Monday, August 17, 2020

झेंडा वंदन राईड १५ ऑगस्ट २०२०

झेंडा वंदन राईड
१५ ऑगस्ट, २०२०


स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी राईड करायची हे ठरवले होते. निलेशला ४५ किमी राईड करायची होती. आदित्य आणि मयुरेशसुद्धा समर्पयामि परिवारासाठी सायकल राईड प्लॅन करीत होते. चिखलोली धरण राईड करायचे नक्की झाले. या राईडला  समर्पयामीच्या वीस सदस्यांनी आपली नावे सुद्धा नोंदविली. विजय या राईडसाठी खास सुट्टी घेऊन यायला तयार झाला होता.

आज सकाळी साडेचार वाजता सायकलला तिरंगा झेंडा लावून झेंडावंदन राईड सुरू झाली. दादरला विजयची भेट झाली. रात्रीच तयार केलेला झेंडावंदन फोटो सर्व मित्रांना शेअर केला होता. 

"यु हवा आज क्यू गा रही है" हे गाणे सुरू होते. रात्री पाऊस पडल्याच्या खुणा रस्ता सांगत होता. पाण्याने भरलेले खड्डे चुकवत सायनला  पोहोचले. जोरदार पाऊस सुरू झाला. मिनीटभरात दोघेही संपूर्ण भिजलो. थांबायचे नाही हे मनाने ठरविले होते. चष्म्यावर पावसाचे थेंब पडत असल्यामुळे समोरचे धुरकट दिसायला लागले.  त्यामुळे चष्मा काढून राईड सुरू ठेवली.  सायन सर्कल ओलांडून चुनाभट्टी एव्हराड नगर जवळ पोहोचताच एक विहंगम दृश्य दिसले. नवीन बांधलेल्या सायन BKC फ्लाय ओव्हरच्या खाली तिरंग्याच्या रंगांची आरास केली होती.
सकाळी पाच वाजता येथे फोटो काढले. ही खुप आनंदमय गोष्ट होती.

पाऊस आम्हाला तुडुंब भिजवत होता. पावसाबरोबर जोरदार वारा सुटला होता.  पावसाचे थेंब हेल्मेटवर तडतड वाजत होते. वाऱ्याच्या झोतावर सायकल डोलत होती. जणूकाही पावसाच्या तालावर कथ्थक नृत्यच करीत होती. हेडविंडमुळे सायकलचा वेग सुद्धा मंदावला होता. पाऊस, वारा, अंधार, धुके तसेच हेडलॅम्पचा मंदावणारा प्रकाश यातसुद्धा नेटाने पेडलिंग सुरू होते.

 पावसाचा ताशा, वाऱ्याचा मारा आणि त्यात तिरंग्याची डौलाने चाललेली फडफड त्यामुळे अंगात नवीन उर्मी उठत होती. अफलातून मजा आली तिरंगा झेंड्याच्या फडफडण्याने.  या पावसात सतत भिजत भिजत पाच वाजून पन्नास मिनिटाने मुलुंड टोलनाक्या अलीकडील ब्रिजखाली पोहोचलो. विजयने आणलेले गरमागरम मसाले दूध हायड्रेशन ब्रेकसाठी होते. आता अंगात वेगळी शक्ती संचारली होती.

तीन हात नाक्यावर अतुल, प्रशांत, यशवंत आणि चिराग हे सर्व आझाद पंछी भेटले. निलेशने एका विशेष कामासाठी रजा घेतली होती. स्वातंत्रदिनानिमित्त आज  ४५ किमी सायकलिंग आणि १५ किमी रनींग हा त्याचा संकल्प होता.

माजीवडे नाक्यावर पोहोचलो. तेथे अविनाश, सुमित, मुन्ना, अनु, आदित्य, मयुरेश, एल्डन यांची भेट झाली. शेवटी अरुणा आली. एक्सपर्ट तंत्रज्ञ हिरेन सुद्धा आज राईड करणार होता. आज प्रथमच मुन्ना आणि अनुची ओळख झाली.

