Sunday, April 18, 2021

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस नववा) राज पिपाला ते ... अंकलेश्वर रामकुंड आश्रम

 नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस नववा)

राज पिपाला ते अंकलेश्वर रामकुंड आश्रम

  ०६.०१.२०२१

   
पहाटे पहाटे हरसिद्धी माता मंदिरातील कोबड्यांनी आरवण्याचा गजर सुरू केला. मंदिर परिसरातील सर्वांना पहाटेची चाहूल लागली होती. हल्ली कोंबड्यांचे आरवणे फक्त गावाकडे पाहायला मिळते. मंदिर परिसरात या कोंबड्यांसाठी खास बसण्याच्या जागा तयार केलेल्या आहेत. चौकशी अंती कळले हे मंदिर कोंबड्यांचे मंदिर म्हणूनच प्रसिद्ध आहे.

सकाळी मैंय्येची पूजाअर्चना करून पुन्हा एकदा हरसिद्धी मातेचे दर्शन घेतले. राजपिपाला मधील हे हरसिद्धी मातेचे मंदिर शक्तीपीठ म्हणून प्रसिद्ध आहे.                                                

पुढील परिक्रमेचा आरंभ झाला. सकाळच्या तुरळक रहादारीमुळे तसेच आल्हाददायक वातावरणामुळे पेडलींगला नवा जोश मिळाला होता. तासाभरात हायवे वरील धारिखेडा गावात पोहोचलो. सूर्यनारायण आसमंतात आपल्या सात पांढऱ्या शुभ्र अश्वांच्या रथातून पूर्वेकडून दौडत येत होते.

रथाचा सारथी अरुण अश्वांच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवत संयत गतीने गगन भ्रमण करीत होता.                                                                         "आरोग्यं भास्करात् इच्छेत्" -  म्हणजे सूर्याकडून आरोग्याची कामना करावी असे शास्त्रवचन आहे... या वचनाला स्मरून आदित्य महाराजांना नमन केले. पोटपूजेसाठी धारिखेड्याच्या नर्मदा साखर कारखान्याजवळ सद्गुरू स्नॅक्सबारकडे थांबलो. सकाळी न्याहारी तयार नसल्यामुळे पापडी, कुरमुरे भेळ आणि शंकरपाळी हा बालभोग केला. सोबत फक्कड चहाचा आस्वाद घेतला.                                     आणखी तासाभराच्या राईडनंतर सारसा गावात थांबलो.  केळी खात असताना, येथे छोटे उस्ताद सायकल स्वार भेटले. गियरवाल्या सायकलबद्दलचे कुतूहल त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. "सायकल चालवायची आहे काय" हे विचारताच तो आनंदाने लाजला. थोडा वेळ आमच्या बरोबर सायकलिंग केली. त्याला प्रोत्साहन म्हणून, आमच्या पुढे त्याची सायकल ठेवली होती. खूप खुश झाला तो बालक. त्याला टाटा करून पुढे निघालो.                                          तासाभरात नावावीधा गावात पोहोचलो. रस्त्याला कडेला बरेच तंबू लागत होते. कोवळे कोवळे  हुरड्याचे कोंब वाळूत भाजण्याचे काम सुरू होते. दिनेश भाईच्या स्टॉलवर थांबलो. येथे हुरड्याला "पोंग" म्हणतात. गरमागरम भाजलेला हुरडा त्यावर रतलामी शेव आणि चाट मसाला... त्यावर लिंबू पिळलेले... नुसत्या वासानेच तोंडाला पाणी सुटले होते... हुरडा म्हणजे इन्स्टंट एनर्जी... खूप वर्षांनी हुरडा पार्टीचा स्वाद... तो ही नर्मदा परिक्रमेमध्ये... हे तर मैय्याने पूरविलेले लाडच होते... सोबत रात्रीच्या प्रसादासाठी एक प्लेट हुरडा बांधून  घेतला. 

झगरिया गावाजवळ हायवे सोडून मढीकडे निघालो. मढी येथे नर्मदा मैयेचा "रामघाट" प्रसिद्ध आहे.

नर्मदा मैय्येच्या विशाल रूपाचे दर्शन घेतले. बरेच भक्तगण, परिक्रमावासींच्या पूजा सुरू होत्या. रंगीबेरंगी कापड्यामधील महिला उपासक घाटाची शोभा वाढवीत होत्या. येथील  मंगलेश्वर मंदिरात श्रीरामजी, सितामैय्या आणि लक्ष्मण यांचे दर्शन घेतले. या मंदिरात अखंड रामधून "श्री राम जय राम जय जय राम" सुरू आहे. सन १९८७ पासून ३४ वर्ष दिवस रात्र रामधून सुरू आहे. एखादी गोष्ट सतत आणि अव्याहतपणे करणे,  यासाठी खरच आध्यत्मिक अनुष्ठान असावे लागते.

मोठं वडाचं झाड, त्यावर किलबिलणारे पक्षी, आजूबाजूला हिरवी टच्च शेती, शीतल वारे यामुळे मनपटलावर आनंदाचा बहर आला होता. तसेच नर्मदा मैंयेचे संथ वाहणे... म्हणजे जणूकाही अखंड चाललेल्या रामधूनमध्ये ती तल्लीन झाली आहे.

 थोडावेळ रामधून मध्ये मग्न झालो. सिध्दनाथ बाबांच्या आश्रमात दुपारच्या अन्नप्रसादीची व्यवस्था होती. दालचावल, सब्जी असा सुंदर बेत होता. बाबाजींनी प्रेमाने जेवुखाऊ घातलं. मैय्येच्या किनारी झाडांच्या गर्द वनराईमध्ये असलेला हा आश्रम मनाला आनंदमय शांतता देत होता. संथ वाहणारी नर्मदा आणि मढीचा आध्यात्मिक संवेदनांने भारावलेला हा परिसर मनास अतीव निस्तब्धता देत होता. 

     ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीतील ओवी मनात रुंजी घालू लागली....

  देशियेचेनि नागरपणें,  शांतु शृंगारातें जिणें ।

 तरी ओवीया होती लेणे,  साहित्यासी ।।

                                                                                            आश्रमाचे महंत जगदीशबापू रामचरणदास बाबांचे आशीर्वाद घेऊन पुढे निघालो. 

