहतात. 

मिसळ आणि तर्रीचा स्वाद घेताना, "छोटे छोटे आनंदाचे क्षण आपण वेचले पाहिजेत", यशवंत जाधव चटकन बोलून गेले. खरं आहे, या आनंदाच्या छोट्या छोट्या क्षणातून आपण समृद्ध होतो.  सायकलिंगच्या आनंदामुळे नवनवीन मित्रांचा खजिना वाढत आहे.  जुन्या मित्रांची नव्याने वेगळी ओळख होत आहे.  नवीन विषय आणि विचारांची देवाण घेवाण यामुळेच जीवन समृद्ध होत जाते.

गोखल्यांच्या मिठाईच्या दुकानातून मुगाचा साजूक तुपातील शिरा घेतला. तेथून केशव वडा टी सेंटर मध्ये आलो. येथील चहा एव्हढा फर्मास होता की दोन कप चहा पिण्याचा मोह आवरता आला नाही. 

पुन्हा भेटण्याचे आश्वासन देऊन सर्वांचा निरोप घेतला. मिसळ आणि चहाचा स्वाद मुखात घोळवत परतीचा प्रवास सुरु झाला.

काहीतरी ऋणानुबंध असल्यामुळेच असे प्रिय मित्र माझ्या जीवनात आले आहेत.


सतीश जाधव
मुक्त पाखरे...

धुंद पावसाळी राईड१०, ११ जून २०२१

धुंद पावसाळी राईड
१०, ११ जून २०२१

धुवादार पावसात राईड करूया काय? संजयचा मेसेज आला. नऊ ते बारा जून दरम्यान मुंबई आणि आसपासच्या भागात धुवाधार पाऊस पडणार आहे, असे वेधशाळेने जाहीर केले होते. याचा संधीचा फायदा घेऊन पावसात खंडाळा सायकल सफर करण्याचे ठरले...

आज सकाळी साडेपाच वाजता सायकल राईड सुरू झाली. सकाळी जोरदार पाऊस सुरू झाला होता. सुरुवातीलाच पावसात भिजणे, एकदम अंगावर येते. त्यामुळेच पोंचू घालून पावसाची तमा न बाळगता पेडलिंग सुरू केले. पावसामुळे रस्त्याला अंधार होता. संततधारेमुळे चष्म्यावर पडणारे टप टप थेंब रस्ता दिसेनासा करीत होते. परेल हिंदमाता जवळ पाणी तुंबायला नुकतीच सुरुवात झाली होती. संजयने सुद्धा दहिसर वरून सायकलिंग सुरू केली होती. 

आज पावसाचा आवेश काही वेगळाच होता. दादर चित्रा सिनेमा जवळील पुलाखालून जाताना; पुलावरून मोठी बस गेल्यामुळे पाण्याचा प्रचंड झोत धाडकन डोक्यावर कोसळला. सायकल सकट होलपटलो. MTB सायकल असल्यामुळे पटकन सावरलो. अंगात पॉंचू असून सुद्धा नखशिखान्त भिजलो होतो. पाऊस सतत पडत असल्यामुळे सायकलचा वेग अतिशय कमी झाला होता. 

"आता थांबायचं नाही गड्या"...  "जिद्दीने पेडल करत रहायचं.." हे मनाला समजावले...  आलेल्या परिस्थितीला सामोरे जायचे... तेव्हाच आनंदाची आगळी वेगळी सकाळ प्रकाशमान होणार होती. तब्बल दिड तास लागला वाशी स्टेशन जवळील हायवेला पोहोचायला. वाशी उड्डाण पुलाखाली तुतारी वाजविणाऱ्या मावळ्याचा पुतळा होता.मावळा खरच तुतारी वाजवून माझे स्वागत करीत होता. संजय घाटकोपर पर्यंत पोहोचला होता. आम्ही दोघे पनवेलच्या पुढे दत्त स्नॅक्स हॉटेल जवळ भेटण्याचे ठरविले होते.
 आता जलधारांनी थोडी उसंत घेतली होती. त्यामुळे पुढची सफर पामबीच रोड वरून सुरू केली. पामबीच म्हणजे सायकलिस्ट मंडळींचे अतिशय आवडते ठिकाण... पण गम्मत म्हणजे पामबीच मार्गे नवी मुंबई महापालिके पर्यंत एकही सायकलिस्ट दिसला नाही. 

