गुरुपौर्णिमेच्या दिवशी घडलेली घटना २९ जुलै २०२६...
जीवनात काही घटना अशा घडतात की त्या क्षणी त्या दुःखद वाटतात; पण काळ थोडासा पुढे सरकला की लक्षात येतं... अरे, ही तर आयुष्याने दिलेली एक सुंदर भेट होती... माझ्यासाठी २९ जुलैचा गुरुपौर्णिमेचा दिवस अगदी असाच ठरला...
सकाळी साडेसात वाजता मुलुंड ऐरोली नाक्यावर सायकलिंग मित्रांची भेट ठरली होती... डॉ. राजेश कांबळे, लक्ष्मण नवले, अतुल ओझा, संजय सावंत आणि मी... सगळे एकत्र येणार होतो गुरुपौर्णिमेनिमित्तानं... त्यामुळे सकाळी सहा वाजता लोअर परळहून सायकल घेऊन निघालो...
बाहेर रिमझिम पाऊस सुरू होता. रस्ता ओला होता. म्हणून नेहमीपेक्षा जरा जास्तच सावधपणे सायकल चालवत होतो... पुढची लाईट सुरू, मागचा ब्लिंकर सुरू... "सुरक्षित सायकलिंग"ची सगळी नियमावली पाळत होतो...
टिळक ब्रिजजवळ पोहोचलो तर सकाळचा भाजीबाजार रंगात आला होता. कोथिंबिर, मेथीची भाजी यांचा सुगंध, मिरच्यांच्या टोपल्या, विक्रेत्यांची लगबग, ग्राहकांची गर्दी… त्या सगळ्यातून हळूहळू वाट काढत पुढे निघालो. दादर, माटुंगा, सायन, चुनाभट्टी ओलांडत प्रियदर्शिनीजवळ आलो...
कुर्ल्याकडे जाणाऱ्या छोट्याशा फ्लायओव्हरवर चढत होतो. पावसाचं पाणी उताराने वाहत होतं. म्हणून अजूनच सावकाश सायकल चालवत होतो...
आणि अचानक...
"धाड!"
एवढाच आवाज झाला... आणि पुढच्या क्षणी मी सायकलवर नव्हतो...
मागून आलेल्या बर्फाच्या ट्रकने माझ्या सायकलच्या मागच्या चाकाला जोरदार धडक दिली होती... मी हवेत उडालो आणि दोन तीन फूट दूर जाऊन पडलो. पाठीत इतकी जोरदार कळ उठली की काही क्षण काय घडलं हेच समजेनासं झालं... डोक्यात हेल्मेट असल्यामुळे हेड इन्ज्युरी झाली नाही...
पण खरी गोष्ट इथूनच सुरू झाली...
ट्रकचा चालक अक्षरशः धावत खाली आला. त्याच्या चेहऱ्यावर भीती होती. त्याने मला उचलून बसवलं आणि घाबरलेल्या आवाजात विचारलं...
"सरजी... ज्यादा तो नहीं लगा?"
मी कसाबसा म्हणालो, "सायकल चालवणं तर शक्य नाही... पाठीत खूप दुखतंय."
तो म्हणाला, बाजूवाले बसने कट मारा... मैने ब्रेक दबाया... लेकीन टायर स्लिप हुवा और आपको धक्का लगा... "चलिए... पहले आपको सुरक्षित जगह ले चलते हैं."
त्याच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो... क्लिनरने सायकल ट्रकमध्ये टाकली..
जवळच त्याची बर्फाची फॅक्टरी होती. मला तिथे नेलं. फॅक्टरीतील बर्फ घेऊन पाठीला शेक दिला...
मालकाला फोन केला. काही मिनिटांत मालक स्वतः आला. त्यांनी परिस्थिती ऐकून घेतली आणि एका क्षणाचाही विचार न करता म्हणाला,
"पहले आपको आपके दोस्तों के पास छोड़ते हैं."
मोठ्या xuv गाडीत माझी सायकल चढवली, मला पुढे बसवलं आणि थेट मुलुंड ऐरोली नाक्यावर आणून सोडलं...
तिकडे सर्व मित्र माझी वाटच पाहत होते.
डॉ. राजेश कांबळे यांने जागेवरच तपासणी केली. पाय हलवायला सांगितले, हातांची हालचाल करून घेतली आणि हसत म्हणाला, "अरे, तू अजून आमच्याशी मस्त गप्पा मारतोयस म्हणजे परिस्थिती नियंत्रणात आहे... पण काळजी घ्यायला हवी."
दुखत तर होतंच... पण मित्रांच्या सहवासात वेदनांचाही विसर पडतो... मग आम्ही टाटा कॉलनीजवळच्या मनीजमध्ये नाश्त्यासाठी गेलो... खरं तर त्या दिवशी नाश्त्या ऐवजी मित्रांच्या मायेने, आपुलकीने आणि धीर देणाऱ्या शब्दांनीच मन आणि पोट दोन्ही भरून गेलं होतं...
