Saturday, August 29, 2020

ढगांच्या दुनियेत... तळेरे राईड

ढगांच्या दुनियेत... तळेरे राईड 

२७ ऑगस्ट, २०२०

आज गौरी विसर्जन, त्यामुळे दुपारपर्यंत घरी यायचे होते. तळेरेमार्गे विजयदुर्गला जाऊन येऊन १३० किमी अंतर होते. त्यामुळे विजयदुर्ग ऐवजी तळेरे फाट्यापर्यंत जाऊन मागे फिरायचे नक्की केले. 

शेजवली  गावानंतर  मुंबई  गोवा हायवे सुरु होतो.  शेजवली पर्यंतचा मार्ग चढ उताराचा आणि बऱ्याच ठिकाणी ऑफ रोडिंग आहे. त्यामुळे वेगावर नियंत्रण ठेऊन सावधगिरीने सायकलिंग करावे लागत होते. 

छोटासा रस्ता... दोन्ही बाजूला हिरवळ... बागडणारी फुलपाखरे... पक्षांचा किलबिलाट... ओढ्या, झऱ्यातून वाहणाऱ्या जलाचा खळखळाट... छोट्या छोट्या लव्ह बर्डसचे सायकलच्या मागेपुढे कसरती करणे... अशा निसर्गरम्य वातावरणात सायकल सहल सहजगत्या सुरू होती. खूप दिवसांनी कोबड्याचे आरवणे कानावर पडले होते. 
पक्षांचे, प्राण्यांचे घड्याळ सूर्यावर असते. खुल्या वातावरणात प्रकाशकिरणांची चाहूल पक्षांना ऊर्जा देते. काल "ईकागाई" हे पुस्तक वाचनात आले. जपानमध्ये वयाची शंभरी गाठलेले सर्वात जास्त लोक आहेत.   दीर्घायुषी व्यक्तीच्या 'जीवनाचे रहस्य' या पुस्तकात दिले आहे. त्यातील एक रहस्य म्हणजे सकाळी लवकर उठून आपले आवडते काम करणे. सकाळी होणारा  किलबिलाट हे पक्षांचे आवडते काम असावे का? यालाच उस्फुर्त जगणे म्हणावे काय?

बालकवींची कविता आपसूक ओठावर आली.

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे

क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे...

कवितेच्या रंगात रंगलो असतानाच... क्षणभर सायकल थबकली... समोरच्या वाटेवरून गुबगुबीत मुंगूस मामा ऐटीत चालले होते. करडा काळपट रंग, झुबकेदार शेपटी आणि चालण्याची ऐट पाहिल्यावर त्याला कडक सॅल्युट ठोकला. प्राणी दर्शन, पक्षी निरीक्षण यामुळे न आटणारा, न संपणारा, चिरंतन आनंदाचा ठेवा मला मिळत होता.
या धुंदीतच शेजवली गाव मागे सोडून हायवेला आलो. आता सुरू झाली ढगांबरोबर सायकल सहल. निवांत हायवे... व्यक्तींची वर्दळ नाही... वाहनांची रहदारी नाही... जणूकाही हा हायवे मलाच आंदण दिला होता. रस्त्याकडेच्या पांढऱ्या पट्ट्याच्या आतून सायकलिंग सुरू होती. साथीला ओठावरील गाण्याची बरसात होती. 

आज माझ्या सायकल सोबत ढगसुद्धा मार्गक्रमण करीत होते. कालिदासांचे मेघदूत आज माझी संगत करीत होते. सायकलशी हितगुज करीत होते. नुकताच पावसाचा शिडकावा झाला होता. सूर्य ढगांना दूर सारून  किरणांचा संदेश धरणीच्या भेटीसाठी पाठवीत होता. परंतु वाऱ्याला साथीला घेऊन ते गलेलठ्ठ ढग, किरणांची वाट अडवून उभे होते. ढगांची गम्मत वाटली... माझ्यासह पुढे सरकताना... किरणांना अडविण्यासाठी त्यांची त्रेधातिरपीट होत होती. लबाड किरणे ढगांना चकवून धरणीची गाठ घेत होते.
 हिरवेगार आणि ओलेचिंब वातावरण मनाला उभारी देत होते. शेजवली जवळच्या उंच टेकडीवर निनादेवीच्या मंदिरातील घंटेचा आवाज कानी पडत होता. ढगांच्या दुनियेत, मंद धुंद निसर्गात सायकल सफर करणे पर्वणी होती.
 
