Thursday, December 3, 2020

येऊर भेट आणि समर्पयामि परिवार

येऊर भेट आणि समर्पयामि परिवार

३ डिसेंबर,२०२०

ध्येयवेडा तरुण अजय ललवाणीला निरोप देऊन ठाण्याकडे प्रस्थान केले. अजयची मुलाखत घेतल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती. येऊरच्या पायथ्याला येऊन प्रशांतला फोन केला. घरगुती कामामुळे तो येणार नव्हता. 

येऊरच्या पायथ्याला मार्तंड चहाचे दुकान हल्लीच सुरू झाले आहे. तेथे पुणेरी क्रीमरोल सुद्धा मिळतात. दोन चहा आणि खुसखुषीत क्रीमरोलचा आस्वाद घेऊन पेटपुजा केली.  आज गियर सेटिंग एक-चार लावून येऊर लूप चढायला सुरुवात केली. वाटेत खाली उतरणाऱ्या हसतमुख गुरुप्रीतची भेट झाली. 

समर्पयामि शॉपिवर पोहोचलो... दारातच स्नेहाची भेट झाली. ती सायकल घेऊन लूप मारायला निघाली होती. पाटलोण पाडा पर्यंत गेली असावी स्नेहा... आणि परत आली गुरुप्रीत आणि आशूला घेऊन... तिच्या सायकलिंग ग्रुपचे हे दोघेही प्राईम मेंबर आहेत. 

राजेश कयाल आपल्या मित्राला घेऊन आला होता. समर्पयामीचे सुपर सायकलिस्ट बलवंत यांची खूप दिवसांनी भेट झाली. हसमुख डॉ नरेंद्रची सुद्धा एन्ट्री झाली. स्नेहाकडे काहीतरी चुंबकीय शक्ती असावी... त्यामुळेच समर्पयामि परिवारातील सदस्यांची वर्दळ शॉपिवर वाढली आहे. स्नेहाचा चहा तेव्हढ्यातच आला.

आशु मित्तल आणि गुरुप्रीतला आपला बगीचा स्नेहाने दाखविला. पारिजातकाच्या फुलाला मंदार सुद्धा म्हणतात हे तीला कळले. आशुने त्यांच्या भाषेत पारिजातकाच्या फुलाला सिंगारफुल म्हणतात हे सांगितले. यावर " शाळेत शिकविलेल्या  मंदारमाला अक्षरगण वृत्ताची सुंदरता सांगितली,  "मंदारमाला रमालाच लाभे, उभा वृक्ष तो सत्यभामां गणी"

 स्वर्गातील पारिजात वृक्ष रुक्मिणी आणि सत्यभामा दोघींनाही हवा होता. श्री कृष्णाने स्वर्गातून सत्यभामेला पारिजात वृक्ष आणून दिला. आपल्या अंगणात तीने तो लावला. परंतु पारिजातकाच्या (मंदार) फुलांचा सडा रुक्मिणीच्या अंगणात पडत असे... असे होते श्री कृष्णाचे प्रेम...

डॉ राजेश कांबळेचे आगमन झाले... ते टकाटक अप टू डेट सायकल घेऊनच... चिपळूणमध्ये त्याच्या सायकलची गियरवायर बदलायला सांगितली होती. प्रत्यक्षात गियर शीफ्टर जवळ ऑइल टाकून साफ केल्यावर गियर एकदम स्मूथ झाले होते. माझी कुरबुरणारी सायकल सुद्धा हिरेनने झक्कास करून टाकली. 

स्नेहाने सर्वांना घर दाखविताना... सचिन आणि काशीनाथ गायकवाड यांचे आगमन झाले. सचिन मुंबई गोवा सायकलिंग अक्षय शेट्टी सोबत करतोय... तर काशीनाथ आपल्या पत्नीसाठी सायकल खरेदी करायला आले होते... विशेष म्हणजे त्यांच्या पत्नीला कॅननडेल सायकलच हवी आहे. २०१८ साली मुंबई पोलीस खात्यामधून इन्स्पेक्टर म्हणून  निवृत्त झालेले काशीनाथ साठीत सुद्धा जेमतेम पंचेचाळीस वर्षाचे वाटत होते. क्राईम ब्रँच मध्ये काम करून सुद्धा पोलिसी खाक्या त्यांच्या देहबोलीत कुठेच जाणवला नाही.  सायकलिंग करणारी ... निसर्गात रमणारी माणसे खूप सकारात्मक असतात... याचाच प्रत्यय आला. 'माझे ब्लॉग त्यांना आवडतात', हे ऐकून खूप बरे वाटले. स्नेहाने तर पुस्तक लिहिण्याचे आवाहन केले आहे.

हसतमुख डॉ सौदामिनीचे मंदस्मित... कोणत्याही व्यक्तीचे अंतरंग समजून घ्यायला खूपच आश्वासक होते. पेशंटना आपलेसे करून घेण्याची  ताकद त्यात आहे. 

अशी ही विविधरंगी माणसे जवळून अनुभवण्याचे भाग्य मला लाभले. निसर्गाबरोबर माणसे मला खूप आवडतात याचीच ही पावती आहे...

 पुन्हा एकदा स्नेहाचा चहा आला... सायकलिंगमुळे समर्पयामि दिवसेगाणिक वाढत आहे... याचे श्रेय मयुरेश डोळस  उर्फ एक नंबर आणि आदित्य दास उर्फ काका यांना द्यायला हवे...

डॉ राजेश बरोबर परतीची राईड सुरू झाली. 

आजची राईड अजय ललवाणीला समर्पित केली आहे.

सबका मंगल हो ! ! !


सतीश जाधव
मुक्त पाखरे....

आकांक्षा पुढती गगन ठेंगणे राईड...

आकांक्षा पुढती गगन ठेंगणे राईड ...

३ डिसेंबर २०२०

डोक्यात बऱ्याच मोठया सायकलिंग राईड घोळत होत्या. "ईस्ट टू वेस्ट इंडिया इज बेस्ट" ही राईड रमाकांत महाडिक ठरवत आहेत.  दररोज दिडशे किमी राईड सतत ३५ दिवस करण्याचे खडतर ध्येय ठेवले आहे या राईडसाठी.   यात भाग घ्यायचा असेल तर दररोज साठ-सत्तर किमी सायकल राईडचा सराव करणे आवश्यक होते. 

आज सकाळी पाच वाजता घर सोडले.  संगीताच्या तालावर आणि मराठी भावगीतांच्या बोलावर.. सुरू झाली सायकल सफर... गाण्याच्या लयीवर  पायाने सुद्धा ठेका धरला होता... त्याच बरोबर मानसुद्धा शास्त्रीय संगीतावर तान देत होती... खूप वर्षांनी "कठीण कठीण कठीण किती, पुरुष हृदय बाई" हे मानापमान नाटकातील आशाताईंनी गायलेले नाट्यगीत कानी पडले यातील "हसत-हसत फसवुनी हृद्बंध जोडिते π π π" या ओळीवर आशाताईंनी घेतलेली तान ऐकून हृदयाची तार झंकारली...

माझ्याच मस्तीत पहाटेच्या मस्त मधुर वाऱ्याची झुळूक अंगावर घेत, राईड सुरू होती. सायन हॉस्पिटलच्या पुढे आलो आणि पाठीला पांढरा बॅनर लावून एक सायकलिस्ट सायकलिंग करत होता. त्याच्या शेजारी भला मोठा भगवा झेंडा लावून दुसरा सायकलिस्ट चालला होता. जवळ गेल्यावर लक्षात आले...एक आंधळा मुलगा सायकलिंग करतोय...शेजारचा भगवा झेंडावाला सायकलिस्ट त्याला मार्गदर्शन करतोय... पुढे वॉकी टॉकी घेऊन एक मुलगा मोटारसायकलवर ड्रायव्हरच्या मागे उलटा बसून त्या दोघांना त्यांच्या मागून येणाऱ्या गाड्यांबाबत मार्गदर्शन करतोय. 

हे सर्व पाहिल्यावर मोबाईलचा व्हिडीओ कॅमेरा सुरू करून त्या अंध मुलाची मुलाखत घ्यायला सुरू केली.