थोड्याच वेळात बर्फ फॅक्टरीचा मालक अमनदीप सिंग म्हणाला, "आता काळजी करू नका... मी स्वतः तुम्हाला सायकलसह सुरक्षितपणे घरी सोडतो."
त्या क्षणी जाणवले... अमनदीपने काळजीपूर्वक मदतीचा हात तर दिलाच होता तसेच तो आपत्कालीन परिस्थितीत जवळ आलेला माणुसकीचा दूतच भासला...
खूप ट्रॅफिक असल्यामुळे मुलुंड ते लोअर परळ हा पावणे दोन तासांचा प्रवास झाला... त्या सफरीत गप्पा रंगल्या. अमनदीप सांगत होता, "तीन वर्षांपूर्वी माझं वजन ११९ किलो होतं. आज ७२ किलो आहे. आता लोकांना फिटनेस आणि हेल्दी लाईफबद्दल मार्गदर्शन करतो." गप्पांमुळे पाठीच्या दुखण्याचा विसर पडला होता...
त्याच्या बोलण्यात मोठेपणा नव्हता; माणुसकी होती. व्यवसाय, हॉटेल्स, जिम... सगळं असूनही स्वभाव मात्र अगदी अतिशय साधा... डाउन टू अर्थ...
घरी पोहोचलो. त्याने स्वतः माझी सायकल घरात आणून ठेवली. जाताना माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला...
"सरजी, दवाके लिए या सायकलके लिए कुछ भी खर्च आये... मुझे जरूर बताइये. मैं तैयार हूँ."
त्या एका वाक्याने मन भरून आलं.
आजच्या काळात माणसं पैशाने श्रीमंत असतात; पण मनाने श्रीमंत असणारी माणसं फार क्वचित भेटतात. मला ती एका... अपघातामुळे भेटली...
मारू हॉस्पिटलमध्ये तपासणी झाली. सुरुवातीला फारसं गंभीर वाटलं नाही... पण एक्सरेमध्ये L2 मणक्याला छोटासा Hairline Fracture आणि Spondylosis असल्याचं समोर आलं. औषधं सुरू झाली. आता MRI होणार आहे...
पहिल्या दिवशी तर अंथरुणावर वळणंसुद्धा मोठं आव्हान होतं...
आज चौथा दिवस आहे...
आणि शरीर मला सांगतंय... "घाबरू नकोस, आपण पुन्हा उभे राहतोय...
आधीपेक्षा जवळपास सत्तर टक्के बरं वाटत आहे...
औषधांचा परिणाम आहेच.. पण त्याहून मोठं औषध म्हणजे मित्रांचे फोन, भेटी, कुटुंबीयांची काळजी आणि असंख्य शुभेच्छा...
डॉक्टर म्हणाले, 'थोडे दिवस आराम करा.' मी म्हटलं, 'ठीक आहे डॉक्टर, सायकलला सांगतो... थोडे दिवस माझी वाट पहा... लवकरच येतो तुझ्यावर स्वार व्हायला...
या अपघाताने मला एक गोष्ट पुन्हा शिकवली...
रस्त्यावर पडणं हा अपघात असतो... पण पडल्यावर पुन्हा उभं राहणं हीच खरी जिद्द असते...
सायकल पडली म्हणून स्वप्न पडत नाहीत...
मणक्याला किरकोळ दुखापत झाली म्हणून मनाचा कणा कधीच मोडत नाही...
उलट प्रत्येक अपघात मला आणखी मजबूत करून जातोयं...
कोणी विचारतं, "आता सायकलिंग थांबवणार ना?"
मी फक्त हसतो...
अहो, सायकलिंग हा माझा छंद तर आहेच पण त्या पेक्षा तो माझा श्वास आहे...
काही दिवस विश्रांती घेईन... डॉक्टरांचं ऐकेन... MRI करेन. उपचार पूर्ण करेन...
पण पुन्हा हेल्मेट डोक्यावर असेल... पाय पॅडलवर असतील... आणि नजरा पुढच्या रस्त्यावरच असतील...
कारण पुढचं लक्ष्य आधीच ठरलं आहे... आग्रा ते राजगड सायकलवारी...
छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्यातून सुटकेच्या पराक्रमाची गाथा सायकलवरून भारतभर पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे...
मला खात्री आहे... शिवछत्रपतींचे आशीर्वाद, मित्रांचे प्रेम आणि तुमच्या शुभेच्छा माझ्यासोबत आहेत...
अरुणाचल प्रदेशात अपघात झाला तेव्हा "एका अपघाताची गंमत" लिहिली होती...
आणि आता...
ही आहे...
"दुसऱ्या अपघाताची... दुसरी गंमत!"
गुरु पौर्णिमेच्या दिवशी ट्रकने धडक दिली खरी...
पण नियतीने त्याच वेळी माझ्या आयुष्यात अमनदीपसारखा एक चांगला मित्रही आणून उभा केला...
म्हणून आज त्या अपघाताकडे रागाने नाही, तर हसतच पाहतो...
कारण काही अपघात वेदना देतात...
आणि काही अपघात आयुष्यभर जपावी अशी माणसं देऊन जातात...
जखमा थोड्या आहेत... पण जिद्द अजूनही कणखर आहे...
