Monday, August 3, 2020

मैत्री दिवस सायकलिंग

मैत्री दिवस सायकलिंग

२ ऑगस्ट २०२०

सकाळीच शाळेतला परममित्र संजय कोळवणकर बरोबर बोलणे झाले, त्याच वेळी आजचा मैत्री दिवस विजय मित्रासोबत सायकलिंग करून साजरा करायचा हे मनाने ठरविले.

चार दिवसापूर्वी कोणीतरी बेलार्ड पियरचे फोटो पोष्ट केले  होते, गुलमोहर फुललाय म्हणून. आज गुलमोहर दर्शन करायचे म्हणून संध्याकाळी पाच वाजता विजयसह सायकल राईड सुरू केली. 

छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनला पोहोचलो. तो परिसर सायंकाळच्या सोनेरी सूर्य किरणांनी न्हाऊन निघाला होता. रहदारीसुद्धा शांत झाली होती. स्टेशनच्या मुख्य इमारती बाहेरील कुंपणावर निळसर गुलाबी रंगांच्या फुलांनी एक वृक्ष बहरला होता. 
हेरिटेज बिल्डिंगच्या कॅनव्हासवर हिरव्यागच्च वृक्षावर गुलाबी निळी फुले म्हणजे इंग्रजी इमारतीवर निसर्गरूपी छत्रपती शिवाजी महाराजांचे आक्रमणच जाणवले. म्हणूनच स्टेशनला व्हिक्टोरियाचे नाव बदलून छत्रपतींचे नाव दिले असावे. मन एकदम प्रसन्न झाले. 

 स्टेशनच्या बाहेर इमारतीचे फोटो काढत असतानाच, माझ्या सोगो कराओके संगीत  मैफिलीची मैत्रीण गीताची भेट झाली.
 आजच्या दिवशी तिची भेट म्हणजे संपूर्ण सोगो परिवाराची भेट होती. तिला सुद्धा सायकलिंगचा श्रीगणेशा लवकरच करायचा आहे. तेथे खूप फोटो काढून बेलार्ड पियरकडे वळलो. 

काय आश्चर्य... मुलांच्या गुलमोहरानी बेलार्ड पियर फुलून गेला होता. आसपासची खूप मुले संपूर्ण परिसरात क्रिकेट खेळत होती. गुलमोहराचा मागमूस कुठेच नव्हता. बेलार्ड पियरच्या सर्व मार्गिका फिरलो. 
अचानक एक वेगळेच दृश्य समोर दिसले. एका मार्गात ढोलताशा लेझीमसह एक मिरवणूक निघाली होती. जवळ जाऊन पाहिले तर एका ऐतिहासिक चित्रपटाची शूटिंग सुरू होती. आश्चर्य वाटले... या मिरवणुकीच्या शूटिंगला करोना काळात परवानगी कोणी आणि कशी दिली, याचे. 

 या मिरवणुकीचे शूटिंग करून गेटवे ऑफ इंडियाकडे निघालो.

सगळ्या ठिकाणी बॅरिकेट लावून गेटवे ऑफ इंडिया परिसर बंद केला होता. ताजमहाल हॉटेल समोरील चौपाटीवरसुद्धा जायला बंदी होती. नेहमी तुडुंब  गजबजलेला हा परिसर एकदम शांत वाटला. माणसांच्या कोलाहलाऐवजी पक्षांचे पंख फडफडण्याचे आवाज आसमंतात घुमत होते. 


आकाशातील काळे पांढरे ढग गेटवे ऑफ इंडियाच्या चार बुरुजांशी हितगुज करत होते. विचारात होते, 'कधी येणार तुझी लाडकी माणसे, तुला भेटायला'.

नीलवर्णी आकाश छताखाली काळे पांढरे ढग हातात हात गुंफून वारा वाहिल तसे स्वछंदी भरकटत होते . ते सागराच्या संथ लाटांशी मान डोलावून  हितगुज करत होते.  लाटाही ढगांशी हळुवारपणे गुजगोष्टी करत होत्या. 

पोलिसांची गाडी येण्याअगोदर दोनचार फोटो काढून तेथून सटकलो. थेट मारिन लाईन्स चौपाटी गाठली. आज खूप मोठा जनसमुदाय चौपाटीवर दिसत होता. सोशल डिस्टनसिंगमुळे तातडीने फोटो काढून पुढे प्रस्थान केले. 
गिरगाव चौपाटीवरून वाळकेश्वरला चढणाऱ्या रस्त्यावर थांबलो. तेथून मारिन लाईन्स चौपाटी परिसर अतिशय विहंगम दिसतो. सूर्य अस्ताला गेला होता, परंतु त्याची लाली राणीच्या रत्नाहाराला सोन्याचा मुलामा देत होती.
 समुद्राच्या निळाईवर तो हिरेजडित रत्नहार चमचम चमकत होता. सागर निळ्या नभाच्या रंगाने न्हाऊन निघाला होता. आकाशाची निळाई पाहून सागराचे पाणी आनंदाने उचंबळून येत होते. 
त्या क्षितिजा जवळ नभाचे आणि सागराचे जेथे मिलन होते, तेथे मनाची सैर सुरू झाली. शांत चित्ताने ती एकरूप अवस्था,  समाधी अवस्था अनुभवायला लागलो.