"अजय ललवाणी" एक पंचविशीतला युवक... मुंबई महानगर पालिकेच्या जी उत्तर विभागात आपत्कालीन व्यवस्थापन खात्यात श्रमिक कामगार म्हणून काम करणारा... शंभर टक्के अंध असलेला मुलगा... सायकलिंग करतोय... आजच्या जागतिक अपंग दिनानिमित्त... ... मुंबई महापालिकेचे नाव उज्वल करणारा अजय... एक ध्येयवेडा मुलगा... सिंधी असून अस्खलित मराठी बोलणारा अजय... निघालाय दादर(मुंबई) ते गोंदिया आणि परत मुंबई सायकलिंग करायला... हे दोन हजार दहा किमीचे अंतर बारा दिवसात पूर्ण करणार आहे... 

दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणातील श्री समर्थ व्यायाम मंदिरासमोरून त्याची ही ऐतिहासिक सायकल वारी आज सुरू झाली.  या सायकल सफरीचा पहिला पडाव १७५ किमी अंतरावरील नाशिक येथे आहे... पहाटे  चार वाजता अजयला फ्लॅग ऑफ करायला समर्थ व्यायाम मंदिराचे संस्थापक श्री अजय देशपांडे सर आणि श्री राजेश तळणीकर सर होते. या राईड साठी येणाऱ्या खर्चाचा बराच मोठा भार देशपांडे सरांनी उचलला आहे. तसेच मनपा अधिकाऱ्यांनी सुद्धा आर्थिक मदत केली आहे.

 अजय नुसता सायकलिष्ट नाही  तर विविध क्रीडा क्षेत्रात त्याने स्वतःचे नाव सुवर्णाक्षराने कोरले आहे. तो ऍथलीट आहे..., मार्शल आर्ट चॅम्पियन आहे..., उत्कृष्ट पोहणारा आहे... त्याने ज्युडो आणि स्विमिंग मध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदके मिळवलेली आहेत. नुकतीच त्याने मुंबई-पुणे-मुंबई ही १८१ किमी सायकल राईड यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. असा हा अष्टपैलू मुलगा आपले पदवी शिक्षण सुद्धा पूर्ण करतोय... काय म्हणावं या ध्येयवेड्या मुलाला... 

अजयने ऑक्टोबर २०१८ मध्ये ताश्कंद येथे झालेल्या दृष्टिहीन व मूकबधिर यांच्या जागतिक ज्यूडो स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. जून २०१९ मध्ये त्याने हिमालयातील "फ्रेंडशिप पिक" आणि ऑगस्ट २०१९ मध्ये "माउंट युनुम" ही शिखरे पादाक्रांत केली आहेत. डिसेंबर २०१९ मध्ये मुंबई-गोवा-मुंबई बाराशे किमी अंतर  सात दिवसात पार केले आहे.

 त्याने सलग दोन वर्ष जलतरण स्पर्धेत राज्य विभागीय पातळीवर फ्रीस्टाईल, ब्रेस्ट स्ट्रोक, व बटरफ्लाय प्रकारात पदके जिंकली आहेत. या खेरीज  त्याने दिव्यांगाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले आहे. तसेच तीन खुल्या मॅरेथॉन शर्यतीत त्याने भाग घेतला आहे. हा तरुण दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिरात हा गेली चार वर्ष नियमितपणे मल्लखांबाचा सराव करीत आहे. त्याने अनेक मल्लखांब प्रात्यक्षिकातही सहभाग घेतला आहे.

"माझ्या दिव्यांग मित्रांनीही पुढे येऊन असे उपक्रम करावेत, त्यात सहभागी व्हावे. कुठलीही शारीरिक क्षती;  तुमची चिकाटी, तुमचे धैर्य हिरावून घेऊ शकत नाही, उलट तुम्हाला दुप्पट सामर्थ्य देते हे आपल्याला सर्व जगाला दाखवून द्यायचे आहे". अजयचे हे बोल अतिशय क्रांतिकारी आहेत.

गेले आठ महिने सतत जाणवणारी अव्यक्त भीती अनिश्चितता, चिंता व त्यावर मात करण्यासाठी शासनाचे सर्व निर्बंध पाळून अत्यंत जबाबदारीने आखलेली ही साहसी मोहीम करोनाच्या वैश्विक महामारी वर मात करण्यासाठी केवळ दिव्यांग बांधवांना नव्हे तर इतर सर्वांनाही एक नवी उमेद, उत्साह व उभारी देईल;  असा विश्वास अजयने व्यक्त केला आहे. 

अजयचे पुढचे स्वप्न; ऑक्टोबर २०२१ मध्ये काश्मीर ते कन्याकुमारी हे ३७०० किलोमीटर अंतर सायकल वरून २५ दिवसात पार करण्याचे आहे.

"खऱ्या अर्थाने आकांशा पुढती गगन ठेंगणे" ही उक्ती अजयने सार्थ केली आहे. माझ्याकडे असलेले तहान लाडू-भूक लाडू त्याला खायला दिले. 

तसेच सायकलवर लावायचे मोबाईल पाऊच भेट दिले. त्याच बरोबर भरपूर आशीर्वाद आणि शुभेच्छा आम्हा समर्पयामि आणि मुक्त पाखरे सायकलिस्ट परिवारातर्फे दिल्या. 

 त्याच्या सोबत असणाऱ्या मंदार पाटील, संदेश चव्हाण, प्रशांत देशमुख, गोपिनाथ आरज, प्रथमेश आडवडे, भगवान पाटील, गणेश सोनावणे, रितिक कासले, निरंकार  पागडे, अण्णासाहेब घुमरे या सपोर्ट टीमचे पोटभर कौतुक केले... 

यातील भगवान पाटील हे स्वतः अंध असून उत्कृष्ट मसाजर आहेत.. ते अजयसह सर्व सायकलिंग टीमचे मालिश करणार आहेत.

आज जागतिक अपंग दिनानिमित्त सायकलिंग जगताला यापेक्षा मोठी भेट काय बरे असेल !!!

एक उत्तुंग ध्येयवादी मुलगा... अजय बरोबर सायकलिंग करायला मिळालेय हे माझे भाग्यच होते.


आजची मुंबई-येऊर-मुंबई ही ८० किमी सायकल राईड अजयला समर्पित करतो आहे.

सतीश जाधव 
मुक्त पाखरे...

Tuesday, December 1, 2020

येऊर... एक सुखद राईड...

येऊर... एक सुखद राईड

१ डिसेंबर २०२०


आज वर्षा अखेरच्या महिन्याच्या, पहिल्या दिवशी माझ्या सायकल कर्मभूमीला... येऊरला भेट द्यायचे ठरविले.  कर्मभूमी बरोबर गुरूला पण भेट देणे महत्वाचे... म्हणून काल मयुरेशला फोन केला.

सकाळी साडेपाच वाजता सुरू झाली सायकल राईड लोअर परेल वरून... माझा साथीदार जिवलग दोस्त विजय, प्रशांतसह सहकुटुंब अलिबागला फिरायला गेला आहे, त्यामुळे आज माझ्या साथीला निसर्ग होता... 

खरं आहे... भरपूर सायकलिंग करायची असेल तर कुटुंबाला सुद्धा फिरवून आणणे अगत्याचे आहे... 

छोट्या म्युजिक बॉक्स वरील किशोर-लताच्या रोमँटिक गाण्यांचा आस्वाद घेत सायकल राईड सुरू झाली... 

"हम दोनो दो प्रेमी दुनिया छोड चले",  माझे अतिशय आवडते गाणे.  हे गाणे लागताच,  प्रिय सायकलला प्रेमाने थोपटले. टायर मधून येणाऱ्या लयबद्ध आवाजात माझे गुणगुणने सुद्धा सुरू झाले. जणूकाही सायकलशी मी गुजगोष्टी करू लागलो. सकाळचे शांत वातावरण, मंद वारे आणि तुरळक रहदारी या सर्वांचा आनंद घेत मजेत आणि एका लयीत पेडलिंग करत होतो.

मुलुंड केव्हा आले कळलेच नाही. टोल नाक्यावर हायड्रेशन ब्रेक घेतला... सोबत आणलेले भूक लाडू खात असताना बरेच सायकलिस्ट ठाण्याकडे जाताजाता अतिशय मस्त स्माईल देऊन, सुप्रभात आणि टाटा करत ठाण्याकडे जात होते. माझ्या ह्या आवडत्या स्पॉटवर सेल्फी काढून दहा मिनिटातच येऊर कडे निघालो. 

