Tuesday, May 5, 2020

Mumbai To Kanyakumari Cycling मुंबई ते कन्याकुमारी सायकलिंग (दुसरा दिवस)

26.10.2019    दिवस दुसरा

पुणे ते कराड सायकलिंग

आज दिवाळीच्या मोठ्या दिवशी पुण्याहून सकाळी पाच वाजता सायकल वारी सुरू करायची होती. सकाळीच सौ प्रतिभाताई नामदेव नालावडेंनी आमचे औक्षण केले. या आदरतिथ्याने  भारावून गेलो.  जणूकाही छत्रपती शिवरायांचे मावळेच लढाईला निघाले होते.  दरवाजापुढे काढलेली रांगोळी आणि दिव्यांनी मन अतिशय प्रसन्न झाले. 

निघतानाच,  सायकल पंचर झाली. लक्ष्मण आणि नामदेव यांनी ताबडतोब नवीन ट्यूब टाकली, तर ती सुद्धा बर्स्ट झाली. माझ्याकडे आणखी ट्यूब नव्हती, म्हणून नामदेवरावांनी त्यांच्या mtb ची ट्यूब दिली. ती ओव्हर साईझ असल्यामुळे हिरेनला विचारून ट्यूब टाकली. तो पर्यंत सोपान नलावडे, विकास भोर, अभिजीत गुंजाळ आणि दिपक निचित   नामदेवच्या घरी पोहोचले होते. सकाळी पाच ऐवजी साडेसहा वाजता सायकल सफर सुरू झाली. 

सकाळच्या वेळी वारजे वरून सुरू केलेली सफर सहज पुणे पार करून गेली.  कात्रज घाट सुरू झाला. आता या घाटात जाण्याचे आणि येण्याचे मार्ग वेगळे केल्यामुळे सायकलिंगला गती आली होती. मोठा बोगदा लागला, हा बोगदासुद्धा चढाचाच आहे,  बोगद्यातून पाणी वाहत होते. त्यामुळे लो गियरवर पेडलिंग करावे लागत होते. हायवेहुन सासवड मार्गे प्रति बालाजीला जाणारा रस्ता पार केला.

वाटेत पुस्तकांचे गाव भिलार 82 किमी हा बोर्ड लागला आणि माझे ट्रेकिंगचे गुरू आणि  जीवनाचे मार्गदर्शक,श्री जगन्नाथ शिंदे साहेबांची आठवण झाली. त्यांचे हे आवडते गाव. या पुस्तकाच्या गावी मी भेट दिलेली आहे.पुढे लागलेल्या अन्नपूर्णा हॉटेलच्या बाहेर पांढऱ्या शुभ्र खिल्लारी बैलांची जोडी असलेली बैलगाडी होती. जवळ जाताच लक्षात आले, हे तर पुतळे आहेत. फोटो काढले आणि पुढे निघालो. 

साडेदहा पर्यंत 50 किमी अंतर कापले होते. शिरावळला माझ्या सायकलमध्ये नवीन ट्यूब टाकली.  शिरवळच्या प्रसिद्ध  श्रीराम हॉटेलमध्ये दोन दोन वडापाव खाल्ले. बाहेर फळवाली मावशी ताजे रसरशीत अंजीर  विकत होती. अर्धा किलो अंजीर घेऊन सर्वांनी खाल्ले. खूप दिवसांनी गावरान अंजीर खाताना लहानपणची आठवण झाली. आई पुण्याच्या तुळशीबाग मंडईतील अंजीर आणि गुडदानी खाऊ घालीत असे.

 आता खंबाटकी घाट सुरू झाला. काळ्या ढगांनी आसमंतात दाटी केली होती. या घाटात जायचा मार्ग दुपदरी होता, तरीसुदधा घाटात खूप ट्राफिक झाली होती. बऱ्याच गाड्या बंद पडल्या होत्या, त्यामुळे कडेकडेने सावधतेने सायकलिंग करत होतो. नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे घाटातील झऱ्यांना बऱ्यापैकी खळखळाट होता. तेथे  लक्ष्मण आणि मी थांबून फोटो काढले.

  गाड्या, बस मधील माणसे, लहान मुले कुतूहलाने आमचे सायकलिंग पाहत होते. गाड्या जागेवर थांबल्या होत्या आणि आम्ही पुढे पुढे चाललो होतो. घाट संपला आणि सातारचा उतार लागला.

