Friday, May 8, 2020

Mumbai To Kanyakumari Cycling (Day 3) मुंबई ते कन्याकुमारी सायकलिंग (दिवस तिसरा)* कराड ते संकेश्वर सायकलिंग*

27.10.2019

Mumbai to Kanyakumari Cycling (Day 3)
मुंबई ते कन्याकुमारी सायकलिंग (दिवस तिसरा)*कराड ते संकेश्वर सायकलिंग*

कराडच्या अलीकडे 6 किमी असलेल्या  आराम हॉटेल पासून पहाटेच आजची राईड सुरू झाली.   सकाळी सर्वांनी स्ट्रेचिंग केले. आज  75 किमी चा पहिला टप्पा कोल्हापूर पर्यंत होता.  आजचे सायकलिंग सरळसोट परंतु चढ उताराचे होते.

कराड पार केले, आणि लक्ष्मणची सायकल चढाला दमछाक करायला लागली. बरीकशा पंचरमुळे हवा कमी झाली होती. नवीन ट्यूब टाकली. त्याच्या सोबत मी होतोच.

बाकीचे सवंगडी पुढे निघाले होते.  आता रस्ता दोन पदरी होता. सिमेंटचा मुख्य रस्ता आणि त्याच्या बाजूला डांबरी रस्ता. या दोन्हीच्या मध्ये एक बारीक चर होता. 

हायवेला सकाळी मोठ्या व्होल्वो प्रवासी बसची खूपच वर्दळ होती. त्यात ह्या बस मोठया कंटेनरला डाव्या बाजूने ओव्हर टेक करताना सायकलच्या खूपच जवळून पुढे जात होत्या. त्यामुळे मुख्य रस्ता सोडून डांबरी रस्त्यावरुनच सर्वांना सायकलिंग करावे लागत होते.  बाजूचा चर सोडून अतिशय काळजीपूर्वक पुढे पुढे चाललो होतो. हायब्रीड सायकलला तर सावधपणे तो बारीक चर टाळावा लागत होता. त्या चरा मध्ये माझी सायकल जाडजुड टायर असूनसुद्धा हडबडली. सायकलच्या मागे असलेले लाल  ब्लिंकर  खूपच महत्वाचे काम करत होते.

वातावरण कुंद झाले होते. काळ्या ढगांची दाटी नभांगणात झाली होती.

हिरव्यागार शेतावर विहरणारे पहाटपक्षी पावसाच्या आगमनाची चाहूल आपल्या किलबिलाटाने देत होते.   रस्त्याच्या कडेला आणि शेतांच्या बांधावर असणारी सुबाभूळ, भेंडा, नारळाची झाडे सुद्धा वाऱ्यावर माना डोलावत पक्षांना साथ देत होते. अशा धुंद निसर्गात, मनाच्या तारा झंकारल्या, "सुहाना सफर है ये मौसम हसी, हमे डर है हम खो न जाये कही" हे बोल आपसूक मुखातून बरसू लागले. देहभान विसरणे याचा अर्थ आज प्रत्यक्ष अनुभवत होतो. या निसर्गात विरघळून जावे, हे भाव मनात उमटले.

आता टक्क उजाडले होते. दीड तासातच छोट्या टपरी वजा सरस्वती हॉटेल मध्ये थांबलो.  कांदापोहे नास्ता केला.  विजयने दिलेला  जडिबुटी-हळद मिश्रित दुधाचा मसाला घालून प्रत्येकाने एक एक ग्लास दूध घेतले. या मसाले दुधाने अतिशय मस्त एनर्जी आली. आठ वाजले आणि सूर्याचा प्रकाश त्याचे तेज दाखवू लागला. सोपानराव सर्वांना सांगत होते, 'दुपारपर्यंत आपणास 100 किमी मारायचे आहेत', जरा जोर मारा.

वाटेत 'नेरले गाव' लागले. "आधार फाउंडेशन" तर्फे मुख्य रस्त्यावर सामूहिक दिवाळी साजरी करणे सुरू होते. आम्हाला पाहून आधार फाउंडेशनचे कार्यकर्ते  पुढे आले, आमची चौकशी केली. कोल्हापूर सकाळचा वार्ताहर विजय लोहारची सुद्धा भेट झाली.

त्याने "प्रदूषण मुक्त भारत" या उपक्रमाबद्दल, दिपक आणि माझी मुलाखत घेतली.  सामूहिक दिवाळी साजरी करण्यासाठी सर्व गावकरी एकत्र आले होते. गावकऱ्यांनी प्रदूषणमुक्ती  उपक्रमाच्या निमित्ताने आमचा सन्मान केला तसेच  समृद्धी नास्ता सेंटर द्वारे, मसाले दूध प्यायला दिले.

कोल्हापूर पर्यंतचा पुढील रस्ता चढ उताराचा होता. मध्ये मध्ये लागणारे पूलसुद्धा 'हेडविंड' मुळे (विरुद्ध दिशेने वाहणारे वारे) दमछाक करत होते. मध्ये टोल नाका लागला, खूप वर्षांनी गोटी-सोडा प्यायला मिळाला. वातावरण अजूनही ढगाळ होते. हिरव्यागार गालिच्यावर नभांची नक्षीदार रांगोळीच दीपावलीच्या मुहूर्तावर सजली होती.


परंतू पाऊस पडत नव्हता. वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे ढग सुद्धा सैरावैरा पळत होते. जणूकाही आमच्या सायकल बरोबर लपंडाव खेळत होते.

दीड वाजता कोल्हापूर गाठले होते.  करवीर नगरामधील हायवेला उजलाईवाडी  येथे "ऑरेंज हॉटेल" मध्ये जेवणासाठी थांबलो.

अतिशय मस्त ऐम्बीयन्स होता या हॉटेलचा. हॉटेल मधील सर्व कामगार वेटर्स यांनी ऑरेंज रंगाचे कपडे घातले होते. चिकन मसाला थाळीचे जेवण सुद्धा फर्मास होते. पुन्हा पांढरा आणि तांबडा रश्यावर ताव मारला. या रश्यामुळे सायकलींगचे श्रम हवेत विरून गेले होते.