       पुन्हा झगरिया गावात आलो. या गावातील घराघरात पतंगीचा मांजा बनविण्याचे कारखाने सुरू होते.

गुजरात मध्ये मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव कार्यक्रम भरविला जातो.  या महोत्सवात देश विदेशातील पतंगप्रेमी भाग घेतात. या महोत्सवासाठीच  लाल,  पिवळा नारंगी रंगांचा मांजा बनविण्याचे काम सुरू होते. धाग्याला  रंग, फेविकॉल, ग्लू, काच यांचे कोटिंग दिले जाते. सायकलच्या रीम पासून मोठी फिरकी बनवून त्याला बनविलेला मांजा लपेटून ठेवतात. दोन दिवस उन्हात कडकडीत सुकविल्यावर तो मांजा छोट्या फिरकीत गुंडाळून विक्री साठी पाठविला जातो. या परंपरागत पतंग व्यवसायाला आता आंतरराष्ट्रीय ख्याती मिळत आहे.                                 अर्ध्या तासात गुमानदेव हनुमान मंदिरात पोहोचलो. बाजूलाच शिवमंदिर सुद्धा आहे. विशेष म्हणजे या मंदिराचा कळस म्हणजे एक शिवलिंग आहे.  येथे मारुतीरायाने शंकराची कठोर तपश्चर्या केली होती. गुमान याचा अर्थ अहंभाव, घमेंड... याचा नाश करणारे बाबा गुमानदेव हनुमान साक्षात रुपात येथे सदैव निवास करतात. हनुमंताच्या स्वयंभू मूर्तीच्या समोरच्या भागावर चांदीचा लेप लावलेला होता तर मागचा भागावर  शेंदुर लिंपण केले होते. मंदिर समोरून कुलूपबंद असल्यामुळे बाजूच्या खिडकीतून फोटो काढला. गळ्यात घातलेल्या रुईच्या पुष्पपानमालेवर चंदनाने राम राम लिहिलेले होते. 

       मंदिराच्या आतील भिंतींवर रामकथा चित्ररूपाने दाखविल्या होत्या. शबरीची बोरे ही कथा माझ्या खूप आवडीची...

निर्व्याज भक्तीची गोष्ट... देव भावाचा भुकेला असतो... त्यामुळेच भगवंताला शबरीची उष्टी बोरे अमृतासमान लागतात... आपल्या दैवताला जे द्यायचे ते उत्तम असले पाहिजे. त्यातील हिणकसपणा आपण काढून टाकला पाहिजे हाच संदेश उष्ट्या बोरातून मिळतो आणि म्हणूनच  उष्टी बोरे देणारी शबरी भावते. सर्वांना  द्यायचे ते उत्कृष्ट  असावे हाच प्रतीत होतो.                                              सातबारा" फाट्यावर पोहोचलो... हे गावचे नाव महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा जमिनीच्या सातबाऱ्याशी अतिशय जवळीक साधणारे...  त्यामुळे मनात हास्याची लकेर उठली. हा परिसर अंकलेश्वर जवळील इंडस्ट्रियल पट्टा आहे. येथे दुपारच्या वेळी रसरशीत कलिंगड खाण्याची एक वेगळीच मजा होती.  येथून अंकलेश्वर सहा किमी अंतरावर होते.                                                                 अंकलेश्वर येथील भिडभंज हनुमान मंदिरात पोहोचलो. बरेच नर्मदा परिक्रमवासी मंदिरात बसले होते.  येथे बालभोग चहाची व्यवस्था होती. येथून अर्धा किमी अंतरावर सुप्रसिद्ध रामकुंड आहे.

अंकलेश्वर येथील प्रसिद्ध आणि प्राचीन  रामकुंड तीर्थक्षेत्रावर पोहोचलो.

रावणाचा वध केल्यावर ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त होण्यासाठी  भारतातील प्रत्येक तिर्थक्षेत्रावर यज्ञ करण्याची आज्ञा गुरुवर्य वशिष्ठमुनी श्रीरामरायांना केली. अंकलेश्वर क्षेत्री आल्यावर सितामैय्याला तहान लागली. तेव्हा बाण मारून येथे नर्मदा मैय्येला रामाने अवतीर्ण केले आहे. सितामैय्याने जलपान केल्यावर येथे यज्ञ करण्याची इच्छा प्रकट केली.  रामाने शतचंडी यज्ञकरून घोर साधना केली. रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या तिर्थाला रामकुंड म्हणतात.  आजूबाजूचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. प्रत्येक परिक्रमावासी रामकुंडला आवर्जून भेट देतात.

रामकुंडाजवळच श्री रामानंददास बापू  महाराजांची धर्मशाळा आहे. गौशाळेत सायकल बांधून महंत गंगादास बापूंची भेट घेतली. बाजूच्या धर्मशाळेत निवासाची व्यवस्था झाली. सितामैय्या आणि श्रीरामाचे श्री राधाकृष्ण यांचे दर्शन घेतले.

दिवसा उजेडी अंकलेश्वर बाजारपेठेत फिरून ड्रायफ्रूट घ्यायचे ठरले. छुट्टा बाजारमधील जेनी चिक्कीवला यांच्याकडे जवळपास पन्नास प्रकारच्या चिक्क्या होत्या...

ड्रायफ्रूट चिक्की, मलाई चिक्की, पानबहार चिक्की यांचा स्वाद घेतला तसेच रात्रीच्या आरती प्रसादीसाठी खरेदी केल्या. 

रामकुंड धर्मशाळेत मोहनदास बाबांची भेट झाली. साडेतीन फूट उंचीचे बाबाजी आश्रमातील भोजनाची सर्व व्यवस्था सांभाळत होते.

जमानगर येथील आपली सर्व संपत्ती आप्तस्वकीयांना देऊन मोहनदासजी महाराजांनी रामसेवेसाठी  रामानंददास आश्रमात सर्व जीवन समर्पित केले आहे. 

