Monday, December 28, 2020

नर्मदा परिक्रमा!!! इंदोर ते ओमकारेश्वर

इंदौर ते ओमकारेश्वर सायकल वारी

२७.१२.२०२०

सकाळी साडेनऊ वाजता अगदी वेळेत अवंतिका एक्सप्रेस इंदोर स्टेशनला पोहोचली. स्टेशन मधील पेंटींग्स मनमोहक होती.

 स्टेशनवर संजयचा मित्र मनोज कुमार शर्मा आम्हाला रिसिव्ह करायला आला होता. संजयचा सायकल बॉक्स लगेज मधून मिळविला, तेथून मनोज कुमारच्या घरी पोहोचलो. वाटेत मनोजने इंदोरचे प्रसिद्ध घंटाघर दाखविले. 

सायकल असेंबल करून फ्रेश होईपर्यंत शर्मा भाभीने जेवणाची व्यवस्था केली. पराठे, पनीर-वाटाणा भाजी, दही, मसाले भात, चटणी आणि फ्रुट सलाड असा फर्मास बेत होता. जेवणानंतर गोड पदार्थ रसगुल्ल्याचा आस्वाद घेतला.

इंदोर जवळील देवमुरारी गावातील 'नालंदा सिजन ऑफ जॉय' कॉलनीत राहणारे मनोजचे चौकोनी कुटुंब अतिशय भावले. मानसी आणि मानवी या छोट्या मुली अतिशय गोड होत्या.
 मनोज स्वतः सायकलिस्ट आहे. विशेष म्हणजे घरात चार सायकल्स आहेत. सर्व कुटुंब सायकल वरून सैर सपाटा करीत असते. मनोजला वाचनाची खूप आवड आहे, हे घरातील पुस्तकांनी भरलेल्या सेल्फ मधून जाणवले. नर्मदा परिक्रमेच्या सुरुवातीला ह्या प्रेमळ कुटुंबाची ओळख ही नर्मदा मैयेची कृपाच म्हणायला हवी. 

शर्मा कुटुंबाचा निरोप घेऊन सायकलिंग राईडला दुपारी २ वाजता सुरुवात केली. येथून ओमकारेश्वर ७८ किमी आहे. सुरुवातीला साधारण तीन किलोमीटर आग्रा-मुंबई हायवे लागला. ह्या रोडला सर्व्हिस रोड असल्यामुळे निवांत सायकलिंग चालले होते. पुढे ओमकारेश्वर आणि खांडवा कडे जाणाऱ्या रस्त्यावर डावीकडे वळलो. हा रस्ता दोन पदरी असल्यामुळे डाव्या बाजूने अतिशय सावधगिरीने सायकलिंग करावे लागत होते. किशोर कुमारचे खांडवा हे जन्मगाव १३० किमी अंतरावर आहे. 
मोठे मोठे कंटेनर जेव्हा मागून हॉर्न मारत, तेव्हा रस्त्याच्या खाली उतरण्याशिवाय मार्ग नव्हता. MTB सायकलमुळे ऑफ रोडिंग सायकलिंग सोपे होत होते. 

बरेच मोटारसायकलवाले स्पीड कमी करून आमची चौकशी करत होते. आयआयटी सीमारोल गावातील निर्भय सोनी या गृहस्थानी मोटारसायकल थांबवून आम्हाला  पुढे पाच किमी अंतरावरील घरी चहा पिण्यासाठी येण्याचे आमंत्रण दिले. सीमारोल गावाच्या रस्त्यावर त्याचा मुलगा नवनीत आम्हाला रिसिव्ह करायला आला होता. निर्भयने अतिशय प्रेमाने आम्हाला चहा पाजला. 
तो स्वतः सायकलिस्ट आहे. त्याचे सोन्याच्या दागिन्यांचे दुकान आहे. या छोट्याश्या गावात IIT आहे, याचे खूप अप्रूप वाटले. मैयाजीच्या कृपेने प्रेमाचा प्रसाद मिळत होता. 

पुढे भैरव घाट लागला. अतिशय वेडीवाकडी वळणे घाटात होती. या घाटात एका अतिशय तीव्र वळणावरून खाली उतरताना, एक मोटारसायकल घाट चढताना घसरू लागली.  त्यावर दोन लहान मुले आणि पति-पत्नी असे चार जणांचे कुटुंब सफर करत होते. ताबडतोब सायकल बाजूला पार्क करून धावत जाऊन मागून त्या मोटारसायकलला मागून आधार दिला आणि वर धक्का मारत मोटारसायकल खाली घसरून पडणार नाही याची खबरदारी घेतली. त्यामुळे होणारा अनर्थ टळला. खरच... हा नर्मदा मैयेचा आदेश असावा...

