Friday, July 24, 2020

मनाली-लेह-खारदुंगला सायकलिंग (दिवस पहिला)


*सोलांग व्हॅली*
०८.०७.२०१९

आज सकाळी साडेसात वाजता मनाली जवळच्या  15 माईल्स येथील युथ हॉस्टेल बेस कॅम्प मध्ये प्रवेश केला. गेल्याच वर्षी सायकलिंग सुरू केले आणि  आज मनाली लेह सायकलिंग करण्याची शारीरिक आणि मानसिक तयारी करून कॅम्प मध्ये दाखल झालो होतो. यामधे समर्पयामि ग्रुपचा सर्वात मोठा वाटा आहे. मधल्या काळात झालेले वेगवेगळे सायकलिंग ट्रेल, माथेरान, कसारा घाट,  जुन्नर माळशेज घाट आणि खंडाळा घाट सायकलिंग,  हिमालयन जालोरी पास सायकलिंग तसेच पंढरपूर सायकल वारी, या सर्व सायकल सफरीमुळे मनाली ते लेह  सायकलिंगसाठी प्रचंड मनशक्ती ऊर्जा प्राप्त झाली होती.



बेस कॅम्पचा पहिला दिवस  विश्रांतीचा होता.  अतिशय निसर्गरम्य परिसर होता बेस कॅम्पचा. मागे हिमालयाच्या हिरव्यागार पर्वत रांगा होत्या. कॅम्पच्या बाजूने बियास नदी वाहत होती. नदीच्या बाजूलाच हिरवळीवर तंबू ठोकण्यात आले होते. एक तंबू दहा सदस्यांना देण्यात आला होता. आजूबाजूला सफरचंदाची झाडे बहरली होती. सिमेंटच्या जंगलापासून दूर निसर्गात राहण्याचा अनुभव रोमांचकारी होता.


विश्रांतीचा दिवस असल्यामुळे लक्ष्मण नवले, ब्रिजेश सिंग आणि भरत दळवी यांच्या सोबत सोलांग व्हॅली पाहण्याचे ठरविले. कॅम्पमध्ये सकाळचा ब्रेकफास्ट घेऊन आम्ही मेनरोड वरील स्पॅन हॉटेल जवळ मनाली बस पकडली. बसमध्ये एक वयस्क तिबेटीयन महिला पुढील सीटवर बसली होती. तिच्या बाजूला बसायला जागा मिळाली. साधारण 80 वर्ष वय असावे तिचे. हातातील जपमाळेचे मणी ओढत मंत्र म्हणत होती. तिच्या परवानगीने मी तिच्यासह सेल्फी काढला. 

तेव्हढ्यात एक रुबाबदार व्यक्ती बस मध्ये चढली. "कुठे निघालात तुम्ही" या त्याच्या मराठीतून विचारलेल्या प्रश्नाने मी आश्चर्य चकित झालो. मी मुंबईकर, पार्ल्याचा डोंगरे, या ठिकाणी मनाली नगरपलिकेसाठी घन कचरा व्यवस्थापनाचे प्रोजेक्ट् राबवतो, डोंगरेने सांगितले. मनालीमध्ये दररोज एक टन प्लास्टिक बॉटलचा कचरा निर्माण होतो  त्याची विल्हेवाट लावण्यासाठी   मनाली शहराच्या जवळच रांगडी येथे थर्मल प्लांट उभारला आहे. ह्या प्लांटचे वैशिट्य की याचे प्रदूषण शून्य टक्के आहे. 1400 सेंटिग्रेडला हा कचरा जाळला जातो. एक मराठी माणूस पर्यावरणावर प्रचंड काम करतो आहे हे पाहून खूप बरं वाटलं.

मनाली बस स्टँडला उतरून सोलांगला जाणाऱ्या बसची चौकशी केली. ती बस दुपारी दीड वाजता होती, म्हणून आम्ही चौघांनी टॅक्सीने सोलांगला जाण्याचे नक्की केले.  बाराशे रुपयात अन्नू ड्रायव्हर तयार झाला. मनाली पासून साधारण चौदा किमी वर सोलांग व्हॅली आहे.

रस्त्याच्या डाव्या बाजूने बियास नदी खळखळाट करत वाहत होती. थोडे अंतर गेल्यावर सीबीएस  शाळा लागली त्या शाळेजवळच मोठी संरक्षक बांधली होती.  बियास नदीला पूर आला तरी शाळेला आणि रस्त्याला कोणतीही हानी होऊ नये या साठी ही संरक्षक भिंत उभारली आहे.  ह्या भिंतीवरून समोरील व्हॅलीचे खूप फोटो काढले. 


पाच किमीवर पाण्याचे नेहरूकुंड लागले. अतिशय थंडगार आणि मिनरल पाण्याचा वाहणारा झरा होता. जवळील बाटल्या पाण्याने भरून घेतल्या तसेच ओंजळीने मनसोक्त पाणी प्यालो.