धर्मशाळेत स्नानसंध्या करून नर्मदा मैंय्येची पूजा केली. सोबतचा हुरडा आणि चिक्की प्रसादी सर्व परिक्रमावासींना अर्पण केली. 

रात्रीची भोजन प्रसादी मोहनदासजी महाराज अतिशय प्रेमाने खाऊ घालत होते. रात्री थोडावेळ त्याच्याशी सत्संग केला.

मोरोपंतांची केकावली मनात तरळली...

सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो !

कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो!!

निरंतर सत्संग लाभो... सज्जनाचेंच भाषण माझ्या कानावर येवो..  मनाचा पापदोष झडून जावो... ऐहिक सुखोपभोगाची लालसा सर्वस्वी नष्ट होवो.

नर्मदा परिक्रमेचे हेच फलित असावे काय...


सतीश जाधव

मुक्त पाखरे ...



Sunday, April 11, 2021

कवी कुसुमाग्रज " यौवन"

यौवन... (तारुण्य)
*अशी हटाची अशी तटाची*

*उजाड भाषा हवी कशाला*

*स्वप्नांचे नवं गेंद गुलाबी*

*अजून फुलती तुझ्या उशाला.*


*अशीच असते यौवनयात्रा*

*शूल व्यथांचे उरी वहावे*

*जळत्या जखमा -- वरी स्मितांचे* 

*गुलाबपाणी शिंपित जावे.*

*जखमा द्याव्या जखमा घ्याव्या*

*पण रामायण कशास त्याचे*

*अटळ मुलाखत जशी अग्नीशी*

*कशास कीर्तन असे धुराचे.*

*उदयाद्रीवर लक्ष उद्यांची*

*पहाट मंथर जागत आहे*

*तुझ्यासाठीच लाख रवींचे*

*गर्भ सुखाने साहत आहे.*


*//कुसुमाग्रज//*

 *यौवन म्हणजे रसरसलेले तारुण्य, तरुण पिढी*

हे तरुणा!   अशी अरेरावीची (हटातटाची) भाषा का करतोस. यातून तुझी निराशा दिसतेय, जीवनाबद्दलची हताशा दिसतेय.

तुझ्या हाती तारुण्य आहे, तू नवनवीन स्वप्न पाहू शकतोस, धमक आहे तुझ्या मनगटात. जे हवे ते मिळविण्याची जिद्द ठेव.

जीवनप्रवास खूप खडतर आहे याची जाणीव ठेव. या दुःखांच्या वेदना उरात लपवून, कठोर परिश्रमाचे,  आनंदाचे गुलाबपाणी त्यावर शिंपड !!

या अपमानाच्या, मानहानीच्या जखमा कशाला कुरवाळत बसला आहे, त्याचे रामायण का करतो आहेस.

लक्षात ठेव ! जीवनाच्या या दाहकतेला तुला सामोरे जायचे आहे, मग अपयशाच्या अंध:काराची (धुराची) तमा का बाळगतो आहेस.

तुझ्या उज्ज्वल भवितव्यासाठी, भविष्यासाठी   उद्याचा दिवस  उजाडतो आहे, पहाट प्रकाशमान होतेय. त्या उंच पूर्वेच्या पर्वतातून (उदयाद्री-- सूर्य उगवणारा पर्वत) पहाटेच्या आशेचे किरण भूतलावर विराजत ( मंथर -- अंथरणे, पसरणे) आहेत.

तुझ्यासाठीच प्रचंड यशाच्या, सुखाच्या वाटा, या पहाटेच्या गर्भात लपलेल्या आहेत, वसलेल्या आहेत.

परिश्रमाच्या वाटेने पुढे पुढे जात रहा, तुझ्या आशाआकांक्षा पूर्ण होणार आहेत.

 तत्ववेत्यांनी मानवाच्या उत्क्रांती विषयी जी मते मांडली आहेत त्या मतांचा आशावादी आविष्कार कुसुमाग्रजांच्या या कवितेतून होतो.

सतीश जाधव
मुक्त पाखरे....

Saturday, April 10, 2021

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस आठवा)देडिया पाडा ते राज पिपाला... हरसिद्धी मंदिर ०५.०१.२०२१

  नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस आठवा)

 देडिया पाडा ते   राज पिपाला...

 हरसिद्धी मंदिर

 ०५.०१.२०२१

पहाटे रामधून ऐकून जाग आली. एक पायी परिक्रमावासी पहाटेच भजन आरती करत होता. लहानपणी गावाची आजी पहाटे पहाटे अशा प्रकारे देवपूजा करायची त्याची आठवण झाली.

मंगल भवन अमंगल हारी...

द्रवहु सुदसरथ अजिर बिहारी...

राम सियाराम सियाराम जय जय राम...

भजन तुम करलो परामानंदका ।

मौका मिले न बारंबार ।।

आनंद लेलो रे संतसंग का

मौका मिले न बारंबार

भरम मिट जायेगा तेरे मनका ।।

मौका मिले न बारंबार ।।

गुरू वचनो का पालन कर लो ।

मौका मिले न बारंबार ।।

पायी परिक्रमा करणाऱ्या मूर्ती पहाटे पहाटेच  उठून आन्हिके आटपून पुढील परिक्रमेची सुरुवात करीत होते.

संजय त्यांच्या मुलाखती घेण्यात गर्क झाला होता. पांढरा सदरा-लुंगी अशा पेहरावात पाठीवर नर्मदा मैंय्येची बाटली आणि पूजेच्या सामानाची पिशवी तसेच आवश्यक कपड्यांची पिशवी त्यावर अंथरुणाची वळकटी आणि हातात पाण्याचा डबा  घेऊन, हे परिक्रमावासी रामनामाचा जप करीत मार्गक्रमण करण्याच्या तयारीत होते.

प्रातर्विधी आटपून नर्मदा मय्येची यथासांग पूजा केली. जलराम बाप्पाच्या मंदिरात श्री राम-सीतामाई तसेच गोपाळ कृष्णाचे दर्शन घेतले. महामंडलेश्वर श्री सुरेंद्रनाथजी महाराजांनी बालभोग म्हणून चहा बिस्किटे दिली.

