Sunday, December 31, 2023

एका अपघाताची गंमत

एका अपघाताची गंमत

तेजुमध्ये मौशूमी दिदी,जयश्री ताई,  शिवांगी आणि प्रियाल यांना टाटा करून आज सकाळी सव्वा सहा वाजता राईड सुरू झाली... मौशूमी दिदीनेच करूणा ट्रस्टच्या गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती... 

आज पासून एक्सपिडिशन मधला महत्त्वाचा टप्पा सुरू झाला होता... किबीतू आणि हेल्मेट टॉप हे बकेट लिस्ट मधील हॉट स्पॉट होते... दिड महिन्यात त्रिपुरा, मिझोराम, मेघालय आणि आसाम पादाक्रांत करून शेवटच्या पंधरा दिवसात अरुणाचल मध्ये पेडलींग करायचे होते.

मागच्या दिड महिन्यात प्रचंड मित्र परिवार मिळाला होता तसेच शाळेतले बालगोपाल दोस्त झाले होते... या सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा घेऊन  या वर्षाच्या शेवटच्या दिवसाची रम्य सकाळी राईड सुरू केली होती.

सकाळचे थंड वारे हिरव्या विड चीटर मधून सुद्धा अंगाला बोचत होते... थोडा चाढाचाच रस्ता असल्यामुळे धीम्या गतीने सायकल रायडिंग सुरू होते... दोन्ही बाजूची वनराई आणि धुकटलेले वातावरण मनाला उभारी आणत होते...  पानांची सळसळ आणि पक्षांचा किलकीलाट... या निसर्ग संगीतात धुंद होऊन अलगदपणे पेडलींग सुरू होते...

चकचकीत निवांत रस्ता लोहित नदीच्या किनाऱ्याने पुढे पुढे सरकत होता...


डीमवे गावा नंतर खडी चढाई सुरू होणार होती... तिथेच न्याहरी करून  चढाईला सुरुवात करणार होतो... आज अमलियांग पर्यंत ८१ किमीची सफर पूर्ण करायची होती... मनात एक अनामिक ओढ होती... किबीतु पर्यंत पोहोचून भारतीय सैनिकांना सदिच्छा भेट देण्याची...

डीमवे गाव चार किमी राहिले होते... एव्हढ्यात मागे जोरदार बॉम्ब स्फोटासारखा ढुंम आवाज झाला... दोन फूट पुढे फेकला गेलो... माझ्या अंगावर सखी... दोन मिनिटे काय झाले मलाच कळले नाही... स्वतःला सावरले... पाय सायकलच्या सीट मध्ये अडकला होता... आणि मागचे चाक फ्रेम मधून निखळून तीन चार ठिकाणी वेडेवाकडे झाले होते...


ट्युब फुटून जोरदार धमाका झाला होता... मोटारसायकलने मागून येऊन जोरदार धडक मारली होती...
 

मोटार सायकल रायडर धावत आला... माझा अडकलेला पाय बाहेर काढून हिरवळीवर बसविले... डोक्यात हेल्मेट आणि हातात ग्लोव्हज असल्यामुळे हेड इंज्युरी आणि हात सोलपटण्यापासून बचावलो होतो... कुल्याला मुका मार लागला होता... 

मोटार सायकलस्वार रडत पाया  पडू लागला... त्याला म्हणालो अरे रडू नकोस... आपण दोघेही बचावलो आहेत... मला पोलीस स्टेशन आणि हॉस्पिटलमध्ये न्यायची जबाबदारी आता तुझी आहे... मागे असलेल्या वळणावरून तो पुढे आल्यावर सूर्याची किरणे त्याच्या हेल्मेटच्या विंड शिल्डवर पडली आणि त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली... त्यामुळे वेगात तो सायकलवर धडकला होता...

विवेकानंद केंद्र शाळेचे मुख्याध्यापक चंपक काकोती सरांना फोन लावला... तातडीने शाळेचा सदस्य प्रशांता पोलिसांची गाडी घेऊन आला. पोलिस स्टेशन मधून आम्हा दोघांनाही तडक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोलीस घेऊन आले... डॉक्टरांनी संपूर्ण तपासणी केली अंगावर कुठेही काळेनिळे डाग नव्हते... दुखऱ्या कुल्यासाठी मलम आणि गोळ्या दिल्या... आज दिवसभारासाठी आराम करण्याचा सल्ला दिला...

पुन्हा पोलीस स्टेशन मध्ये आलो... मोटार सायकलस्वार  दिलबहाद्दुरचे रडून डोळे लाल झाले होते... मजुरी करणारा दिलबहाद्दुर ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी बायकोमुलांना खाऊ-मिठाई घेऊन घरी  निघाला होता... लोहित पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सांगितले "मला कंप्लेंट किंवा FIR करायचा नाही... याला सोडून द्या"... दिलबहाद्दुर पैसे देत होता... त्याला सांगितले "तू माझ्या मुलासारखा आहेस... तुझी बायको मुले घरी वाट पाहत असतील... लवकर घरी जा..."