आदित्यने "बोलो भारतमाता की"  असा जोरदार निनाद  केल्यावर सर्वांनी एकसाथ केलेल्या   "जय" अश्या  जयघोषाने माजीवडा जंक्शन दणाणून सोडला. हिरेनने सर्वांच्या सायकली तपासून ठाकठीक केल्या. मयुरेशने सर्वांना तिरंगा बिल्ले वाटले. आदित्यने  सर्वांना सायकलिंग करताना घ्यायची काळजी बद्दल सांगितले. आता सुरू झाली चिखलोली धरणाकडे सायकल राईड.

पाऊस सुरूच होता. सात वाजता खारेगाव जंक्शनला पोहोचलो. सर्वांना कचोरी दिली. अरुणाने कानटोपी, त्यावर फ्लॅपवाली टोपी आणि त्यावर हेल्मेट असा पक्का बंदोबस्त डोक्याचा केला होता. आज डॉ सुमित जाम खुशीत दिसत होता. तानसा राईडमध्ये मागे राहणारा सुमित आज सर्वांच्या पुढे होता. एक्सट्रा एनर्जी घेऊन आला होता सुमित. त्याच्या बरोबर प्रशांत सुद्धा पुढे होता. आजच्या मोठी राईड झोकात करायची असा विचार दोघांनी केला असावा.

खारेगावकडून शिळफाट्याकडे जाण्यासाठी मुंब्रा बायपासकडे वळलो.  बायपासचा चढ सुरू झाला. बाजूने मोठेमोठे कंटेनर जात होते. त्यामुळे जपून आणि एकामागे एक सायकलिंग करत होतो. चढ संपला आणि मुंब्रादेवी मंदिराच्या पायथ्याला मोठा धबधबा लागला. 

कड्यावरून कोसळणारे प्रचंड पाणी पाहून सायकली आपोआप धबधब्याकडे वळल्या. लागलेला दम पळून गेला. आता सुरू झाली मस्ती. प्रथम सुमित आणि मुन्ना शिरले धबधब्यात. मुन्नाने अनु सह भन्नाट सायकल पोज दिली धबधब्याखाली. 

 एका मोठ्या दगडावर  चढून धबधब्याचा झोत अंगावर घेत, तिरंगा झेंडा फडकवत सर्वांनी फोटो काढले. अतुल तर धबधब्याच्या कड्यावर चढायचा प्रयत्न करत होता. तर बलवंतने "सायकल वरीयर"  स्टाईल धबधब्याखाली फोटो काढला. 
फुलटू धम्माल आली तुषार अंगावर घेताना. प्रत्येक जण अक्षरश बेभान होऊन धबधब्यात रमला होता. आजच्या सायकलिंगची सुरुवात मनाच्या स्वातंत्र्याची होती. 

 निसर्गाने मुक्त  उधळलेल्या सौंदर्याने तन, मन तृप्त झाले. तसेच कड्यावरून कोसळणाऱ्या धबधब्याने सर्व आनंदाने बेहोश झाले होते.

पुन्हा पेडलिंग सुरू झाले. मुंब्रा टोलनाका ओलांडून दिवा गावात शिरलो. भन्नाट उतारावरून वळसे घेत सायकल चालवणे अतिशय कसबी काम होते. सायकल मोटरसायकलच्या वेगाने पळत होती. पण एक जाणवले हायड्रोलीक डिस्क ब्रेकमुळे सायकल कंट्रोल करणे खूपच सहज होते. 

