Sunday, August 31, 2025

छत्रपती शिवाजी महाराज चातुर्य गरुडझेप सायकल राईड... १७ ते २७ ऑगस्ट २०२५...

छत्रपती शिवाजी महाराज चातुर्य गरुडझेप सायकल राईड... १७ ते २७ ऑगस्ट २०२५...

जय भवानी जय शिवाजी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाचा जयघोष करण्यासाठी... शिवचातुर्य दिन १७ ऑगस्ट २०२५ रोजी गरुडझेप सायकल आणि मशाल घेऊन धावण्याच्या मोहीमेची तेजोमयी सुरुवात झाली... ती आग्र्याच्या लाल किल्यासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्या पासून...

या तेजोमय मोहिमेचा शुभारंभ झाला महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री आशिष शेलार यांच्या शुभहस्ते... आणि आश्वासन मिळाले... आग्र्यात छत्रपतींचे भव्य स्मारक बनविण्याचे...

 ही सायकल मोहीम... ११ दिवसांच्या अखंड आणि प्रचंड प्रयासाने... २७ ऑगस्ट रोजी स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी शिवरायांची  विजयी भगवी पताका फडकवून पूर्णत्वाला गेली...

 १३१० किमीची  ही सायकलिंग मोहीम सहनशक्तीचा परिपाक होता... प्रखर ऊन, मुसळधार पाऊस, ऑफ रोडिंग रस्ते, घाटांचे आव्हान आणि विरुद्ध वाऱ्याचा प्रहार... या प्रत्येकाशी छत्रपतींच्या मावळ्यांनी सिंहाच्या ताकदीने सामना केला....

तरुणांना लाजविणाऱ्या ५६ यंग सिनियर्स सायकलपटूंनी दररोज १२५–१४० किमी सायकल चालवत, छत्रपतींच्या जयघोषात स्वराज्याकडे नेणारा हा हिंदूधर्म रक्षणाचा खडतर मार्ग पार केला... यात नऊ लढवय्या महिला सामील होत्या...

आग्रा... ग्वालियर... शिवपुरी... गुना... पाचोर... देवास... ठिकरी... नरडाना... चांदवड... संगमनेर... भोसरी… आणि अखेरीस स्वराज्याचा इतिहास घडविणाऱ्या  राजगडावर या मोहिमेची सांगता झाली... 

प्रत्येक शहरात सायकल मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळत होता... स्थानिक सायकलिस्ट हसऱ्या चेहऱ्याने स्वागत करत होते आणि पुढील वर्षी मोहिमेत सामील होण्याचे आश्वासन देऊन प्रेरणादायी सोबत देत होते.... 

गुना येथे भेटलेला सायकलिस्ट आशिष गलगले जानी दोस्त बनला... पुढच्या वर्षी या मोहिमेत तो सामील होणार आहे...

भोपाळचा हेमंत खरे फोन करून मार्ग दाखवत होता...  धामनोद येथे भेटलेला आणि आपुलकीने शिवज्योतीबाबत चौकशी करणारा अग्रवाल पुढच्या वर्षी मोहिमेला मदत करणार आहे... 


धुळ्याचा टुरिंग सायकलिस्ट अनिल जाधव लांबच्या प्रवासाचे अनुभव सांगून उत्साह वाढवत होता...
 

मालेगावचा मॅरेथॉन रनर संजय पवार पायांच्या ताकदीतून चिकाटीचे बळ देत होता... लासलगाव येथे भेटलेले जाधव मामा–भाचे प्रेमाने चौकशी करत होते आणि छत्रपतींची महती समजून घेत होते... त्यांनी फक्कड मसाला पान खाऊ घातले...


संगमनेरचा शिवप्रेमी नरेश माळवे शिवप्रेमाच्या संभाषणातून इतिहासाची जाज्वल्य प्रेरणा जागवत होता...


तर घोंडेवाडी येथे भेटलेला अजय शिसोदे याने दुपारच्या जेवणाची झकास ट्रीट दिली...


आणि भारतातून निर्यात होणारे A1 मनुके  अजयने खायला घातले...  पुण्याचा नगरसेवक रुपेश मोरे याने कात्रजवळ झकास कॉफी पाजून क्षुधा शांत केली...
  