खारेपाटण मागे पडले, त्या नंतर नाडगीवे गाव लागले. या हायवेवर ज्या ज्या ठिकाणी मार्गात गाव लागते तेथे फ्लाय ओव्हर बांधण्याचे काम जोरात चालू आहे. नडगीवेची घाटी सुरू झाली.  घाटीमधून जाणारे पूर्वीचे मार्ग आता प्रशस्त केले आहेत. पावसाला सुरुवात झाली. चढावाला अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. चष्म्यावर पडत असलेल्या थेंबाने अस्पष्ट दिसू लागले. सायकल थांबवून चष्मा पाठपिशवीत टाकला. 

घाटी संपताच बांबरवाडी आणि मांडवकरवाडी गावे लागली.  तळेरेमध्ये सुद्धा फ्लाय ओव्हरचे काम सुरू होते. त्यामुळे छोट्या मार्गिकेने तळेरेमध्ये सायकलने प्रवेश केला. 

सपाटून भूक लागली होती. रोडवर छोटेसेच टपरीवजा हॉटेल, पण त्याचे नाव "राज हॉटेल" होते. हसतमुख वयस्क आजोबा  गल्ल्यावर बसले होते. मिसळीच्या तर्रीचा घमघमाट सुटला होता. काम करणाऱ्या मुलाला विचारले, 'मला सूप मिळेल काय' मुलगा म्हणाला, 'आमच्याकडे चायनीज मिळत नाही' गल्ल्यावरच्या आजोबांना मला काय हवे ते बरोबर कळले होते. ते म्हणाले, 'मुंबईकरांना मिसळची तिखट तर्री दे'. आजोबांच्या निरीक्षण शक्तीचे अप्रूप वाटले. 

चिंब भिजलेल्या दशेत चमच्याने मिसळचा तेज तिखट रस्सा ओरपण्याची मज्जा काही औरच होती.  आणखी दोन वाट्या रस्सा प्यायल्यावर मन तृप्त झाले. मिसळ सोबत मेथीचा लाडू आणि शेंगदाण्याच्या कूट आणि गुळ घालून बनविलेल्या लाडूची ऑर्डर दिली.  प्रत्येक पदार्थाची चव अवीट होती. मेथी आणि शेंगदाणा  लाडू म्हणजे कोकणचा मेवा होता. सागरसंगीत न्याहारी झाल्यावर कडक स्पेशल चहाचा आस्वाद घेतला.

परवाचा जैतापूर ब्लॉग अपलोड करून पुढची सफर सुरू केली. अर्ध्या किलोमीटरवर उजव्या बाजूला विजयदुर्ग फाटा लागला तर डाव्या बाजूचा फाटा वैभववाडी मार्गे, फोंडा घाटाकडे जात होता. विजयदुर्ग फाट्यावर फोटो काढला. तेव्हढ्यात जोरदार पाऊस सुरू झाला म्हणून बाजूच्या टपरीवर थांबलो.
पाऊस थांबताच परतीची सफर सुरू झाली. ढगांनी आसमंत व्यापला होता. दूरवर दिसणाऱ्या डोंगरावर खाली उतरून मेघांचा वर्षाव सुरू होता. जलभारीत ढग त्यांच्या मर्जीप्रमाणे रंग बदलत होते.
 जोरदार वारा  नारळ, पोफळींच्या झावळ्या बरोबर पिंगा खेळत होता. खुरट्या झाडांची सळसळ नादमय संगीत साथ देत होती. जोरदार हेडविंडमुळे सायकल सुद्धा डोलत होती. स्पीकरवरच्या  रेडिओ संगीतापेक्षा निसर्गाचे संगीत ब्रह्मनंदी टाळी लावत होते.

 वाटेत अदिस्टी मातेचे मंदिर लागले. या मंदिरात असंख्य छोट्या छोट्या घंट्या लावल्या होत्या. 
कोकणात अशी खूप श्रद्धास्थाने आहेत.  जगाच्या पाठीवर कुठेही राहात असलेला कोकणी माणूस अशा देवळांच्या ओढीनेच कोकणच्या मातीशी नाळ जोडून आहे. इतरत्र पर्यटनापेक्षा आपल्या कोकणातल्या गावी जाणे त्याला खूप आवडते. गणपती, होळी, दहीकाला, पालखी, गोंधळ अशा प्रत्येक सणाला कोकणात येणारा चाकरमानी म्हणूनच खूप ऊर्जावान असतो. थोड्या साधनसामग्री मध्ये सुद्धा समाधानी असतो. 
कोकणातल्या वास्तव्यात निसर्ग सौंदर्याबरोबर येथील जनजीवनाची सुद्धा खूप जवळून ओळख झाली. 

