Sunday, May 24, 2020

Mumbai to Kanyakumari Cycling (Day Seven) 31.10.2019 मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस सातवा) सिरा ते बंगलोर

कन्याकुमारी सायकल सफर
31.10.2019 (दिवस सातवा)
सिरा ते बंगलोर सायकलिंग
सरकारी गेस्ट हाऊस मधून सकाळी साडेपाचला  राईड सुरु झाली.
सकाळची सायकलिंग अतिशय आल्हाददायक असते. पूर्व दिशा हळूहळू तांबूस रंगप्रभेने आरक्त होऊ लागली. आकाशांत ढगांचे बागडणे सुरू होते.
आज अभिजित आणि दीपक सर्वात पुढे होते. ब्लुटूथ स्पीकरवर सकाळची आवडती गाणी लावून त्यांची रपेट सुरू होती.  मागोमाग मी आणि लक्ष्मण मोबाईलवर पहाटेची भक्तीगीते लावून, भक्तिरसात न्हात राईड करत होतो. आमच्या मागे विकास, नामदेव आणि सोपान मार्गक्रमण करत होते.
आता सुरू झाला प्रकाश कवडश्यांचा खेळ. काळ्या पांढऱ्या ढगाबरोबर प्रकाशाचे इंद्रधनुष्यी रंग लपंडाव खेळू लागले.
धरणीवर येणारे कवडसे सप्तरंगाची उधळण करीत होते. पावसाळी वातावरणात पहाटे सायकल चालविणे म्हणजे प्रकाश किरणांच्या निसर्ग मार्गावरून स्वर्गारोहण करण्यासारखे होते.