आश्रमाचा परिसर फुलांनी झाडांनी बहरलेला होता. फुलांचा मंद सुगंध आनंद लहरी निर्माण करीत होत्या. वातावरणातील सुखद गारवा उत्साहाच्या वारू वर स्वार होत होता. सुरेंद्रनाथजींचा आशीर्वाद घेऊन सायकलिंग सुरू झाले.

सकाळ सकाळी सायकलिंगचा उत्साह जोमदार होता. या परिक्रमेच वैशिट्य म्हणजे प्रत्येक दिवस पहिला दिवस वाटत होता. "याला" गावाजवळील कर्जन नदीच्या पुलावर डोक्यावर लाकडाची मोळी घेऊन जाणाऱ्या गावकरी महिलांची रांग पुढे पुढे सरकत होती.

पहाटे उठून रानातील वाळकी लाकडे गोळा करून, अतिशय लयबद्ध चालीने त्या महिला लगबगीने लाकूडफाटा डोक्यावर घेऊन घराकडे निघाल्या होत्या. ग्रामीण जीवनाची ही झलक कॅमेराबद्ध करण्याचा मोह आवरला नाही. सकाळच्या कुंद प्रकाशात एक झकास लँड्स्केप डोळ्यांच्या कॅमेऱ्यात समाविष्ट झाले. ढगाआड लपलेला सूर्य सुद्धा अनिमिष नेत्रानी त्या लालनांना न्याहाळत होता. आनंदाचे तरंग मनी उमटले निसर्गाची रूपे न्याहाळताना...

सकाळी नऊ च्या दरम्यान हायवे वरील भोवी गावात पोहोचलो. सपाटून भूक लागली होती. मेथी भजी, आलू भजी आणि चहावर ताव मारला.

येथून एक रस्ता बडोद्याकडे चालला होता. आम्हाला दुसऱ्या रस्त्याने नेतरंग मार्गे  राजपिपाला शहराच्या दिशेने जायचे होते.

थोड्याच वेळात शूलपाणी घाट सुरू झाला. पोट भरले असल्यामुळे आरामात घाटी चढत होतो. मागून एक मोटारसायकल भर्रकन पुढे गेली आणि आचके देत बंद पडली. मोटारसायकलच्या मागे बसलेल्या व्यक्तीच्या हातात एक मोठा लाकडाचा ओंडका होता. मोटारसायकल रायडर किक मारून मारून दमला... सायकल बाजूला ठेऊन, हळूच पुढे आलो. मोटारसायकलची चावी बंद करून स्पार्क प्लग बाहेर काढला.. एक जोरदार फुक मारली स्पार्क प्लगला आणि पुन्हा इंजिनला लावला. नर्मदे हर... अशी मैय्येला साद घातली आणि रायडरला किक मारायला सांगितले... एका फटक्यात मोटारसायकल सुरू झाली. त्या दोघांच्या चेहऱ्यावरील हास्य खूप काही देऊन गेले... खरच मैंय्येची लीला अगाध... या आनंदाच्या दुर्मिळ क्षणांचे मोल कशातही करता येणार नाही...

घाटातील "गाडीत" गावात थांबलो. येथे परिक्रमावासीसाठी चहाची व्यवस्था होते. शहापूरचे विनय जोशी यांची भेट झाली.

ते पायी परिक्रमा करीत होते. शास्त्रोक्त पद्धतीने अंशात्मक जन्मकुंडली बनविण्यात ते माहीर  
आहेत. जन्मकुंडली बाबत नवीन माहिती मिळाली. अतिशय काटक शरीरयष्टी परंतु बोलायला एकदम चटपटीत असे जोशी बुवा एकदम भावले.

शेगावच्या गजानन महाराज मठाच्या त्यांनी शहापूर ते शेगाव अशी चालत पाच वाऱ्या केलेल्या आहेत.  तेथूनच त्यांना नर्मदा परिक्रमा करण्याची प्रेरणा मिळाली. २०१७ साला पासून मनात असलेल्या  जाज्वल्य इच्छाशक्तीमुुळे परिक्रमा घडून आलेली आहे. आतापर्यंतच्या मैय्याच्या परीक्रमेमध्ये सर्वत्र त्यांना प्रेमभावाची अनुभूती झाली आहे.

"आम्ही निमित्त आहोत, सर्व घडवून आणणारी मैय्या आहे. परिक्रमेत लोकांनी जेवणखाण, चहापाणी हात धरून, बसवून प्रेमाने खाऊ घातले. एव्हढं प्रेम घरात सुद्धा मिळत नाही", जोशी भरभरून बोलत होते.

"माझा अनुभव वाचून मैय्येची परिक्रमा करण्यास कोणी प्रेरित झाला तर नर्मदा मैय्येचे आणखी एक लेकरू जन्माला आले म्हणून, मला खूप आनंद वाटेल" हे जोशी बुवांचे उद्गार  भरावून टाकणारे होते.  मुंबईत आपली पुन्हा भेट घेऊ असे सांगून त्यांचा निरोप घेतला.

आता नर्मदा घाटातून पेडलिंग सुरू होते. जवळच कर्जन नदीवरचा पाणलोट क्षेत्राचा भाग दिसत होता.
तासाभरात राजपिपाला शहराच्या वेशीवर गावरान कवठ फळाच्या गाडीजवळ थांबलो.

गुजरातीमध्ये याला कोठा म्हणतात. सर्दी खोकल्यावर अतिशय उपयुक्त असे हे आंबटगोड फळ नुसतं पाहिल्यावर तोंडाला पाणी सुटलं. कवठ फोडून त्यात गूळ तसेच मीठ-मसाला  टाकून आम्ही मिटक्या मारीत "कोठा" खात.. पोटाचा कोठा भरून घेतला.

राजपिपला शहराच्या मध्यभागी असलेल्या  हरसिद्धी माता मंदिराकडे सायकलिंग सुरू झाले. मंदिरात पोहोचताच त्याच्या कार्यालयात सायकलवरचे सामान काढून ठेवले.

 तेथून नर्मदा मैय्येच्या किनारी असलेल्या २० किमी अंतरावरील गोरा गावाजवळील शूलपाणेश्वर मंदिराकडे प्रस्थान केले.

