Friday, August 8, 2025

रेषांत उमटले शिवतेज... दि. ८ ऑगस्ट २०२५

रेषांत उमटले शिवतेज...

दि. ८ ऑगस्ट २०२५

मित्राच्या मुलाने छत्रपती शिवाजी महाराजांचे रेखाचित्र पाठविले... महाराजांचं एव्हढ सुंदर रेखाचित्र पाहून मन उचंबळून आलं… आणि डोळे तिथेच खिळून राहिले...

त्या रेषांमध्ये होतं... एका लहानग्या मनाचं शिव साम्राज्याविषयीचं प्रेम, अभिमान आणि निष्ठा...

रेखाचित्रातल्या त्या डोळ्यांत सिंहाच तेज, कपाळावर स्वराज्याचा संकल्प आणि ओठांवर अदम्य धैर्य होतं...

हिंदू स्वराज्याची बीजं जिजाऊंनी  शिवरायांच्या मनात लहानपणीच पेरली... स्वराज्याच्या या विचारांची फळं पिढ्यान्पिढ्या फुलत राहणार आहेत...

रणभूमीत वाऱ्याशी स्पर्धा करणारा... रणनीतीत शत्रुलाही चकवणारा... धाडसात पर्वताशी भिडणारा,.. आणि स्वराज्य सत्यात उतरवणारा राजा... म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज... यांच्या तलवारीत होती सिंहगर्जना...

  ज्या काळात भीतीमुळे माणसे घराबाहेर पडायला धजावत नव्हती... त्या अंधाकारमय काळात एक ओजस्वी सिंहतेज उभे राहिले... 

आई जिजाऊंच्या संस्कारातून घडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी... भवानीमातेसमोर नतमस्तक होऊन मुठभर मावळ्यांच्या निष्ठेच्या जोरावर  तलवार उचलली... अन्यायाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध... आणि हिंदू धर्मरक्षणासाठी...

सिंहगड, पुरंदर, प्रतापगड, राजगड, रायगड… हे किल्ले तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाडसाची, शौर्याची आणि दूरदर्शी युद्धनीतीची साक्ष देतात...

रणांगणात वाऱ्यासारखी चपळता... शत्रूच्या छावणीत वाघासारखी भीतीदायक छाया... राजकारणात बुद्धिबळासारखा नेमका डाव... आणि जनतेच्या हृदयात साक्षात दैवतासारखे स्थान…… ते म्हणजे स्वराज्याचे शिल्पकार... छत्रपती शिवाजी महाराज...

शब्द अपुरे आहेत छत्रपतींचे वर्णन करायला... शिवाजी महाराज हे तर मराठी अस्मितेचे तेजस्वी सूर्य आहेत...

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्म रक्षणासाठी...  तसेच श्रद्धा, संस्कृती,  सन्मान वाचवण्यासाठी आणि अन्याया विरुद्ध तलवार चालविली...

ते धर्माभिमानी होते... त्यांनी हिंदू संस्कृतीचं, मंदिरांचं, गोमातेचं आणि संतांच्या परंपरेचं रक्षण केलं...  राजधर्माचे पालन केले...

 आजही प्रत्येक भारतीयाच्या  नसानसांत शिवप्रेमाची धार आहे…

इतिहासाच्या पानांमध्ये महाराज झळकतात... आणि वर्तमानात प्रत्येक मराठी मनात धडधडत राहतात…

छत्रपती शिवाजी महाराजांना शतशः नमन...

सतीश जाधव

7977690693

आई... माझं सर्वस्व... दि. ८ ऑगस्ट २०२५

आई... माझं सर्वस्व...८ ऑगस्ट २०२५

वंदन करतो त्या माऊलीला...
जिच्या हातून आयुष्याचा पहिलं घास मिळाला...

जिच्या मांडीवर पहिलं स्वप्न पाहिलं...
जिच्या कुशीत प्रत्येक दुःख विरघळलं…

१९८५ साली तिने या जगाचा निरोप घेतला…
आज चाळीस वर्षे झाली... 

ती प्रत्यक्ष नाही... पण प्रत्येक श्वासात, प्रत्येक विचारात... तिचा सुगंध... तिचा आशिर्वाद आहे...

आज मी जो काही आहे... तो तिच्या संस्कारांचा... तिच्या त्यागाचा वारसा आहे…  

तुझी आठवण म्हणजे देवांचे पूजन...
तुझी शिकवण म्हणजे आयुष्याचं मार्गदर्शन...

