Monday, May 25, 2020

Mumbai to Kanyakumari Cycling ( Day Eighth) 01.11.2019 Bangalore to Salem मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस आठवा) बंगलोर ते सेलम

मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस आठवा)  01.11.2019

बंगलोर ते सेलम

बंगलोरच्या सिंदूरी हॉटेल मधून सकाळी सहा वाजता सेलमसाठी सायकल राईड सुरू झाली. कनकपुरा विभागातून मधून बाहेर पडून नाईस हायवे जवळ यायला अर्धा तास लागला. 

आज सुद्धा नाईस टोल नाक्यावर आम्हाला अडवले. कालचा सीन पुन्हा रिपीट झाला. दिपकने फोनाफोनी सुरू केली आणि दहा मिनिटात रवी साहेबांनी पाठविलेली पोलीस व्हॅन आमच्या मदतीला हजर झाली. या पोलीस व्हॅनचे एस्कॉर्ट घेऊन आम्ही सर्वजण हायवे वरून रुबाबात निघालो.  बंगलोरमध्ये असलेल्या दिपकच्या ओळखीमुळेच बंगलोर शहरातून आम्ही सर्व सहजपणे बाहेर पडलो. ट्रॅफिकमुळे, जुन्या हायवे वरून राईड करत बंगलोर  बाहेर जायला आम्हाला तीन तास लागले असते ते नाईस रोड मुळे तासाभरात झाले.
 
नाईस रोडवरून 25 किमी राईड झाल्यावर बंगलोरच्या उपनगरातील ट्राफिक मध्ये आलो. या ठिकाणी सोपानराव, विकास, नामदेव, अभिजित आणि दीपक पुढे निघाले. मी आणि लक्ष्मण चहा साठी मागे थांबलो.

चहा घेऊन दहा मिनिटात आम्ही सायकलिंग सुरू केली.  बंगलोर शहराच्या बाहेर आलो आणि सायकलचा वेग वाढला. आज जवळपास दोनशे किमी रायडिंग होते. बराचसा रस्ता उताराचा  होता. तसेच आज वातावरण ढगाळ असल्यामुळे ऊन जाणवत नव्हते

बंगलोर मधून बाहेर पडल्यावर हायवे अतिशय सुस्थितीत होता. त्यामुळे सायकली 25 किमी वेगाने धावत होत्या.   अकरा वाजेपर्यंत आम्ही 80 किमी अंतर कापले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडांची रेलचेल होती. आज सुद्धा ढगांचे वेगवेगळे रंग पाहायला मिळाले. ढगांच्या मागे सूर्याच्या किरणांची होणारी बरसात मन मोहून टाकत होती.  निळ्याभोर नभात पांढऱ्या ढगांचे पुंजके फेर धरून नाचत होते.

रस्त्यात कन्याकुमारी 603 किमी हा माईल स्टोन लागला. कन्याकुमारी आता आवाक्यात आली आहे याची जाणीव झाली. मी आणि लक्ष्मणने आज आघाडी मारली होती. हिरव्यागार झुडपात दिपस्तंभासारखा दिसणाऱ्या माईल स्टोनला पाहून फोटो काढायचा मोह टाळता आला नाही. लक्ष्मणने तर दहा बारा फोटो काढले. मी  त्या माईल स्टोनवर स्वार झालो होतो. इच्छित ध्येय्याकडे मनाचा वारू वायुगतीने पोहोचला होता. 

हायवेच्यामध्ये  वेगवेगळ्या फुलांची हिरवीगार झाडे मस्त डेरेदार झाली होती. या ठिकाणी सुद्धा रस्त्यावर गतप्राण झालेली फुलपाखरे आणि चतुर दिसले. नभात ढगांची लठ्ठालठ्ठी चालू होती. ते वाऱ्याच्या साथीने लपंडाव खेळत होते. निळ्याभोर गगनाकडे पाहताना  "बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात..., भेट आपुली स्मरशी काय तू मनात..." हे भावगीत तरळले. 
आकाशाकडे झेपावणारे उंच उंच कल्पतरूंचे वृक्ष, नभाच्या निळ्या पांढऱ्या रंगात हिरवळ पेरत होते. रस्त्याचा राखाडी, झाडांचा हिरवा, ढगांचा पांढरा आणि नभाचा निळा रंग निसर्गाच्या नयनरम्य दर्शनाची रंगत वाढवत होते. भावविभोर करणारे, हे निसर्गाचे रूप पाहणे म्हणजे पर्वणीच होती. 
छोटीशी घाटी लागली, एका दमात घाटी चढलो आणि काय... त्या घाटाच्या माथ्यावर रसरशीत सीताफळ अवतरली. दोन मोठी सीताफळ फस्त करून नव्या दमान पुढची राईड सुरू झाली.
आता निसर्गाच्या रंगात पहाडी रंग सामील झाला. निसर्गाला कवेत घेऊन पुढची राईड सुरू केली.
 तामिळनाडूचे हत्ती जंगल लागले.  आता उतारावर भन्नाट वेगाने धावत होत्या सायकली. येथेच जपायचे असते. वेगावर नियंत्रण ठेऊन, बाजूने जाणाऱ्या गाड्यांवर लक्ष देऊन, एकाग्र चित्ताने सायकल पळवावी लागते. सोबत समान असल्यामुळे उतारावरच सायकल सांभाळायला कसब लागते.  उतारावर तातडीने ब्रेक लावणे अतिशय धोक्याचे असते.
 
 उतार संपला आणि आम्ही तामिळनाडू मध्ये शिरलो. अटकूरकी गावात नानखटाई आणि डोसा खाल्ला. सोबत  चहा घेतला. दुपारी दोन वाजता कृष्णगिरी टोल प्लाझा येथे पोहोचलो. सतत काहीतरी खात असल्यामुळे जेवणाची इच्छा नव्हती. तसेच आज मोठी राईड होती आणि जेवल्यावर सुस्ती येते. त्यामुळेच मी आणि लक्ष्मण ड्रायफ्रूट चिक्की इत्यादी एनर्जी पदार्थ खात होतो. 
 
 बाकीची मंडळी पुढेच होती.  उताराचा रस्ता संपून आता सरळ रस्ता होता. रहदारी थोडी कमी झाली होती.

दुपारी तीन वाजता कावेरीपट्टणम पर्यंत मी आणि लक्ष्मण आलो होतो. येथून सेलम 98 किमी आहे. लक्ष्मण चुळबुळ करत होता, थोडीशी पेंग आली होती त्याला. परंतु अंधार पडायच्या अगोदर सेलम गाठायचे होते. म्हणून थोडा वेळ थांबून, फ्रेश होऊन पुढील राईड सुरू केली. आता रस्ता सरळसोट होता आणि हेडविंड सुद्धा नव्हते, त्यामुळे वेगात सायकल धावत होत्या.

