Monday, January 4, 2021

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस दुसरा) बकावां ते दवाना

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस दुसरा) बकावां ते दवाना
३०.१२.२०२०

पहाटे चार वाजता बाजूच्या राम मंदिरातील रामधून कानावर पडली. सीताराम बाबांनी सकाळी साडेचार वाजता मंदिरात काकड आरतीला बोलावले होते. तयार होऊन दोघेही राम मंदिरात पोहोचलो. आरतीला सुरुवात झाली आणि आम्हा दोघांना घंटा वाजविण्याची कामगिरी मिळाली. मंदिराच्या खिडकीतून नर्मदा मैंयेची सुद्धा काकड पूजा झाली. बाबाजींनी सकाळीच चहा पाजला. तसेच पायी परिक्रमा करणाऱ्यांसाठी शूलपाणी जंगलातून जाणारा परिक्रमा मार्गाचा चार्ट दिला.

सकाळीच गावातील मुले आमच्या भोवती जमा होऊन 'नर्मदे हर' म्हणत पाया पडू लागली. सुनील केवट या मुलाने घरी येऊन कृपाप्रसादी म्हणून चहा पिण्याचा आग्रह धरला.

त्याच्या घरी जाताना, वाटेत शिवलिंग कारखान्यांना भेटी दिल्या. बारवां गाव शिवलिंग बनविण्याच्या कुटीरोद्योहासाठी जगप्रसिद्ध आहे.   एक इंचापासून २२  फुटापर्यंत शिवलिंग येथे बनविले जातात.

बारवां गावातून वाहणाऱ्या नर्मदा मैयेच्या पात्रात एक टापू आहे. तेथील पत्थर आणून त्यातून शिवलिंगाची निर्मिती केली जाते. ही शिवलिंग भारतात आणि भारताबाहेर विक्री केली जातात. नर्मदा मैयेच्या पत्रातील प्रत्येक कंकर हा शंकर असतो, याची प्रचिती आली.

सुनीलच्या घरात वडील पत्थर घेऊन येतात आणि  आई शिवलिंग तयार करते. केवट आणि माझी समाजाच्या लोकांचा हा पिढीजात व्यवसाय आहे. सुनील गावात येणाऱ्या प्रत्येक परिक्रमवासींना आपल्या घरी येण्याचा आग्रह करतो. त्याची आई म्हणते, 'आप लोग जब घर आते हो, तो नर्मदा मैय्याकी कृपा हमपर रहती है'... अतिशय श्रद्धा पूर्वक आणि हसतमुखाने, लोकसेवा करण्याचे काम बकावांचे गावकरी करीत होते.

गावाच्या सुरुवातीलाच गोपालकृष्णाचे भव्य मंदिर आहे. विशेष म्हणजे गावातील सर्व महिला या मंदिरात पूजा अर्चना करीत होत्या. गावचे मुखीया म्हणाले,  'या गावाला आणि आमच्या अन्नछत्रामध्ये पुन्हा जरूर या'.

  बेडगी मिरची, गहू, कापूस, चणे या प्रदेशात पिकविले जातात.

तसेच विटांचे कारखाने सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. या गावाला सहकुटुंब भेट देण्याचे ठरवून निरोप घेतला. येथून तेली भटीयाण येथील सियाराम बाबांचा आश्रम १४ किमी अंतरावर आहे.

नगावा गावात गीता बहेन आहेत. त्या सर्व परिक्रमावासींना चहा बिस्कीट देऊन त्याची सेवा करतात.

येथे मुले छोटी चक्री चालवत होते. चक्रीला येथे टका म्हणतात. एक मुलगा टका पळवत सायकल बरोबर स्पर्धा करत होता. या गावात आरंडी (एरंडेल) ची मोठ्या प्रमाणात शेती आहे.

साडेनऊ वाजता तेली भटीयाण गावातील सीयाराम बाबांच्या आश्रमात पोहोचलो. बाबांचे दर्शन घेतले.


बाबा भेट देणाऱ्या  प्रत्येक भक्ताला चहा पाजतात. त्यांचे विशेष म्हणजे कोणी त्यांना दान दिले तर फक्त दहा रुपयेच घेतात. पाचशेची नोट दिली तर चारशे नव्वद परत करतात. 

आश्रमाबाजूलाच नर्मदा मैय्या आहे. 

 मैयेच्या पाण्यात डुबकी मारून तेथेच पूजा केली आणि बाबांच्या भोजन प्रसादीचा लाभ घेतला. आज दालबाटीचे भोजन होते.