🙏 शिर साष्टांग वंदन आई… 🙏

सतीश जाधव
7977690693

Thursday, August 7, 2025

*दत्ता मामा... माझे स्फूर्तीस्थान....*विलेपार्लेच्या हनुमान मार्गावरील आजची प्रसन्न सकाळ... हातात सायकल, चेहऱ्यावर समाधान, अंगावर साधा पांढरा झब्बा व पायजमा... आणि वयाच्या ८८ व्या वर्षीही चिरतरुण चेहरा... हा आहे दत्ता मामा... माझ्या आयुष्याचा मार्गदर्शक... सायकलसह जीवनशैली शिकवणारे माझे प्रेरणास्थान...१९७२ साली घोडा सायकलवरून मुंबई ते गोवा असा दमदार प्रवास करणारा मामा... त्या काळातही सायकलच्या प्रेमात होता आणि आजही आहे... त्याच्या हातून घेतली सायकलची धुरा... आणि आध्यात्मिक साधना... माझ्या सायकल वारीची प्रेरणा त्याच्यापासूनच आली आहे...दत्ता मामाचा खरा खजिना आहे ज्ञानात... मामाकडे असलेलं सगळ्यात मौल्यवान वैभव म्हणजे त्याच सखोल ज्ञान...संस्कृत व उर्दू भाषेत विशारद... सध्या गुजराती भाषेचा धांडोळा घेत आहेत... भगवतगीता हा त्यांचा श्वासच आहे... विशेष म्हणजे १६ वा अध्याय त्याला मुखोद्गत आहे... केवळ पांडित्यच नव्हे, तर त्या ज्ञानातला सखोलपणा आणि विनम्रता त्यांच्या बोलण्यातून सतत जाणवते...गृहस्थ जीवन जगतानाच त्याने वेद, उपनिषदे, भगवद्गीता, गुरुचरित्र, दासबोध यांचा गंभीर अभ्यास केला आहे... त्यांच्या डोळ्यांत एक विलक्षण चमक आहे... उत्साहाची आणि अनुभवाची...वयाच्या या टप्प्यात वृद्धाश्रमात सेवा द्यावी, अशी मामा इच्छा बाळगतो... निरोगी जगणं जगत... दुसऱ्यांची काळजी घेणं हे मामाच्या जीवनाचं साधन आहे...सायकल चालवताना... संतुलन राखा... कितीही खडतर मार्ग आला तरी चिकाटी ठेवा... आणि अंतर्मुख होऊन सायकल वारी करा... ही मामाची शिकवण... माझा श्वास झाला आहे... न थांबता साथ देणारा...मामा सायकल गुरुमंत्र देणारा ऋषी आहे... त्याच्या सहवासात दोन तास होतो... आणि सकारात्मक ऊर्जेच भंडार घेऊन घरी निघालो...माझं भाग्य आहे की असा आगळावेगळा मामा माझ्या आयुष्यात आहे. आजची ४४ किमी राईड त्यांच्या चरणी अर्पण करतो...सतीश जाधव7977690693

दत्ता मामा... माझे स्फूर्तीस्थान....

विलेपार्लेच्या हनुमान मार्गावरील आजची प्रसन्न सकाळ... हातात सायकल, चेहऱ्यावर समाधान, अंगावर साधा पांढरा झब्बा व पायजमा... आणि वयाच्या ८८ व्या वर्षीही चिरतरुण चेहरा... हा आहे दत्ता मामा...

 माझ्या आयुष्याचा  मार्गदर्शक... सायकलसह जीवनशैली शिकवणारे माझे  प्रेरणास्थान...

१९७२ साली घोडा सायकलवरून मुंबई ते गोवा असा दमदार प्रवास करणारा मामा... त्या काळातही सायकलच्या प्रेमात होता आणि आजही आहे...

 त्याच्या हातून घेतली सायकलची धुरा...  आणि आध्यात्मिक साधना... माझ्या सायकल वारीची  प्रेरणा त्याच्यापासूनच आली आहे...

दत्ता मामाचा खरा खजिना आहे ज्ञानात... मामाकडे असलेलं सगळ्यात मौल्यवान वैभव म्हणजे त्याच सखोल ज्ञान...

संस्कृत व उर्दू भाषेत विशारद... सध्या गुजराती भाषेचा धांडोळा घेत आहेत...  भगवतगीता हा त्यांचा श्वासच आहे... विशेष म्हणजे १६ वा अध्याय त्याला मुखोद्गत आहे...  
केवळ पांडित्यच नव्हे, तर त्या ज्ञानातला सखोलपणा आणि विनम्रता त्यांच्या बोलण्यातून सतत जाणवते...
गृहस्थ जीवन जगतानाच त्याने वेद, उपनिषदे, भगवद्गीता, गुरुचरित्र, दासबोध यांचा गंभीर अभ्यास केला आहे... त्यांच्या डोळ्यांत एक विलक्षण चमक आहे...  उत्साहाची आणि अनुभवाची...

वयाच्या या टप्प्यात वृद्धाश्रमात सेवा द्यावी, अशी मामा इच्छा बाळगतो...  निरोगी जगणं जगत...  दुसऱ्यांची काळजी घेणं हे मामाच्या जीवनाचं साधन आहे...

सायकल चालवताना... संतुलन राखा...  कितीही खडतर मार्ग आला तरी चिकाटी ठेवा... आणि अंतर्मुख होऊन सायकल वारी करा... ही मामाची शिकवण... माझा श्वास झाला आहे... न थांबता साथ देणारा...