रस्त्यावरच्या उन्हामुळे मृगजळाचा भास होत होता. हायवेच्या दोन्ही बाजूला रानवाट फुलांचे ताटवे नेत्रसुख देत होते.  खळाळत वाहणारी नदी, छोटे छोटे तलाव, उंच उंच नारळाची झाडे, डेरेदार केळीच्या लागवडी, एका बाजूला दिसणारे हिरवटलेले डोंगर, हे पाहिल्यावर इथेच, या निसर्गात मुक्काम ठोकण्याची मनोमन इच्छा झाली. 
आजूबाजूला असणारी कौलारू घरे सुद्धा हिरव्यागर्द झाडांच्या वाड्यांमध्ये वसली होती. किती सुंदर जनजीवन आहे इथले. फुले, फळे, पक्षी, प्राणी यांच्या सहवासात जगणारी माणसे निरामय जीवन जगतात याची जाणीव झाली.
एक लक्षात आले, एक दिवसात खूप जास्त राईड, या सर्व आनंदापासून लांब ठेवते. फक्त एका ठिकाणाहुन दुसऱ्या ठिकाणी भोज्या करायला पळावे लागते. ज्यांच्याकडे वेळेची वानवा आहे त्यांनी हे करावे. पण निसर्गप्रेमी, अशा सायकलिंग पासून लांब राहील हे नक्की.

सायकलिंगचा उद्देश शरीर स्वास्थ्य तर आहेच पण त्याच बरोबर निसर्ग दर्शन, फोटोग्राफी, जनजीवनाची जवळून ओळख तसेच आपण घेतलेले प्रदूषण मुक्तीचे ध्येय सुसंवादावाटे जनमानसात पोहोचविणे, हा आहे.  नक्कीच, पुढील नियोजित सायकल सफारी याच उद्देशानेच होतील.

सायंकाळी साडेसहा वाजता सेलम पासून 20 किमी अंतरावर पोहोचलो. आता शेवटचा पॅच मारायचा होता. उरलेसुरले ड्रायफ्रूट खाल्ले. लक्ष्मणने अभिजीतला फोन केला. सर्व मंडळी सेलमच्या अलीकडे 15 किमी वर हॉटेल अन्नामार मध्ये उतरली होती. पेडलिंगला  सुरुवात केली आणि 15 मिनिटात अन्नामार हॉटेल गाठले. 

अभिजित प्लॅनिंग मास्टर आहे. गुगल वर सर्च करून राईड करता करता, स्वस्त आणि मस्त हॉटेल शोधून काढत होता. आम्ही अंघोळ करून फ्रेश होई पर्यंत हॉटेल खालच्या रेस्टॉरंट मध्ये जेवणाची व्यवस्था दिपकने केली होती. 

आज एकूण 203 किमी राईड झाली होती. माझ्या सायकलिंग करियर मधली सर्वात मोठी राईड होती आजची.

सतीश विष्णू जाधव

Sunday, May 24, 2020

Mumbai to Kanyakumari Cycling (Day Seven) 31.10.2019 मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस सातवा) सिरा ते बंगलोर

कन्याकुमारी सायकल सफर
31.10.2019 (दिवस सातवा)
सिरा ते बंगलोर सायकलिंग
सरकारी गेस्ट हाऊस मधून सकाळी साडेपाचला  राईड सुरु झाली.
सकाळची सायकलिंग अतिशय आल्हाददायक असते. पूर्व दिशा हळूहळू तांबूस रंगप्रभेने आरक्त होऊ लागली. आकाशांत ढगांचे बागडणे सुरू होते.
आज अभिजित आणि दीपक सर्वात पुढे होते. ब्लुटूथ स्पीकरवर सकाळची आवडती गाणी लावून त्यांची रपेट सुरू होती.  मागोमाग मी आणि लक्ष्मण मोबाईलवर पहाटेची भक्तीगीते लावून, भक्तिरसात न्हात राईड करत होतो. आमच्या मागे विकास, नामदेव आणि सोपान मार्गक्रमण करत होते.
आता सुरू झाला प्रकाश कवडश्यांचा खेळ. काळ्या पांढऱ्या ढगाबरोबर प्रकाशाचे इंद्रधनुष्यी रंग लपंडाव खेळू लागले.
धरणीवर येणारे कवडसे सप्तरंगाची उधळण करीत होते. पावसाळी वातावरणात पहाटे सायकल चालविणे म्हणजे प्रकाश किरणांच्या निसर्ग मार्गावरून स्वर्गारोहण करण्यासारखे होते.

