Wednesday, December 30, 2020

नर्मदा परिक्रमा.. ओमकारेश्वर दर्शन

नर्मदा परिक्रमा... ओमकारेश्वर दर्शन

२८.१२.२०२०

सकाळी गजानन महाराजांच्या काकड आरतीने जाग आली. सायकलच्या कॅरी बॅगचा पांघरुण म्हणून चांगला उपयोग झाला. नवीन घेतलेल्या स्लीपिंग बॅगमुळे बाहेरील थंडी जाणवत नव्हती. वातावरणातील अल्हाददायक गारव्यामुळे मन तजेलदार झाले होते. अर्धा तास मेडिटेशन केले. सकाळचे प्रातर्विधी आटपले. थंड पाण्याने मस्त आंघोळ केली.

कपडे घालून तयार होई पर्यंत, संजय जागा झाला होता. सकाळीच स्वतःचे कप घेऊन आम्ही भोजनगृहकडे गेलो. अर्धा अर्धा कप चहा घेतला. सकाळची न्याहारी तयार होती. गरमागरम उपमा आणि कांदापोहे  घेतले. नास्ता झाल्यावर मंदिर परिसराचे फोटो काढले.

संजयची तयारी झाली. आम्हाला काल भेटलेले पुण्याचे दोन सायकलिस्ट शिरीष देशपांडे आणि ओंकार ब्रम्हे सायकलने आज नर्मदा परिक्रमा करायला निघाले आहेत.  त्यांना भेटून खूप आनंद झाला. सायकलिस्टला सायकलिस्ट भेटला, म्हणजे घरातला माणूस भेटला असा भाव निर्माण होतो. 

ओंकारच्या मामामुळे (शेवडे) आज दोघेही सायकल परिक्रमा करीत आहेत. त्यांना भरपूर शुभेच्छा देऊन निरोप घेतला.

आम्ही सायकलवरून ओमकारेश्वर मंदीराकडे प्रस्थान केले. नर्मदेवर असलेल्या झुलत्या पुलावरून सायकल घेऊन मंदिराजवळ गेलो. 

पंधरा मिनिटात दर्शन झाले. सध्याच्या परिस्थितीमुळे मंदिराचे गर्भगृह बंद  केले आहे. त्यामुळे दूरवरून दर्शन मिळाले. तेथून आदि शंकराचार्यांच्या  गुंफेत गेलो. येथेच शंकराचार्यांनी, नर्मदेच्या स्तुपिपर नर्मदाष्टक स्तोत्र रचिले.


मंदिर परिसरात संजयने गो प्रो कॅमेऱ्याने भरपूर शूटिंग केले. संजयची एक गोष्ट खूप आवडली... ती म्हणजे नर्मदा परिक्रमा अनुषंगाने भेटणाऱ्या बाबाजी-मैयाजी यांना बोलते करून त्यांची माहिती शूट करणे.

ओमकारेश्वर मंदिराकडून आम्ही ममलेश्वर मंदिरात आलो. भोलेनाथाचे दर्शन झाले.

 दक्षिण तटावर असलेल्या या मंदिराच्या गोमुख घाटावरून संकल्प पूजा करून परिक्रमा सुरू होते. गोमुख घाटावर गेलो. तेथून जुन्या बस स्टँड मार्गे जुन्या पुलावर आलो. येथून नर्मदा मैया, ओमकारेश्वर आणि ममलेश्वर यांचे विहंगम दर्शन झाले. खूप फोटोग्राफी केली. समोर ओमकारेश्वर धरणाची भिंत दिसत होती. 
आम्हाला परिक्रमा प्रमाणपत्र घ्यायचे होते. गजानन महाराज आश्रमाबाहेरील गोस्वामी चहावाल्याकडे चौकशी केली असता त्याने नव्या बस स्टँड जवळील मंगलदासबाबाजींचे नाव सांगितले.

सायंकाळी पाच वाजता बाबाजींच्या आश्रमात गेलो असता बाबाजी आराम करत आहेत असा निरोप मिळाला, म्हणून आश्रमतच थांबलो. या आश्रमात हनुमान आणि गणेशाचे जोड देऊळ आहे. 

साडेपाच वाजता मंगलदास बाबाजी आले. ते परिक्रमा समितीचे मंडल अध्यक्ष आहेत.