बेलापूर हायवेला आल्यावर गाड्याच्या रहदारीत सायकलिंग सुरू झाली. पॉंचू काढून आता हिरवा फ्लुरोसंट विंडचिटर घातला. पाऊस थांबला तरी नभात काळ्या ढगांनी दाटी केली होती. बाजूने जाणाऱ्या गाड्या स्प्रे सारखे पाण्याचे तुषार अंगावर उडवत होते. हा तर जमिनीवरून अंगावर कोसळणारा पाऊस होता. खांदेश्वर गाव आले आणि पुन्हा पाऊस सुरू झाला. चोही बाजूनी जलधारांनी माझ्या भोवती फेर धरला होता. थेंब अन् थेंब जणू मित्रच वाटत होता. खरं तर पावसात भिजायचे कारण हवे होते. या निसर्गानेच चैतन्याचे धडे शिकविले होते.  या धुंद पावसात रममाण होत मुंबई गोवा हायवेच्या सुरवातीला असलेल्या  दत्त स्नॅक्स कॉर्नरला पोहोचलो. 

पंधरा मिनिटात संजय तेथे पोहोचला. चरचरीत भूक लागली होती. खमंग कांदा भजी आणि वडापाव वर ताव मारला. सोबत आणलेला सुकामेवा साथीला होताच.

 आता सुरू झाली मैत्रीची राईड... नर्मदा परिक्रमा केल्या नंतर आज पुन्हा एकदा आम्ही दोघे एकमेकांच्या संगतीत तुडुंब राईड करणार होतो. पाऊस पुन्हा बरसतोय...  अशा वेळी मित्राचा सहवास लाभतोय...  कोन गावाजवळ एक्सप्रेस वे ला जुना हायवे क्रॉस करतो, त्या ब्रिजवर थांबलो आणि सरळ रेषेत जाणाऱ्या एक्सप्रेस वे चे दर्शन घेतले. दूरवर डोंगरांच्या कपारीत रस्ता गडप झाला होता. तेथे नभ काळ्या मेघांनी झाकोळले होते. ढगांचे डोंगरांशी मिलन झाल्याचे अप्रतिम दृश्य डोळ्यात साठवत होतो.

खोपोलीकडे राईड सुरू झाली आणि गेल्या वर्षी केलेली एकविरा देवी राईड आठवली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरलेले गर्द गहिरे हिरवे रान... हरवून जाई धुंद मनाचे भान... अशी स्थिती झाली होती. रसायनी बस स्टँड जवळ आलो. तेथे पुणे १०० किमी मैलाचा दगड लागला.
तेथे फोटो काढला आणि मित्रांना पोष्ट केला.  काय आश्चर्य शरदचा मेसेज आला... तुम्ही नक्की कुठे चालला आहात... मुंबई कन्याकुमारी सायकलिंग करताना याच मार्गाने बंगलोर लागले होते त्याची आठवण झाली. 

पुढे मार्गक्रमण करत असताना विने गावाजवळील निशीलँड पार्क मध्ये एक खरेखुरे विमान ठेवले होते. विमानाच्या लोकेशनवर फोटो काढले. हिरवळीच्या जंगलात उतरलेले विमान सायकल पुढे खुजे वाटत होते. मुंबई पुणे जुना हायवे चारपदरी मार्ग अतिशय सुस्थितीत होता. दोन्ही बाजूला हिरवळ आणि  तरारलेल्या झाडांच्या मधून नागमोडी सायकलिंग मनाच्या डोहात शांतीचे तरंग उमटवित होते. 

"आनंदाचे डोही आनंद तरंग" या तल्लीनते मध्ये महडच्या वरदविनायक गणेश मंदिराकडे आलो. मंदिर बंद असल्यामुळे, बाप्पाचे दर्शन बाहेरून घेतले. मंदिराच्या जवळच राहण्याची सोय आहे, हे समजल्यावर हुरूप आला. खंडाळ्याला राहण्याची सोय झाली नाही तर महडला यायचे ठरविले.  आता खंडाळ्याच्या घाट चढण्याचे नक्की केले. 

भूक लागली होती पण जेवल्यावर घाट चढणे कठीण झाले असते म्हणून खोपोलीच्या अलीकडे हाल गावाजवळ अननसाचा टेम्पो उभा होता. त्याच्या कडून एक रसरशीत अननस घेतले. सुकामेवा खाऊन सुरू झाली चढाई खंडाळ्याच्या घाटाची...  या घाटाला बोरघाट पण म्हणतात. अतिशय कठीण घाट म्हणून याची ख्याती होती. परंतु एक्सप्रेस वे झाल्यामुळे या घाटाची रहदारी कमी झाली आहे. तसेच रुंद केलेल्या रस्त्यामुळे अपघात सुद्धा कमी झाले आहेत.

