Thursday, May 13, 2021

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस अकरावा) विमलेश्वर (रत्नसागर) ते भरुच०८.०१.२०२१

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस अकरावा)
  विमलेश्वर  (रत्नसागर) ते भरुच

०८.०१.२०२१

विमलेश्वर तिर्थधाम... याला मैय्येचे चरण स्थल म्हणतात... रावणाने येथे घोर तपश्चर्या केली होती. दक्षिण तटावरील शेवटचे आणि अतिशय महत्वाचे आध्यत्मिक स्थळ... मनात एक अनामिक हुरहूर होती. हे समुद्र (रत्नसागर) आणि नर्मदा मैया यांच्या संगमाचे हे पवित्र ठिकाण आहे.

कोणत्याही नदीचा जेव्हा सागराशी संगम होतो तेव्हा सागर नदीच्या पात्रात घुसून खाडी प्रदेश तयार होतो. येथे नदीचे पाणी खारट होते. येथील नर्मदा मैया आणि सागर संगमा मध्ये वेगळी गोष्ट पाहायला मिळते ती म्हणजे नर्मदा मैय्या सागरात जवळपास २४ किमी आता घुसली आहे. त्यामुळे नर्मदा पारिक्रमेचा हा टप्पा  पार करताना नावाडी बाजूच्या खाडीतून थेट समुद्रात खोलपर्यंत नाव घेऊन जातो...एका रोमांचकारी अनुभवला आम्ही सामोरे जाणार होतो.

आजची नावेतील पारिक्रमा दक्षिण तटावरील विमलेश्वर ते उत्तर तटावरील मिठी तलाई अशी होती.

पहाटे दोन वाजल्या पासून वर्दळ सुरू झाली. पहाटे उठून सर्व तयारी झाली. विशेष म्हणजे येथे आलेल्या प्रत्येक मूर्तिकडे खाली अंथरायला कॅरीमॅट होते. पहाटे शाळीग्राम महाराजांकडून  बालभोग चहासुद्धा मिळाला. गेली सात वर्षे शाळीग्राम महाराज नर्मदा पारिक्रमावासीयांची मनोभावे सेवा करीत आहेत. मैयेची पूजा करून पहाटे  पाच वाजता जय्यत तयारीनिशी खाडी ताटाकडे जायला सज्ज झालो. बसने, मोटरसायकलने आणि पायी परिक्रमा करणारे सर्व जत्थे;  नर्मदे हर... ओम नमः शिवाय... जय सियाराम... जयघोष करीत खाडीकडे प्रस्थान करू लागले. सायकल बोटीच्या वर टाकून, तिची सुद्धा नर्मदा पारिक्रमा घडणार होती.

खाडी किनारी प्रचंड जनसागर लोटला होता... सागराचा एक पाट त्या खाडीत आला होता. अजून भरती सुरू न झाल्यामुळे त्या पाटात सागराचे पाणी आले नव्हते... वातावरणात गारवा होता. संजय आलेल्या पारिक्रमावासीयांशी चर्चा करण्यात मग्न झाला. बसने आलेल्या पारिक्रमावासीयांमध्ये महिला वर्ग मोठ्या प्रमाणात होता.

त्यांचे सामूहिक भजन सुरू होते. भक्तिमय वातावरणाने आसमंत भरून गेला होता. सागर किनारचा सूर्योदय अनुभवत होतो.  आजचा सूर्य चंद्रासारखा पांढराफेक दिसत होता. त्याची आसमंतात  पसरलेली सुवर्णप्रभा म्हणजे नेत्रसुखाचा परमावधी होता. बरेच परिक्रमावासी कुतूहलाने आमची सुद्धा विचारपूस करीत होते. आठ वाजता खाडीचे पाणी वाढायला लागले. त्या बरोबर एक-एक नाव किनाऱ्यावर येऊ लागली.

एकूण पाच नाव आल्या. दोन छप्परवाल्या आणि तीन उघड्या होत्या. नावाड्याने अतिशय दाटीवाटीने सर्व पारिक्रमावासींना अक्षरशः कोंबले. सायकल छप्परवाल्या नावेच्या टपावर बांधल्या.

पाच नावेमध्ये साधारण चारशे मूर्ती असाव्यात... नर्मदा मैय्येवर असलेल्या गाढ श्रद्धेमुळे हा खडतर प्रवास अतिशय आनंदात आणि प्रचंड ऊर्जेत सुरू झाला. सकाळी समुद्राकडून वारे वाहत होते. विशेष म्हणजे नावेत जागा नसल्यामुळे माझी टपावर बसण्याची सोय झाली होती.