पुढील सायकलिंग सुरू झाले. दुपारच्या उन्हाचा कडाका आता वाढला होता. कागल बस स्टँड पर्यंत 91 किमी सायकलिंग झाले होते. कागल येथील हायवेला असलेल्या बाजारपेठेत आम्ही पोहोचलो. लक्ष्मण आणि मी हायड्रेशन ब्रेक घ्यायचे ठरविले. बाकीची मंडळी पुढे निघाली होती.

सायकलवर असलेल्या सामानामुळे तसेच सायकलिंगच्या पोशाखामुळे आम्ही तेथील गावकऱ्यांचे केंद्रबिंदू होतो. आमची चौकशी सुरू झाली.  लक्ष्मण आणि माझी दमछाक झाली होती. इतक्यात जवळच असलेल्या भेळपुरीवाल्याने झक्कास भेळपुरी आणून दिली. तेथील गावकऱ्यांनी आम्हाला गराडा घातला होता. कुठून आले, कुठे निघालात? या सर्व प्रश्नांची उत्तरे लक्ष्मण तडफेने देत होता. 

सायकलला लावलेला "मुंबई ते कन्याकुमारी सायकलिंग आणि प्रदूषणमुक्त भारत"  हा बोर्ड वाचून विस्फारीत नजरेने त्या जमावातील  तरुण प्रश्न  विचारू लागले. आता लक्ष्मण मधील व्याख्याता जागृत झाला. सविस्तर माहिती तसेच या सायकल वारीचे प्रयोजन लक्ष्मणभाऊ सर्वांना समजावून सांगू लागले.

मी निमूटपणे भेळपुरी खात होतो. हळूच त्या गर्दीतून सटकून भेळपुरी गाडीजवळ आलो आणि पाणीपुरी सुद्धा गटकावली. आता त्या जमावाचा चार्ज मी घेतला आणि लक्ष्मणला भेळपुरीवाल्याकडे पिटाळले.  पंधरा मिनिटात सर्वांचे समाधान केले, तसेच प्रदूषण मुक्तीचे महत्व सांगितले. पुढे प्रस्थान करणार इतक्यात चहाचा कप सुद्धा हातात आला. आमच्या भेळपुरी आणि चहाचे पैसे त्या जमावातील कोणीतरी दिले होते.

सर्वांचे आभार मानून पुढची सफर सुरू झाली. पुढील दहा किमी टप्प्यात बाकीच्या सायकलिस्ट मंडळींची भेट झाली. त्यानंतर तीन तासात संकेश्वर गाठले. दाभाळे कॉम्प्लेक्स मधील 'राजधानी हॉटेल' मध्ये राहायची व्यवस्था झाली.

  सायंकाळचे सहा वाजले होते, संकेश्वर गाठायला.   आज 133 किमी राईड झाली होती.

हॉटेलच्या टेरेसवर सायकल ठेवल्या. उजेड आल्यामुळे संकेश्वर बाजारपेठ फिरलो. छान सफरचंद मिळाली. विक्रेते प्रामाणिक आणि हसतमुख होते. केळी सुद्धा रसरशीत मिळाली. रात्री बाजूच्याच "वीरशैव लिंगायत धाबा" मध्ये शाकाहारी जेवण जेवलो. दिवाळीचे लक्ष्मीपूजन प्रत्येक दुकानात चालू होते. मराठी बोलणारे बरेच मिळाले.

आता दिवसेंदिवस आम्हा सर्वांचा आत्मविश्वास वाढत होता. आजच्या सफरीत जी जी मंडळी भेटली त्यांनी खूपच प्रेमाने आमचे आदरतिथ्य केले होते. उदात्त ध्येय असेल तर प्रभावित जनप्रवाह उदारहस्ते मदत करतो याचा प्रत्यय आला.

पूर्वी ऋषी-मुनी साधु-संत अशाच कारणांसाठी भ्रमंती करत असावेत काय?

आज नितांत सुंदर निसर्ग दर्शन झाले होते तर नटखट ढग आमच्या सायकलशी स्पर्धा करत होते. या सौंदर्याला मनात साठवून निद्रेच्या अधीन झालो.

सतीश विष्णू जाधव


Wednesday, May 6, 2020

पाली गणपती सायकल भेट* 03.03.2020

03.03.2020 * पाली गणपती सायकल भेट*

*पाली गणपती सायकल भेट*

मंगळवार म्हणजे गणपतीचा वार. आज ठरले, पालीच्या गणपतीला भेट द्यायची. विजयची संकल्पना मी उचलून धरली आणि आजची सायकल सफर सुरू झाली.

अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा *बल्लाळेश्वर* ओळखला जातो. बल्लाळ या गणपती बाप्पाच्या असीम भक्तामुळेच त्याला बल्लाळेश्वर म्हणतात.

पंधरा दिवसांपूर्वीच ओझरच्या बाप्पाची भेट घेतली, आज पालीच्या गणपतीच्या भेटीला निघालोय. अशा प्रकारे निसर्ग भ्रमणाबरोबर गणरायाचे दर्शन तर घडणार आहेच. तसेच *प्रदूषण मुक्त भारत*  या संकल्पनेसह शारीरिक स्वास्थ्य; या बहुआयामी कार्यावर विजयसह निघलो आहे.

सकाळी पावणे आठ वाजता खोपोली वरून सायकल सफर सुरू झाली. खोपोली ते पाली 42 किमी अंतर आहे. हा रस्ता पुढे कोलाडला जातो. अजूनही कोकणात जाणारे चाकरमानी पेण, वडखळ मार्ग टाळून खोपोली, कोलाड मार्ग अवलंबतात, त्यामुळे या रस्त्याला सतत ट्राफिक होती.

हा रस्ता चौपदरी करण्याचे काम प्रगती पथावर आहे. परंतु मध्ये काही काही पॅच अतिशय खराब आहेत. कभी खुशी कभी गम, तर कधी हसू कधी आसू असे ऑफ रोडिंग सायकलिंग होते. सिमेंटच्या रस्त्यावर सुसाट धावणारी सायकल अचानक दगड धोंढ्यात येते आणि सर्व अंग व्हायब्रेट होते.

सध्यातरी हा रस्ता फक्त MTB साठीच योग्य आहे. याचा वेळी "हम है राही प्यार के हमसे कुछ ना बोलीये, जो भी प्यारसे मिला हम उसीके हो लिये" गाणे लागले होते. निसर्ग;  येणारी प्रत्येक परिस्थिति स्वीकारण्याचा मंत्रच आमच्याकडून गिरवून घेत होता.