दुपारचे बारा वाजल्यामुळे उन्हाचा चटका जाणवत होता. परंतु सायकलवर समान नसल्यामुळे प्रेडलिंग हलके झाले होते. वाटेत पायी परिक्रमावासी भेटत होते. दिड तासात नवीन शूलपाणी मंदिरात पोहोचलो.

  प्राचीन शूलपाणी मंदिर आता नर्मदा जलाशयाच्या धरण क्षेत्रात पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे हे नवीन मंदिर जवळच्या टेकडीवर बांधले आहे. मंदिरातील गुरुजींनी शूलपाणी महादेवाची कथा सांगितली...
प्राचीन शूलपाणी मंदिराची कथा:-

प्राचीन शूलपाणी मंदिर, नर्मदा जलाशयाच्या पाण्याखाली गेल्यावर पाच वर्षांनी सन १९९२ मध्ये नवीन मंदिर बांधले आहे. प्राचीन मंदिरातील शिवलिंग स्वतः शंकर महादेवाने स्थापन केलेले होते.

इति श्री स्कंध पुराणातील, रेवा खंडात मार्कंडेय स्वामी म्हणतात, " तीर्थामध्ये तीर्थ ज्याला परमतीर्थ म्हणतात जे शूल (पर्वत) दुभंगून निर्माण झाले ते रेवाच्या (नर्मदेच्या) दक्षिण तटावर स्थित आहे ते शूलपाणेश्वर नावाने स्थापित आहे.

येथे एक अलौकिक आणि अद्भुत गोष्ट आहे, ती म्हणजे  शूलपाणी शिवलिंगमध्ये तीन मणी आहेत. हे तीन मणी प्रत्यक्ष स्वयं शंकर महादेवाच्या त्रिशूलचे प्रतीक आहेत. त्यामुळेच या स्थळाचे नाव शूलपाणी आहे.
शूलपाणी आणखी एक अर्थ आहे... शूल म्हणजे कष्ट आणि पाणी म्हणजे निवारण.. कष्टांचे निवारण करणारे शिवशंभो येथे विराजमान आहेत.

 गोरा कॉलनीच्या टेकडीवर नवीन मंदिराची पुनर्स्थापना झाली. परंतु जुन्या मंदिरातील दोन शिवलिंगतील मुख्य शिवलिंग जुन्या मंदिरातून आणता आले नाही. मुख्य आत्मलिंग काढण्यासाठी ९० फुटापर्यंत ड्रिलिंग केले, परंतु संपूर्ण खडक निघाल्यामुळे ते काढता आले नाही. पांडवांनी स्थापित केलेले दुसरे शिवलिंग नवीन मंदिरात आणले आहे.

ब्रह्माजीचा पौत्र (नातू) अंधक याने एका पायावर उभे राहून वायू भक्षण करून एक हजार वर्षे शिवाची घोर तपस्या केली. घनघोर तपस्येमुळे अंधकाच्या मस्तकातून धूर निर्माण होऊ लागला, त्याने संपूर्ण विश्व अंधकारमय झाले.  शिवशंभो प्रसन्न झाल्यावर त्यांच्याकडे अंधकाने मोक्ष प्राप्ती मागितली. शिव शंभो म्हणाले तुला मोक्ष दिला तर मला ब्रम्ह हत्येच पातक लागेल. तेव्हा अंधकाने क्रोधीत होऊन शिवाशी युद्ध आरंभले. शिवाने त्रिशूलाने त्याचे मस्तक भेदन केले.त्रिशूळाला त्याचे रक्त लागले होते. तेव्हा आकाशवाणी झाली...  नर्मदेच्या दक्षिण तटावर असलेल्या भृगुतूंग  पर्वतावर त्रिशूलाचा प्रहार केल्यावर रक्ताचे डाग नाहीसे होतील आणि ब्रम्हहत्येच्या पातकातून आपण मुक्त व्हाल.

 त्रिशूळाचा त्या पर्वतावर प्रहार करताच सरस्वती गंगेची उत्पत्ती झाली आणि त्रिशूळावरील डाग धुतले गेले आणि तेथे शूलपाणी शिवलिंगाची उत्पत्ती झाली. त्या भृगुतूंग पर्वतावर केलेल्या  त्रिशूळच्या प्रहरामुळे शिवलिंगावर तीन मणी निर्माण झाले आहेत. महादेव शिवशंकराच्या त्रिशूळापासून उत्पन्न झालेले आणि गंगेच्या पाण्याचा जेथे वास आहे, म्हणूनच या मंदिरास शूलपाणेश्वर महादेव म्हणतात.

सरदार सरोवराची उंची वाढविण्यास प्रखर विरोध होण्याचे मुख्य कारण प्राचीन शूलपाणी मंदिर पाण्याखाली जाणार, हे सुद्धा होते.

शूलपाणी मंदीराची कथा ऐकून मन ब्रह्मानंदात लीन झाले....

तेथून गोरा पुलावरून नर्मदा मैयेच्या विशाल जलशयाजवळ आलो. तब्बल तीन दिवसानंतर मैंयेचे दर्शन झाले होते. मैय्येच्या उत्तर तटावर सरदार वल्लभभाई पटेलांचा भव्य "एकतेचा पुतळा" (Statue Of Unity) दिमाखात उभा होता.

संजयने नर्मदेच्या तटावर स्वतःला झोकून दिले. नर्मदा जलात पाय सोडून निवांत पहुडला होता

 जुना पूल पाण्याखाली गेला होता.

त्याच्या शेजारीच उत्तर तटावर जाण्यासाठी नवीन पूल बांधला आहे.

बराच वेळ नर्मदा तटावर व्यतीत करून, येथून जवळच्या हरीधाम आश्रमात आलो. येथे स्वामी सर्वेश्वरानंद यांचे दर्शन झाले.

परमेश्वराचे भजन, नर्मदा मैय्येचा  सहवासात  तुम्ही यात्रा पूर्ण करा. प्रत्येक स्थळाचा आनंद घ्या आणि झालेली अनुभूती समाजात सर्वांना सांगा.. जेणेकरून नर्मदा परिक्रमा करण्याची आस प्रत्येकाच्या मनात निर्माण करा... असा संदेश स्वामीजींनी दिला.