दुपारचे जेवण सातारजवळाच्या सद्गुरू हॉटेलमध्ये घेतले. खूप मस्त शाकाहारी जेवण होते. सद्गुरुचा मालक सुर्वे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व. अतिशय मेहनतीने हे हॉटेल उभे केले होते. आता सतारा परिसरात त्याची तीन हॉटेल्स आहेत. त्याने आम्हाला सायकलवारी साठी शुभेच्छा दिल्या.

पुढे लक्ष्मणची सायकल पंचर झाली. सर्व किट बरोबर असल्यामुळे पंचर झटपट काढले. आता रस्ता चढ-उताराचा होता. पुणे बंगलोर हायवेवर मध्ये लागणाऱ्या गावांना बायपास करण्यासाठी  पूल बांधले आहेत. त्यामुळे विना अडथळा रहदारी सुरू होती. या रस्त्यावर मोठे ट्रक, ट्रेलर, व्हॉवो बसगाड्या याचे प्रमाण प्रचंड आहे. त्यामुळे सायकल रस्त्याच्या किनाऱ्याने पांढऱ्या पट्टयाच्या आत आणि एकामागे एक चालवत होतो. सातारा जवळचा टोल नाका पार करून पुढे थांबलो.
डॉ विजय खाडे आणि कुटुंबीय  चियर अप करायला  सवादे गावाजवळ आमच्या भेटीला आले होते. तसेच मित्र स्वरूपने दिपक आणि माझ्यासाठी एक्स्ट्रा ट्यूब आणून दिल्या.

   कराड गाठायचे वेध लागले होते. जोरदार सायकलिंग सुरू होते. दोन्ही घाट परिश्रमपूर्वक पार केल्यामुळे आता शरीरात नवचैतन्य  सळसळत होते. कराडच्या अलीकडील आमचे थांबायचे ठिकाण कधी आले ते कळलेच नाही. आज कराड पर्यंत 156 किमी सायकल राईड झाली होती.

दिपकचा मित्र अमित,  आणि अमितचा मित्र, सागर बामणे, त्याचे हे आराम हॉटेल. सागरच्या या नव्या कोऱ्या हॉटेलचे अजून  उदघाटन सुद्धा झालेले नव्हते. तरी सुद्धा या हॉटेलमध्ये आमची राहायची व्यवस्था झाली होती. मैत्री काय काम करते याचे हे ज्वलंत उदाहरण होते.

रात्री कऱ्हाडी मटणासह तांबडा आणि पांढरा रस्सा मटकावला. सायकली व्यवस्थित बांधून सकाळच्या  प्रवासासाठी लवकर झोपी गेलो.

सतीश विष्णू जाधव

13 comments:

  1. मस्त प्रवास व वर्णन आणी हो छायाचित्रेही छान

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद विद्या,

      असेच प्रोत्साहन मिळो!!!

      Delete
  2. विद्या,

    धन्यवाद आणि खूप खूप आभार!!

    असेच प्रोत्साहन मिळत राहो!!!

    ReplyDelete
    Replies
    1. जाधव सर... वरती प्रतिसाद दिला आहे ते विनायक वैद्य काका आहेत.
      खेडला असतात आणि जळफळाट व्हावा असे सायकलिंग करतात.

      (विद्या हे काकांना दोस्तीखातर हाक मारण्याचे नांव नाहिये ना..?) ;)

      Delete
    2. छान वर्णन, तितकेच सुंदर छायाचित्रण आणि कॕप्शन्सही कल्पक! पुढचे वाचण्याची उत्सुकता आहे.

      Delete
  3. हा भागही भारी झाला आहे..

    प्रत्येक भागाच्या / दिवसाच्या शेवटी भारताच्या नकाशावर कुठून कुठे कसा प्रवास झाला आहे हे दाखवाल का..? तुमच्या प्रवास किती अवाढव्य आहे हे समजायला मदत होईल.

    ReplyDelete
  4. फारच छान ब्लॉग लिहायला सुरुवात केली धन्यवाद सर

    ReplyDelete
    Replies
    1. प्रवास वर्णन छान लिहीले आहे छायाचित्रण मस्त आहे

      Delete
  5. प्रवास वर्णन छान आहे अणि छाया चित्रण मस्तच आहे 😍😍😍

    ReplyDelete