येऊरच्या पायथ्यालाच माझे मनाली-लेहचे सायकल साथीदार मिलिंद गोगटेंची भेट झाली. त्यांचा एक लूप मारून झाला होता... दुसरा लूप माझ्या बरोबर सुरू केला. वर्षभरातील त्यांनी केलेली सायकलिंग मधील प्रगती आणि पराक्रम ऐकून... मी स्तिमित झालो. विशेष म्हणजे त्यांनी सायकलिंगच्या प्रत्येक किलो मीटर्सची नोंद ठेवली आहे. तसेच प्रत्येक मिनिटांचा हिशेब लिहिला आहे. त्यांनी केलेले सायकलचे मॉडीफिकेशन आणि त्यानंतर घेतलेली उत्तुंग भरारी... लय भारी... सध्या ते ताशी २८ किमी वेगाने सायकल सहज चालवतात. दररोज साधारण ५० किमी सायकल राईड त्यांच्या अंगवळणी पडले आहे. दोन महिन्यानंतर सेवानिवृत्त होणारे मिलिंद भाऊ खऱ्या अर्थाने आझाद पंछी होणार आहेत. 

मिलिंद बरोबर गप्पा मारत मारत येऊरच्या समर्पयामि शॉपीकडे पोहोचलो... आणि अहो आश्चर्यम् ... हरिओम बाबाजी आणि स्नेहा आमच्या स्वागताला दारातच उभे होते. हिरेन शॉपी उघडण्याच्या तयारीत होता. सायकल,  शॉपीमध्ये पार्क केली. 
आणखी एक आश्चर्याचा सुखद धक्का स्नेहाने दिला... तिच्या येऊरच्या नवीन घरात आम्हाला चहापणासाठी बोलावले. खरं तर... स्नेहा येऊरच्या निसर्गरम्य वातावरणात समर्पयामि शॉपी शेजारी राहायला आलीय...  हीच गोष्ट आम्हा समर्पयामि परिवारासाठी अतिशय आनंदाची आहे. स्नेहाचा बोलका स्वभाव... चेहऱ्यावरचे आश्वासक हास्य... हे प्रत्येकाला खूप भावते... मला आणि मिलिंदला स्नेहाने सर्व घर दाखवले. घरात फुलविलेला बगीचा दाखवला.  झाडाफुलांवर अतोनात प्रेम करणारी स्नेहा... सर्वांना प्रिय आहे... 

"आपण चांगले, तर सारं जग चांगले" ह्या तिच्या ब्रीदने मनात आनंदाचे तरंग निर्माण झाले.

 आयुष्यभर सर्वांसाठी जगले... आता स्वतःसाठी जगतेय... याच साठी स्नेहा येऊरच्या गर्द हिरवाईत येऊन राहीलीय... निसर्ग सोबत असताना... ती एकटी कशी असेल... मधून मधून समर्पयामि परिवार स्नेहाला भेटणार आहे... तिचा पाहुणचार घेणार आहे... मिलिंद आणि स्नेहाच्या गप्पांमध्ये मी एव्हढा रंगलो की तास कसा गेला कळलेच नाही...

शॉपीमध्ये आलो आणि अरुणा, अविनाश, शरद सिद्धार्थ यांची भेट झाली. गेल्या महिन्यात शंकर महाराज मठ राईड मध्ये सिद्धार्थची ओळख झाली होती. आज तो आणखी बारीक भासला. सायकलिंग त्याने भलतीच मनावर घेतली आहे. त्याने, दोन वर्षापूर्वीचा स्वतःचा  फोटो  मोबाईलमध्ये दाखवला...प्रचंड फरक झाला आहे त्याच्यात... आता सिद्धार्थ १५० किमी राईड करायला सज्ज झाला आहे... समर्पयामिचा प्रत्येक सदस्य एकमेकांपासून इंस्पायर होतोय... ही फार मोठी गोष्ट आहे.

 सिद्धार्थचे मित्र अभिषेक व्यास आणि वरुण टिपणीस यांची सुद्धा ओळख झाली. दोघेही उमदे आहेत. अविनाशला आझाद पंछी गृपमध्ये सामील व्हायची ओढ लागली आहे.  त्याला महाबळेश्वर राईड करायची आहे पण नोकरीच्या रजेची आझादी नसल्यामुळे पंछी पिंजऱ्यात बंद आहे.
येऊर लूप चॅलेंज मध्ये एका दिवसात सर्वात जास्त लूप मारणारा शरद माझा फेव्हरिट दोस्त आहे.

इतक्यात माझा सायकलिंग गुरूचे... मयुरेश डोळसचे ... आगमन झाले. 


मागोमाग स्नेहासुद्धा गप्पात सामील झाली. काही महत्त्वाचे काम असल्यामुळे अरुणा लवकर निघाली होती.

हिरेनने माझी सायकल तपासून ओके केली ... महाराष्ट सरकारच्या राज्य बंदी आदेशामुळे आम्ही मुंबई-गोवा-मंगलोर सायकलवारी गणपतीपुळ्याला विसर्जित करून मुंबईला आलो होतो. त्यामुळे उद्यापासून मुंबई-वैतरणा-त्रंबकेश्वर वारी करण्याचे नक्की केले होते. त्यासाठीच सायकलच्या डॉक्टरचा... हिरेनचा... हात माझ्या सायकलवरून फिरणे आवश्यक होते.

छान पैकी फोटो सेशन झाले आणि सर्वांसोबत परतीचा प्रवास सुरु झाला....

मिलिंद आणि स्नेहाच्या स्वभावाचे नवीन पैलू समजले होते... त्यात नवीन मित्रांची भर आणि जुन्या मित्रांच्या गाठीभेटी... हे आजच्या येऊर सायकलिंगचे वैशिट्य होते. 

सतीश जाधव
स्वच्छंदी पाखरे ...

 

Monday, November 16, 2020

एक सुखद अनुभव...

एक सुखद अनुभव...

१५ नोव्हेंबर २०२०

सकाळी सहा वाजता सायकलिंगसाठी घराबाहेर पडलो. 
स्वप्नाने विचारले, 'आज कुठे दौरा'.
म्हणालो, 'माहीत नाही'.

 काहीच ठरवलं नव्हतं, कुठे जायचं, कोणाला भेटायचं. दिवाळीचा दिवस मोठा, नाही आनंदाला तोटा. हा आनंद परमप्रिय व्यक्ती बरोबर व्यतीत करावा हीच मनीची इच्छा होती. 

एक विचार चमकला आणि निघालो देवनारकडे. माझे परममित्र, पितृतुल्य, ट्रेकिंगचे गुरू श्री मधुकर गीते (वय वर्ष ८०) यांच्या घरी पोहोचलो. दाराची बेल वाजवली. डोळे चोळतच गीतेंनी दरवाजा उघडला. आश्चर्यचकित झाले गीते. माझा अवतार पाहून, सायकलिंग करत आलोय, हे त्यांनी ताडले. 

मला बसवून दहा मिनिटात फ्रेश होऊन आले. आता सुरू झाली गप्पांची मैफिल. २२ नोव्हेंबर पासून मुंबई - मंगलोर सायकल वारी करतोय, म्हणूनच आजच्या दिपावलीच्या दिवशी तुमचे आशिर्वाद घेण्यासाठी आलोय !!!  खूप आनंदित झाले गीते.

*प्रदूषण मुक्त भारत* ही संकल्पना घेऊन मुंबई - मंगलोर सायकलिंग करतोय, हे ऐकून गीते एकदम खुश झाले, भरभरून आशीर्वाद दिले. 


मला आवडणारे एक आदर्श व्यक्तिमत्व. जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन खच्चून भरला आहे त्याच्याकडे. 

या वयात सुद्धा स्वतःची कामे स्वतः करणारे, ऋषीतुल्य जीवन जगणारे गीते माझे आदर्श आहेत. सकाळी अचानकपणे त्यांना भेटण्याचा विचार आला आणि  तडीस नेला याचा मला मनोमन आनंद झाला होता.

 व्हाट्स अँप, इन्स्टाग्राम, फेसबुकच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा देण्यापेक्षा, वडीलधाऱ्यांना प्रत्यक्ष भेटणे आणि त्यांचे आशीर्वाद घेणे किती आनंददायी असते याची प्रचिती आणि प्रतीती आजच्या दीपावलीच्या मोठ्या दिवशी आली.


