Saturday, May 16, 2020

Mumbai to Kanyakumari Cycling (Day Five) 29.10.2019 Dharawad to Davangiri. मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस पाचवा) धारवाड ते दावनगिरी

मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर
29.10.2019   (दिवस पाचवा)

धारवाड ते दावनगिरी

धारवाडच्या कृषी विद्यापीठ हॉस्टेल मधून सकाळी साडेपाच वाजता सायकलिंग सुरू केले.

  20 किमी राईड करून,  हुबळी जवळील टोल नाक्यावर हायड्रेशन ब्रेक घेतला. चहा, बिस्किटे खाल्ली.

सोपान म्हणाला,  'लवकर चला आज मोठा पल्ला मारायचा आहे'. नामदेव निघण्यासाठी चुळबुळ करत होता. तो आमचा खजिनदार असल्यामुळे चहावाल्याचे पैसे दिल्याशिवाय त्याला निघता येत नव्हते. विकास लांबूनच त्याची गंम्मत पाहत होता. सोपान आणि विकासकडे हायब्रीड सायकल होती, तर नामदेवकडे MTB, त्यामुळे नामदेवला सायकलिंग करताना जादा जोर काढावा लागत होता. नामदेवाने व्रत घेतले होते, सोपान आणि विकासची पाठ सोडायची नाही. जसे की संत जनाबाईने नामदेवांची पाठ कधीच सोडली नाही.

40 किमी वर 'वीरालमेना' गावात एक टपरी लागली. दिवाळी निमित्त बाजूचा प्रणव धाबा बंद होता. टपरीवरच्या काकीने झकास उपिट खायला घातले. वर चहा पिऊन पुढची राईड सुरू केली.  मी आणि लक्ष्मण निसर्ग भ्रमंतीमुळे मागे राहिलो होतो. मामाच्या गावाला जाऊया, पळती झाडे पाहूया, हे गाणे प्रत्यक्ष अनुभवत होतो.

सहा पदरी हायवे वर गाड्यांची रहदारी कमी होती. सकाळी दहाच्या दरम्यान पांढऱ्याशुभ्र  ढगांनी आकाश भरून टाकले होते. ढगांचे वेगवेगळे आकार मनाला भावले होते.   ओठावर "दिवाना हुवा बादल, सावन की घटा छायी" गाणे तरळले. लक्ष्मण दोन्ही हात पसरून ढगांना कवेत घेत होता.

आणखी 18 किमी राईड झाली दहा वाजले होते. उन्हे चढू लागली होती. 

वाटेत एका टपरीवर थांबलो. मुंबईवरून आलेले नाईक कुटुंब भेटले. त्या कुटुंबातील मुलांना आम्ही प्रदूषण मुक्त भारत ही संकल्पना घेऊन "मुंबई ते कन्याकुमारी" सायकलिंग करतोय, याचे खूप अप्रूप वाटले. सर्व कुटुंबियांनी आमच्यासह फोटो काढले.

दिवाळी फराळ खायला दिला. आपली मराठी माणसे जेव्हा परप्रांतात भेटतात तेव्हा घरातील माणूस भेटल्याचा आनंद होतो.

पुढची राईड सुरू झाली, आता सर्व बाजूला मोठमोठया पवनचक्क्या फिरत होत्या.

या भागात वाहणाऱ्या वाऱ्याचा, वीजनिर्मितीसाठी प्रचंड उपयोग करण्यात आला होता. रस्त्यात मोठे मोठे ट्रेलर्स; पवनचक्यांचे सुटे भाग, पाती घेऊन चालले होते.  पांढऱ्या ढगांनी आच्छादलेले निळेभोर आभाळ आणि त्यावर पवनचक्यांची रांगोळी, खरच निसर्ग सुद्धा दिवाळी साजरी करत होता. लहानपणी जत्रेत मिळणाऱ्या 'भिरभिऱ्यांची' आठवण पवनचक्क्या देत होत्या. आमचे सुपर सवंगडी पुढे सटकले होते. लक्ष्मण आणि मी 'साथ साथ' चाललो होतो. पण जेव्हा सायकलवर असतो तेव्हा मनाची साथ असते भन्नाट वेगाने पळणाऱ्या.

ऊन वाढल्यामुळे 12 किमी वर शिंगगाम गावात श्री जयलक्ष्मी परिवार धाब्यावर हायड्रेशन ब्रेक घेतला. "अनिया पकोडा" म्हणजे  कांदा भजीची ऑर्डर दिली पण भजी तयार नव्हती. म्हणून मी कोल्ड ड्रिंक आणि लक्ष्मणने कॉफी घेतली आणि पुढची सफर सुरू केली.