मामा सायकल गुरुमंत्र देणारा ऋषी आहे... त्याच्या सहवासात दोन तास होतो...  आणि सकारात्मक ऊर्जेच भंडार घेऊन घरी निघालो...

माझं भाग्य आहे की असा आगळावेगळा मामा माझ्या आयुष्यात आहे. आजची ४४ किमी राईड  त्यांच्या चरणी अर्पण करतो...

सतीश जाधव
7977690693

मुलुंड (पूर्व) ...एक थांबा... अनेक आठवणी...*

🚴‍♂️ मुलुंड (पूर्व) ...एक थांबा... अनेक आठवणी...

पूर्व द्रुतगती महामार्गावरील मुलुंड म्हाडा कॉलनी जवळील हा साधा वाटणारा साइनबोर्ड माझ्यासाठी एक भावनिक ठेवा आहे...

इथूनच माझ्या ट्रेकिंग आणि भटकंतीला सुरुवात झाली होती... मुंबई महापालिकेतील माझ्या प्रिय सहकाऱ्यांसोबत...  पायवाटांवरून चालत चालत आयुष्याच्या अनेक वळणांवर पोहोचलो… सह्याद्रीसह अख्खा हिमालय पालथा घातला... सेवानिवृत्तीनंतर ट्रेकिंगचं रूपांतर सायकलिंगमध्ये झालं... 

आजही या ठिकाणी मुद्दाम थांबतो... कारण इथं आठवणी थांबतात... वेळ थांबतो... आणि मन गतकाळच्या सहवासात हरवून जातं…

ज्यांच्यासोबत डोंगर-दऱ्या पालथ्या घातल्या... अनेक मोहिमा पूर्ण केल्या... त्यापैकी कितीतरी मित्र आता देवाघरी गेले आहेत... पण त्यांच्या आठवणी मात्र प्रत्येक वाऱ्याच्या झुळुकीत... प्रत्येक पेडलिंगमध्ये जिवंत आहेत...

 त्यांनी घडवलं...  साथ दिली...  त्यांनीच उमज दिली... म्हणूनच माझ्या  सायकल वारीत त्यांच्या आठवणींची शिदोरी सोबत असते...

देवाघराच्या मित्रांनो... तुमच्यासारखे सहकारी लाभले... हेच माझं खरं भाग्य...

आजही मी तुमच्यासोबतच चालतोय... रस्त्यावर, आठवणीत, आणि मनाच्या खोल कप्प्यांत...


सतीश जाधव
7977690693

फॅट सायकल… एक सुखद योगायोग...

फॅट सायकल… एक सुखद योगायोग...
दि. ५ ऑगस्ट २०२५

ठाणे-मुलुंड फ्लायओव्हरवर सुप्रिय फाळे भेटला… पठ्ठ्या फॅट सायकलवरून थेट ऑफिसला चालला होता...

चेक नाका ओलांडताच सुप्रिय म्हणाला... चालवणार का फॅट सायकल...

मनात तर कित्येक दिवसांपासून फॅट सायकल चालवण्याची इच्छा दडून बसली होती… आज ती इच्छा अचानक पूर्ण होणार हे कळल्यावर खरंच... रोमांच उभे राहिले... क्षणाचाही विचार न करता होकार दिला...
सायकल सुरू केली… आणि पहिल्याच मिनिटाला लक्षात आलं... अरे, ही तर भन्नाटच आहे... जाड टायरमुळे रस्त्यावरील खड्डे-खुड्डे कुठे गायब झालेत कळलंच नाही… मुलुंड म्हाडा कॉलनीपासून ऐरोली सिग्नलपर्यंत हवेत तरंगत असल्यासारखं वाटत होतं...

सुप्रियने सायकलसह माझा फोटो काढला… म्हणालो... आता तुझी फॅट सायकल व्हायरल झाली म्हणून समज...

खरं सांगायचं तर... खूपदा मनात काही कल्पना असतात… काही गैरसमज साचून राहिलेले असतात... पण जेव्हा आपण स्वतः त्या अनुभवातून जातो, तेव्हाच उमगतं... नेमकं खरं काय आहे ते...

सुप्रिय, मनापासून धन्यवाद...

तुझ्या सायकलमुळे एक अपूर्व अनुभव गाठीशी आला…

सतीश जाधव
7977690693

आठवणीतील जिम... पॉवर हाउस...

*आठवणीतील जिम... पॉवर हाउस...*
आज दुपारी घरून मोटार सायकलने दादरला निघालो होतो... अचानक बस स्टॉप वर एक परिचित चेहरा नजरेस पडला... जिम ट्रेनर हेमंत जाधव...

 मन अगदी उल्हसित झालं... हेमंत कुठे निघालास... बसने वांद्रे कोळीवाड्यात निघालोय... पटकन म्हणालो... बस कशाला... चल, बस मोटरसायकलवर... सोडतो तुला...

लोअर परळ ते वांद्रे कोळीवाडा... वाटेत असलेल्या लाल हिरव्या सिग्नल्सपेक्षा आमच्या गप्पाच जास्त रंगल्या होत्या... 