पोलिस स्टेशनच्या बाहेर  आल्यावर बायको आणि मुलीला अपघात झाल्याचे कळविले... तसेच सर्व गृपवर व्हॉट्स ॲपवर कळविले... 

जवळच सायकलचे दुकान होते... त्याला सर्व घटना सांगून काय मदत करता येईल ते विचारले... याचे रीपेअरींग तीनसुखिया येथे होईल याची माहिती मिळाली... गुगल वर तीनसुखियाच्या किला सायकल शॉपीचा नंबर मिळाला... फोन करून आणि सायकलचा फोटो पाठवून परिस्थिती सांगितली... मालक ऋषभने आश्वासन दिले आणि  सांगितले.."सर उद्या सकाळी सायकल घेऊन या... तुम्हाला टकाटक करून देतो...

आजचा अपघात हा अनपेक्षितपणें घडलेली घटना होती...  हेल्मेट  ग्लोव्हज  गॉगल  हे सेफ्टी गियर्स आणि अल्युम्यूनियम अलॉयच्या MTB  सायकलचा दणकटपणाच या अपघातातून काहीही इजा न होता मला वाचवू शकला... खरं तर सखीने माझ्यावर आलेला कठीण प्रसंग स्वतःवर घेतला होता... आता माझे कर्तव्य आहे तिला टकाटक करण्याचे होते...

तसेच तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आशीर्वाद... या सफरीत सर्वांनी दिलेले सहकार्यच... परमेश्वराच्या चरणी रुजू झाले होते...

म्हणूनच म्हणतात ना... "देव तारी त्याला कोण मारी"

हा अपघात म्हणजे...  एखाद्या सस्पेन्स चित्रपटात घडणाऱ्या घटनां सारखा होता... पुढे काय होणार याची काडीची ही कल्पना नाही... पण डोकं शांत ठेऊन निर्णय घेणे... हीच आजच्या घटनेची गंमत होती...

मंगल हो... !!!

Wednesday, December 13, 2023

डबल डेकर हँगिंग ब्रीज आणि रेनबो धबधबा

डबल डेकर हँगिंग ब्रीज आणि रेनबो धबधबा 

आजची सोहरा (चेरापुंजी) ते नॉनग्रियट ही १८ किमीची डाऊन हील आणि नंतर अप हील राईड अतिशय टफ होती... 


डाऊन हील राईड केल्यावर खोल दरीत उतरत साडेतीन  हजार पायऱ्या  उतरून लिव्हिंग रूट डबल डेकर ब्रीजकडे ट्रेक केला... झाडांच्या पारंब्यापासून तयार झालेला ब्रीज निसर्गाचा चमत्कारच होता...

त्यानंतर आणखी अडीच किमी खाली चढउताराच्या पायऱ्या पार करून गेल्यावर... रेनबो वॉटर फॉल पाहिला... नव्हे अनुभवला...

झाडांच्या पारंब्यापासून तयार झालेला पूल... आणि धबधब्याच्या पाण्यात दिसणारे इंद्रधनुष्य हे अनुभवणे एक पर्वणीच होती...

या दोन्ही निसर्गसुंदर गोष्टीं बरोबरच..  दरीत उतरण्याचे ट्रेकिंग करताना...पक्षांचा किलबिलाट... किड्यांचा किर् किर् आवाज... मधमाश्यांचा  गुंजारव...

                    मधमाश्यांच घरट 

पाण्याचा खळखळाट... झाडांचे वेगवेगळे प्रकार ... त्यांची सळसळ...   ऐकून... पाहून... मन एका निर्वात पोकळीत गेले... शांत झाले...

वाटेत भेटणारे कामकरी... टुरिस्टनां चालताना कोठेही अडचण होऊ नये म्हणून... खाली उतरणाऱ्या  रस्त्याची डागडुजी करणारे... आणि वाटेत प्लॅस्टिक  रॅपर्स, बाटल्या उचलणारे गावकरी... रस्ता स्वच्छतेची पुरेपूर काळजी घेत होते...

दोन्ही स्पॉट पाहून परतीचा अपहील ट्रेक पूर्ण करून दुपारी अडीच वाजता टॉपला पोहोचलो...  आता खरी कसोटी होती... अठरा किमीची अपहील सायकल राईड करणे... 

सायंकाळी पाच पूर्वी हॉटेल वर पोहोचायचा प्रयत्न होता... आठ किमीचा अवघड घाट चढायलाच अडीच तास लागले... त्या वेळी समोरच्या डोंगरा आड अस्ताला जाणाऱ्या सूर्य देवाच्या  दर्शनाने मन हरखून गेले...

