Friday, December 11, 2020

वैतरणा त्रंबकेश्वर जव्हार सायकल सफर


वैतरणा त्रंबकेश्वर जव्हार सायकल सफर 

दि. ७ ते ९ डिसेंबर २०२०

०७.१२.२०२०

सायकलिंगमुळे काय काय  घडू शकते याचे प्रत्यंतर म्हणजे त्रंबकेश्वर सायकल वारी आहे...

मुंबई महापालिकेत कार्यरत असताना दोन-तीन वेळा वैतरणा तलाव पाहण्याचे ठरले होते. परंतू काही कारणास्तव तो योग जुळून आला नव्हता. सायकलिंग मुळेच हे शक्य झाले. 

विजयचे एक बरे आहे., त्याने मनावर घेतले की पूर्ण करायचेच,  या त्याच्या स्वभावामुळेच अडीच दिवसात ही सफर पूर्ण झाली. किंबहुना पावसाळ्यात सहकुटुंब ही सहल करायची हे सुद्धा ठरले. 

सोमवारी, सात तारखेचा दिवस विजयने भरला आणि दुपारी अडीच वाजताची  लोकल पकडून साडेचार वाजता कसारा गाठले. सुरू झाली आमची सायकल वारी वैतरणाकडे. संध्याकाळ होत आली होती तरीही उन्हाचे कवडसे डोळ्यावर येत होते. कसारा घाट सुरू झाला, तशी वाहनांची वर्दळ सुरू झाली. मोठे मोठे कंटेनर एकमेकांना ओव्हरटेक करतात तेव्हा सायकल रस्त्यावरून खाली घेण्याशिवाय गत्यंतर नसते. 

एका मागोमाग सायकलिंग करत अर्धा घाट चढून गेलो आणि वैतरणा धरणाकडे जाणारा रस्ता लागला.

 घाट सोडून विहिगाव कडे जाणाऱ्या रस्त्यावरून सायकलिंग सुरू झाले. विहिगाव सोडले आणि वैतरणा नदीवरील पुलावर पोहोचलो. 
सूर्य निजधामाला प्रस्थान करत होता. वैतरणेच्या डोहातील एक शुष्क झाड आसमंतात पसरलेला लालीमा अनिमिष नजरेने न्याहाळत होते. शांत निवांत पसरलेल्या जलाने लाल दुलई अंगावर ओढली होती. डोंगराच्या आड अस्ताला जाणारा रवी अनंत रंग उधळीत आपल्या निर्गमनाची ग्वाही गगनाला देत होता. या लोकेशनवर विजय सेल्फी मध्ये स्वतःलाच न्याहाळत होता.  
हे निसर्गरम्य दृश्य डोळ्याच्या कॅमेऱ्यात साठवून पुढे प्रस्थान केले.

काही ओळी मनात तरळल्या ...
अस्तास निघाली ...
दिव्य रविराज स्वारी ...
आवरोनी पसरलेली ...
किरणप्रभा सारी ...
नभी विलसतसे ...
लालीमा चौफेर ...
नयनास सुखावतसे ...
सायंकाळ मनोहर ...
सुगंधित मंद  वाहे समीर ...
 पक्षी सुस्वर आले समेवर ...
 गगनी उगवला शुक्राचा तारा ...
 मनी मोर धुंदीत नाचणारा ...

अंधार पडायला सुरुवात झाली आणि सायकलचे हेडलॅम्प सुरू केले. रहदारी अतिशय कमी होती. पाहिले डेस्टिनेशन २८ किमी वरील खोडाळा होते. विहिगाव सोडले आणि चढ उताराचा, वळणावळणाचा रस्ता सुरू झाला. अंधारामुळे सायकलचा वेग सुद्धा अंमळ हळू झाला होता. खोडाळा गावात पोहोचायला सायंकाळचे सात वाजले होते. 