चारही बाजूला वर्तुळाकार क्षितिज पसरले होते. एका बाजूला कांदळवनाचे अर्धवर्तुळाकार जंगल तर दुसऱ्या बाजूला खाडी आणि समुद्राचे अर्ध वर्तुळाकार क्षितिज; पृथ्वीची गोलाई दाखवत होता.   बोचरे वारे अंगावर घेत नावेतून सफर सुरू झाली. प्रत्येक नावेतून "नर्मदे हर" चा जयघोष सुरू होता. समुद्राच्या भरतीमुळे नाव बरेच हेलकावे खात होती. तासाभराच्या नावेतील सफरी नंतर खाली बसलेले सदस्य टपावर येण्यासाठी चुळबुळ करू लागले. परंतु नावाडी सुरक्षेच्या कारणास्तव कोणालाही टपावर सोडत नव्हता. फोटो काढण्याच्या निमित्ताने संजय हळूच वर आला. हवेशीर टपावर चणे, शेंगदाणे आणि चिक्की खाणे म्हणजे स्वर्गसुखाचा आनंद होता.

तट परिवर्तन करताना सर्व जबाबदारी नावड्याची असते. आपली जीवन नैय्या सुखरूप पार करण्यासाठी नावाड्याला भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. काही पारिक्रमावासी कपड्यांच्या भेटवस्तू कोणी रोख रक्कम, तर जे गृपमध्ये आले होते ती मंडळी एकत्रीत भेटवस्तू देत होते.

भर समुद्रात बोट गेल्यावर; समोर एक टापू दिसतो. त्या टापूजवळ नावेने  उजव्या बाजूला वळण घेतले आणि मिठीतलाई किनाऱ्यावर जाऊ लागली.

जवळपास चार तास ही नावेतील रोमांचकारी सफर सुरू होती. मिठीतलाई किनाऱ्यावर उतरून सर्वांनी "नर्मदे हर" चा जोरदार जयघोष केला. सायकल ताब्यात घेऊन पुढची सफर सुरू झाली.

आसपासचा परिसर गुजरात मधील दहेजचा इंडस्ट्रियल पट्टा होता. उन्हे वाढली होती. भूकपण लागली होती. चार किमी अंतरावरील भांगेरा येथील चंद्रमौलेश्वर महादेव मंदिराच्या कृष्णानंद आश्रमात पोहोचलो. तेथील बाबाजी म्हणाले, येथे सदाव्रत मिळेल.  कोणताही आडोसा किंवा घर नसल्यामुळे पुढे जायचे ठरले. रिलायन्स नोसिल कंपनीच्या समोर असलेल्या एका टपरीवर भोजनप्रसादी म्हणून केळी खाल्ली. तेथून पुढील पारिक्रमा सुरू झाली.

हायवेला येऊन भर उन्हात सायकलिंग सुरू झाले. दहा किमी पुढे गेल्यावर पाठपिशवी  केळ्याच्या टपरीवर राहिल्याचे लक्षात आले. संजयला तेथेच थांबवून ऑटोरिक्षा करून नोसिल जवळील टपरीवर गेलो. केळीवाल्या पंडितजींनी पाठपिशवी सांभाळून ठेवली होती. किंबहुना माझ्या पिशवीतील पारिक्रमा वहीवर असलेल्या मोबाईलवर बरेच फोन सुद्धा केले होते. पण फोन लागला नाही. केळीवाल्याचे पोटभर आभार मानून तसेच मागे फिरलो. यामुळे एक गोष्ट लक्षात आली. आपल्या प्रत्येक बॅगेत दोघा-तिघांच्या फोन नंबरचे कागद ठेवणे अतिशय गरजेचे आहे.

भोजनप्रसादीची वेळ टाळून गेली होती. जवळच चहाच्या टपरीवर कुरमुरे आणि चहा घेतला. येथून भरुच ५० किमी अंतरावर होते.  अंधार पडायच्या आत भरुच गाठायचे होते. हायवेवरील अतिशय हेवी ट्राफिक आणि हेडविंड अंगावर घेऊन भर उन्हात सायकल चालवणे ही परीक्षाच होती.

सपाट रस्त्यावर लो गियर ठेऊन सुद्धा पेडलिंग करणे जिकरीचे झाले होते. दीड तासात जेमतेम वीस किमी सफर झाली. भेेेलसली  गावात एका छोट्या टपरीवर हायड्रेशन ब्रेक घेतला. ब्रेड पकोडे भजी सोबत चटकदार मिरची आणि चहा घेऊन पुढे प्रस्थान केले.

तासाभरात भरुच उपनगर भागात पोहोचलो. भरुच बांबखाना येथील कोळीवाड्यात गुलाबभाई यांनी थांबविले. त्यांच्या मारुती गाडीच्या मागे माँ नर्मदा लिहिलेले होते. हायवेला रस्त्यात गाडी उभी करून आमच्या पुढ्यात हात जोडून गुलाबभाई उभा राहिला. तुमच्या रूपाने आमच्या दारी नर्मदा मैय्या आली आहे. तेव्हा तुमची सेवा करण्याची आम्हाला संधी द्या. सायंकाळ झाली आहे, आज  चहापान भोजनप्रसादी घेऊन येथेच रहा, असे त्याने विनवले.