या सर्वांची निरपेक्ष मदत, मनापासूनचे प्रोत्साहन आणि प्रेरणापूर्वक सदिच्छांमुळे सायकलिंगची ऊर्जा सतत वाढत होती... त्यामुळेच संपूर्ण मोहिमेचे अवघड टप्पे सहज पार पाडता आले....

संगमनेर येथील खांडेश्वर मंदिरातील सर्व व्यवस्था सायकलिस्ट मित्र कानवडे कुटुंबानी केली होती... तर घारगाव येथे परममित्र चंदन घुले आणि त्याची पत्नी वैशाली यांनी सकाळच्या न्याहारीची फर्मास व्यवस्था केली होती...

या मोहिमेचे शिल्पकार आणि प्रेरणास्थान... गरुडझेपचे संस्थापक व विश्वस्त  मारुती आबा गोळे यांच्या अथक प्रयत्नामुळे १७ ऑगस्ट या दिवसाला शिव चातुर्य दिन म्हणून सरकारने शिक्का मोर्तब केले आहे... छत्रपतींचा जाज्वल्य इतिहास जनमानसांच्या दिलात रुजावा... म्हणून भारतीय पोस्ट विभागाने शिवचातुर्य स्मरण तिकीट प्रकाशित केले... राजगड किल्ल्यावर या तिकिटाचे लोकार्पण करण्याचा क्षण माझ्या जीवनातील अतीव आनंदाचा क्षण होता ...

तसेच सायकल मोहिमेचे शिल्पकार प्रकाश केदारी, शिरीष लोणकर, किरण पाटील आणि गणेश आगाशे त्यांच्या निर्धारपूर्वक आणि अप्रतिम  नियोजनाने ही सायकल मावळ्यांची तेजोमयी मोहीम पूर्णत्वाला गेली...

या हिंदवी स्वराज्याच्या मार्गावर माझ्यासोबत असलेले धैर्याचे सहशिलेदार  नवनीत वरळीकर, महेंद्र निकम, विठ्ठल चव्हाण आणि चंद्रशेखर जगताप... सर्वांनी एकदिलाने छत्रपतींची महती भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस सांगितली... आणि ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली... त्यांच्या पुढील टुरिंग सायकलिंग कार्यक्रमासाठी ही मोहीम अतिशय उपयुक्त ठरणार आहे...


धर्मांध औरंगजेबाच्या ९९ दिवस नजरकैदेत  असताना... आग्र्याच्या मीनाबाजार कोठी येथून छत्रपतींनी चातुर्याने सुटका करून घेतली... तो इतिहास ज्या भूमीवर घडला, त्या पवित्र जागेला भेट देण्याचे भाग्य सुद्धा लाभले....

प्रत्येक भारतीयाने आग्र्याच्या ताजमहाला सोबत छत्रपतींचे होणारे भव्य स्मारक पाहावे, हिच श्रींची इच्छा आहे...

या मोहिमेच्या निमित्ताने खूप नवीन मित्र मिळाले तर जुने मित्र नव्याने उमगले...

मोहिमेत सामील असणाऱ्या नऊ रणरागिणी महिला या तर आमच्या प्रेरणास्रोत होत्या...

ही मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय चातुर्याची आठवण करून देणारा प्रेरणादायी प्रवास होता.. सायकलस्वार, मशाल घेऊन धावणारे मॅरेथॉन रनर, स्थानिक स्वयंसेवक आणि जन प्रतिनिधी... कलाकार... सर्वांनी मिळून शिवज्योती सोबत चालताना शौर्य, इतिहास, श्रद्धा आणि सायकलिंग याचा संगम घडविला होता...

आबांनी सहा वर्षांपूर्वी पेटवलेली गरुडझेपेची ज्योत... आज विराट ज्वाला होऊन प्रज्वलित होत आहे प्रत्येकाच्या मनात...

आग्रा आता छत्रपतींच्या नावाने ओळखला जावा... हिच लोकभावना आहे...