बाबांच्या आश्रमातून  जवळच असलेल्या निमाड अभ्युदय संचालित भारतीताई ठाकूर यांच्या नर्मदालायला भेट दिली. येथे ताईंची भेट झाली नाही. तेथून लेपा पुनर्वास येथील नर्मदालायला भेट दिली. भारती ताईंची भेट झाली.

येथे आजूबाजूच्या गावातील जवळपास ९०० मुले शिक्षण घेत आहेत. मुले व्यवसायभिमुख प्रशिक्षण घेतात. गवंडीकाम, सुतार, वेल्डींग, फॅब्रिकेशन या कामाचे प्रशिक्षण येथे घेतलेली खूप मुले आता स्वतःचा व्यवसाय करीत आहेत. मुलांनी सोलार ड्रायर आणि सोलर कुकर बनविला आहे.

भारती ताई नर्मदा परिक्रमा करीत असताना, गावातील मुलांची शिक्षणाबाबत दयनीय परिस्थिती पहिली.  परिक्रमापूर्ण झाल्यावर येथील मुलांसाठी काहीतरी करायचे या भावनेतून भारतीताई नोकरी सोडून लेपा येथे स्थायिक झाल्या.  आज त्या नऊशे मुलांच्या आई आहेत. नर्मदा मैयेच्या सहवासामुळे काय चमत्कार होऊ शकतो... हे भारतीताईच्या या कार्यामुळे लक्षात येते.
एका मुलीने जखमी झालेला पाणबगळा (पॉन्ड हेरॉन) भारतीताईंकडे आणला. त्याला आईच्या मायेने भारतीताई कुरवाळत होत्या.

त्याच्या पंखाला इजा झाली होती, त्यावर आता औषोधोपचार केले जाणार आहेत. शाळेतील मुलांनी संपूर्ण शाळा आम्हाला दाखविली. पहिल्या माळ्यावर तयार होणाऱ्या वर्गाचे लोखंडी दरवाजे शाळेतील मुलांनीच बनविले आहेत. संगीत कक्ष, शिवण वर्ग  पाहिले. तीन वर्षांपूर्वी यशोधन तर्फे बांधण्यात आलेल्या हॉलला सुद्धा भेट दिली. ताईच्या कार्यालय कक्षात लावलेली नर्मदा मैयेची फोटो फ्रेम खूपच भावली. ताईच्या या कार्यासाठी यथाशक्ती देणगी दिली. सायकल परिक्रमेसाठी भारती ताईंचे आशीर्वाद  घेतले. मुलांसोबत फोटो काढून नर्मदालायचा निरोप घेतला.
आता आम्हाला खलघाट मार्गे दवाना येथे जायचे होते. वाटेत आग्रा मुंबई रस्ता लागला. खलघाट गावात जवळ वेदा नदी लागली. पुढे जाऊन ती नर्मदेला मिळते. नंतर ठिकरी गाव लागले. तेथील गोकुळ स्वीट दुकानातील बलराम यांनी नमकीन आणि सुप्रसिद्ध गजक मिठाई तसेच चहा पाजली.
नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांची सेवा करणे हे बलरामने घेतलेले व्रत आहे.

रस्ते अतिशय टकाटक होते. त्यामुळे आमची राईड राजेशाही पद्धतीने सुरू होती. दवाना येथील भौसिंग बाबांच्या आश्रमात साडेसहा वाजता पोहोचलो. वातावरण थंड झाले होते. आश्रमाचे महंत तवरदासजी काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यांचे सेवक आमची जातीने चौकशी करून... काय हवे ते विचारात होते. 

रात्री भोजन प्रसादी म्हणून मसाले भात आणि ताक होते. तृप्त मनाने झोपेच्या अधीन झालो.

नर्मदा मैयेच्या कृपेने आज "बाबांची छाया आणि आईची माया" ह्यांचा लाभ झाला.

नर्मदे हर !!!

सतीश जाधव
मुक्त पाखरे…..

  

Friday, January 1, 2021

नर्मदा परिक्रमा.. ओमकारेश्वर ते बकावां (परिक्रमेचा पाहिला दिवस)

नर्मदा परिक्रमा...ओमकारेश्वर ते बाकावां
(परिक्रमेचा पहिला दिवस)

२९.१२.२०२०

सकाळी गजानन महाराज मंदिरात आम्हाला परिक्रमवासी म्हणून पांढरी लुंगी आणि सदरा तसेच छोटी वही भेट मिळाली. गजानन महाराज आश्रमात परिक्रमा करणाऱ्या सर्व बाबाजी मैयाजी यांची राहण्याची आणि जेवणाची निशुल्क व्यवस्था होते. परिक्रमेला अंथरून, पांघरून अथवा स्लीपिंग बॅग घेणे आवश्यक आहे. तसेच स्वतःचे ताट, वाटी, पेला घेणे सोईचे असते.