पुढे दहा किमी अंतरावरील भरुच मधील प्रसिद्ध निलकंठेश्वर  महादेव मंदिरात आज विश्राम करणार होतो. त्यामुळे गुलाबभाई यांच्या घरात चहा बिस्कीट घेतली. गुलाबभाई आणि त्याचा मोठाभाऊ नर्मदा प्रकल्पग्रस्त बचाव आंदोलनात मेधा पाटकर यांच्या समवेत काम करतात.

त्यांच्यासह फोटो काढले आणि आभार मानून पुढची सफर भरुच शहरातून सुरू झाली.

भरुचचे शेंगदाणे जगप्रसिद्ध आहेत.   सायंकाळ झाल्यामुळे रस्त्यावर रहदारी वाढली होती. भरुच शहराच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या निळकंठ महादेव मंदिरात पोहोचायला सायंकाळचे सात वाजले.

त्यामुळे मंदिराचे दरवाजे बंद झाले होते. बाजूच्या दुकानात चौकशी करता. पारिक्रमावासीयांना साडेसहा पर्यंत आत प्रवेश देतात;  हे समजले. बराच वेळ थांबल्यावर एक बाबाजी आले त्यांनी आम्हाला मंदिरात प्रवेश दिला. ताबडतोब भोजनप्रसादी घेण्याची विनंती केली.

आज बोटीची सफर आणि ६० किमी सायकलिंग असा मोठा पल्ला मारला होता. ताटात भोजनप्रसादी आणून मंदिराच्या एका बाजूला असलेल्या शेड जवळ झाकून ठेवला. जवळच असलेल्या न्हाणीघरात स्नानसंध्या आटपून मैयेची पूजा केली. त्या नंतर भोजनप्रसादी सेवन केली.

नर्मदे किनारी असलेल्या प्राचीन निळकंठ महादेवाचे सुंदर मंदिर, अतिशय विशाल प्रांगण आणि नितांत स्वच्छ परिसर पाहून सर्व शीण नाहीसा झाला. अंधार पडल्यामुळे सकाळी देवदर्शन करायचे ठरविले.

जेवणखाण आटपल्यावर मंदिराजवळच्या नर्मदा घाटावर जाऊन आम्ही निवांतपणे बसलो. चमचमणाऱ्या चांदण्यात नर्मदा मैय्येचे शांतपणे वाहणे मनावर गारुड करून गेले. त्या निरव शांततेशी साधलेला संवाद वेगळी अनुभूती देऊन गेला.


पहाटे चार वाजल्यापासून सुरू झालेला आजचा अतिशय महत्वाचा दिवस मैय्येच्या घाटावर येऊन विसावला होता....

सतीश जाधव
मुक्त पाखरे....

Monday, April 26, 2021

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस दहावा)अंकलेश्वर (रामकुंड आश्रम) ते विमलेश्वर (रत्नसागर) ०७.०१.२०२१

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस दहावा)
अंकलेश्वर (रामकुंड आश्रम) ते विमलेश्वर (रत्नसागर)

०७.०१.२०२१

सकाळी अंकलेश्वर रामकुंड आश्रमातून प्रस्थान केले.  सव्वा तासात महर्षी काश्यप मुनींच्या तपोभूमीमध्ये आम्ही प्रवेश केला होता. भुरुडी-हजात गावाच्या पावनस्थळी "बलबला कुंड" हे जागृत स्थान आहे.

या आश्रमात निलकंठेश्वर महादेवाचे मंदिर आहे. मंदिरातील लिंगाला गोंडयांच्या फुलांनी अतिशय कलात्मक रीतीने सजविण्यात आले होते.

लिंगाभोवती नागदेवाची फणी पसरलेली... आणि त्यावर चांदीचे झुंबर... वातावरण भारावलेले होते... अतिशय स्वच्छ गाभारा... त्यासोबत "ओम नमः शिवाय" ची धून मनात आध्यत्मिक तरंग निर्माण करीत होते...

येथील बलबला कुंड अतिशय प्राचीन आहे. नर्मदे हर असा जयघोष करताच या कुंडातील पाण्यातून मोठया प्रमाणावर बुडबुडे पृष्ठभागावर येऊ लागले. जणूकाही उकळत्या पाण्यातून बुडबुडे यावेत तसे... या बुडबुड्यांमुळेच या कुंडाचे नाव बलबला कुंड पडले आहे.
याचे पाणी खारट आणि शीतल आहे. काश्यप ऋषींच्या तपसाधनेमुळे पावन झालेल्या या भूमीमध्ये त्याच्या तापाची ऊर्जा  जाणवते. त्या उर्जेलाच बरोबर घेऊन परिक्रमा करायची आहे. निळ्याशार आकाशाखाली हिरव्यागार पाण्यात पाय टाकून ध्यानस्थ बसलो. थंड आणि खारे पाणी त्यात नर्मदा मैयेचा सहवास... बुडबुड्याच्या या नैसर्गिक चमत्काराने जीवनाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन सापडला.