सर्व सवंगड्यांची साथ साथ सफर सुरू होती.15 किमी वरच्या सिरा टोल प्लाझाला तासाभरात पोहोचलो. टपरीवर नानखटाई, केक आणि मसाला चहा घेतला. सर्वजण एकत्रच होतो.
पुढची राईड सुरू झाली. आज लक्ष्मण जोरात होता. सर्वांच्या पुढे सायकलिंग करत होता. सोपान आणि विकास सर्वांना घेऊन येत होते.
नामदेव माझ्याबरोबर सायकलिंग करत होता. नामदेवची पेडलिंग करताना एक विशिष्ट लकब होती. त्याचे दोन्ही खांदे पेडलसह वरखाली व्हायचे. 'चढावर कोणते गियर लावायचे', नामदेवने मला विचारले.
'पुढचा दोन आणि मागचा पाच हे आयडल गियर असतात.  पण तुमच्या पायावर किती प्रेशर येते, त्या प्रमाणे गियर बदलणे गरजेचे असते. तुमचे मोशन कायम राहण्यासाठी, एकाच गतीने पेडलचे स्पिनींग आवश्यक असते, त्यामुळे दमछाक होत नाही. चढावर न थांबता, न थकता सायकलिंग करणे यासाठी हे स्पिनींग टेक्निक वापरतात. मनाली-लेह सायकलिंग मध्ये  युथ हॉस्टेलच्या  शैलेशने हे टेक्निक मला शिकवले होते',  मी नामदेवाला म्हणालो.
  वाटेत बंगलोर 100 किमी माईल स्टोन लागला. 
लक्ष्मण थोडा पुढे राईड करत होता. "बंगलोर",  एक महत्वाचा टप्पा शंभर किमी अंतरावर म्हणजे मुंबई वरून जवळपास 900 किमी अंतर आम्ही पार केले होते. आनंदाला पारावर नव्हता. सायकलने अप्रतिम साथ दिली होती. आज तिला माईल स्टोनची भेट घ्यायची होती.
सायकलचा आनंद माझ्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. पाणी पिऊन माईलस्टोनला नमस्कार करून पुढची राईड सुरू झाली. आज माझ्यासाठी हा माईल स्टोन निसर्ग होता.
पुन्हा ढगांनी आभाळ भरून आले. हळूहळू त्यांनी सूर्यावर आक्रमण केले.
पांढऱ्या ढगांपाठोपाठ काळेजर्द मेघ हत्तीच्या कळपासारखे आकाशावर चालून गेले. पावसाचे निशाण फडकू लागले. आम्ही  आक्रमणाची वाट पाहत होतो. पण वाऱ्याचा पलटवार; त्या मस्तवाल मेघांना भारी पडला. ते उन्मत्त हत्तीसारखे मेघ; सैरावैरा पळू लागले.
निसर्गाचा हा लपंडाव मी स्तिमित होऊन पहात होतो, भान हरपून. 
साठ किमी वरच्या दुसऱ्या टोल नाक्यावर दहा वाजता पोहोचलो. मस्त लुसलुशीत डोसा, मिरचीची भजी, सोबत बटाटा आणि शेवग्याच्या शेंगा घातलेले सांबर आणि केसरी रंगाची खोबरे चटणी ह्या नास्त्यावर आडवा हात मारला.
आज आमचा अकाऊंटंट नामदेव रंगात आला होता. सर्वांबरोबर सेल्फी काढत होता.
 सायकल सोबत सुद्धा त्याने सेल्फी काढला. त्याच्या चेहऱ्यावरील निर्मळ हास्य बरेच काही सांगत होते. सकाळीच बायकोबरोबर गप्पा मारल्या होत्या त्याने, तीला सर्व सेल्फी पाठवायचे होते.
  आणखी पंधरा किमी सायकलिंग केली.  जवळपास 80 किमी राईड झाली होती. वाटेतील छोट्या टपरीवर उत्तप्पा इडली सांबर आणि चटणीचा आस्वाद घेतला. लक्ष्मणने आज मसाला मसाला डोसा खाल्ला. या डोस्याच्या तव्यावर अंडी तळतात, म्हणून लक्ष्मण कुठेही डोसा खात नव्हता. खाता खाता नामदेवाने सर्व सेल्फी बायकोला पोष्ट केल्या होत्या.
वातावरण अजूनही पावसाळी आणि ढगाळ होते. परंतु पाऊस पडत नव्हता. कदाचित आमची प्रदूषण मुक्तीची राईड सुखरूप आणि प्रशस्त व्हावी, यासाठीच वरुण राजाने न बरसण्याचे  फर्मान काढले असावे.
बंगलोरचा नाईस हायवे  अजून 40 किमी होता. तेथून पुढे 35 किमी सायकलिंग करायचे होते. 
माझ्यासह लक्ष्मण, दिपक आणि अभिजित यांनी जोरदार मुसंडी मारली आणि नाईस हायवे जवळ पोहोचलो.
हा हायवे प्रायव्हेट आहे.  BOT (Built, Own & Transfer) तत्वावर, हा हायवे  34 वर्षाच्या करारावर नाईस संस्थेने बांधला आहे. 34 वर्ष, टोल वसुली नाईस संस्था करणार आहे. यामुळे बंगलोर मुख्य हायवेची रहदारी बऱ्याच अंशी कमी झाली आहे.
परंतु हा रस्ता सायकलसाठी निषिद्ध आहे.  नाईस टोलनाक्यावर पोहोचताच, तेथील सिक्युरिटी गार्ड अक्षरशः आम्हाला हाकलून लावत होते. दिपकची फोनाफोनी चालू झाली.  काय आश्चर्य ! !   थोड्या वेळातच मुख्य सुरक्षा अधिकारी रंगनाथ धावत आला. तुम्ही एकून कीती जण आहात. मागची मंडळी किती वाजता येतील, याची चौकशी केली. दिपकची चक्रे फिरली होती. मगाशी हाकलवून लावणारे गार्ड आम्हाला पाणी देऊ लागले. आम्हाला बाजूच्या रेस्टरूममध्ये थांबायला सांगितले.
थोड्याच वेळात सोपान, विकास आणि नामदेव  नाईस हायवेला आले.  मग काय, पोलीस एस्कॉर्ट मध्ये,  त्या 42 किमीच्या नाईस रोडवरून आमच्या सायकली धावू लागल्या.
दिपक पोलीस व्हॅन मध्ये बसून थांबलेल्या आणि बाजूने जाणाऱ्या गाड्यांना सूचना देत होता. सायकलींची शाही सवारी निघाली होती. अफलातून दिपकमुळे सायकलींना नाईस रोड पाहता आला. दिपकने बंगलोरच्या होम मिनिस्ट्री मध्ये फोन लावला होता. त्यामुळेच त्या हायवेवरून राईड सुरू झाली.  क्या बात है, दिपक!!!
आम्ही नाईस रोड वरून मध्येच बांनारकट्टा एक्झीटला बाहेर पडलो. तेथून तडक कनकपुरा पोलीस स्टेशनमध्ये गेलो. तेथील वरिष्ठ पोलीस अधिकारी रवी  सरांनी नाईस रोड बाबत आम्हाला मदत केली होती.
सायंकाळी सहा वाजता कनकपुरा भागातील तीन स्टार  'सिंदूर गार्डन हॉटेल' मध्ये पोहोचलो. 
आज 155 किमी राईड झाली होती. आमची रहायची आणि जेवणाची व्यवस्था सुद्धा पोलीस अधिकारी रवी सरांनी केली होती.
या हॉटेलच्या रेस्टॉरंट मधील मासे आणि टायगर कोळंबीने जेवणात बहार आणली. रात्री आम्हाला आवर्जून भेटायला आले, पोलीस अधिकारी रवी सर. बंगळूरमध्ये आमचे जंगी स्वागत झाले होते.
या हॉटेलवर, दिपकचा आणखी एक घनिष्ठ सायकलिस्ट मित्र  'सलीम' आमच्या भेटीला आला होता. या सलीमने 1997 मध्ये बंगलोर ते हज सायकलिंग केले होते.  मुंबईत व्हिसासाठी दिपकने सलीमला मदत केली होती. ती ओळख अजूनही सलीमने ठेवली होती. त्याने खास आमच्यासाठी 'चिकन 65'  ही मुघलाई डिश आणली होती.
आणखी एक खासियत पाहायला मिळाली,  दिपकची.  कोणत्याही मोठया हॉटेलमध्ये बाहेरील पदार्थ निषिद्ध असतात. दिपकने रेस्टॉरंटच्या मुख्य कप्तानाला सांगितले, 'सलीमने आमच्या प्रेमाखातर चिकन 65  आणले आहे. पण तुमचा नियम आम्हाला मोडायचा नाही, तुम्हीच सांगा काय करू'. दिपकची हे मिठास बोलणे ऐकून आम्हाला सलीमची डिश खायची परवानगी मिळाली.
  रात्रीचे बंगळूर जबरदस्त भावले. सलीम सारखा झकास मित्र मिळाला. मस्त वाटला सलीम.  त्याच्या सोबत युरोप सायकलिंग करायची इच्छा आहे.
  नाईस रोड,  पोलीस अधिकारी रवी सर, सलीम ही मंडळी आणि आजच्या सफरीतील निसर्ग;  'बंगळूर' बरोबर कायम स्मरणात राहील.
 