घाट उतरताच भैरव बाबाचे मंदिर लागले. या मंदिराचे वैशिट्य म्हणजे... ज्यांना वाईट व्यसन सोडायचे आहे... अशी मंडळी भैरवबाबाला सिगारेट, दारू देतात. 
तुमची वाईट व्यसने मला अर्पण करा आणि नर्मदा मैयेच्या दर्शनाला जा... असाच संदेश भैरव बाबा देत असावा का ?

वाटेत बाईग्राम गावात शनी मंदिर लागले. रेडा वाहन असलेली शनी देवाची काळी कभिन्न मूर्ती अतिशय तेजपुंज होती. शनी देवाच्या चेहऱ्यावर आश्वासक हास्य होते. . या जागृत देवस्थानात स्त्री-पुरुष सर्वांची खूप गर्दी होती. 
सहा वाजता बारवाह गावात पोहोचलो. चहाच्या टपरीवर चहा-बिस्किटे घेतली. चहावाल्याला पैसे विचारताच, त्याने हात जोडले आणि म्हणाला, 'साहब आप नर्मदा मैयाजी परिक्रमाके पवित्र कार्य मे जा राहे हो'. 'आप आधा पैसा सिर्फ  बीस रुपया देना'. हमारी तरफसे मैंयाजीको प्रणाम कहना... 
त्याच्या श्रद्धेला नमन केले. त्या गरीब चहावल्याच्या प्रेम पूर्वक अविर्भावामुळे मन उचंबळून आले. त्याच्यासह फोटो काढून पुढे निघालो. 

तासाभरात बरोबर सात वाजता ओमकारेश्वरच्या नव्या बस स्टँड जवळ पोहोचलो. मंदिर येथून दोन किमी अंतरावर आहे. जवळच असलेल्या स्वामी गजानन महाराज आश्रम संकुलात पोहोचलो. या संकुलात सर्वजण मराठी बोलतात. विशेष म्हणजे येथील  सेवक प्रत्येकाला 'माऊली' संबोधतात. 
सायकलने परिक्रमा करणारे परिक्रमावासी म्हणून आम्हाला दोन बिल्ले देण्यात आले. विशाल अशा हॉलमध्ये आमची व्यवस्था करण्यात आली. अतिशय स्वच्छ आणि शांत असलेल्या या संकुलात गजानन महाराजांचे भव्य मंदिर आहे. रात्री महाराजांच्या शेजारतीने आम्ही भक्ती रसात न्हाऊन निघालो.
इंदोर ते ओमकारेश्वर ही ७८ किमी ची सायकल यात्रा   म्हणजे सांसारिक जीवनातून अध्यात्मिक संन्यस्त जीवनाकडे केलेली सफर होती. 

नर्मदे हर !!!

सतीश जाधव
मुक्त पाखरे...

10 comments:

  1. सतिशराव जर असेच विरक्तीकडे गेलात तरएकदिवसआम्हाला तुम्हाला शोधण्यासाठी हिमालयात यावे लागणार
    जीवनातल्या अविट गोडीकडे तुम्ही निघाले आहात नर्मदामैय्या आपला प्रवास सुखकर व आनंदमय करो 🌹जय नर्मदा मैय्या🌹हार्दिक शुभेच्छा 🌹

    ReplyDelete
  2. आपल्या परिक्रमे बद्दल खूप खूप शुभेच्छा . आपण खूप सुदर लिहिता . पूर्ण परिक्रमे बद्दल वाचायला खूप आवडेल आम्हालाही छानछान पहायला मिळेल . शनिदेवाची भव्य मूर्ति खूप सुंदर . आपणास परिक्रमेत अनेकाचे सहकार्य घडो . हिच नर्मदे मैया चरणी प्रार्थना . नर्मदेहर .

    ReplyDelete
  3. नमस्कार सतिश भाऊ,
    नेहमी प्रमाणे खूप छान.
    भरपूर शुभेच्छा.
    नर्मदे हर !!!!!

    ReplyDelete
  4. All d best for your Parikrama 🙏🏻🙏🏻

    ReplyDelete
  5. सतीश सर...
    मस्त enjoy करता आहात.
    शुभेच्छा!

    ReplyDelete
  6. नर्मदे हर.श्री.सतिश जाधव व श्री.संजय सावंत.... आपल्याला परिक्रमेसाठी खूप खूप शुभेच्छा. मैय्याने बोलावले आहे. कृपा झालेली आहेच. कृपा वृद्धिंगत होवो व आपली परिक्रमा छान संपन्न होवो. आम्ही पण तुमचेबरोबर मानसिक परिक्रमेत आहोतच. नर्मदे हर.

    ReplyDelete
  7. सौ. व श्री तावसे...

    ReplyDelete
  8. मयेची आपल्यावर कृपा आहे आपली परिक्रम खूप छान परिपूर्ण होवो पाठविलेले फोटो अतिशय सुंदर आपल्या परिक्रमा खूप खूप शुभेच्छा नर्मदे हर हर

    ReplyDelete