Friday, August 7, 2020

पुन्हा दिंडीगड सायकल सफर

पुनः दिंडीगड सायकल सफर

१ ऑगस्ट २०२०

"आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे काही चालेना" ही म्हण आज तंतोतंत खरी ठरली. आदित्यने आग्रह केला आणि दिंडीगडला जायचे नक्की झाले.

 काल राजेश बरोबर मुंब्रादेवी सायकलिंग करायचे ठरविले होते. निखिल आणि निलेशला सुद्धा तसाच निरोप दिला होता.  परंतु आदित्यची साथ म्हणजे सायकलच्या महाराजांची साथ असते, ती कशी सोडायची?  राजेशला फोन केला परंतु  दिंडीगडला खूप वेळ होणार म्हणून त्याने असमर्थता दर्शविली.
सायकलचे चाक बदलायचे म्हणून मुंबईवरून सकाळी  निघालो.   थेट ठाण्याला काका आदित्यच्या घरी जायचे होते.  मुलुंड टोल नाका ओलांडल्यावर चाक पंचर झाले, त्यामुळे काका रिक्षाने स्टँड बाय चाक घेऊन सर्व्हिस रोडला भेटला. तातडीने चाक बदलून आदित्यच्या घरी पंचर चाक ठेवले आणि तीन हात नाक्यावर बरोब्बर साडेसहा वाजता पोहोचलो.
निलेश डॉट वेळेवर आला, मागोमाग निखिल सुद्धा पोहोचला. काका सोबत अविनाश सुद्धा जॉईन झाला. अविनाशने नुकतीच पिवळ्या रंगाची कॅननडेल घेतली आहे. सायकलसह, अविनाश सुद्धा चमकत होता.  हिरेन आला, त्याने सर्वांच्या गाड्या ओके आहेत हे चेक केले आणि आम्ही दिंडीगडकडे प्रस्थान केले.

खारेगाव टोल नाका ओलांडून अंजुर फाट्यावरून पाईप लाईनच्या मार्गावरून राईड सुरू झाली.

 
हम पाच, चलेंगे साथ साथ, करत पक्षांचा किलबिलाट ऐकत भन्नाट वेगाने पुढे जात होतो. आदित्य सर्वांच्या पुढे जाऊन व्हिडीओ शूटिंग आणि फोटोग्राफी करत होता. गेल्या आठवड्यातच आदित्य सोबत ही राईड केली होती.  त्यामूळे रस्ता सरावाचा होता. 

वाटेत निखीलची गाडी पंचर झाली. आदित्य लागला कामाला. सायकलचा टायर सुद्धा फाटला होता. टायरमध्ये सपोर्ट म्हणून आदित्यने शंभर रुपयांची नोट ठेवली. 
नऊ वाजता सोनाळे गावात पोहोचलो. पायथ्याला एका दुकानात अमूल दूध आणि अंजीर मिठाई खाल्ली. चढ चढताना काय काळजी घेतली पाहिजे याची माहिती आजही आदित्यने दिली.

आता सुरू झाली चढाई दिंडीगडाची. माझ्या आतापर्यंतच्या अप हिल राईड मधील ही कठीण राईड होती. गेल्या वेळच्या चढाईत दोन वेळा सायकल ढकलावी लागली होती. त्यामुळेच आजचा प्रयत्न होता, सायकल न ढकलता गड पार करणे. 

"करीता अथक सायास... अशक्य ते शक्य होईल खास"... हेच विचार ठेऊन गड चढायला सुरुवात केली होती.

हायब्रीड सायकलमुळे कोणतीही रिस्क नको म्हणून, निलेश थोड्याच वेळात सायकल ढकलत वर जाऊ लागला. त्याच्या चालण्याच्या वेगापेक्षा माझ्या सायकलचा वेग कमी होता. नेहमीप्रमाणे आदित्य सर्वांना चिअर अप करत होता. फुर्तीला अविनाश भराभर  पेडलिंग करत पुढे गेला होता. अर्ध्या रस्त्यात निखीलची विकेट पडली.  म्हणाला, 'तुम्ही जा पुढे, मी थांबतो इथेच'. आदित्य काकाचा डायलॉग मी मारला, 'वरून जे सृष्टी सौंदर्य दिसणार आहे, ते इथून नाही दिसणार'. 

आदित्यच्या डोक्यात वेगळीच आयडिया घोळत होती.  त्याने सॅक मधून मजबूत पातळ दोरी काढली. दोरीची एक बाजू निखिलच्या सायकल हँडलला बांधली आणि दुसरी बाजू स्वतःच्या सायकल कॅरियरला बांधली. आता सुरू झाली निखीलची टोइंग सायकल. 

खरंच... मानलं पाहिजे या आदित्यला. एव्हढया कठीण चढावर स्वतःची सायकल चढविणे दमछाक करते, तेथे आदित्य दुसऱ्याची सायकल खेचत होता. अचाट आहे आदित्य. खरच अशी व्यक्तिमत्व क्षणाक्षणाला काही नवीन शिकवीत असतात. जीवापाड परोपकार, जे आपल्याकडे आहे ते भरभरून देण्याची कला, आदित्यकडून शिकावी.
या आदित्यचा जास्तीत जास्त सहवास मिळण्यासाठी त्याच्या बरोबर मोठी राईड करायचा मनात संकल्प केला.

एका कठीण चढावर माझी सायकल घसरली आणि मी चक्क उलटा पडलो. झिकझांक करताना सायकल रस्त्याबाजूच्या  मातीत गेली आणि माझा बॅलन्स गेला. समोरचा रस्ता एकदम चढाचा होता. थोडावेळ दमछाक घेऊन सायकल ढकलत तो कठीण पॅच पार केला. त्यानंतर पेडलिंग सुरू केले.

निखिलला वर सोडून, मला मदत करायला आदित्य पुन्हा खाली यायला निघाला होता. परंतु मी पेडलिंग करताना पाहून आदित्य, अविनाश, निलेश आणि निखिल  चिअर अप करायला लागले. शेवटचा शंभर फुटाचा सिमेंट काँक्रीट टप्पा त्याच जोशात  न उतरता पार केला आणि थेट मंदिराच्या पायथ्याला येऊन थांबलो.  