ढगांच्या साथीने आजची ६५ किमी सफरीची सांगता करताना बालकवींच्या कवितेच्या चार ओळी मनपटलावर आल्या. 

अशी झेप घ्यावी, असे सूर गावे,

घुसावे ढगामाजि बाणापरी,

ढगांचे अबोली भुरे केशरी रंग

माखून घ्यावेत पंखावरी.


सतीश जाधव
आझाद पंछी...

Thursday, August 27, 2020

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प राईड

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प राईड

२५ ऑगस्ट, २०२०


दोन वर्षांपूर्वी विजयदुर्ग किल्यावर गेलो होतो, तेव्हा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प खाडीच्या पलीकडे दिसत होता. या प्रकल्प परिसराला भेट देण्याचे तेव्हाच नक्की केले होते. आज सायकलिंग करत जैतापूरला जाण्यामुळे माझ्या बकेटलिस्ट मधील एक इच्छा पूर्ण होणार होती.

सकाळीच वाल्ये गावातून सुरुवात करून कोंडये घाटी रस्ता निवडला. या घाटी रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल आहे. मनात गाणे गुणगुणत अतिशय हळू गतीने चढ चढत होतो. तेव्हढ्यात झाडीतून फुरऱ्... फुरर्... आवाज आला. सायकल थांबवून झाडीत नजर टाकली तर झाडीत रानगव्याचे दर्शन झाले. शिंगाखालील  माथ्याचा भाग पांढरा शुभ्र, तेज नजर, बाकदार शिंग आणि चेहऱ्यावरील राकट भाव जंगलाच्या शूर सरदारासारखे भासले. नजरेला नजर झाली.  त्याला कॅमेऱ्यात कैद करणार तेव्हढ्यात  रानगवा घनदाट रानात गायब  झाला. 

जंगलाच्या प्रत्येक प्राण्यांची, पक्षांची, कीटकांची एक सिमीत हद्द असते. त्या हद्दीत राहूनच त्यांची दिनचर्या सुरू असते. त्यामुळे त्यांच्या प्रदेशात शिरताना त्यांना त्रास होणार नाही, त्यांचे स्वतंत्र अबाधित राहील अशीच आपली वागणूक हवी.

काळ्या मुंग्यांची अतिशय शिस्तबद्ध रांग तुरुतुरु चालताना दिसली. सायकल थांबवून त्या रांगेला कोणताही अडथळा येणार नाही याची काळजी घेऊन रस्ता ओलांडला. 

टी टी टीव... टी टी टीव..., चूक चूक...,  कुहू कुहू... असे वेगवेगळ्या पक्षांची गायकी ऐकून मन मोहून गेले. आज वारा पडला होता.  समोर दिसणाऱ्या दरीतून पांढऱ्या शुभ्र ढगांचे पुंजके हिरव्यागार झाडांना स्पर्श करीत वर वर येत होते. घाटी चढताना दमछाक होत होती. एव्हढ्यात दवबिंदूंची बरसात सुरू झाली. हाताच्या केसांवर पडणारे दवबिंदूंचे थेंब मोत्यासारखे चमकत होते. 