दीड तासात अर्ध्या रस्त्यातील परळी गावात पोहोचलो. डोळे, कान, नाक, चेहरा सर्व धुळीने माखला होता. तोंडाला स्कार्फ असून सुध्दा नाकाच्या आत धूळ चिकटली होती. हाताला घातलेला स्किनर सुद्धा काळा पट्टेरी झाला होता. आज खूप दिवसांनी रीयल ऑफ रोडिंग सायकलिंग केली होती. चेहरा व्यवस्थित साफ करून, टपरीवर चहा घेतला आणि पुढची राईड सुरू केली.

दहा वाजता पाली मंदिराजवळ पोहोचलो. मंदिराच्या  मार्गावरून बदलापूर नगर परिषद शाळेचे बरेच विद्यार्थी बाप्पाचे दर्शन घेऊन परत निघाले होते.

त्यांनी आम्हा दोघांना गराडा घातला. त्या सर्वांना प्रदूषण मुक्तीचा आणि सायकल चालावा, तसेच झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश दिला. तर विजयने गुरुजींना सांगितले तुम्ही सायकल चालविली तर विद्यार्थी तुमचे अनुकरण करतील. सर्वांबरोबर ग्रुप फोटो काढून त्यांना निरोप दिला.

आम्ही बाप्पाच्या मंदिरात गेलो. पालीच्या बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले.  हे मंदिर साडेतीनशे वर्षाचे पेशवे कालीन आहे. काळ्या पत्थराचा गाभारा आणि वरच्या गोल घुमटावरील आर्च अप्रतिम आहे. काळा दगड व्हर्निश लावल्यामुळे चमकत होता.

बल्लाळेश्वराची मूर्ती वालुकामय आहे. तीला शेंदूर लेपन केले आहे. अष्टविनायकापैकी एक असलेले हे स्वयंभू देवस्थान आहे. बाहेरील सभामंडप, शिसवी लाकडाच्या खांबावर आहे. संपूर्ण लाकडी महिरप आणि महिलांसाठी गवाक्ष त्या खांबावर बनविलेला आहे. पेशवेकाळात आरतीच्या वेळी महिलांसाठी खास बसण्याची व्यवस्था या गवाक्षात होती. मंदिराच्या सभागृहात बसविलेले पंखे, झुंबर, घड्याळ तसेच स्टीलचे रेलिंग आणि लोंबणाऱ्या विजेच्या वायर, या सुंदर दगडी आणि लाकडी पुरातन शिल्पाच्या कलात्मकतेला बाधा आणत होत्या. मंदिराच्या आत फोटो काढणे निषीद्ध आहे

मंदिराच्या प्रांगणात  भलेमोठे दगडी "जाते" आहे.

या जात्यात चुना आणि गूळ दळून मंदिराच्या 
बांधकामासाठी, दगडी चिरे जोडण्यासाठी वापर करण्यात आला होता, अशी माहिती साठे गुरुजींनी दिली. या मंदिराच्या मागेच सरस गड आहे. बाप्पासाठी जागृत पहारा देणारा गण असावा.

बाप्पाचा परम भक्त बल्लाळच्या धुंडी विनायकाचे प्रथम दर्शन घ्यावे लागते.

अकरा वाजता महाप्रसाद सुरू होतो. फक्त वीस रुपयात सुग्रास भोजन प्रसाद  मिळतो. तो भक्षण करून परतीच्या प्रवासाला बारा वाजता सुरुवात केली.

आता उन्हाचा कडाका जबरदस्त होता. पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि खोपोलीकडे सुसाटत निघालो. तीन तासात खोपोली फाट्यावर पोहोचलो. थंडगार ऊसाचा रस पिऊन ताजेतवाने झालो.

विजयची रग अजून शिल्लक होती. तेथून 14 किमी असलेल्या कर्जत स्टेशनकडे कूच केले. खोपोली, पळसदरी, कर्जत रस्ता चारपदरी आणि टकाटक आहे. बरोबर चार वाजता कर्जत गाठले आणि सायकल सफरीची सांगता झाली.

*आज शंभर किमी राईड झाली होती.*  ही राईड विजयने दमछाक न होता सहजपणे पूर्ण केली होती. हे आजच्या सायकल सहलीचे फलीत होते.

माझ्या काही दोस्तांना, माझे हे  सायकलिंग  अतिरेक वाटतो. तर काही मित्रांनी, रक्तदानाची शंभरी झाली, आता बस कर!, असाही सल्ला दिलाय.

*खरं तर सायकलिंग सोबत "प्रदूषण मुक्त भारत" आणि "रक्तदान म्हणजे जीवनदान" या संकल्पनांचा मी प्रचार, प्रसार करतो आहे. या कार्यासाठी माझे शंभर वर्षाचे जीवन सुद्धा फार तोकडे आहे आणि जेव्हा असे सल्ले येतात, तेव्हा माझा जीवन प्रवास  योग्य मार्गाने सुरू आहे याची खात्री पटते.*

*शेवटी किती जगला यापेक्षा कसा जगला हेच महत्वाचे आहे.*

*गणपती बाप्पा मोरया*

सतीश विष्णू जाधव

Tuesday, May 5, 2020

*//प्रकाश बाबुराव सरवदे तळेगावचे अथांग तळे//*

22.06.2019

// प्रकाश बाबुराव सरवदे तळेगावचे अथांग तळे //

काही व्यक्तिमत्व खूपच प्रभावी असतात,  प्रथम भेटीतच भारावून टाकतात.

मुंबई पंढरपूर सायकल सफरीत अशाच एका व्यक्तिमत्वाची भेट झाली. लक्ष्मण नवलेंचे मित्र *प्रकाश बाबुराव सरवदे*

हाडाचा शिक्षक आणि विद्या प्रसारिणी सभा, पुणे यांच्या विविध शाळांमध्ये अध्यापनाची धुरा पस्तीस वर्षे यशस्वीपणे सांभाळून निवृत्त झालेले प्रकाश सरवदे, प्रथम भेटीतच माझे जिवलग मित्र झाले.