सायकल काही दिवस थांबली आहे... पण प्रवास अजिबात थांबलेला नाही...
कारण... शंभर वर्षांपर्यंत सायकल चालवायची आहे...
जय शिवराय...
सतीश कुसुम विष्णू जाधव
सायकल वेडा...
अप्रतिम शब्दांकन, सतिश तुझ्या जिद्दीला सलाम...Get well soon..💐
ReplyDeleteग्रेट जिद्द 👍
DeleteMast lekh baba .. hats of to u
ReplyDeleteबरे व्हा, तंदुरुस्त व्हा, लवकर सायकल चालवताना भेटू 🚴🏻💨
ReplyDeleteफारच छान लेख , साहेब, तुमच्या जिद्दीला आणि चिकाटीला माझा साष्टांग दंडवत, तुम्ही लवकर यातून बरे हिच ईश्वर चरणी प्रार्थना
ReplyDeleteGreat Sirji , all the best 🙏
ReplyDeleteTc sir ✌️All is well
ReplyDeleteGet well soon sir.
ReplyDeleteThe roads, the bridges, the flyovers, the mountains , the valleys are all awaiting to welcome you with open arms.
Take care and god bless
अश्याही परिस्थितीत तु positive राहुन सुंदर लिखाण करु शकतोस व नवीन मित्र जोडल्याचा आनंद व्यक्त करू शकतोस !
ReplyDeleteHats Off.
काळजी घे.
सर तुम्ही लवकरच बरे होऊन, पुढच्या मजली करिता तयार होत आहात. तुमच्या जिद्दीला मानाचा मुजरा !!
ReplyDeleteजय शिवराय 🙏
Get well soon 🙏
ReplyDeleteसर वाचून खूप वाईट वाटले. पण अशा गोष्टी घडणे खूप वेदनादायी असते..काळजी घ्या आणि आराम करा..एकदम फिट आणि फाइन व्हा..लवकर बरे व्हा ही देवाला प्रार्थना🙏🙏..
ReplyDeleteखरंच सर, घटना एक असते; पण त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा असतो. तुमच्या लेखणीतून गंभीर प्रसंगालाही अर्थपूर्ण आणि रंजक वळण मिळते. अप्रतिम मांडणी! गरूडझेप तुमची वाट पहातेय
ReplyDeleteजय शिवराय 🚩
खूप छान सर. तुम्ही प्रत्येक गोष्ट खूप पॉझिटिव्ह घेता आणि हसतमुख रित्या सामोरे जाता. मग ती एखादी चांगली गोष्ट असो किंवा अशा प्रकारची एखादी जीवघेणी घटना असो. तुमचा कडून शिकण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. तुम्ही एका आठवड्याभरात पुन्हा सायकल वर विराजमान होणार ह्याची आम्हाला खात्री आहे.👍😊
ReplyDelete*# धर हॅंडल 🚲 मार पायडल 🚴😃*
ReplyDeleteBe motivated , Sir तुम्हीच आदर्श आहात आमचा नव्हे तुमच्या कडे पाहूनच प्रेरणा घेऊन वाटचाल करत आहोत .
ReplyDeleteWe proud of you sir and
GET WELL SOON 👍
# सायकलप्रेमी
सतिश खरच तू वेडा आहेस., तुझ्या जिद्दीला सलाम 🫡अपघात काय असतो आणि कसा होतो ते कळत सुध्दा नाही.
ReplyDeleteखरच तुला भेटलेली माणसे देवदूता सारखी होती.
वेळेत उपचार मिळाले.
लवकरच बरा होऊन तुझे ध्येय साकार करतीलच
.
लवकरच बरा हो औषध पाणी वेळेत घे.
ReplyDeleteदेव पाठीराखा आहेच.
भेटूच आपण.
मी सुद्धा या प्रसंगातून गेलोय.
Great, likhan ekdam mast
ReplyDeleteget well soon
proper take care each n everytime
साहेब लवकर बरे व्हा, सर्ली तुमची वाट पहात आहे, पण यापुढे काळजी घ्या, घरी कोणीतरी आपली वाट पहात आहे हे कृपया लक्षात ठेवा. 🙏🙏
ReplyDeleteसतीशजी नियतीच्या मुळे जे घडले ते अनपेक्षित आहे पण ज्या हिमतीने आपण सहन करतात व हे जे काही तूम्ही कष्ट घेतात त्याचे सुंदर फळ आपलेला निश्चित मिळणार व अता लेह लाडख छान सायकल रायड केली त्या नंतर देवाने थोडी विश्रांती दिली असो काळजी घ्या लवकर सायकलवर भेटू 👍
ReplyDeleteGet well soon. Many more cycle tours waiting for us.
ReplyDeleteGet well soon sir 🚴💪💐
ReplyDeleteसर काळजी ghya
ReplyDeleteGreat
ReplyDeleteTake care and get well soon 🙏
ReplyDeleteसकारात्मक दृष्टिकोन हाच खरा यशाचा गुरू मंत्र गुरू पोर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही आम्हाला दिला आहे.
ReplyDelete