Tuesday, May 19, 2020

Mumbai to Kanyakumari (Day Six) 30.10.2019 मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस सहावा) दावनगिरी ते सिरा

मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर
(दिवस सहावा)   30.10.2019

*दावनगिरी ते सिरा *

सकाळी सहा वाजता दावनगिरीच्या पोलीस गेस्ट हाऊस मधून राईड सुरू झाली. 

रस्त्यावर वाहने तुरळक होती. सरळसोट क्षितीजाकडे जाणार रस्ता, शेवटी एका बिंदूपाशी संपत होता. जणूकाही पुढील वाट आसमंतातील असावी.  त्या वाटेवर काळे निळे ढग आमच्या स्वागताची तयारी करत होते.

दाटले आकाशी ढग काळेशार ...

ओथंबले धरेवर अधीर अनिवार

मनी अधीरता लक्ष्य गाठण्याची ...

भ्रांत सोबत्यांची तशीच स्वतःची 

तरीही चालणे वाट अतिआनंदाची ...

असे ती भरतभूच्या प्रदूषण मुक्तीची

15 किमी वरच्या बिनधास्त ढाब्यावर आलो.  याच धाब्यावर रात्रीचे जेवण जेवलो होतो.  मस्त गरमागरम पराठे खाल्ले आणि सुरू झाली पुढची राईड. लवकर लवकर सायकलिंग करा म्हणून सोपानराव घाई करत होता.  तेव्हढ्यात  या धाब्यावर कोल्हापूरहुन बालाजीला जाणारे पाटील  कुटुंब भेटले. त्या कुटुंबातील दोन मुली सायकलिस्ट होत्या. आमच्या बरोबर फोटो काढले. सोपान, विकास आणि नामदेव यांनी राईड सुरू केली.


पहाटे पाऊस पडला होता, त्यामुळे रस्ते ओले होते. रस्त्यावर पसरलेल्या ओलसर मातीमुळे, टायरमधून चर.. चर.. आवाज येते होते. वातावरण अजूनही ढगाळ होते, कधीही पाऊस पडावा असे.


वाटेत लोटस मंदिर लागले.

 हे मंदिर उघडे बोडके  होते. विशेष म्हणजे चारही कडांना साखळी बांधून मध्ये मूर्तीच्यावर स्टीलची मेघडंबरी छत्र म्हणून लटकवण्यात आली होती. एकदम आगळे वेगळे वाटले हे मंदीर. मंदिरावर कानडीत लिहिले होते, त्यामुळे ते कोणत्या देवाचे आहे ते कळले नाही.

वेळ न दवडता आम्ही पुढे निघालो. रस्त्यात आम्ही कप्तान सोपान आणि कंपनीला गाठलेच. तासाभरात एव्हरग्रीन ढाब्यावर येऊन  डोसा आणि गरम इडली भरपेट खाल्ली.

आज लक्ष्मण आणि मी सर्वांच्या पुढे होतो, ते थेट चित्रदुर्ग पर्यंत. कालच्या मिटिंगनुसार मागे राहायचे नाही हे मी आणि लक्ष्मणने ठरविले होते.  दावनगिरी ते चित्रदुर्ग ही जवळपास 75 किमी राईड होती.  सकाळी वातावरण ढगाळ होते. त्यामुळे आज सूर्यदर्शन झाले नाही. दहा नंतर लागणाऱ्या उन्हाचा चटका सुद्धा नव्हता.  पुढचा स्टॉप चित्रदुर्गला जेवणासाठी होता.

लक्ष्मण आणि मी भराभर पुढे जात होतो. अभिजीतची तब्बेत नरम गरम होती,  आज दिपक अतिशय उत्साहाने आणि दमदार राईड करत होता. नामदेव त्यांना कंपनी देत होता.  विकास आणि सोपानराव एका विशिष्ट गतीने पुढे चालले होते. आम्ही चित्रदुर्ग या छोटेखानी शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सहकाऱ्यांची वाट पाहत थांबलो. पावणे अकरा वाजले होते.  

तेव्हढ्यात पंधरा मिनिटे लक्ष्मणने छान डुलकी काढली.   'मागे या' म्हणून कप्तान सोपनचा फोन आला. आमच्या भेटीचे ठिकाण 2 किमी मागे होते.

चित्रदुर्गच्या शून्यपिठाला भेट म्हणजे दिपकच्या ओळखीची पराकाष्ठा होती. आम्हाला आराम करायला एक मोठी खोली मिळाली. स्वामी शिवमूर्ती बसवेश्वरांची झालेली भेट आणि त्यांनी आमच्या कन्याकुमारी राईडला दिलेल्या आशीर्वादाने आम्ही सर्व भारावून गेलो. याच मठात दुपारच्या भोजन-प्रसादाचा आम्ही लाभ घेतला. या चित्रदुर्गला प्राचीन किल्ला आहे. तसेच  महाभारतातील भीम पत्नी हिडीम्बाचे हे गाव आहे.

पुढची राईड सुरू झाली . जोरदार वारे वाहत होते त्यामुळे दोन तासात जवळपास 30 किमी राईड झाली. पुढे अचानकपणे मळभ भरून आले आणि जोरदार पाऊस सुरू झाला. या पावसात पुढचे काही दिसेनासे झाले, तरी सुद्धा लक्ष्मण आणि मी हेड लाईट चालू करून भिजत सायकलिंग करत होतो. जवळपास तासभर झाला तरी पाऊस थांबायची लक्षणे नव्हती. तेव्हढ्यात एक धाबा लागला. आम्ही दोघांनी त्याचा आसरा घेतला. पाऊस थांबल्यावर पुढची राईड सुरू केली.