काही व्यक्तींना प्रथमतः  भेटल्यावर असे जाणवते की आपण यांना आधीही भेटलेलो आहोत,  का बरे असे होते?

पंढरपुर सायकल वारीमध्ये माझ्यासह लक्ष्मण नवले, अतुल ओझा आणि संतोष शिर्के सामील झाले होते. संतोषचे नुकतेच डोळ्याचे ऑपरेशन झाले होते, तरीही तो माऊलीच्या ओढीने सायकल वारीत सामील झाला होता.

दुपारच्या जेवणाचा मुक्काम तळेगावमधील माझा शाळकरी वर्गमित्र प्रकाशच्या घरी करूया,  हा लक्ष्मण नवलेचा प्रस्ताव आम्ही स्वीकारला. दुपारी बारा वाजता लोणावळ्याला पोहोचलो.  तेथून तळेगावसाठी जोरदार स्प्रिंट मारली. साडेतीन वाजता तळेगावला प्रकाश सरवदेंच्या घरी पोहोचलो. हॉलमध्ये सुदर्शनचक्रधारी श्री कृष्णाची फ्रेम होती.

दुपारच्या जेवणास अंमळ वेळच झाला होता. पण सरवदे गुरुजी आमची वाट पाहत थांबले होते. शांत, धीरोदात्त, हसतमुख व्यक्तिमत्व; सफेत सदरा-लेंग्यात आणखी उठून दिसत होते. शिवाजी महाराजांसारखी दाढी त्यांच्या व्यक्तिमत्वाला भारदस्तपणा आणत होती. घरात शिरताच प्रकाश आणि त्याच्या सौ. त्रिवेणी यांनी सुहास्य वदनाने स्वागत केले.

पंगतीची तयारी झाली. आंम्ही सर्वजण जमिनीवरील सतरंजीवर मांडी घालून बसलो.  प्रकाश भाऊ सुद्धा आमच्या सोबत जेवायला बसले.

सुंदर शाकाहारी बेत  होता. वरण-भात आणि  त्यावर साजूक तूप तसेच पोळ्या,  हिरवे वाटणे बटाटा रस्सेदार आमटी, हिरवी चटणी, लोणचं  आणि गोड पदार्थ म्हणून काजू कतली होती.

  जोरदार भूक लागली होती. जेवणाला सुरुवात करण्याअगोदर *"यज्ञ शिष्टाशिनः सन्तो"*  प्रार्थना झाली. पोटात जठराग्नी सोबत भक्तीरस सुद्धा पाझरला होता. प्रकाशाची पत्नी सौ. त्रिवेणी साक्षात अन्नपूर्णा होती. जेवणाला अप्रतिम चव होती. सायकलिंगचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला. या सुंदर शाकाहारी पाहूणचारामुळे मन प्रसन्न झाले.

आता सुरू झाली गप्पांची मैफिल. चौकसपणामुळे प्रकाश भाऊंना विचारले, ' जेवणा अगोदर प्रार्थना का?'   आपल्या रसना उद्विपित करण्यासाठी तसेच जठरातील पाचकरस पाझरण्यासाठी प्रार्थना महत्वाची आहे. प्रथमतः जेवणाचा आस्वाद डोळ्याने, नाकाने, कानाने, त्वचेने आणि जिव्हेने घेणे  अतिशय आवश्यक आहे.  अन्नाचा परिपूर्ण आस्वाद पंचेंद्रियाने आणि मनाने घेतल्यामुळे त्याचे पचन सुफळ संपूर्ण होते. अतिशय अभ्यासपूर्ण आणि  वैज्ञानिक  उत्तर प्रकाशभाऊंनी  दिले होते.

विद्या प्रसारिणी सभा, पुणे यांच्या विविध शाळांमध्ये अध्यापन क्षेत्रात ३५ वर्षांची सेवा त्यांनी दिली आहे.  त्यातील २८ वर्ष मुख्याध्यापक म्हणून  कार्यरत होते. सुविद्य पत्नी सौ त्रिवेणी आणि दोन मुली प्रियांका व मधुरा असा चौकोनी संसार. नुकतेच मोठ्या मुलीचे लग्न झाले आहे. प्रकाशभाऊ मे २०१८, मध्ये सेवानिवृत्त झाल्यावर स्वाध्याय परिवारासाठी पूर्ण वेळ कार्यरत आहेत.

पांडुरंग शास्त्री आठवले उर्फ दादाजींच्या स्वाध्याय परिवाराचे वरिष्ठ सदस्य आहेत, प्रकाश भाऊ.         त्यांच्या तेजस्वी चेहऱ्यावर सात्विक भाव प्रकर्षाने जाणवत होते.

स्वाध्याय परिवार आणि दादाजींच्या कार्याच्या अनुषंगाने प्रकाश भाऊंशी चर्चा सुरू झाली.

ज्ञान, कर्म आणि भक्ती ही स्वाध्यायची त्रिसुत्री त्यांनी सविस्तरपणे सांगितली.

*मनुष्य गौरव* हा स्वाध्यायचा पाया आहे.  श्रीमद भागवत गीतेतील तत्वज्ञान सर्वांना समजावणे आणि आचरणात आणण्यासाठी दादाजी कार्यरत होते.  त्यांनी स्थापन केलेल्या  तत्वज्ञान विद्यापीठामध्ये सर्वांना प्रवेश आहे. स्वाध्यायचा अर्थ आहे,  स्वतःला जाणणे, स्वतःचे अध्ययन करणे.

प्रकाश भाऊंशी चर्चा करताना, त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टींनी मनात पक्के घर केले.

*"भक्ती प्रेमातून हवी भीतीतून नको"*

*परमेश्वराने आपल्याला सर्व काही बहाल केले आहे,  त्यामुळे मंदिरात जाऊन काही मागणे मागण्याऐवजी या जन्मासाठी परमेश्वराला धन्यवाद दिले पाहिजेत* (Thanks Giving To God)

परमेश्वराची भक्ती प्रेममय असायला हवी. काही मागण्यासाठी किंवा भीती पोटी नको. हे तत्व मला पटले.

वडीलधाऱ्यांना  नमस्कार करण्यामुळे त्याचा प्रभाव लहानांवर तर पडतोच तसेच घरातसुद्धा  प्रसन्न आणि शांततामय वातावरण निर्मिती होते. हे विचार तर भन्नाटच.