जीवन एक बुडबुड्या सारख आहे... हा बुडबुडा फुटण्या अगोदर जीवनाच्या भवसागराला पार करण्यासाठी अहंभाव, 'मीपणा' या कुंडात विसर्जित करा असा संदेश हे बलबला कुंड देते आहे... याची अनुभूती झाली..

हंसोट येथील सूर्यकुंड जवळ पोहोचलो. अतिशय शांत वातावरण...

सूर्यकुंडाच्या समोरच हंसेश्वर महादेवाचे मंदिर आहे... येथे महर्षी जबालि मुनींनी तपस्या केली होती. जबालिपुरम आणि आता जबलपूर हे शहराचे नाव जबालि मुनींशी जोडलेले आहे. नर्मदेच्या किनारी त्यांनी कित्येक वर्षे तपस्या केली होती. प्रकांड पंडित आणि चारही वेदांचे ज्ञान असलेले जबालि ऋषी नर्मदेचे निस्सीम भक्त होते.

हंसोट गावात आलो... येथे " मेथीना गोटा" अतिशय प्रसिद्ध आहे.

  थाळीत वेगवेगळ्या प्रकारच्या भजी आल्या... सोबत आंबट गोड चटणी आली... बालभोग मनसोक्त झाला... सोबत चहा होताच... पुढच्या प्रवासासाठी  ऊर्जा भरून घेतली.

वाटेत अब्दुल वाडीवाला याची भेट झाली.  चहा पाजून अब्दूलभाई  सर्व परिक्रमावासीयांची सेवा करतात.

संत तुलसीदासजींचे दोहे त्यांना अवगत होत  "दया धरम का मूल है पाप मूल अभिमान, तुलसी दया न छोडिये जब तक घट में प्राण" परोपकार हेच अब्दुलच्या जीवनाचे ब्रीद आहे.

वाटेत ऊसाची एक वेगळ्या जातीची शेती पाहायला मिळाली. या ऊसाच्या जातीला येथे 'दुक्कड' म्हणतात.

या उसाच्या डोक्यावर आलेले तुरे राजाच्या मुकुटासारखे भासत होते.  भरीव ऊसाचे खोड अतिशय कडक परंतु एकदम रसदार असते. हे कापायला कठीण असते. कारखान्यात याला चांगला भाव मिळतो.

पुढे दंतराई गावातील हनुमान टेकडी मंदिरात पोहोचलो. हनुमान मंदिर देवालयाच्या पहिल्या मजल्यावर स्थापित आहे.

   मारुतीरायचे दर्शन घेतले... त्यानंतर शनिदेवाच्या पायी नतमस्तक झालो... येथे नवग्रहांचे मंदिर सुद्धा होते. केेतू सोडला तर सर्व नवग्रह उग्र दृष्टीचे आहेत. केतूचे फक्त धड आहे.  मुंडके नसल्यामुळे त्याची उग्रता समजत नाही. सुंदर परिसर ... बरेच नर्मदा परिक्रमावासी येथे विश्रांती घेत होते.
 मोठया वडाच्या झाडाशेजारीच रामसेवक बाबाजींची कुटी होती. बाबाजींनी प्रथम चहा  आणि नंतर भोजनप्रसादी दिली. बाबाजी येथेच राहण्याचा आग्रह करीत होते. दुपारचे बारा वाजले असल्याने विमलेश्वर पर्यंत पोहोचण्याचे  लक्ष होते.

दोन तासात कठपोर येथील कोटेश्वर महादेव मंदिरात पोहोचलो. कोटेश्वर महादेव मंदिरातील लिंग, वरच्या बाजूला शंकूकृती आहे.

येथेच कोटीतीर्थ आहे. या कोटीतीर्थ कुंडाच्या मधोमध छोटेसे शिवलिंग मंदिर स्थापित आहे. या कुंडात सहस्त्र तीर्थांचे जल समाविष्ट आहे.
रत्नसागराकडे जाणारा प्रत्येक परिक्रमवासी या कुंडाचे दर्शन घेतो.  कुंडाच्या बाजूला असलेल्या विस्तीर्ण नारळाच्या झाडांमुळे रत्नसागर (समुद्र) जवळ आल्याची चाहूल लागली होती. या मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम मोठया प्रमाणावर चालू होते. बरेच परिक्रमवासी येथे विश्राम करत होते.

अर्ध्या तासात विमलेश्वर महादेव मंदिरात पोहोचलो.