पुढचा सुद्धा सोहारा (चेरापुंजी) पर्यंतचा चढाचाच होता... वाटेतच अंधार पडला आणि थंडी वाढली... एका छोट्या धाब्यावर  थांबून चण्याची भाजी, दोन उकडलेली अंडी खाल्ली... 

लाईट चालू करून शेवटची सात किमी राईड सुरू केली... या संपूर्ण ट्रेल मध्ये शरीराचा आणि मनाचा कस लागला... 

सकाळी पावणे सहा वाजता सुरू केलेली राईड रात्री सहा वाजता पूर्ण झाली होती... हॉटेलवर आल्यावर रूम हिटरने पाय शेकून काढले... 

या खोल दरीच्या सफरीत नेट उपलब्ध नसल्यामुळे कोणालाही फोन करता आला नव्हता... त्यामुळे रात्री सर्वांशी निवांत गप्पा मारल्या... 

आजचे मुख्य आकर्षण  होते...  डबल डेकर रूट हँगिंग ब्रीज आणि रेनबो धबधबा पाहणे...

 निसर्गाच्या अंतरंगात शिरायचे असेल तर... खडतर परिश्रम करून निसर्गा जवळ जाणे आवश्यक ठरते...

आपली मंदिरे सुद्धा डोंगर दऱ्यात वसली आहेत त्याचं कारण पण हेच असावे का...

Thursday, November 30, 2023

टप‌ टप‌ पडती अंगावरती प्राजक्ताची फुले....


टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले...

पारीजातक किंवा प्राजक्त... अतिशय नाजूक आणि आवडीचे फुल... मस्त सुगंध दरवळतोय वेचलेल्या हातामध्ये...

प्राजक्ताचे फुल इतके नाजुक की हळुवार स्पर्शानेही कोमेजून जाणारे... 

उन्हाचा ताप सहन करायला नको म्हणुनच  रात्री उमलणारे.... 

आज पहाटे फुलांनी बहरलेला प्राजक्त पाहिला...

हिरवळीवर पडलेला सडा...

जसा काही आकाशात  प्रकट झालेल्या असंख्य तारकांच...

पांढर्‍याशुभ्र पाकळ्या आणि केशरी रंगाचा देठ...  निसर्गाचा हा नाजुक अविष्कार...

एखाद्या सुंदर आणि मादक ललने सारखा...

प्राजक्त पाहिला की अलगद आठवतात त्या व. पु. काळे यांच्या ओळी...

पारीजातकाचं  क्षणभंगुर आयुष्य लाभलं तरी चालेल...

पण लयलुट करायाची ती सुगंधाचीच...

मंगेश पाडगावकरांची कविता तर हृदयातील अनमोल ठेवा आहे...

टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले 

भिर् भिर् भिर् भिर् त्या तालावर गाणे अमुचे जुळे !

कुरणावरती, झाडांखाली ऊन-सावली विणते जाळी...

येतो वारा पाहा भरारा, गवत खुशीने डुले !

दुर दुर हे सूर वाहती उन्हात पिवळया पाहा नाहती...

हसते धरती, फांदीवरती हा झोपाळा झुले !

गाणे अमुचे झुळ-झुळ वारा... गाणे अमुचे लुक-लुक तारा...

पाऊस, वारा, मोरिपसारा या गाण्यातुन फुले !

फुलांसारखे सर्व फुलारे... सुरात मिसळुनि सुर चलारे... 

गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे !

तसेच सुवर्णतुला संगीत नाटकातील विद्याधर गोखले यांचे  पद आठवले...

अंगणी पारिजात फुलला ।

बहर तयाला काय माझिया प्रीतीचा आला ॥

धुंद मधुर हा गंध पसरला

गमले मजला मुकुंद हसला

सहवासातुर मदिय मनाचा कणकण मोहरला ॥

सुनिताबाईंच्या "आहे मनोहर तरीही"  ग्रंथामधला प्रसंग आठवला...

पहाटे  सुनिताबाई प्राजक्ताची  फुले वेचत असताना पु.ल. नीं हळूच झाड हलविले आणि सुनिताबाईंवर प्राजक्ताचा वर्षाव झाला... 

प्रेमाला वय नसतं... हेच प्राजक्त सांगतो...

त्यामुळे बालपणीचा काळ आठवला आणि जुन्या मधुर आठवणी चाळवल्या...

माझा बालमित्र... सकाळी प्राजक्त वेचुन घरी आणताना हाताच्या उष्णतेने कोमेजतात... म्हणुन ही फुले आणण्यासाठी ओला रुमाल अंगणात घेऊन जायचा...आणि घरात आणल्यावर घंगाळ्यात पाणी घालुन त्यावर  प्राजक्त तरंगत ठेवायचा... त्यामुळे संपूर्ण दिवसभर प्राजक्ताचा मंद दरवळ घरात असायचा...

त्यामुळे नेहमी वाटायचे जिण असावं तर प्राजक्ता सारखं...

या संदर्भात आनंद चित्रपटातील डायलॉग आठवला...