बाबाजींनी आम्हाला कोणतेही पैसे न घेता  प्रमाणपत्र दिले. प्रमाणपत्र देण्याचे काम बाबा सेवाभाव म्हणून करतात.

तुम्ही नर्मदा मैयेची परिक्रमा करता आहात परिभ्रमण नाही. त्यामुळे परिक्रमा अंतरात मोजू नका,अंतरंगात मोजा. नर्मदेच्या किनाऱ्यावरील प्रत्येक घाट तपोभूमी आहे. काठावर असलेल्या साधू संत महंत यांच्या आश्रमांना भेटी द्या. प्रेमाने कोणी काही दिले तर अव्हेरू नका. तुम्ही फक्त परिक्रमावासी आहात, त्यामुळे अधिकारी, व्यावसायिक, डॉक्टर, इंजिनियर हे सर्व मुखवटे उतरवून एक सर्वसामान्य माणूस म्हणून परिक्रमा करा. पर्यावरणाचे भान राखा. तुमच्यामुळे कोणाला दुःख किंवा त्रास होईल असे वागू नका. तुमचा क्रोध आणि अहंकार कमी झाला तरच खऱ्या अर्थाने परिक्रमा करत आहात. हे लक्षात ठेवा. मंगलदास महाराजांची ही संत वाणी म्हणजे साक्षात नर्मदा मैयाचा आदेश आहे... याची अनुभूती झाली.

या आश्रमात वकील मनोज माने यांची भेट झाली. यांनी सहकुटुंब तीन वेळा नर्मदा परिक्रमा केली आहे.  ते म्हणाले, 'नर्मदा परिक्रमा करताना जास्तीत जास्त आश्रमांना भेटी द्या... संत महंतांची वाणी श्रवण करा... जीवनाचे तत्वज्ञान उलगडत जाईल. त्यांनी एक मौनीबाबा संतांना लिहून प्रश्न विचारला होता, " What is God"  लिहून उत्तर मिळाले, " God is Love"

माने म्हणाले, जेव्हा मुंबईतील वकिली कामातून उसंत मिळते तेव्हा ओंकारेश्वरला सहकुटुंब कार घेऊन येतो. गेली सोळा वर्ष त्यांचा हा नित्यनियम आहे. प्रचंड सकारात्मक ऊर्जा त्यांच्या ठायी जाणवली. तीच ऊर्जा घेऊन आम्ही सायकल परिक्रमेला सुरुवात करतोय.

सायंकाळी पुन्हा मंगलदास स्वामींच्या आश्रमाला भेट दिली. स्वामीजींनी गोपाळकृष्ण शाळीग्राम रूप दाखविले. स्वामींनी आमच्या सायकल परिक्रमा मार्गात काही सुधारणा सुचविल्या. नर्मदा मैयेच्या जास्तीत जास्त सान्निध्यात राहण्याचा प्रयत्न करा. पुढे पुढे तुम्हाला कोणतीही अडचण आली तरी मैयाजी तुमच्या साथीला असणार आहे.

आमच्या परिक्रमेला स्वामीजींचे आशीर्वाद आणि माने कुटुंबियांच्या सदिच्छा मिळाल्या. मनोज माने कारने  आम्हाला सोडायला गजानन महाराज आश्रमापर्यंत आले होते. मंगलदास स्वामींनी उद्याच्या संकल्प पूजेसाठी पाठक गुरुजींची गाठ घालून दिली.

'तुम्हाला परिक्रमा करण्याची अनुभूती कशी झाली?' या प्रश्नावर वारकरी संप्रदायाच्या मोरे महाराजांनी दिलेली माहिती खूपच प्रभावी होती.


लोककल्याणासठी परिक्रमा करतोय, शेतकरी होतो... कुटुंब निवर्तल्यावर... पंढरीच्या वारीने भ्रमंती सुरू केली. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी... बाकी पायी भारत भ्रमंती... आळंदी वरून पायी ओमकारेश्वरला आलेल्या मोरे महाराजांची ही तिसरी परिक्रमा होती. परिक्रमेत भेटणाऱ्या दिनदुबळ्या, गरीब मूर्तींना (लोकांना) चहा पाजणे... जेवू घालणे ... मदत करणे.. तरुणांना वारीसाठी-परिक्रमेसाठी उद्युक्त करणे .. हेच त्यांनी आयुष्यभर घेतलेले व्रत आहे... पांढरा सदरा, पांढरे धोतर आणि खांद्यावर भगवी पताका घेऊन,  जय जय रामकृष्ण हरी जप करत हसतमुखाने उर्वरित आयुष्य लोकासेवेसाठी व्यतीत करीत आहेत.