त्रिकाल संध्या करण्यामुळे वातावरण पवित्र होते.

सकाळी हाताचे दर्शन घेऊन  "कराग्रे वसते लक्ष्मी" .....

दुपारच्या जेवणा अगोदर

  *यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः
भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्* ....
 
आणि रात्री झोपण्या अगोदर
*ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने॥ प्रणत: क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम:॥ ....

या प्रार्थना गृहसौख्य राखतात तसेच मनशांती देतात.

राजीव दीक्षित यांच्या व्याख्यानात ऐकलेली एक गोष्ट प्रकाश भाऊ  गेली कित्येक वर्ष आचरणात आणत आहेत.
ती म्हणजे,  "रोज सकाळी उठल्यावर तोंड न धुता, तोंडात असलेली लाळ डोळ्यांच्या बुबुळाला लावणे". यामुळे आश्चर्याची गोष्ट म्हणजे  त्यांच्या चष्म्याचा नंबर नाहीसा झाला आहे.

मेडिटेशनचा  त्यांनी सहज सोपा अर्थ सांगितला,  "ध्यानधारणा म्हणजे जागृतपणी झोपेचा अनुभव घेणे. मन एकाग्र करणे."

प्रकाश भाऊंच्या चेहऱ्यावरील सुहास्य, सतत सकारात्मक ऊर्जा प्रसारित करत होते.

लक्ष्मण भाऊंनी प्रकाशबद्दल आणखी एक माहिती दिली ती म्हणजे, त्यांनी "पुणे कन्याकुमारी आणि परत पुणे"  सायकलिंग केले आहे. खूप आनंद झाला, हे ऐकून.

आनंदाचा एखादा क्षण जरी जीवनात आला तरी खूप काही साध्य केलं असे समजायचे. हा विचार भावला मनाला.

तसेच आज कोणाचे तोंड पाहिले म्हणून दिवस खराब गेला, असे विचार जर येत असतील तर, देवाचे तोंड पाहावे म्हणजे असे नकारात्मक विचार येणारच नाहीत.

मुलगी प्रियांकाच्या लग्नाचा प्रसंग आठवला तेव्हा तर त्यांना स्वतःचे लग्न सुद्धा आठवले.

त्यांचा अभिनिवेश म्हणजे एखाद्या घटनेचे विश्लेषण करताना  मनात सकारात्मक भाव ठेवणे.  गुंता कोणी केला, यापेक्षा तो कसा सोडवता येईल या कडे लक्ष देणे.

प्रकाशभाऊ,  जनसेवा करतात, कोणतीही अपेक्षा न ठेवता.

त्यांना मान, प्रशंसा, पद, पैसा, अधिकार, मोठेपणा याची कसलीही अपेक्षा नाही.

हाती असलेले काम सचोटीने करणे, हेच त्यांचे धेय्य आहे.

देव सतत मनात हवा,  तरच चुकीच्या गोष्टी करण्याची बुद्धी होणारच नाही,  हे त्यांचे भाष्य मनाला उच्च पातळीवर घेऊन गेले.

पूजेची सक्ती नाही तर परमेश्वराचे रूप  आपल्या चित्तात उतरविणे,  त्यांचे गुण आपल्यात मनात रुजविणे आणि ते आचरणात आणणे; हीच खरी ईश्वर भक्ती आहे, हे तत्वज्ञान भावले.

सद्गुणांचा वापर जीवनात होणे महत्वाचे आहे तसेच त्यातून लोककल्याण होणे सुद्धा आवश्यक आहे. या विचारांनी मन भावविभोर झाले.

जवळपासच्या गावात दादाजींकडून मिळालेले स्वाध्याय तत्वज्ञान सांगणे, हा उपक्रम प्रकाश भाऊ गेली ३५ वर्ष करीत आहेत. कोणतीही अपेक्षा न ठेवता लोकजीवन सुसह्य करणे हा प्रकाशभाऊंचा ध्यास आहे.

पांडुरंग शात्री आठवलेंच्या (दादाजींच्या)  विचारांचा प्रचंड पगडा आहे प्रकाशभाऊंचा जीवनावर आहे.

खरोखर "ते सेफ हँड मध्ये आहेत"

योग्य गुरू मिळाले हे त्याचे परम भाग्य आहे.

जवळपास पस्तीस-चाळीस गावांशी त्यांचा संपर्क आहे.

परमेश्वराची भक्ती कशी करावी याची प्रेरक महिती प्रकाशभाऊ  या गावात देतात.

त्यामुळे शेकडो कुटुंबांचे  जीवन सुखी समाधानी झाले आहे.

प्रकाशभाऊंनी शेवटी अतिशय प्रेरक गोष्ट सांगितली ती म्हणजे, " आपल्या बोलण्यात आणि वागण्यात एकवाक्यता हवी, पारदर्शीपणा हवा "

इतक्यात त्रिवेणी वहिनीने मस्त मसालेदार चहा सुद्धा बनविला. तास-दीड तास कसा गेला ते कळलेच नाही. आता आम्हाला पुणे गाठायचे होते.

सरवदे कुटुंबाला शुभ कामना देऊन सायकलने पुण्याला प्रस्थान केले.

आयुष्य खूपच तोकडे आहे, म्हणूनच आपल्या जीवनाला आश्चर्यकारकरीत्या स्तिमित करणाऱ्या व्यक्तिमत्वांची प्रशंसा करायलाच हवी.

प्रकाशभाऊंचा  जीवनपट खालील चार ओळी अधोरेखित करतोय.

वाट होती खडतर, केला खूप प्रयास !

कष्टांच फळ सोन म्हणून त्याचीच धरली कास !

दिला साऱ्यांना आधार, नाही धरला हव्यास !

उज्वल यशाला तुमच्या, आमचा सलाम खास !

*" प्रकाश सरवदे"* म्हणजे तळेगावाचे अथांग तळे*

एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व माझ्या जीवन सफरीत समाविष्ट झाले होते.

खूप भाग्यवान आहे मी  ! ! !