येथूनच पुढे बोटीरून प्रवास करून रत्नसागर पार करायचा होता. पावणे चार वाजले होते. विमलेश्वर मंदिर परिसरात परिक्रमावासीयांची खूप गर्दी होती. बसने, मोटरसायकलने, पायी आणि सायकलने प्रतिक्रमा करणारे (आम्ही दोघे) सर्वजण एका ठिकाणी जमा झालो होतो... सायकल व्यवस्थित बांधून; हॉलच्या एका कोपऱ्यात बस्तान टाकले. काही वयस्क मंडळींची मुलाखत घेण्याचे काम संजय करत होता... उद्या समुद्र पार करणार म्हणून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह विलसत होता.

मंदिर परिसर प्रशस्त होता. नर्मदा परिक्रमेमधील दक्षिण तटावरचे हे शेवटचे आणि महत्वाचे देवस्थान आहे. त्यामुळे रत्नसागर पार करण्यासाठी प्रत्येक परिक्रमवासी विमलेश्वर महादेवाच्या चरणी येतो.

देव आणि दानवांनी समुद्र मंथन केले ते स्थळ नर्मदा मैय्या आणि सागर यांच्या संगमाचे आहे. तेथेच समुद्र मंथनातून चौदा रत्ने बाहेर आली होती. म्हणूनच या संगम स्थळाला रत्नसागर म्हणतात. 

केवट रामजीभाई सायंकाळी लॉन्च बुकिंगसाठी आले.  जे पायी किंवा सायकलने परिक्रमा करणारे आहेत त्यांच्या कडून १५० रुपये तर बस अथवा मोटारसायकल परिक्रमावासींसाठी २५० रुपये तिकीट होते. सायकलचे भाडे म्हणून प्रत्येकी एक तिकिटाचे पैसे घेतले.

मोटार सायकल पारिक्रमावासींसाठी उत्तर तटावर गाडी पोहोचविण्याची व्यवस्था होती. 

सायंकाळपर्यंत विमलेश्वर मंदिरात खूपच गर्दी झाली होती. दोन मोठ्या बस मधून जवळपास शंभर यात्रेकरू आले होते. धर्मशाळेच्या प्रांगणात पथाऱ्या मांडल्या गेल्या. गाडीवाल्या परिक्रमवासीं बरोबर जेवण बनविणारी मंडळी सुद्धा होती. बाकी पायी पारिक्रमावासींसाठी देवस्थानातर्फे भोजनप्रसादीची व्यवस्था होती.
स्नानसंध्या आटपून, मैयेची यथासांग पूजा केली. सोबत आणलेला प्रसाद मंदिरातील सर्व यात्रेकरूंना वाटला. विशेष म्हणजे सर्वांना देऊन प्रसाद उरला होता. मंदिराच्या पुजारींना प्रसाद देऊन त्याची सांगता केली. मैंय्येचा महिमा खरच अगाध आहे... कोणाला काहीच कमी पडत नाही...

भोजन प्रसादी घेऊन अंमळ लवकरच झोपी गेलो. पहाटे खाडीचा दक्षिण किनारा गाठायचा होता.

ओंकारेश्वरवरून सुरू केलेल्या रत्नसागरपर्यंतच्या परिक्रमेची  सांगता उद्या होणार होती. एकूण जवळपास ५०० किमी पारिक्रमा परिपूर्ण झाली होती.

नर्मदा मैयेला उजव्या हाताला ठेऊन केलेली दक्षिण ताटावरची एक स्वप्नवत सफर  पूर्णत्वाला गेली होती...

सतीश जाधव
मुक्त पाखरे...

Sunday, April 18, 2021

नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस नववा) राज पिपाला ते ... अंकलेश्वर रामकुंड आश्रम

 नर्मदा परिक्रमा (परिक्रमेचा दिवस नववा)

राज पिपाला ते अंकलेश्वर रामकुंड आश्रम

  ०६.०१.२०२१

   
पहाटे पहाटे हरसिद्धी माता मंदिरातील कोबड्यांनी आरवण्याचा गजर सुरू केला. मंदिर परिसरातील सर्वांना पहाटेची चाहूल लागली होती. हल्ली कोंबड्यांचे आरवणे फक्त गावाकडे पाहायला मिळते. मंदिर परिसरात या कोंबड्यांसाठी खास बसण्याच्या जागा तयार केलेल्या आहेत. चौकशी अंती कळले हे मंदिर कोंबड्यांचे मंदिर म्हणूनच प्रसिद्ध आहे.

सकाळी मैंय्येची पूजाअर्चना करून पुन्हा एकदा हरसिद्धी मातेचे दर्शन घेतले. राजपिपाला मधील हे हरसिद्धी मातेचे मंदिर शक्तीपीठ म्हणून प्रसिद्ध आहे.                                                

पुढील परिक्रमेचा आरंभ झाला. सकाळच्या तुरळक रहादारीमुळे तसेच आल्हाददायक वातावरणामुळे पेडलींगला नवा जोश मिळाला होता. तासाभरात हायवे वरील धारिखेडा गावात पोहोचलो. सूर्यनारायण आसमंतात आपल्या सात पांढऱ्या शुभ्र अश्वांच्या रथातून पूर्वेकडून दौडत येत होते.