बाबू मोषाय... जिंदगी बडी होनी चाहिए... लंबी नाही...

किती जगलास यापेक्षा कसा जगालास हेच महत्त्वाचे आहे...

प्राजक्तांच्या फूलाबाबत फार सुंदर कथा आहे...

 रुपनगरच्या राजकन्येचं सुर्यावर निरतिशय प्रेम होत... लग्नाच्या दिवशी सुर्यदेव मांडवात येत नाहीत...म्हणुन राजकन्या रुसून... रागावुन... धगधगत्या होमकुंडात स्वतःला झोकुन देते... 

तेथे प्रकट होते प्राजक्ताचे रोपटे...

सुर्यदेवावर राग म्हणुन हे प्राजक्ताचे फुल दिवसा फुलत नाही...

दिवस उजाडला आणि सूर्य देव आसमंतात वर येऊ लागला की प्राजक्त  कोमेजून जाते... 

परंतु पहाटेचा मंद सुगंधीत दरवळ तिच्या निस्सीम प्रेमाची साक्ष देतं राहते...

लहानपणी आजीच्या गावाला गेल्यावर  प्राजक्ताच्या फुलांच्या माळा हातात घालून लपंडाव खेळायचो... 

प्राजक्ताचे केशरी देठ चुरडले की सुगंधित केशरी रंगाने हात गंधित व्हायचे...

फुलांचा पाऊस पहायचा असेल तर पहाटे प्राजक्ताचं झाड हळुवार हलवायचं आणि त्या सड्यात न्हाऊन जायचं...

श्री कृष्ण आणि सत्यभामेची कथा सुद्धा प्रसिद्ध आहे...

श्री कृष्ण हे झाड स्वर्गातून पट्टराणी रुक्मिणीसाठी आणत असताना... वाटेत सत्यभामेन हट्ट धरला... प्राजक्त माझ्या अंगणातच लावायचा... तिच्या हट्टाखातर श्री कृष्णाने तिच्या अंगणात प्राजक्त लावला... 

रुक्मिणी रुसली... श्री कृष्ण हसला आणि म्हणाला... उद्या सकाळी माझ्याबरोबर अंगणात ये... प्राजक्ताचा सर्व सडा रुक्मिणीच्या अंगणात पडलेला होता... 

शाळेत मंदारमाला वृत्त शिकविताना गुरुजींनी वरील कथा सांगितली होती... या वृत्तात बावीस अक्षरे असतात.. तसेच त्याचे उदाहरण अजूनही लक्षात आहे...

मंदारमाला रमालाच लाभे उभा वृक्ष तो सत्यभामांगणी

पहाटेच्या प्राजक्ताने आठणींचा खजिना उघडला...  सर्वांना भरभरून वाटण्यासाठीच...

मंगल हो... !!!



Tuesday, November 28, 2023

१७.११.२३... आगरतळा सायकल सफर... दुसरा दिवस

१७.११.२३...  आगरतळा सायकल सफर...

आगरतळा येथे रात्रभर पाऊस पडत होता... रात्री गारठा वाढला होता... पूर्वेकडच्या प्रांतात पहाटेच उजाडते... ब्रम्हमुहूर्तावर श्री  जगन्नाथाची काकड आरती सुरु झाली...  प्रातर्विधी आटपून ध्यानधारणा झाली... परमेश्वराचे दर्शन घेऊन जाकीट कानटोपी आणि रेनकोट घालून चौकात चहा प्यायला गेलो... पाऊस सुरूच होता...

चहाची नवीन रेसिपी पहायला मिळाली... चहाची पावडर पाण्यात उकळवून घेतली होती. एका ग्लासात दोन चमचे दुधाची पावडर आणि एक चमचा साखर घेऊन त्यात उकळते चहाचे पाणी ओतले... आणि चमच्याने मस्त घुसळले... झाली फक्कड चहा तयार... काही जण काळी चहा पीत होते...

सात वाजता देबाशिश मुजुमदार भेटायला येणार होता...  देबाशिशचा फोन आला... सतत पाऊस सतत पडत असल्याने त्याचे भेटणे पुढे गेले होते.  नंदूची सायकल असेंबल करायची होती. प्रथम प्लॅस्टिक रॅपर फाडून काढले... टॅग कापून सायकलचे  सर्व भाग सुटे केले. छोटा बटू गोविंद वल्लभदास सायकल जोडायला मदत करत होता...

त्यानंतर हक्काने माझ्या मोबाईलवर सुपर सॉनिक कार्टून पाहत होता...

पाऊस पडत असल्यामुळे बाहेर जाणे शक्य नव्हते. त्यामुळे मंदिरातच न्याहरी करायचे ठरविले... न्याहारीला गरमागरम डाळखिचडी मिळाली... पातळ खिचडी बोटांनी खाणे आणि ती अंगावर न सांडणे याला वेगळे कसब लागते... बाजूला बसलेल्या बाबूजीचे खिचडी खाणे पाहिले आणि यातली मेख कळली. तो हाताच्या पंजाने पातळ खिचडी ओरपत होता... यासाठी सराव करावा लागणार होता... म्हणून तूर्तास कागदी पानच तोंडाला लावले आणि खिचडी पिऊन टाकली.. तूपातील खिचडीमूळे मन तृप्त झाले...