दिवा नाक्यावर लहान मुलांचा घोळका झेंडे विकत होता. मयुरेशने एका लहान मुलीकडून काही झेंडे हातात घेऊन तिला सांगितले, ' तुझे सर्व झेंडे मला दे'. त्या मुलीने मयुरेशच्या हातातील झेंडे मागून भेटले. मयुरेश  सर्व झेंड्यांचे पैसे आपल्याला देणार नाही असा भ्रम तिला झाला असावा. सुमित पटकन म्हणाला 'मयुरेश तुझी फेस व्हॅल्यू तीने केली आहे'. मयुरेशने तीला पैसे दिल्यावर तीने सर्व झेंडे  दिले. आता प्रत्येकाच्या सायकलवर तिरंगा फडकू लागला. आदित्यने त्या सर्व मुलांसोबत फोटो काढला. तसेच आम्हा सर्वांचा फोटो काढताना, जोरदार गर्जना मारली, " भारत माता की जय".


पावसाची रिमझिम सुरू होती. आम्ही पेडलिंग करत शिळफाट्यावर पोहोचलो.  मागे राहिलेल्या अरुणाला आदित्य घेऊन येत होता.  थोडा वेळ थांबलो शिळफाट्याजवळ. तेथून उजवीकडे वळून देसाई गाव, लोढा नाका ओलांडून बदलापूर पाईप लाईन रोडवर आलो. आता जोरदार पाऊस सुरू झाला होता. 

मी अविनाश बरोबर सायकलिंग करत होतो. थोडा पुढे सुमित पाश्चात्य संगीतावर डोलत सायकलिंग करत होता. अविनाश म्हणाला, 'अँपलच्या शिरीने सुद्धा सांगितले,  आज दिवसभर पाऊस पडणार म्हणून'. तरुणाईला एक मोठं अस्त्र मिळालंय काहीही प्रश्न पडला तर, गुगल, ऍपल मधून शोधणे. अविनाश पुढे म्हणाला, 'आता खंडाळ्याला घाटात काय मजा आली असती ना... सायकलिंग करायला !!!'.  'राजा, आताची पाईप लाईन राईड एन्जॉय कर, नंतर जाऊच आपण खंडाळ्याला'  मी म्हणालो. 

खरं तर प्रत्येक ठिकाणची मजा वेगळी आणि युनिक असते, त्यामुळे सकारात्मकते बरोबर स्विकारात्मक सुद्धा असणे फार महत्वाचे आहे. समोर आलेल्या परिस्थितीला आपण आहे तसे स्वीकारतो, तेव्हाच त्यातील आनंद लुटू शकतो. मग त्याचे कम्पॅरिझन करण्याची आवश्यकता लागत नाही.

पाईप लाईन रस्त्यावर सर्वांच्या सायकली झोपवून, एक ग्रुप फोटो काढला. ही मयुरेशची आयडिया होती.
 नऊ वाजता  कल्याण फाट्यावर पोहोचलो. येथे गरमागरम वडापाव त्यावर केळी, पपई असा हायड्रेशन ब्रेक घेतला. यशवंत सर्वांना प्रेमाने पपई खाऊ घालत होता. तर मयुरेश सर्वांवर केळ्याची बरसात करीत होता.

बदलापूर पाईप लाईन वरील डी मार्ट ओलांडले आणि पुढे चिखलोली गाव लागले. येथे बदलापुरच्या लोकल सायकालिस्टची भेट झाली.  आम्हाला धरणाचा रस्ता  दाखविण्यासाठी ते धरणापर्यंत आमच्या सोबत आले. आता गावातून ऑफ रोडिंग सुरू झाले. कच्च्या रस्त्याच्या चढावर दगड आणि चिखल असल्यामुळे, अतिशय कमी गियरवर पेडलिंग करावे लागत होते. 

सर्व परिसर हिरवळीने भरलेला होता. एका छोट्या पुलावर थांबलो. खालून पाण्याचा पाट वाहत होता. गार वारा आणि पाऊस यांची संगत होती. पुलाखालून खळखळत वाहणारे पाणी, त्यातून उठणारा पाण्याचा पांढरा रंग, निसर्गाचे नित्य नूतन रूप दाखवत होता. येथे माझी साथ संगत करणाऱ्या सायकलचा  फोटो काढला. तिरंगा डौलाने फडकून सायकलला साथ देत होता. 