सर्व सवंगड्यांची साथ साथ सफर सुरू होती.15 किमी वरच्या सिरा टोल प्लाझाला तासाभरात पोहोचलो. टपरीवर नानखटाई, केक आणि मसाला चहा घेतला. सर्वजण एकत्रच होतो.
पुढची राईड सुरू झाली. आज लक्ष्मण जोरात होता. सर्वांच्या पुढे सायकलिंग करत होता. सोपान आणि विकास सर्वांना घेऊन येत होते.
नामदेव माझ्याबरोबर सायकलिंग करत होता. नामदेवची पेडलिंग करताना एक विशिष्ट लकब होती. त्याचे दोन्ही खांदे पेडलसह वरखाली व्हायचे. 'चढावर कोणते गियर लावायचे', नामदेवने मला विचारले.
'पुढचा दोन आणि मागचा पाच हे आयडल गियर असतात.  पण तुमच्या पायावर किती प्रेशर येते, त्या प्रमाणे गियर बदलणे गरजेचे असते. तुमचे मोशन कायम राहण्यासाठी, एकाच गतीने पेडलचे स्पिनींग आवश्यक असते, त्यामुळे दमछाक होत नाही. चढावर न थांबता, न थकता सायकलिंग करणे यासाठी हे स्पिनींग टेक्निक वापरतात. मनाली-लेह सायकलिंग मध्ये  युथ हॉस्टेलच्या  शैलेशने हे टेक्निक मला शिकवले होते',  मी नामदेवाला म्हणालो.
  वाटेत बंगलोर 100 किमी माईल स्टोन लागला. 
लक्ष्मण थोडा पुढे राईड करत होता. "बंगलोर",  एक महत्वाचा टप्पा शंभर किमी अंतरावर म्हणजे मुंबई वरून जवळपास 900 किमी अंतर आम्ही पार केले होते. आनंदाला पारावर नव्हता. सायकलने अप्रतिम साथ दिली होती. आज तिला माईल स्टोनची भेट घ्यायची होती.
सायकलचा आनंद माझ्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. पाणी पिऊन माईलस्टोनला नमस्कार करून पुढची राईड सुरू झाली. आज माझ्यासाठी हा माईल स्टोन निसर्ग होता.
पुन्हा ढगांनी आभाळ भरून आले. हळूहळू त्यांनी सूर्यावर आक्रमण केले.
पांढऱ्या ढगांपाठोपाठ काळेजर्द मेघ हत्तीच्या कळपासारखे आकाशावर चालून गेले. पावसाचे निशाण फडकू लागले. आम्ही  आक्रमणाची वाट पाहत होतो. पण वाऱ्याचा पलटवार; त्या मस्तवाल मेघांना भारी पडला. ते उन्मत्त हत्तीसारखे मेघ; सैरावैरा पळू लागले.
निसर्गाचा हा लपंडाव मी स्तिमित होऊन पहात होतो, भान हरपून. 
साठ किमी वरच्या दुसऱ्या टोल नाक्यावर दहा वाजता पोहोचलो. मस्त लुसलुशीत डोसा, मिरचीची भजी, सोबत बटाटा आणि शेवग्याच्या शेंगा घातलेले सांबर आणि केसरी रंगाची खोबरे चटणी ह्या नास्त्यावर आडवा हात मारला.
आज आमचा अकाऊंटंट नामदेव रंगात आला होता. सर्वांबरोबर सेल्फी काढत होता.
 सायकल सोबत सुद्धा त्याने सेल्फी काढला. त्याच्या चेहऱ्यावरील निर्मळ हास्य बरेच काही सांगत होते. सकाळीच बायकोबरोबर गप्पा मारल्या होत्या त्याने, तीला सर्व सेल्फी पाठवायचे होते.
  आणखी पंधरा किमी सायकलिंग केली.  जवळपास 80 किमी राईड झाली होती. वाटेतील छोट्या टपरीवर उत्तप्पा इडली सांबर आणि चटणीचा आस्वाद घेतला. लक्ष्मणने आज मसाला मसाला डोसा खाल्ला. या डोस्याच्या तव्यावर अंडी तळतात, म्हणून लक्ष्मण कुठेही डोसा खात नव्हता. खाता खाता नामदेवाने सर्व सेल्फी बायकोला पोष्ट केल्या होत्या.
वातावरण अजूनही पावसाळी आणि ढगाळ होते. परंतु पाऊस पडत नव्हता. कदाचित आमची प्रदूषण मुक्तीची राईड सुखरूप आणि प्रशस्त व्हावी, यासाठीच वरुण राजाने न बरसण्याचे  फर्मान काढले असावे.
बंगलोरचा नाईस हायवे  अजून 40 किमी होता. तेथून पुढे 35 किमी सायकलिंग करायचे होते. 
माझ्यासह लक्ष्मण, दिपक आणि अभिजित यांनी जोरदार मुसंडी मारली आणि नाईस हायवे जवळ पोहोचलो.
हा हायवे प्रायव्हेट आहे.  BOT (Built, Own & Transfer) तत्वावर, हा हायवे  34 वर्षाच्या करारावर नाईस संस्थेने बांधला आहे. 34 वर्ष, टोल वसुली नाईस संस्था करणार आहे. यामुळे बंगलोर मुख्य हायवेची रहदारी बऱ्याच अंशी कमी झाली आहे.
परंतु हा रस्ता सायकलसाठी निषिद्ध आहे.  नाईस टोलनाक्यावर पोहोचताच, तेथील सिक्युरिटी गार्ड अक्षरशः आम्हाला हाकलून लावत होते. दिपकची फोनाफोनी चालू झाली.  काय आश्चर्य ! !   थोड्या वेळातच मुख्य सुरक्षा अधिकारी रंगनाथ धावत आला. तुम्ही एकून कीती जण आहात. मागची मंडळी किती वाजता येतील, याची चौकशी केली. दिपकची चक्रे फिरली होती. मगाशी हाकलवून लावणारे गार्ड आम्हाला पाणी देऊ लागले. आम्हाला बाजूच्या रेस्टरूममध्ये थांबायला सांगितले.
थोड्याच वेळात सोपान, विकास आणि नामदेव  नाईस हायवेला आले.  मग काय, पोलीस एस्कॉर्ट मध्ये,  त्या 42 किमीच्या नाईस रोडवरून आमच्या सायकली धावू लागल्या.
दिपक पोलीस व्हॅन मध्ये बसून थांबलेल्या आणि बाजूने जाणाऱ्या गाड्यांना सूचना देत होता. सायकलींची शाही सवारी निघाली होती. अफलातून दिपकमुळे सायकलींना नाईस रोड पाहता आला. दिपकने बंगलोरच्या होम मिनिस्ट्री मध्ये फोन लावला होता. त्यामुळेच त्या हायवेवरून राईड सुरू झाली.  क्या बात है, दिपक!!!
आम्ही नाईस रोड वरून मध्येच बांनारकट्टा एक्झीटला बाहेर पडलो. तेथून तडक कनकपुरा पोलीस स्टेशनमध्ये गेलो. तेथील वरिष्ठ पोलीस अधिकारी रवी  सरांनी नाईस रोड बाबत आम्हाला मदत केली होती.
सायंकाळी सहा वाजता कनकपुरा भागातील तीन स्टार  'सिंदूर गार्डन हॉटेल' मध्ये पोहोचलो. 
आज 155 किमी राईड झाली होती. आमची रहायची आणि जेवणाची व्यवस्था सुद्धा पोलीस अधिकारी रवी सरांनी केली होती.
या हॉटेलच्या रेस्टॉरंट मधील मासे आणि टायगर कोळंबीने जेवणात बहार आणली. रात्री आम्हाला आवर्जून भेटायला आले, पोलीस अधिकारी रवी सर. बंगळूरमध्ये आमचे जंगी स्वागत झाले होते.
या हॉटेलवर, दिपकचा आणखी एक घनिष्ठ सायकलिस्ट मित्र  'सलीम' आमच्या भेटीला आला होता. या सलीमने 1997 मध्ये बंगलोर ते हज सायकलिंग केले होते.  मुंबईत व्हिसासाठी दिपकने सलीमला मदत केली होती. ती ओळख अजूनही सलीमने ठेवली होती. त्याने खास आमच्यासाठी 'चिकन 65'  ही मुघलाई डिश आणली होती.
आणखी एक खासियत पाहायला मिळाली,  दिपकची.  कोणत्याही मोठया हॉटेलमध्ये बाहेरील पदार्थ निषिद्ध असतात. दिपकने रेस्टॉरंटच्या मुख्य कप्तानाला सांगितले, 'सलीमने आमच्या प्रेमाखातर चिकन 65  आणले आहे. पण तुमचा नियम आम्हाला मोडायचा नाही, तुम्हीच सांगा काय करू'. दिपकची हे मिठास बोलणे ऐकून आम्हाला सलीमची डिश खायची परवानगी मिळाली.
  रात्रीचे बंगळूर जबरदस्त भावले. सलीम सारखा झकास मित्र मिळाला. मस्त वाटला सलीम.  त्याच्या सोबत युरोप सायकलिंग करायची इच्छा आहे.
  नाईस रोड,  पोलीस अधिकारी रवी सर, सलीम ही मंडळी आणि आजच्या सफरीतील निसर्ग;  'बंगळूर' बरोबर कायम स्मरणात राहील.
 