सतीश विष्णू जाधव

Mumbai To Kanyakumari Cycling मुंबई ते कन्याकुमारी सायकलिंग (दुसरा दिवस)

26.10.2019    दिवस दुसरा

पुणे ते कराड सायकलिंग

आज दिवाळीच्या मोठ्या दिवशी पुण्याहून सकाळी पाच वाजता सायकल वारी सुरू करायची होती. सकाळीच सौ प्रतिभाताई नामदेव नालावडेंनी आमचे औक्षण केले. या आदरतिथ्याने  भारावून गेलो.  जणूकाही छत्रपती शिवरायांचे मावळेच लढाईला निघाले होते.  दरवाजापुढे काढलेली रांगोळी आणि दिव्यांनी मन अतिशय प्रसन्न झाले. 

निघतानाच,  सायकल पंचर झाली. लक्ष्मण आणि नामदेव यांनी ताबडतोब नवीन ट्यूब टाकली, तर ती सुद्धा बर्स्ट झाली. माझ्याकडे आणखी ट्यूब नव्हती, म्हणून नामदेवरावांनी त्यांच्या mtb ची ट्यूब दिली. ती ओव्हर साईझ असल्यामुळे हिरेनला विचारून ट्यूब टाकली. तो पर्यंत सोपान नलावडे, विकास भोर, अभिजीत गुंजाळ आणि दिपक निचित   नामदेवच्या घरी पोहोचले होते. सकाळी पाच ऐवजी साडेसहा वाजता सायकल सफर सुरू झाली. 

सकाळच्या वेळी वारजे वरून सुरू केलेली सफर सहज पुणे पार करून गेली.  कात्रज घाट सुरू झाला. आता या घाटात जाण्याचे आणि येण्याचे मार्ग वेगळे केल्यामुळे सायकलिंगला गती आली होती. मोठा बोगदा लागला, हा बोगदासुद्धा चढाचाच आहे,  बोगद्यातून पाणी वाहत होते. त्यामुळे लो गियरवर पेडलिंग करावे लागत होते. हायवेहुन सासवड मार्गे प्रति बालाजीला जाणारा रस्ता पार केला.

वाटेत पुस्तकांचे गाव भिलार 82 किमी हा बोर्ड लागला आणि माझे ट्रेकिंगचे गुरू आणि  जीवनाचे मार्गदर्शक,श्री जगन्नाथ शिंदे साहेबांची आठवण झाली. त्यांचे हे आवडते गाव. या पुस्तकाच्या गावी मी भेट दिलेली आहे.पुढे लागलेल्या अन्नपूर्णा हॉटेलच्या बाहेर पांढऱ्या शुभ्र खिल्लारी बैलांची जोडी असलेली बैलगाडी होती. जवळ जाताच लक्षात आले, हे तर पुतळे आहेत. फोटो काढले आणि पुढे निघालो. 

साडेदहा पर्यंत 50 किमी अंतर कापले होते. शिरावळला माझ्या सायकलमध्ये नवीन ट्यूब टाकली.  शिरवळच्या प्रसिद्ध  श्रीराम हॉटेलमध्ये दोन दोन वडापाव खाल्ले. बाहेर फळवाली मावशी ताजे रसरशीत अंजीर  विकत होती. अर्धा किलो अंजीर घेऊन सर्वांनी खाल्ले. खूप दिवसांनी गावरान अंजीर खाताना लहानपणची आठवण झाली. आई पुण्याच्या तुळशीबाग मंडईतील अंजीर आणि गुडदानी खाऊ घालीत असे.

 आता खंबाटकी घाट सुरू झाला. काळ्या ढगांनी आसमंतात दाटी केली होती. या घाटात जायचा मार्ग दुपदरी होता, तरीसुदधा घाटात खूप ट्राफिक झाली होती. बऱ्याच गाड्या बंद पडल्या होत्या, त्यामुळे कडेकडेने सावधतेने सायकलिंग करत होतो. नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे घाटातील झऱ्यांना बऱ्यापैकी खळखळाट होता. तेथे  लक्ष्मण आणि मी थांबून फोटो काढले.

  गाड्या, बस मधील माणसे, लहान मुले कुतूहलाने आमचे सायकलिंग पाहत होते. गाड्या जागेवर थांबल्या होत्या आणि आम्ही पुढे पुढे चाललो होतो. घाट संपला आणि सातारचा उतार लागला.

दुपारचे जेवण सातारजवळाच्या सद्गुरू हॉटेलमध्ये घेतले. खूप मस्त शाकाहारी जेवण होते. सद्गुरुचा मालक सुर्वे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व. अतिशय मेहनतीने हे हॉटेल उभे केले होते. आता सतारा परिसरात त्याची तीन हॉटेल्स आहेत. त्याने आम्हाला सायकलवारी साठी शुभेच्छा दिल्या.

पुढे लक्ष्मणची सायकल पंचर झाली. सर्व किट बरोबर असल्यामुळे पंचर झटपट काढले. आता रस्ता चढ-उताराचा होता. पुणे बंगलोर हायवेवर मध्ये लागणाऱ्या गावांना बायपास करण्यासाठी  पूल बांधले आहेत. त्यामुळे विना अडथळा रहदारी सुरू होती. या रस्त्यावर मोठे ट्रक, ट्रेलर, व्हॉवो बसगाड्या याचे प्रमाण प्रचंड आहे. त्यामुळे सायकल रस्त्याच्या किनाऱ्याने पांढऱ्या पट्टयाच्या आत आणि एकामागे एक चालवत होतो. सातारा जवळचा टोल नाका पार करून पुढे थांबलो.
डॉ विजय खाडे आणि कुटुंबीय  चियर अप करायला  सवादे गावाजवळ आमच्या भेटीला आले होते. तसेच मित्र स्वरूपने दिपक आणि माझ्यासाठी एक्स्ट्रा ट्यूब आणून दिल्या.

   कराड गाठायचे वेध लागले होते. जोरदार सायकलिंग सुरू होते. दोन्ही घाट परिश्रमपूर्वक पार केल्यामुळे आता शरीरात नवचैतन्य  सळसळत होते. कराडच्या अलीकडील आमचे थांबायचे ठिकाण कधी आले ते कळलेच नाही. आज कराड पर्यंत 156 किमी सायकल राईड झाली होती.