स्वामीजींचे आशीर्वाद घेऊन मुख्य रस्त्यावर आलो. सडकून भूक लागली होती. वाटेतच बिलोसी गावात व्हिलेज रेस्टॉरंट लागले. तेथे राजस्थानी थाळी जेऊन , राजपिपला शहराकडे सायकलिंग सुरू केले.

राजपिपला वेशीवर एक मिरवणूक निघाली होती. लाकडी घोडा गळ्यात अडकवून स्वार घोड्यासारख्या उड्या मारत होता.

एका बाबाजींच्या गळ्यात बरेच हार घातलेले होते. मिरवणूक शहरातील मंदिरांना भेटी देणार होती.

हरसिद्धी माता मंदिरात पोहोचलो. संध्याकाळच्या मातेच्या आरतीमध्ये सामील झालो. एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट दृष्टीस पडली.

या मंदिरात बरेच कोंबडे आणि कोंबड्या मातेला अर्पण केल्या होत्या. एक कोंबडा आरतीच्या ठेक्यावर एका पायावर नाचत होता. तर दुसरा मान डोलावत, सतत आरवत होता. मंदिरातील पवित्र वातावरणाचा परिणाम पक्षीमात्रांवर  होतो याची प्रचिती आली.

मंदिराच्या मोकळ्या जागेत आतापर्यंत दहाबारा परिक्रमवासी आले होते. स्नानादी आटपून मंदिरातील चौथऱ्यावर मैयेची पूजा केली. रात्री मंदिरातच भोजनप्रसादीची व्यवस्था होती. मंदिराबाहेरील दुकानातुन  अमूल लस्सी आणि आईस्क्रीम यांचा आस्वाद घेतला. दुकानदाराबरोबर उद्याच्या सायकल परिक्रमेबाबत चर्चा केली. येथून पंचवीस किमी अंतरावर वराछा गावात बसलेल्या गुरू दत्तात्रयाचे दर्शन होईल ही माहिती मिळाली.

रात्री गप्पा मारता मारता कधी झोपी गेलो हे कळलेच नाही...

सतीश जाधव

स्वछंदी पाखरे.....

Monday, March 29, 2021

पृथ्वीचे प्रेमगीत

पृथ्वीचे प्रेमगीत

युगामागुनी चालली रे युगे ही
करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी
कितीदा करु प्रीतीची याचना

नव्हाळीतले ना उमाळे उसासे
न ती आग अंगात आता उरे
विझोनी आता यौवनाच्या मशाली
ऊरी राहीले काजळी कोपरे

परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे
अविश्रांत राहील अन् जागती
न जाणे न येणे कुठे चालले मी
कळे तू पुढे आणि मी मागुती

दिमाखात तारे नटोनी थटोनी
शिरी टाकिती दिव्य उल्काफुले
परंतु तुझ्या मूर्तीवाचून देवा
मला वाटते विश्व अंधारले

तुवा सांडलेले कुठे अंतराळात
वेचूनिया दिव्य तेजःकण
मला मोहवाया बघे हा सुधांशू
तपाचार स्वीकारुनी दारुण

निराशेत सन्यस्थ होऊन बैसे
ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रृव
पिसाटापरी केस पिंजारुनी हा
करी धूमकेतू कधी आर्जव

पिसारा प्रभेचा उभारून दारी
पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ
करी प्रीतीची याचना लाजुनी
लाल होऊनिया लाजरा मंगळ

परी दिव्य ते तेज पाहून पूजून
घेऊ गळ्याशी कसे काजवे
नको क्षूद्र शृंगार तो दुर्बळांचा
तुझी दूरता त्याहुनी साहवे

तळी जागणारा निखारा उफाळून
येतो कधी आठवाने वर
शहारून येते कधी अंग तूझ्या
स्मृतीने उले अन् सले अंतर

गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे
मिळोनी गळा घालुनीया गळा
तुझ्या लाल ओठातली आग प्यावी
मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा

अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन्
मला ज्ञात मी एक धुलिःकण
अलंकारण्याला परी पाय तूझे
धुळीचेच आहे मला भूषण

कविवर्य   कुसुमाग्रज 

कुसुमाग्रजांनी पृथ्वी सोबत स्त्रीचे मन सुद्धा कथन केले आहे. 

भव्य आणि विशाल प्रेमाची ही कथा आहे. युगानुयुगे सूर्याच्या प्रेमाची याचना करीत तुझ्या भोवती मी फिरते आहे. तरीपण सदैव माझी वंचना होत आहे. असं किती काळ धावू? तारुण्याचा यौवनाचा बहर ओसरला आहे. तरीसुद्धा मनाच्या अंतरंगात तुझ्या प्रेमाची अखंड ज्योत सदैव तेवत आहे. तुझ्या भोवती प्रेमायचना करीत मी अविरत भ्रमण करणार आहे. 

अनंत युगे पृथ्वी सूर्याच्या कक्षेत  करत फिरत आहे.

 तसेच प्रेमभराने प्रेरित झालेली लालना प्रियकराला विचारते आहे, 'तुझ्या मागे मागे किती काळ येऊ; तुझ्या प्रीतीची याचना किती वेळा करू, अशी विचारणा करते आहे. प्रत्येक प्रेयसीची ही आराधना आहे.

स्त्री (पृथ्वी) जेव्हा एखाद्यावर (सूर्यावर) नितांत प्रेम करते. तेव्हा तारे, चंद्र, ध्रुव, धूमकेतू, शुक्र, मंगळ यांच्या विविध अंगाने विविध ढंगाने केलेल्या प्रेम याचना तिला निरर्थक वाटतात. सूर्याच्या दिव्य तेजापुढे इतरांचे प्रेमालाप काजव्याच्या शूद्र चमचमी सारखे भासतात. 
माझ्या प्रेमासाठी अनेक तारे, ग्रह, धूमकेतू मला लुभावण्याचा प्रयत्न करीत आहेत. माझ्या अंगअंगावर उल्कामय पुष्प वर्षाव करीत आहेत. परंतु तुझ्या शिवाय मला काहीही प्रिय नाही.
तुझ्या भव्य तेजापुढे, काजव्या प्रमाणे असणाऱ्या ग्रह ताऱ्यांचा प्रेमाचा स्वीकार मला मान्य नाही. त्या पेक्षा तुझा दुरावा मला प्रिय आहे.