  ध्यानीमनी नसताना आजची सायकल सफर, अतिशय आल्हाददायक, पाऊस विरहित आणि बंगलोरच्या प्राईम रस्त्यावरून झाली होती. दुपारी उन्हाचा दाह सुद्धा जाणवला नव्हता. आज निसर्गाचा वरदहस्त आमच्यावर झाला होता.

  सातव्या दिवशीच हजार किमी अंतर पादाक्रांत केले होते. आयुष्यातील पहिली मोठी राईड दोस्तांच्या साथीने भन्नाट अनुभवली होती. पुण्यात प्रथमच भेटलेले दोस्त आता माझ्या जिवाभावाचे मित्र झाले होते.
 
  एखाद्या व्यक्तीला मित्र म्हणून स्वीकारायचे असेल तर त्याला सोबत, सायकलिंगसाठी न्या. दिवस रात्र एकत्र राहिल्यावर त्याचे मूळ स्वभाव आपल्याला समजतात. यातून झालेली मैत्री कायमची असते. त्यांची ओळख खूप जुनी आहे, असेच मग प्रतीत होते.

 
आजचा दिवस दिपकचा होता.
 हॅट्स ऑफ दिपक !!!

सतीश विष्णू जाधव

Tuesday, May 19, 2020

Mumbai to Kanyakumari (Day Six) 30.10.2019 मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस सहावा) दावनगिरी ते सिरा

मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर
(दिवस सहावा)   30.10.2019

*दावनगिरी ते सिरा *

सकाळी सहा वाजता दावनगिरीच्या पोलीस गेस्ट हाऊस मधून राईड सुरू झाली. 

रस्त्यावर वाहने तुरळक होती. सरळसोट क्षितीजाकडे जाणार रस्ता, शेवटी एका बिंदूपाशी संपत होता. जणूकाही पुढील वाट आसमंतातील असावी.  त्या वाटेवर काळे निळे ढग आमच्या स्वागताची तयारी करत होते.

दाटले आकाशी ढग काळेशार ...

ओथंबले धरेवर अधीर अनिवार

मनी अधीरता लक्ष्य गाठण्याची ...

भ्रांत सोबत्यांची तशीच स्वतःची 

तरीही चालणे वाट अतिआनंदाची ...

असे ती भरतभूच्या प्रदूषण मुक्तीची

15 किमी वरच्या बिनधास्त ढाब्यावर आलो.  याच धाब्यावर रात्रीचे जेवण जेवलो होतो.  मस्त गरमागरम पराठे खाल्ले आणि सुरू झाली पुढची राईड. लवकर लवकर सायकलिंग करा म्हणून सोपानराव घाई करत होता.  तेव्हढ्यात  या धाब्यावर कोल्हापूरहुन बालाजीला जाणारे पाटील  कुटुंब भेटले. त्या कुटुंबातील दोन मुली सायकलिस्ट होत्या. आमच्या बरोबर फोटो काढले. सोपान, विकास आणि नामदेव यांनी राईड सुरू केली.


पहाटे पाऊस पडला होता, त्यामुळे रस्ते ओले होते. रस्त्यावर पसरलेल्या ओलसर मातीमुळे, टायरमधून चर.. चर.. आवाज येते होते. वातावरण अजूनही ढगाळ होते, कधीही पाऊस पडावा असे.


वाटेत लोटस मंदिर लागले.

 हे मंदिर उघडे बोडके  होते. विशेष म्हणजे चारही कडांना साखळी बांधून मध्ये मूर्तीच्यावर स्टीलची मेघडंबरी छत्र म्हणून लटकवण्यात आली होती. एकदम आगळे वेगळे वाटले हे मंदीर. मंदिरावर कानडीत लिहिले होते, त्यामुळे ते कोणत्या देवाचे आहे ते कळले नाही.

वेळ न दवडता आम्ही पुढे निघालो. रस्त्यात आम्ही कप्तान सोपान आणि कंपनीला गाठलेच. तासाभरात एव्हरग्रीन ढाब्यावर येऊन  डोसा आणि गरम इडली भरपेट खाल्ली.

आज लक्ष्मण आणि मी सर्वांच्या पुढे होतो, ते थेट चित्रदुर्ग पर्यंत. कालच्या मिटिंगनुसार मागे राहायचे नाही हे मी आणि लक्ष्मणने ठरविले होते.  दावनगिरी ते चित्रदुर्ग ही जवळपास 75 किमी राईड होती.  सकाळी वातावरण ढगाळ होते. त्यामुळे आज सूर्यदर्शन झाले नाही. दहा नंतर लागणाऱ्या उन्हाचा चटका सुद्धा नव्हता.  पुढचा स्टॉप चित्रदुर्गला जेवणासाठी होता.

लक्ष्मण आणि मी भराभर पुढे जात होतो. अभिजीतची तब्बेत नरम गरम होती,  आज दिपक अतिशय उत्साहाने आणि दमदार राईड करत होता. नामदेव त्यांना कंपनी देत होता.  विकास आणि सोपानराव एका विशिष्ट गतीने पुढे चालले होते. आम्ही चित्रदुर्ग या छोटेखानी शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सहकाऱ्यांची वाट पाहत थांबलो. पावणे अकरा वाजले होते.  

तेव्हढ्यात पंधरा मिनिटे लक्ष्मणने छान डुलकी काढली.   'मागे या' म्हणून कप्तान सोपनचा फोन आला. आमच्या भेटीचे ठिकाण 2 किमी मागे होते.

चित्रदुर्गच्या शून्यपिठाला भेट म्हणजे दिपकच्या ओळखीची पराकाष्ठा होती. आम्हाला आराम करायला एक मोठी खोली मिळाली. स्वामी शिवमूर्ती बसवेश्वरांची झालेली भेट आणि त्यांनी आमच्या कन्याकुमारी राईडला दिलेल्या आशीर्वादाने आम्ही सर्व भारावून गेलो. याच मठात दुपारच्या भोजन-प्रसादाचा आम्ही लाभ घेतला. या चित्रदुर्गला प्राचीन किल्ला आहे. तसेच  महाभारतातील भीम पत्नी हिडीम्बाचे हे गाव आहे.

पुढची राईड सुरू झाली . जोरदार वारे वाहत होते त्यामुळे दोन तासात जवळपास 30 किमी राईड झाली. पुढे अचानकपणे मळभ भरून आले आणि जोरदार पाऊस सुरू झाला. या पावसात पुढचे काही दिसेनासे झाले, तरी सुद्धा लक्ष्मण आणि मी हेड लाईट चालू करून भिजत सायकलिंग करत होतो. जवळपास तासभर झाला तरी पाऊस थांबायची लक्षणे नव्हती. तेव्हढ्यात एक धाबा लागला. आम्ही दोघांनी त्याचा आसरा घेतला. पाऊस थांबल्यावर पुढची राईड सुरू केली.