गाडीत ड्रायव्हर अन्नूची बडबड चालूच होती. येथील घोडेवाले, गाडीवाले, BMX  बाईकवाले तसेच पॅराग्लायडिंग करणारे टुरिस्टना कसे फसवतात याचे किस्से सांगत होता. टुरिस्ट बरोबर सचोटीने वागत नसल्यामुळे बियास नदीला खूप मोठी बाढ येणार असे छातीठोकपणे अन्नू सांगत होता. खरंतर त्याच्या मनातील भडास तो बाहेर काढत होता.

सोलांग टुरिस्ट स्पॉटवर पोहोचल्यावर समोरच पॅराग्लायडिंग सेंटर होते. सर्वात मोठ्या  पॅराग्लायडिंगसाठी गंडोलाने दोन हजार फूट उंचीवर नेत होते.  तेथून साधारण पंधरा मिनिटे आकाशात विहार करून खाली व्हॅलीमध्ये लँडिंग करत होते. अन्नूने सांगितल्या प्रमाणे आम्ही हिमालय डोंगरात दोन किमी अंतरावर असलेल्या अंजनी महादेव मंदिर आणि धबधबा यांना भेट द्यायचे ठरविले. ब्रिजेश ट्रेकिंग करायचे टाळत होता तरी त्याला आम्ही घेऊन गेलो.

सर्वत्र हिरवळ पसरली होती. बाजूने  BMX टॉय जीप टुरिस्टना घेऊन मंदिराकडे चालल्या होत्या.  काही जण पायीसुद्धा चालले होते. अर्ध्या तासातच अंजनी महादेव मंदिराकडे पोहोचलो.

एका भल्यामोठ्या चौथऱ्यावर विशाल शिवलिंग होते आणि  डोंगराच्या उंच कपारीतून प्रचंड पाण्याचा धबधबा त्या शिवलिंगावर पडत होता. त्याचे थंडगार तुषार आसमंतात पसरले होते. या तुषारांमुळे मन उल्हासित झाले.  

समोरच्या हिरव्यागार टेकडी वरून पाण्याचा पांढराशुभ्र  ओढा खाली वाहत होता. निळ्याभोर नभातील शुभ्र ढगांची प्रतिमाच जलधारा होऊन सुरूंच्या डोंगरातून खाली कोसळत होती. तो पांढराशुभ्र जलप्रपात हिरव्या  धरणीवर कोसळताना खळखळत वाहणारे पाणी  आसमंतात अवखळ नाद निर्माण करत होते.


आसमंती निळ्या निळ्या
धवल पहा या मेघमाला

हिरव्या गर्द पाचू राशी
हिऱ्यामोत्याची त्यावर नक्षी 

जल प्रपात अति अधिर
अलींगनास ते भूशीर

रम्य निसर्ग हा मनोहारी
किमयाच  आहे ही भारी

उन्हाळातल्या  ऊन झळांनी
तप्त जाहले सगळे डोंगर

पावसातल्या  टपोर थेंबानी
शांत कसे ते झाले सत्वर

मऊ मखमली हिरव्या शाली
डोंगर माथी  लेवून सजली 

पायवाटांची  साद हळुवार
त्यास देऊनी प्रतिसाद सत्वर

घेतली बळे ही धाव पहा
आनंद सभोवार अहा अहा !!!

सोलांग व्हॅलीचा मनमुराद आस्वाद घेत, आनंदाच्या जल तुषारांवर तरंगतच बेस कॅम्पकडे परतलो.

सतीश विष्णू जाधव

4 comments:

  1. मित्र संजय चे अभिप्राय,

    सतीश ! अप्रतिम निसर्ग वर्णन हे तुझ्या प्रवासी कथा कथनाचे वैशिष्ट्य आहे, त्यामुळे आपण ही तुझ्या सोबत प्रवास करीत आहोत असा आभास वाचकाला होतो हि ताकद तुझ्या लेखणीत आहे ती वंदनीय आहे.🙏

    ReplyDelete
  2. आपण केलेल्या निसर्गाचं वर्णन आणि त्याला प्रत्येदर्शी असलेली निसर्गाचे फोटो ते पाहून वाचता वाचता मी कधी मानली आणि सोलांग व्ह्याली ल कधी पोहचलो ते मला कळलेच नाही
    वाचता वाचता प्रसंगात हरवून जवा असा निसर्गाची जिवंत पण दाखवणारा आपला लेख खूप अप्रतिम आहे. लेख वाचून कधी कोरोना संपतो आही कधी मी मानली सहलीची तयारी करतो याची उत्सुकता लागली आहे

    खूप छान अप्रतिम अनुभव

    ReplyDelete
  3. खूप छान प्रतिसाद

    धन्यवाद हरेश

    ReplyDelete