Wednesday, December 30, 2020

नर्मदा परिक्रमा.. ओमकारेश्वर दर्शन

नर्मदा परिक्रमा... ओमकारेश्वर दर्शन

२८.१२.२०२०

सकाळी गजानन महाराजांच्या काकड आरतीने जाग आली. सायकलच्या कॅरी बॅगचा पांघरुण म्हणून चांगला उपयोग झाला. नवीन घेतलेल्या स्लीपिंग बॅगमुळे बाहेरील थंडी जाणवत नव्हती. वातावरणातील अल्हाददायक गारव्यामुळे मन तजेलदार झाले होते. अर्धा तास मेडिटेशन केले. सकाळचे प्रातर्विधी आटपले. थंड पाण्याने मस्त आंघोळ केली.

कपडे घालून तयार होई पर्यंत, संजय जागा झाला होता. सकाळीच स्वतःचे कप घेऊन आम्ही भोजनगृहकडे गेलो. अर्धा अर्धा कप चहा घेतला. सकाळची न्याहारी तयार होती. गरमागरम उपमा आणि कांदापोहे  घेतले. नास्ता झाल्यावर मंदिर परिसराचे फोटो काढले.

संजयची तयारी झाली. आम्हाला काल भेटलेले पुण्याचे दोन सायकलिस्ट शिरीष देशपांडे आणि ओंकार ब्रम्हे सायकलने आज नर्मदा परिक्रमा करायला निघाले आहेत.  त्यांना भेटून खूप आनंद झाला. सायकलिस्टला सायकलिस्ट भेटला, म्हणजे घरातला माणूस भेटला असा भाव निर्माण होतो. 

ओंकारच्या मामामुळे (शेवडे) आज दोघेही सायकल परिक्रमा करीत आहेत. त्यांना भरपूर शुभेच्छा देऊन निरोप घेतला.

आम्ही सायकलवरून ओमकारेश्वर मंदीराकडे प्रस्थान केले. नर्मदेवर असलेल्या झुलत्या पुलावरून सायकल घेऊन मंदिराजवळ गेलो. 

पंधरा मिनिटात दर्शन झाले. सध्याच्या परिस्थितीमुळे मंदिराचे गर्भगृह बंद  केले आहे. त्यामुळे दूरवरून दर्शन मिळाले. तेथून आदि शंकराचार्यांच्या  गुंफेत गेलो. येथेच शंकराचार्यांनी, नर्मदेच्या स्तुपिपर नर्मदाष्टक स्तोत्र रचिले.


मंदिर परिसरात संजयने गो प्रो कॅमेऱ्याने भरपूर शूटिंग केले. संजयची एक गोष्ट खूप आवडली... ती म्हणजे नर्मदा परिक्रमा अनुषंगाने भेटणाऱ्या बाबाजी-मैयाजी यांना बोलते करून त्यांची माहिती शूट करणे.

ओमकारेश्वर मंदिराकडून आम्ही ममलेश्वर मंदिरात आलो. भोलेनाथाचे दर्शन झाले.

 दक्षिण तटावर असलेल्या या मंदिराच्या गोमुख घाटावरून संकल्प पूजा करून परिक्रमा सुरू होते. गोमुख घाटावर गेलो. तेथून जुन्या बस स्टँड मार्गे जुन्या पुलावर आलो. येथून नर्मदा मैया, ओमकारेश्वर आणि ममलेश्वर यांचे विहंगम दर्शन झाले. खूप फोटोग्राफी केली. समोर ओमकारेश्वर धरणाची भिंत दिसत होती. 
आम्हाला परिक्रमा प्रमाणपत्र घ्यायचे होते. गजानन महाराज आश्रमाबाहेरील गोस्वामी चहावाल्याकडे चौकशी केली असता त्याने नव्या बस स्टँड जवळील मंगलदासबाबाजींचे नाव सांगितले.

सायंकाळी पाच वाजता बाबाजींच्या आश्रमात गेलो असता बाबाजी आराम करत आहेत असा निरोप मिळाला, म्हणून आश्रमतच थांबलो. या आश्रमात हनुमान आणि गणेशाचे जोड देऊळ आहे. 

साडेपाच वाजता मंगलदास बाबाजी आले. ते परिक्रमा समितीचे मंडल अध्यक्ष आहेत.

बाबाजींनी आम्हाला कोणतेही पैसे न घेता  प्रमाणपत्र दिले. प्रमाणपत्र देण्याचे काम बाबा सेवाभाव म्हणून करतात.