बस्स...  आता एकच ध्यास… भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष दुमदुमत राहावा… आणि त्यांचा जाज्वल्य इतिहास सायकलिंगच्या मार्गाने प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचावा...

🙏 जय जिजाऊ! जय शिवराय! 🚩

सतीश जाधव

7977690693


Friday, August 15, 2025

आग्रा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली हवेली... दि.१५ ऑगस्ट २०२५

आग्रा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली हवेली... दि.१५ ऑगस्ट २०२५

आग्र्याच्या बसै परिसरात असणाऱ्या आँचल किरण धर्मशाळेतून आम्ही दहा सायकल मावळे निघाले दहा किमी अंतरावर असलेल्या... कोठी मीना बाजार हवेलीकडे... 

हिच ती हवेली जेथे छत्रपती शिवाजी महाराजांचे ९९ दिवस वास्तव्य होते... त्यांना नजरकैद करून ठेवले होते... आणि १७ ऑगस्ट १६६६ रोजी अतिशय चातुर्याने छत्रपतींनी आपली सुटका करून घेतली होती...

दहा किमीची सायकल रपेट करत राजा जय किसनदास भवन वाड्याजवळ पोहोचलो...
 
उंच टेकडीवर असलेल्या या वाड्याच्या उजव्या बाजूच्या उतारावर ती ऐतिहासिक वास्तू नजरेस पडली... आणि मन भरून आले...


स्वराज्याच्या इतिहासात अमर झालेल्या त्या पावन भूमीवर उभं राहण्याचा क्षण आज लाभला... आग्र्यातील मीना बाजार सराई मधील राजा जय किसनदास भवन वाड्याजवळची कोठी मीना बाजार हवेली पाहण्याचे भाग्य मिळाले...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली हवेली... या हवेलीच्या दारातून आत जाताना प्रत्येक पावलाबरोबर हृदयात आदराचे तरंग उमटत होते...

हवेलीच्या प्रांगणात हनुमानजीचे मंदिर होते...


जीर्ण झालेल्या भिंतींमधून इतिहासाची स्पंदने जाणवत होती... हवेत आजही स्वराज्याची शौर्यगाथा दरवळत होती.

 १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिवसाची ही आगळी वेगळी भेट होती... स्वातंत्र्याच्या आनंदात... पावन स्थळी उभं राहून मन कृतार्थ झालं... ही क्षणचित्रे हृदयात कायमची कोरली गेली आहेत... छत्रपतींच्या शौर्याची प्रेरणा देणारे हे दीपस्तंभ सदैव उजळत राहतील...

सतीश जाधव
7977690693

Wednesday, August 13, 2025

शिवचातुर्य दिनानिमित्त गरुडझेप मोहिम २०२५ अंतर्गत पायी व सायकल वारी अभियान...

शिवचातुर्य दिनानिमित्त गरुडझेप  मोहिम २०२५ अंतर्गत पायी व सायकल वारी अभियान...

 हिंदवी स्वराज्याच्या इतिहासातील सर्वात महत्त्वपूर्ण दिवस म्हणजे १७ ऑगस्ट १६६६, शिवचातुर्य  दिन...

याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून गरुडझेप घेतली महाराष्ट्राकडे... आणि हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकले...

या घटनेच्या ३५८ व्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही गरुडझेप मोहिम २०२५ अंतर्गत शिवज्योत घेऊन पायी आणि सायकल अभियान आयोजित करण्यात आले आहे...

हिंदवी स्वराज्याच्या अमर इतिहासाला उजाळा देणाऱ्या गरुडझेप मोहिमेच्या सहाव्या पर्वाची भव्य सुरुवात होणार आहे.. रविवार, १७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता...

शिवगर्जनेसह लाल किल्ला, आग्रा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकातून मोहिमेला प्रारंभ होईल...

आग्रा ते राजगड अशी तब्बल १३९० कि.मी.ची हिंदवी स्वराज्य पथावरून  जाणारी ही रोमांचक मोहीम २७ ऑगस्ट रोजी राजगड किल्ल्याच्या गडकोटात शिवज्योत आणि विजय पताकेसह पूर्णत्वास जाईल...