निसर्गाचे सौंदर्यधन मनमुराद लुटून नेत्र भिंगात बद्ध केलं आणि आज सोबत नसलेल्या मित्रवर्यासाठी अन् चिरंतन आठवणीसाठी कॅमेराबद्ध सुद्धा केले.

आकाशाला काळ्या पांढऱ्या ढगांनी निरनिराळे आकार घेऊन कवटाळले होते. तरीही आकाशाला धरणीवरील पाणी प्रवाहाची प्रचंड ओढ दाटली होती.  त्यासाठी ढगांच्या राशींचाच आधार घेत डोंगरावरून ती निळाई पाण्यात उतरली होती. आकाशभेटीने पाणी ही लहरत होते. आनंदाने वेगही वाढला होता पाण्याचा वाहण्याचा.  सागराशी असलेल्या प्रेमाच्या ओढीने खळाळत, तटावरील झुडूपांशी कान गोष्टी करत,  जलाचे वेगाने  वाहणे चालले होते.

शेवटचा ऑफ रोडिंग चढाव अतिशय स्टीफ होता. अगोदरच एक बाय एक गियर सेट करून तो चढाव चढायला सुरुवात केली.  आदित्य, अविनाश, चिराग, प्रशांत मला चिअर अप करत होते. शेवटच्या दहा फुटात " भारत माता की जय" अशी जोरदार गर्जना करून चढ चढून गेलो.  

समोरच तलावाचे विहंगम दृष्य पाहून मन मोहरून गेले. मातीच्या बंधारा घालून डोंगरातून येणाऱ्या नदीचे पाणी अडविले होते. तलावात पसरलेल्या अथांग पाण्यात ढगांचे रंग उतरले होते. आजूबाजूला असलेले डोंगर जलधारांचा अभिषेक जलाशयात अव्याहतपणे करत होते.  मातीच्या बंधाऱ्यावर उगवलेली गवताची हिरवळ, त्यात दिसणारी पिवळी लाल तृण फुले, त्यावर बागडणारी फुलपाखरे तसेच या बंधाऱ्यावरून जाणारी पाऊलवाट;  सारे काही अदभूत होते. सृष्टी जणूकाही पाचूच्या शालूवर हिरवी वेलबुट्टी लेऊन सजली होती.

हे बघतानाच मीच निसर्ग झालो. निरव शांततेने मन गहिरे झाले आणि निसर्ग गीत स्फुरले. 

पाऊलवाटा हिरव्या ओल्या 

 पानांवर पागोळ्या गळल्या 
 
 सुवासिक फुलांनी मोहविलें
 
 फुलपाखरांना  रंगही  दिलें
 
 सुरंगी फुले लाल लाजली
 
 हिरवी पाने हळूच डोलली
 
 पानावरचे थेंब  छान चमकले
 
 रवी तेज पिऊन ते सजले 
 
 सप्तरंगाचा रम्य नजराणा
 
 मिरवितो हा निसर्ग राणा
 
 एक दृष्टी पडता त्यावर 
 
 सुखविते हे अपुले अंतर

या अप्रतिम निसर्गात मला आणणाऱ्या सायकलचा बहुमान करायचे मनात आले. तीला एका हाताने उचलून आजच्या मोठ्या दिवशी मानवंदना दिली.


अतुल आणि प्रशांत आज सुद्धा हिरवे टीशर्ट घालून आले होते. त्यामध्ये मी सुद्धा हिरवे टीशर्ट घालून सामील झालो होतो. दोघांना परत जुळे भाऊ म्हणताच  प्रशांत म्हणाला मी काळा आणि चिराग गोरा मग कसे शक्य आहे.  मी म्हणालो, ' तू अमावस्येला आणि चिराग पौर्णिमेला जन्माला आले आहेत. या वर दोघेही खळखळून हसले.