तुम्ही नर्मदा मैयेची परिक्रमा करता आहात परिभ्रमण नाही. त्यामुळे परिक्रमा अंतरात मोजू नका,अंतरंगात मोजा. नर्मदेच्या किनाऱ्यावरील प्रत्येक घाट तपोभूमी आहे. काठावर असलेल्या साधू संत महंत यांच्या आश्रमांना भेटी द्या. प्रेमाने कोणी काही दिले तर अव्हेरू नका. तुम्ही फक्त परिक्रमावासी आहात, त्यामुळे अधिकारी, व्यावसायिक, डॉक्टर, इंजिनियर हे सर्व मुखवटे उतरवून एक सर्वसामान्य माणूस म्हणून परिक्रमा करा. पर्यावरणाचे भान राखा. तुमच्यामुळे कोणाला दुःख किंवा त्रास होईल असे वागू नका. तुमचा क्रोध आणि अहंकार कमी झाला तरच खऱ्या अर्थाने परिक्रमा करत आहात. हे लक्षात ठेवा. मंगलदास महाराजांची ही संत वाणी म्हणजे साक्षात नर्मदा मैयाचा आदेश आहे... याची अनुभूती झाली.

या आश्रमात वकील मनोज माने यांची भेट झाली. यांनी सहकुटुंब तीन वेळा नर्मदा परिक्रमा केली आहे.  ते म्हणाले, 'नर्मदा परिक्रमा करताना जास्तीत जास्त आश्रमांना भेटी द्या... संत महंतांची वाणी श्रवण करा... जीवनाचे तत्वज्ञान उलगडत जाईल. त्यांनी एक मौनीबाबा संतांना लिहून प्रश्न विचारला होता, " What is God"  लिहून उत्तर मिळाले, " God is Love"

माने म्हणाले, जेव्हा मुंबईतील वकिली कामातून उसंत मिळते तेव्हा ओंकारेश्वरला सहकुटुंब कार घेऊन येतो. गेली सोळा वर्ष त्यांचा हा नित्यनियम आहे. प्रचंड सकारात्मक ऊर्जा त्यांच्या ठायी जाणवली. तीच ऊर्जा घेऊन आम्ही सायकल परिक्रमेला सुरुवात करतोय.

सायंकाळी पुन्हा मंगलदास स्वामींच्या आश्रमाला भेट दिली. स्वामीजींनी गोपाळकृष्ण शाळीग्राम रूप दाखविले. स्वामींनी आमच्या सायकल परिक्रमा मार्गात काही सुधारणा सुचविल्या. नर्मदा मैयेच्या जास्तीत जास्त सान्निध्यात राहण्याचा प्रयत्न करा. पुढे पुढे तुम्हाला कोणतीही अडचण आली तरी मैयाजी तुमच्या साथीला असणार आहे.

आमच्या परिक्रमेला स्वामीजींचे आशीर्वाद आणि माने कुटुंबियांच्या सदिच्छा मिळाल्या. मनोज माने कारने  आम्हाला सोडायला गजानन महाराज आश्रमापर्यंत आले होते. मंगलदास स्वामींनी उद्याच्या संकल्प पूजेसाठी पाठक गुरुजींची गाठ घालून दिली.

'तुम्हाला परिक्रमा करण्याची अनुभूती कशी झाली?' या प्रश्नावर वारकरी संप्रदायाच्या मोरे महाराजांनी दिलेली माहिती खूपच प्रभावी होती.


लोककल्याणासठी परिक्रमा करतोय, शेतकरी होतो... कुटुंब निवर्तल्यावर... पंढरीच्या वारीने भ्रमंती सुरू केली. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी... बाकी पायी भारत भ्रमंती... आळंदी वरून पायी ओमकारेश्वरला आलेल्या मोरे महाराजांची ही तिसरी परिक्रमा होती. परिक्रमेत भेटणाऱ्या दिनदुबळ्या, गरीब मूर्तींना (लोकांना) चहा पाजणे... जेवू घालणे ... मदत करणे.. तरुणांना वारीसाठी-परिक्रमेसाठी उद्युक्त करणे .. हेच त्यांनी आयुष्यभर घेतलेले व्रत आहे... पांढरा सदरा, पांढरे धोतर आणि खांद्यावर भगवी पताका घेऊन,  जय जय रामकृष्ण हरी जप करत हसतमुखाने उर्वरित आयुष्य लोकासेवेसाठी व्यतीत करीत आहेत.

सिंघाजी गावचे रामप्रसाद परिक्रमा करायला निघाले आहेत. 

त्याच्या गावात अखंड ज्योती आहे.  त्यांचे म्हणने, 'चलते चलते दुनियासे चले जावो, इसमे जीवन जीनेका असली मजा है'.  त्यांचे वडील ९५ वर्षाचे असताना हसत खेळत देवाकडे निघून गेले.