 लाजेने चुर होऊन थरथरणारी लाट आजच्या मैत्री दिनानिमित्त प्रिय "मित्राला" आर्जव करत होती, 'थांब ना थोडावेळ, नको ना मावळूस एवढ्या लवकर. मित्र तिला हसत हसत सांगत होता, उद्या सकाळी लवकरच भेटूया. अच्छा तो हम चलते है.

हे दोघांचे हितगुज ऐकून मित्र विजयला म्हणालो, चल आपणसुद्धा निघुया इथून. जास्त वेळ थांबलो तर आपले पोलीस मित्र येतील आपल्या भेटीला. विजय हसला... आम्ही कमला नेहरू पार्ककडे प्रस्थान केले. रस्ते वर्दळ नसल्यामुळे निवांत होते. समुद्रही त्या शांततेचा कानोसा घेत शांत झाला होता. संपूर्ण तीनबत्ती परिसर निर्जन झाला होता. फक्त तुरळक गाड्यांची रहदारी सुरू होती. 

तेथून महालक्ष्मी, वरळी मार्गे घरी पोहोचलो. दोन तासात पस्तीस किमी राईड झाली होती. 

आजच्या मैत्री दिनानिमित्त जिवलग मित्र संजय बरोबर बोलणे झाले, मित्र विजय बरोबर सायकल राईड झाली.  सोगो मैत्रीण गीताची भेट झाली. गेटवे ऑफ इंडियाची ढगांशी झालेली मैत्री पाहिली आणि गिरगाव चौपाटी नाक्यावरून सागरी लाट आणि सूर्य नारायणाची मैत्रीसुद्धा अनुभवली होती.

आजचा मैत्री दिवस खऱ्या अर्थाने सार्थकी लागला होता.

आझाद पंछी....

8 comments:

  1. सुंदर मैत्री दिवस

    ReplyDelete
  2. मित्र भगवान विचारे याचे अभिप्राय!!!

    मैत्री दिन.....मैत्री दिन निळ्या लाटांचा..... सायंकालीन निळ्या ढगांचा...... सोगो कराओके मैत्रिणीचा.... विजय मित्राचा. मैत्रीदिन सकलांचा. पसंद अपनी अपनी तसा मैत्रीदिन अपना अपना. बाकी वर्णन नेहमीप्रमाणेच सुंदर.

    ReplyDelete
  3. सस्नेह नमस्कार,

    फुललेल्या गुलमोहर दर्शनाच्या कुतूहलापोटी सुरु केलेली मैत्री दिवसाची सायकल सफर निळ्या अंबराच्या छत्रछायेखाली, मित्राच्या सानिध्यात, मित्र-मैत्रिणीच्या समवेत, निसर्गाच्या रंगीबीरंगी छटा आणि राणीच्या रत्नाहाराचा सोन्याचा मुलामा डोळ्यांत साठवीत, अथांग सागराच्या साक्षीने शेवटी मित्रालाच निरोप देऊन पूर्ण केलीत. खूप छान !!!!

    'आजचा मैत्री दिवस खऱ्या अर्थाने सार्थकी लागला होता' ही भावना सुद्धा आम्हा मित्रांना भावली.

    बाकी संपूर्ण सफर वर्णनाची running commentary नेहमी प्रमाणेच ओघवती, सर्वसमावेशक, मनाला प्रेरणा देणारी, वेगवेगळ्या उपमांनी नटलेली आणि शेवटी 'संपूर्ण सफर सारांश' अशीच !!!!

    सगळेच फोटो खूप छान एकापेक्षा एक सरस !!!!

    भविष्यातील पुढील सायकल सफरीसाठी खूप खूप शुभेच्छा !!!!

    धन्यवाद!!

    ...... लक्ष्मण

    ReplyDelete
  4. लक्ष्मण !!!

    एकदम फिदा तुमच्या समीक्षेवर....

    ReplyDelete
  5. मित्राचे अभिप्राय

    मैत्री दिनाच्या दिवशी मन:प्रिय मित्र मैत्रीणीना भेट ह्या सारखा आनंद नाही ,त्या आनंदाचे दिलखुलास वर्णन खूप छान लिहिलं आहे.
    समुद्राच्या लाटा, मेघ, वारा , सूर्य यांची ही मैत्री ही छान वर्णिली आहे

    ReplyDelete