वर चढण्याचा भार कमी व्हावा म्हणून झिक झ्याक सायकलिंग करत होतो.  रस्त्याच्या किनारीच्या भागावर शेवाळ जमा झाल्यामुळे सायकल ग्रीप सोडून घसरू लागली. समर्पयामीच्या आदित्यने ट्रेनिंग दिल्याप्रमाणे चाकातील हवा थोडी थोडी कमी केली. त्यामुळे शेवाळात सुद्धा  रस्ता पकडून सायकलिंग दमदारपणे सुरू होती.   कोंबडीच्या पिलासारखा चिव चिव आवाज काढत रस्त्यावरून तुरु तुरु धावणाऱ्या लाव्हा पक्षांचे दर्शन झाले. त्यांचे   तुरुतुरु धावणे परिकथेतील सात बुटक्यांसारखे भासले.
घाट चढून आलो. मजल दरमजल करीत कोंडीये गावाजवळील हायवेला आलो आणि सायकलची हवा टॉप अप केली. हायवेची सफर सराईतपणे पार करून हातीवले गावाजवळील उदयच्या चहा टपरीवर आलो. जान्हवी वहिनीच्या हातचा फक्कड चहा घेऊन जैतापूरकडे सायकल सफर सुरू झाली. येथून जैतापूर २९ किमी आहे. जुवाटी तिठ्या वरून जैतापूरकडे जाणाऱ्या रस्त्याला वळसा घेतला. 
हा रस्ता राज्य महामार्ग आहे. या वर्षी पडलेल्या भरपूर पावसामुळे, बऱ्याच ठिकाणी रस्ता ओबडधोबड झाला होता. निसर्गात सफर सुरू होती. प्रथम काशींगे त्या नंतर महाळूनगे गाव लागले. काशींगे गावाचा परिसर नयनरम्य फुलांनी फुलला होता. तर महाळूनगेला मोठा सॅटेलाईट टॉवर उभा होता. चौके फाटा येथून २१ किमी होता. सुंदर वातावरणात सायकल सफरीचा आनंद घेत होतो.
'डोंगर' गावात जाणारा फाटा लागला. त्याचवेळी हमरस्त्यावरील समोरच्या डोंगरावर हापूस आंब्यांची मोठी बाग लागली. अतिशय सुबक पद्धतीने एका रांगेत कलमे लावली होतो. उभी आडवी आणि तिरक्या रेषेत दिसणारी कलमी झाडांची  रांग त्या वाडीच्या मालकाची कलात्मकता दाखवीत होती. 

येथूनच नाणार फाटा लागला. नाणार प्रकल्प सध्या बंद स्थितीत आहे. उजवीकडे जाणार फाटा थेट राजापूरला जात होता. पुढे विलये तिठा, पडवे आणि त्यानंतर मुरगुले वाडी ही गावे लागली. पुढे कोंबे गावाची हद्द सुरु झाली.

 हॉटेल वजा टपरी दिसल्यामुळे हायड्रेशन ब्रेक घ्यायचे ठरविले. बाजूच्या रेशन दुकानावर बऱ्याच महिला मास्क लावून धान्य घेण्यासाठी सोशल डिस्टनसिंग पळून रांगेत उभ्या होत्या. चहा टपरीत स्पेशल चहाची ऑर्डर दिली आणि गावचे नाव विचारले. "साखरकोंबे" हे गावचे नाव ऐकून खूप गंमत वाटली. मालकाला सांगितले,  'चहात दोन चमचे साखर घाला'. गावांची अशी आगळीवेगळी नावे;  ही त्या त्या गावाची जुनी ओळख  देत असावीत. याच टपरीवर गावाकडची खोबरे चिक्की मिळाली. खोबरे, वेलची, खजूर आणि गूळ घालून बनविलेली चिक्की खूप चविष्ट होती. 

येथून दहा किलोमीटर जैतापूर आहे. त्यामुळे पुढचा ब्रेक जैतापूरला घ्यायचे ठरवून पुढची सफर सुरू केली.  वाटेत अनसुर, करेल गावे लागली करेलला शंकराचे  माणेश्वर मंदिर आहे. पुढे मीठगव्हाणे गाव लागले. पूर्वी मिठाची मोठी कोठारे असावीत या गावात. यानंतर जांभळगाव लागले. येथे बाप्पाच्या आरतीचे सूर कानावर येत होते. त्यानंतर वाघ्रण गाव लागले. परममित्र शरदच्या पाटीलच्या अलिबागमधील गावचे नाव सुद्धा वाघ्रण आहे. 
पुढे माडबन आणि अणुऊर्जा प्रकल्पाकडे जाणार फाटा लागला. या फाट्यावरून एकाबाजूला जैतापूर चार किमी दुसऱ्या बाजूला माडबन चार किमी अणुऊर्जा चार किमी आणि लाईट हाऊस चार किमी आहेत. क्षणभर विचार केला. प्रथम जैतापूर गावात जायचे नक्की केले.

मधल्या रस्त्यात कुवेशी, नंतर दळी आणि होळी गाव लागले. कोण कुलपती वेशीवर आला..., काय दळण दळल... आणि कशाची होळी केली... हे यां गावात थांबलो असतो तर नक्कीच शोधून काढले असते.