आमच्या सायकल परिक्रमेच्या पूर्व संध्येला भेटलेल्या परिक्रमावासी, नर्मदेचे भक्तगण, साधुसंत यांनी आमच्या परिक्रमेच्या संकल्पना बदलून टाकल्या होत्या.

नर्मदा आमच्या कडून काय काय कार्य करून घेणार आहे... हे नर्मदा मैयाच जाणे...

नर्मदे हर !!!

सतीश जाधव
मुक्त पाखरे.....

Monday, December 28, 2020

नर्मदा परिक्रमा!!! इंदोर ते ओमकारेश्वर

इंदौर ते ओमकारेश्वर सायकल वारी

२७.१२.२०२०

सकाळी साडेनऊ वाजता अगदी वेळेत अवंतिका एक्सप्रेस इंदोर स्टेशनला पोहोचली. स्टेशन मधील पेंटींग्स मनमोहक होती.

 स्टेशनवर संजयचा मित्र मनोज कुमार शर्मा आम्हाला रिसिव्ह करायला आला होता. संजयचा सायकल बॉक्स लगेज मधून मिळविला, तेथून मनोज कुमारच्या घरी पोहोचलो. वाटेत मनोजने इंदोरचे प्रसिद्ध घंटाघर दाखविले. 

सायकल असेंबल करून फ्रेश होईपर्यंत शर्मा भाभीने जेवणाची व्यवस्था केली. पराठे, पनीर-वाटाणा भाजी, दही, मसाले भात, चटणी आणि फ्रुट सलाड असा फर्मास बेत होता. जेवणानंतर गोड पदार्थ रसगुल्ल्याचा आस्वाद घेतला.

इंदोर जवळील देवमुरारी गावातील 'नालंदा सिजन ऑफ जॉय' कॉलनीत राहणारे मनोजचे चौकोनी कुटुंब अतिशय भावले. मानसी आणि मानवी या छोट्या मुली अतिशय गोड होत्या.
 मनोज स्वतः सायकलिस्ट आहे. विशेष म्हणजे घरात चार सायकल्स आहेत. सर्व कुटुंब सायकल वरून सैर सपाटा करीत असते. मनोजला वाचनाची खूप आवड आहे, हे घरातील पुस्तकांनी भरलेल्या सेल्फ मधून जाणवले. नर्मदा परिक्रमेच्या सुरुवातीला ह्या प्रेमळ कुटुंबाची ओळख ही नर्मदा मैयेची कृपाच म्हणायला हवी. 

शर्मा कुटुंबाचा निरोप घेऊन सायकलिंग राईडला दुपारी २ वाजता सुरुवात केली. येथून ओमकारेश्वर ७८ किमी आहे. सुरुवातीला साधारण तीन किलोमीटर आग्रा-मुंबई हायवे लागला. ह्या रोडला सर्व्हिस रोड असल्यामुळे निवांत सायकलिंग चालले होते. पुढे ओमकारेश्वर आणि खांडवा कडे जाणाऱ्या रस्त्यावर डावीकडे वळलो. हा रस्ता दोन पदरी असल्यामुळे डाव्या बाजूने अतिशय सावधगिरीने सायकलिंग करावे लागत होते. किशोर कुमारचे खांडवा हे जन्मगाव १३० किमी अंतरावर आहे. 
मोठे मोठे कंटेनर जेव्हा मागून हॉर्न मारत, तेव्हा रस्त्याच्या खाली उतरण्याशिवाय मार्ग नव्हता. MTB सायकलमुळे ऑफ रोडिंग सायकलिंग सोपे होत होते. 

बरेच मोटारसायकलवाले स्पीड कमी करून आमची चौकशी करत होते. आयआयटी सीमारोल गावातील निर्भय सोनी या गृहस्थानी मोटारसायकल थांबवून आम्हाला  पुढे पाच किमी अंतरावरील घरी चहा पिण्यासाठी येण्याचे आमंत्रण दिले. सीमारोल गावाच्या रस्त्यावर त्याचा मुलगा नवनीत आम्हाला रिसिव्ह करायला आला होता. निर्भयने अतिशय प्रेमाने आम्हाला चहा पाजला. 
तो स्वतः सायकलिस्ट आहे. त्याचे सोन्याच्या दागिन्यांचे दुकान आहे. या छोट्याश्या गावात IIT आहे, याचे खूप अप्रूप वाटले. मैयाजीच्या कृपेने प्रेमाचा प्रसाद मिळत होता. 