 अर्ध्या तासात पुन्हा ढगांनी दाटी  केली. पुन्हा पाऊस सुरू झाला. 

आम्ही दोघेही चिंब भिजलो होतो.  आता आसरा पाहत होतो. पुढे एका धाब्यावर थांबलो. पाऊस थांबायची काहीही लक्षणे नव्हती.

धाब्यावर भाषेची अडचण जाणवू लागली. सिरा कडे जाणारा रस्ता कसा आहे. राहण्याची व्यवस्था कुठे होईल याची माहिती मिळाली नाही.

तेवढ्यात एक टेम्पो त्या धाब्यावर आला. त्याच्याकडून माहिती मिळाली. अजून चाळीस किमी वर सिरा गाव होते. पुढची राईड सुरू झाली, रस्तावर ट्राफिक तुरळक होती. पाऊस सुरूच होता, परंतू त्याचा जोर कमी झाला होता.

पुढे चालणाऱ्या गाड्यांमुळे सायकल आणि आम्ही नखशिखांत बरबटलो  होतो.  चाकातून उडणाऱ्या चिखल मिश्रित पाण्यामुळे गावाच्या जत्रेत नाचणाऱ्या खेळीया सारखा चेहरा झाला होता. अशा अवतारात घरच्यांनी सुध्दा आम्हाला ओळखले नसते.
अंधार पडायला सुरुवात झाली, रस्त्यात चौकशी केली असता सिरा अजून दहा किमी पुढे आहे हे समजले.

पाऊस थांबला होता पण रस्ते ओले होते. अंधार पडला होता. सायकलचे लाईट चालू करून आम्ही चाचपडत सिराला पोहोचलो.

शेवटच्या काही किलो मीटर्समध्ये दिपक सुद्धा प्रचंड थकला होता.. सोपान, विकास , नामदेव आणि अभिजित आमच्या मागोमाग  सिराला पोहोचले.  आज 140 किमी राईड झाली होती.

सिराला अभिजितच्या ओळखीने पीडब्लूडी गेस्ट हाऊसमध्ये राहायची व्यवस्था झाली. दोन खोल्यात सर्वांना ऍडजस्ट व्हावे लागले.

आंघोळ करून सॅकमधील कपडे काढून सुकविण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा लागला. जेवून झोपायला रात्रीचे 11 वाजले.

 आम्हाला पावसाने झोडपले, चिखलाने माखविले  आणि जिद्दीने  सिरा पर्यंत  पोहोचविले

 एक थ्रिलिंग आणि वेगळा अनुभव होता, धुवाधार पावसात राईड करण्याचा.  पावसाचा जोर एव्हढा होता की चष्म्याला सुद्धा वायपर लावायला हवे होते.

निसर्गाचे अनंत आविष्कार आजच्या राईड मध्ये पाहायला मिळाले.

किती सुंदर आहे हे आयुष्य ! !

आणि असे अनुभव जीवनाचे सौंदर्य आणखी वाढवत होते ! ! !

सतीश विष्णु जाधव

Saturday, May 16, 2020

Mumbai to Kanyakumari Cycling (Day Five) 29.10.2019 Dharawad to Davangiri. मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस पाचवा) धारवाड ते दावनगिरी

मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर
29.10.2019   (दिवस पाचवा)

धारवाड ते दावनगिरी

धारवाडच्या कृषी विद्यापीठ हॉस्टेल मधून सकाळी साडेपाच वाजता सायकलिंग सुरू केले.

  20 किमी राईड करून,  हुबळी जवळील टोल नाक्यावर हायड्रेशन ब्रेक घेतला. चहा, बिस्किटे खाल्ली.

सोपान म्हणाला,  'लवकर चला आज मोठा पल्ला मारायचा आहे'. नामदेव निघण्यासाठी चुळबुळ करत होता. तो आमचा खजिनदार असल्यामुळे चहावाल्याचे पैसे दिल्याशिवाय त्याला निघता येत नव्हते. विकास लांबूनच त्याची गंम्मत पाहत होता. सोपान आणि विकासकडे हायब्रीड सायकल होती, तर नामदेवकडे MTB, त्यामुळे नामदेवला सायकलिंग करताना जादा जोर काढावा लागत होता. नामदेवाने व्रत घेतले होते, सोपान आणि विकासची पाठ सोडायची नाही. जसे की संत जनाबाईने नामदेवांची पाठ कधीच सोडली नाही.

40 किमी वर 'वीरालमेना' गावात एक टपरी लागली. दिवाळी निमित्त बाजूचा प्रणव धाबा बंद होता. टपरीवरच्या काकीने झकास उपिट खायला घातले. वर चहा पिऊन पुढची राईड सुरू केली.  मी आणि लक्ष्मण निसर्ग भ्रमंतीमुळे मागे राहिलो होतो. मामाच्या गावाला जाऊया, पळती झाडे पाहूया, हे गाणे प्रत्यक्ष अनुभवत होतो.

सहा पदरी हायवे वर गाड्यांची रहदारी कमी होती. सकाळी दहाच्या दरम्यान पांढऱ्याशुभ्र  ढगांनी आकाश भरून टाकले होते. ढगांचे वेगवेगळे आकार मनाला भावले होते.   ओठावर "दिवाना हुवा बादल, सावन की घटा छायी" गाणे तरळले. लक्ष्मण दोन्ही हात पसरून ढगांना कवेत घेत होता.

आणखी 18 किमी राईड झाली दहा वाजले होते. उन्हे चढू लागली होती. 

वाटेत एका टपरीवर थांबलो. मुंबईवरून आलेले नाईक कुटुंब भेटले. त्या कुटुंबातील मुलांना आम्ही प्रदूषण मुक्त भारत ही संकल्पना घेऊन "मुंबई ते कन्याकुमारी" सायकलिंग करतोय, याचे खूप अप्रूप वाटले. सर्व कुटुंबियांनी आमच्यासह फोटो काढले.

दिवाळी फराळ खायला दिला. आपली मराठी माणसे जेव्हा परप्रांतात भेटतात तेव्हा घरातील माणूस भेटल्याचा आनंद होतो.

पुढची राईड सुरू झाली, आता सर्व बाजूला मोठमोठया पवनचक्क्या फिरत होत्या.

या भागात वाहणाऱ्या वाऱ्याचा, वीजनिर्मितीसाठी प्रचंड उपयोग करण्यात आला होता. रस्त्यात मोठे मोठे ट्रेलर्स; पवनचक्यांचे सुटे भाग, पाती घेऊन चालले होते.  पांढऱ्या ढगांनी आच्छादलेले निळेभोर आभाळ आणि त्यावर पवनचक्यांची रांगोळी, खरच निसर्ग सुद्धा दिवाळी साजरी करत होता. लहानपणी जत्रेत मिळणाऱ्या 'भिरभिऱ्यांची' आठवण पवनचक्क्या देत होत्या. आमचे सुपर सवंगडी पुढे सटकले होते. लक्ष्मण आणि मी 'साथ साथ' चाललो होतो. पण जेव्हा सायकलवर असतो तेव्हा मनाची साथ असते भन्नाट वेगाने पळणाऱ्या.