  ध्यानीमनी नसताना आजची सायकल सफर, अतिशय आल्हाददायक, पाऊस विरहित आणि बंगलोरच्या प्राईम रस्त्यावरून झाली होती. दुपारी उन्हाचा दाह सुद्धा जाणवला नव्हता. आज निसर्गाचा वरदहस्त आमच्यावर झाला होता.

  सातव्या दिवशीच हजार किमी अंतर पादाक्रांत केले होते. आयुष्यातील पहिली मोठी राईड दोस्तांच्या साथीने भन्नाट अनुभवली होती. पुण्यात प्रथमच भेटलेले दोस्त आता माझ्या जिवाभावाचे मित्र झाले होते.
 
  एखाद्या व्यक्तीला मित्र म्हणून स्वीकारायचे असेल तर त्याला सोबत, सायकलिंगसाठी न्या. दिवस रात्र एकत्र राहिल्यावर त्याचे मूळ स्वभाव आपल्याला समजतात. यातून झालेली मैत्री कायमची असते. त्यांची ओळख खूप जुनी आहे, असेच मग प्रतीत होते.

 
आजचा दिवस दिपकचा होता.
 हॅट्स ऑफ दिपक !!!

सतीश विष्णू जाधव

18 comments:

  1. Superb kaka👍👍👍🤗🤗🤗👍👍👍

    ReplyDelete
  2. पोलीस स्टेशन ला गेल्यावर आलेली मजा नमूद करता आली असती

    ReplyDelete
  3. No doubt "आजचा दिवस दिपकचा होता.

     हॅट्स ऑफ दिपक !!!"

    दीपकच्याच मुत्सदेगिरिमुळे आज आम्हा सर्वांना "Nice Road" सर करता आला होता.

    Nice Road वरिल ती "सायकलींची अफलातून शाही सवारी" पुन्हा होइल की नाही हे माहीत नाही पण विसरता येणे नाही हेच खरे.

    शब्द आणि वाक्यरचने प्रमाणे फोटोंची मांडणी अतिशय छान केली आहे.

    Hats off to you too Sir.

    प्रत्येक लेखागणीक माझी Cycling ride परत परत होतेय हे मात्र खरं.

    धन्यवाद साहेब.

    ....... लक्ष्मण गणपत नवले.

    ReplyDelete
  4. लक्ष्मण भाऊ,

    खूप उस्फुर्त आणि छान अभिप्राय आहेत.

    असाच लोभ राहो......

    ReplyDelete
  5. अप्रतिम सफर!जबरदस्त उत्साह आणि मित्र. मलाही युरोप सायकलिंग करायचे आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. नमिता,
      धन्यवाद, खूप उस्फुर्त अभिप्राय!!!

      युरोप सायकल सफर नक्कीच करूया

      Delete
  6. मस्त वर्णन.
    जणु मीच या राईड वर असल्याचे वाटले. तुम्ही कन्याकुमारीला पोहचे पर्यंत ब्लॉग वाचणार आहेच.

    असे मित्र मिळणे हे भाग्य लागतं हे खरेच. नशीबवान आहात.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सुनील,

      असेच प्रोत्साहन मिळो.

      लवकरच पुढचा ब्लॉग पोष्ट करतो!!!

      Delete
  7. खरच तो दिवस आठवणीतला आहे कारण मी व लक्ष्मण सर हॉटेल मधे वाद घालत होतो

    ReplyDelete
  8. अप्रतिम सफर

    ReplyDelete
  9. धन्यवाद!!!

    असेच प्रोत्साहन मिळो !!!

    ReplyDelete
  10. छान अनुभव सांगितले आहेत. मामा यापुढेही अश्याच तुमच्या सफर होवोत.

    ReplyDelete
  11. तुमचं प्रवास वर्णन वाचून आपणही अशी राईड करावी अशी इच्छा होतेय पण सध्या काही शक्य नाही. फोटो आणि कॅप्शन मस्त आहेत. दीपक साहेबांची खरंच कमाल आहे! या पुढचे भाग पटापट टाका. धन्यवाद!

    ReplyDelete
  12. धन्यवाद निनाद,

    अभिप्राय अतिशय मस्त !!!

    ReplyDelete