Tuesday, August 4, 2020

मेघदूत

मेघदूत

महाकवी श्री कालिदासांचे मेघदूत वाचनात आले... 

शांताबाई शेळके यांनी रसग्रहण केलेले...

या रसग्रहणाला कविवर्य माधव ज्युलियन यांची चार ओळींची प्रस्तावना आहे.

त्या चार ओळींचा,  भावलेला रसस्वाद... झालेले आकलन... सविनय सादर...


मेघांनी हें गगन भरतां गाढ आषाढमासी

होई  पर्युत्सुक  विकल तो कांत एकांतवासी,

तंनि:श्वास श्रवुनि, रिझवी कोण त्याच्या जिवासी ?

मंदाक्रान्ता ललित कविता कालिदासी विलासी !


*रसास्वाद*

कविवर्य माधव ज्युलियन यांनी  कालिदासांच्या मेघदूत महाकाव्याचे  मंदाक्रांता वृत्तात रसग्रहण केले आहे. त्यातील या प्रथम चार ओळी आहेत.

 या चारपंक्ती मध्ये :
 
 आषाढ महिन्यात नभांगणात ढगांची दाटी झाल्यावर, हा प्रेमाचा पुजारी एकांतवास भोगणारा शापित यक्ष;  प्रेयसीच्या भेटीसाठी  विरहाने व्याकुळ  आहे. 
 
 जशी गगनात मेघांनी गर्दी केली आहे, तसेच प्रेमाची दाटी त्याच्या हृदयात झाली आहे. मिलनाच्या विरहाने विकलांग झालेला तो जीव, ढगांकडे आर्ततेने पाहत आहे. 


मेघांच्या तनातून बरसणाऱ्या जलधारा, त्या आर्त जिवाच्या अश्रूधारांपुढे फिक्या झाल्या आहेत. 

त्याच्या श्वासाचा वेग वाढला आहे;  या श्वासाची अधीरता,  या अश्रूंचे लोट थांबविणारी ललना कधी येणार आहे.

कालिदासाच्या शब्दविलासाने भारलेले  मेघदूत  हे संस्कृत काव्य मंदाक्रांता वृत्तात आहे  आणि कविवर्य माधव ज्युलियन यांनी केलेले मंदाक्रांता वृत्तातील मराठी रसग्रहण सुद्धा अतिशय अप्रतिम आहे.

मनाला चिरंतन आणि शाश्वत आनंद ह्या पहिल्या चार ओळी देतात.

प्रेमाची उत्कटता,  विरहाची आर्तता मनाला भावविभोर करते.

प्रत्येक  शब्द...

त्यातील ओज...

ओघवती भाषाशैली...

मंदाक्रांता वृत्तात केलेली शब्दांची गुंफण...

मंद चालणाऱ्या गजगामीनी सारखी हळुवारपणे मनाचा गाभारा पादाक्रांत करते.

 आपल्या मनातल्या गोष्टी,  कवींच्या शब्द सामर्थ्याने आपल्या समोर अवतीर्ण होतात, तेव्हा प्रेमभावना उचंबळून येतात...  

नव्हे.... नव्हे... भरभरून वाहू लागतात...
 
 बांध फुटून वाहणारे प्रेम....

 साऱ्या आसमंतात भरून जाते... 

किंबहुना त्याच्याही पलीकडे वाहत जाते. 
 
गाढ आषाढमासी...

कांत एकांतवासी...

कविता कालिदासी विलासी....

हे शब्द मन पटलावर गारुड करतात. 

काय अप्रतिम शब्द रचना आहे...

या महाकाव्याच्या शेवटी...

मेघाला वर्षावैभव प्राप्त होऊन सौदामिनीसोबत रत होत असता, विरहाची अनुभूती कधीही न येवो अशी कामना यक्ष व्यक्त करतो....

महाकवी कालिदासांची शब्दविलासिनी आपल्याला वेगळ्या भाव विश्वात घेऊन जाते.

आझाद पंछी.... 😊🦋

2 comments:

  1. बाबारे ऐवढे प्रचंड आम्हाला झेपेल का
    आजचे वातावरण खरेच मंदाक्रांता नाही तर मदाक्रांदता आहे
    मस्त

    ReplyDelete
  2. राजेश भाऊ...

    मला भावलेले सहज सोप्या शब्दांत मांडण्याचा प्रयत्न आहे. आपले वाङ्मय एव्हढे भावगर्भ आहे की त्यातील काही कण जरी आपल्याला लाभले तरी ते अनंत काळ पुरतील.

    ReplyDelete