ऊन वाढल्यामुळे 12 किमी वर शिंगगाम गावात श्री जयलक्ष्मी परिवार धाब्यावर हायड्रेशन ब्रेक घेतला. "अनिया पकोडा" म्हणजे  कांदा भजीची ऑर्डर दिली पण भजी तयार नव्हती. म्हणून मी कोल्ड ड्रिंक आणि लक्ष्मणने कॉफी घेतली आणि पुढची सफर सुरू केली.

आता ऊन आणि वारा यांचा दमछाक करणारा मारा सुरू झाला. दुपार झाली होती. सोपान आणि सुपर सवंगडी हवेरी गावाच्या आसपास राजस्थानी ढाब्यावर जेवायला थांबले होते. आम्ही दोघे हवेरी गावात शिरलो. कुठेही ढाबा सापडेना. गावातील गावकरी आमची विचारपूस करत होते. तेव्हढ्यात मोटरसायकलवर दोन राजस्थानी भेटले.

त्यांनी सांगितले हायवे बायपास वर राजस्थानी धाबा आहे. तुम्ही आता गावात आला आहात. आमची आस्थेने चौकशी करून त्यांनी मस्त चहा पाजला.

हायवेला आलो वाटेत 'हवेरी नाला' तुडुंब भरून वाहत होता.

त्यावरील जुना दगडी पुल,  विजयनगर साम्राज्यातील तुंगभद्रा नदीवरील हंपीच्या पुलाची आठवण देऊन गेला.

तसेच हायवे वर आलो, तर राजस्थानी धाबा मागे गेला होता आणि दुसरा दहा किमी पुढे होता. पुढे जायचे ठरविले. रणरणत्या उन्हात पेडलिंग करत होतो. 

तेवढ्यात लाल शर्ट घातलेला मोटर सायकलवाला पुढे जाऊन थांबला.  आम्ही जवळ आल्यावर आमची चौकशी केली. 'रवींद्र' पण सायकलिस्ट होता. आम्ही प्रदूषण मुक्तीचा संदेश घेऊन कन्याकुमारीला जातोय, हे ऐकल्यावर त्याने आईने बनविलेल्या करंज्या खायला दिल्या. पोटात भुकेचा डोंब उसळला होता, त्यात घरची करंजी म्हणजे 'वाळवंटात ओयासिस' सापडले होते. त्याच्या शुभेच्छा आणि प्रेमाने दिलेले करंज्याचे पाकीट घेऊन पुढे निघालो.

जवळपास 105 किमी सायकलिंग झाले होते. मोतिबिनोर गावाच्या जवळ घुमर राजस्थानी ढाबा लागला. दुपार झाली होती.  जेवायची इच्छा नव्हती. चहा बिस्कीटे खाल्ली. लक्ष्मणाला झोप येत होती. दुपारच्या कडक उन्हात माझी सुद्धा सायकल चालवायची इच्छा नव्हती. थोडा आराम करून पुढे निघालो.

आणखी तीन किमी वर मोतिबिनोर बस स्टँड होता. राजस्थानी पाणीपुरीवाल्याकडे रगडापुरी खाल्ली. स्टँड जवळच एक ऑटोवाला होता. त्याने आमची कानडीत  चौकशी करायला सुरुवात  केली. आम्ही मुंबईवरून आलो समजताच मराठी बोलायला लागला. त्याने पुढील रस्त्याची माहिती दिली.

दावनगीरीचे अंतर अजून 58 किमी होते. दुपारचे तीन वाजले होते.  पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या.   20 किमी सायकलिंग केले.  रानेबेंनूर गावातील टपरीवर चहा नानखटाई खाल्ली.

पुढे 11 किमी चालेगिरी टोल प्लाझाला थांबलो,  सूर्यबिंब आता मावळतीला लागले होते.  ढगाआड लपू लागले. 

काळ्या ढगांबरोबर किरणांचा लपंडाव सुरू झाला. काळे पांढरे मेघ सुवर्णकडांनी आरक्त झाले होते. निसर्गाचे हे आगळे वेगळे रूप डोळ्यांचे पारणे फेडत होता.

प्रभाकर जोगांच्या व्हायोलिनवरील जुनी गाणी मोबाईल वर लावली होती.

सायकलचा वेग वाढला आणि पुढील 27 किमी दीड तासात पार करून दावणगिरी गाठले. आज 168 किमी सायकलिंग झाले होते.

दावणगिरी हे दक्षिण भारतातील कर्नाटक राज्याच्या मध्यभागी असलेले मोठे शहर आणि दावणगिरी जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. हे कापसाचे  हब असून भारताचे "मँचेस्टर" म्हणून प्रसिद्ध आहे.

सध्या त्याची स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी निवड झाली आहे.

दावनगिरीला सुद्धा दिपकने कमाल केली होती. तेथील पोलीस सुप्रीन्टेंडेंटच्या ओळखीने, पोलीस गेस्ट हाऊसमध्ये आमची राहायची आलिशान व्यवस्था होती. येथेच दिपकचा आणखी एक मित्र ड्रायफ्रूट आणि फळे घेऊन आमच्या स्वागताला आला होता.

त्याच्याबरोबर गप्पा मारत असतानाच,  खुद्द पोलीस सुप्रीन्टेंडेंट साहेब आले. आमची आस्थेने चौकशी आणि सन्मान केला.

  दोन इन्स्पेक्टर आणि पोलीस व्हॅन देऊन रात्री सामिष भोजनाची व्यवस्था सुद्धा केली. बिनधास्त फॅमिली ढाब्यावर जेवण झाले.

पुढील सायकलिंग साठी सर्वांची मिटिंग झाली. दुपारच्या जेवणपर्यंत सर्वांनी कटाक्षाने एकत्र राहायचे ठरविले. कालच्या सायकलिंगमध्ये तसे झाले नव्हते.

मिटिंगमध्ये विकासने एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगितली, ' जेव्हा घाट किंवा चढ लागतो तेव्हा खूप वर पाहिलं तर चढ अंगावर येतो.  पुढे गेलेल्या सायकलिस्टला आपण गाठू का, असा नकारात्मक भाव निर्माण होतो, आणि आपला रिदम तुटतो. अशावेळी फक्त पुढच्या चाकाच्या थोडेसे पुढे पाहून पेडलिंग करत राहणे'.  खरे होते विकासचे म्हणणे,

   आपले अंतिम लक्ष कन्याकुमारी असताना, छोटे छोटे घाट का बरे पहायचे?'. अनुभवानेच अशा गोष्टी शिकायला मिळतात.

