Thursday, August 7, 2025

आठवणीतील जिम... पॉवर हाउस...

*आठवणीतील जिम... पॉवर हाउस...*
आज दुपारी घरून मोटार सायकलने दादरला निघालो होतो... अचानक बस स्टॉप वर एक परिचित चेहरा नजरेस पडला... जिम ट्रेनर हेमंत जाधव...

 मन अगदी उल्हसित झालं... हेमंत कुठे निघालास... बसने वांद्रे कोळीवाड्यात निघालोय... पटकन म्हणालो... बस कशाला... चल, बस मोटरसायकलवर... सोडतो तुला...

लोअर परळ ते वांद्रे कोळीवाडा... वाटेत असलेल्या लाल हिरव्या सिग्नल्सपेक्षा आमच्या गप्पाच जास्त रंगल्या होत्या... 

खूप वर्षांनी भेटलो होतो... पण बोलताना क्षणभरही तुटकपणा वाटला नाही...

आता हेमंत लोअर परळच्या मथुरादास मिल कंपाउंडमधल्या फिटनेस गॅरेजमध्ये ट्रेनर आहे...

कधीकाळी दिपक सरांच्या पॉवर हाऊस जिममध्ये पर्सनल ट्रेनर होता हेमंत... पण आम्हा सर्व मित्रांना सतत मदत करायचा... हेमंत आमचा  'फिटनेस साथी' होता...

त्या जुन्या जिमच्या दिवसांच्या गप्पा निघाल्या...
विमल पोरवाल, वंदना, संजय वोरा, नेहा, राजेश दुलानी, कमलेश जैन, पांगम, राजेंद्र मसुरकर, समिधा जाधव... सगळे आठवले...

हसत हसत हेमंत म्हणाला... अपेक्षा तर आता मॅरेथॉन ट्रेनर झालीये

त्या एका हेमंतच्या भेटीतून इतकं काही आठवलं की जणू काही जिमचे सगळे  जुने मित्र पुन्हा एकत्र भेटले आहेत...

हो... हल्ली एकत्र येणं कमी झालंय… पण प्रत्येकाच्या जीवनात फिटनेस अजूनही  कार्यरत आहे...

विमल मॅरेथॉन करतोय... कमलेश आणि संजय शिवाजी पार्कमध्ये ब्रिक्स वॉकिंग करतात... राजेश योगाभ्यास करतोय... पांगम अजूनही जिममध्ये घाम गाळतोय... मी सायकल घेऊन बोकाळत फिरतोय...
फक्त संदीप झोखंडे आणि संजय टकले काय करत आहेत, ते अजून शोधायचंय...

हेमंतने प्रेमाने गप्पांदरम्यान सांगितलं... कधीतरी फिटनेस गॅरेजला ये ना... सगळ्यांना घेऊन ये...

आणि त्याच क्षणी मनात ठरवलं.... आता पुन्हा सगळ्या जिमच्या मित्रांना एकत्र आणायचच...

एक मित्र भेटतो.. तेव्हा फक्त तोच भेटत नाही... तर त्याच्यासोबत येतात सर्व मित्रांच्या खोडकर आठवणी... जुने किस्से... आणि त्या जुन्या काळचे जिवंत क्षण...

 सतीश जाधव...
7977690693

No comments:

Post a Comment