मंगल हो सायकलिंग !!! 

सतीश जाधव
मुक्त पाखरे ...

Tuesday, November 10, 2020

श्री शंकर महाराज मठ राईड

श्री शंकर महाराज सायकल राईड

०८.११.२०२०

राजेशचा आदेश आला, आपल्याला पडघा येथील  हायवेला असणाऱ्या श्री दत्त स्नॅक्स बारमध्ये मिसळ पाव खायला जायचे आहे. तयारी झाली, गृपवर मेसेज टाकला मुंबई ते मंगलोर सायकल सफारीच्या तयारीसाठी  आज मोठी राईड करायची होती.

सकाळी सहा वाजता कळवा स्टेशन वरून सायकल सफारी सुरू झाली. सोबत विजय होता. राजेश आम्हाला वाटेतच भेटला. पंधरा मिनिटात खारेगाव टोल नाक्यावर पोहोचलो. पाच मिनिटात अविनाश आणि त्याचा मित्र सिद्धार्थ आले. मागोमाग चिराग, प्रशांत, शरद आणि प्रिन्स आले. अनपेक्षितपणे मोठा गृप झाला होता. गोबरा हसरा सिद्धार्थ खूप पॉझिटिव्ह भासला. शरद म्हणजे एनर्जीचा स्त्रोत आहे. चिरागचा स्टॅमिना खूप वाढला आहे. बोलका अविनाश एकदम खुश होता. मितभाषी प्रिन्सने गालात स्माईल दिले, तर प्रशांत आता आपलं कसं होणार अशा अविर्भावात होता. पण मला खात्री आहे की मुंबई ते मंगलोर सफारी प्रशांत सहज पूर्ण करणार आहे.

आता सुरू झाली पूर्व द्रुतगती महामार्गावरून आम्हा नऊ जणांची सायकल राईड. महामार्गावरील रहदारी टाळून, थोड्याच वेळात आंजर्ले फाट्यावरून पाईपलाईन मध्ये वळलो. वातावरण आल्हाददायक आणि प्रसन्न होते. दोन्ही बाजूला असलेल्या मोठया पाईप मधून सायकल राईड करणे म्हणजे पर्वणी होती. निवांतपणा आणि गप्पांचा बहर पाईपच्या प्रांगणात खुलून आला होता.

अविनाश माझ्या जोडीने सायकलिंग करत होता. भिमाशंकर सायकल वारीच्या गमतीजमती त्याला सांगत होतो.  म्हणाला, 'सर, तुमच्या बरोबर महाबळेश्वर राईड करायची आहे'. त्याला माझे पुढील कार्यक्रम सांगितले. त्याप्रमाणे तारखा नक्की करण्याची कामगिरी अविनाशवर सोपविली. गेल्या वर्षी प्रशांत आणि चिराग समवेत रेवस-महाड-महाबळेश्वर- वाई- पुणे-मुंबई अशी सायकल सफर केली होती.  त्या नंतर विजय बरोबर खोपोली-खंडाळा-पुणे- महाबळेश्वर-महाड- मुंबई अशी सफर केली होती. अविनाशला महाड मार्गे महाबळेश्वर सफर करायची आहे.

पाईप लाईन मधून जातानाच सूर्योदय झाला. 

समुद्रकिनाऱ्यावरून, डोंगरावरून सूर्योदय अनेक वेळा पाहिले होते. पण पाईप मधून सूर्याचा उदय वेगळाच भासला. मुंबईला पाणी पुरवठा करणारे हे पाईप म्हणजे मुंबईची जीवन वाहिनी होती, तर सूर्याचा उदय उत्साहाची, चैतंन्याची  जननी होती. मानवनिर्मित ठोकळ्यासारख्या दिसणाऱ्या इमारती या लोकेशनवर निर्जीव भासत होत्या. पाईप लाईन संपवून पिसे  पांजरापुर जवळ पुन्हा महामार्गावर आलो.

आज विजय, राजेशच्या साथीने पेडलिंग करत होता. अविनाश आणि सिद्धार्थ अव्याहत गप्पा मारत होते. चिराग प्रशांतला चिअरअप करत होता, तर शरद आझाद पंछी सारखा मागे पुढे बागडत होता. तासाभरात वडप नाक्यावर पोहोचलो. समोर दिसणारे प्रसिद्ध शांग्रीला रिसॉर्ट ओस पडले होते. चहा बिस्कीटचा हायड्रेशन ब्रेक घेतला. सकाळीच अविनाशला चणे खायची हुक्की आली. विजयने आयुर्वेदिक मसाले दूध काढले. राजेश वेळेचे गणित करत होता. टपरीवरचा चहा एकदम झकास होता. सिद्धार्थने आणखी एक कप चहा घेतला आणि सर्वांचे बिल दिले. आज तो पहिल्यांदाच ग्रुप मध्ये आला होता, त्यामुळे जाम खुश होता. उजव्या पायाला फ्लूरोसंट पट्टी लावून मोठ्या राईडसाठी आज प्रथमच बाहेर पडला होता. त्याच्या सायकलची सीट खूपच खाली होती. तिला व्यवस्थित ऍडजस्ट केली. विशेष म्हणजे अविनाश आणि सिद्धार्थच्या गळ्यात शिट्टी होती. 

दूध पिणाऱ्या राजेशला वेफर्स पाकिटांच्या मुंडावळ्यात, लग्नातल्या नवरदेवासारखे पकडले होते. आडव्या टाकलेल्या सायकलच्या लोकेशनवर गृप फोटो काढून पुढे प्रस्थान केले.

पंधरा मिनिटांचा ब्रेक घेऊन पुढची राईड सुरू झाली. हायवेला सुद्धा अविनाश आणि सिद्धार्थ बाजूबाजूने  सायकलिंग करत होते. पुढे सिद्धार्थला समजावून सांगितले.

हायवे वरून पाऊण तासाची राईड करून श्री दत्त स्नॅक्स हॉटेलकडे पोहोचलो. मोटार सायकल स्वारांची बुलेट रायडर गॅंग आली होती. एका मोटरसायकलिस्टने आमची आस्थेने चौकशी केली. आम्ही मुंबई तेे मंगलोरसाठी प्रॅक्टिस करतोय, हे ऐकून तो एकदम खुश झाला. माझ्याबरोबर फोटो सुद्धा काढला.


 खुपच गर्दी होती श्री दत्त हॉटेलमध्ये, म्हणून तेथे न थांबता खडवली बायपास जवळील स्वप्नीलच्या हॉटेलमध्ये विसावलो. मिसळपाव, वडापाव वर सर्वांनी ताव मारला. व्रतस्थ विजयने घरून डबाभर आणलेली साबुदाणा खिचडी काढली. मी तर साबुदाणा खिचडी सोबत तर्रीवाली उसळ मागविली. एका नवीन कॉम्बिनेशनचा  शोध लागला होता. साबुदाणा खिचडी आणि उसळीचा रस्सा... एकदम सरसरून डोक्याचे केस उभे करणारा... मनमुराद नास्ता झाला.

सायकलिंगचे एक बरे असते. खूब खाव... खूब पचाव... 


हॉटेल मालक स्वप्नील, राजेशचा दोस्त निघाला. राजेश पेशाने नुसता डॉक्टर नाही तर एक अतिशय चांगला सहृद माणूस आहे. त्याच्या लाघवी बोलण्याने अनोळखी माणसेंसुद्धा चटकन त्याचे दोस्त होतात.

खडवली स्टेशनकडे राईड सुरू झाली.  रस्ता  छोटा.. दोन्ही  बाजूला झाडी.. रहदारी नाही... त्यामुळे पेडलिंगचा जोर वाढला होता. पंधरा मिनिटात भातसा नदीवरील पुलावर पोहोचलो.  

तेथेच शेजारीच धम्म विपुल विपश्यना केंद्र आहे.  नदीच्या एका किनाऱ्याला बरेच तरुण अंघोळीसाठी पाण्यात उतरले होते. तर दुसऱ्या किनाऱ्यावर  दशक्रिया विधी चालू होते. नदीत उतरण्याचा मोह आवरता घेतला. सिद्धार्थ आणि शरदला काही कामानिमित्त घरी लवकर पोहोचायचे होते.

खडवली स्टेशनच्या रेल्वे लेव्हल क्रॉसिंग जवळ दहा मिनिटे थांबावे लागले. त्यात राजेश, विजय, शरद, अविनाश चुळबुळ करत पलीकडे गेले.  परंतु बाकीच्या साठी थांबणे त्यांना क्रमप्राप्त होते.