या वेळी सोपानरावांचे हसतमुख आणि हावभावयुक्त  बोलणे, एकदम फर्मास होते. व्यवसायिक असल्यामुळे, समोरच्याला पटविण्याची हातोटी सोपानकडे अफलातून आहे, हे समजले.   लिडरशीप क्वालिटीज त्यात खच्चून भरल्या होत्या.

दिपकच्या मित्राने आणलेले कलिंगड रवाळ तर  सफरचंद एकदम कडक आणि रसरशीत होते.  फळे खाऊन निद्राधीन झालो, सकाळी चार वाजता उठण्यासाठी.

सतीश विष्णू जाधव.

Friday, May 15, 2020

Mumbai to Kanyakumari Cycling (Day Four) 28.10.2019 मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस चौथा) संकेश्वर ते धारवाड

मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस चौथा)  २८.१०.२०१९ संकेश्वर ते धारवाड
संकेश्वरमधील राजधानी हॉटेलच्या टेरेसवरून सायकल खाली घेऊन सामानाची बांधाबांध करून सायकलिंग सुरू करायला सकाळचे सहा वाजले.
प्रभातीच्या सुवर्णछटांनी आसमंत दरवळून निघाला होता.
.
तुरळक काळे मेघ क्षितिजावरील सुवर्णप्रभांमध्ये गहिरे रंग भरत होते. शांत धुंद गुलाबी हवा ढगांच्या रथावर आरूढ होऊन, सुवर्ण किरणांचे आगमन भूतलावर प्रशस्त करीत होती.
सकाळी सर्वांनी स्प्रिंट मारायचे ठरविले. 22 किमी अंतर एका तासात पार केले आणि हत्तरगी टोल प्लाझाला पोहोचलो.
.
तेथे चहा, बिस्कीट खाऊन तडक सायकलिंग सुरू केले.
सकाळचे वातावरण अतिशय आल्हाददायक होते. थोड्या वेळातच आसमंत सोनेरी रंगाने प्रकाशमान झाला.
.
दारमानकी गावाजवळ, सायकलवर एक वयस्क गृहस्थ चालले होते. त्यांच्या जवळून सायकल चालवायला लागलो आणि नाव विचारले, 'बाळाप्पा शिवाप्पा पवार' वय वर्ष ७०,
.
वयाच्या १५ वर्षांपासून सायकल चालवितो, आता दररोज १० किमी राईड करतो', पवार आजोबांनी, त्यांचा सायकल प्रवास सांगितला. खूप आनंद झाला पवार आजोबांना भेटून. अजूनही धडधाकट आणि तुकतुकीत चेहऱ्याचे आजोबा खूप भावले. आम्ही कन्याकुमारीला सायकलवरून "प्रदूषणमुक्त भारत" हा संदेश घेऊन निघालोय, हे सांगितल्यावर, त्यांनाही आनंद झाला. त्यांच्यासह फोटो काढून, त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे निघालो.
मध्ये एक छोटा घाट लागला . घाट चढण्याअगोदर दोन केळी खाल्ली, त्यामुळे मस्त एनर्जी आली होती. माथ्यावर पोहोचलो, पलीकडून येणाऱ्या वाऱ्यावर पाण्याचे दोन घोट मारले.
आता भन्नाट उतार सुरू झाला, वाऱ्यावर आम्ही सर्व विहरत होतो. सोपान, विकास आणि नामदेव सुसाटत पुढे निघाले होते. त्यांच्या मागे अभिजित आणि दिपक अगोदर केलेल्या सायकलिंगच्या गप्पा मारत चालले होते. लक्ष्मण आणि मी निसर्गभ्रमणचा आनंद घेत आणि फोटो काढत पेडलिंग करत होतो.
नऊ वाजेपर्यंत जबरदस्त राईड झाली ४५ किमी अंतर सहज पार केले होते. हा प्रदेश कर्नाटकमध्ये असून सुद्धा खूप मराठी माणसे भेटत होती.
ककती गावात नास्ता घेण्यासाठी थांबलो. प्रशांतचा सायकालिस्ट मित्र निखिल आम्हाला भेटायला आला होता. प्रशांतला खूप आनंद झाला. त्याने आमच्यासह १० किमी सायकलिंग केले. त्याच्या शुभेच्छा घेऊन पुढील राईड सुरू झाली.
रस्त्त्यात ७२ वर्षाचे 'कृष्णाप्पा बोंगाळे' काका भेटले. सायकलिंग करत शेतावर निघाले होते. आम्ही कन्याकुमारीला प्रदूषणमुक्तीचा संदेश घेऊन चाललोय याचे खूप अप्रूप वाटले त्यांना. काकांनी, सर्वांच्या खाऊसाठी वीस रुपये बक्षीस दिले आणि योग जागृतीचा सुद्धा प्रसार करा हा संदेश दिला. काकांकडून उस्फूर्तपणे मिळालेले बक्षीस आमच्या प्रदूषण मुक्तीच्या प्रयत्नांना मिळालेले सर्वात मोठे प्रशस्तीपत्र होते.
आता दुपारचे बारा वाजले होते. वरमुंटी घाट चढायला सुरुवात केली. माझ्या सोबत लक्ष्मण सायकलिंग करत होता. घाटात सोपान, विकास, नामदेव, अभिजित आणि दीपक आमच्या पुढे गेले.
घाटाच्या माथ्यावर गेल्यावर तेथे असलेला ऊसाचा रसवाला धावत आला आणि तुमच्या माणसाने रसाचे २० रुपये दिले नाही म्हणून सांगितले. प्रत्यक्षात आम्हाला रस पाजावा, म्हणून अभिजीतने त्याला २० रुपये आगाऊ दिले होते. अशी पण माणसे जीवनप्रवासात भेटतात आणि शिकवून जातात.
पुढे सायकलिंग करताना 'भीमा संताजी' आजोबा भेटले. ते म्हणाले, 'सायकलिंग करतच, मी तालुक्याच्या बाजारात नियमित जात असतो. त्यामुळे गावातील सहकाऱ्यांची खूपशी कामे पटापट होतात'. काटक पण धडधाकट भीमा आजोबांना नमस्कार करून पुढे निघालो.
दरम्यात 'इरेबागेवाडी' येथे चहा प्यायला थांबलो. तेथे तरुण 'संगू गायकवाड' भेटला. आमची आस्थेने चौकशी केली, "हुबळीला काय मदत हवी असेल तर सांगा" हे त्याचे बोल, जवळच्या परिचितासारखे वाटले. गम्मत म्हणजे, तू काय करतो हे विचारल्यावर, "पॉलिटिक्स माझा व्यवसाय आहे आणि सर्व पक्षांना माणसे पुरविण्याचे काम करतो", हसत हसत 'संगू' म्हणाला.