रथाचा सारथी अरुण अश्वांच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवत संयत गतीने गगन भ्रमण करीत होता.                                                                         "आरोग्यं भास्करात् इच्छेत्" -  म्हणजे सूर्याकडून आरोग्याची कामना करावी असे शास्त्रवचन आहे... या वचनाला स्मरून आदित्य महाराजांना नमन केले. पोटपूजेसाठी धारिखेड्याच्या नर्मदा साखर कारखान्याजवळ सद्गुरू स्नॅक्सबारकडे थांबलो. सकाळी न्याहारी तयार नसल्यामुळे पापडी, कुरमुरे भेळ आणि शंकरपाळी हा बालभोग केला. सोबत फक्कड चहाचा आस्वाद घेतला.                                     आणखी तासाभराच्या राईडनंतर सारसा गावात थांबलो.  केळी खात असताना, येथे छोटे उस्ताद सायकल स्वार भेटले. गियरवाल्या सायकलबद्दलचे कुतूहल त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. "सायकल चालवायची आहे काय" हे विचारताच तो आनंदाने लाजला. थोडा वेळ आमच्या बरोबर सायकलिंग केली. त्याला प्रोत्साहन म्हणून, आमच्या पुढे त्याची सायकल ठेवली होती. खूप खुश झाला तो बालक. त्याला टाटा करून पुढे निघालो.                                          तासाभरात नावावीधा गावात पोहोचलो. रस्त्याला कडेला बरेच तंबू लागत होते. कोवळे कोवळे  हुरड्याचे कोंब वाळूत भाजण्याचे काम सुरू होते. दिनेश भाईच्या स्टॉलवर थांबलो. येथे हुरड्याला "पोंग" म्हणतात. गरमागरम भाजलेला हुरडा त्यावर रतलामी शेव आणि चाट मसाला... त्यावर लिंबू पिळलेले... नुसत्या वासानेच तोंडाला पाणी सुटले होते... हुरडा म्हणजे इन्स्टंट एनर्जी... खूप वर्षांनी हुरडा पार्टीचा स्वाद... तो ही नर्मदा परिक्रमेमध्ये... हे तर मैय्याने पूरविलेले लाडच होते... सोबत रात्रीच्या प्रसादासाठी एक प्लेट हुरडा बांधून  घेतला. 

झगरिया गावाजवळ हायवे सोडून मढीकडे निघालो. मढी येथे नर्मदा मैयेचा "रामघाट" प्रसिद्ध आहे.

नर्मदा मैय्येच्या विशाल रूपाचे दर्शन घेतले. बरेच भक्तगण, परिक्रमावासींच्या पूजा सुरू होत्या. रंगीबेरंगी कापड्यामधील महिला उपासक घाटाची शोभा वाढवीत होत्या. येथील  मंगलेश्वर मंदिरात श्रीरामजी, सितामैय्या आणि लक्ष्मण यांचे दर्शन घेतले. या मंदिरात अखंड रामधून "श्री राम जय राम जय जय राम" सुरू आहे. सन १९८७ पासून ३४ वर्ष दिवस रात्र रामधून सुरू आहे. एखादी गोष्ट सतत आणि अव्याहतपणे करणे,  यासाठी खरच आध्यत्मिक अनुष्ठान असावे लागते.

मोठं वडाचं झाड, त्यावर किलबिलणारे पक्षी, आजूबाजूला हिरवी टच्च शेती, शीतल वारे यामुळे मनपटलावर आनंदाचा बहर आला होता. तसेच नर्मदा मैंयेचे संथ वाहणे... म्हणजे जणूकाही अखंड चाललेल्या रामधूनमध्ये ती तल्लीन झाली आहे.

 थोडावेळ रामधून मध्ये मग्न झालो. सिध्दनाथ बाबांच्या आश्रमात दुपारच्या अन्नप्रसादीची व्यवस्था होती. दालचावल, सब्जी असा सुंदर बेत होता. बाबाजींनी प्रेमाने जेवुखाऊ घातलं. मैय्येच्या किनारी झाडांच्या गर्द वनराईमध्ये असलेला हा आश्रम मनाला आनंदमय शांतता देत होता. संथ वाहणारी नर्मदा आणि मढीचा आध्यात्मिक संवेदनांने भारावलेला हा परिसर मनास अतीव निस्तब्धता देत होता. 

     ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीतील ओवी मनात रुंजी घालू लागली....

  देशियेचेनि नागरपणें,  शांतु शृंगारातें जिणें ।

 तरी ओवीया होती लेणे,  साहित्यासी ।।

                                                                                            आश्रमाचे महंत जगदीशबापू रामचरणदास बाबांचे आशीर्वाद घेऊन पुढे निघालो. 

       पुन्हा झगरिया गावात आलो. या गावातील घराघरात पतंगीचा मांजा बनविण्याचे कारखाने सुरू होते.