  मातीच्या बांधाऱ्यावरील पाऊल वाटेवरून सायकलिंग सुरू झाली, पलीकडच्या किनाऱ्यावर जाण्यासाठी.  मागून आदित्य,  मुन्ना, सुमित आणि एल्डन येत होते. त्यांना कॅमेराबद्ध केले. त्या पाऊल वाटेवरून सायकल चालवणे म्हणजे कसरत होती. पाणथळ जागेत चाक रुतत होते, सायकल घसरत होती. एका बाजूला तलाव तर दुसऱ्या बाजूला शंभर फूट खड्डा यातून अतिशय सावधपणे सायकल हाकारात पलीकडच्या किनाऱ्याला आलो. 

या किनाऱ्यावरून तलाव अजूनही विस्तीर्ण दिसत होता.  मातीच्या पठारावर बाजूच्या डोंगरातून जलधारा वाहत होत्या.  

आता सुरू झाली मैफिल नाच-गाण्याची.  सुमित भांगडा गाण्यावर असे काही ठुमके मारत होता की सर्वजण त्याचे फॅन झाले. त्याचे पदलालित्य अप्रतिम होते. प्रत्येक जण आता नाचू लागले. मुन्ना, अविनाश, बलवंत, चिराग, प्रशांत, हिरेन, यशवंत सारे भांगडा मध्ये सामील झाले. मयुरेश एका हातात झेंडा फडकवत लाजत डान्स करत होता. काका उर्फ आदित्य इलेक्ट्रिक शॉक लागल्या सारखा नाचत होता. एल्डन फक्त हाताने नाचत होता. तर अन्नू हात उंचावून हसत नाचत होती.
एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आम्ही सर्वजण खऱ्या अर्थाने बालपणात, शालेय जीवनात गेलो होतो. कोणताही अभिनिवेश नाही, कोणताही भेद नाही , फक्त आणि फक्त निसर्गाचा आनंद लुटणे. निसर्गात रममाण होणे. ठाण्यावरून साधारण ४५ किमी राईड करून चिखलोली धरणावर पोहोचलेले आम्ही सर्वजण एकमेकांत गुंफून गेलो होतो. " दिलसे मिले दिल" च्या अनुभूतीमध्ये सर्व समर्पयामि सामावून गेलो होतो. सध्या चालू असलेल्या बंधनातून सर्व मुक्त झाले होते. 

त्यानंतर सुरू झाले तलावाच्या किनारी आनंद भोजन. अविनाश  घरून आणलेला झुणका भाकर आवर्जून सर्वांना वाढत होता. बलवंतने उकडलेले चणे आणले होते. मी आणलेल्या पनीर बुर्जीवर सर्व आझाद पंछी तुटून पडले. विजयने  डबाभरून साबुदाणा खिचडी आणली होती. अतुलने ठेपले आणि गोड छुन्दा आणला होता. काकाने दही, अरुणाची बिस्किटे, यशवंतचे खजूर आणि एल्डनचे चॉकलेट;  या आनंद भोजनाची लज्जत वाढवत होते. 

कमी बोलणारा विजयसुद्धा आज खुलला होता. त्याचे खूप फोटो काढले. तसेच स्लोमोशन व्हिडीओ शूट केला.  या स्पॉटवर खूप मौजमस्ती केली. अक्षरशः बागडत होतो, लहान मुलांसारखे, सर्वकाही विसरून.

आता सुरू झाली परतीची सफर. मयुरेश, चिराग, प्रशांत आणि मी पुढे निघालो. बलवंत काही काम असल्यामुळे अगोदरच निघाला होता. मागोमाग सर्वजण निघाले. अरुणाला घेऊन चिअर अप करत अतुल सर्वांच्या मागून  येत होता.