गावात चौकशी केली असता जवळच्या मंदिरात झोपण्याची व्यवस्था होईल असे समजले. नशेरा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चार किमी अंतरावरील वाईल्ड कॅम्प रिसोर्ट बद्दल माहिती मिळाली. 

रात्रीच्या अंधारात सुरू झाली राईड. वाईल्ड कॅम्प जवळ पोहोचलो, तर गेटला कुलूप होते. रिसेप्शन जवळ लाईट सुरू होती. छोट्या गेटची कडी उघडून रिसेप्शनला हाक मारली. कोणाचाही मागमूस दिसत नव्हता. 
पायऱ्यांवरून चढत वरच्या दिशेला निघालो. रेस्टॉरंटकडे थोडी हालचाल दिसली. जवळ गेलो तेथे रिसॉर्ट मॅनेजर मंजुनाथची भेट झाली. राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था झाली. अतिशय लॅव्हीश असलेला डिलक्स रुम अतिशय रिझनेबल दारात आम्हाला मिळाला. तसेच जेवण सुद्धा मस्त आणि झकास बनविले होते. आजची ३२ किमीची संध्याकाळची राईड अविस्मरणीय होती.

वाईल्ड कॅम्प रिसॉर्ट ३३ एकर जागेवर बनविले आहे. चोवीस सुपर डिलक्स रुम डोगरांच्या उतारावर वसले आहेत. रिसेप्शन हॉलच्या भिंतीवर सुंदर वारली पेंटींग्ज आहेत. गणपती मंदिर, स्विमिंग पूल, मुलांसाठी प्ले हॉल, तसेच सकाळी ब्रम्हगिरी पर्यंतचा निसर्गाने नटलेला संपूर्ण परिसर न्याहाळता येतो. जवळून वाहणाऱ्या वैतरणा नदीचा खळखळणारा आवाज सुद्धा रात्रीच्या शांत वातावरणात अनुभवता येतो.

०८.१२.२०२०


सकाळी पावणे सहा वाजता रिसॉर्ट वरून राईड सुरू केली. दरीतून चार किमी चढाचा रस्ता पार करून खोडाळा गावात आलो. सर्वत्र सामसूम होती. आता सुरू झाली वैतरणा धरणाकडे राईड. 
घाट रस्ता होता. अंधारात लाईट लावून धीम्या गतीने पेडलिंग सुरू होते. पहाटेचे आल्हाददायी थंडगार वारे, तसेच हेडविंड आणि चढाचा रस्ता एन्जॉय करत पुढे चाललो होतो. मॉर्निग वॉकसाठी निघालेली गावकरी मंडळी वाटेत भेटत होती. सूर्योदयाची चाहूल आसमंताने दिली. निळ्या जांभळ्या सोनेरी रंगांची बरसात सुरू झाली. सूर्यनारायणाचा रथ हळूहळू धरणीकडे दौडू लागला. 
झाडे, पाने, पक्षी प्रफुल्लित झाले होते. पाखरांचा किलबिलाट, जवळच्या गावातून येणारे कोंबड्याचे आरवणे, गाईंचे हंबरणे; मनात असीम आनंदाच्या मंद लहरी निर्माण करत होत्या. सोबत असलेला म्युजिक बॉक्स बंद ठेवून निसर्गाचे संगीत ऐकण्यात दंग झालो होतो. 

 मन प्रसन्न करणारे सकाळचे वातावरण,  रहदारी विरहित रस्ता, खरं तर .. ही सायकलिस्टसाठी पर्वणी होती. आदित्य काकाने सांगितलेले मनोमन पटले... सकाळी लवकर म्हणजे पाचच्या आसपास राईड सुरू करा... ब्रह्ममुहूर्तामधील सर्व नैसर्गिक शक्ती तुम्हाला अनुभवता येतील. तसेच दुपारी बारा वाजेपर्यंत सहजपणने शंभर किमी अंतर पार केलेले असेल.
एका व्हीव पॉईंट जवळ पोहोचलो आणि ऑफ रोडिंग सायकलिंग सुरू झाले. घाटाच्या टोकावर पोहोचलो आणि समोरच्या डोंगराआडून भास्कराने दर्शन दिले. गळ्याभोवतीचे तांबूस सोनेरी उपरणे आसमंती लहरत असताना आदित्य राज आसमंतात विराजमान होत होता. अतिशय नितांत सुंदर आणि विहंगम सुर्योदयाचे आम्ही दोघेच साक्षीदार होतो. 