पुढे फाळेगावात मासे बाजार भरला होता. शरदने गिमिक केले. एक ताजी फडफडीत कोळंबी खाण्याचा प्रताप केला.

तर बऱ्याच महिन्याने पाहिलेला लांबसडक वाम मासा उचलून झकास फोटो काढला.

पुढे चढ-उताराचा  रस्ता सुरू झाला. उन्हाचे चटके जाणवू लागले होते. परंतु आजूबाजूला झाडी असल्यामुळे पेडलिंग सुसह्य झाले होते. दिड तास राईड झाल्यावर काळू नदीवरील 'रुंदे पुलावर' आलो. नावाप्रमाणेच हा पूल दोन गाड्या सहज पास होतील एव्हढा रुंद होता. काळू नदीचा अतिशय विहंगम नजारा होता. शांत निवांत निळे पाणी आजूबाजूला रंगांची उधळण करणारी झाडी. त्यांचे  प्रतिबिंब, जलात उतरलेली नभाची निळाई. काय वर्णावा हा देखावा ! ! !

मनात शब्दांची बरसात सुरू झाली....

निळे नभ जलाशयी ओथंबूनी पाहे स्वतःला

जलाशये धरुनी ठेविले नभाच्या प्रतिबिंबाला

नदीकाठच्या तरु वेलींनाही नाही मोह आवरला

वाऱ्यासवे झुलताना जलात न्याहळती स्वतःला

रंगीत गंधित पुष्प लतावेली कुजबुजती वाऱ्याला

पक्षी फुलपाखरे न् भुंगे अधिकच गमती तयाला

प्राणवायू तो हवेत मिसळी तरुलतांनी सोडलेला

वाहत्या जलाने ही अवचित स्वतःत सामावला

जल लहरींनी निळा जलाशय मनमोहक सजला

निळ्या मनमोराचा पिसारा क्षणार्धातच फुलला

शिणवटा सायकल वीराचा क्षणार्धातच संपला

सायकल सुद्धा सुखावली..

जलासंगे बोलू लागली..

तुझ्याचसाठी आले येथे...

कोलाहल सोडून तेथे..

तुझ्याच रंगात रंगले मी

आनंदाची उठली उर्मी

डोळे मिटावे तुला बिलगावे

या चित्राचा भागच व्हावे

सगळे वाटे कवेत घ्यावे

अन् असेच हरवून जावे...

पुलकित मनाने निशब्द गावे

रंगीत आनंदित फुलपाखरू व्हावे.


खरंच दत्तगुरूंचे परमशिष्य श्री शंकर महाराजांचा मठ काळू नदी वरील रुंदे पुलाशेजारी का आहे याचा उलगडा झाला. ह्या नदीचा संगम पुढे आंबिवली जवळ भातसा नदीशी झाला आहे.

पूल ओलांडताच टिटवाळा हद्द सुरू झाली. शेजारीच असलेल्या श्री शंकर महाराजांच्या मठात गेलो. अतिशय सुंदर वास्तू... पावित्र्यपूर्ण वातावरण... सोशल डिस्टनसिंग पाळून मठात प्रवेश सुरू झाला होता. श्री शंकर महाराजांचे दर्शन घेतले.

सभामंडपात थोडावेळ ध्यानस्थ झालो.  महाराजांची प्रतिमा असलेला गाभारा आकाशातील ग्रह ताऱ्यांनी सजविला होता. निसर्गाच्या दुनियेतून अध्यात्माच्या विश्वात प्रवेश झाला होता. ही वेगळीच शांतता होती. स्थितप्रज्ञतेची प्रथम पायरी मठात मिळाली. शेजारीच ध्यान केंद्र सुद्धा आहे. सर्वांनी पहावी, अनुभवावी अशी ही वास्तू... एका पवित्र मंगलमय वातावरणाने व्यापली होती.  मला महाराजांच्या मठात नेण्याची राजेशची मनोकामना पूर्ण झाली होती. आजच्या राईडचे ही फलनिष्पत्ती होती.

येथून फक्त तीन किमी अंतरावर टिटवाळा, श्री महागणपती मंदिर आहे. मंदिराकडे जाण्यासाठी सायकलिंग सुरू झाली. साडेअकरा वाजले होते. पंधरा मिनिटात गणपती मंदिराकडे पोहोचलो. शरद, सिद्धार्थ, अविनाश पुढे निघाले. बाकीचे मंदिराजवळ गेले. मुख्य दर्शन बंद होते. कळसाचे दर्शन घेऊन आम्ही कल्याणकडे प्रस्थान केले.

कल्याण माळशेज हायवेच्या तिठ्यावर पोहोचलो. येथे पुढे गेलेली मंडळी नारळ पाणी पीत होते. चिराग  आणि प्रशांतला  उसाच्या रसाची लहर आली. त्यांच्यात मी सामील झालो. आता प्रिन्स सुद्धा पुढे जाणाऱ्या मंडळीत सामील झाला.

उन्हाचा कडाका जोरदार जाणवू लागला. दहा किमी राईड करून शहाड स्टेशन जवळील पुलाच्या अलीकडे हायड्रेशन ब्रेक घेतला. विजय म्हणला, 'आपण ट्रेनने जाऊया'. दुपारच्या उन्हात राईड करण्यापेक्षा रेल्वे सोईस्कर वाटली. प्रशांत, चिराग आणि राजेश यांना टाटा केला. त्यांनी ठाण्याकडे राईड सुरू केली.

आजच्या ६२ किमी सायकल सफरीची सांगता शहाड स्टेशनला झाली.

रमणीय तानसा पाईप लाईन, रखरखीत नाशिक महामार्ग, निसर्गरम्य पडघा टिटवाळा रस्ता, भातसा आणि काळू नदीचे दर्शन, शांत निवांत श्री शंकर महाराज मठ, बंद टिटवाळा गणपती मंदिर या सर्व गोष्टींना एकत्र आणण्यासाठी राजेशची धडपड खरोखर वाखाणण्याजोगी होती. मित्रांसह सायकलीवर बसलेले प्रेम त्याला आता स्वस्थ बसू देत नाही, हेच आजच्या राईडचे वेगळे वैशिष्ट्य होते.

सतीश जाधव
मुक्त पाखरे...

Wednesday, November 4, 2020

श्री भीमाशंकर सायकल वारी... दिवस दुसरा

श्री भीमाशंकर सायकल वारी

27 ते 29 ऑक्टोबर 2020
 
// दिवस दुसरा //


     आज सकाळी सहा वाजता जाग आली. तासाभरात दोघेही तयार झालो, पुढच्या राईड साठी. सकाळी फाईव्ह स्टार नाश्त्याची व्यवस्था होती, पण त्यासाठी आठ वाजेपर्यंत थांबावे लागणार होते. आजची राईड सुद्धा बरीच मोठी होती आणि वेळेचं गणित जमावयाचे असल्यामुळे रमाकांतने आणलेला प्रोटीन शेक प्यालो.

 सकाळी स्क्विरल रिसॉर्टचा नजारा  वेगळा आणि विहंगम दिसत होता. डोंगराच्या कुशीत वसलेले हे रिसॉर्ट अतिशय कल्पकतेने घडविले होते. गावापासून दूर असल्यामुळे वर्दळ आणि रहदारी पासून मुक्त होते. आसपासचा संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला होता. रिसॉर्ट मधील बाकदार वळणावळणाचा रस्ता शेवटी रेस्टॉरंटपर्यंत जात होता. खरं तर या रिसोर्टमध्ये संपूर्ण दिवस राहून येथील अँबियन्स एन्जॉय करायला हवा होता. श्री भिमाशंकरच्या पायथ्याला बांधलेल्या या रिसॉर्टमुळे येथील जनजीवनाची सुबत्ता प्रतीत होत होती.

रिसॉर्टमधूनच अजितला फोन केला आणि पुढील सफरीला निघालोय याची माहिती दिली. तसेच जुन्नरकरांबरोबर हा संपूर्ण परिसर सायकलने पुन्हा एकदा फिरण्याचा मानस व्यक्त केला. रिसॉर्टच्या बाहेर पडल्यावर चहाची टपरी लागली. तेथे चहा सोबत भूकलाडू खाऊन पाण्याच्या बाटल्या आणि पोटल्या भरून घेतल्या. आता चढाची सफर सुरू झाली. येथून श्री भीमाशंकर मंदिर ३६ किमी आहे. 