सकाळी ओमकारेश्वर मंदिराच्या दक्षिण तटावरील प्रवेशद्वाराला भेट दिली.  

 तेथून दक्षिण तटावरील ममलेश्वर मंदिराजवळील गोमुख घाट येथे संकल्प पूजा करण्यासाठी पोहोचलो.

प्रथम नर्मदा मैंयेचे दर्शन घेऊन स्नान केले. पाठक गुरुजींनी यथासांग संकल्प पूजन केले. सायकलचे नर्मदा मैयेसोबत फोटो काढले.  

बाटलीत घेतलेली नर्मदा मैया सतत आपल्या सोबत ठेवा. तसेच दररोज  तिचे पूजन करा.हे गुरुजींनी सांगितले.

नवीन बस स्टँड जवळील मंगलदासबाबांच्या आश्रमाला पुन्हा एकदा भेट देऊन बाबांचे आशीर्वाद प्राप्त केले. बाबाजींनी आज काही सूचना केल्या. ते म्हणाले, 'परिक्रमेमध्ये आपल्या उजव्या बाजूला नर्मदा मैयाजीला ठेऊन परिक्रमा करायची आहे. या परिक्रमेत जबलपूर जवळील भेडाघाटला जायचे नाही... कारण कोठेही नर्मदा मैयेला ओलांडायचे नाही. विशेष करून अमरकंटक येथे सुद्धा नर्मदा मैय्या ओलांडणार नाही याची काळजी घ्या'.

मनोज मानेची सुद्धा भेट झाली. आज दत्त जयंती असल्यामुळे दत्त नामाचा जयघोष करून दुपारी बारा वाजता परिक्रमेची सुरुवात केली.

आमच्या पहिल्या प्लॅन प्रमाणे दिवसाला साधारण शंभर किमी सायकलिंग करायचे ठरविले होते. परंतु आता किलो मीटर्स कन्सेप्ट मनातून काढून टाकला. जास्तीत जास्त नर्मदेच्या सान्निध्यात राहण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच प्रमाणे किनाऱ्यावरील मठ, आश्रम, देवळे, भोजन प्रसादीचे अन्नछत्र, यांना भेट देण्याचे नक्की केले.

सनावत गाव हा पहिला पडाव  एकदम जोशात पार केला. दुपारी सुद्धा वातावरणात गारवा होता. तेथून खरगोन गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला लागलो. दोनच्या दरम्यात बेडीया गावात पोहोचलो. येथील मिरची मंडी मध्य प्रदेश मधील बेडीया (म्हणजेच बेगडी) मिरचीची सर्वात मोठी मंडई आहे. येथून रावेरखेडी गाव बारा किमी आहे. दोन तासात बेडगी पर्यंत ३६ किमी सायकलिंग केले होते.

मंडईतील प्रेमलालजी मुच्छाला या दुकानाच्या मालकाने आम्हाला थांबविले. आमची प्रेमाने चौकशी करून चहा पाजला. 

मैयेच्या कृपा प्रसादला सुरुवात झाली होती. मैयेकडून ही परिक्रमा आमच्या कडून करवून घेतली जात आहे.  हा मान मैयेचा आहे आमचा नाही. हाच मनातील भाव अतिशय सर्वांना जवळ आणतो आहे.

वाटेत गावकरी सुरेन बिर्ला भेटला. त्याने  रावेरखेडीचा रस्ता समाजवला, तसेच बकावां गावात थांबण्याचा सल्ला दिला.

 बकावां गाव शिवलिंगासाठी प्रसिद्ध आहे. तेथील घराघरात चालणारे कारखाने  जरूर पहा,  हे सांगितले.

निपाणी-सिपाणी गावापासून रावेरखेडी बायपास सुरू झाला. येथून दहा किमीवर रावेर आहे. खेडी गाव मागे टाकून आता रावेरकडे पेडलिंग सुरू झाले.

 थोड्याच वेळात रावेरला पोहोचलो. 

थोरले बाजीराव पेशवे हे एक अजिंक्य मराठा पेशवे होते. त्यांनी ४२ लढाया केल्या आणि सर्व जिकल्या होत्या. . यांनीच अटकेपार मराठा साम्राज्याचा झेंडा फडकवला होता. वयाच्या ३९ वर्षी त्याचे रावेरखेडी येथे निधन झाले.