माझा सायकालिस्ट मित्र मितेश शिवलकरचे आणि प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकरचे जैतापूर हे गाव. खाडीच्या किनाऱ्यावर वसलेले निसर्गरम्य गाव.
 या गावात शिरताच बाजारपेठ लागली. पुढे पुरातन वेताळ देवाचे मंदिर लागले. त्यानंतर गावाची सायकल सहल सुरू झाली. 
 

चिंचोळ्या रस्त्यातून सायकलिंग करताना छोट्या छोट्या वाड्या लागत होत्या. नारळ, आंबा, केळी पोफळी, फणस या झाडांची रेलचेल होती. गावातील जेट्टी आणि बाजारपेठेतील जेट्टी यांना भेट दिली.
 भरतीची वेळ होती. दूरवर मासेमारी जहाज नांगरली होती. जैतापूरचे विशाल आणि मनमोहक खाडीचा भाग दिसत होता. एका बोटीवर भगवा झेंडा फडकत होता. त्याच्या पलीकडे नाटे गावतील भगवती मंदिर दिसत होते. 
 
 जेट्टीवर सायकल सह फोटो काढले. उजव्या बाजूला रत्नागिरीला जाणाऱ्या कोष्टल हायवेवरील खाडी पूल होता.  खाडीच्या पलीकडे नाटे गाव दिसत होते. खाडीत समोर एक बेट होते, त्यावर सुद्धा तीस चाळीस  घरे दिसत होती. या गावात नावेनेच जाता येते.
 

 पुढे कधी जैतापूरला राहणे झाले तर या बेटावर  सायकलिंग करायला खूप आवडेल.
 
 बाजारपेठेतील जेट्टीवर गेलो. पावसामुळे फेरी सर्व्हिस बंद होती. पायऱ्या पायऱ्यांची जेट्टी एकदम खाडीत लुप्त झाली होती. भरतीच्या पाण्यात जेट्टीच्या शेवटच्या तीन पायऱ्या बुडाल्या होत्या. पाण्यात सायकल उभी करून तिचे फोटो काढले. 
 

 बाजारपेठेत मांजरेकर खानावळीत जेवण घेऊन तडक माडबनकडे निघालो. जैतापूर सारखेच निसर्गरम्य माडबन गाव समुद्र किनारी वसलेले आहे. नावाप्रमाणेच माडांच्या झाडांतच हे गाव आहे. माडबन पर्यटनस्थळ आहे. चौपाटीवरून समोर विजयदुर्ग किल्ल्याचे दर्शन होते. किल्ल्याच्या उंच बुरुजावर भगवा झेंडा डौलाने फडकत होता.
 
 समुद्रांच्या लाटांचे उसळणे  मनाला भावले. भरती असल्यामुळे चौपाटीचा किनारा फेसळलेल्या  पाण्याने झाकला गेला होता. 
 
 माडबन गावातून पुन्हा मुख्य रस्त्यावर येऊन अणुऊर्जा प्रकल्पाकडे प्रस्थान केले. तीन किमी सायकलिंग करीन प्रकल्पाच्या गेट जवळ पोहोचलो. गेट बंद होते. 
गेटजवळ सायकल थांबवून तेथील  सुरक्षा रक्षकांबरोबर वार्तालाप सुरू केला. आत प्रकल्पाची कामे सुरू होती. प्रत्यक्ष हे स्टेशन चालू व्हायला किती काळ लागेल , याचे उत्तर मिळले नाही. पाण्याची बाटली भरून घेतली. सुरक्षा रक्षकांचे आभार मानून परत मागे फिरलो. 
 
 आता दुपारचे साडेतीन वाजले होते आणि परतीचा प्रवास अंधार पडायच्या आत पूर्ण करायचा होता. त्यामुळे तीन किमी वरील माडबन लाईटहाऊसकडे न वळता परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. 
 