पुढचे वळण घेतल्यावर  डिंभे धरणाची प्रचंड मोठी भिंत दिसू लागली. रमाकांत म्हणाला, 'हा घाट थोडा वर चढून गेल्यावर तेथून डिंभे धरण आणि संपूर्ण पाणलोट क्षेत्राचा नजारा अतिशय विहंगम दिसतो'. रमाकांतने सांगितलेले 'थोडे' वर चढायला अर्धा तास लागला. घाट रस्त्याचे अंतर थोडे असले तरी दमछाक करणारे असते. सकाळचे आठ वाजून गेल्यामुळे ऊन चढायला सुरुवात झाली होती. 


घाटाच्या एका पॉईंट वरून डिंभे धरण दिसू लागले. हे धरण घोड नदीवर बांधलेले असून येथे पाच मेगा वॅट क्षमतेचे वीज केंद्र आहे. 
आसपासच्या १९ गावांची जवळपास ३४ हजार एकर जमीन जलसिंचनाखाली आणली आहे. या धरणामुळे आंबेगाव तालुका सुजलाम सुफलाम झाला आहे.

धरणाच्या लोकेशनवर फोटो काढले. शेंगदाणा लाडू खाऊन पुढे प्रस्थान केले. रस्त्याची परिस्थिती गंभीर होती. त्यामुळे रोडिओ चालविणारा रमाकांत तीक्ष्ण नजरेने पेडलिंग करत होता. रोडिओला शॉक ऑबसॉरर्बर नसल्यामुळे खांद्यावर खूप प्रेशर येते. परंतु सर्व आघात सहन करण्याची प्रचंड मानसिक ताकद रमाकांतकडे होती. तसेच मध्ये मध्ये येणारे चढ आणि अडथळे याची माहिती रमाकांत सतत मला देत होता.  सायकल नुकतीच सर्व्हिस केल्यामुळे माझी सायकलिंग निवांतपणे सुरू होती. उत्तम प्रतीच्या सायकलमुळे शारीरिक इजा होण्याचे प्रमाण अतिशय नगण्य असते. 

तळेघर पर्यंत वेडीवाकडी वळणे आणि चढ याच्याशी जुळवून घेत दोघांचेही पेडलिंग सुरू होते. बराच पुढे गेल्यावर रमाकांत माझ्यासाठी थांबत होता. आम्हा दोघांना एकमेकांच्या कुवतीचा अंदाज आल्यामुळे सहजतेने सायकलिंग होत होते. तळेघर पर्यंतचे २३ किमी अंतर पार करायला तब्बल अडीच तास लागले. आजच्या राईडचा पहिला टप्पा आम्ही पार  केला होता. ह्या टप्प्याचे एक वैशिट्य जाणवले, ते म्हणजे वाटेत लागणाऱ्या हॉटेल्सची नावे देवदेवतांची होती. हॉटेल भीमाशंकर, हॉटेल वैष्णवधाम, हॉटेल शिवशंकर, हॉटेल साई  इत्यादी. हिंदु देवदेवतांची नावे हॉटेलला देऊन नक्की काय सांगायचे असेल?  इतर धर्मियांच्या देवतांची किंवा प्रेषितांची नावे हॉटेलला दिलेली माझ्या पाहण्यात अजूनपर्यंत आली नाहीत. 

तळेघरच्या हॉटेल आनंद मध्ये मस्त ताकाची कढी वडा मिळतो, तसेच वर भरपूर कढी मिळते, असे रमाकांत म्हणाला. आज कढी वडा बनविला नव्हता. हॉटेलात मटकी आणि वाटाणा मिसळ तयार होती. तर्रीच्या वासानेच भूक खवळली.  चमचमीत मिसळ पावाबरोबर कवडेदार दही आले. मिसळीच्या तर्रीचा आस्वाद घेत,  दोन पावासोबत दोन बाऊल रस्सा ओरपला. त्यानंतर मसाले चहाने तोंडाची भगभग शमविली. 

येथून श्री भीमाशंकर देऊळ १२ किमी आहे. सगळा चढाचा रस्ता होता. देवदर्शन घेऊन पुन्हा तळेघरला यायला दोन तास लागणार होते म्हणून रमाकांतने दुपारच्या जेवणाची चौकशी सुरू केली. आनंद हॉटेलच्या मालकाने असमर्थता दर्शविली. सध्याच्या परिस्थितीमुळे जेवणासाठी वाटेत कुठेही हॉटेल उपलब्ध नाहीत हे कळले. आमच्या समोरच तोंडाचा मास्क खाली करून  एक सद्गृहस्थ मिसळ खात होते. ते हसून म्हणाले, 'चला, जेथे मी जेवतो तेथे तुमची व्यवस्था होईल'.  हॉटेल समोर असलेल्या आरोग्य केंद्रात श्री भंडारे, फार्मासिस्ट म्हणून काम करत होते. आम्ही मुंबई वरून सायकलिंग करत येथपर्यंत आलो आहोत आणि आज देवदर्शन करून तळेगावला जाणार , हे ऐकून ते आश्चर्यचकित झाले. काही गोळ्या औषध हवे काय याची त्यांनी विचारणा केली. जवळच एका घरात आम्हाला घेऊन गेले. सूर्यवंशी ताईंच्या खानावळीत  जेवणासाठी ऑर्डर दिली.  भंडारे साहेबांचे आभार मानून आम्ही श्री भिमाशंकरकडे प्रस्थान केले. 

तीन किमीवरील राजपुर पर्यंत चढाचा रस्ता असून वेडीवाकडी वळणे कमी होती. त्यानंतर भीमाशंकर वन्यजीवन अभयारण्य सुरू झाले.  निबीड अरण्य असल्यामुळे झाडांच्या गुहेतून आमची सफर सुरू झाली. उन्हाचा लवलेश रस्त्यावर नव्हता. वातावरणात थंडी होती. मोरांचे केकारव आणि दिवसा रातकिड्यांचा किर्रर्र किर्रर्र आवाज हे निसर्ग संगीत ऐकतांना "निसर्गाच्या शांततेचा आवाज" क्षणभर थांबून मनाच्या अंतरंगात साठवू लागलो. इतक्यात चीक.. चीक.. फुरर... आवाज आला. वेगळाच आवाज होता. समोरच्या झाडावर निरखून पाहिले, तर "शेकरू" माझ्याकडे टक लावून पाहत होता. तांबूस राखाडी रंगाचा लांबसडक झुबकेदार शेपूट असणारा, खारी सारखा दिसणारा परंतु खारीच्या चारपट मोठा असणारा शेकरू मी पहिल्यांदा पहिला होता.

 स्तिमित होऊन भान हरपून  त्याच्याकडे पाहत होतो. हा शेकरु उंच झाडाच्या फांदीवरून हवेत झेप घेऊन दुसऱ्या झाडावर आकाशात तरंगत जातो, हे पुस्तकात वाचले होते. त्याला पाहण्याचा दुर्मिळ योग आज या सायकल सफरीने घडवून आणला होता. सायकलिस्ट म्हणजे निसर्गसंरक्षक म्हणूनच शेकरूने दर्शन दिले असावे. डोळ्यांचे पारणे फिटले.

त्या धुंदीतच ती अवघड वेडीवाकडी वळणे सहज चढून गेलो. भिमाशंकरच्या प्रवेशदाराजवळ पोलिसांनी अडवले आणि पुन्हा वास्तवात आलो. 'पूढे जाता येणार नाही, येथूनच परत फिरायचे' हवालदार साहेबांचे फर्मान आले. त्यांना नमस्कार केला आणि सायकल बाजूला लावली. 'किती जण आहात तुम्ही',  'साहेब दोघेजण', एक जण पुढे गेलाय ! पाच मिनिटे काहीही न बोलता चौकीजवळ थांबलो. "कुठून आलात',  'साहेब, 'मुंबईवरून आलोय', 'करोना लवकर संपवा म्हणून साकडं घालायला आलोय". हवालदार साहेबांना काय वाटलं कोणास ठाऊक, मला म्हणाले, जा ! जाऊन या मंदिरापर्यंत! जास्त वेळ नका थांबू !!! पडत्या फळाची आज्ञा मिळताच सायकलवर तातडीने स्वार झालो आणि मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ पोहोचलो. रमाकांत माझी वाट पाहत होता. घडलेला वृत्तांत सांगितला. रमाकांत म्हणाला, ' मी आलो तेव्हा चौकीमध्ये कोणीही नव्हते. मंदिराकडे उतरणाऱ्या पायऱ्यासमोरच लोखंडी बॅरिकेट्स लावून रस्ता बंद केला होता. श्री भीमाशंकर कमानीचे दर्शन घेऊन दोघांचे फोटो सेशन झाले.