आज एका तासात अप हिल पूर्ण झाले होते. परंतु एक ठरवले, 'मंजिल अभी बाकी है मेरे दोस्त, फिर एक बार आयेन्गे'. नॉन स्टॉप चढाई साठी...
मंदिराच्या पायथ्याला सायकल बांधून,  सर्वांनी शेवटचा पाचशे फुटाचा ट्रेक सुरू केला. गडावरून दिसणारे विहंगम दृश्य पाहून सर्व नवे सदस्य स्तिमित झाले. निलेशने मनोमन ठरविले, या दिंडीगडावर सहकुटुंब यायचे. बऱ्याच वेळा टेकडीवरचे हे दिंडेश्वर महादेव मंदिर निलेशने मोटार सायकलिंग करताना पाहिले होते, पण आज प्रथम तो गडावर आला होता. प्रचंड खुश झाला होता निलेश.
देवदर्शन आटपून खाली सायकल स्टँड जवळ आलो. आज आदित्य आम्हाला नवीन स्पॉट दाखवणार होता. ऑफ रोडिंग सायकलिंग करत पाच मिनिटात दिंडेश्वरी माता भैरवी देवीच्या मंदिराजवळ पोहोचलो. 
अतिशय निसर्गरम्य परिसर आणि विशेष म्हणजे पाण्याची मुबलक सोय होती. दर्शन घेऊन मंदिरातच नाश्त्यासाठी बसलो. निखिलने कंदापोहे आणले होते, तर निलेशने डायटचिवडा काढला. माझ्याकडचे ड्रायफ्रुट बाहेर आले.  मंदिराच्या पुजारी दादांनी तांब्यातून पाणी दिले. सुरू झाले वनभोजन. पक्षांचे आवाज, झाडांची सळसळ आणि पुजारी दादांचे बोलणे मनाला खूप भावले. निखिलने भरपूर कंदापोहे आणले होते. त्या सोबत निलेशचा डायट चिवडा आणि पायथ्याला घेतलेली अंजीरची मिठाई, एकदम फर्मास बेत होता न्याहरीचा. डायफ्रूट मधील सुका आवळा अविनाशला खूप भावाला. 

आज पाऊस असता तर काय मजा आली असती,  असा घोषा निखिल करत होता. निखिलला हसत हसत सांगितले, राजा, जो निसर्ग आता दिसतोय, तो एन्जॉय केला पाहिजे. ना की जे नाही त्याबद्दल दुःख करणे. निसर्ग थोडाच आपल्या म्हणण्याप्रमाणे वागणार आहे. म्हणूनच निसर्ग आता जे देतोय, जे दाखवतोय,  ते भरभरून घेतलं पाहिजे, त्यात खरा आनंद आहे. माझे बोलणे आदित्यला पटले,  तो गालातल्या गालात हसत होता.

पुजारी दादांनी व्हॅलीत असलेल्या पाताळेश्वर भैरव मंदिराची माहिती दिली. त्या मंदिराला सुद्धा भेट द्यायचे ठरले. आदित्य सोबत अविनाश आणि मी सायलकलिंग करत थोडे खाली उतरलो. निखिल आणि निलेश मधल्या पाऊल वाटेने खाली उतरत होते. एका ठिकाणी आल्यावर तेथून सायकलिंग करत खाली व्हॅली मध्ये जाणे शक्य नव्हते. सायकल तेथेच ठेऊन पाचशे फूट दरीत उतरलो.

 सायकलिंग नंतर  ट्रेकिंगला खूप मज्जा आली. व्हॅलीतील एका उतरणीवर पाताळेश्वर भैरवनाथाचे मंदिर विराजमान होते.
 हे पांडवकालीन मंदिर भग्नावस्थेत होते. मंदिराचे मोठे मोठे पत्थर खालील ओढ्यात पडले होते. पाण्याच्या प्रवाहामुळे जमीन खचुन मंदिराच्या भिंती ढासळल्या होत्या.  गाभारा आणि भैरवनाथाचे लिंग शाबूत होते. नुकतच शिवलिंगाला बेलपत्र आणि फुलांनी सजविले होते. 

देवदर्शन करून बाजूच्या ओढ्यात पाय सोडून बसलो. आजूबाजूचा निसर्ग पाहून मन एकदम प्रसन्न झाले.  
संपूर्ण व्हॅली आणि समोर दिसणारा डोंगर हिरवाईने नटला होता. हिरव्या रंगाच्यासुद्धा खूप वेगवेगळ्या छटा दिसत होत्या. झुळझुळ वाहणारा ओढा, त्याचा खळखळ आवाज, मोरांचा केकारव, पक्षांचा किलबिलाट, पानांची सळसळ, आकाशात ढगांचे विहरणे,  एकामागे एक असणारे डोंगरांचे हिरवे पदर पाहून  विंदा करंदीकरांची कविता आठवली.

देणाऱ्याने देत जावें;   घेणाऱ्याने घेत जावें.

हिरव्यापिवळ्या माळावरून;  हिरवीपिवळी शाल घ्यावी...

वेड्यापिशा ढगांकडून;  वेडेपिसे आकार घ्यावे...

घेतां घेतां एक दिवस;  देणाऱ्याचे हात घ्यावे !

निसर्ग भरभरून जे देतोय; तेच सर्वाना वाटण्यासाठी मनात काही शब्दसुमने प्रसवली.

निसर्ग असा अजब लहरी

खेळ दाखवितो कितीतरी

पाहता त्याला  आनंदिसी

सुंदर वर्णन त्याचे  लिहिसी

दृष्टी लाभतसे वाचकास दिव्य

मोद भरतो जीवनी अतिभव्य

सायकल अन् मित्रांसोबत

निसर्ग वेडा फिरतो अविश्रांत !!!

भान हरपून गेले हा निसर्गाचा आविष्कार पाहून. व्हॅलीमध्ये एक पाऊल वाट उतरत होती. खाली ओवळे गाव वसलेले होते. घरांच्या छपराची लाल कौले छोट्या छोट्या पाखरांसारखी दिसत होती. दूरवर हायवे दिसत होता. वेगात जाणाऱ्या गाड्या दिसत होत्या परंतु गाड्याचे आवाज येत नव्हते. 
आदित्य आणि अविनाश मंदिराबाजूच्या छोट्या शेडमध्ये पहुडले. निलेश, निखिल आणि मी ओढ्यात गप्पा मारत बसलो होतो. मुंबईच्या जवळ एव्हढा निसर्गरम्य, अदभूत परिसर पाहून सहकुटुंब एकदिवसाची सहल काढायचे मनात ठरविले. आदित्य काकाने तर खाली जाणाऱ्या पाऊल वाटेने ऑफ रोडिंग सायकलिंग करायचे सुद्धा नक्की केले.
अविनाशच्या पायाखाली काहीतरी वळवळले, बघतो तर एक खेकडा होता. त्याला पकडून साहसी खेकडया बरोबर अविनाशचा फोटो काढला. हळूच त्याला दगडात सोडून दिले.