आता ऊन आणि वारा यांचा दमछाक करणारा मारा सुरू झाला. दुपार झाली होती. सोपान आणि सुपर सवंगडी हवेरी गावाच्या आसपास राजस्थानी ढाब्यावर जेवायला थांबले होते. आम्ही दोघे हवेरी गावात शिरलो. कुठेही ढाबा सापडेना. गावातील गावकरी आमची विचारपूस करत होते. तेव्हढ्यात मोटरसायकलवर दोन राजस्थानी भेटले.

त्यांनी सांगितले हायवे बायपास वर राजस्थानी धाबा आहे. तुम्ही आता गावात आला आहात. आमची आस्थेने चौकशी करून त्यांनी मस्त चहा पाजला.

हायवेला आलो वाटेत 'हवेरी नाला' तुडुंब भरून वाहत होता.

त्यावरील जुना दगडी पुल,  विजयनगर साम्राज्यातील तुंगभद्रा नदीवरील हंपीच्या पुलाची आठवण देऊन गेला.

तसेच हायवे वर आलो, तर राजस्थानी धाबा मागे गेला होता आणि दुसरा दहा किमी पुढे होता. पुढे जायचे ठरविले. रणरणत्या उन्हात पेडलिंग करत होतो. 

तेवढ्यात लाल शर्ट घातलेला मोटर सायकलवाला पुढे जाऊन थांबला.  आम्ही जवळ आल्यावर आमची चौकशी केली. 'रवींद्र' पण सायकलिस्ट होता. आम्ही प्रदूषण मुक्तीचा संदेश घेऊन कन्याकुमारीला जातोय, हे ऐकल्यावर त्याने आईने बनविलेल्या करंज्या खायला दिल्या. पोटात भुकेचा डोंब उसळला होता, त्यात घरची करंजी म्हणजे 'वाळवंटात ओयासिस' सापडले होते. त्याच्या शुभेच्छा आणि प्रेमाने दिलेले करंज्याचे पाकीट घेऊन पुढे निघालो.

जवळपास 105 किमी सायकलिंग झाले होते. मोतिबिनोर गावाच्या जवळ घुमर राजस्थानी ढाबा लागला. दुपार झाली होती.  जेवायची इच्छा नव्हती. चहा बिस्कीटे खाल्ली. लक्ष्मणाला झोप येत होती. दुपारच्या कडक उन्हात माझी सुद्धा सायकल चालवायची इच्छा नव्हती. थोडा आराम करून पुढे निघालो.

आणखी तीन किमी वर मोतिबिनोर बस स्टँड होता. राजस्थानी पाणीपुरीवाल्याकडे रगडापुरी खाल्ली. स्टँड जवळच एक ऑटोवाला होता. त्याने आमची कानडीत  चौकशी करायला सुरुवात  केली. आम्ही मुंबईवरून आलो समजताच मराठी बोलायला लागला. त्याने पुढील रस्त्याची माहिती दिली.

दावनगीरीचे अंतर अजून 58 किमी होते. दुपारचे तीन वाजले होते.  पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या.   20 किमी सायकलिंग केले.  रानेबेंनूर गावातील टपरीवर चहा नानखटाई खाल्ली.

पुढे 11 किमी चालेगिरी टोल प्लाझाला थांबलो,  सूर्यबिंब आता मावळतीला लागले होते.  ढगाआड लपू लागले. 

काळ्या ढगांबरोबर किरणांचा लपंडाव सुरू झाला. काळे पांढरे मेघ सुवर्णकडांनी आरक्त झाले होते. निसर्गाचे हे आगळे वेगळे रूप डोळ्यांचे पारणे फेडत होता.

प्रभाकर जोगांच्या व्हायोलिनवरील जुनी गाणी मोबाईल वर लावली होती.

सायकलचा वेग वाढला आणि पुढील 27 किमी दीड तासात पार करून दावणगिरी गाठले. आज 168 किमी सायकलिंग झाले होते.

दावणगिरी हे दक्षिण भारतातील कर्नाटक राज्याच्या मध्यभागी असलेले मोठे शहर आणि दावणगिरी जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. हे कापसाचे  हब असून भारताचे "मँचेस्टर" म्हणून प्रसिद्ध आहे.

सध्या त्याची स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी निवड झाली आहे.

दावनगिरीला सुद्धा दिपकने कमाल केली होती. तेथील पोलीस सुप्रीन्टेंडेंटच्या ओळखीने, पोलीस गेस्ट हाऊसमध्ये आमची राहायची आलिशान व्यवस्था होती. येथेच दिपकचा आणखी एक मित्र ड्रायफ्रूट आणि फळे घेऊन आमच्या स्वागताला आला होता.