दूरवर पसरलेल्या डोंगरांच्या घड्या, खालच्या दरीत दाटलेल्या घनदाट झाडांचे वन , ढगांचे वाहणारे पुंजके;  सारे काही स्तिमित करणारे होते. 
प्रत्येक ठिकाणी निसर्ग का बरे वेगळा भासतो ? 

 का, निसर्गाचे असणे विविध रंगी आहे ?

एक मात्र जाणले!!! आपल्या मनातील भावनांप्रमाणे निसर्ग बदलतो...

चढ उताराचा आणि ओबडधोबड रस्ता पार करत वैतरणा धरणाच्या समोरील पुलावर पोहोचलो. धरणाचे दरवाजे बंद होते. तरी एक पाण्याचा छोटुकला झोत खाली कोसळत होता. नदीच्या पात्रात झुडपे उगवली होती. पावसाळ्यात जेव्हा धरणाचे दरवाजे उघडले जातात तेव्हा वैतरणा नदी जिवंत होते. 
पुढे दोन रस्ते लागले. एक घोटीकडे जाणारा तर दुसरा वैतरणा जलाशयाकडे जाणारा.

 अर्धा किमी पुढे आलो... आणि विस्तीर्ण, अथांग जलाशय दिसू लागला. सायकल झाडाच्या साथीने उभी करून जलाशयाचे नयन मनोहारी रूप डोळ्यात साठवू लागलो. 
खूपशी झाडे जलाशयात डुंबत होती. एका किनाऱ्याला कोणीतरी टेंट लावून कॅम्प साईट बनविली होती.
 वाहणाऱ्या वाऱ्यावर जलाशयात खळखळऱ्या लाटा उमटत होत्या. कान आणि मन तृप्त झाले.  पाण्यात उतरलो... वैतरणा धरण पाहण्याचे खूप वर्षांचे स्वप्न साकारले होते. यालाच अळवंडी धरण म्हणतात.
 सुंदर नजारा.. अथांग जलाशय... त्यातून जाणारा चिंचोळा रस्ता... लांबवर समोर दिसणारा ब्रम्हगिरी पर्वत... किनाऱ्यावर लावलेले टेंट... झाडांचे जलाशयात डुंबणे... सारेकाही नयनरम्य...
 
 स्वर्ग-स्वर्ग म्हणजे दुसरं काय असत.. अतिसुंदर नजारा इथे पाहायला मिळाला. मन आनंदाने भावविभोर झालं.

या परिसरात वर्षातील सहा महिन्यापेक्षा अधिक काळ धुके असते.  रामायणात उल्लेख केलेला दंडकारण्याचा भाग हा प्रामुख्याने हाच परिसर होता. विशेष म्हणजे जांभूळ,करवंदे,गावठी आंबे कटूर्ले, काजू, फणस, रानभाज्या, चीचुर्डे, गावठी काकडी [मेणाची काकडी ], भोकर, काचर ,वाळकं इत्यादी विविधतेने नटलेला दुर्मिळ रानमेवा याच परिसरात चाखायला मिळतो.

 ठाकूर, महादेव कोळी, वारली, कोकणा या आदिवासी जमातींचे  वास्तव्य  या परिसरात आढळते. त्यांची संस्कृती, प्रथा, त्यांचे राहणीमान, त्यांची नृत्यशैली, त्यांचा बोहाडा हा सांस्कृतिक कार्यक्रम  कायम आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. वारली चित्रकला तर जगप्रसिद्ध आहे.
 