 संध्याकाळच्या तिरप्या सुर्यकिरणांमुळे सायकलची सावली लांबवर पाडू लागली होती. आकाशातील ढगांचे पुंजके,  छोट्या छोट्या तळ्यात आंघोळ करायला उतरण्याचा प्रयत्न करीत होते. तसेच काही ढग झुडपांबरोबर लपंडाव करीत होते. 
पडवे गावात चहासाठी हायड्रेशन ब्रेक घेतला. येथे दुकान मालकाने आस्थेने चौकशी केली. सायकल वरून संपूर्ण राजापूर फिरल्याबद्दल त्यांना खूप आनंद झाला. पुन्हा सलग दीड तास सायकलिंग करत हातीवले हायवेला दुसरा हायड्रेशन ब्रेक घेतला. ११० किमी सायकलिंग करून संध्याकाळी साडेसहा वाजता घर गाठले.

आजच्या सायकल सफरीमध्ये गावांच्या नावाच्या गमती जमतीची मजा घेतली. जैतापूर खाडी, माडबन समुद्र, तेथून दिसणारा विजयदुर्ग किल्ला आणि निसर्गरम्य परिसर यांचा आनंद भरभरून लुटला. 

 सतीश जाधव
 आझाद पंछी..

Tuesday, August 25, 2020

धुतपापेश्वर राईड

धुतपापेश्वर राईड

२३ ऑगस्ट, २०२०

धुतपापेश्वर मंदिराचे नाव बऱ्याच वर्षांपासून ऐकून होतो  पण पाहणे झाले नव्हते. त्यामुळे आज धुतपापेश्वर राईड करायची हे नक्की केले.

वाल्ये गावातून राईड सुरू झाली. आज कोंडये गावाकडे जाणारा चढाचा रस्ता निवडला होता. चिंचोळा रस्ता आणि पावसात डांबर-खडीची धूप झाल्यामुळे रस्ता ऑफ रोडिंग झाला होता. गियर एक बाय दोन लावून अतिशय संथ गतीने घाट चढून गेलो. अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. डोंगराच्या वर सपाटीला पोहोचताच, जोरदार पाऊस सुरू झाला. पावसाच्या जलधारा मध्ये घाम आणि शीण दोन्हीही वाहून गेला. 

पठाराच्या दोन्ही बाजूला बेधुंद हिरवळ आणि काजूची झाडे दिसत होती. पाणथळीमध्ये पडलेले झाडांचे प्रतिबिंब निसर्गाचे आगळे वेगळे प्रतिरूप दाखवत होते.  

आणखी दोन चढ-उतार केल्यावर वाल्ये गावाची हद्द संपून पन्हाळे गाव सुरू झाले. वेशिवरच्या एका टपरीवर पाचसहा वयस्क बसले होते. त्यांना रामराम करताच, सर्वांनी ऊभे राहून मला प्रति नमस्कार केला. सायकलने घाट चढून आल्याचे आश्चर्य सर्वांच्या चेहऱ्यावर जाणवत होते. धुतपापेश्वरला जाणार हे सांगितल्यावर, एक आजोबा म्हणाले, 'सायकलने',  'हो' म्हणताच त्यांनी तोंडभरून आशीर्वाद दिले.

कोंडये गावाच्या चढउताराची वाट पार करून हायवेला आलो. पाऊस अजूनही लपंडाव खेळत होता. कोंडये गावाचा चढ लागला आणि पेडलिंग करताना घामाच्या धारा वाहत होत्या. पुन्हा उताराला पावसाचा मारा सुरू झाला. अतिशय मजेत सफर सुरू होती. "सुहाना सफर और ये मौसम हसी" हे गाणे आपसूकच ओठावर आले. हायवेच्या दोन्ही बाजूला पसरलेली झाडे आणि भाताची शेती पाहून सायकल थांबविली आणि गाणे गात निसर्गाबरोबर संवाद साधला. 

भाताची हिरवीगार पाने डोलून साथ देत होती. लाल पिवळी गवतफुले एकमेकांशी दांडिया रास करीत डोलत होती. फुलांच्या ओढीने फुलपाखरे त्यांच्याशी हसत खेळत लपंडाव करीत होते. जगाला आनंद देण्यासाठी उमललेली ही क्षणभंगुर फुले, चिरकाल मनाच्या गाभाऱ्यात दरवळत होती.

जुवाटी फाटा पार केला, त्या नंतर जैतापूरला जाणारा हातीवले फाटा लागला. फाट्यावरच्या उदय जानवलकरच्या टपरीवर आलो.  अर्धा डझन केळी घेतली. दोन खाल्ली आणि बाकीची पाठपिशवीत ठेवली. केळी म्हणजे सायकलिंग साठी बूस्टर डोस असतो. 
आरेकर वाडी बस स्टॉप पार केल्यावर टोल नाका लागला. तेथून पुन्हा चढला सुरुवात झाली. हॉटेल अंकिता पॅलेस हॉटेलपर्यंत चढ चढल्यावर उतार सुरू झाला. हायवे सोडून उजव्या बाजूला गंगातीर्थाकडे वळसा घेतला. 