गुजरात मध्ये मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव कार्यक्रम भरविला जातो.  या महोत्सवात देश विदेशातील पतंगप्रेमी भाग घेतात. या महोत्सवासाठीच  लाल,  पिवळा नारंगी रंगांचा मांजा बनविण्याचे काम सुरू होते. धाग्याला  रंग, फेविकॉल, ग्लू, काच यांचे कोटिंग दिले जाते. सायकलच्या रीम पासून मोठी फिरकी बनवून त्याला बनविलेला मांजा लपेटून ठेवतात. दोन दिवस उन्हात कडकडीत सुकविल्यावर तो मांजा छोट्या फिरकीत गुंडाळून विक्री साठी पाठविला जातो. या परंपरागत पतंग व्यवसायाला आता आंतरराष्ट्रीय ख्याती मिळत आहे.                                 अर्ध्या तासात गुमानदेव हनुमान मंदिरात पोहोचलो. बाजूलाच शिवमंदिर सुद्धा आहे. विशेष म्हणजे या मंदिराचा कळस म्हणजे एक शिवलिंग आहे.  येथे मारुतीरायाने शंकराची कठोर तपश्चर्या केली होती. गुमान याचा अर्थ अहंभाव, घमेंड... याचा नाश करणारे बाबा गुमानदेव हनुमान साक्षात रुपात येथे सदैव निवास करतात. हनुमंताच्या स्वयंभू मूर्तीच्या समोरच्या भागावर चांदीचा लेप लावलेला होता तर मागचा भागावर  शेंदुर लिंपण केले होते. मंदिर समोरून कुलूपबंद असल्यामुळे बाजूच्या खिडकीतून फोटो काढला. गळ्यात घातलेल्या रुईच्या पुष्पपानमालेवर चंदनाने राम राम लिहिलेले होते. 

       मंदिराच्या आतील भिंतींवर रामकथा चित्ररूपाने दाखविल्या होत्या. शबरीची बोरे ही कथा माझ्या खूप आवडीची...

निर्व्याज भक्तीची गोष्ट... देव भावाचा भुकेला असतो... त्यामुळेच भगवंताला शबरीची उष्टी बोरे अमृतासमान लागतात... आपल्या दैवताला जे द्यायचे ते उत्तम असले पाहिजे. त्यातील हिणकसपणा आपण काढून टाकला पाहिजे हाच संदेश उष्ट्या बोरातून मिळतो आणि म्हणूनच  उष्टी बोरे देणारी शबरी भावते. सर्वांना  द्यायचे ते उत्कृष्ट  असावे हाच प्रतीत होतो.                                              सातबारा" फाट्यावर पोहोचलो... हे गावचे नाव महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा जमिनीच्या सातबाऱ्याशी अतिशय जवळीक साधणारे...  त्यामुळे मनात हास्याची लकेर उठली. हा परिसर अंकलेश्वर जवळील इंडस्ट्रियल पट्टा आहे. येथे दुपारच्या वेळी रसरशीत कलिंगड खाण्याची एक वेगळीच मजा होती.  येथून अंकलेश्वर सहा किमी अंतरावर होते.                                                                 अंकलेश्वर येथील भिडभंज हनुमान मंदिरात पोहोचलो. बरेच नर्मदा परिक्रमवासी मंदिरात बसले होते.  येथे बालभोग चहाची व्यवस्था होती. येथून अर्धा किमी अंतरावर सुप्रसिद्ध रामकुंड आहे.

अंकलेश्वर येथील प्रसिद्ध आणि प्राचीन  रामकुंड तीर्थक्षेत्रावर पोहोचलो.

रावणाचा वध केल्यावर ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त होण्यासाठी  भारतातील प्रत्येक तिर्थक्षेत्रावर यज्ञ करण्याची आज्ञा गुरुवर्य वशिष्ठमुनी श्रीरामरायांना केली. अंकलेश्वर क्षेत्री आल्यावर सितामैय्याला तहान लागली. तेव्हा बाण मारून येथे नर्मदा मैय्येला रामाने अवतीर्ण केले आहे. सितामैय्याने जलपान केल्यावर येथे यज्ञ करण्याची इच्छा प्रकट केली.  रामाने शतचंडी यज्ञकरून घोर साधना केली. रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या तिर्थाला रामकुंड म्हणतात.  आजूबाजूचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. प्रत्येक परिक्रमावासी रामकुंडला आवर्जून भेट देतात.

रामकुंडाजवळच श्री रामानंददास बापू  महाराजांची धर्मशाळा आहे. गौशाळेत सायकल बांधून महंत गंगादास बापूंची भेट घेतली. बाजूच्या धर्मशाळेत निवासाची व्यवस्था झाली. सितामैय्या आणि श्रीरामाचे श्री राधाकृष्ण यांचे दर्शन घेतले.