 येथे सुद्धा लाडवाचा प्रसाद भक्षण केला. मुंबईत  भीमाशंकर सायकल वारीचा संकल्प केला होता. त्याची पूर्तता आज झाली होती. 

वीस वर्षांपूर्वी थंडीच्या दिवसात भीमाशंकरला भोरगिरी वरून रात्री ट्रेकिंग करत आलो होतो. त्यावेळी  समोरील रस्त्यावर छोटी छोटी हॉटेल्स होती. सकाळीच एका हॉटेलमध्ये  मोड फोडलेल्या मटकीची वाफाळलेली तर्रीबाज मिसळ खाल्ली होती. वीस वर्षांपूर्वीची चव अजूनही तोंडात घोळतेय. या पट्ट्यातील मसालाच लाजवाब आहे. बाजूचा सरबतवाला सुद्धा आठवतोय. गोटी सोडा, लिंबू सरबत म्हणजे ग्रामीण जीवनाची ओळख होती. रमाकांत काही महिन्यांपूर्वी येथे आला होता तेव्हा मंदिर परिसर भाविकांनी गजबजलेला होता. परंतु आज संपूर्ण परिसर सामसूम होता. 

जुन्या आनंददायी आठवणींना उजाळा देत परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. पोलीस चेकपोष्ट जवळ हवालदार साहेबांना नमस्कार केला आणि अभयारण्यात शिरलो. आता उताराचा रस्ता होता, परंतु वाहनांची वर्दळ वाढल्यामुळे वेगावर नियंत्रण ठेवावे लागत होते. अर्ध्या तासात तळेघरला खानावळीत पोहोचलो. 

आमच्या पुढे दोन व्यक्ती होत्या. आमची चौकशी केल्यावर ही खानावळ तुम्हाला कशी सापडली याची विचारणा झाली, आरोग्य केंद्रातील भांडारे यांचे घेताच, त्यांना आनंद झाला.  त्याच आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ रमाकांत आणि डॉ चेतन यांनी आपली ओळख सांगितली. त्यांच्याशी चर्चा करताना, सायकलिंगचा उद्देश सुदृढ शरीर ठेऊन डॉक्टरांपासून चार हात लांब राहणे, तसेच  पर्यावरण  प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी हातभार लावणे आणि निसर्गभ्रमंती हा आहे. या सर्व बाबींसाठी जनमानसांना सायकलिंग करण्यास उद्युक्त करणे यासाठीच आमचे प्रयत्न आहेत. डॉ चेतन म्हणले सायकलिंगद्वारे मधुमेह सुद्धा दूर ठेवता येतो. डॉ रमाकांत, कोणती सायकल घेऊ याची विचारणा करू लागले.

  दोन्ही डॉक्टरांनी आरोग्यकेंद्राला भेट देण्याची विनंती केली. आज सुद्धा बराच मोठा पल्ला गाठायचा असल्यामुळे, पुढच्या वेळेस त्यांच्या केंद्रास भेट देण्याचे आश्वासन देऊन त्यांचा निरोप  घेतला. 

दहा मिनिटात जेवण पुढ्यात आले. वरण, भात, पोळी, पांढऱ्या भोपळ्याची भाजी, मटकीचे कालवण आणि घरचे लोणचे असे सुग्रास जेवण जेवताना घरची आठवण झाली. . मायेच्या ओलाव्यात ८० रुपयात  मिळालेले  जेवण  पंचतारांकित हॉटेलच्या जेवणाला सुद्धा भारी होते. तृप्त मनाने सूर्यवंशी ताईंचे आभार मानले आणि पुढील सायकलिंगला सुरुवात केली.

चांगले काम,  चिकाटी आणि परिश्रमपूर्वक करत असलो की प्रत्येक व्यक्ती आणि निसर्ग तुम्हाला साथ देतो याची पुन्हा एकदा प्रचिती आली. 

तळेघर कडून घोडेगावला जाणार रस्ता बायपास करून उजवीकडे राजगुरूनगर, भोरगिरीकडे जाणाऱ्या रस्त्याकडे वळलो. बायपासकडे येताच रमाकांत म्हणाला, 'एकदम जपून, अतिशय तीव्र उतार आहे'. खरोखरच ४५ अंशामध्ये खाली उतरणारा रस्ता पोटात गोळा आणणारा होता. रमाकांतची रोडिओ असल्यामुळे त्याला आणखीनच सावधगिरी बाळगावी लागत होती. उतारासह वेडीवाकडी वळणे सुद्धा सायकलचे कसब पणाला लावत होत्या. अशा उतारावर जर बारीक राळ किंवा खडी आली की सायकल कंट्रोल करणे अतिशय कठीण काम होते. हायड्रॉलीक ब्रेक असून सुद्धा हात दुखू लागले. रमाकांतच्या ब्रेक मधून तर करर्  करर् आवाज येत होता. 

शेवटी भोरगिरी राजगुरूनगर बायपास जवळील शिरगाव गावात  पोहोचलो. समोर असणाऱ्या चहाच्या टपरीवर सायकल थांबविली. त्या टपरीचे नाव होते भीमाशंकर हॉटेल. पुन्हा थोडे हसू आले. 

 हाताला प्रचंड रग लागली होती. ग्लोव्हज आणि स्किनर काढून मनगटाची आणि बोटांची कसरत केली तेव्हा कुठे रग शांत झाली. चहा पितापिता मालकाला तळेगाव दाभाडेकडे जाणारा रस्ता विचारला. रस्ता आता भीमा नदीच्या कडेकडेने चालला होता. पुढे उजव्या बाजूला वळून पूल ओलांडून भीमा नदी ओलांडली. 

आता अंगावर येणारा घाट सुरू झाला. छोटा रस्ता आणि सरळसोट चढाचा घाट जणू आमची परीक्षाच पाहत होता. त्यात खडबडीत रस्ते म्हणजे कठीण परीक्षा पेपर होता. अशा बऱ्याच परीक्षा रमाकांत चांगल्या मार्कने पास झाला होता. पण माझी पहिलीच  वेळ होती. चारवेळेला केलेली दिंडीगड सायकलिंग येथे उपयोगाला आली. त्यामुळे काठावर का होईना परंतु परीक्षा पास झालो होतो. 

धामणगावचा अवघड घाट चढून गेलो. पुन्हा  थोड्यावेळात उतार सुरू झाला. पुन्हा घाट सुरू. अशी वरखाली दमविणारी कसरत चालू होती.  आजूबाजूला शेतात काम करणारी मंडळी कुठे चाललात असे विचारायची, तळेगाव म्हटल्यावर त्यांचे चेहरे प्रश्नर्थक व्हायचे . तुम्ही राजगुरू नगर मार्गे जायला हवे होते.या मार्गाने सर्व घाटच घाट आहेत. येथील घाटाचा अनुभव घ्यायचाय आणि तुम्हाला भेटायचं होतं म्हणूनच या मार्गाने आलो. लोकांचे हसतमुख आशीर्वाद घेऊन आमचे सायकलिंग सुरू होते. आतापर्यंत पाच घाट चढून उतरलो होतो.

समोरच्या डोंगर माथ्यावर पवनचक्यांच्या रांगा पसरल्या होत्या. डोंगरावरून वाहणाऱ्या वाऱ्याचा उपयोग विद्युत निर्मिती साठी करण्यात आला होता. 