खूप वर्षांनी भेटलो होतो... पण बोलताना क्षणभरही तुटकपणा वाटला नाही...

आता हेमंत लोअर परळच्या मथुरादास मिल कंपाउंडमधल्या फिटनेस गॅरेजमध्ये ट्रेनर आहे...

कधीकाळी दिपक सरांच्या पॉवर हाऊस जिममध्ये पर्सनल ट्रेनर होता हेमंत... पण आम्हा सर्व मित्रांना सतत मदत करायचा... हेमंत आमचा  'फिटनेस साथी' होता...

त्या जुन्या जिमच्या दिवसांच्या गप्पा निघाल्या...
विमल पोरवाल, वंदना, संजय वोरा, नेहा, राजेश दुलानी, कमलेश जैन, पांगम, राजेंद्र मसुरकर, समिधा जाधव... सगळे आठवले...

हसत हसत हेमंत म्हणाला... अपेक्षा तर आता मॅरेथॉन ट्रेनर झालीये

त्या एका हेमंतच्या भेटीतून इतकं काही आठवलं की जणू काही जिमचे सगळे  जुने मित्र पुन्हा एकत्र भेटले आहेत...

हो... हल्ली एकत्र येणं कमी झालंय… पण प्रत्येकाच्या जीवनात फिटनेस अजूनही  कार्यरत आहे...

विमल मॅरेथॉन करतोय... कमलेश आणि संजय शिवाजी पार्कमध्ये ब्रिक्स वॉकिंग करतात... राजेश योगाभ्यास करतोय... पांगम अजूनही जिममध्ये घाम गाळतोय... मी सायकल घेऊन बोकाळत फिरतोय...
फक्त संदीप झोखंडे आणि संजय टकले काय करत आहेत, ते अजून शोधायचंय...

हेमंतने प्रेमाने गप्पांदरम्यान सांगितलं... कधीतरी फिटनेस गॅरेजला ये ना... सगळ्यांना घेऊन ये...

आणि त्याच क्षणी मनात ठरवलं.... आता पुन्हा सगळ्या जिमच्या मित्रांना एकत्र आणायचच...

एक मित्र भेटतो.. तेव्हा फक्त तोच भेटत नाही... तर त्याच्यासोबत येतात सर्व मित्रांच्या खोडकर आठवणी... जुने किस्से... आणि त्या जुन्या काळचे जिवंत क्षण...

 सतीश जाधव...
7977690693

Monday, August 4, 2025

शारदाश्रम 1974 बॅच... दोस्तीचा धमाका...स्नेहसंमेलन...

शारदाश्रम 1974 बॅच... दोस्तीचा धमाका...स्नेहसंमेलन...

स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने, जागतिक मैत्री दिन रविवार दि. ३ ऑगस्ट रोजी...शारदाश्रम शाळेच्या १९७४ बॅचमधले तब्बल २६  मित्र पुन्हा एकदा एकत्र आले होते... दादर छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळील  पार्क क्लब मध्ये...

शाळा संपली, वर्ग सुटला, शिक्षण पूर्ण झालं... पण शारदाश्रमी मित्रांची मैत्री... आजही तितकीच ताजी... तितकीच हसरी... आणि तितकीच हृदयात खोलवर रुजलेली आहे... जणूकाही काळाच्या ओघात विखुरलेली पाने पुन्हा एकत्र येऊन आठवणींच्या वहीत जुन्या दिवसांचा सुगंध पेरण्यासाठी जमली होती...

कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत भावनिक ठरली...  दिवंगत मित्र संजीव पणशीकर आणि इंग्रजी शिकविणाऱ्या लाडक्या तळवलकर बाई यांना भावपूर्ण  श्रद्धांजली अर्पण केली... काही क्षण गप्पांचे सूर शांत झाले... त्यांच्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात अलगद जागा करून गेल्या...

नंतर मात्र वातावरणात पुन्हा हलकेच हास्य उमटायला सुरुवात झाली.... कुणाच्या हातात गारगार मोजिटो मॉकटेल... कुणालच्या हातात वाइनचा ग्लास...

कुणी ब्लेंडर प्राइडचा आस्वाद घेत होतं... तर कुणी केवळ गप्पांमधूनच नशा अनुभवत होते... हास्य, किस्से आणि मस्तीचा फुल्ल बार सुरू झाला होता...

विशेष म्हणजे, श्रावण महिना सुरू असतानाही चविष्ट सामिष आणि निरामिष चकण्यांचा मनसोक्त आस्वाद घेत सगळे भान विसरून गेले होते...

कुणाल ठाकूर... विकासने होशिंगने दिलेली परदेशी चॉकलेट वाटत फिरत होता... सर्वांना त्याने बनविलेली होममेड  वाइन पिण्याचा आग्रह करत होता... त्याचं प्रेम जणू त्या बाटलीत साठवलेलं होतं... तर प्रमोद दातार स्वादिष्ट मिठाई सर्वांना देत होता... 