नंदुची सायकल जोडून तयार झाली. आता दोन्ही सायकल अप टू डेट झाल्या होत्या. ... लोकल साईट पहायच्या होत्या पण पाऊस काही थांबायचे नाव घेत नव्हता. आज संपूर्ण त्रिपुरा पावसात चिंब झाले होते. मंदिरात आलेल्या देवांश बरोबर ओळख झाली. 

त्रिपुरा मधील महत्त्वाच्या स्थळांची माहिती मिळाली... "जवळच असलेला उज्जयंता महाल आणि रविंद्र भवन आठवणीने पाहा" देवांश म्हणाला...

दुपारी महाप्रसादाचा लाभ घेतला... येथे सर्वजण भात खातात... जेवण वाढण्याची नवीन पद्धत कळली. भातावर प्रथम पालक वाटाण्याची सुकी भाजी आली. ती भाजी आणि भाताचे चार घास खाल्ले... मग वरण वाढले गेले... पण भातावर नाही तर पत्रावळीच्या एका बाजूला... थोडासा डाळ भात खाल्ल्यावर केळीची भजी आली.. मग आली मिक्स भाजी त्यात पनीर पण होते... मग आली फ्लॉवरची भाजी... त्यानंतर आंबटगोड पायसम आणि शेवटी खीर... सर्व जेवणात भात कॉमन होता... हवा तेवढा घ्या... प्रत्येक पदार्थ गरमागरम खाण्यासाठीच ही पद्धती असावी... जेवणाची ही पद्धती विलक्षण भासली... आणि भावली सुद्धा...

अखंड पडत असलेल्या पावसामुळे आज आराम करण्याशिवाय गत्यंतर नव्हते...जोरदार थंड वारेसुद्धा वाहत होते... कानटोपी आणि जाकीट घालूनच मच्छरदाणीत  बसलो होतो...

सायंकाळी पुन्हा भोजन प्रसादीचा लाभ घेतला... जेवणासोबत गो मातेचे दूध मिळाले... सात्विक जेवण झाल्यावर सर्वांना फोन करण्याचा आनंद घेतला...

 परममित्र नवनीतला  फोन केला तेव्हा तो भरभरून सांगत होता...  रशिया वरून एक सायकलिस्ट सायकलिंग करत... मुंबईतील वरळी किल्ला पाहायला आला होता.  त्याला घरी घेऊन गेलो आणि त्याचा पाहुणचार केला...रशियन  ॲबीशी  आता जिगरी दोस्ती झाली आहे... या घटनेचा  झालेला आनंद नवनीतच्या बोलण्यातून ओसंडून वाहत होता...  

मित्र गजानन तर फोनवर तासातासाची खबर घेऊन... हवामान अंदाज आणि आवश्यक माहिती देत होता... मुंबईची बॅक अप टीम  त्रिपुराच्या महत्त्वाच्या बातम्या पुरवत होत्या...

आज सायकलिंग करायला मिळाले नाही म्हणून नंदू थोडा नाराज झाला होता...

आले देवाजीच्या मना... तेथे कोणाचे चालेना...

तुका म्हणे उगेचि राहा... होईल ते सहज पाहा...

शांत रहा... वृत्तीने स्थिर रहा... भगवंताच्या इच्छेने जे जे घडते ते साक्षी रूपाने पाहा.. निष्कारण अस्वस्थ होऊ नका... 

हेच त्या जगन्नाथाला सांगायचे होते काय...

*मंगल हो...*

१६.११.२०२३आगरतळा सायकल सफर...

१६.११.२०२३.   आगरतळा सायकल सफर... पहिला दिवस

पहाटे साडेतीन वाजता घरातून निघालो. लगेज सामान आणि पॅक केलेल्या दोन्ही सायकली ओलाच्या ईर्टीगा मध्ये सहज बसल्या...

छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर तासाभरात पोहोचलो...
 

एअर इंडियाच्या विमानात गोणी पॅक केलेले सायकल लगेज कोणतेही अतिरिक्त भाडे न घेता स्वीकारले गेले. नाजूक सामान असल्याचा स्टिकर लावल्यामुळे  सायकल लगेज अतिशय काळजीपूर्वक हाताळले गेले...
 

विशेष म्हणजे कलकत्ता आणि आगरतळा दोन्ही ठिकाणी विमान नियोजित वेळेपूर्वी पंधरा मिनिटे लवकर पोहोचले... दोन्ही विमानात नाश्ता सुद्धा मिळाला... यातील हवाई सुंदरी चक्क मराठीत बोलत होत्या... एअर इंडियाने दिवाळीच्या मोठ्या दिवसात सुखद धक्के दिले होते...