 आदित्यने मग नारळ पाण्याचे पावडर सॅचे काढले. मोठ्या पाण्याच्या बाटलीत ते टाकल्यावर शहाळ्याचे पाणी तयार झाले. बहारदार नारळ पाण्याचा आस्वाद सर्वांनी घेतला. काकाने मंदिराच्या डागडुजीचे काम करणाऱ्या गावकऱ्यांना सुद्धा नारळपाणी  दिले. खरच... समयसूचकता काकाकडून शिकावी.
दुपारचा एक वाजला होता. पुन्हा ती दरी चढत पार करून वर आलो आणि सायकलिंग करत दिंडेश्वरी भैरवी मातेच्या मंदिरात आलो. 

मंदिर परिसरात काही हिंदी भाषिक मंडळी जेवण बनवीत होती. त्यांचा एक मोठा गृप देवदर्शनासाठी ट्रेक करत वर येणार होता. गोवऱ्याच्या चुलीत त्यांनी बटाटे भाजले होते. त्या गावरान धुराच्या वासाने ते भाजलेले बटाटे खाण्याची मनोमन इच्छा झाली. म्हणतात ना.. परमेश्वराच्या दारात मनापासून झालेली इच्छा पूर्ण होते. त्या मुख्य आचाऱ्याने मला बोलावून दोन मोठे भाजलेले बटाटे आणि मीठ दिले. काळपट, मातकट झालेल्या साली काढून मीठ लावून ते बटाटे खाताना आपसूक डोळे मिटले आणि मन त्या बटाट्याचा स्वाद घेण्यात तल्लीन झाले. त्यानंतर पुजारी दादांनी जडीबुटीयुक्त लेमन चहा दिला. या प्रेमळ आदरतिथ्याने सर्वजण प्रचंड आनंदलो.

या आनंदाच्या भरातच दिंडीगड उतरलो. पायथ्याला घरच्यांसाठी मिठाई घेऊन सोनाळे गाव पार करून हायवेला आलो. खारेगाव टोल नाका ओलांडुन मलईदार नारळ पाणी प्यालो. तीन हात नाक्यावर सर्वांना राम राम करून,  एकटाच,  उरात भरलेल्या निसर्गासोबत मुंबईला घराकडे निघालो.

आजची दिंडीगड सफर मित्रांच्या साथीने आणि आदित्य काकाच्या शोधक वाटांमुळे अविस्मरणीय झाली होती.

आझाद पंछी ...

Tuesday, August 4, 2020

मेघदूत

मेघदूत

महाकवी श्री कालिदासांचे मेघदूत वाचनात आले... 

शांताबाई शेळके यांनी रसग्रहण केलेले...

या रसग्रहणाला कविवर्य माधव ज्युलियन यांची चार ओळींची प्रस्तावना आहे.

त्या चार ओळींचा,  भावलेला रसस्वाद... झालेले आकलन... सविनय सादर...


मेघांनी हें गगन भरतां गाढ आषाढमासी

होई  पर्युत्सुक  विकल तो कांत एकांतवासी,

तंनि:श्वास श्रवुनि, रिझवी कोण त्याच्या जिवासी ?

मंदाक्रान्ता ललित कविता कालिदासी विलासी !


*रसास्वाद*

कविवर्य माधव ज्युलियन यांनी  कालिदासांच्या मेघदूत महाकाव्याचे  मंदाक्रांता वृत्तात रसग्रहण केले आहे. त्यातील या प्रथम चार ओळी आहेत.

 या चारपंक्ती मध्ये :
 
 आषाढ महिन्यात नभांगणात ढगांची दाटी झाल्यावर, हा प्रेमाचा पुजारी एकांतवास भोगणारा शापित यक्ष;  प्रेयसीच्या भेटीसाठी  विरहाने व्याकुळ  आहे. 
 
 जशी गगनात मेघांनी गर्दी केली आहे, तसेच प्रेमाची दाटी त्याच्या हृदयात झाली आहे. मिलनाच्या विरहाने विकलांग झालेला तो जीव, ढगांकडे आर्ततेने पाहत आहे. 


मेघांच्या तनातून बरसणाऱ्या जलधारा, त्या आर्त जिवाच्या अश्रूधारांपुढे फिक्या झाल्या आहेत. 

त्याच्या श्वासाचा वेग वाढला आहे;  या श्वासाची अधीरता,  या अश्रूंचे लोट थांबविणारी ललना कधी येणार आहे.

कालिदासाच्या शब्दविलासाने भारलेले  मेघदूत  हे संस्कृत काव्य मंदाक्रांता वृत्तात आहे  आणि कविवर्य माधव ज्युलियन यांनी केलेले मंदाक्रांता वृत्तातील मराठी रसग्रहण सुद्धा अतिशय अप्रतिम आहे.

मनाला चिरंतन आणि शाश्वत आनंद ह्या पहिल्या चार ओळी देतात.

प्रेमाची उत्कटता,  विरहाची आर्तता मनाला भावविभोर करते.

प्रत्येक  शब्द...

त्यातील ओज...

ओघवती भाषाशैली...

मंदाक्रांता वृत्तात केलेली शब्दांची गुंफण...

मंद चालणाऱ्या गजगामीनी सारखी हळुवारपणे मनाचा गाभारा पादाक्रांत करते.

 आपल्या मनातल्या गोष्टी,  कवींच्या शब्द सामर्थ्याने आपल्या समोर अवतीर्ण होतात, तेव्हा प्रेमभावना उचंबळून येतात...  

नव्हे.... नव्हे... भरभरून वाहू लागतात...
 
 बांध फुटून वाहणारे प्रेम....

 साऱ्या आसमंतात भरून जाते... 

किंबहुना त्याच्याही पलीकडे वाहत जाते. 
 
गाढ आषाढमासी...

कांत एकांतवासी...

कविता कालिदासी विलासी....

हे शब्द मन पटलावर गारुड करतात. 

काय अप्रतिम शब्द रचना आहे...

या महाकाव्याच्या शेवटी...

मेघाला वर्षावैभव प्राप्त होऊन सौदामिनीसोबत रत होत असता, विरहाची अनुभूती कधीही न येवो अशी कामना यक्ष व्यक्त करतो....

महाकवी कालिदासांची शब्दविलासिनी आपल्याला वेगळ्या भाव विश्वात घेऊन जाते.

आझाद पंछी.... 😊🦋

Monday, August 3, 2020

मैत्री दिवस सायकलिंग

मैत्री दिवस सायकलिंग

२ ऑगस्ट २०२०

सकाळीच शाळेतला परममित्र संजय कोळवणकर बरोबर बोलणे झाले, त्याच वेळी आजचा मैत्री दिवस विजय मित्रासोबत सायकलिंग करून साजरा करायचा हे मनाने ठरविले.