 दिनेश नाडकर्णी... नेहमीच्या बाईक रायडर गँगची ताम्हिणी घाटाची राईड रद्द करून शाळकरी मित्रांच्या भेटीसाठी आला होता.... त्या वळणदार रस्त्यांपेक्षा अधिक साद त्याला बालमित्रांच्या आठवणींनी घातली होती... विशेष म्हणजे... त्याने बारा दिवस पाळलेला   श्रावणही आजच्या दिवशी मित्रासाठी सोडला होता...  मैत्रीसाठी पहिला घोट घेतला होता... उद्यापासून पुन्हा त्याचा श्रावण सुरू होणार होता...

या स्नेहमेळाव्याचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे जयवंत पवार, नंदन कोलासकर, सुरेश चिकणे, दयानंद आफंडकर, राजन वारंग, उदय जाधव, प्रकाश तर्फे आणि शंकर परब हे मित्र... जवळपास पन्नास वर्षांनी प्रथमच या कार्यक्रमात सर्वांना भेटायला आले  होते...  या साऱ्यांनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमात नवचैतन्य फुलवलं होतं...

परदेशात इंजिनियर म्हणून काम केलेल्या जयवंत पवारच्या डोक्यावरच टेंगूळ  सांगत होतं... तो बरंच काही उद्योग करत होता... तो म्हणाला हे टेंगूळ म्हणजे  १००० GB चे मेमरी कार्ड आहे... 

सुरेश चिकणे निवृत्त झाल्यावर प्रचंड फिरतो आहे आणि नवोदित कब्बडी संघाचे व्यवस्थापन पाहतो आहे...

BARC  मधून निवृत्त झालेला दयानंद आफंदकर सुद्धा खूप फिरतो आहे... कब्बडीपटू असलेल्या दयानंदाच्या परदेश वाऱ्यासुद्धा खूप झाल्या आहेत आणि नुकताच प्रचंड गर्दीच्या कुंभमेळ्याला सुद्धा जाऊन आला आहे...

राजन वारंग वाऱ्यावर फिरतो आहे... इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहे... शाळेतील टेक्निकल विषयामुळे त्याच्या छंदाचे रूपांतर व्यवसायात झाले आहे...

हे जूने मित्र.. आज त्यांची ५१ वर्षानंतर नव्याने ओळख झाली होती...

निशिकांत क्षिरे दररोज दीड तास योगा करतो... आणि फिरण्याची आवड जपली आहे... प्रमोद तर सावलीसारखा त्याच्या सोबत असतो... शाळेच्या एकाच बेंच वरील मित्र म्हणून दोघेही प्रख्यात होते.. बँकेत सुद्धा एकाच सेक्शन मध्ये कार्यरत होते...

शरद पाटील आज खूप खुश होता... सर्व शाळकरी मित्रांना एकत्र आणण्याचा त्याचा ध्यास आज सफल झाला होता... ग्रुप वर भेटण्याची पोस्ट टाकल्यावर शरदने सर्वांना वैयक्तिक फोन केले होते... मेसेज पाठविले होते... त्याच्या मेहनतीला आज फळ आले होते... 

सतीश कामेरकर घराला रंग काढण्यात व्यस्त होता... तर विकास होशिंग परदेशात थांबला होता... अजित तोडणकर कोर्ट कचऱ्यात अडकला होता... संजय कोळवणकर युनियनच्या कामात गुंतला होता... त्यांना खूप मिस केले...

विनायक सध्या फोटोग्राफी शिकविण्याचे क्लास घेतो आहे... उद्या त्याचा वाढदिवस आहे... त्याला अँडवान्स मध्ये सर्वांनी शुभेच्छा दिल्या...

नागेश सकाळी तीन वाजता उठल्यावर देवाला प्रार्थना करतो... आणखी मला दोन तास वाढवून देशील काय... सुखी समाधानी जीवन लाभल्याबद्दल परमेश्वराचे तो दररोज  आभार मानतो...

अजय हर्डीकरला सर्व मित्रांना भेटून खूप छान वाटत होत... हॅप्पी गो लकी अजयला सर्व मित्रांचा अभिमान आहे...

या वयात सुद्धा मकरंद चव्हाण उर्फ गिरीशची नोकरी सुरू आहे... आणि जिंदगी एन्जॉय करतो आहे...

शारदाश्रमचा उत्कृष्ट टेबल टेनिसपटू उदय जाधव आवर्जून उपस्थित झाला होता... सुधीर पवार आणि उदय ने TT मध्ये अंतर शालेय स्पर्धेत शाळेच प्रतिनिधित्व केलं होत...  उदय २०१३ मध्ये बँकेतून निवृत्त होऊन आता क्रेडिट सोसायटी चालवतो आहे... त्याचे काम सुरू आहे... आणि जीवनात खूप समाधानी आहे...