 मराठा सरदार ग्वाल्हेरचे शिंदे यांनी रावेर खेडी येथे नर्मदा तटावर थोरले बाजीराव पेशवे यांची ही समाधी बांधली.

समाधी समोरच्या चबूतऱ्यावर दोन मिनिटे बसून बाजीराव पेशव्यांना मूक श्रद्धांजली वाहिली. नर्मदेच्या विशाल पत्रात टक लावून पाहत होतो... पेशव्यांच्या तलवारीचे  खणखणीत आवाज कानात घुमू लागले... महाराष्ट्रातील प्रत्येक शिवप्रेमीने ही समाधी आवर्जून पहिली पाहिजे.

समाधीचा परिसर अतिशय विहंगम आहे. तसेच तेथील कर्मचाऱ्याला आता सरकारने पगार सुरू केला आहे. मराठयांच्या इतिहासात थोरले बाजीराव पेशव्यांचे नाव सुवणाक्षराने कोरले गेले आहे.


समाधी परिसरात फोटोग्राफी करून रावेर येथील प्रेमदासजी महाराज यांच्या आश्रमात आलो. 

ते  सुद्धा त्यांनी मारलेली प्रेमाची हाक ऐकून... महाराजांच्या चेहऱ्यावरील तेज आणि प्रेमपूर्वक भाव त्यांच्या नावाची साक्ष देत होते.

बाबाजींच्या आश्रमात आम्ही बसलो असताना पायी चालणारे तीन परिक्रमावासी आले. प्रथमच आम्हाला  दोन बाबाजी आणि एक मैयाजी भेटले होते. संध्याकाळचे साडेचार वाजल्यामुळे हे पारिक्रमवासी त्याच आश्रमात विश्राम करणार होते.

यात, ठाण्यातील सुप्रसिद्ध डिस्कव्हरी ताई, रुपाली पारखे देसिंगकर या परिक्रमेत होत्या. त्या कॉलमिस्ट आहेत. त्यांनी मोबाईल फोन बंद करून टाकला आहे. आता त्या  नर्मदा मैयेच्या स्वाधीन झाल्या आहेत. त्यात कोणाचाही हस्तक्षेप किंवा साधा संवाद सुद्धा त्यांना नको आहे. त्या फक्त आणि फक्त नर्मदा मैयेशी संवाद साधणार आहेत... एक साधक बनून... एक परिक्रमिक म्हणून... परिक्रमेच्या कालावधीत त्या स्वतःसाठी जगणार आहेत... जगण्याचा उद्देश शोधणार आहेत... नर्मदा मैयाजी त्यांच्या इच्छा आकांक्षा नक्कीच पूर्ण करेल...

रुपाली ताईचे सर्व कुटुंब दत्त संप्रदायातील असल्यामुळे... त्यांना लहानपणापासून नर्मदेची ओढ होते... त्यांची परिक्रमेची इच्छा नर्मदा मैयेने घडवून आणली आहे...

बालभोग (चहापान) घेऊन सर्वांचा निरोप घेतला आणि पुढे प्रस्थान केले. आज तेली भाटीयाणच्या सियाराम बाबांच्या आश्रमात विश्रांती घेण्याचा विचार होता. सव्वापाच वाजता बकावां येथे पोहोचलो. येथील चौरस्त्यावर उभे असलेली गावकऱ्यांनी आमची चौकशी केली आणि गावातील मां नर्मदा रेवा अन्नछत्रालायचा लाभ घ्यावा हो विनंती केली. येथे भोजनप्रसादी आणि निवासाची व्यवस्था सेवाभाव म्हणून केली जाते. भटीयाणला जायला रात्र होईल. याची त्यांनी कल्पना दिली. मैंयेचा आदेश मानून आम्ही गावातील मां रेवा अन्नछत्र सेवा समिती आश्रमात विश्रांती घेतली. आश्रमाच्या समोरच नर्मदा मैंयेचे दर्शन झाले.


नर्मदा मैयेच्या घाटावर स्नान करण्याचा मोह आवरता आला नाही.  दोघांनी डुबकी मारून... तयारी केली...  सोबत असलेल्या नर्मदा जलाची यथासांग पूजा अर्चना केली.

थंडी वाढू लागली होती. आठ वाजता भोजन प्रसादीची व्यवस्था झाली. आमच्या सोबत बकावां केंद्रात  नागपूरचे पाच परिक्रमावासी होते.