चार दिवसापूर्वी कोणीतरी बेलार्ड पियरचे फोटो पोष्ट केले  होते, गुलमोहर फुललाय म्हणून. आज गुलमोहर दर्शन करायचे म्हणून संध्याकाळी पाच वाजता विजयसह सायकल राईड सुरू केली. 

छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनला पोहोचलो. तो परिसर सायंकाळच्या सोनेरी सूर्य किरणांनी न्हाऊन निघाला होता. रहदारीसुद्धा शांत झाली होती. स्टेशनच्या मुख्य इमारती बाहेरील कुंपणावर निळसर गुलाबी रंगांच्या फुलांनी एक वृक्ष बहरला होता. 
हेरिटेज बिल्डिंगच्या कॅनव्हासवर हिरव्यागच्च वृक्षावर गुलाबी निळी फुले म्हणजे इंग्रजी इमारतीवर निसर्गरूपी छत्रपती शिवाजी महाराजांचे आक्रमणच जाणवले. म्हणूनच स्टेशनला व्हिक्टोरियाचे नाव बदलून छत्रपतींचे नाव दिले असावे. मन एकदम प्रसन्न झाले. 

 स्टेशनच्या बाहेर इमारतीचे फोटो काढत असतानाच, माझ्या सोगो कराओके संगीत  मैफिलीची मैत्रीण गीताची भेट झाली.
 आजच्या दिवशी तिची भेट म्हणजे संपूर्ण सोगो परिवाराची भेट होती. तिला सुद्धा सायकलिंगचा श्रीगणेशा लवकरच करायचा आहे. तेथे खूप फोटो काढून बेलार्ड पियरकडे वळलो. 

काय आश्चर्य... मुलांच्या गुलमोहरानी बेलार्ड पियर फुलून गेला होता. आसपासची खूप मुले संपूर्ण परिसरात क्रिकेट खेळत होती. गुलमोहराचा मागमूस कुठेच नव्हता. बेलार्ड पियरच्या सर्व मार्गिका फिरलो. 
अचानक एक वेगळेच दृश्य समोर दिसले. एका मार्गात ढोलताशा लेझीमसह एक मिरवणूक निघाली होती. जवळ जाऊन पाहिले तर एका ऐतिहासिक चित्रपटाची शूटिंग सुरू होती. आश्चर्य वाटले... या मिरवणुकीच्या शूटिंगला करोना काळात परवानगी कोणी आणि कशी दिली, याचे. 

 या मिरवणुकीचे शूटिंग करून गेटवे ऑफ इंडियाकडे निघालो.

सगळ्या ठिकाणी बॅरिकेट लावून गेटवे ऑफ इंडिया परिसर बंद केला होता. ताजमहाल हॉटेल समोरील चौपाटीवरसुद्धा जायला बंदी होती. नेहमी तुडुंब  गजबजलेला हा परिसर एकदम शांत वाटला. माणसांच्या कोलाहलाऐवजी पक्षांचे पंख फडफडण्याचे आवाज आसमंतात घुमत होते. 


आकाशातील काळे पांढरे ढग गेटवे ऑफ इंडियाच्या चार बुरुजांशी हितगुज करत होते. विचारात होते, 'कधी येणार तुझी लाडकी माणसे, तुला भेटायला'.

नीलवर्णी आकाश छताखाली काळे पांढरे ढग हातात हात गुंफून वारा वाहिल तसे स्वछंदी भरकटत होते . ते सागराच्या संथ लाटांशी मान डोलावून  हितगुज करत होते.  लाटाही ढगांशी हळुवारपणे गुजगोष्टी करत होत्या. 

पोलिसांची गाडी येण्याअगोदर दोनचार फोटो काढून तेथून सटकलो. थेट मारिन लाईन्स चौपाटी गाठली. आज खूप मोठा जनसमुदाय चौपाटीवर दिसत होता. सोशल डिस्टनसिंगमुळे तातडीने फोटो काढून पुढे प्रस्थान केले. 
गिरगाव चौपाटीवरून वाळकेश्वरला चढणाऱ्या रस्त्यावर थांबलो. तेथून मारिन लाईन्स चौपाटी परिसर अतिशय विहंगम दिसतो. सूर्य अस्ताला गेला होता, परंतु त्याची लाली राणीच्या रत्नाहाराला सोन्याचा मुलामा देत होती.
 समुद्राच्या निळाईवर तो हिरेजडित रत्नहार चमचम चमकत होता. सागर निळ्या नभाच्या रंगाने न्हाऊन निघाला होता. आकाशाची निळाई पाहून सागराचे पाणी आनंदाने उचंबळून येत होते. 
त्या क्षितिजा जवळ नभाचे आणि सागराचे जेथे मिलन होते, तेथे मनाची सैर सुरू झाली. शांत चित्ताने ती एकरूप अवस्था,  समाधी अवस्था अनुभवायला लागलो.

 लाजेने चुर होऊन थरथरणारी लाट आजच्या मैत्री दिनानिमित्त प्रिय "मित्राला" आर्जव करत होती, 'थांब ना थोडावेळ, नको ना मावळूस एवढ्या लवकर. मित्र तिला हसत हसत सांगत होता, उद्या सकाळी लवकरच भेटूया. अच्छा तो हम चलते है.

हे दोघांचे हितगुज ऐकून मित्र विजयला म्हणालो, चल आपणसुद्धा निघुया इथून. जास्त वेळ थांबलो तर आपले पोलीस मित्र येतील आपल्या भेटीला. विजय हसला... आम्ही कमला नेहरू पार्ककडे प्रस्थान केले. रस्ते वर्दळ नसल्यामुळे निवांत होते. समुद्रही त्या शांततेचा कानोसा घेत शांत झाला होता. संपूर्ण तीनबत्ती परिसर निर्जन झाला होता. फक्त तुरळक गाड्यांची रहदारी सुरू होती. 

तेथून महालक्ष्मी, वरळी मार्गे घरी पोहोचलो. दोन तासात पस्तीस किमी राईड झाली होती. 

आजच्या मैत्री दिनानिमित्त जिवलग मित्र संजय बरोबर बोलणे झाले, मित्र विजय बरोबर सायकल राईड झाली.  सोगो मैत्रीण गीताची भेट झाली. गेटवे ऑफ इंडियाची ढगांशी झालेली मैत्री पाहिली आणि गिरगाव चौपाटी नाक्यावरून सागरी लाट आणि सूर्य नारायणाची मैत्रीसुद्धा अनुभवली होती.

आजचा मैत्री दिवस खऱ्या अर्थाने सार्थकी लागला होता.

आझाद पंछी....