  हा परिसर महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्यमान असलेला भाग  असल्यामुळे येथे भात हे प्रमुख पिक आहे. भातशेतीसाठी लागणारे पाणी पावसाळ्यात चोहोबाजूंनी शेतात पसरलेले असते हे विहंगम दृश्य बघून असे वाटते की सगळीकडे धरतीने पाण्याची निळी  शालचं पांघरलेली आहे. 
  
  सर्वाधिक पर्जन्यमान, धबधबे,  किल्ले, प्रेक्षणीय स्थळे, अध्यात्मिक केंद्रे, श्रद्धास्थाने, नद्या, धरणे यांनी व्यापलेला हा परिसर महाराष्ट्राचा स्वर्गच म्हणायला हवा. 
  
आतापर्यंत सकाळ पासून २८ किलोमीटर राईड झाली होती वैतरणा पर्यंत.  येथून २६ किलोमीटर राइड करायची होती, त्रंबकेश्वरला पोहोचायला. 
तासभरात  संपूर्ण परिसर पाहून पुढे प्रस्थान केले. तीन किमी वरील झारवड गावात पोहोचलो. गावात चहाची चौकशी करता... तुळसाबाई आजी म्हणाली, 'गुळाचा काळा चहा चालेल काय' आनंदाने होकार देताच, दहा मिनिटात  गुळाचा फक्कड चहा आला. 
गावातील पोरंटोरं जमा झाली. त्यांना आजीच्या दुकानातील गोळ्या वाटल्या. पुढल्या राईडसाठी चिकी घेतली. आजीने चहाचे पैसे घेतले नाहीत. हे निर्व्याज प्रेम... ही संस्कृती... आपल्याला खेडोपाडी अनुभवता येते. 
गावातील चटपटीत मुलगा ऋषिकेश आणि तुळसाबाई आजी बरोबर फोटो काढला. आजीच्या पाया पडून आशीर्वाद घेतले आणि पुढची सफर सुरू केली.

आता मार्गक्रमण अप्पर वैतरणा पाणलोट क्षेत्राच्या (रिजरव्हायर) बाजूबाजूने सुरू होते. वाटेत दापुरे गाव लागले. या परिसरात बरीच रिसॉर्ट सुद्धा आहेत.     तासाभरात नाशिक त्र्यंबक रोड लागला. समोर पवित्र ब्रम्हगिरी पर्वत दिसू लागला.  
त्रंबक घाट पार करून पवित्र क्षेत्र त्रंबकेश्वर मध्ये प्रवेश केला. थेट मंदिरापर्यंत सायकलिंग केले. 

सायकलने प्रथमच त्रंबकेश्वराचे दर्शन घेतले होते. मंदिरात फारशी गर्दी नव्हती. 
तरीसुद्धा संपूर्ण मंदिराला वळसा मारून गाभाऱ्यात जावे लागले. निवांत देवदर्शन झाले. थोडावेळ मंदिरात बसून मेडिटेशन केले.
त्र्यंबकेश्‍वर ज्योर्तिलिंग येथे ब्रह्मा, विष्‍णु आणि महेश  विराजित आहेत. ही या  ज्‍योतिर्लिंगाची सर्वात मोठी  विशेषता आहे. इतर सर्व ज्‍योतिर्लिंगामध्ये फक्त महेश्वर विराजित आहेत. हे शिवलिंग अंतरगोलाकृती आहे. त्याच्या आतमध्ये तीन लिंग आहेत. यांनाच त्रिदेव ब्रम्हा, विष्णू आणि महेश म्हणतात. सकाळची काकड आरती झाल्यावर ह्या आंतरगोलाकृती लिंगावर चांदीचा पंचमुखी मुकुट घातला जातो.