त्याच्याबरोबर गप्पा मारत असतानाच,  खुद्द पोलीस सुप्रीन्टेंडेंट साहेब आले. आमची आस्थेने चौकशी आणि सन्मान केला.

  दोन इन्स्पेक्टर आणि पोलीस व्हॅन देऊन रात्री सामिष भोजनाची व्यवस्था सुद्धा केली. बिनधास्त फॅमिली ढाब्यावर जेवण झाले.

पुढील सायकलिंग साठी सर्वांची मिटिंग झाली. दुपारच्या जेवणपर्यंत सर्वांनी कटाक्षाने एकत्र राहायचे ठरविले. कालच्या सायकलिंगमध्ये तसे झाले नव्हते.

मिटिंगमध्ये विकासने एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगितली, ' जेव्हा घाट किंवा चढ लागतो तेव्हा खूप वर पाहिलं तर चढ अंगावर येतो.  पुढे गेलेल्या सायकलिस्टला आपण गाठू का, असा नकारात्मक भाव निर्माण होतो, आणि आपला रिदम तुटतो. अशावेळी फक्त पुढच्या चाकाच्या थोडेसे पुढे पाहून पेडलिंग करत राहणे'.  खरे होते विकासचे म्हणणे,

   आपले अंतिम लक्ष कन्याकुमारी असताना, छोटे छोटे घाट का बरे पहायचे?'. अनुभवानेच अशा गोष्टी शिकायला मिळतात.

या वेळी सोपानरावांचे हसतमुख आणि हावभावयुक्त  बोलणे, एकदम फर्मास होते. व्यवसायिक असल्यामुळे, समोरच्याला पटविण्याची हातोटी सोपानकडे अफलातून आहे, हे समजले.   लिडरशीप क्वालिटीज त्यात खच्चून भरल्या होत्या.

दिपकच्या मित्राने आणलेले कलिंगड रवाळ तर  सफरचंद एकदम कडक आणि रसरशीत होते.  फळे खाऊन निद्राधीन झालो, सकाळी चार वाजता उठण्यासाठी.

सतीश विष्णू जाधव.

12 comments:

  1. आपण केलेलं काम फार सुंदर आहे बेटी बचाव बेटी पढाओ,, या सामाजिक उद्बोधन,व प्रदूषण वाचवा त्यासाठी सायकल चालवा हा संदेश आपण दिलात आपणास हार्दिक शुभेच्छा
    आधार फाउंडेशन नेर्ले
    अध्यक्ष विजय लोहार

    ReplyDelete
  2. प्रवास वर्णन सुंदर शब्दात लिहिले आहे. त्यामुळे वाचताना आपण एखादे पुस्तक वाचतो आहे असे वाटते. तसेच सुंदर छायाचित्रे काढली आहेत. त्यामुळे ती पुन्हा पुन्हा पहावी असे वाटते. खूप छान

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद मनोज,

      असेच प्रोत्साहन मिळो

      Delete
  3. सुंदर वर्णन.तुम्ही नुसत लिहित नाही वाचकालाही तो प्रवास प्रत्यक्ष घडवता. पुढच्या भागांची उत्सुकतेने वाट पहात आहोत.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद संजय,

      लवकरच पुढचा भाग टाकतो

      Delete
  4. Pharch chan, Maja aali, sobat photo hi chan aahey

    ReplyDelete
  5. सतीश सर, आपण आत्मिक आनंदाने विहार करताना सृष्टी आपल्याला तिच्या विविध रूपातून किती सहजतेने जीवनात आनंदी राहण्याचा मूलमंत्र शिकवीत असते. ते जाणून घेण्याचा एक मार्ग तुम्हाला गवसला आहे. हा मार्ग खरं तर आपल्या प्रत्येकाच्या नजरेसमोर असतो. परंतु तो ओळखण्याची दृष्टीच आपल्याजवळ नसते. असेच सहाने फिरत रहा व लिहीत राहा.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद!!

      सायकलिंग आणि निसर्ग भ्रमण म्हणजे जीवनाची पर्वणी आहे.

      किती घेशील दोन्ही करांनी , अशी अवस्था होते.

      Delete
  6. मोठ्ठी मजल, ओघवते वर्णन आणि अप्रतिम निसर्गभेटी!

    ReplyDelete
    Replies
    1. तुझ्या बरोबर लॉंग ड्राइव्ह करायची इच्छा आहे

      Delete