 येताना पुन्हा कल्याण फाट्यावर थांबलो. पाऊस तुडुंब कोसळत होता. आदित्य पोहोचल्यावर  पुढची सफर सुरू झाली. विजयने आज मला टीशर्ट प्रेझेंट दिले होते. परतीच्या सफरीत मी ते शर्ट घातले. हा नवा टीशर्ट सुमितला खूप आवडला होता. ते सांगण्यासाठी सायकलिंग करताना सुमित माझ्या जवळ आला होता. 


डोंबिवली शीळफाटा रस्ता लागला. कटाई नाका येथील बस स्टॉप वर थांबलो. येथे मुन्नाभाई बोलता झाला, सायकलिंगमुळे गेल्या तीन वर्षात त्यात क्रांतिकारी बदल झाले आहेत.  तो ९५ किलोचा ७५ किलो झाला आहे. त्याचा डायबिटीज कायमचा नाहीसा झाला आहे. लाईफ स्टाईल बदलली आहे त्याची. सायकलिंगमुळे काय घडू शकते याचे जिवंत उदाहरण माझ्या समोर होते.  त्याने खूप लोकांना सायकलिंग साठी मोटिव्हेट केले आहे. मुन्ना आता समर्पयामिला कायमचा जोडला गेला आहे. मुन्नाने त्याची मैत्रीण अनुची ओळख करून दिली. तीचे वडील सुद्धा स्पोर्ट्स मन आहेत. खेळामुळे माणसाचा चेहरा ताजातवाना राहतो, तसेच त्यांचे वय कमी वाटते. यासाठी अनुने वडिलांचे उदाहरण दिले. 

कटाई नाक्यावर  ट्राफिक जास्त असल्यामुळे थोडे पुढे जाऊन लोढा नाका, निळजे येथे थांबलो. चुकमुक होऊ नये म्हणून  शेवटी राहिलेल्या अरुणाची वाट पाहत होतो. अतुल अरुणाला सोबत घेऊन येणार याची खात्री होती. तेव्हढ्यात अतुल आणि अरुणा येताना चिरागला दिसले. त्याने जोरात अतुलला हाक मारली, त्या बरोबर भर ट्राफिक मध्ये अरुणा थांबली. मागून येणाऱ्या गाड्यांचे तिला भान राहिले नाही. मयुरेशला सकाळीच अरुणाने सांगितले होते. मी सायकल हळू चालविणार तुम्हाला त्रास झाला तर सांभाळून घ्यायचे. अरुणा अजूनही खड्ड्यांना घाबरते. म्हणूनच मयुरेश तिला सायकलिंगसाठी सतत प्रोत्साहित करत असतो. 

लोढा नाक्यावरील अभिमान अमृततुल्य चहावाल्याला चहाची ऑर्डर दिली. तेवढ्या वेळेत हिरेनने मुन्नाच्या सायकलचा टायर बदलून टाकला.  डॉ सुमितच्या सायकलची घंटी एकदम भारी वाजत होती. 

अमृततुल्य चहा एकदम फार्मास बनला होता. माझ्यासह काही जणांनी डबल चहा घेतला. सर्वांना एव्हढा आवडला की अमृततुल्य चहाच्या टपरीवर त्याच्या मालकासह सर्वांचा गृप फोटो काढला. या चहावाल्याचे स्लोगन होते  'एकदा चहा प्याल,  तर पुन्हा पुन्हा याल' 


आदित्य काका सर्वाना आग्रहाने चहा पाजत होता. पण स्वतः पीत नाही हे विशेष आहे. त्यामुळे काका नो पार्किंग बोर्ड खाली उभा होता.

प्रशांत सायकलिंग करताना आज खूप रिलॅक्स वाटला. टेस्ट राईड साठी मयुरेशने दिलेल्या कॅननडेल सायकल त्याला सूट झाली होती. जुनी हायब्रीड काढून नवीन MTB सायकल घेण्याचे त्याच्या डोक्यात घोळत होते.