त्र्यंबकेश्वर मंदिर  ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीत स्थित आहे. या पर्वताला साक्षात शिवाचे रूप मानतात. याच  पर्वतावर  पवित्र गोदावरी नदीचा उगम आहे. हिलाच दक्षिण गंगा म्हणतात.
 सिंधू-आर्य शैलीचा नमुना असलेले प्राचीन दगडी बांधकाम असलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार नानासाहेब पेशव्यानी केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी करताना त्रंबकेश्वराचे दर्शन घेतले होते. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या पवित्र स्थळी दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो. तेव्हा येथील पवित्र तीर्थक्षेत्र कुशावर्तावर महास्नानासाठी भारतभरातून साधुसंत आणि भक्तमंडळी येतात....

मंदिर परिसरात फिरून प्रसाद म्हणून माव्यापासून बनविलेले रवाळ कालाकंद घेतले. तेथून बस स्टँड जवळ असलेल्या ओम गुरुदेव हॉटेल मध्ये आलो. तेथे दुपारचे जेवण घेतले. थोडी विश्रांती घेऊन जव्हारकडे राईड सुरू केली. 

जव्हार येथून ५१ किमी आहे. पाहिले डेस्टिनेशन ३० किमी वरील मोखाडा ठरविले. जेवणामुळे तसेच दुपारच्या उन्हामुळे वेग कमी झाला होता. वाटेत अंबाई घाट लागला. रस्ता ओबडधोबड असला तरी जास्त वळणाचा नव्हता. तसेच ग्रॅज्युअल उताराचा होता. त्यामुळे दमछाक कमी होत होती. दोघांच्या सायकलला हायड्रोलीक डिस्क ब्रेक असल्यामुळे कमी श्रमात पेडलिंग सुरू होते. घाटाच्या टॉपला होटेल पिकनिक पॉईंट अतिशय रम्य ठिकाणी पोहोचलो. येथून मेटकवारा आणि तोरांगणची व्हॅली आणि वसलेली गावे अतिशय नयनरम्य दिसत होती. 

पुढे लागलेल्या वालब्रीद मोखाडा घाटात क्षणभर विश्रांतीला संत्र आणि चिक्की खाल्ली. निळमाती गावात पुन्हा चहा ब्रेक झाला. 

उतारावर चरणगाव तसेच मोऱ्हान्डा गावे लागली. पोशेरा गावात चहा ब्रेक घेतला. मोखाडा फाट्यावर थोडा वेळ थांबलो. दुपारचे ऊन चढल्यामुळे थोड्या थोड्या वेळाने हायड्रेशन ब्रेक घ्यावा लागत होता. हा संपूर्ण परिसर आदिवासी ग्रामीण पट्टा आहे. त्यामुळे चहाची टपरी सुद्धा मिळणे कठीण होते. 
आता जव्हारचा २५ किमीचा टप्पा सुरू झाला. सूर्यास्ताच्या आत जव्हार गाठायचे होते. शेवटच्या टप्प्यात एनर्जी लेव्हल कमी असते. परंतु उन्हे थोडी उतरल्यामुळे जिद्दीने पुढील सफर सुरू होती. छोटे छोटे ब्रेक घेत पेडलिंग करत होतो. स्पीकरवरच्या लताबाईंच्या गाण्यामुळे प्रवास सुसह्य झाला होता. 

कोळसेवाडी रायताळे गावाच्या वळणावर आदिवासी महिला पेरू, रताळी विकायला बसल्या होत्या. त्यांच्याकडे पेरू घेतले आणि पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. पेरूमुळे एकदम तरतरी आली.
 हिंदीत पेरूला अमृद म्हणतात. आज खरच तो पेरू अमृतासारखा गोड लागला.  सर्दी होते म्हणून पेरू न खाणारा विजय, आज पेरुवर नितांत खुश होता. निसर्गाची हीच खरी किमया आहे. साऱ्या व्याधी पळवून लावण्याची अमोघ शक्ती निसर्गात आहे. फक्त आपण त्याच्या जवळ जायला हवे...
सायंकाळी सहाच्या दरम्यान जव्हार शहरात प्रवेश केला. वेशीवर सूर्यास्ताचे मनोहारी दर्शन झाले. आज  सर्व दुकाने बंद होती. विजय म्हणाला बस स्टँडकडे जाऊ तेथे राहायची व्यवस्था होईल. 