पुढे भैरव घाट लागला. अतिशय वेडीवाकडी वळणे घाटात होती. या घाटात एका अतिशय तीव्र वळणावरून खाली उतरताना, एक मोटारसायकल घाट चढताना घसरू लागली.  त्यावर दोन लहान मुले आणि पति-पत्नी असे चार जणांचे कुटुंब सफर करत होते. ताबडतोब सायकल बाजूला पार्क करून धावत जाऊन मागून त्या मोटारसायकलला मागून आधार दिला आणि वर धक्का मारत मोटारसायकल खाली घसरून पडणार नाही याची खबरदारी घेतली. त्यामुळे होणारा अनर्थ टळला. खरच... हा नर्मदा मैयेचा आदेश असावा...

घाट उतरताच भैरव बाबाचे मंदिर लागले. या मंदिराचे वैशिट्य म्हणजे... ज्यांना वाईट व्यसन सोडायचे आहे... अशी मंडळी भैरवबाबाला सिगारेट, दारू देतात. 
तुमची वाईट व्यसने मला अर्पण करा आणि नर्मदा मैयेच्या दर्शनाला जा... असाच संदेश भैरव बाबा देत असावा का ?

वाटेत बाईग्राम गावात शनी मंदिर लागले. रेडा वाहन असलेली शनी देवाची काळी कभिन्न मूर्ती अतिशय तेजपुंज होती. शनी देवाच्या चेहऱ्यावर आश्वासक हास्य होते. . या जागृत देवस्थानात स्त्री-पुरुष सर्वांची खूप गर्दी होती. 
सहा वाजता बारवाह गावात पोहोचलो. चहाच्या टपरीवर चहा-बिस्किटे घेतली. चहावाल्याला पैसे विचारताच, त्याने हात जोडले आणि म्हणाला, 'साहब आप नर्मदा मैयाजी परिक्रमाके पवित्र कार्य मे जा राहे हो'. 'आप आधा पैसा सिर्फ  बीस रुपया देना'. हमारी तरफसे मैंयाजीको प्रणाम कहना... 
त्याच्या श्रद्धेला नमन केले. त्या गरीब चहावल्याच्या प्रेम पूर्वक अविर्भावामुळे मन उचंबळून आले. त्याच्यासह फोटो काढून पुढे निघालो. 

तासाभरात बरोबर सात वाजता ओमकारेश्वरच्या नव्या बस स्टँड जवळ पोहोचलो. मंदिर येथून दोन किमी अंतरावर आहे. जवळच असलेल्या स्वामी गजानन महाराज आश्रम संकुलात पोहोचलो. या संकुलात सर्वजण मराठी बोलतात. विशेष म्हणजे येथील  सेवक प्रत्येकाला 'माऊली' संबोधतात. 
सायकलने परिक्रमा करणारे परिक्रमावासी म्हणून आम्हाला दोन बिल्ले देण्यात आले. विशाल अशा हॉलमध्ये आमची व्यवस्था करण्यात आली. अतिशय स्वच्छ आणि शांत असलेल्या या संकुलात गजानन महाराजांचे भव्य मंदिर आहे. रात्री महाराजांच्या शेजारतीने आम्ही भक्ती रसात न्हाऊन निघालो.
इंदोर ते ओमकारेश्वर ही ७८ किमी ची सायकल यात्रा   म्हणजे सांसारिक जीवनातून अध्यात्मिक संन्यस्त जीवनाकडे केलेली सफर होती. 

नर्मदे हर !!!

सतीश जाधव
मुक्त पाखरे...

Sunday, December 27, 2020

नर्मदे हर!!! नर्मदा सायकल वारी...

नर्मदे हर!!! नर्मदा सायकल वारी...

२६.१२.२०२०


दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर परमेश्वर सुद्धा प्रत्येक व्यक्तीच्या रूपाने मदत करतो याची प्रचिती आली...

पंधरा दिवसांपूर्वीच, सायकलने नर्मदा परिक्रमा  करायची अशी आंतरिक इच्छा झाली. हे यशोधन नर्मदा परिक्रमा गृपवर लिहिले होते. 


 जर कोणाला सायकलने नर्मदा परिक्रमा करायची इच्छा  असेल तर त्याच्या बरोबर यायला तयार आहे,  ही पोष्ट यशोधनचे सर्वेसर्वा प्रकाशभाऊंनी नर्मदा परिक्रमेच्या सर्व पन्नास गृपवर  टाकली होती.

तीन दिवसापूर्वी २३ डिसेंबरला माझे मित्र रामेश्वर भगत यांच्याबरोबर सायकल राईड करत असताना, रामेश्वर  म्हणाला,   'माझा मित्र संजय सावंत २६ डिसेंबरला सायकलने नर्मदा परिक्रमा करण्यासाठी निघतोय'...

मनात वीज चमकली...

नर्मदा मातेचं बोलावणं आलं आहे...

आता थांबणे नाही...

२३ डिसेंबरला संध्याकाळी संजयला फोन केला...