अविनाशने आणखी एक गोष्ट सांगितली. त्याचे मित्र माझ्या ब्लॉगचे फॅन आहेत. तसेच ते सर्व समर्पयामिनां नावाने ओळखायला लागले आहेत. त्यांनी पण सायकली चालवाव्यात आणि भरभरून आनंद मिळवावा हीच माझी विनंती आहे.

वाटेत देसाई गाव लागले. जास्त रहदारीमुळे खड्या खुड्ड्याचा रस्ता होता.  शिळफाट्याकडे जाताना मध्ये डायघर (शिक्षण महर्षी नारायण चौधरी चौक) चौरस्ता लागला येथून छोट्या घाटीचा चढ सुरू होतो. रस्त्याला ट्राफिक असूनसुद्धा सायकली सहजपणे पुढे पुढे जात होत्या. शिळफाट्याला डावीकडे वळण घेऊन महापे नाक्याकडे राईड सुरू झाली. एक भन्नाट उतार लागला त्यावर एल्डन सुसाटत पुढे गेला. माझ्या मागे विजय होता. निर्माण भवन जवळ एल्डन थांबला होता. त्याच्या जवळ  विजय आणि मी थांबलो. 

समोर एक बसस्टॉप होता. त्यावर हेलन केलर नाव लिहिले होते. खूप आश्चर्य वाटले ते नाव वाचून. पाऊण तास थांबलो मागून येणारा कोणीही सायकलिस्ट आम्हाला दिसेना. खूप जणांना फोन केले, पण लागले नाहीत. तेवढ्या वेळात कृझ फोटोग्राफर एल्डन बरोबर खूप गप्पा मारल्या. जगातले १५० देश तो फिरला आहे आणि पाच वर्षात पाच वेळा पृथ्वी प्रदक्षिणा झाली आहे त्याची. याची नोंद गुगलने घेतली आहे. अतिशय तरुण वयात जग पादाक्रांत केल्यामुळे खूप मॅच्युअर्ड आहे एल्डन. आई शिक्षिका तर वडील अभ्युदय बँकेतून अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. 

एक जाणवले सायकलिंग सर्वांना एकाच पातळीवर आणते. निसर्गात एक जादू आहे. प्रत्येक माणूस निसर्गात एव्हढा खुलतो की प्रत्येकजण एकमेकांचे  घनिष्ठ मित्र होतात. मग आपली सुखदुःख सहजपणे शेअर करतात. प्रथमच भेटलेल्या मुन्ना आणि एल्डन आज माझे जिवलग मित्र आहेत. आहे ना कमाल सायकलिंगची. एल्डनला मी आणलेले सुके आवळे खूप भावले.

आता आम्ही तिघांनी राईड सुरू केली. महापे ओलांडून रबाळे मार्गे ऐरोली गावात पोहोचलो. तेथून ऐरोली मुलुंड सिग्नल पर्यंत सायकलिंग करून एल्डनला निरोप दिला.

आता विजयसह मुंबईकडे निघालो. शेवटचा सव्वीस किलोमीटरचा टप्पा पार करण्यासाठी मनाची तयारी केली आणि सुरू झाली सायकल दौड. विक्रोळी जवळ पावसाने गाठले. पुन्हा भिजतच सायकल सफर सुरू ठेवली. कुर्ल्याला पाऊस थांबला. आता पेडलिंग करताना पायाच्या पोटरीत दुखू लागले होते. लक्षात आले, शरीरातले पाणी कमी झाले आहे. प्रियदर्शिनी बिल्डिंग बायपास जवळ सायकल थांबवून पाण्याच्या बाटलीत आदित्यने दिलेली नारळ पाणी पावडर टाकली आणि सर्व पाणी प्यालो. थोडा वेळ बसल्यावर तरतरी आली. 

 पावसात सतत भिजत असल्यामुळे शरीरातील पाणी कमी झाले आहे हे लक्षात येत नाही. त्यामुळे सायकलिंग करताना दर तासाला तहान लागली नसेल तरी पाणी पिणे किती आवश्यक आहे याची जाणीव झाली. 