 अर्ध्या तासात पुन्हा ढगांनी दाटी  केली. पुन्हा पाऊस सुरू झाला. 

आम्ही दोघेही चिंब भिजलो होतो.  आता आसरा पाहत होतो. पुढे एका धाब्यावर थांबलो. पाऊस थांबायची काहीही लक्षणे नव्हती.

धाब्यावर भाषेची अडचण जाणवू लागली. सिरा कडे जाणारा रस्ता कसा आहे. राहण्याची व्यवस्था कुठे होईल याची माहिती मिळाली नाही.

तेवढ्यात एक टेम्पो त्या धाब्यावर आला. त्याच्याकडून माहिती मिळाली. अजून चाळीस किमी वर सिरा गाव होते. पुढची राईड सुरू झाली, रस्तावर ट्राफिक तुरळक होती. पाऊस सुरूच होता, परंतू त्याचा जोर कमी झाला होता.

पुढे चालणाऱ्या गाड्यांमुळे सायकल आणि आम्ही नखशिखांत बरबटलो  होतो.  चाकातून उडणाऱ्या चिखल मिश्रित पाण्यामुळे गावाच्या जत्रेत नाचणाऱ्या खेळीया सारखा चेहरा झाला होता. अशा अवतारात घरच्यांनी सुध्दा आम्हाला ओळखले नसते.
अंधार पडायला सुरुवात झाली, रस्त्यात चौकशी केली असता सिरा अजून दहा किमी पुढे आहे हे समजले.

पाऊस थांबला होता पण रस्ते ओले होते. अंधार पडला होता. सायकलचे लाईट चालू करून आम्ही चाचपडत सिराला पोहोचलो.

शेवटच्या काही किलो मीटर्समध्ये दिपक सुद्धा प्रचंड थकला होता.. सोपान, विकास , नामदेव आणि अभिजित आमच्या मागोमाग  सिराला पोहोचले.  आज 140 किमी राईड झाली होती.

सिराला अभिजितच्या ओळखीने पीडब्लूडी गेस्ट हाऊसमध्ये राहायची व्यवस्था झाली. दोन खोल्यात सर्वांना ऍडजस्ट व्हावे लागले.

आंघोळ करून सॅकमधील कपडे काढून सुकविण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा लागला. जेवून झोपायला रात्रीचे 11 वाजले.

 आम्हाला पावसाने झोडपले, चिखलाने माखविले  आणि जिद्दीने  सिरा पर्यंत  पोहोचविले

 एक थ्रिलिंग आणि वेगळा अनुभव होता, धुवाधार पावसात राईड करण्याचा.  पावसाचा जोर एव्हढा होता की चष्म्याला सुद्धा वायपर लावायला हवे होते.

निसर्गाचे अनंत आविष्कार आजच्या राईड मध्ये पाहायला मिळाले.

किती सुंदर आहे हे आयुष्य ! !

आणि असे अनुभव जीवनाचे सौंदर्य आणखी वाढवत होते ! ! !

सतीश विष्णु जाधव

15 comments:

  1. छान सुरू आहे सफर... पावसातला अनुभवही थरारकच असेल.

    फोटो भारी आहेत.

    पुढील भागाच्या प्रतिक्षेत..!!

    ReplyDelete
  2. Ek Divsat 140KM mhanje Lai Bhari!!

    ReplyDelete
  3. , सतीश सर, दानव गिरी तून निघालात. आणि जणू निसर्गाने तुमच्या सायकल तपश्चर्या भंग करण्यासाठी दानव सोडले. पण तुम्ही विश्वामित्र ऋषी सारखे अभंग राहून ते अस्त्र परतवून लावले. जणू तुम्ही आभाळाच भिडलात असे वाटले.

    ReplyDelete
  4. तुमच्या कल्पकतेला मनापासून दाद!!!

    खूप खूप छान वाटले

    ReplyDelete
  5. सुंदर फोटोग्राफी व अप्रतिम वर्णन खूप छान

    ReplyDelete
  6. ���� खूप छान लिहीले आहे तुम्ही सर.
    एकदम विस्तृत आणि सर्वसमावेशक !!!!
    अभिनंदन.

    ReplyDelete
  7. छानच. लिखाण आणी छायाचित्रे दोन्ही अप्रतिम. पावसातल सायकलिंग म्हणजे खरच थ्रिलिंग.

    ReplyDelete
  8. धन्यवाद संजय !!!

    असेच प्रोत्साहन मिळो ...

    ReplyDelete
  9. सर्वसमावेशक आणि अर्थपूर्ण अशा कवितेच्या समावेशामुळे लेखाची मजा आजुनच वाढली आहे.
    खुपच छान!!!! ����

    ReplyDelete
  10. धन्यवाद लक्ष्मण !!

    अशीच मजा घ्या आणि लुटा !!!

    ReplyDelete
  11. खूप छान लिखान आहे वाचता वाचता कधी संपते ते कळतच नाही
    खरच खूप छान अनुभव मांडला आहे आपन ! !

    ReplyDelete