बोलणे झाले... सायकल परिक्रमेचा सर्व कार्यक्रम समजावून घेतला... संजयने केलेली सर्व तयारी व्यवस्थित ऐकून घेतली...

रात्री सर्व गोष्टींचा विचार केला... पत्नीशी बोललो... आणि मनोमन नर्मदा परिक्रमेला जायची मनाने तयारी केली...

२४ आणि २५  डिसेंबर या दोन  दिवसात..

सायकल सर्व्हिसिंग... नवीन टायर टाकणे... संजयने बनविला तसा... "नर्मदा परिक्रमा"  प्रिंट केलेला टीशर्ट बनविणे... सायकलला लावायचा छोटा बोर्ड... रेल्वे बुकिंग... सायकल डिसमेंटल करून बॅगेत भरणे आणि पुनः असेंबल करणे... पॅनियर बॅग दुरुस्त करणे... पॉवर बँक खरेदी करणे... या सर्व गोष्टी करायच्या होत्या...

अहो आश्चर्यम...,  दोन दिवसात सर्व तयारी झाली होती...

मेट्रो जवळील ग्लॅलेक्सी स्पोर्ट्सच्या हर्षदने पांढरा टीशर्ट तर दिलाच, त्याच बरोबर त्यावर नर्मदा परिक्रमा नाव सुद्धा प्रिंट करून दिले.  दुकानातील त्याचा सहकारी प्रमोदने अतिशय सकारात्मक प्रतिसाद देऊन सायंकाळपर्यंत माझा टीशर्ट नावासह तयार करून ठेवला होता. हर्षदने माझा सर्व कार्यक्रम ऐकल्यावर, प्रेमाने कानटोपी प्रेझेंट दिली. तीचा वापर नर्मदा परिक्रमेत करण्याची विनंती केली.

रोमन प्रिंटरकडे अर्ध्या तासात सायकलला लावायचा छोटा बोर्ड तयार झाला. हरिओम रमेशला टायपिंग येत नव्हते. तेव्हा ते करून दिल्यावर आवश्यक रंगसंगती निवडून आर्टवर्क बनविले. रंगीत प्रिंट घेऊन त्याला डबल लॅमिनेशन केले.

संपूर्ण प्रिन्सेस स्ट्रीट फिरलो... एका दुकानात सायकलचे २७.५ साईझचे टायर मिळाले. घरी आणून सायकलचे जुने टायर काढून नवीन बसविले.. सायकल सर्व्हिस करून टकाटक केली.

रेल्वे बुकिंग सुद्धा उपलब्ध होते... किंबहुना संजयच्या बोगीतच सीट मिळाली... २४ डिसेंबरच्या रात्री संजयने विचारले 'Any Updates', त्याला बनविलेला बॅनर आणि टीशर्टचा फोटो पाठवला. क्षणभरात 'मस्त' ही प्रतिक्रीया संजय कडून मिळाली.

संजयच्या सायकलसाठी स्पोकची सुद्धा व्यवस्था झाली. नर्मदा सायकल वारीचा कार्यक्रम आणि सामानाची लिष्ट मिळाली. त्यावर संजय बरोबर चर्चा केली. सायकल सफारीच्या मागील अनुभवावरून कमीत कमी आणि आवश्यक समानसह ही नर्मदा परिक्रमा करायची होती. त्याची संपूर्ण जुळवाजुळव केली...

२६ डिसेंबरला दुपारीच विजय मदतीला आला. संपूर्ण सायकल खोलून नवीन घेतलेल्या दोन बॅगामध्ये सायकल व्यवस्थित पॅक केली. नर्मदा वारीची सर्व तयारी पूर्ण झाली होती...


आता अवंतिका एक्सप्रेस गाडीत बसलो आहे... सायकलची नवीन बनविलेली बॅग सुद्धा सीटखाली व्यवस्थित फिट झाली आहे...

मनातील दुर्दम्य इच्छाशक्ती... मातेने घातलेली साद... दोन दिवसात प्रत्येक व्यक्तीने केलेली मदत... मित्रांनी दिलेली साथ... कुटुंबाचा सकारात्मक सपोर्ट... याचीच परिणीती... म्हणजे माझी नर्मदा सफर आजपासून सुरू झाली आहे...

नर्मदे हर !!!

सतीश जाधव
स्वच्छंदी पाखरे...

Sunday, December 20, 2020

दिलखुलास राईड...

दिलखुलास राईड
१९.१२.२०२०

काल ब्रिजेशने मुंबईची राईड करण्याची पोष्ट समर्पयामीवर टाकली. त्याला जॉईन व्हायचे नक्की केले. 