भोजन प्रसादी आटपल्यावर बाजूच्या सीताराम धाम आश्रमात गेलो. सीताराम बाबा आणि रामदास बाबा यांचे आशीर्वाद घेतले. येथील राम मंदिरात सुरू असलेले सुंदररकांड श्रवण करण्यासाठी बसलो.  सुंदरकांडातील दोहे हिंदी नेमाडी भाषेत होते. परंतु त्यात असलेला ताल आणि बाबाजींचे स्वर यांनी ब्रह्मनंदी टाळी लागली.

दिवसभरात ६० किमी सायकलिंग झाले होते. रात्री साडेदहा वाजता निवांत झोपी गेलो.

आमच्या सायकल परिक्रमेचा प्रथम दिवस...   सकाळपासून रात्री पर्यंत ...नव्या गाठी-भेटींनी तुडुंब भरलेला होता... परंतु या सर्व भेटी... खूप जुने ऋणानुबंध असावेत अशा  होत्या...

ही तर नर्मदा मैयेची कृपाच होती...

एका समान धाग्याने सर्व जोडलेले होते... तो म्हणजे प्रेमाचा धागा... आणि नर्मदा मैया साथीला असणे...

नर्मदे हर !!!

सतीश जाधव
मुक्त पाखरे....

Wednesday, December 30, 2020

नर्मदा परिक्रमा.. ओमकारेश्वर दर्शन

नर्मदा परिक्रमा... ओमकारेश्वर दर्शन

२८.१२.२०२०

सकाळी गजानन महाराजांच्या काकड आरतीने जाग आली. सायकलच्या कॅरी बॅगचा पांघरुण म्हणून चांगला उपयोग झाला. नवीन घेतलेल्या स्लीपिंग बॅगमुळे बाहेरील थंडी जाणवत नव्हती. वातावरणातील अल्हाददायक गारव्यामुळे मन तजेलदार झाले होते. अर्धा तास मेडिटेशन केले. सकाळचे प्रातर्विधी आटपले. थंड पाण्याने मस्त आंघोळ केली.

कपडे घालून तयार होई पर्यंत, संजय जागा झाला होता. सकाळीच स्वतःचे कप घेऊन आम्ही भोजनगृहकडे गेलो. अर्धा अर्धा कप चहा घेतला. सकाळची न्याहारी तयार होती. गरमागरम उपमा आणि कांदापोहे  घेतले. नास्ता झाल्यावर मंदिर परिसराचे फोटो काढले.

संजयची तयारी झाली. आम्हाला काल भेटलेले पुण्याचे दोन सायकलिस्ट शिरीष देशपांडे आणि ओंकार ब्रम्हे सायकलने आज नर्मदा परिक्रमा करायला निघाले आहेत.  त्यांना भेटून खूप आनंद झाला. सायकलिस्टला सायकलिस्ट भेटला, म्हणजे घरातला माणूस भेटला असा भाव निर्माण होतो. 

ओंकारच्या मामामुळे (शेवडे) आज दोघेही सायकल परिक्रमा करीत आहेत. त्यांना भरपूर शुभेच्छा देऊन निरोप घेतला.

आम्ही सायकलवरून ओमकारेश्वर मंदीराकडे प्रस्थान केले. नर्मदेवर असलेल्या झुलत्या पुलावरून सायकल घेऊन मंदिराजवळ गेलो. 

पंधरा मिनिटात दर्शन झाले. सध्याच्या परिस्थितीमुळे मंदिराचे गर्भगृह बंद  केले आहे. त्यामुळे दूरवरून दर्शन मिळाले. तेथून आदि शंकराचार्यांच्या  गुंफेत गेलो. येथेच शंकराचार्यांनी, नर्मदेच्या स्तुपिपर नर्मदाष्टक स्तोत्र रचिले.


मंदिर परिसरात संजयने गो प्रो कॅमेऱ्याने भरपूर शूटिंग केले. संजयची एक गोष्ट खूप आवडली... ती म्हणजे नर्मदा परिक्रमा अनुषंगाने भेटणाऱ्या बाबाजी-मैयाजी यांना बोलते करून त्यांची माहिती शूट करणे.

ओमकारेश्वर मंदिराकडून आम्ही ममलेश्वर मंदिरात आलो. भोलेनाथाचे दर्शन झाले.

 दक्षिण तटावर असलेल्या या मंदिराच्या गोमुख घाटावरून संकल्प पूजा करून परिक्रमा सुरू होते. गोमुख घाटावर गेलो. तेथून जुन्या बस स्टँड मार्गे जुन्या पुलावर आलो. येथून नर्मदा मैया, ओमकारेश्वर आणि ममलेश्वर यांचे विहंगम दर्शन झाले. खूप फोटोग्राफी केली. समोर ओमकारेश्वर धरणाची भिंत दिसत होती. 
आम्हाला परिक्रमा प्रमाणपत्र घ्यायचे होते. गजानन महाराज आश्रमाबाहेरील गोस्वामी चहावाल्याकडे चौकशी केली असता त्याने नव्या बस स्टँड जवळील मंगलदासबाबाजींचे नाव सांगितले.