तिच्या अंतरीच्या कळा लाव्हा रसासारख्या उफाळून येतात, त्यामुळेच आपल्या (पृथ्वी आणि सूर्य) दोघांतली  दुरी सलत राहते. तुझे तेजोमय रूप धारण करून, तुझी गळा भेट घ्यावी. तुझ्या दाहकतेत विरघळून जावे. अशीच मनोकामना आहे. एव्हढे अमर्याद, अनंत प्रेम आहे.

तुझ्या प्रेमाच्या अंगार माझ्या अंतरंगात धगधगतो आहे. तुझ्या आठवणीने सौंदमीनीचे आसूड माझ्यावर मनावर  कोसळतात आणि त्याचा ज्वालामुखी द्वारे उद्रेक होतो. तुझ्या विरहाने मन भूकंपाद्वारे विदीर्ण होते. 

परंतु हे प्रेम मला एकतर्फी वाटत नाही, कारण तिच्या वर असलेल्या प्रेमामुळेच सूर्य तिला आपल्या मागे घेऊन चालला आहे. त्यामुळेच पृथ्वीच्या प्रीतीची ज्योत अविश्रात तेवत आहे. त्याच्या मागची प्रेरणा सुर्यच आहे. 

या ठिकाणी एक जाणवते, सूर्य (पुरुष) सर्वांनाच आपल्या मागे खेचतो आहे. सर्वांवर प्रेम करतो आहे. परंतु पृथ्वी (स्त्री) नितांत प्रेम,  फक्त एकावरच करू शकते. त्यामुळेच ती इतरांच्या प्रेमाचा अव्हेर करते.
तुझ्या विराट रुपात मिसळून जावे हीच कामना आहे.   तुझ्या तेजोमय ज्वालात सामावून जावे आणि आलिंगनाने प्रीतीची  तीव्रता अनुभवायची आहे. तुझ्या अमर्याद थोरावीची मला जाणीव आहे. तुझ्या पुढे एखाद्या धुळीकणाप्रमाणे मी शुद्र आहे. तरी सुद्धा तुझ्यात सामावून जाण्याची तीव्र लालसा आहे

स्त्रीला (पृथ्वीला) सूर्याची अमर्याद थोरवी माहीत आहे. त्यांच्यापुढे आपण यत्किंचित आहोत हे सुद्धा तिला ज्ञात आहे. तरी सुद्धा सूर्याच्या चरणी आपले प्रेम अर्पण करण्यासाठी त्याच्या पायाची धूळ होणे सुद्धा तिला मान्य आहे.

असे नितांत प्रेम फक्त स्त्रीच करू शकते.

सतीश जाधव
मुक्त पाखरे......

Monday, March 8, 2021

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस सातवा) प्रकाशा ते देडिया पाडा ०४.०१.२०२१

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस सातवा)   प्रकाशा ते देडियापाडा

०४.०१.२०२१

प्रकाशाला दक्षिण काशी सुद्धा म्हणतात. तापी महात्म्यात उल्लेख आहे की, शिव महादेवाने एका सिद्धमहात्म्याच्या स्वप्नात येऊन सांगितले की एकाच स्थानावर एका रात्रीत १०८ शिवमंदिरांची निर्मिती झाली तर त्या गावात  माझा कायम निवास असेल. तापी, पुलिंदा आणि गोमाई नदीच्या संगमा जवळील गावामध्ये १०८ शिवमंदिर निर्मितीचे काम सुरू झाले. शिवभक्तांनी १०७ मंदिरांची निर्मिती केली, परंतु १०८ व्या मंदिराचे निर्माण कार्य सुरू असतानाच सूर्य प्रकाशित झाले. त्यामुळे या गावाला काशी एवढे महत्व मिळाले नाही. 

       आजसुद्धा हे मंदिर;  भिंती विरहित अर्धवट अवस्थेत आहे. ह्या मंदिर निर्मितीच्या वेळी प्रकाश आल्यामुळे या गावाला प्रकाशा हे नाव पडले.

तापीच्या किनाऱ्यावर जाऊन सुर्यनारायणाचे दर्शन घेतले. मैयेची पूजा केली. केदारेश्वर, काशीविश्वेश्वर महादेव तसेच पुष्पदंतेश्वर मंदिरांचे दर्शन घेऊन पुढे प्रस्थान केले.

आज देडिया पाडा पर्यंत जवळपास ९५ किमी सायकलिंग करायची होती. या रस्त्याचे वैशिष्ट्य म्हणजे कधी महाराष्ट्र तर कधी गुजरात पुन्हा महाराष्ट्र असा दोन्ही राज्यांच्या वेशी वरून प्रवास सुरु होता. रस्त्याच्या डाव्या बाजूला महाराष्ट्र तर उजव्या बाजूला गुजरात... येथे भेटणाऱ्या व्यक्ती मराठी आणि गुजराती भाषा याची सळमिसळ करून बोलतात.
या भागात कापूस आणि ऊस याचे मोठ्या प्रमाणात पीक येते. पहिला टप्पा १८ किमी वरील तळोदा शहर होते. रस्त्यात एक गोदाम लागले.  कापसाची छाननी करून तो ट्रकमध्ये भरण्याचे काम सुरू होते.

कापसाच्या वेगवेगळ्या प्रती समजल्या. येथे प्रसाद म्हणून चहा देण्यात आला.

तळोदा येथील कणकेश्वर महादेव मंदिराला भेट दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी करताना येथे तळ ठोकला होता. म्हणून या गावाला तळोदा हे नाव पडले.  एका धनगराच्या मेंढरांच्या खाजणात, छत्रपतींच्या मावळ्यांनी घोडे घुसवले, म्हणून त्या धनगराने हातातील काठीने मावळ्यांशी सामना केला होता. त्याचा पराक्रम पाहुन छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला आपल्या सैन्यात सामावून घेतले होते.