दिवसा उजेडी अंकलेश्वर बाजारपेठेत फिरून ड्रायफ्रूट घ्यायचे ठरले. छुट्टा बाजारमधील जेनी चिक्कीवला यांच्याकडे जवळपास पन्नास प्रकारच्या चिक्क्या होत्या...

ड्रायफ्रूट चिक्की, मलाई चिक्की, पानबहार चिक्की यांचा स्वाद घेतला तसेच रात्रीच्या आरती प्रसादीसाठी खरेदी केल्या. 

रामकुंड धर्मशाळेत मोहनदास बाबांची भेट झाली. साडेतीन फूट उंचीचे बाबाजी आश्रमातील भोजनाची सर्व व्यवस्था सांभाळत होते.

जमानगर येथील आपली सर्व संपत्ती आप्तस्वकीयांना देऊन मोहनदासजी महाराजांनी रामसेवेसाठी  रामानंददास आश्रमात सर्व जीवन समर्पित केले आहे. 

धर्मशाळेत स्नानसंध्या करून नर्मदा मैंय्येची पूजा केली. सोबतचा हुरडा आणि चिक्की प्रसादी सर्व परिक्रमावासींना अर्पण केली. 

रात्रीची भोजन प्रसादी मोहनदासजी महाराज अतिशय प्रेमाने खाऊ घालत होते. रात्री थोडावेळ त्याच्याशी सत्संग केला.

मोरोपंतांची केकावली मनात तरळली...

सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो !

कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो!!

निरंतर सत्संग लाभो... सज्जनाचेंच भाषण माझ्या कानावर येवो..  मनाचा पापदोष झडून जावो... ऐहिक सुखोपभोगाची लालसा सर्वस्वी नष्ट होवो.

नर्मदा परिक्रमेचे हेच फलित असावे काय...


सतीश जाधव

मुक्त पाखरे ...



Sunday, April 11, 2021

कवी कुसुमाग्रज " यौवन"

यौवन... (तारुण्य)
*अशी हटाची अशी तटाची*

*उजाड भाषा हवी कशाला*

*स्वप्नांचे नवं गेंद गुलाबी*

*अजून फुलती तुझ्या उशाला.*


*अशीच असते यौवनयात्रा*

*शूल व्यथांचे उरी वहावे*

*जळत्या जखमा -- वरी स्मितांचे* 

*गुलाबपाणी शिंपित जावे.*

*जखमा द्याव्या जखमा घ्याव्या*

*पण रामायण कशास त्याचे*

*अटळ मुलाखत जशी अग्नीशी*

*कशास कीर्तन असे धुराचे.*

*उदयाद्रीवर लक्ष उद्यांची*

*पहाट मंथर जागत आहे*

*तुझ्यासाठीच लाख रवींचे*

*गर्भ सुखाने साहत आहे.*


*//कुसुमाग्रज//*

 *यौवन म्हणजे रसरसलेले तारुण्य, तरुण पिढी*

हे तरुणा!   अशी अरेरावीची (हटातटाची) भाषा का करतोस. यातून तुझी निराशा दिसतेय, जीवनाबद्दलची हताशा दिसतेय.

तुझ्या हाती तारुण्य आहे, तू नवनवीन स्वप्न पाहू शकतोस, धमक आहे तुझ्या मनगटात. जे हवे ते मिळविण्याची जिद्द ठेव.

जीवनप्रवास खूप खडतर आहे याची जाणीव ठेव. या दुःखांच्या वेदना उरात लपवून, कठोर परिश्रमाचे,  आनंदाचे गुलाबपाणी त्यावर शिंपड !!

या अपमानाच्या, मानहानीच्या जखमा कशाला कुरवाळत बसला आहे, त्याचे रामायण का करतो आहेस.

लक्षात ठेव ! जीवनाच्या या दाहकतेला तुला सामोरे जायचे आहे, मग अपयशाच्या अंध:काराची (धुराची) तमा का बाळगतो आहेस.

तुझ्या उज्ज्वल भवितव्यासाठी, भविष्यासाठी   उद्याचा दिवस  उजाडतो आहे, पहाट प्रकाशमान होतेय. त्या उंच पूर्वेच्या पर्वतातून (उदयाद्री-- सूर्य उगवणारा पर्वत) पहाटेच्या आशेचे किरण भूतलावर विराजत ( मंथर -- अंथरणे, पसरणे) आहेत.

तुझ्यासाठीच प्रचंड यशाच्या, सुखाच्या वाटा, या पहाटेच्या गर्भात लपलेल्या आहेत, वसलेल्या आहेत.

परिश्रमाच्या वाटेने पुढे पुढे जात रहा, तुझ्या आशाआकांक्षा पूर्ण होणार आहेत.

 तत्ववेत्यांनी मानवाच्या उत्क्रांती विषयी जी मते मांडली आहेत त्या मतांचा आशावादी आविष्कार कुसुमाग्रजांच्या या कवितेतून होतो.

सतीश जाधव
मुक्त पाखरे....