सिंघाजी गावचे रामप्रसाद परिक्रमा करायला निघाले आहेत. 

त्याच्या गावात अखंड ज्योती आहे.  त्यांचे म्हणने, 'चलते चलते दुनियासे चले जावो, इसमे जीवन जीनेका असली मजा है'.  त्यांचे वडील ९५ वर्षाचे असताना हसत खेळत देवाकडे निघून गेले.

आमच्या सायकल परिक्रमेच्या पूर्व संध्येला भेटलेल्या परिक्रमावासी, नर्मदेचे भक्तगण, साधुसंत यांनी आमच्या परिक्रमेच्या संकल्पना बदलून टाकल्या होत्या.

नर्मदा आमच्या कडून काय काय कार्य करून घेणार आहे... हे नर्मदा मैयाच जाणे...

नर्मदे हर !!!

सतीश जाधव
मुक्त पाखरे.....

9 comments:

  1. नमस्कार सर,
    तुमचे नर्मदा परिक्रमेचे जीवंत लेखन वाचावयास मिळत आहे आणि त्यामुळे आमचीही परिक्रमा होते आहे असे मला वाटते आहे. तुम्हाला संत, महंत, बाबा, महाराज, स्वामीजी, भक्तगन इत्यादींच्या होणा-या गाठी भेटी आम्हीही पावत आहोत आणि मैयाचे दर्शन सुध्दा होत आहे असे वाटते.
    असेच लिहिते रहा आणि मैयाचे दर्शन घडवत रहा ही विनंती.
    परिक्रमेच्या पुढील वाटचालीसाठी मनोमन शुभेच्छा.
    .... लक्ष्मण

    ReplyDelete
  2. तुम्ही आता मय्ये च्या प्रेमात पडले आहात....
    नर्मदे हर......

    ReplyDelete
  3. सतिश महाराज की जय
    आम्ही नशिबवान माणसाच्या जवळ आहोत होत आमचे भाग्य🌹🙏

    ReplyDelete
  4. अतिशय छान !!! नर्मदा नदीचे पावित्र्य आणि तेथील नयनरम्य वातावरण फारच प्रसन्न आहे.
    तसेच विशेष म्हणजे नर्मदेच्या पाण्यात तयार झालेले शालिग्राम यापासून भगवान महादेव यांचे संपूर्ण भारतात शिवलिंग मंदिरात स्थापना करण्यात येतात ते इतर ठिकाणी भेटत नाही.
    नर्मदे हर!!!
    ----स्वप्निल नागरे

    ReplyDelete
  5. नर्मदे हर।। पहिल्याच दिवसाचे अनुभव ऐकताना मन भरून आले. खूपच छान वाटले. प्रकाश सरांमुळे हा लाभ झाला. पुढील परिक्रमेसाठी शुभेच्छा.
    सौ.यशश्री तावसे.

    ReplyDelete
  6. मस्त वाटत वाचून ओंकारेश्वर ला आहोत असे वाटले
    प्रत्यक्ष समोर दिसलें

    ReplyDelete
  7. सतीश बाबाजी🙏
    आपण आणि आपल्या सहकारी मित्रांना सायकलवरील नर्मदा परिक्रमेसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!
    आत्तापर्यंतच्या प्रवासाचे छान वर्णन आणि फोटो शेअर केल्याबद्दल धन्यवाद! पुढील परिक्रमावर्णन आणि फोटोसाठी उत्सुकता वाढली आहे.यातून आम्हाला देखील परिक्रमेसाठी प्रेरणा मिळते आहे.
    प्रकाश सर यशोधन ट्रॅवल्स यांचेमुळे तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकलो.
    नर्मदे हर!
    श्रीकांत पठाडे पुणे

    ReplyDelete
  8. सतीश सर
    आपल्यातील हुबेहूब वर्णनाच्या लिखाणामुळे मी पण आपल्यासोबत परिक्रमा करत असल्याचा भास होतो,जीवन जगण्याच्या विविध कला व शारीरिक क्षमता याचा अनोखा संगम ही तुमच्याकडून प्रत्येकाने आवर्जून शिकावे, आईनर्मदे हर।।।।।।।।

    ReplyDelete