राजपुरचे गंगातीर्थ ऐतिहासिक महत्वाचे आणि पवित्र स्थळ आहे. 
छत्रपती शिवाजी महाराजांनी विजयापुरच्या (बिजापूर) बादशहावर स्वारी करून राजापूर ताब्यात घेतल्यावर या गंगातीर्थाला भेट दिली होती. कविवर्य मोरोपंतांनी भेट देऊन  राजापूरच्या गंगेचे महात्म्य सांगणारे  "गंगा प्रतिनिधीर्थ कीर्तन" काव्य रचले आहे. गंगातीर्थाच्या जीर्णोद्धारासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी भरीव देणगी दिली आहे. 

दर तीन वर्षांनी आगमन होणाऱ्या गंगातीर्थाला महाराष्ट्राच्या इतिहासात मनाचे स्थान आहे. येथे एकूण चौदा कुंड आहेत, त्यातील काशीकुंड आणि मूळ गंगा कुंड  'प्रमुख कुंड' आहेत.

चौदाव्या शतकात राजा रुद्रप्रताप यांनी चौदा कुंडांचे बांधकाम केले. विशेष म्हणजे या कुंडांतील प्रत्येक जलाचे तापमान वेगवेगळे आहे. 

या गंगातीर्थाला सवाई माधवराव पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर यांनी भेटी दिल्या आहेत. जेव्हा गंगा अवतीर्ण होते तेव्हा येथे मोठी यात्रा भरते. भारतवर्षातील अनेक भाविक या गंगा 
तीर्थाला भेट देतात. सध्याच्या परिस्थितीमुळे मंदिर बंद होते. बाहेरून सायकलसह फोटो काढून उन्हाळे गावाकडे प्रस्थान केले. 

या उन्हाळे गावात गरम पाण्याची पवित्र कुंड आहेत. बाजूलाच ग्रामदैवत महालक्ष्मीचे भव्य मंदिर आहे. 


हिच्या चरणामधून या पवित्र गरम झऱ्यांची निर्मिती झाली आहे. भाविक या कुंडात स्नान करणे म्हणजे मातेचा कृपा प्रसाद मानतात. अर्जुना नदीच्या वाढलेल्या पाण्यामुळे गरम पाण्याचे कुंड भरून गेले होते. 

जवळच स्वामी समर्थांचा मठ आहे. तेथे स्वामी समर्थांच्या पादुका आहेत. उन्हाळे गाव आणि मठ नारळी, पोफळी, आंबा, फणस, काजूंच्या झाडांमध्ये वसलेले आहे. बाजूने वाहणारी अर्जुना नदी, हिरवागार निसर्ग, रम्य शांत वातावरणामुळे मन भावविभोर झाले.

 खरच... सायकलिंगमुळे कोकणातील निसर्गरम्य तिर्थस्थळे पाहण्याचा योग जुळून आला होता. येथून जवळच कोकण रेल्वेचे राजापूर स्टेशन आहे. 
 
 आता सुरू झाली राजापूरकडे सायकल राईड.  अर्जुना नदीच्या पैल तीरावर राजापूर शहर वसलेले आहे. हे शहर ऐतिहासिक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या "आज्ञापत्रात" राजपुरचा उल्लेख आहे.  महाराजांच्या दूरदर्शीपणामुळेच इंग्रजांना समुद्र किनारची बंदरे वापरासाठी न देता तीस किमी आत  खाडी मध्ये व्यापारासाठी राजापूर बंदर वापराची परवानगी दिली होती. जेणे करून त्यांच्या सर्व व्यापारउदिमावर बारकाईने नजर ठेवता येईल.
 
राजापूर शहरात प्रवेश केला आणि खाडी 
किनाऱ्याने  दोन किमी आत आल्यावर खाडी ओलांडून घुतपापेश्वर घाट चढायला सुरुवात केली. चार किमीचा अतिशय कठीण चढ होता. सुरुवातीला  एक बाय दोन आणि नंतर एक बाय एकवर गियर लावून घाट पार केला. येथे  पावसाच्या साथीमुळे  न थांबता,  न थकता, एका दमात घाट पार केला. 