 मुंबईतून निघून आगरतळाला अर्ध्या दिवसात  पोहोचलो होतो... हाच प्रवास रेल्वे अथवा रस्त्याने केला असता तर  चार दिवस लागले असते... आजचा आगरतळा पर्यंतचा विमान प्रवास अतिशय सुखकारक झाला.. 

मित्र गजाननमुळे आगरतळा येथील जगन्नाथ मंदिराच्या डॉर्मेटरीमध्ये राहायची व्यवस्था झाली... ती सुद्धा अतिशय माफक दरात... शेजारीच तलाव असल्यामुळे मच्छरांपासून बचावासाठी प्रत्येक पलंगाला मच्छरदाणी होती... नंदूच्या मदतीने सायकल असेंबल केली...  सायकल टकाटक करायला दोन तास लागले... दुपार पासूनच रिमझिम पाऊस सुरू झाला होता... नंदू विश्रांतीसाठी पलंगावर आडवा झाला... 

थंड पाण्याने मस्त स्नान करून जगन्नाथाचे दर्शन घेतले... 

मंदिर परिसरात बरीच भाविक मंडळी विशेषतः महिला होत्या... सभागृहात श्री कृष्णाचे भजन कीर्तन सुरू होते... प्रवचनाचे एक आवर्तन झाले की सर्व महिला हू... लू... लू... लू... लू... असा आवाज एका सुरात काढत... जसे की श्री कृष्णाच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या गोपिकाच...

मंदिराबाहेरच कुल्हडवाली चहा मिळाली... 

गजाननचा मित्र देबाशिस मुजुमदार उद्या सकाळी भेटायला येणार आहे... उद्या आगरतळा शहर सायकलने फिरायचे आहे... महाराजा बीर बीक्रम यांचा महाल, म्युझियम, रवींद्रनाथ टागोर सभागृह, विधान भवन,  त्रिपुरा सुंदरी मातेचे देऊळ,  बंगला देश सीमा पहायची आहे...

तसेच रिमझिम पावसाचा आस्वाद घ्यायचा आहे..

उद्याची ही सराव राईड असेल... वातावरणाशी एकरूप होण्यासाठी...

मंगल हो... !!!

Monday, November 27, 2023

डोंबुर तलाव...

डोंबुर तलाव...

त्रिपुरा मधील सुप्रसिद्ध डोंबुर तलाव साऊथ कारबुक गावावरून २५ किमी अंतरावर आहे.  त्या ठिकाणी उत्तर बाजूने सायकलिंग करून जाणार होतो. परंतु सायकल ब्रेक डाऊन झाल्यामुळे रणजित मामाच्या ऑटोने जायचे नक्की झाले. रबरच्या शेतावरून आल्यावर फ्रेश होऊन ऑटोने जतनबारीकडे प्रस्थान केले. जतनबारी वरून मुख्य रस्ता सोडून नारीकेल कुंजच्या  घाट रस्त्याने सफर सुरू झाली... 

रस्त्याची कामे सुरू असल्यामुळे ऑफ रोडींग प्रवास होता. खडबड रस्त्यावरून ऑटोतून प्रवास करणे म्हणजे शरीराचा तंबोरा वाजविणे होते... परंतु घाटाच्या दरीतून वाहणारा पाण्याचा पाट... आणि चारही बाजूची हिरवीकंच वनराई... सफर सुसह्य करत होती... 

काही ठिकाणी चढावर रिक्षा थांबत होती... पण रणजित पट्टीचा ड्रायव्हर... आम्हाला गाडीच्या खाली न उतरवता... अशी काही रिक्षा एक्सलरेट करायचा की रिक्षा चटकन चढ चढत असे...  डोंबुर वॉटर फॉल ओलांडून तीर्थमुखला पोहोचलो.

येथे गोमती नदीने असा काही गोलाकार वळसा घेतला आहे की ते  वळण डोळ्याचे पारणे फेडतो...

येथे कालीमातेचे मंदिर आहे. मकर संक्रांतीला येथे मोठी यात्रा असते... त्यासाठीच मोठ्या प्रमाणात रस्ता रुंदी करणाचे काम सुरू होते. तेथून पाच किमी वरील मंदिर घाट गावात पोहोचलो...

येथून डोंबूर तलावातील नारिकेल कुंज आयलंडवर जाण्यासाठी बोट केली... आमच्या बरोबर पंजाबचे पाच जण होते... त्यामुळे बोटीचे भाडे सात जणात समान वाटल्यामुळे प्रत्येकी चारशे रुपयांमध्ये आमची डोंबुर तलावाची राईड सुरू झाली... 

झाडाझुडुपातील तलावाच्या ओहळातून नाव पुढे सरकत होती... जणूकाही नाव पाण्याबरोबर लपंडाव करत होती... वीस मिनिटांनी नाव विस्तीर्ण तलावात आली... आणि डोळ्याचे पारणे फिटले...