चार झेंडे लावलेल्या एका दुमजली इमारतीकडे पोहोचलो. 'हॉटेल शाम पॅलेस' हे मराठी नाव वाचून खूप आनंद झाला. समोर साईबाबांची मोठी फ्रेम आणि बाजूलाच स्वामी शिवानंद महाराज यांची फ्रेम पाहून,  साई धून ऐकून, तसेच सुंदर वारली पेंटींग पाहून मन प्रसन्न झाले. 
काउंटरवर असलेल्या वेदांशला रूम संबंधी विचारणा केली. त्याने फोन करून हॉटेलचे सर्वेसर्वा त्याचे बाबा, श्री बाळा अहिरे यांना बोलावले. बाळा भाऊंनी अतिशय माफक दरात आम्हाला रूम दिला. सर्व जव्हार बंद होते, तरीसुद्धा आमची, आपल्या घरी जेवणाची व्यवस्था केली. 

तासाभरात फ्रेश होऊन वेदांश बरोबर त्याच्या घरी गेलो. त्याची आई घरातच खानावळ चालवत होती. जेवण झाल्यावर बाजूच्याच दुकानात अमूल कुल्फी आईस्क्रिम विजयने मला आणि वेदांशला खाऊ घातली. 

जव्हारची माहिती वेदांशने दिली. येथील जयविलास राजवाडा, सूर्यास्त पॉईंट, हनुमान पॉईंट आणि दाभोसा धबधबा, कालमांडवी जलप्रपात ही प्रेक्षणीय स्थळे आहेत. या ठिकाणी पुन्हा एकदा पावसाळ्यात सहकुटुंब भेट द्यायची हे ठरविले. 

आजच्या दिवस भरात ९४ किमी राईड झाली होती. निसर्गदर्शन, देवदर्शन आणि मनुष्य दर्शन अशी विविधअंगी आजची राईड होती. रात्री लवकर झोपी गेलो, ते सकाळी साडेचार वाजता उठण्याचा इराद्याने.

०९.१२.२०२०

आज पहाटे वेळेवर जाग आली. मस्त झोप झाली होती. प्रातर्विधी आटपून पावणे सहा वाजता राईड सुरू केली. पहिला टप्पा २७ किमी विक्रमगडचा होता. दिड तासात विक्रमगडला पोहोचलो. उंच सखल खड्डे खुड्डे असणारे रस्ते होते. तरी रहदारी अतिशय कमी असल्यामुळे गाड्यांच्या लाईटचा त्रास नव्हता. वातावरण थंड होते परंतु सायकलिंग करताना शरीर गरम होते, त्यामुळे गारवा जाणवत नव्हता. 

विक्रमगड सुद्धा सहलीचे ठिकाण आहे. येथे दोन कॉलेज आहेत तसेच सरकारी पॉलिटेक्निक कॉलेज सुद्धा आहे. येथे बुधवारी फार मोठा बाजार भरतो. तेव्हा मुंबई नाशिक वरून जनसागर खरेदी साठी येतो.  रानमेवा, भाज्या, आदिवासी लोक साहित्य, वारली पेंटींग्ज इत्यादी आकर्षक गोष्टी या बाजारात मिळतात. 
विक्रमगड मनोर फाट्याजवळील श्री दत्ताकृपा मिसळ हाऊस मध्ये चमचमीत मिसळवर ताव मारला. आज विजयला कॉफी प्यायची लहर आली. नेसकॅफे पिऊन पुढची राईड सुरू केली. मनोर हायवे २२ किमी होता. तेथील रस्ता सुद्धा ऑफ रोडिंग सारखाच होता. परंतु उदरभरण झाल्यामुळे पेडलिंग मध्ये जोश होता. 