धोपेश्वर गावात प्राचीन धुतपापेश्वर मंदिर आहे. श्री शंकराचे स्वयंभू शिवलिंग धबधब्या खालील छोट्या गुंफेत आहे. 
तसेच  या शिवलिंगावर धबधब्याचा जलाभिषेक होत असतो. यालाच कोटीतीर्थ म्हणतात. आज पडत असलेल्या जोरदार पावसामुळे धबधब्याला खूप पाणी होते, त्यामुळे शिवलिंगपर्यंत जाणे अशक्य होते.

ह्या निसर्गरम्य धबधब्याच्या तीन स्टेप्स आहेत. त्याचा धीरगंभीर आवाज, आजूबाजूला घनदाट अरण्य, खाली जाणारी खोल दरी, नारळ, पोफळी केळीच्या बागा,  हे अप्रतिम वातावरण पाहिल्यावर शिवशंकर महाराज येथे का आले असावेत, याची प्रचिती येते.
धबधब्याच्या बाजूला धुतपापेश्वराचे मंदिर सुद्धा आहे. मंदिर खुले होते. परंतू एकच कुटुंब देवदर्शनाला आले होते. मुख्य गर्भ गृह बंद होते.धबधब्याचे व्हिडीओ आणि फोटो काढून बाहेर आलो. 

मंदिराबाहेर एक अवलिया श्री वसंत ठाकूर यांची भेट झाली. 
यांच्या डाव्या हाताची नखे चार फूट लांब आहेत. यामुळे त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद आहे

एक नकलाकार, पक्षांचे, प्राण्यांचे, फिल्मी कलाकारांचे आवाज काढणारा, शिट्टीने गाणी म्हणणारा, तांदळावर दीडशे अक्षरे, गाईच्या केसावर गणपती काढणारा हा असामी जगावेगळा आहे. गेली ३५ वर्ष घालविली आहेत त्याने नखे वाढविण्यात.
 बाळासाहेब ठाकरे, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन यांचा फॅन आहे. सर्वांचे हुबेहूब आवाज काढण्यात पटाईत.  समर्थ रामदास स्वामींचा शिष्य समजतो स्वतःला, त्यामुळे पायात चप्पल घालत नाही, ब्रम्हचारी आहे आणि धोपेश्वर गावात आई सोबत राहतो. तसेच सतत नामस्मरण करीत असतो.
 
त्याच्या समवेत तासभर होतो. प्रत्येक क्षण मला हसवत होता, त्याच्या नकलांच्या साथीने.  निसर्गावर प्रेम करणारा, प्रचंड सकारात्मक दृष्टोकोन असणारा  हा माणूस ध्येय वेडा आहे. 

त्याला माहित आहे, चांगले बोलण्यामुळे आणि तसेच वागण्यामुळेच सांसारिक पाश नसताना सुद्धा  खूप मोठा मित्रपरिवार आहे त्याचा. वेडीच माणसे जगावेगळे छंद जोपासू शकतात, याची जाणीव झाली. 

सायकल भ्रमंती करताना अशी माणसे भेटणे हे खरंच माझे भाग्य होते.

वसंत ठाकूर यांनी सांगितलेले काही विचार  : - 

ज्या घरात म्हातारे आई वडील राहतात 

तो सर्वात मोठा  श्रीमंत माणूस. 

माणूस कमावलेल्या पैशाने श्रीमंत होत नाही

तर जमवलेल्या माणसांनी श्रीमंत होतो.

फुले नित्य फुलतात, ज्योती अखंड उजळतात

आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात.

कारण सांगणारे लोक कधीही यशस्वी होत नाहीत

आणि यशस्वी होणारी माणसे कधीही कारण सांगत नाहीत.

कालचा दिवस गेला,

उद्याचा दिवस अजून यायचा आहे,

आजचा दिवस तुमच्या हातात आहे,

चला कामाला लागा.

आजची डोंगर दऱ्यातील ५० किमी सायकल राईड  राजापूर परिसरातील प्रसिद्ध स्थळे, तीर्थक्षेत्र पाहण्यासाठी होती. पण त्या अनुषंगाने नकळत राजापूरच्या  धेय्यवेड्या माणसाची पण मैत्री झाली.

सतीश जाधव
आझाद पंछी...