Wednesday, July 29, 2020

दिंडीगड सायकल सफर

दिंडीगड राईड

२६ जुलै २०२०


सकाळी पावणे पाच वाजता सायकल राईड सुरू झाली. बरोबर  पाच वाजता दादरच्या प्रीतम हॉटेल जवळ विजय तयारच होता. सायकलच्या हँडलला लावलेला हाय पॉवर हेड लाईट आणि हेल्मेटला लावलेला लाल ब्लिन्कर लाईट  चालू  केला. सकाळच्या पावसाळी वातावरणात नवीनच घेतलेला  हेड लाईट अतिशय प्रखर उजेड रस्त्यावर टाकत होता. आम्ही दोघेही सर्व सेफ्टीगियरसह सज्ज होतो.

आज दिंडीगड सायकल राईड करायची होती. विशेष म्हणजे आजच्या राईडचे प्लॅनिंग चिरागने केले होते. पंधरा दिवसापूर्वी समर्पयामीचे दहा शिलेदार याच दिंडीगड सायकल सफरीवर जाऊन आले होते. त्यांचे फोटो पाहिल्यावर आपण ही राईड नक्कीच करायची हे आझाद पंछी सदस्यांना वाटतच होते आणि त्याला मूर्तरूप चिरागने दिले होते. 

कालच खास निलेश शिंदेच्या समवेत घोडबंदर फाउंटन हॉटेल राईड केली होती. तेव्हाच चिरागने आजच्या राईडचे शिक्कामोर्तब केले होते.

दादरवरून सकाळी  पाच वाजता, ब्रम्हमुहूर्तावर  राईड सुरू झाली होती. रात्री पाऊस पडून गेला होता, त्यामुळे रस्ता ओलसर होता. अतिशय आल्हाददायक आणि अंमळ शांतनिवांत वातावरण होते.  सुंदर गुलाबी वारे सुटले होते. विजयची साथ असली की सायकलिंग साठी एक रिदम असतो. कधी तो पुढे कधी मी पुढे, अशी जुगलबंदी आम्हा दोघांत चालली होती. एका विशिष्ट वेगाने आम्ही सायकलिंग करत होतो. 

सायन रुग्णालयाजवळ अद्ययावत शौचालय दिसले. खास महिलांसाठी  शौचालय आहे हे वाचून खूप आनंद झाला.

पूर्व द्रुतगती महामार्गावरून विक्रोळी उड्डाणपुलावर पोहीचलो आणि सूर्यनारायणाची प्रभा, तांबूस सोनेरी रंग उधळत नभांगणात अवतीर्ण झाली होती. 

जसे की,  भास्कराच्या आगमनाची दवंडी पिटत होती. ह्या सोनेरी रंगाचा मुकुट रुपेरी ढगांनी परिधान केला होता. रस्त्याच्या एका बाजूला हिरव्यागार झाडांना झाकून टाकणाऱ्या जाळीदार वेली आणि दुसऱ्या बाजूला  मऊ मुलायम  गवताचा  हिरव्या रंगाचा घनदाट गालिचा  पसरला होता.  सकाळ सकाळीच पाखरांची इकडून तिकडे उडण्याची लगबग आणि किलबिल निसर्गाच्या मनमोहक रंगांना संगीताचा साज चढवत होता.

खरोखरच... निसर्गाचे हे विराट रूप पाहताना हरखून जायला होते. जाणीव होते,  "देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी". निसर्गाच्या या विश्वात रममाण झाल्यावर सायकलिंग म्हणजे आनंदाचा झोका असतो. तेथे दमछाकीला थारा नसतो

तासाभरातच सकाळी सहा वाजता मुलुंड चेक नाक्यावर पोहोचलो. विजय सोबत आज पंचवीस किमीची भन्नाट सायकलिंग झाली होती. 

विजयने आजच्या राईडसाठी ऑफिसमधून सुट्टी घेतली होती. त्याची सुट्टी घेण्याची कल्पना एकदम फर्मास होती.  आम्ही मुलुंडला हायड्रेशन ब्रेक घेतला तेव्हा विजयने आपल्या साहेबाला,  'मी आज रजेवर आहे'  हे  सांगितले. 

आता भूक लागली होती. विजयने फर्मास साजूक तुपाचा शिरा बनवून आणला होता. टोलनाक्या जवळील बाकड्यावर बसून शिरा फस्त केला. चिराग इतर सदस्यांबरोबर  साडेसहा वाजता तीन हात नाक्यावर येणार होता, त्यामुळे पंधरा मिनिटात  पुढची राईड सुरू केली.

टोल नाका पार करण्याअगोदरच सायकलच्या मागच्या चाकातून खर्र खर्र आवाज येऊ लागला. मी सायकलला ओढतोय असे जाणवले. सायकल थांबवून मागचे चाक फिरवले तर ते वेडेवाकडे फिरत होते. तारा तपासल्या. चार पाच तारा तुटल्याचे लक्षात आले. तातडीने मयुरेश आणि आदित्यला फोन लावले. त्यांचे फोन लागले नाहीत. मग हिरेनला फोन लावला. त्याने सायकल येऊरला घेऊन यायला सांगितले. 

बऱ्याच तारा तुटल्यामुळे अतीशय सावधगिरीने आणि संथगतीने ठाण्याकडे निघालो. तीन हात नाक्यावर पोहोचायला दहा मिनिटे उशीर झाला. तेथे चिराग, प्रशांत, अतुल, प्रिन्स यांची भेट झाली. तेवढ्यात राजेशचा फोन आला, पावणे सात वाजता तो खारेगाव टोल प्लाझाला उभा राहणार होता.

सायकलचे काम केल्याशिवाय मला दिंडीगडला जाणे शक्य नव्हते. अतुलने फोनाफोनीला सुरुवात केली. यशवंत जाधव माझ्यासाठी सायकल घेऊन यायला तयार झाले. अतुलने आणखी एका मित्राला फोन केला. इतक्यात काका उर्फ आदित्य देवासारखा हजर झाला. आदित्य म्हणजे सर्व अडचणीचे उपाय असणारा सायकलचा डॉक्टर आहे. त्याने सायकलची अवस्था पाहिली आणि हिरेनला फोन करून एक स्टँड बाय चाक आणायला सांगितले.

इतक्यात यशवंत जाधव यांचे सुद्धा आगमन झाले. चिराग, प्रशांत आणि प्रिन्सला डॉ राजेशच्या भेटीला खारेगाव टोल नाक्याकडे पाठवले.  सायकलचे चाक रिपेअर करून मी, विजय आणि अतुल त्यांना जॉईन होणार होतो. वर्तकनगर जवळ हिरेन स्टँडबाय चाक घेऊन आला. आदित्यने ताबडतोब चाक बदलले आणि सायकल तयार झाली. 