मॅरेथॉनपटू नंदन कोलासकर हा शाळेतील मित्र आहे हे पार्क हॉटेल मध्ये कळले... घाटकोपर ते मुलुंड येथील सर्विस रोडवर धावताना त्याला खूप वेळ पहिलं होते... त्याची नव्याने ओळख झाली... बेस्ट मधून इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून निवृत्त झालेला नंदन काही काळ युनियनचे काम करत होता... आता त्याच्या सक्रिय सहभागामुळे घाटकोपर येथील त्याची इमारत रीडेव्हलप झाली आहे... १५ ऑगस्ट रोजी इमारतीचा ताबा सर्व सदस्यांना मिळणार आहे... केव्हढी मोठी गोष्ट आहे ही...  कब्बडी, क्रिकेट, हॉलिबॉल मध्ये त्याने शाळेचे प्रतिनिधित्व केले होते... 

व्यावसायिक प्रकाश तर्फे याचे सुइंग मशीनचे भवानी शंकर मार्गावर दुकान आहे... आणि तो लाईफ मस्त मजेत जगतो आहे... त्याचं आयुष्य सुईंग मशीनसारखं झपाझप धावतंय...क्षणोक्षणी मैत्रीची नाती जोडतोय...  पुढेच निघालाय, थांबण्याचं नावच नाही...

दिनेश नाडकर्णी एक प्रसन्न व्यक्तिमत्व... बाईक रायडर आणि फिटनेस फ्रीक दिनेशने नुकतीच इंटरसेप्टर बुलेट वरून स्पिती व्हॅली पार केली आहे... अतिशय थ्रिलिंग सफर होती त्याची...

असे हे आगळे वेगळे आणि लाईफ एन्जॉय करणारी व्यक्तिमत्वे... माझे शाळकरी मित्र आहेत याचा खूप अभिमान आहे...

विनायक पुराणिकही पहिल्यांदाच या कार्यक्रमात सहभागी झाला होता... आणि त्याच्या मैत्रीच्या भाष्याने सर्व सुखावले होते... मैत्रीच्या  वृक्षाला तजलेदार करणाऱ्या अविस्मरणीय आठवणी आज पुन्हा एकदा मनाच्या पटलावर हळूच उमटल्या होत्या...

शाळेच्या काळाने दिलेले संस्कार, शिक्षकांनी दिलेली शिकवण आणि मिळालेली परिपक्व जीवनदृष्टी... या साऱ्यांचं प्रतिबिंब प्रत्येकाच्या देहबोलीतूनतून स्पष्ट उमटत होती...

कोणी बँकेत अधिकारी... कोणाची व्यवसायात भरारी… कोणी डॉक्टर... कोणी इंजिनियर... कोणी पोलिस अधिकारी.. कोणी CA... तर कोणी शेतकरी झाले होते... पण त्या सर्वांमागे एकच अधोरेखित भावना होती...  आम्ही शारदाश्रमी...

त्या दिवशी जुन्या आठवणी नव्याने उमलत होत्या... आणि  प्रत्येकाच्या डोळ्यात, आवाजात आणि हसण्यात नकळत खुलत होत्या...

प्रमोद दातार आणि निशिकांत क्षीरे ही जोडगोळी म्हणजे मैत्रीचा मूर्तिमंत नमुना होती... एकाच शाळेत... शारदाश्रमात शिकले... एकाच बँकेत एकच ब्रँच मध्ये नोकरी केली आणि आजही एकमेकांच्या जवळपासच राहतात... दोघांची मैत्री म्हणजे जणू जीवनभराची सहचर्यगाथा होती...

हसत हसत टपल्या मारणारा कैलास... आणि आपल्या गोड हास्याने आपलासा वाटणारा जीवन... हे बंधुद्वय  कार्यक्रमात अक्षरशः रंग भरत होते... कैलासच्या मिश्किल चिमट्यांनी सगळ्यांचं हसू थांबत नव्हतं, तर जीवनचं प्रत्येकाला भेटण्यासाठीचं उत्कट प्रेम पाहून सगळ्यांनाच शाळेतील दिवस आठवत होते..

शरद पाटीलच्या हातात कॅमेरा होता आणि तो रंगतदार क्षणांची उजळणी टिपण्यात मग्न होता... त्याच्या कॅमेऱ्यात अनेक आठवणी कायमस्वरूपी जपल्या गेल्या होत्या... 

दुसरीकडे प्रकाश परांजपे गप्पा मारण्यात रममाण झाला होता... तर मकरंद चव्हाण आपल्या शब्दांनी... प्रमोद अमृतकर, शरद पाटील आणि सतीश  यांच्या आजच्या मित्रभेटीचा कार्यक्रम जुळवून आणल्याचे कौतुक करत होता... 

शिरीष देसाईने आज कडकडीत श्रावण पाळला होता... त्याला मित्र भेटीनेच नशा आली होती...

दिलीप काळे म्हणजे अजब रसायन… सर्व काही कळतं... पण न कळल्याचा आविर्भाव करण्यात पटाईत... DSLR कॅमेऱ्याचे बटण दाबायचा पण फोटो यायचा नाही...  कारण तो बटण लॉक करायचा...  अभिनय असा करायचा की ऑस्करवाल्यांनी त्याला 'काही केलं नाही!" हा आजीवन निर्विकार अभिनय पुरस्कार द्यावा...