दिपकचा मित्र अमित,  आणि अमितचा मित्र, सागर बामणे, त्याचे हे आराम हॉटेल. सागरच्या या नव्या कोऱ्या हॉटेलचे अजून  उदघाटन सुद्धा झालेले नव्हते. तरी सुद्धा या हॉटेलमध्ये आमची राहायची व्यवस्था झाली होती. मैत्री काय काम करते याचे हे ज्वलंत उदाहरण होते.

रात्री कऱ्हाडी मटणासह तांबडा आणि पांढरा रस्सा मटकावला. सायकली व्यवस्थित बांधून सकाळच्या  प्रवासासाठी लवकर झोपी गेलो.

सतीश विष्णू जाधव

Monday, May 4, 2020

Anjarle Turtle Festival आंजर्ले कासव महोत्सव

16 मार्च 2020
*आंजर्ले कासव महोत्सव*.  Anjarle Turtle Festival

आंजर्ले कासव महोत्सवाची घोषणा झाली होती. चिपळूनची सह्याद्री निसर्ग मित्र संस्था आणि आंजर्ले कासव मित्र संस्था यांच्या सहकार्याने हा कासव महोत्सव 14 ते 31 मार्च दरम्यान जाहीर झाला होता.

या कार्यक्रमाचे संचालक वेळास येथील मोहन उपाध्ये यांना फोन केला. त्यांनी आंजर्लेला कसे पोहोचायचे याची सविस्तर माहिती दिली. 

आज दुपारी परममित्र  विजय कांबळे आणि मी सहकुटुंब गाडी घेऊन निघालो.  रस्त्याला रहदारी कमी होती त्यामुळे जुन्या मुंबई गोवा मार्गाने जायचे ठरविले. वडखळ बायपास पूल झाल्यामुळे तीन तासात माणगावला पोहोचलो. लोणार फाट्यावरून वळून  मंडणगडचा रस्ता पकडला. 

एकपदरी रस्ता असल्यामुळे गाडीचा वेग कमी झाला. आंबेत मार्गे आंजर्लेला पोहोचायला रात्रीचे आठ वाजले. माझी भाची मनीषा आणि भाचेजावई सुनील मेस्त्री तेथे आमची वाट पाहतच होते. आंजर्ले गावातील "केतकी बीच रिसॉर्ट" मध्ये  राहण्याची व्यवस्था सुनीलने केली होती.  त्याने सोबत आणलेले मासे  हॉटेल मध्ये बनवायला दिले.
आंजर्ले गावातील समुद्र किनारी असलेले केतकी रिसॉर्ट अतिशय सुंदर लोकेशनवर वसलेले आहे. नारळ पोफळीची वाडी, रंगीबेरंगी फुलांचे ताटवे, झाडांच्या ओंडक्या पासून बनविलेल्या बैठक व्यवस्था आणि ठिकठिकाणी लावलेले दोराचे झोपाळे मनाला सुखद समाधान I होते.आंजर्ले गावात पोहोचल्यावर समजले, करोनामुुळे जिल्हाधिकाऱ्याने आदेश काढून कासव महोत्सव रद्द केला आहे. त्यामुळे सर्व पर्यटकांचे बुकिंग रद्द करण्यात आले होते. परंतु सुनीलच्या ओळखीमुळे आमच्या निवासाची व्यवस्था झाली होती.  त्या रिसॉर्टमध्ये आम्हा व्यतिरिक्त आणखी एक चार जणांचे कुटुंब होते. त्यामुळे संपूर्ण रिसॉर्ट जणूकाही आमच्या साठीच राखीव होता. मग रात्रीच्या चांदण्यात सुरू झाली गप्पांची मैफिल. जुन्या आठवणी, केलेल्या विविध सहली, त्यात आलेली धमाल यांच्या फुलझड्या बरसू लागल्या. रात्रीचे अकरा वाजले तरी जेवणाचे भान कोणालाही नव्हते. गप्पागोष्टी करतानाच तळलेल्या पापलेटवर ताव मारला होता. त्यानंतर भाकरी आणि कोळंबीचे कालवण सोबत रस्सा भात ही मस्त ट्रीट होती. जेवण झाल्यावर आम्ही किनाऱ्यावर फेरफटका मारला. कासव महोत्सव रद्द झाल्यामुळे आंजर्लेचा समुद्र किनारा जणूकाही आम्हालाच आंदण दिला होता. सागराची गाज आणि क्षितिजाजवळ दिसणाऱ्या मासेमारी जहाजांच्या रांगा एका वेगळ्याच दुनियेत मनाला घेऊन गेल्या होत्या. चराचरात भरलेला आनंद, अथांग मनाच्या गाभाऱ्यात भरभरून साठवत होतो. ओलसर वाळूवर रात्रीच्या निरव शांततेत पावलांचे ठसे उमटवत चालणे आणि चालताना वाळूचा होणारा आवाज मनात साठवणे, हेच जगणे होते. निसर्गात विरघळून जाणे काय असते त्याचा आस्वाद, अनुभव घेत होतो.

  मनातील असंख्य कासव त्या वाळूवर पसरले होते.(खालील फोटो गेल्या वर्षीचा आहे)ते हळूहळू सागरातील पाण्याच्या ओढीने पुढे पुढे सरकत, अलगद आलेल्या लाटेवर स्वार होत होते. दुसऱ्या फेसळणाऱ्या लाटेमध्ये लुप्त होत होते. "मन उधाण वाऱ्याचे" याची देही याची डोळा पहात होतो. "मनातील कासव महोत्सव"  खऱ्या अर्थाने जगलो होतो. जनजीवनातून दूर एकांत, सोबत निवांत समुद्र किनारा आणि निरव रात्र यापेक्षा आणखी काय हवे असते आपल्याला.

   शांताबाई शेळकेंच्या " पावसा आधीचा पाऊस"  या कथा संग्रहाप्रमाणे "कासवांशिवाय कासव महोत्सव" मी जबरदस्त उपभोगला होता.

सतीश विष्णू जाधव

Sunday, May 3, 2020

Mumbai To Kanyakumari Cycling (मुंबई ते कन्याकुमारी सायकलिंग) (दिवस पहिला) 25.10.2019

 25.10.2019  दिवस पहिला  

   मुंबई ते पुणे सायकलिंग

मुंबई ते कन्याकुमारी राईडचा आजचा पहिला दिवस होता. 1760 किमी सायकलिंग 11 दिवसात पूर्ण करण्याचे ध्येय घेऊन, तसेच या संपूर्ण सायकल वारीत "प्रदूषण मुक्त भारत" हा संदेश जनमानसात रुजविण्याचे स्वप्न उराशी बाळगून सुरू झाली सायकलवारी. सोबत माझा सायकलिस्ट मित्र लक्ष्मण नवले पण होता.