सायंकाळी पाच वाजता बाबाजींच्या आश्रमात गेलो असता बाबाजी आराम करत आहेत असा निरोप मिळाला, म्हणून आश्रमतच थांबलो. या आश्रमात हनुमान आणि गणेशाचे जोड देऊळ आहे. 

साडेपाच वाजता मंगलदास बाबाजी आले. ते परिक्रमा समितीचे मंडल अध्यक्ष आहेत.

बाबाजींनी आम्हाला कोणतेही पैसे न घेता  प्रमाणपत्र दिले. प्रमाणपत्र देण्याचे काम बाबा सेवाभाव म्हणून करतात.

तुम्ही नर्मदा मैयेची परिक्रमा करता आहात परिभ्रमण नाही. त्यामुळे परिक्रमा अंतरात मोजू नका,अंतरंगात मोजा. नर्मदेच्या किनाऱ्यावरील प्रत्येक घाट तपोभूमी आहे. काठावर असलेल्या साधू संत महंत यांच्या आश्रमांना भेटी द्या. प्रेमाने कोणी काही दिले तर अव्हेरू नका. तुम्ही फक्त परिक्रमावासी आहात, त्यामुळे अधिकारी, व्यावसायिक, डॉक्टर, इंजिनियर हे सर्व मुखवटे उतरवून एक सर्वसामान्य माणूस म्हणून परिक्रमा करा. पर्यावरणाचे भान राखा. तुमच्यामुळे कोणाला दुःख किंवा त्रास होईल असे वागू नका. तुमचा क्रोध आणि अहंकार कमी झाला तरच खऱ्या अर्थाने परिक्रमा करत आहात. हे लक्षात ठेवा. मंगलदास महाराजांची ही संत वाणी म्हणजे साक्षात नर्मदा मैयाचा आदेश आहे... याची अनुभूती झाली.

या आश्रमात वकील मनोज माने यांची भेट झाली. यांनी सहकुटुंब तीन वेळा नर्मदा परिक्रमा केली आहे.  ते म्हणाले, 'नर्मदा परिक्रमा करताना जास्तीत जास्त आश्रमांना भेटी द्या... संत महंतांची वाणी श्रवण करा... जीवनाचे तत्वज्ञान उलगडत जाईल. त्यांनी एक मौनीबाबा संतांना लिहून प्रश्न विचारला होता, " What is God"  लिहून उत्तर मिळाले, " God is Love"

माने म्हणाले, जेव्हा मुंबईतील वकिली कामातून उसंत मिळते तेव्हा ओंकारेश्वरला सहकुटुंब कार घेऊन येतो. गेली सोळा वर्ष त्यांचा हा नित्यनियम आहे. प्रचंड सकारात्मक ऊर्जा त्यांच्या ठायी जाणवली. तीच ऊर्जा घेऊन आम्ही सायकल परिक्रमेला सुरुवात करतोय.

सायंकाळी पुन्हा मंगलदास स्वामींच्या आश्रमाला भेट दिली. स्वामीजींनी गोपाळकृष्ण शाळीग्राम रूप दाखविले. स्वामींनी आमच्या सायकल परिक्रमा मार्गात काही सुधारणा सुचविल्या. नर्मदा मैयेच्या जास्तीत जास्त सान्निध्यात राहण्याचा प्रयत्न करा. पुढे पुढे तुम्हाला कोणतीही अडचण आली तरी मैयाजी तुमच्या साथीला असणार आहे.

आमच्या परिक्रमेला स्वामीजींचे आशीर्वाद आणि माने कुटुंबियांच्या सदिच्छा मिळाल्या. मनोज माने कारने  आम्हाला सोडायला गजानन महाराज आश्रमापर्यंत आले होते. मंगलदास स्वामींनी उद्याच्या संकल्प पूजेसाठी पाठक गुरुजींची गाठ घालून दिली.

'तुम्हाला परिक्रमा करण्याची अनुभूती कशी झाली?' या प्रश्नावर वारकरी संप्रदायाच्या मोरे महाराजांनी दिलेली माहिती खूपच प्रभावी होती.