सकाळी ४.५० वाजता घर सोडले.  सायकलवर तीन-सात गियर सेट करून आज मुलुंड पर्यंत राईड करणार होतो. चढावरसुद्धा गियर न बदलता मजल दरमजल करीत सकाळी सव्वा सहा वाजता मुलुंड चेक नाक्याजवळ पोहोचलो. एक लक्षात आले... सायकल मोशनमध्ये असेल तर थोडेसे जास्त एफर्ट घेऊन गियर शिफ़्ट न करता चटकन पुढे जाता येते.

ब्रिजेश, प्रविणकुमार, बलजीत आणि राहुल यांची भेट झाली. एल्डन ऐरोली-मुलुंड जंक्शनवर जॉईन झाला.

खूप दिवसांनी प्रविणकुमार आणि बलजीत यांची भेट झाली होती. आज सर्वांना मुंबई फिरुन शंभर किमी राईड करायची होती.  ब्रिजेश आणि बलजीत जोशात होते. एल्डन नवीन हायब्रीड सायकल घेऊन आला होता. राहुलचा सतत हसरा भाव मनाला सकारात्मक ऊर्जा देत होता. 


प्रवीणकुमारच्या काळ्या झुबकेदार मिशा हवेवर फुरफुरत होत्या. मानले ब्रिजेशला... पुढचा गियर दोनवर सेट करून तो प्रचंड वेगाने स्पिनिंग करत होता.

हायवे पार करून, BPT च्या रस्त्याने, फ्रि वे च्या खालून राईड सुरू झाली. या रस्त्याला  गाड्यांची रहदारी कमी होती. विशिष्ट वेगाने सर्वजण भाऊच्या धक्क्याच्या दिशेने जात होतो. बरोबर आठ वाजता रो रो जहाजाजवळ पोहोचलो. नेमके तेव्हाच रो रो बोटीने मांडव्याकडे प्रस्थान केले होते. पटापट फोटो काढले. बलजीत आणि राहुलने पहिल्यांदा रो रो बोट पहिली होती. एल्डनने जहाज चालवायचे ट्रेनिंग पूर्ण केले आहे. त्यामूळे त्याच्या जहाजातून आम्ही फिरायचे नक्की केले. 


शाहिद भगतसिंग रस्त्यावरून फोर्ट मार्केट जवळ आलो. माझ्या अतिशय पसंतीच्या न्यू आनंद भवन हॉटेलमध्ये सर्वांना अल्पोपहारासाठी घेऊन गेलो. इडली-वडा सांबार, उपमा-शिरा, मसाला डोसा आणि उडुपी स्पेशल केला-भोंडा यावर ताव मारला. चहा तसेच फिल्टर कॉफी पिऊन मन तृप्त झाले. भोंडावर एल्डन खुश होता तर राहुलला इडली अतिशय आवडली. 


येथून सेंट्रल लायब्ररी जवळ आलो. आज येथील परिसर जणू आमच्यासाठीच राखून ठेवला होता. पुन्हा फोटो सेशन झाले. गेट वे कडे पेडलिंग सुरू केले.

गेट वे ऑफ इंडिया जवळ सीबर्ड पक्षांची शाळा भरली होती. लाटांवर विहरत हे पक्षी माना डोलवत जणूकाही बाराखडी पाठ करत होते. पर्यटकांसाठी गेट वे आता खुले झाले आहे. परंतु भेट देणाऱ्या तसेच एलिफंटाकडे जाणाऱ्या बोटींमध्ये पर्यटकांचे प्रमाण कमी होते.

ताजमहाल हॉटेल पाहिले की याचे संस्थापक सर जमशेटजी टाटा आणि वास्तू रचनाकार श्री सीताराम खंडेराव वैद्य यांची आठवण येते. भारतीयांसाठी भारतीयाने बांधलेले हे पंचतारांकित हॉटेल आता ११६ वर्षाचे झाले आहे. मुंबईच्या महानतेचे दर्शन  झाले होते.

पर्यटक, गेट वे ऑफ इंडिया समवेत ताज महाल हॉटेल सुद्धा पहायला येतात. मुंबईची ओळख बनलेल्या या ताज हॉटेल मध्ये देशविदेशातील पर्यटक आवर्जून भेट देतात. सर्वांनी मनमुराद फोटोग्राफी करून मरीन लाईन्सकडे सायकलिंग सुरू केले.

मारिन लाईन्स चौपाटीवर डोक्यालिटी बालक आहे... मानवाच्या गूढ मनाचे ते प्रतीक आहे... तसेच जवळच एक बेडूक आहे... बेडकासारख्या उडया मारणाऱ्या  आपल्या मनाला...  अथांग सागराच्या साक्षीने शांत करावे... या साठीच ही प्रतीके लावली असावीत काय ?