उंच डोंगरामध्ये विस्तीर्ण पसरलेला तलाव आणि आजूबाजूच्या किनाऱ्यावरील झुडपात लपलेली झावळ्यावाली आदिवासी घरे पाहून...

बालकवींच्या "त्या तिथे पलिकडे" कवितेच्या ओळी मनपटलावर तरळून गेल्या... आकाशाच्या क्षितिजावर  लांबवर पसरलेला  हिरवागार किनारा तलावाच्या पाण्यात प्रतिबिंबीत होत होता... बोटीमुळे उठणाऱ्या पाण्याच्या लहरींमुळे  त्या प्रतिमा लयबध्द डोलत होत्या...

एक टक निसर्गाच्या या रंगांचे अवलोकन करत होतो... त्यामुळे पाण्यावरून बोटीशिवाय मीच तरंगत पुढे सरकत असल्याचा भास होत होता... नभाच्या निळाईत बोटीच्या एका टोकावर काढलेला फोटो... "किती घेशील दोन्ही करांनी... देणाऱ्याचे हात हजार... याची जाणीव करून देत होते...

हा आनंदाचा बहर... माझ्या दुबळ्या झोळीतून ओसंडून वाहत होता...

तर नंदूचा आनंद त्याच्या स्मित हास्यातून परावर्तित होत होता...त्या आनंदाला दोन्ही हातांनी गच्च पकडण्याचे नंदुचे प्रयत्न थिटे पडत होते...

पाच पंजाबी पोरांचे बोटीत वेगवेगळ्या अँगलने फोटो काढणे सुरू होते... 

नारिकेल रिसॉर्टच्या किनाऱ्यावर उतरलो... हा रिसॉर्ट तलावाच्या मधोमध असलेल्या आयलंडवर बांधण्यात आला आहे... थ्री स्टार कॅटेगरीच्या या रिसॉर्ट मधील सर्व कॉटेजेस फुल होते... प्रशस्त परिसर आणि शिस्तबद्ध पद्धतीने केलेली तलाव फेसिंग असलेल्या लाकडी घरांची रचना मनाला शांततेचा फिल देत होती...

या आयलंडच्या पलिकडच्या किनाऱ्यावर तुरळक वस्ती होती... तेथे खाण्याच्या टपऱ्या लावल्या होत्या... तेथील उकडलेले पिवळे जर्द टपोरे वटाणे कांदा चटणी मिक्स करून खाताना... रसना चमचमीत झाली होती... 

आयलंडचा संपूर्ण नजारा पाहून रिसॉर्टच्या रेस्टॉरंट मध्ये दाखल झालो...  ते काहीतरी लोकल खाण्याच्या इराद्याने...  भाताबरोबर स्थानिक भाजी गोडवाखची ऑर्डर दिली...

राईची पाने वाफवून त्यात पपई, बीन आणि हर्ब घालून  घट्ट बनविलेली  स्पायसी गोडवाख भाजी भाताबरोबर खाताना... एक वेगळीच लज्जत येत होती... 

पंजाबी मुलांनी स्पीड बोटीचा आनंद घेतला... बराच वेळ झाल्यामुळे बोटवाला आम्हाला शोधायला आला होता... रिक्षावाल्या रणजितचे पण फोन येऊन गेले... बोटीने पुन्हा मंदिर घाट येथे आलो.जवळच एक ग्रामीण महिला हातमागावर भरजरी शाल तयार करत होती... तिच्या कामात अप्रतिम सफाईदारपणा होता... 

रणजितने मग डोंबुर तलावातून गोमती नदीत येणाऱ्या पाण्यावर बांधलेले धरण आणि वीज निर्मिती करून नदीत कोसळणारा धबधबा दाखविला...


तेथून डोंबुर तलावाच्या बंधाऱ्यामुळे विस्थापित झालेल्या रीफ्युजी लोकांचे गाव कलजारी दाखविले... विस्थपितांची घरे सरकारी खर्चाने बांधली जात होती... तसेच आज मोफत रेशन वाटपाचा कार्यक्रम त्या गावात सुरू होता...  टेकडीच्या दुर्गम भागात वसलेल्या ह्या आदिवासी गावासाठी पक्का रस्ता सुद्धा तयार होत होता.

त्रिपुरा मधील महत्त्वाचे  प्रेक्षणीय स्थळ  डोंबुर तलाव  आमच्या सायकल वारीचा एक भाग होता... तो उत्तर बाजूने पूर्ण करताना आम्हाला ११० किमी राईड करावी लागणार होती... तोच रिक्षाने दक्षिण मार्गाच्या शॉर्टकटने पूर्ण केला... त्यामुळे दोन दिवसांच्या सायकल वारीची भरपाई झाली होती... 