वाटेत शेतां मधील खळ्यामध्ये सुक्या पेंड्यांचे भारे बांधण्याचे काम सुरू होते. थोडावेळ आम्ही सुद्धा शेतकरी झालो.
सावडे, वेढे, भोपोली गावे पार करत दीड तासात मनोर जंक्शनला आलो.  साडेनऊ वाजले होते, उन्हे चढू लागली होती. त्यामुळे नाक्यावर फलाहार केला. दोन दोन केळी आणि संत्र खाऊन पाणी भरून घेतले.
आता विरार पर्यंत ४३ किमी राईड पश्चिम द्रुतगती महामार्गावरून करायची होती. विजय म्हणाला आपण पालघरला जाऊया. परंतु पालघर सुद्धा २५ किमी अंतरावर होते. तसेच रेल्वे गाड्यांची फ्रीक्वेन्सी कमी होती म्हणून विरारला जायचे नक्की झाले. 

धूळ, धूर, माती आणि गाड्यांची प्रचंड वर्दळ यात राईड सुरू झाली. ऊन वाढल्यामुळे दर दहा किमीवर हायड्रेशन ब्रेक घेत होतो. बस आणि कंटेनर एकमेकांना ओव्हरटेक करताना अतिशय जवळून जात होत्या. आम्ही सर्व्हिस रोडच्या पांढऱ्या पट्ट्याच्या आतूनच सायकलिंग करत होतो. धूर,धुळीचा त्रास होऊ नये म्हणून मास्क लावून चेहरा झाकून घेतला होता. 

दोन तासात विरार फाट्यावर पोहोचलो. तेथेच आगरी धाब्यावर जेवणासाठी थांबलो. जेऊन तडक दहा किमी अंतरावरील विरार स्टेशनकडे प्रस्थान केले. शहरात ट्राफिक असल्यामुळे वेग कमी झाला होता.  विरार स्टेशनात रेल्वे आमच्या दिमतीला तयारच होती. ट्रेनमध्ये बसल्यावर आम्ही निवांत झालो. आम्ही सुखरूप असल्याची घरी वर्दी दिली. एक छान झोप काढून, दोघेही दादरला उतरलो आणि घरी मार्गस्थ झालो.

आज ९० किमीची राईड दुपारी एक वाजताच पूर्ण झाली होती. 

एक नयनरम्य,  निसर्गसुंदर, भक्तिमय, प्रेक्षणीय आणि आरामदायी अशी ४८ तासांची सायकल सहल मजेत पूर्ण झाली होती. 

प्रत्येक सायकलिस्टने विशेषतः पावसाळ्यात ही राईड जरूर करावी....

सतीश जाधव
मुक्त पाखरे ...

7 comments:

  1. अप्रतिम वर्णन आणि सुंदर फोटोग्राफी 👌

    ReplyDelete
  2. खुप सुंदर वर्णन सर

    ReplyDelete
  3. एकदम छान मजा आली

    ReplyDelete
  4. NRG मित्राचे अभिप्राय!!!

    देव दर्शनाला जाताना,निसर्गाचे विविध रंगी दर्शन अतिशय आनंददायी...
    बहारदार वर्णन...
    नयनमनोहर निसर्गाला उत्तमरित्या
    कॅमेरा बध्द केल्याने त्याचे विलोभनीय दर्शन वाचताना होते ...

    ReplyDelete
  5. वर्षाचे अभिप्राय !!!

    वैतरणा राईड वाचली, निसर्गाची विविध रूपे, रंगांची उधळण , फारच आवडली रे, सौदर्याने भरलेले हे रूप साठवून घेतले डोळ्यात, तुझी कविता उत्तम, सर्वांना जोडून ठेवण्याची तुझी वृत्ती आणि हो विजयची साथ खूपच भावले मनाला

    ReplyDelete