आता आदित्य काका, यशवंत जाधव सुद्धा दिंडीगड राईडला तयार झाले. आदित्य येतोय याचा सर्वात जास्त आनंद मला झाला. अतुलने सर्वांसाठी केळी घेतली. अतुल, राजेश, प्रशांत आणि प्रिन्स टोल नाक्यावरून पुढे निघाले होते. माझ्यासह विजय आणि यशवंतने सायकलिंग सुरू केली. कॅडबरी जंक्शन जवळ अतुल आणि आदित्य; सिद्धार्थ  येणार म्हणून त्याची वाट पाहत थांबले.

 खारेगाव टोल नाका पार करून अंजुर फाट्याकडून पाईप लाईनच्या आत आम्ही शिरलो. येथून सोनाले फाट्यापर्यंत सोळा किमी राईड करायची होती. पाईप लाईनचा रस्ता जणू काही आम्हा सायकलिस्ट साठीच मोकळा होता. दोन्ही बाजूला पाण्याचे भलेमोठे पाईप आणि मध्ये छोटा रस्ता.  पाईपच्या पायथ्याला हिरवी खुरटी गवताळ झाडे वाऱ्यावर डोलत होती. ओवाळे फाट्याजवळ मागून येणारे आदित्य, अतुल आणि सिध्दार्थ यांची भेट झाली. 

अजून दहा किमी राईड करायची होती.  आम्ही सहाजण भराभर पेडलिंग करत सोनाळे गावाकडे निघालो. या पाईप लाईनच्या उजव्या बाजूला मुंबई नाशिक हायवे आहे, तर डाव्या बाजूला मोठी मोठी वेअर हाऊसेस आहेत. इथल्या स्थानिक लोकांनी आपल्या जमिनी मोठ्या मोठ्या कंपन्यांना विकून ह्या या वेअर हाऊसेसची निर्मिती केली आहे. हा सर्व परिसर ड्रायपोर्ट म्हणूनच आता उदयाला आला आहे. 

पुन्हा आम्ही सर्व पाईपलाईन मधून मार्गक्रमण करू लागलो. या पाईप लाइनचे एक वैशिष्ट्य आहे. त्या अजस्त्र पाईप कडून दूरवर पाहिलं की दोन्ही पाईप एकमेकांना मिळाल्याचे दिसतात आणि मधला रस्ता नाहीसा होतो. हे तर मृगजळासारखे असते. एक सुसाट अनुभव गाठीला आला होता. आदित्य आज जॉईन झाल्यामुळे आजची सफर भन्नाट आणि जबरदस्त होणार याची मला खात्री झाली होती. 
मुंबई महापालिका या पाईपचा अतिशय चांगला मेंटेनन्स ठेवते. त्यामुळे जागोजागी पाईपच्या रंगरंगोटीची खबरदारी घेतलेली दिसत होती. तसेच या रस्त्यात कुठेही अतिक्रमण झालेले नव्हते.

साडेनऊ वाजता  आम्ही सोनाळे फाट्यावर पोहोचलो  वाटेत राजेश आम्हाला रिसिव्ह करायला सायकलिंग करत आला होता. राजेशने वजन खूपच कमी केले आहे. सोनाळे फाट्यावर गरमागरम वडापाव आणि अतुलने आणलेली केळी हादडली. 

 सोनाळे गावात लोकवस्तीपेक्षा कारखानेच दिसत होते. आदित्य काकाने दिंडीगड चढताना काय काय काळजी घ्यायची याची सविस्तर माहिती सर्वांना दिली.

काका म्हणाला, 'काही ठिकाणी एक बाय एक गियर सुद्धा जास्त वाटेल, त्यामुळे दोघांमध्ये योग्य अंतर ठेवा, चिंचोळा रस्ता आणि अतिशय उंच चढाई असल्यामुळे झिकझाक सायकल चालावा. एखाद्याला थांबायचे असेल तर रस्त्याच्या किनाऱ्याला थांबा. मागून येणाऱ्याला वाट द्या'.

 सोनाळे गावातून दिडेश्वर महादेव मंदिर फाट्यावरून उंच चढाई सुरू झाली. तीन किमी चढाई होती. आदित्य, राजेश, चिराग, प्रिन्स पुढे सरकले. माझ्या सोबत विजय, अतुल, यशवंत, प्रशांत आणि सिद्धार्थ अतिशय धीम्या गतीने चढाई करत होतो. थोड्याच वेळात अतुल सायकल ढकलायला लागला.  माझ्या मागोमाग विजय अतिशय आत्मविश्वासाने घाट चढत होता. दहा वाजून गेल्यामुळे सूर्याचा पारा चढला होता. पंधरा वीस मिनिटातच मी नाका ऐवजी तोंडाने श्वास घ्यायला सुरुवात केली. आता हायड्रेशन ब्रेक घेणे गरजेचे होते. 
 

माझ्या पुढे  यशवंत, प्रशांत आणि सिद्धार्थ होते. पाऊण तासातच त्यांची दमछाक झाली. हळूहळू पुढे सरकताना, यशवंत म्हणाला, 'तुम्ही व्हा पुढे, आम्ही थांबतो इथेच'.

जवळपास पाऊण घाट चढून गेलो होतो.  एका झाडाखाली पाणी प्यायला थांबलो. पाच मिनिटे विश्रांती घेऊन सायकलला पेडल मारायचा प्रयत्न केला, परंतु तो पॅच एकदम स्टीफ होता. त्यामुळे सायकल ढकलतच तो चढ चढावा लागला. पुढे थोडा प्लेन रस्ता आल्यावर पुन्हा पेडलिंग सुरू केले. शेवटचा शंभर फुटाचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा होता. तसेच पावसामुळे तेथे शेवाळ जमलेले होते. तो  पॅच पुन्हा सायकल ढकलत चढावा लागला. 

आदित्य आणि चिराग पुन्हा खाली गेले आणि यशवंत,  प्रशांत, विजय यांना ऊर्जा देऊन, त्यांना सुद्धा वर घेऊन आले. जवळपास दीड तास लागला संपूर्ण चढ पार करायला. आदित्य आणि चिरागची कमाल होती.  कोणालाही गिव्ह अप करू दिलं नाही. आदित्यच एकच म्हणणं होतं. वरून दिसणारा अप्रतिम निसर्ग तुम्हाला खालून दिसणार नाही. थोडे आणखी परिश्रम घ्या आणि निसर्गाचा आनंद लुटा. 