कुणालने अलिबागच्या आपल्या बंगल्यावर पुढचं स्नेहसंमेलन ठेवण्याची प्रेमळ ऑफर दिली... तर नागेशने 'जगायचं कसं' या विषयावर मार्मिक भाष्य करत सगळ्यांना अंतर्मुख केलं... विनायक पुराणिकने आपल्या खास शैलीत मित्रांची महती मांडून सर्वांना खुश केलं... 

अजय हर्डीकरने मला सायकलवरून घरी येण्याचं आग्रहाचं निमंत्रण दिलं... प्रमोद अमृतकरने अत्यंत संयमितपणे खाण्यापिण्याच्या ऑर्डर सांभाळून कार्यक्रमाचा सोज्वळ व्यवस्थापक ही जबाबदारी पार पाडली... थोडे उशिरा आलेले रामकृष्ण मुतालिक आणि नरेंद्र मोहिते हिरीरीने कार्यक्रमात सामील झाले होते...

तीन तास मैत्रीच्या सूरावटीत हरवलेले हे सारे चेहरे जेव्हा एका फोटोसाठी एकत्र आले... तेव्हा त्या क्षणाने शाळेच्या जुन्या वर्गासारखंच काहीसं भावविश्व उभं केलं होतं...

खानपानाच्या समारोपानंतर जेव्हा गारेगार कुल्फी आली...  ती तर गालावर हसू आणि मनात समाधान देऊन गेली...

आजचा दिवस म्हणजे शब्दशः आठवणींचा उत्सव होता... प्रत्येकाने अंतःकरणातून अनुभवला आणि आयुष्यभरासाठी जपून ठेवला... मैत्रीचे धागे अजून घट्ट झाले होते..

सर्वांनी पुन्हा भेटण्यासाठी... असे कार्यक्रम वर्षातून किमान दोन वेळा करण्याचे आश्वासन घेऊन... एकमेकांचा निरोप घेतला...

माणसाच्या आयुष्यात पैसा येतो-जातो… पण  मित्रांची संगत म्हणजे एक अमूल्य ठेवा असतो...

शारदाश्रम १९७४ बॅच जय हो... मैत्री अमर राहो...

सतीश जाधव...

7977690693


Wednesday, July 30, 2025

धोदाणी धबधबा... निसर्गाचा श्वास... सायकल निसर्ग संगम...

धोदाणी धबधबा... निसर्गाचा श्वास...  सायकल निसर्ग संगम...

दि. २९ जुलै २०२५

खांदेश्वर स्टेशन जवळ विकास कोळी पहाटेच सायकलवरून आला... काल अचानक ठरलं... पनवेल जवळच्या धोदाणी धबधब्याला भेट द्यायची ती सुद्धा सायकल वरून...

खांदेश्वर स्टेशन पासून 22 किमी अंतरावर असलेल्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या नयनरम्य धबधब्याला भेट देण्याचे खूप दिवस मनात होते... आणि काल  विकासचा फोन आला... सर उद्या मला सुट्टी आहे... जायचं का धोदाणीला... नेमकी विजयची सुट्टी रद्द झाली... त्यामुळे एकट्यानेच विकासला होकार दिला...

आज खास सखी सोबतीला होती... नवीन पनवेल सोडलं आणि हिरवळीचा रस्ता सुरू झाला... दोन्ही बाजूला हिरवीगार शेती, भुरभूरणारा पाऊस... मंद धुंद वारा... पक्षांची किलबिल... भुंग्यांचा गुंजारव... पारिजातकाचा सुगंध... या बेहोशीत वाटेतील गाडेश्वर मंदिरात पोहोचलो... 

शिवलिंगाची पूजा सुरू होती... निवांत दर्शन झाले...


आता हळूहळू चढाचा रस्ता सुरू झाला... नेरे गाव सोडले आणि एकपदरी परंतु सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यावरून पेडलिंग सुरू होते... मागून एस टी महामंडळाची लाल पारी आली आणि तिला वाट देण्यासाठी  मातीत उतरून सायकल थांबवावी लागली... 

धोदाणी गावातील मंदिराकडे पोहोचलो... गावातील चिंचोळ्या रस्त्यावरून वळणे घेत एका ओढ्याजवळ आलो... बाजूच्या घराच्या पडवीत सायकल ठेवून ट्रेकिंग सुरू झाले...  डोंगरातून वाहणारे तीन ओढे पार केले...

आणि अनंत चौधरीच्या निसर्ग वडापाव सेंटरकडे पोहोचलो... 

आता धबधब्याचा आवाज येऊ लागला... दूरवर दिसणारे डोंगराच्या कपारीतून बरेच धबधबे खाली कोसळत होते...

 पुढे एकत्र होऊन धोदाणी धबधब्याचा प्रचंड झोत जमिनीवर अवतीर्ण होत होता...

धबधब्याची एक कड हवेत उंच झेप घेत होती...