शेवटच्या दहा किमीची सायकल राईड अतिशय सावकाश आणि रमत गमत केली. आज १२६ किमी राईड झाली होती. घरी जाऊन फ्रेश झाल्यावर स्ट्रेचिंग साठी वीस मिनिटे वज्रासनात बसलो. त्यामुळे पुन्हा एकदम ताजातवाना झालो, पुढील राईड ठरविण्यासाठी.

आजच्या राईडला झेंडावंदन राईड म्हणायचे एक विशेष कारण होते. ते म्हणजे शाळेत असताना आजच्या दिवशी सुट्टी असायची, पण या दिवशी सकाळी शाळेत युनिफॉर्म घालून झेंडावंदनसाठी जावे लागे. पाहुण्यांच्या हस्ते तिरंगा झेंडा अनावरण झाल्यावर राष्ट्रगीत होत असे आणि त्यानंतर आम्हाला खाऊ मिळत असे. विशेष म्हणजे सकाळीच लताबाईंचे  "हे मेरे वतन के लोगो" गाणे ऐकायला मिळायचे. 

खऱ्या अर्थाने,  जसे आपण परमेश्वराला, आईवडिलांना वंदन करतो तीच भावना झेंडा वंदनमध्ये आहे. झेंडा वंदन म्हणजेच राष्ट्राला वंदन होय. 


सतीश जाधव
आझाद पंछी....

8 comments:

  1. खूप छान सफर तुमची.

    सायकल चालवत असताना रस्त्यारस्त्यांवर दिसणाऱ्या, घडणाऱ्या नवनवीन असणाऱ्या अगदी साध्या सुध्या,लहान सान वस्तू, घटनांचे वर्णन खूप देखणे आणि हुबेहूब केले आहे.
    आपण संत माऊली च्या ओवी प्रमाणे तीन समर्पणा पैकी ज्ञान समर्पण खूप मोठ्या प्रमाणात करत आहात.

    ReplyDelete
  2. नेहमी प्रमाणे मोजके पण अचूक शब्द निवड
    काय सांगावे
    प्रत्यक्ष न येता हि अनुभूति।
    असेच तुमच्या दुचाकीवर स्वार व्हा आणि नवनवीन अनूभव मिळवित रहा व आमच्या पर्यत पोहचवीत रहा

    ReplyDelete
  3. Your ride in these circumstances & single-minded pursuit of the entire group is nothing short of outstanding.
    Even more praiseworthy is your such detailed & vivid description. Knowing this route, I felt as if I too was a part of this adventurous group.
    Please keep me in the loop.
    Niranjan Shimpi (Vijay's friend)

    ReplyDelete
  4. सतीश सर, माझी भ्रमणगाथा च्या माध्यमातून तुम्हाला कलाविष्कार करण्याची संधी मिळाली आहे. यातून तुम्ही आपलं व्यक्तिमत्त्व सुंदर राखले आहे. आणि आपण जो शब्द गंध पसरविला आहे‌ तो पारिजातका प्रमाणे आम्हाला आत्मिक समाधान देत आहे. आमची साथ तुम्हाला आहेच. पण त्या पेक्षा तुमचा आधार आम्हाला जास्त आहे.

    ReplyDelete
  5. खुप छान सफर वाचताना उत्सुकता वाढवत जाते. मस्त आवडली सफर.

    ReplyDelete
  6. मैत्रीण वर्षाचे अभिप्राय!!!

    तुझे विस्तृत झेंडावंदन राईड म्हणजे खरोखरच स्वातंत्र्याची 73 वर्षे वाटली मला, निसर्गाचे वर्णन करताना तू कवी होतोस, सायकल स्वारी करताना घोडेस्वार आणि सर्वांना आपलंसं करतोस तू, खूप धमाल केलीस आणि आम्हाला त्यात सामील करून घेतलास, धन्यवाद

    ReplyDelete