नवनवीन माणसे त्याचे स्वभाव, आस्था, आपुलकी, बोलण्याची कला यामुळे ज्ञानात प्रचंड भर पडली होती. ही माणसे आता जवळची वाटू लागली होती. एका गोष्टीची जाणीव प्रकर्षाने झाली, ती म्हणजे, 'चांगलं काम करायला निघालो की सर्व माणसे आणि निसर्गसुद्धा भरभरून मदत करतो'.
राजस्थान धाब्यावर दुपारी दोन वाजता पोहोचलो ८७ किमी राईड झाली होती. अतिशय सुमार धाबा होता हा. दुपारीच तेथील भाजी संपली होती. दालराईस खावा लागला. राजस्थानातील तरुण मुले कर्नाटकात धाबा चालवितात. परंतु महाराष्ट्रातील तरुण, अशी खाद्य चळवळ परप्रांतात चालविताना तुरळक दिसतो.
जवळच पाण्याचा मस्त हौद होता, त्यामध्ये फ्रेश झालो. आमच्या आधी सोपान, नामदेव, अभिजित, दीपक आणि विकास यांचे जेवण झाले होते. आम्ही आलो आणि ते पुढे निघाले.
दुपारचे ऊन होते, पण वारा छान सुटला होता. लक्ष्मण म्हणाला, ' निसर्ग संगीताच्या तालावर माझ्या सायकलवरील तिरंगा लयबद्ध फडकत आहे'. लक्ष्मणसुद्धा निसर्गावर भाळला होता.
.
नुसती सायकल दामटण्यापेक्षा, लक्ष्मणने निसर्गाबरोबर धरलेला फेर, मन उल्हसित करत होता.
हायवेच्या मध्ये रंगीबेरंगी फुलांचे ताटवे फुलले होते. पिवळी, गुलाबी, निळी, केसरी रंगाची ती रानफुले वाऱ्यावर छानपैकी डोलत होती.
.
या फुलांच्या ताटव्यावर रंगीबेरंगी फुलपाखरे बागडत होती. आणि हे काय !, काही फुलपाखरे त्या डांबरी रस्त्यावर धडपडत गतप्राण झाली होती. एवढ्या सुंदर वातावरणात, मस्त हवेवर बागडणाऱ्या फुलपाखरांची अशी अवस्था का बरे व्हावी? एक वोव्हो बस माझ्या बाजूने सुसाटत गेली. त्या बसच्या प्रचंड झोताबरोबर, हायवेच्या मधोमध असलेल्या फुलांच्या ताटव्यातून मधूकण भक्षून रानाकडे परतणारी आणखी दोन फुलपाखरे गतप्राण होऊन माझ्या सायकल जवळ पडली. कोमल हाताने त्यांना उचलून एका झुडपाच्या पानावर ठेवले. खूप चटका लावून गेला तो प्रसंग. मनोमन ठरविले, कर्नाटक सरकारला पत्र लिहायचे, 'हायवेच्या मधे फुलझाडे लावू नका म्हणून'.
त्यानंतर थोडा वेळ आम्ही सर्व्हिस रस्त्यावरून सायकली चालविल्या.
.
पुढे टोल नाका आला, तेथे चहा आणि नानखटाई खाल्ली. आमचे पाच स्प्रिंटर खूप पुढे गेले होते.
वाटेत बेळगाव शहराच्या थोडे पुढे हलगा गावाजवळ कर्नाटक सरकारचे सुवर्ण विधान भवन लागले.
.
निसर्ग रम्य परिसरात अतिशय भव्य आणि विलोभनीय राजवाडा सदृश्य इमारतीचे बांधकाम होते. जवळचे जलमंदिर सुदधा निसर्गाचे सौंदर्य वाढवत होते.
त्यानंतर लक्ष्मण आणि मी, जोरदार पेडलिंग केल्यावर धारवाड जवळच्या टोल नाक्यावर, पुढे गेलेले आमचे पाच साथीदार भेटले. आणखी पुढे जायचे होते. पण दिपकचा मित्र, संजय भाटियाने आमची धारवाड कृषी विद्यापीठात, राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली होती.
येथेच संजय बरोबर संतोषची पण ओळख झाली. संतोष धारवाड मध्ये अक्षयपात्र अन्नदान योजना चालवितो. अक्षयपात्र ही आशियातील सर्वात मोठी किचन आहे. तिचे नाव लिम्का रेकॉर्ड बुक मध्ये नोंद झाले आहे.
खरच दिपकच्या अफाट जनसंग्रहामुळे आमची ही सायकल सफर अतिशय मजेत आणि कमी खर्चात चालली होती. आपल्याला सहलीत-सफरीत खूप माणसे भेटतात. पण भेटलेल्या माणसांशी संपर्क ठेऊन, वेळप्रसंगी त्यांना मदत करण्याचे काम किती जण करतात. ही हातोटी जपलीय दिपकने, त्यामुळेच प्रत्येक ठिकाणी अशी मैत्री जपलेली माणसे लोहचुंबकासारखी खेचत येतात. मैत्री वाढविण्याची आणि जपण्याची अतिशय मस्त कला आहे दिपककडे.
धारावाडच्या कृषी विद्यापीठातील VIP हॉस्टेलमध्ये आमची राहण्याची व्यवस्था होती. अतिशय आलिशान होते हॉस्टेल. जेवणसुद्धा सात्विक होते.
धारवाड कृषी विद्यापीठामध्ये सेंद्रिय (ऑरगॅनिक) खते वापरून तयार झालेल्या धान्यातून बनविलेले अन्नपदार्थ रात्रीच्या जेवणात चाखता आले. हा एक वेगळा आणि आनंंददायी अनुभव होता. त्यामुळे १३० किमी सायकल चालविल्याचा शीण कुठल्याकुठे पळून गेला होता.
कृषी विद्यापीठाचे केअर टेकर राजशेखर सायंटिस्ट आहेत आणि स्वतः ऑरगॅनिक शेती करतात. त्यांनी आमचे यथोचीत आदरातिथ्य केले. प्रदुषण मुक्तीच्या आमच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. त्यांच्या शेतीच्या प्रोजेक्ट्ची माहिती दिली.
.
आजची संकेश्वर ते धारवाड सायकल सफर रंगीबेरंगी होती. परंतु फुलपाखरांचा प्रसंग चटका लावून गेला होता. या प्रवासात भेटलेले गावकरी पर्यावरण रक्षणाबाबत खूपच सजग आहेत, याचा प्रत्यय आला. वयस्क गावकरी सायकलिंगमुळे अतिशय सुदृढ आणि कार्यक्षम होते. तसेच धारवाडला भेटलेल्या मित्रांमुळे या सायकल सफारीचा आनंद इंद्रधनुष्यी झाला होता.
त्यामुळे रात्रीच्या गप्पा जबरदस्त रंगल्या. स्वप्नात आलेल्या फुलपाखरांना मी अभय दिले होते.
सतीश विष्णू जाधव