 अतिशय बाकदार वळणे आणि उभ्या चढाईचा खंडाळ्याचा रस्ता भल्या भल्या सायकलिस्ट मंडळींना जेरीस आणतो. म्हणूनच लेह लढाखची पूर्व तयारी म्हणून भर पावसात खंडाळा चढायचे ठरविले होते. 

नव्या ऊर्जेने चढाई सुरू केली. पाऊस थांबला तरी आकाश ढगाळ होते. आता जलधाराशिवाय अंग घामाने चिंब झाले होते. शिंगरोबा मंदिराकडे पोहोचलो आणि देवाला प्रसाद दाखवून रसरशीत अननसाचा फडशा पडला. मस्तपैकी तासभर हायड्रेशन ब्रेक घेतला. आता सुरू झाली अमृतांजन पुलाकडे चढाई. 

घाटात पुढे धबधबा लागला. दोघेही घुसलो पाण्यात आणि जी धम्माल केली त्याला तोड नाही. निव्वळ आम्ही दोघेच डुंबत होतो. चहा घेऊन अमृतांजन ब्रिजकडे प्रस्थान केले.  ढगात दडलेल्या नागफणी  कड्याचे (ड्युक्स नोज) दर्शन झाले. निळ्याभोर आकाशावर पांढऱ्याफेक ढगांचा शिडकावा त्या कॅनव्हासवर नागफणीचा डोंगर, हे निसर्ग चित्र पाहिल्यावर भान हरपून गेले.फोटो काढण्याची आता आमची चढाओढ लागली.

आता शेवटचा चढ सुरू झाला. "खंडाळ्याच्या घाटात हवा थंडगार" हे गाण्याचे बोल आठवले. या थंडगार हवेतून पुरेपूर प्राणवायू नसानसात भरून घेतला. त्यामुळे हा चढ सहजपणे चढून गेलो. राजमाची व्हीव पॉईंटकडे आलो. या टप्यावर निसर्गाचे बहारदार रूप डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करू लागलो. दूरवर डोंगराच्या माथ्यावरून कोसळणारा धबधबा पायथ्याला हिरवळीत गडप झाला होता. पुढे नागमोडी धावत जाणारा ओहळ लहान बालकासारखा अवखळ झाला होता. भान हरपून गेले. 

येथून खंडाळा गावात आलो. येथेच मुंबई बँकेच्या स्वप्नपूर्ती विश्रामधाम मध्ये राहायची सोय संजयमुळे झाली... ते पण रात्रीच्या जेवणासह. संध्याकाळच्या प्रहरी पाऊस सुरू झाला... संपूर्ण कॉटेज परिसर धुक्याने भरून गेला. येणारा प्रकाश सुद्धा धुक्यात हरवला होता. जेवणाच्या अगोदर खंडाळ्याचा एक फेरफटका मारला. तलावावर जाऊन पावसांच्या तुषारासह थंड वारे अंगावर घेतले. 

 तलावात उमटलेले तरंग आणि संधीप्रकाशात लाभलेला शांत एकांत, सोबत मित्राचा संग... आणखी काय हवे असते जीवन अंतरंगाचा ठाव घेण्यासाठी....

भरपेट नास्ता करून दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता परतीचा प्रवास सुरु झाला.
आता वेगाला मागे टाकत सुसाटत मुंबईकडे निघालो होतो. पाऊस पाठशिवणीचा खेळ खेळत होता... हिरवे प्लुरोसंट विंडचिटर घातल्यामुळे खूप सुरक्षित वाटत होते. तसेच पावसाळी सायकलिंग सँडल्सवर करणे खूप सुखकारक आहे, याचा प्रत्यय आला.  वाटेत अमृतांजन पुलाजवळ मयुरेश पॉईंट लागला. याच ठिकाणी समर्पयामिच्या मयुरेशने टि शर्ट काढून डान्स केला होता.

  तीन ठिकाणी हायड्रेशन ब्रेक घेतले.  वाशी गावात केळी खाल्ली. संजयने मानखुर्दवरून दहिसरला जाण्यासाठी घाटकोपर कडे प्रस्थान केले.
  
    पावसात तुडुंब भिजत २१० किमी राईड दोन दिवसात पूर्ण झाली. विशेष म्हणजे अवघड खंडाळ्याचा घाट सहज पार करत... हिरवटलेले डोंगर.. खळखळणारे नाले... आणि भिरभरणारे काळपट पांढरट ढग...यांच्या संगतीत दोन दिवस अविस्मरणीय झाले होते.


सतीश जाधव
मुक्त पाखरे