वाढत्या उन्हामुळे घाटाच्या चढावर प्रचंड दमछाक होत होती. दुपारच्या जेवणामुळे सुद्धा रिफ्लेक्सेस कमी झाले होते. दोन तासात घोटेवाडी येथे पोहोचलो. येथील चढावर प्रचंड खराब रस्ता होता. मी जोर लावून कसाबसा चढून गेलो 
रमाकांत चढ चढत असताना शेतातून एक वयस्क माणूस धावत आला आणि म्हणाला, ' थांबा साहेब थांबा.., मी दळवी, तुम्हाला ओळखलं मी, तुम्ही मागच्या वेळेस आलात तेव्हा बराच वेळ आपण बोलत होतो. माझी मुलगी सुद्धा तुमच्या इथे ठाण्याला राहते, आता शेतीच्या कामासाठी इकडे आलीय. रमाकांत चढावर असल्यामुळे  सायकल ढकलण्या शिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता.

 पुढच्या गावात रमाकांतची ओळख निघाली. शिंदे ताईंनी गुळाचा चहा आणि मारी बिस्किटे दिली. परंतु पैसे घ्यायला तयार होईनात. बळेच त्यांच्या हातात पैसे कोंबले. 

घोटावाडी गाव सोडले आणि पाठोपाठ दोन घाट लागले. त्यानंतर कुडे गावापर्यंत सरळ रस्ता होता. गावातील शंकराच्या मंदिरासमोर सभामंडप होता. थोड्या विश्रांतीसाठी थांबलो. गावातील  माणसे आणि लहान मुले पुढे आली. आमची चौकशी करू लागली. 'प्रदूषण मुक्त भारत' ही संकल्पना घेऊन आम्ही फिरतोय हे सांगितले.

गावातून बाहेर पडल्यावर संधीप्रकाश सुरू झाला.  वाटेत येथे गुराखी मुले भेटली. त्यांना गियरवाल्या सायकलचे खूप अप्रूप वाटत होते. पुढे काकूबाई मंदिर लागले. येथे बीमर लाईट सुरू केले. वाटेत समोरच्या महादेवाच्या डोंगरावर बऱ्याच पवनचक्क्या लावलेल्या होत्या. या महादेवाच्या डोंगराला वळसा मारून डोंगराच्या कडेकडेने पुढे मार्गक्रमण सुरू झाले.येथून चढ उतार चढ उतार असाच रास्ता होता.  जवळपास १७ किमी राईड झाली, त्या साठी तब्बल दोन तास लागले होते
आता अंधार पडायला सुरुवात झाली होती त्यामुळे बीमर लाईट लावून पेडलिंग सुरू केले. पुढचा रस्ता घाट माथ्यावरून पुढे पुढे सरकत होता. भामा असखेड धरणाचा पाणलोट परिसर आजूबाजूच्या गावाच्या लाईट्स मुळे चमचमत होता. पालू गावात जेवणाबाबत चौकशी केली असता पाईट गावात व्यवस्था होईल हे समजले. सर्व रस्ता घाटमाथ्यावरून असल्यामुळे बराचसा थंडावा जाणवू लागला. हेदृज गावानंतर उतार सुरू झाला. थोड्या वेळातच पाईट गावात प्रवेश केला.
गावातील कुंडेश्वर धाब्यावर पोहोचलो. आता रात्रीचे  आठ वाजले होते. चरचरून भूक लागली होती. सामिष भोजनाची ऑर्डर दिली. ढाबा अतिशय स्वच्छ आणि टापटीप होता. मालक अरुण अहेरकर याने आमची चौकशी केली. त्याला खूप आनंद झाला,  आम्ही मुंबईवरून सायकलिंग करत त्याच्या धाब्यावर आलो याचा. 
प्रथम सूप नंतर सागुती, उकडलेले अंडे, भाकरी आणि स्वादिष्ट  इंद्रायणी भात खाऊन मन तृप्त झाले.

 स्वीट डिश बाबत विचारणा केली असता, मोमो मोदक विशेष भेट म्हणून खायला मिळाले. अरुण म्हणाला येथून चार किमी वर डोंगरात प्राचीन कुंडेश्वर महादेव मंदिर आहे. पुढच्या वेळेस जरूर त्या मंदिरास भेट देऊ असे आश्वासन अरुणला दिले.  मुंबईच्या स्टार कलाकारांसारखी आमची खातीरदारी झाली. आमच्या बरोबर खूप फोटो अरुण आणि त्याच्या सहकाऱ्यांनी काढले. 
रात्रीचे नऊ वाजले होते आणि तळेगाव पर्यंत आणखी ३० किमी राईड करायची होती. तसेच दोन घाट पण चढायचे होते. सुग्रास जेवणामुळे नाईट राईड करायला दोघेही सज्ज झालो होतो. 

रस्त्यात मोटार सायकलने जाणारी मुले भेटली. मुंबई वरून सायकलिंग करत आलो आहोत, हे कळल्यावर त्यांना खूप अप्रूप वाटले. त्यांना सायकलिंग आणि प्रदूषणमुक्त पर्यावरण याची माहिती दिली. या तरुणांना आम्ही सर्व घाट चढून आलोय, हे  खरे वाटेना.  त्यामुळे पुढे जाऊन काकूबाई मंदिरा जवळील घाटात टॉपला उभे राहून आम्ही रात्रीच्या अंधारात कशाप्रकारे घाट चढतो आहोत, हे पाहात होते. हा घाट अतिशय कठीण होता. गियर रेशुओ एक एक लावून सुद्धा सायकल झिक झाक करावी लागत होती. हा घाट सायकल वरून न उतरता चढल्यावर सर्व मुले आम्हाला शेक हॅन्ड करून मागे फिरली. 

धामणी फाट्या नंतर आता बऱ्यापैकी मोठा आणि दोन पदरी रस्ता सुरू झाला. घाटात ग्रॅज्युअल चढ होता.  घाट संपवून तळेगाव midc मध्ये प्रवेश केला.

 अतिशय प्रशस्त आणि काँक्रीटच्या रस्त्यावरून सायकल चालवायला खूप कमी प्रयास लागतात. त्यामुळे गाणे गुणगुणत तळेगाव दाभाडेकडे प्रवास सुरु झाला. इंद्रायणी नदी ओलांडून  यशवंत नगर मध्ये पोहोचायला रात्रीचे साडेअकरा वाजले होते.

रमाकांतचा मित्र, अमितच्या घरी आमचा रात्रीचा मुक्काम होता. अमित घरी नव्हता. घराची चावी शेजाऱ्यांकडे दिली होती. त्यांना रात्रीचे उठवून चावी घेणे, रमाकांतला अडचणीचे वाटत होते. म्हणून रमाकांतने अमितला फोन केला. अमितने शेजाऱ्याला फोन करावा अशी त्याची अपेक्षा होती. 
 परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे रमाकांतचा मित्र अमित मोने आम्हाला रिसिव्ह करायला मुख्य रस्त्यावर उभा होता. इंद्रायणी नदीपासून कार ने अमित आम्हाला फॉलो करत होता. आमच्या नकळत त्याने आमचे फोटो सुद्धा काढले होते. 
 
त्याच्या मागोमाग आम्ही कल्पक सोसायटीत प्रवेश केला आणि थेट दुसऱ्या मजल्यावरील अमितच्या फ्लॅटमध्ये सायकल विसावल्या. अमित भेटल्यामुळे आमचा आजच्या सायकल सफरीची सांगता सुखरूप झाली होती
 
अतिशय उस्फुर्त आणि बोलका अमित प्रथम भेटीतच भावला. फ्रेश होऊन रात्री एक वाजेपर्यंत त्याच्याबरोबर गप्पा मारत होतो. गिरगावच्या ब्राम्हण अळीत राहणारा अमित,  करोना काळात बऱ्याच वेळा तळेगावला एकटाच येऊन राहतो. एकांत शांतता आणि निसर्ग त्याला प्रिय आहे.

आज ३८८० फूट चढाई करून १२० किमी अंतर पार केले होते. तसेच सकाळी साडेसात ते रात्री साडेअकरा अशी १६ तासांची राईड झाली होती. 

रात्री झोपताना रमाकांत म्हणाला, सतीश खूप दमला असशील ना !, मी हसून म्हणालो, ' 'रमाकांत, आता नाईट राईड करून मुंबई गाठूया काय!'. हे वाक्य ऐकताच रमाकांत डाराडूर झोपी गेला.

आजच्या राईडने एक गोष्ट लक्षात आली, ध्येय कितीही कठीण असले तरी, जबरदस्त मानसिक तयारी, दुर्दम्य आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला इप्सित साध्य करून देते. 

माझ्या भारत भ्रमणाची ही मुहूर्तमेढ होती ....


सतीश जाधव
आझाद पंछी.....