Monday, May 4, 2020

Anjarle Turtle Festival आंजर्ले कासव महोत्सव

16 मार्च 2020
*आंजर्ले कासव महोत्सव*.  Anjarle Turtle Festival

आंजर्ले कासव महोत्सवाची घोषणा झाली होती. चिपळूनची सह्याद्री निसर्ग मित्र संस्था आणि आंजर्ले कासव मित्र संस्था यांच्या सहकार्याने हा कासव महोत्सव 14 ते 31 मार्च दरम्यान जाहीर झाला होता.

या कार्यक्रमाचे संचालक वेळास येथील मोहन उपाध्ये यांना फोन केला. त्यांनी आंजर्लेला कसे पोहोचायचे याची सविस्तर माहिती दिली. 

आज दुपारी परममित्र  विजय कांबळे आणि मी सहकुटुंब गाडी घेऊन निघालो.  रस्त्याला रहदारी कमी होती त्यामुळे जुन्या मुंबई गोवा मार्गाने जायचे ठरविले. वडखळ बायपास पूल झाल्यामुळे तीन तासात माणगावला पोहोचलो. लोणार फाट्यावरून वळून  मंडणगडचा रस्ता पकडला. 

एकपदरी रस्ता असल्यामुळे गाडीचा वेग कमी झाला. आंबेत मार्गे आंजर्लेला पोहोचायला रात्रीचे आठ वाजले. माझी भाची मनीषा आणि भाचेजावई सुनील मेस्त्री तेथे आमची वाट पाहतच होते. आंजर्ले गावातील "केतकी बीच रिसॉर्ट" मध्ये  राहण्याची व्यवस्था सुनीलने केली होती.  त्याने सोबत आणलेले मासे  हॉटेल मध्ये बनवायला दिले.
आंजर्ले गावातील समुद्र किनारी असलेले केतकी रिसॉर्ट अतिशय सुंदर लोकेशनवर वसलेले आहे. नारळ पोफळीची वाडी, रंगीबेरंगी फुलांचे ताटवे, झाडांच्या ओंडक्या पासून बनविलेल्या बैठक व्यवस्था आणि ठिकठिकाणी लावलेले दोराचे झोपाळे मनाला सुखद समाधान I होते.आंजर्ले गावात पोहोचल्यावर समजले, करोनामुुळे जिल्हाधिकाऱ्याने आदेश काढून कासव महोत्सव रद्द केला आहे. त्यामुळे सर्व पर्यटकांचे बुकिंग रद्द करण्यात आले होते. परंतु सुनीलच्या ओळखीमुळे आमच्या निवासाची व्यवस्था झाली होती.  त्या रिसॉर्टमध्ये आम्हा व्यतिरिक्त आणखी एक चार जणांचे कुटुंब होते. त्यामुळे संपूर्ण रिसॉर्ट जणूकाही आमच्या साठीच राखीव होता. मग रात्रीच्या चांदण्यात सुरू झाली गप्पांची मैफिल. जुन्या आठवणी, केलेल्या विविध सहली, त्यात आलेली धमाल यांच्या फुलझड्या बरसू लागल्या. रात्रीचे अकरा वाजले तरी जेवणाचे भान कोणालाही नव्हते. गप्पागोष्टी करतानाच तळलेल्या पापलेटवर ताव मारला होता. त्यानंतर भाकरी आणि कोळंबीचे कालवण सोबत रस्सा भात ही मस्त ट्रीट होती. जेवण झाल्यावर आम्ही किनाऱ्यावर फेरफटका मारला. कासव महोत्सव रद्द झाल्यामुळे आंजर्लेचा समुद्र किनारा जणूकाही आम्हालाच आंदण दिला होता. सागराची गाज आणि क्षितिजाजवळ दिसणाऱ्या मासेमारी जहाजांच्या रांगा एका वेगळ्याच दुनियेत मनाला घेऊन गेल्या होत्या. चराचरात भरलेला आनंद, अथांग मनाच्या गाभाऱ्यात भरभरून साठवत होतो. ओलसर वाळूवर रात्रीच्या निरव शांततेत पावलांचे ठसे उमटवत चालणे आणि चालताना वाळूचा होणारा आवाज मनात साठवणे, हेच जगणे होते. निसर्गात विरघळून जाणे काय असते त्याचा आस्वाद, अनुभव घेत होतो.

  मनातील असंख्य कासव त्या वाळूवर पसरले होते.(खालील फोटो गेल्या वर्षीचा आहे)ते हळूहळू सागरातील पाण्याच्या ओढीने पुढे पुढे सरकत, अलगद आलेल्या लाटेवर स्वार होत होते. दुसऱ्या फेसळणाऱ्या लाटेमध्ये लुप्त होत होते. "मन उधाण वाऱ्याचे" याची देही याची डोळा पहात होतो. "मनातील कासव महोत्सव"  खऱ्या अर्थाने जगलो होतो. जनजीवनातून दूर एकांत, सोबत निवांत समुद्र किनारा आणि निरव रात्र यापेक्षा आणखी काय हवे असते आपल्याला.

   शांताबाई शेळकेंच्या " पावसा आधीचा पाऊस"  या कथा संग्रहाप्रमाणे "कासवांशिवाय कासव महोत्सव" मी जबरदस्त उपभोगला होता.

सतीश विष्णू जाधव

No comments:

Post a Comment