मंदिराच्या पायथ्याला सर्व सायकली लॉक करून शेवटचा पाचशे फुटाचा ट्रेक सुरू केला.  एका उंच टेकाडावर दिंडीगड महादेवाचे मंदीर होते. ओम नमः शिवाय चा घोष सुरू होता. अतिशय पवित्र वातावरणात, निसर्गाचा हिरवागार आविष्कार पाहताना मन अतिशय उल्हसित झाले. चढाचा थकवा क्षणात नाहीसा झाला. चिरागच्या प्रयत्नांना मूर्त रूप मिळाले होते.

आजच्या सायकल सहलीची गम्मत एक होती. सुरुवातीला फक्त पाच सदस्य होते, परंतु ऐनवेळी दहा सदस्य झाले होते. आजच्या  नेतृत्वाचा झेंडा आदित्यच्या साथीने चिरागच्या खांद्यावर होता. त्याने समर्थपणे तो पेलला होता. डॉ राजेशने त्याला स्पेशल थँक्स दिले.  देवदर्शन झाले, आता निसर्ग दर्शन होते. राजेशने कल्याण परिसर आणि डोंबिवली परिसर दाखवला. दोन्ही बाजूंनी जाणारी पाईप लाईन पहिली.  त्या मध्ये ठाणे खाडीचा तयार झालेला पाचूचा हार पहिला. 


त्यातून जाणारी रेल्वे लाईन आणि गर्द हिरवाई, जसेकाही एखाद्या विमानातूनच आमचे निसर्गदर्शन सुरू होते.

आकाशाची अथांग गहिरी निळाई, शुभ्र ढगांच्या पक्ष्यांचा विहार, तजेलदार हिरवीगार झाडे, पायवाटे जवळची हिरवट पोपटी झुडुपे, त्यात हळूच डोकावणारी नाजूक लहानशी पिवळी तृण फुले वाऱ्यावर डोलताना डोळ्यांना सुखावत होती. मंद वाऱ्यासोबत हिरव्यागार पानांची हळुवार चाललेली कुजबुज कानी येत होती. 

ती मंद सुरावट मन आनंदित करत होती. झाडांच्या हिरव्या रंगाचा ओला दर्प नाकाला जाणवत होता . वातावरणातील हिरवाई डोळे, नाक, कान याद्वारे मनाला आनंद देत होती. आजूबाजूला बागडणारी असंख्य फुलपाखरे निसर्गाचा आनंद आणि  जिवंतपणा साजरा करीत होती. एकमेकांच्या पंखाला पंख लावून या फुलावरून त्या फुलावर त्याचे विहरणे मला बालपणात घेऊन गेले.

फुलपाखरू  छान किती दिसते,  फुलपाखरू ।।

या वेलीवर फुलांबरोबर

गोड किती हसते फुलपाखरू ।।

पंख चिमुकले निळे जांभळे

हालवुनी झुलते फुलपाखरू ।।

डोळे बारिक करिती लुकलुक

गोल मणी जणु ते फुलपाखरू ।।

मी धरू जाता येइ न हाता

दूरच ते उडतें फुलपाखरू ।।

निसर्गाचा मनोरम नजारा मनाच्या गाभाऱ्यात ठासून भरला. 

आता परतीची राईड सुरू झाली. पायथ्याला आलो. सर्वांना भूक लागली होती. खाली एका दुकानाजवळ थांबलो. अमूल दूध आणि मिठाईवर ताव मारला. 

काका आणि राजेशला महत्वाचे काम असल्यामुळे दोघे तातडीने ठाण्याकडे  निघाले. आता आम्ही कल्याण ठाणे हायवे वरूनच परतीची सफर सुरू केली. उन्हाचा पारा चढला होता. तसेच गाड्या, ट्रेलर यांची उदंड रहदारी सायकलचा वेग सीमित करत होती. 

ठाणे गाठण्यासाठी दोन ठिकाणी हायड्रेशन ब्रेक घेतला. दुपारचे अडीच वाजले ठाण्यात पोहोचायला. येथून चिराग, प्रशांत, यशवंत, प्रिन्स आणि सिद्धार्थ ठाण्यातच राहत असल्यामुळे जेवायला घरी जाणार होते. परंतु अतुल, विजय आणि मला आणखी तीस किमी राईड करायची होती. त्यामुळे माजीवडे जंक्शन जवळ दुर्गा हॉटेल मधून पार्सल दालखीचडी घेऊन हॉटेलच्या पायरीवर बसून जेवलो. 

जेवण झाल्यावर अतुल घोडबंदर मार्गे गोरेगावकडे निघाला, तर मी आणि विजय पूर्व द्रुतगती महामार्गावरून मुंबईकडे निघालो.  दुपारचे ऊन आणि पोटातले जेवण यामुळे अतिशय धीम्या गतीने आम्ही सायकलिंग सुरू केले. सायंकाळी पाच वाजता सुखरूप घरी पोहोचलो. आज 105 किमी राईड झाली होती.

आजच्या सायकलिंग मध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे आदित्य आणि चिरागने गृपमध्ये मोटिव्हेशनचे काम केले, त्यामुळेच सर्वजण दिंडीगड टॉपला पोहोचू शकले.
दिंडीगड सायकल राईड हा माईंड गेम होता

आझाद पंछी....

Friday, July 24, 2020

मनाली-लेह-खारदुंगला सायकलिंग (दिवस पहिला)


*सोलांग व्हॅली*
०८.०७.२०१९

आज सकाळी साडेसात वाजता मनाली जवळच्या  15 माईल्स येथील युथ हॉस्टेल बेस कॅम्प मध्ये प्रवेश केला. गेल्याच वर्षी सायकलिंग सुरू केले आणि  आज मनाली लेह सायकलिंग करण्याची शारीरिक आणि मानसिक तयारी करून कॅम्प मध्ये दाखल झालो होतो. यामधे समर्पयामि ग्रुपचा सर्वात मोठा वाटा आहे. मधल्या काळात झालेले वेगवेगळे सायकलिंग ट्रेल, माथेरान, कसारा घाट,  जुन्नर माळशेज घाट आणि खंडाळा घाट सायकलिंग,  हिमालयन जालोरी पास सायकलिंग तसेच पंढरपूर सायकल वारी, या सर्व सायकल सफरीमुळे मनाली ते लेह  सायकलिंगसाठी प्रचंड मनशक्ती ऊर्जा प्राप्त झाली होती.



बेस कॅम्पचा पहिला दिवस  विश्रांतीचा होता.  अतिशय निसर्गरम्य परिसर होता बेस कॅम्पचा. मागे हिमालयाच्या हिरव्यागार पर्वत रांगा होत्या. कॅम्पच्या बाजूने बियास नदी वाहत होती. नदीच्या बाजूलाच हिरवळीवर तंबू ठोकण्यात आले होते. एक तंबू दहा सदस्यांना देण्यात आला होता. आजूबाजूला सफरचंदाची झाडे बहरली होती. सिमेंटच्या जंगलापासून दूर निसर्गात राहण्याचा अनुभव रोमांचकारी होता.