हवेत विरघळून जात होती...  माझ्यासह विकास या मनोहरी दृश्यात हरवून गेलो... जिथे पावसाच्या सरी झरझर कोसळतात, तिथे निसर्गाचा उत्कट आविष्कार भरभरून अनुभवण्यासाठी आलो होतो धोदाणी धबधब्याकडे...

माथेरानच्या पायथ्याशी, घनदाट जंगलात दडलेलं एक अनोखं रत्न… धोदाणी गावाजवळचा हा धबधबा म्हणजे निसर्गाचा उत्कट आविष्कार आहे...

पावसाच्या सरी अंगावर घेत होतो... टेकड्यांमधून कोसळणाऱ्या शुभ्र जलधारेचा आवाज म्हणजे  जणू पृथ्वीच्या हृदयाची स्पंदने होती... 

धोदाणी धबधब्याजवळ पोहोचलो... आणि निसर्ग अधिकच बोलका झाला. वाऱ्याच्या तालावर झाडांची पानं नाचत होती... ढग जमिनीवर उतरत होते... धोदाणी धबधब्याचा लयीत खळखळणारा... तो आवाज मनाच्या खोल कप्यात दडलेल्या शांततेचा होता...


उंचावरून कोसळणाऱ्या जलधारा... निसर्ग संगीत गात होत्या... त्यांच्या प्रत्येक थेंबात एक सळसळती ऊर्जा होती.. मनात स्पंदन निर्माण करणारी...

त्या जलतुषारांचं सौंदर्य इतकं तरल होत की, काही क्षणांत त्यांनी  धुक्याची एक स्वप्नवत चादर विणली... त्या चादरीतून उगवली एक पांढऱ्याशुभ्र पंखांची जलपरी... नजरेत क्षणभर तरंगणारी, आणि पुढच्याच क्षणी हवेत विरून जाणारी... ती कुणालाच सापडणारी नव्हती... अनुभव देणारी होती...  अंतर्मनाला स्पर्श करून जाणारी होती... आणि त्या स्पर्शातून उठत होते  अनेक तरंग... भावनांचे, आठवणींचे,  रम्य शांततेचे...

जेव्हा ही दृश्यं मनाच्या कप्प्यांत साठतात...तेव्हा धोदाणीचा धबधबा फक्त नजरेत राहात नाही... तो हृदयात वाहतो...

 खरं सांगायचं तर... इथे आल्यावर मोबाईल विसरावासा वाटला... कारण डोळ्यांच्या कॅमेराने टिपलेली दृश्यंच चिरकाल टिकतात...

 जलाशयात उतरलो प्रचंड झोत आणि तुषारांची बरसात अनुभवण्यासाठी... त्यात वाऱ्याचा लपंडाव... सर्व कसे अवर्णनीय... नखशिखांत चिंब झालो होती... पण मन भरत नव्हते... 

विकास मोबाईल सांभाळत लांबूनच फोटो काढत होता... जवळपास अर्धातास पाण्यात खेळत होतो... आता सपाटून भूक लागली... मधला दिवस असल्यामुळे हाताच्या बोटावर मोजणारे  पर्यटक होते  त्या परिसरात...

निसर्ग सेंटरवर  गरमगरम कांदापोहे आले त्यात विकासने आणलेला डाएट चिवडा टाकून क्षुधा शांत केली... चहा घेतला आणि परतीची सफर सुरू झाली...

गाडेश्वर धरणाजवळ आलो, आणि एक फलक नजरेस पडला... देहरंग धरण... क्षणभर थांबलो... अहो, काय कल्पक नाव... जेथे निसर्गाचे असंख्य रंग मुक्तपणे खेळतायत...  जल, नभ, डोंगर, हिरवळ, आणि पक्षी यांचे रम्य मिश्रण... तेथे देहरंग नावच शोभून दिसते...

वाटेतल्या गप्पा सुद्धा... वाऱ्याच्या झुळुकीसारख्या हळुवार होत्या...कधी मन हलकं करत होत्या... तर कधी जीवनाचे सार सांगत होत्या... या गप्पांच्या ओघात अण्णाच हॉटेल कधी आलं कळलंच नाही...

खांदेश्वर येथे येऊन अण्णाच्या हॉटेल मध्ये डोसा, उत्तप्पा आणि कॉफी घेतली... आजची सर्व ट्रीट विकासची होती... 

परममित्र विकासचा निरोप घेऊन घराकडे परतीची सफर सुरू झाली...

आजची ५२ किमीची राईड निसर्गाला अर्पण केली...

जर शांततेचा शोध घेत असाल, तर हे ठिकाण उत्तर आहे.... आणि जर थोडं साहस हवं असेल, तर धोदाणी त्यासाठीही तयार आहे... मग थांबू नका… पावसाच्या सरी झेलत, हिरवळीच्या कुशीत एक दिवस स्वतःला हरवून बघा... धोदाणी धबधबा एकदा तरी अनुभवायलाच हवा...

सतीश जाधव

7977690693