साडेचार वाजता कारबुक गावात रिक्षातून उतरताना  रिक्षापेक्षा सायकल बरी असेच भाव मनात होते... 

मंगल हो... 

Sunday, November 12, 2023

बडे दिनोमे खुशी का दिन आया...६६ किमी राईड आणि ११३ वे रक्तदान

बडे दिनोमे खुशी का दिन आया...

६६ किमी राईड आणि ११३ वे रक्तदान...

आजचा दिवस खरोखरच खूप खास आहे... आज दिपावली... उटणे लावून अभ्यंग स्नान... लक्ष्मी पूजन... आणि त्याच बरोबर माझा ६६ वा वाढदिवस... आणि लग्नाचा ४५ वा वाढदिवस... यालाच म्हणतात बडे दिनोंमे खुशी का दिन आया...

आजच्या मोठ्या दिवशी काही तरी भव्य दिव्य करायचे ठरविले होते... 

सकाळी चार वाजता उठल्यावर... बायकोने चंदनाचे उटणे लावले... अभ्यंगस्नान झाले... याच दिवशी श्री कृष्णाने नरकासुराचा वध केला होता... त्याच्या वधाचे  प्रतीक म्हणून करीटं फोडलं...

पूजाअर्चना झाल्यावर बायकोला लग्नाच्या ४५ व्या वाढदिवसासाठी शुभेच्छा दिल्या... मला सुद्धा गोड शुभेच्छा मिळाल्या...

आजच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त ६६ किमी सायकलिंग करण्याचा मानस सायकलिस्ट मित्रमंडळींनी सांगितला होता... 


सकाळीच सुरू झाली सायकल वारी... मरीन लाइन्सला पाच लूप मारण्याचे ठरविले होते... शुलू तांबे आणि तुषार रेडकर बिल्डिंग खालीच आले होते... सकाळच्या अतिशय आल्हादायक वातावरणात राईड सुरू झाली... नरिमन पॉइंटला अतुल ओझा, अंबरीश गुरव, नवनीत वरळीकर, ज्योती कोल्हे आणि तुषार वासे भेटायला आले... 

पन्नास किमी राईड झाल्यावर... एअर इंडिया बिल्डिंग शेजारील मनीज् मध्ये खादीची चळवळ सुरू झाली... उपमा चमच्याने कापून वाढदिवस साजरा झाला... ६६ किमी पूर्ण करायचे होते...  तेथून थेट हिंदुजा हॉस्पिटल शेजारील चौपाटीवर आलो... हरहुन्नरी अतुलने स्टायलिस्ट फोटो काढले...

अजून वाढदिवसाचा ज्वर उतरला नव्हता... तुषार रेडकर आणि शुलू दूरदर्शन जवळील केक शॉप मध्ये केक घेऊन वाट पाहत होते... गंमत म्हणजे केकच्या दुकानातच दुसऱ्यांदा वाढदिवस साजरा झाला... 

समुद्रा सारखेच... तरुण मित्रांच्या प्रेमाला भरते आले होते...

शिवडीच्या श्री हिंद स्वराज्य प्रतिष्ठान यांनी रक्तदान शिबिरात येण्याचे आमंत्रण दिले होते... पुन्हा फ्रेश होऊन परेल येथील भावसार सभागृहात दाखल झालो... तेथे मित्र रोहन आणि प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांनी हार्दिक स्वागत केले... आतापर्यंत केलेल्या सायकलिंग बाबत तसेच रक्तदाना बाबत सभागृहाला माहिती दिली... वाढदिवसाच्या दिवशी रक्तदान ही संकल्पना सर्व तरुणांना खूप आवडली... 

शरीर स्वास्थ्या बरोबर  प्रदूषण मुक्त भारत या संकल्पनेचा प्रचार प्रसार करण्यासाठीच सायकलने भारत भ्रमंती सुरू आहे... तसेच सायकलिंग करा आणि मोबाईल संस्कृती मधून निसर्ग संस्कृती मध्ये या... हा संदेश तरुणांना दिला... 

माझे रक्तदान सुरू असतानाच सायकलिस्ट मित्र अंबरीश गुरव आला आणि त्याने पण रक्तदान केले... चांगली गोष्ट करणे हे सर्वांनाच प्रोत्साहित करते... याचाच परिपाठ अंबरिशने आज घालून दिला होता... 

आजच्या या मोठ्या दिवशी मनाला समाधान आणि आनंद देणाऱ्या गोष्टी हातून घडल्या होत्या... 

कुटुंब, नातलग, मित्रपरिवार आणि हितचिंतक या सर्वांच्या शुभेच्छांचे गाठोडे घेऊनच १६ नोव्हेंबर रोजी सात बहिणींना (नॉर्थ ईस्ट) भेटायला... त्यांच्या सोबत सायकलिंग करायला जातोय... 

ही शुभेच्छांची शिदोरी अनंत काळासाठी पुरणार आहे...


मंगल हो... !!!