आता ओबेरॉय हॉटेलच्या समोरील चौपाटीवर सायकलींनी विसावा घेतला. प्रत्येकाचे सायकलसह प्रोफाइल फोटोसेशन सुरू झाले. एल्डनने नवीन सायकल घोड्यासारखी उभी करून फोटो काढले... मग ब्रिजेश कसा मागे राहणार... प्रविणकुमार समवेत एक अफलातून पोज ब्रिजेशने दिली. त्याच्या मनात आनंदाची कारंजी उडत असावीत.


मरीनलाईन्स चौपाटीला वळसा घालत तीन बत्ती कडे निघालो. राजभवनाचा चढ चढून मुख्यमंत्रांच्या वर्षा बंगल्याकडे आलो. वर्षा बंगल्याची खडी चढाई   ब्रिजेशाला खूप भावली. पुढच्या वेळेस तो लूप मारायला येणार आहे.

प्रियदर्शिनी पार्क कडून ब्रीच कॅण्डीकडे आलो. तेथून महालक्ष्मी मंदिर ओलांडून हाजीअली मार्गे वरळी चौपाटीला आलो.  कॉमन मॅन सर्वांचा आवडता आणि जवळचा माणूस... त्याच्या लांब नाकाला खाजवत... ब्रिजेश त्याच्या कानात काहीतरी सांगत होता... येथे सुद्धा कॉमन मॅन समवेत फोटो काढले.


शेवटी सिद्धिविनायक मंदिराला वळसा मारून सर्वांना पोर्तुगीज चर्चकडे बाय बाय करून घरी परतलो. आज सर्वांसमावेत सहजपणे ९० किमी राईड झाली होती.

दिलखुलास मित्रांसमावेत मनोहारी मुंबईची मस्त बिनधास्त राईड करताना अनिर्वचनीय आनंद झाला होता.

सतीश जाधव
मुक्त पाखरे ...

Tuesday, December 15, 2020

सायकलिंग आणि जिजाऊ, शिवरायांचा आशीर्वाद...

सायकलिंग आणि जिजाऊ, शिवरायांचा आशीर्वाद...

१५.१२.२०२०

नियमित सायकलिंग सुरू करून तीन वर्षे पूर्ण झाली... खरच एक गोड स्वप्नच आहे सायकलिंग म्हणजे... या काळात नवनवीन मित्र मिळाले... किंबहुना मित्रमंडळींचे कुटुंबीय सुद्धा ओळखू लागले...  सायकलिंग बरोबर लिहिण्याची उर्मी उफाळून आली... निसर्गाचे नवोन्मेषकारी रूप आकळून... लेखणीद्वारे शब्दरूपाने  प्रकट होऊ लागले... हे लेखन पुन्हा वाचताना.. सायकलिंगचा आनंद द्विगुणित होऊ लागला... 

ना कोणाशी स्पर्धा... ना कोणत्याही BRM सारख्या इव्हेंटमध्ये सहभाग... निव्वळ आणि निव्वळ आनंद मिळविण्यासाठी आणि वाटण्यासाठीच सायकलिंगचा ध्यास... नवनवीन मित्र जमविणे... त्यांच्या अनुभवावरून आपल्या ज्ञानाची कक्षा वाढविणे... तसेच आलेले अनुभव सर्वांना शेअर करणे... हाच ध्यास...

या ध्यास पर्वातूनच आजची राईड करण्याचे ठरविले. प्रात:प्रहरी सायकलिंग अतिशय चांगली आणि जोमदार असते हे बरेच वेळा आदित्य काका कडून ऐकले होते. म्हणून सुरू केली आजची राईड... सकाळी ५.५० वाजता लोअर परेल वरून... 

घनमिल नाक्याजवळ जिजाऊंचा छावा म्हणून अतिशय प्रतिकात्मक शिल्प लावले होते... तळहातावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप असलेले हे शिल्प अतिशय बोलके होते. जणूकाही जिजाऊ मातेने हिंदवी स्वराज्याची जबाबदारी बालपणीच शिवबांना सोपविली होती...

खरं आहे... छत्रपतींच्या हिंदू पतपातशाही... हिंदवी स्वराज्य स्थापनेमुळेच...  आज आपण हिंदू म्हणून भारतात जन्माला आलोय... त्या जिजाऊंना आणि छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून आजची राईड सुरु केली...

एक संकल्प केला होता मनात... आणि पेडलिंगला सुरुवात केली. गोखले रोड वरून सेनाभवन पार करून माहीम कॉजवे गाठले... माहीमच्या खाडी जवळ अतिशय थंड वारे वाहत होते. वांद्रे फ्लाय ओव्हर वरून पश्चिम द्रुतगती महामार्गावर आलो. सकाळच्या वातावरणात भन्नाट वेगाने मार्गक्रमण करत होतो. 