विश्रांतीचा दिवस असल्यामुळे लक्ष्मण नवले, ब्रिजेश सिंग आणि भरत दळवी यांच्या सोबत सोलांग व्हॅली पाहण्याचे ठरविले. कॅम्पमध्ये सकाळचा ब्रेकफास्ट घेऊन आम्ही मेनरोड वरील स्पॅन हॉटेल जवळ मनाली बस पकडली. बसमध्ये एक वयस्क तिबेटीयन महिला पुढील सीटवर बसली होती. तिच्या बाजूला बसायला जागा मिळाली. साधारण 80 वर्ष वय असावे तिचे. हातातील जपमाळेचे मणी ओढत मंत्र म्हणत होती. तिच्या परवानगीने मी तिच्यासह सेल्फी काढला. 

तेव्हढ्यात एक रुबाबदार व्यक्ती बस मध्ये चढली. "कुठे निघालात तुम्ही" या त्याच्या मराठीतून विचारलेल्या प्रश्नाने मी आश्चर्य चकित झालो. मी मुंबईकर, पार्ल्याचा डोंगरे, या ठिकाणी मनाली नगरपलिकेसाठी घन कचरा व्यवस्थापनाचे प्रोजेक्ट् राबवतो, डोंगरेने सांगितले. मनालीमध्ये दररोज एक टन प्लास्टिक बॉटलचा कचरा निर्माण होतो  त्याची विल्हेवाट लावण्यासाठी   मनाली शहराच्या जवळच रांगडी येथे थर्मल प्लांट उभारला आहे. ह्या प्लांटचे वैशिट्य की याचे प्रदूषण शून्य टक्के आहे. 1400 सेंटिग्रेडला हा कचरा जाळला जातो. एक मराठी माणूस पर्यावरणावर प्रचंड काम करतो आहे हे पाहून खूप बरं वाटलं.

मनाली बस स्टँडला उतरून सोलांगला जाणाऱ्या बसची चौकशी केली. ती बस दुपारी दीड वाजता होती, म्हणून आम्ही चौघांनी टॅक्सीने सोलांगला जाण्याचे नक्की केले.  बाराशे रुपयात अन्नू ड्रायव्हर तयार झाला. मनाली पासून साधारण चौदा किमी वर सोलांग व्हॅली आहे.

रस्त्याच्या डाव्या बाजूने बियास नदी खळखळाट करत वाहत होती. थोडे अंतर गेल्यावर सीबीएस  शाळा लागली त्या शाळेजवळच मोठी संरक्षक बांधली होती.  बियास नदीला पूर आला तरी शाळेला आणि रस्त्याला कोणतीही हानी होऊ नये या साठी ही संरक्षक भिंत उभारली आहे.  ह्या भिंतीवरून समोरील व्हॅलीचे खूप फोटो काढले. 


पाच किमीवर पाण्याचे नेहरूकुंड लागले. अतिशय थंडगार आणि मिनरल पाण्याचा वाहणारा झरा होता. जवळील बाटल्या पाण्याने भरून घेतल्या तसेच ओंजळीने मनसोक्त पाणी प्यालो.

गाडीत ड्रायव्हर अन्नूची बडबड चालूच होती. येथील घोडेवाले, गाडीवाले, BMX  बाईकवाले तसेच पॅराग्लायडिंग करणारे टुरिस्टना कसे फसवतात याचे किस्से सांगत होता. टुरिस्ट बरोबर सचोटीने वागत नसल्यामुळे बियास नदीला खूप मोठी बाढ येणार असे छातीठोकपणे अन्नू सांगत होता. खरंतर त्याच्या मनातील भडास तो बाहेर काढत होता.

सोलांग टुरिस्ट स्पॉटवर पोहोचल्यावर समोरच पॅराग्लायडिंग सेंटर होते. सर्वात मोठ्या  पॅराग्लायडिंगसाठी गंडोलाने दोन हजार फूट उंचीवर नेत होते.  तेथून साधारण पंधरा मिनिटे आकाशात विहार करून खाली व्हॅलीमध्ये लँडिंग करत होते. अन्नूने सांगितल्या प्रमाणे आम्ही हिमालय डोंगरात दोन किमी अंतरावर असलेल्या अंजनी महादेव मंदिर आणि धबधबा यांना भेट द्यायचे ठरविले. ब्रिजेश ट्रेकिंग करायचे टाळत होता तरी त्याला आम्ही घेऊन गेलो.

सर्वत्र हिरवळ पसरली होती. बाजूने  BMX टॉय जीप टुरिस्टना घेऊन मंदिराकडे चालल्या होत्या.  काही जण पायीसुद्धा चालले होते. अर्ध्या तासातच अंजनी महादेव मंदिराकडे पोहोचलो.

एका भल्यामोठ्या चौथऱ्यावर विशाल शिवलिंग होते आणि  डोंगराच्या उंच कपारीतून प्रचंड पाण्याचा धबधबा त्या शिवलिंगावर पडत होता. त्याचे थंडगार तुषार आसमंतात पसरले होते. या तुषारांमुळे मन उल्हासित झाले.  

समोरच्या हिरव्यागार टेकडी वरून पाण्याचा पांढराशुभ्र  ओढा खाली वाहत होता. निळ्याभोर नभातील शुभ्र ढगांची प्रतिमाच जलधारा होऊन सुरूंच्या डोंगरातून खाली कोसळत होती. तो पांढराशुभ्र जलप्रपात हिरव्या  धरणीवर कोसळताना खळखळत वाहणारे पाणी  आसमंतात अवखळ नाद निर्माण करत होते.


आसमंती निळ्या निळ्या
धवल पहा या मेघमाला

हिरव्या गर्द पाचू राशी
हिऱ्यामोत्याची त्यावर नक्षी 

जल प्रपात अति अधिर
अलींगनास ते भूशीर

रम्य निसर्ग हा मनोहारी
किमयाच  आहे ही भारी

उन्हाळातल्या  ऊन झळांनी
तप्त जाहले सगळे डोंगर

पावसातल्या  टपोर थेंबानी
शांत कसे ते झाले सत्वर

मऊ मखमली हिरव्या शाली
डोंगर माथी  लेवून सजली 

पायवाटांची  साद हळुवार
त्यास देऊनी प्रतिसाद सत्वर

घेतली बळे ही धाव पहा
आनंद सभोवार अहा अहा !!!

सोलांग व्हॅलीचा मनमुराद आस्वाद घेत, आनंदाच्या जल तुषारांवर तरंगतच बेस कॅम्पकडे परतलो.

सतीश विष्णू जाधव