या ऐतिहासिक मोहिमेत शिवज्योत घेऊन धावणारे २५ साहसी मावळे  आणि शिवरायांचे ६० दमदार सायकलिस्ट मावळे सहभागी होत आहेत...

धावेच्या आणि सायकलच्या वेगातून... तसेच हृदयातील शिवगर्जनेतून हिंदवी स्वराज्याचा संदेश सर्व मावळे घरोघरी पोहोचणार आहे...

या उपक्रमात देशभरातून आलेले शिवप्रेमी सहभागी होणार असून, १५० आंतरराष्ट्रीय महिला कलाकरांकडून ‘शिवालय नाटिका’ सादर केली जाणार आहे. तसेच विविध जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांचा सहभाग, मराठी व हिंदी भाषेतील प्रेरणादायी कार्यक्रम, आणि मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिकेही होणार आहेत...

या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. श्री. आशिषजी शेलार, उत्तर प्रदेश सरकारचे कॅबिनेट मंत्री मा.श्री. योगेंद्रजी उपाध्याय आणि आमदार मा.श्री. राहुलदादा कुल यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे...

गरुडझेप मोहिम संस्था, समर्थ गुरु रामदास स्वामी आणि छत्रपती शिवराय प्रतिष्ठान, आग्रा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित केला आहे...


सतीश जाधव
7977690693

Tuesday, August 12, 2025

*🚴‍♂️ दोस्तीची सायकल 🚴‍♂️*दिनांक १२ ऑगस्ट २०२५

*🚴‍♂️ दोस्तीची सायकल 🚴‍♂️*

दिनांक १२ ऑगस्ट २०२५

आजचा अंधेरीकडे  नेणारा सायकलिंगचा प्रवास...  आनंद, उत्साह आणि भेटींच्या जिव्हाळ्याने भरलेला होता...

 खरी दोस्ती ही कुठल्याही अंतरावर थांबत नाही... ती पुढे पुढे चालत राहते... माझ्यासाठी सायकल राईड ही दोस्तांना भेटण्यासाठी निमित्त होतं...

हेल्मेट, ग्लोव्हज, पेडलिंगचा वेग सगळं होतं... पण ध्येय एकच होतं… मित्रांना भेटणं...

रस्त्यातील प्रत्येक वळणावर आठवणींची झुळूक वाहत होती... तेव्हा त्या तीन ओळखीच्या चेहऱ्यांना भेटलो तेव्हा आनंदाचा सुसाट वारा सुटला...

हातात हात, डोळ्यांत आनंद, आणि ओठांवर तीच जुनी हसरी भाषा...भेटून किती बरं वाटलं... फोटो काढताना जाणवलं हा तर आपल्या नात्यांचा आरसा आहे... फोटोच्या चौकटीत एक सुंदर क्षण कैद झाला...

आजचा दिवस शिकवून गेला... अंतर कितीही असो... सायकलचा रस्ता असो वा जीवनाचा... दोस्तीला गाठण्यासाठी नेहमी वेळ काढावा लागतो...

जशी सायकलच्या टायरला हवा हवी... तशी दोस्तीची दास्तान जिव्हाळ्याची व्हावी...

 प्रवास कितीही असो, भेटीत मिळालेला आनंद प्रत्येक क्षण अधिक सुंदर करतो... सायकलिंग आणि दोस्ती... दोन्ही जीवनाला रंग आणि ऊर्जा देतात...

सतीश जाधव

7977690693

Sunday, August 10, 2025

"विश्वंभर @ ७५... ऋणानुबंधांचा अमृत महोत्सवी सोहळा... दि. १० ऑगस्ट २०२५

विश्वंभर @ ७५... ऋणानुबंधांचा अमृत महोत्सवी सोहळा...
दि. १० ऑगस्ट २०२५

परममित्र विश्वंभर पावसकर याच्या आयुष्यातील आजचा खास दिवस... त्याचा ७५ वा वाढदिवस...
 त्याने प्रेमाने अंधेरी टाईम्स स्क्वेअर मधील Barbeque Nation मध्ये बोलावलं होतं... 