सव्वा सहा वाजता पार्ले जंक्शन जवळ पोहोचलो. इतक्यात लक्ष्मण नवलेचा फोन आला. 'कुठे पोहोचलात', 'डोमॅस्टिक  विमानतळाजवळ आहे', आज घोडबंदर लूप मारतोय,  हे सांगितल्यावर , लक्ष्मण म्हणाला, मी गोव्यावरून मुंबईला आलोय आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला उतरलोय, सायकलिंग करत येतोय... आपण तीन हात नाक्यावर सकाळी आठ वाजता भेटूया... हे ठरवून, पुढची राईड सुरू केली. 

जोगेश्वरी गोरेगाव दरम्यान नाकाबंदीमुळे ट्राफिक जाम होती. सर्व्हिस रोड सुद्धा जाम होता. अक्षरशः फुटपाथ वरून ढकलत सायकल जाम मधून बाहेर काढली आणि सुसाट वेगात टोल नाका पार करून घोडबंदर जवळील फाउंटन हॉटेलकडे जाणाऱ्या घाटावर चढाई केली. टॉपला येताच लालभडक सूर्याचे दर्शन झाले.

 दोन मिनिटे थांबून सुर्योदयाचा फोटो काढला. पुन्हा पेडलिंग सुरू केले. घोडबंदर नाक्यावर खूप रहदारी होती. सिग्नलला वळसा मारला ... जवळच्या टपरीवर चहा प्यायचा मोह आवरता घेतला... 

घोडबंदर घाट चढून ठाण्याकडे प्रस्थान केले. माजीवडा जंक्शनची रहदारी टाळण्यासाठी फ्लाय ओव्हरवर चढलो.  सकाळी बरोब्बर ८.२० वाजता तीन हात नाका येथे पोहोचलो....

लक्ष्मणाला दोन फोन केले परंतू रिस्पॉन्स मिळाला नाही. त्याचे लाईव्ह लोकेशन सायनला संपले होते. लक्ष्मणाला ऐरोली मुलुंड नाक्यावर भेटायचे ठरवून पुढे राईड सुरू केली. हायवे टोल नाका पार केला आणि लक्ष्मणचा फोन आला. तो तीन हात नाक्यावर पोहोचला होता. आज तो कळव्याला जाणार होता. वेळीच कम्युनिकेशन न झाल्यामुळे आमची चुकामुक झाली होती. 

रस्त्याला रहदारी वाढली होती. तरीसुद्धा सायकल भन्नाट वेगाने पळत होती. पोटली मधील पाणी संपले होते आणि बाटलीतील पाणी पोटात चालले होते. मनसुद्धा सायकलच्या वेगाशी स्पर्धा करीत होते. नऊ वाजून पन्नास मिनिटांनी सोसायटीच्या आवारात सायकलने विश्रांती घेतली.

सकाळी पाच पन्नासला सुरू झालेली राईड चार तासांनी संपली होती... तब्बल ८५ किमी राईड ... सकाळी खाल्लेल्या चार खजूर आणि एक डिंकाच्या भूक लाडूवर... वाटेत दोन लिटर पाणी पिऊन... दरम्यान कुठेही न खाता... पूर्ण केली होती.

जिजाऊ आणि शिवरायांचे आशीर्वाद घेऊन...  मनात संकल्प ठरवून... सुरू केलेली ही राईड... चार तासात पूर्ण झाल्यामुळे... जीवनात अशक्य असे काहीही नाही... याची प्रचिती आली...

जय हो !!!

सतीश जाधव
मुक्त पाखरे .....

Friday, December 11, 2020

जीवन

जीवन
११.१२.२०२०

जीवन म्हणजे मनातल्या चोरकप्प्यात काही असणं

आठवण आल्यावर एकांतात एकटच असल्यावर

मनातल्या मनात हूरहूरणं... उदास होणं...

ही मानसिक स्थिती...

कोणत्या आठवणी काढता ...

त्यावर अवलंबून आहे....

जीवनाबाबत सकारात्मक असल्यावर....

जीवनाकडे पाहण्याची परिभाषा बदलते..

आणि मग...

जीवन  म्हणजे रंगबिरंगी चित्रकला होते....

वेगवेगळे रंग....

काही गहिरे...

काही फिकट...

काही आनंदी वाटणारे...

काही उदास दिसणारे...

मनाच्या चोरकप्प्यातील दुःखद आठवणींने हुरहूरण्यापेक्षा...

तो मनाचा गाभारा आनंदाने, प्रेमाने ओतप्रोत करणे कधीही चांगले...

मुक्त पाखरू...