पहाटे साडेतीन वाजता मुंबईवरून सायकल राईड सुरू झाली. कन्याकुमारी गाठायचे असल्यामुळे मागील कॅरियरवर बरेच समान होते. चौकपर्यंत सकाळी आठ वाजता पोहोचलो. पुढचा खोपोली पर्यंतचा रस्ता अतिशय खराब होता. त्यात सेल्फ सपोर्ट राईड, म्हणून अशा रस्त्यावर सांभाळून सायकल चालवत होतो. आणखी तासाभरात खोपोलीला  पोहोचलो.

माझ्या सायकलला MTB टायर असल्यामुळे, ही सफर सोपी झाली. खोपोलीत जेवण घेतले. तेव्हा लक्ष्मण म्हणाला, 'तुमचे मागील चाक आउट आहे'. जेवल्यावर चाक फिरवून पाहिले. खरेच आउट होते, मागचे चाक.

पुण्याला जाऊन आउट काढायचे ठरले. आता खंडाळा घाट सुरू झाला. आज आम्ही पहिल्यांदा सर्व सामनासह घाटात सायकलिंग करत होतो. पहिला हॉल्ट शिंगरोबा मंदिराजवळ घ्यायचा ठरले.

लक्ष्मण त्याच्या वेगाने हळूहळू पुढे सरकू लागला. शिंगरोबा मंदिराच्या आधी एक अवघड वळण आहे. तेथे माझ्या सायकल मधून "खाड्खुड" आवाज झाला. झटक्यात सायकल थांबली. सावधगिरीने ताबडतोब सायकल मुख्य रस्त्यावरून बाजूला  घेतली आणि आडवी झोपवली. सायकलची चेन गियरमध्ये अडकली होती. तसेच एक तार तुटून पडली होती. खूप प्रयत्न करून चेन सोडवली. तार एका बाजूने तुटून लटकत होती.  लक्ष्मणला फोन लावला. त्याने निखळलेली तार बाजूच्या स्पोक मध्ये गुंतवायला सांगितले.  लक्ष्मण शिंगरोबा मंदिराकडे सायकल ठेऊन खाली यायला निघाला. मी सायकल ढकलत घाट चढत होतो. रस्त्यात लक्ष्मण भेटला. त्याने सायकल तपासली आणि ढकलण्यापेक्षा सायकलिंग करायला सांगितले. मारली टांग सायकलवर आणि सुरु केली. लक्ष्मण मागून सायकल ढकलत  होता. आम्ही आता मंदिराकडे पोहोचलो. घामाने  थबथबलो होतो. माठातील गार पाणी पिऊन निवांत झालो. तेवढ्यात लक्ष्मणने पुण्याला सत्यजितला फोन करून पुण्यात सायकल मॅकेनिकची व्यवस्था करण्यास सांगितले.

चाक थोडेसे वेडेवाकडे झालेले,  त्यात एक तार तुटलेली. मागील चाकावर सामानाचे ओझे. अशा परिस्थितीत लोणावळा गाठायचे होते.  अमृतांजन पुलावर पुन्हा चेन लॉक झाली. आता लक्ष्मणला फोन न करताच मीच मॅकेनिक झालो. चेन सोडवली आणि अतिशय सावकाश सायकलिंग करत राजमाची पॉईंटकडे पोहोचलो. माझ्या उशिरा येण्याचे कारण लक्ष्मणाला समजले होते.

राजमाची पॉइंटवर मस्त थंडगार वारे सुटले होते.  समोरील हिरव्यागार डोंगरमाथ्यावरून झकास पांढराशुभ्र धबधबा खालच्या झाडीत लुप्त होत होता.  निळेशार आकाश आणि त्यात काळ्याभुऱ्या ढगांची गर्दी, प्रकाशाच्या विविध छटा अनुभवताना, डोळ्याचे पारणे फिटले होते.
*दिवाळीतील धनत्रयोदशीचा आजचा दिवस, या  निसर्गाच्या समवेत व्यतीत करण्याचे भाग्य माझ्या जीवनात आले होते. सोबत हसतमुख दोस्त लक्ष्मण होताच. जीवनाची "सेकंड इंनिग" अशीच नेहमीच अफलातून असावी, अशी मनोमन प्रार्थना केली.*पुढचा लोणावळ्यापर्यंतचा सायकल प्रवास याच आनंदलहरीवर झुलत डोलत पूर्ण झाला. शिवाजी नगरला आल्यावर आमचा लेह सायकलिस्ट मित्र सत्यजित  मदतील आला. त्यानेच कर्वे रोडवरील ट्रॅक अँड ट्रेलचे दुकान दाखवले.

या दुकानातील मॅकेनिक राजू , देवासारखा धावून आला. दुकान बंद होण्याच्या बेतात होते. माझ्या सायकलची अडचण समजताच राजुने भराभर काम सुरू केले आणि अर्ध्या तासात सायकल टकटकीत झाली.

हा राजू सुद्धा सायकलिस्ट आहे. दरवर्षी पुण्याचा एक गृप घेऊन सायकलिंग करत गोव्याला जातो. आम्ही कन्याकुमारीला सायकलिंग करत जाणार, हे कळल्यावर त्याने पेढे दिले. आम्हाला पाहून खूप आनंदाला होता राजू !! तेथून  आम्ही शिवाजी पुतळ्याजवळ आलो. येथे सत्यजितला निरोप दिला. आजचा मुक्काम कोथरूड मध्ये होता. आज 152 किमी सायकलिंग झाले होते.

पहिल्या दिवसाची सायकल सफर  खडतर होती पण अश्यक्य नव्हती.  कठीण गोष्ट साध्य केली की तीचा आनंद अपरिमित आणि अविस्मरणीय असतो. एक गोष्ट  लक्षात आली, जीवनात अशक्य असे काहीही नसते, परंतु ते साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे आवश्यक असते.


सतीश विष्णू जाधव