तळोदे शहराला स्वतःचा सांस्कृतिक, सामाजिक  इतिहास आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे, पहेलवानकी गाजवणारे अशी तळोद्याची ओळख आहे. क्रीडा, कला, शिक्षण व राजकीय क्षेत्रात तळोद्याचा नाव लौकीक आहे. तळोदा तालुक्यात राहणाऱ्या लोकांना तळोदेकर म्हणून ओळखतात, तालुक्यात आदिवासी बांधवांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. जहागीरदार बारगळांची गढी तळोद्यात विशेष प्रसिद्ध आहे.

तळोदा पार करून तासाभरात मेंढवड या गावाजवळ पोहोचलो. या पट्ट्यात जागोजागी ऊसाची गुऱ्हाळे लागली होती. एका ऊसाच्या गुऱ्हाळात प्रवेश केला.

चार मोठ्या कढईत ऊसाचा रस उकळत होता. घट्ट झालेला ऊसाचा रस पत्र्यांच्या डब्यात भरून थंड केला जात होता. लाल रसरशीत केमिकल विरहित गुळ खायला मिळाला. त्याच बरोबर दोन मोठे ग्लास ऊसाचा रस समोर आला. रस काढलेली ऊसाची चिपाड सुद्धा जळण म्हणून तसेच गुरांच खाद्य म्हणून उपयोगात येतात. त्यातून निघणारी मळी खत म्हणून वापरात येते. कारखान्यात कामकरी महिला मोठया प्रमाणात होत्या.

दुपारचा एक वाजला होता. रस्ता बराच खराब होता. धूळ, धूर, ऊन यांचा सामना करीत मार्गक्रमण करीत होतो. वाटेत अक्कलकुवा गावाजवळ एका चहावाल्याने नर्मदे हर करीत आम्हाला साद घातली.

दुपारच्या उन्हात कडक मसालेदार चहा थंडावा देऊन गेला. चुलीतील निखारे धगधगते ठेवण्यासाठी सोनाराकडे असते तशी फुंकणी मशीन चुलीला लावली होती. जुगाड संस्कृतीमुळे या गावाला "अक्कलकुवा" नाव पडले असावे काय?

पावणे तीन वाजता गव्हाली गावात पोहोचलो. गरमागरम भजी आणि जिलेबी खाल्ली.

उन्हात तापल्यामुळे थोड्या विश्रांतीची गरज होती. या टपरीवर एक सुभाषित लिहिले होते "नम्रता हाच माणसाचा सर्वोत्तम गुण आहे" अतिशय खराब रस्त्यांमुळे कातावलेल्या जीवाला नम्रतेचा सहवास मिळाला की पुढ्यात येणारे पदार्थ समाधानाचे सुख देतात. अतिशय चपलखपणे सुभाषिताचा अर्थ समजला होता.

गुजरात राज्यातील दुधलीवार गावाजवळ पोहोचलो. 'नाना माच' आणि 'मोटा माच' घाट्या चढून वर आलो होतो. घाटी चढताना दमछाक झाली परंतु टकाटक रस्त्यामुळे वेगात वाढ झाली होती. रस्त्याच्या किनारी मकेवाला बसला होता. चुलीवरील मोठ्या टोपात मक्याची कणसे उकडत टाकली होती.

 फतकल मारून बसलो आणि मक्याचा आस्वाद घेतला. मक्याला येथे 'डोडा' म्हणतात.  दुपारच्या भोजन प्रसादी ऐवजी वाटेत मिळेल ते हायड्रेशन साठी खात होतो.

दुधलीवार गावाकडून देडियापाडा अवघ्या अठरा किमी अंतरावर आहे. सूर्य अस्ताला चालला होता आणि पुढील प्रवास शूलपाणेश्वर अभयारण्यातून होता. मोठे मोठे कंटेनर या हायवे वरून जात होते. त्यामुळे सायकलिंग अतिशय सावधपणे करत होतो.

वाटेत नर्मदाकुटी गाव लागले. एका झोपडीच्या लोकेशनवर अस्ताला चाललेला सूर्य सुवर्ण शलाकांची उधळण नभांगणात करत होता.

अलगदपणे लाखाची गोष्ट चित्रपटातील " त्या तिथे पलीकडे" गाण्याची आठवण झाली. गाणे अनुभवणे काय असते याची अनुभूती मिळाली.

सायंकाळी साडेसहा वाजता देडियापाडा येथील जलराम बाप्पाच्या आश्रमात पोहोचलो. 

प्रकाशा ते अंकलेश्वर या दिडशे किमी पट्ट्यात परिक्रमावासीयांसाठी कोणतीही सेवा उपलब्ध नव्हती. त्यामुळे जलराम बाप्पाच्या आशीर्वादाने महामंडलेश्वर श्री सुरेंद्रदासजी महाराज गेल्या सव्वीस वर्षांपासून देडियापाडा येथे परिक्रमावासीयांची सेवा करत आहेत. हे सेवाव्रत म्हणजे एक महायज्ञ आहे... अखंड धगधगत राहणारे...
सुरेंद्रदासजी महाराज म्हणतात "मैने जो देखा दो रोटीमे, वो नही देखा पुछीमे"   विचारपूस करण्यापेक्षा जेवू घाला हाच संदेश देतात बाबाजी.

जलराम बाप्पाच्या मंदिराजवळच मोठा आश्रम परिक्रमावासीयांच्या निवासासाठी होता.  आमच्यासह जवळपास वीस परिक्रमावासी तेथे होते. स्नानसंध्या आटपून नर्मदा मैंय्येची पूजाअर्चना केली. वातावरणात गारवा आला होता. रात्री सर्वांसोबत  दालखीचडी भोजनप्रसादी ग्रहण केली.

आजच्या दिवसाची प्रकाशा ते देडियापाडा ही सायकल वारी स्मरणात राहील अशीच होती... सेवावृत्तीच्या प्रकाशवाटा दैदिप्यमान झाल्या होत्या.


सतीश जाधव

मुक्त पाखरे...