लोककल्याणासठी परिक्रमा करतोय, शेतकरी होतो... कुटुंब निवर्तल्यावर... पंढरीच्या वारीने भ्रमंती सुरू केली. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी... बाकी पायी भारत भ्रमंती... आळंदी वरून पायी ओमकारेश्वरला आलेल्या मोरे महाराजांची ही तिसरी परिक्रमा होती. परिक्रमेत भेटणाऱ्या दिनदुबळ्या, गरीब मूर्तींना (लोकांना) चहा पाजणे... जेवू घालणे ... मदत करणे.. तरुणांना वारीसाठी-परिक्रमेसाठी उद्युक्त करणे .. हेच त्यांनी आयुष्यभर घेतलेले व्रत आहे... पांढरा सदरा, पांढरे धोतर आणि खांद्यावर भगवी पताका घेऊन,  जय जय रामकृष्ण हरी जप करत हसतमुखाने उर्वरित आयुष्य लोकासेवेसाठी व्यतीत करीत आहेत.

सिंघाजी गावचे रामप्रसाद परिक्रमा करायला निघाले आहेत. 

त्याच्या गावात अखंड ज्योती आहे.  त्यांचे म्हणने, 'चलते चलते दुनियासे चले जावो, इसमे जीवन जीनेका असली मजा है'.  त्यांचे वडील ९५ वर्षाचे असताना हसत खेळत देवाकडे निघून गेले.

आमच्या सायकल परिक्रमेच्या पूर्व संध्येला भेटलेल्या परिक्रमावासी, नर्मदेचे भक्तगण, साधुसंत यांनी आमच्या परिक्रमेच्या संकल्पना बदलून टाकल्या होत्या.

नर्मदा आमच्या कडून काय काय कार्य करून घेणार आहे... हे नर्मदा मैयाच जाणे...

नर्मदे हर !!!

सतीश जाधव
मुक्त पाखरे.....

Monday, December 28, 2020

नर्मदा परिक्रमा!!! इंदोर ते ओमकारेश्वर

इंदौर ते ओमकारेश्वर सायकल वारी

२७.१२.२०२०

सकाळी साडेनऊ वाजता अगदी वेळेत अवंतिका एक्सप्रेस इंदोर स्टेशनला पोहोचली. स्टेशन मधील पेंटींग्स मनमोहक होती.

 स्टेशनवर संजयचा मित्र मनोज कुमार शर्मा आम्हाला रिसिव्ह करायला आला होता. संजयचा सायकल बॉक्स लगेज मधून मिळविला, तेथून मनोज कुमारच्या घरी पोहोचलो. वाटेत मनोजने इंदोरचे प्रसिद्ध घंटाघर दाखविले. 

सायकल असेंबल करून फ्रेश होईपर्यंत शर्मा भाभीने जेवणाची व्यवस्था केली. पराठे, पनीर-वाटाणा भाजी, दही, मसाले भात, चटणी आणि फ्रुट सलाड असा फर्मास बेत होता. जेवणानंतर गोड पदार्थ रसगुल्ल्याचा आस्वाद घेतला.

इंदोर जवळील देवमुरारी गावातील 'नालंदा सिजन ऑफ जॉय' कॉलनीत राहणारे मनोजचे चौकोनी कुटुंब अतिशय भावले. मानसी आणि मानवी या छोट्या मुली अतिशय गोड होत्या.
 मनोज स्वतः सायकलिस्ट आहे. विशेष म्हणजे घरात चार सायकल्स आहेत. सर्व कुटुंब सायकल वरून सैर सपाटा करीत असते. मनोजला वाचनाची खूप आवड आहे, हे घरातील पुस्तकांनी भरलेल्या सेल्फ मधून जाणवले. नर्मदा परिक्रमेच्या सुरुवातीला ह्या प्रेमळ कुटुंबाची ओळख ही नर्मदा मैयेची कृपाच म्हणायला हवी. 

शर्मा कुटुंबाचा निरोप घेऊन सायकलिंग राईडला दुपारी २ वाजता सुरुवात केली. येथून ओमकारेश्वर ७८ किमी आहे. सुरुवातीला साधारण तीन किलोमीटर आग्रा-मुंबई हायवे लागला. ह्या रोडला सर्व्हिस रोड असल्यामुळे निवांत सायकलिंग चालले होते. पुढे ओमकारेश्वर आणि खांडवा कडे जाणाऱ्या रस्त्यावर डावीकडे वळलो. हा रस्ता दोन पदरी असल्यामुळे डाव्या बाजूने अतिशय सावधगिरीने सायकलिंग करावे लागत होते. किशोर कुमारचे खांडवा हे जन्मगाव १३० किमी अंतरावर आहे. 
मोठे मोठे कंटेनर जेव्हा मागून हॉर्न मारत, तेव्हा रस्त्याच्या खाली उतरण्याशिवाय मार्ग नव्हता. MTB सायकलमुळे ऑफ रोडिंग सायकलिंग सोपे होत होते. 