महापालिकेच्या नायर रुग्णालयात नोकरी करत असताना १९८० साली आमची मैत्री झाली...  त्याला आता ५५ वर्ष झाली… ती ओळख हळूहळू आयुष्यभराच्या मैत्रीत बदलली... विश्वंभरच्या प्रथम भेटीत हे नाव एवढे भावले की नेहमी त्याला विश्वंभर नावानेच हाक मारली...

माझ्या मागोमाग तो जलविभागात निरीक्षक म्हणून आला... आणि मैत्री अधिक दृढ झाली... लोअर परळच्या माझ्या घरासाठी त्याने केलेली भरघोस मदत मी आयुष्यभर विसरू शकत नाही...

आम्ही एकत्र सहकुटुंब प्रचंड भारतभ्रमंती केली आहे... सेवानिवृत्ती नंतर कार्यालयीन मित्रांचा गोतावळा कमी होत जातो... पण विश्वंभर सोबतची मैत्री आजही तितकीच जिवंत आणि घट्ट आहे...

आशिष आणि केदार... विश्वंभरची दोन्ही मुलं... माझी मुलगी चारूचे जुने मित्र... आजच्या भेटीत दोघांनी पहिली चारूची चौकशी केली...


अंधेरीच्या पंप हाउस परिसरात पावसकर कुटुंब राहत असताना आशिष आणि केदारचे लहानपणी घेतलेले अनेक फोटो आजही डोळ्यांसमोर तरळतात... हेच तर ऋणानुबंध आहेत... ज्यांना काळ, अंतर, आणि परिस्थती सैल करू शकत नाही...

आशिष आता गोरेगावला, केदार भांडुपला राहतो... दोघांची आपुलकी तशीच आहे...

  आजच्या निमित्ताने अशोक रहाटे, प्रकाश पवार आणि यशवंत यांसारखे जिवलग मित्रही भेटले... असे कार्यक्रम जीवनात आनंदाची पेरणी करतात...


स्वप्नाने दिलेल्या गावच्या काजूगराची भेट विश्वंभरला देताना मन भरून आलं... विश्वंभरच्या शंभराव्या वाढदिवसापर्यंत अशाच भेटी घडत राहोत... हिच परमेश्वराकडे इच्छा व्यक्त केली...

विश्वंभरला छान आणि निरामय आरोग्याच्या शुभेच्छा देऊन निरोप घेतला…

– सतीश जाधव
📞 7977690693

Saturday, August 9, 2025

नारळी पौर्णिमेचे मंगल क्षण... दि०९ ऑगस्ट २०२५

नारळी पौर्णिमेचे मंगल क्षण... 

दि०९ ऑगस्ट २०२५

आज नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचा मंगल सोहळा…  आर्य समाज, लोअर परळ येथे चतुर्वेद शतकम् पारायण महायज्ञ होता..  या पवित्र कार्यक्रमात सहकुटुंब सहभागी होण्याचे भाग्य लाभले...

आगमन होताच, पुरोहित पं. भास्कर शास्त्रींनी प्रेमळ हसऱ्या चेहऱ्याने कपाळावर शुभ्र चंदन लेप लावून केलेले स्वागत जणू  आशिर्वादाचा शीतल स्पर्शच होता...

त्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने, मंत्रोच्चारांच्या निनादात, यथासांग होमहवन झाले. यज्ञकुंडातून निघणाऱ्या धुराचा सुगंध आणि मंत्रांच्या लयीने मन एकदम पवित्र आणि प्रसन्न झालं...

विशेष म्हणजे, यज्ञकार्य पूर्ण झाल्यावर पं. भास्कर शास्त्रींच्या पत्नी राजकुमारीताईंनी सर्वांच्या मनगटावर राखी बांधली… त्या क्षणी भावबंध, आपुलकी आणि संस्कृतीची  अनुभूती झाली...

शेवटी अल्पोपहाराचा आस्वाद घेत, मनात समाधान आणि आनंदाची गोड आठवण घेऊन घरी परतलो...

आजचा हा मोठा दिवस... श्रद्धा, संस्कार आणि स्नेह यांच्या अनमोल धाग्यांनी गुंफलेली एक सुंदर आठवण बनून हृदयात कायम राहणार आहे...

सतीश जाधव

7977690693