बरेच मोटारसायकलवाले स्पीड कमी करून आमची चौकशी करत होते. आयआयटी सीमारोल गावातील निर्भय सोनी या गृहस्थानी मोटारसायकल थांबवून आम्हाला  पुढे पाच किमी अंतरावरील घरी चहा पिण्यासाठी येण्याचे आमंत्रण दिले. सीमारोल गावाच्या रस्त्यावर त्याचा मुलगा नवनीत आम्हाला रिसिव्ह करायला आला होता. निर्भयने अतिशय प्रेमाने आम्हाला चहा पाजला. 
तो स्वतः सायकलिस्ट आहे. त्याचे सोन्याच्या दागिन्यांचे दुकान आहे. या छोट्याश्या गावात IIT आहे, याचे खूप अप्रूप वाटले. मैयाजीच्या कृपेने प्रेमाचा प्रसाद मिळत होता. 

पुढे भैरव घाट लागला. अतिशय वेडीवाकडी वळणे घाटात होती. या घाटात एका अतिशय तीव्र वळणावरून खाली उतरताना, एक मोटारसायकल घाट चढताना घसरू लागली.  त्यावर दोन लहान मुले आणि पति-पत्नी असे चार जणांचे कुटुंब सफर करत होते. ताबडतोब सायकल बाजूला पार्क करून धावत जाऊन मागून त्या मोटारसायकलला मागून आधार दिला आणि वर धक्का मारत मोटारसायकल खाली घसरून पडणार नाही याची खबरदारी घेतली. त्यामुळे होणारा अनर्थ टळला. खरच... हा नर्मदा मैयेचा आदेश असावा...

घाट उतरताच भैरव बाबाचे मंदिर लागले. या मंदिराचे वैशिट्य म्हणजे... ज्यांना वाईट व्यसन सोडायचे आहे... अशी मंडळी भैरवबाबाला सिगारेट, दारू देतात. 
तुमची वाईट व्यसने मला अर्पण करा आणि नर्मदा मैयेच्या दर्शनाला जा... असाच संदेश भैरव बाबा देत असावा का ?

वाटेत बाईग्राम गावात शनी मंदिर लागले. रेडा वाहन असलेली शनी देवाची काळी कभिन्न मूर्ती अतिशय तेजपुंज होती. शनी देवाच्या चेहऱ्यावर आश्वासक हास्य होते. . या जागृत देवस्थानात स्त्री-पुरुष सर्वांची खूप गर्दी होती. 
सहा वाजता बारवाह गावात पोहोचलो. चहाच्या टपरीवर चहा-बिस्किटे घेतली. चहावाल्याला पैसे विचारताच, त्याने हात जोडले आणि म्हणाला, 'साहब आप नर्मदा मैयाजी परिक्रमाके पवित्र कार्य मे जा राहे हो'. 'आप आधा पैसा सिर्फ  बीस रुपया देना'. हमारी तरफसे मैंयाजीको प्रणाम कहना... 
त्याच्या श्रद्धेला नमन केले. त्या गरीब चहावल्याच्या प्रेम पूर्वक अविर्भावामुळे मन उचंबळून आले. त्याच्यासह फोटो काढून पुढे निघालो. 

तासाभरात बरोबर सात वाजता ओमकारेश्वरच्या नव्या बस स्टँड जवळ पोहोचलो. मंदिर येथून दोन किमी अंतरावर आहे. जवळच असलेल्या स्वामी गजानन महाराज आश्रम संकुलात पोहोचलो. या संकुलात सर्वजण मराठी बोलतात. विशेष म्हणजे येथील  सेवक प्रत्येकाला 'माऊली' संबोधतात. 
सायकलने परिक्रमा करणारे परिक्रमावासी म्हणून आम्हाला दोन बिल्ले देण्यात आले. विशाल अशा हॉलमध्ये आमची व्यवस्था करण्यात आली. अतिशय स्वच्छ आणि शांत असलेल्या या संकुलात गजानन महाराजांचे भव्य मंदिर आहे. रात्री महाराजांच्या शेजारतीने आम्ही भक्ती रसात न्हाऊन निघालो.
इंदोर ते ओमकारेश्वर ही ७८ किमी ची सायकल यात्रा   म्हणजे सांसारिक जीवनातून अध्यात्मिक संन्यस्त जीवनाकडे केलेली सफर होती. 

नर्मदे हर !!!

सतीश जाधव
मुक्त पाखरे...