Thursday, December 16, 2021

श्री स्वामी समर्थ महाराज राईड.... कशेडी... १५ डिसेंबर २०२१

श्री स्वामी समर्थ महाराज राईड.... कशेडी...
१५ डिसेंबर २०२१

काल चिपळूणला पोहोचल्यावर प्रथम सायकल असेंबल केली आणि  भटक्या खेडवाला... विनायक वैद्य यांना फोन केला... सकाळीच कामावर जायचे असल्यामुळे त्यांनी आज सायकलिंग करण्यास असमर्थता दाखविली... चिपळूणचा सायकल मित्र प्रसाद महाडला असल्यामुळे सायकलिंगला येऊ शकणार नव्हता... 

प्रसादचा मित्र भावेश सावंत आज  कंपनी देणार होता... "उद्या कशेडी घाट चढाई करूया" भावेशाच्या बोलण्याला तात्काळ होकार दिला... 
त्याचे कारण सुद्धा होते... कशेडी घाटाच्या टॉपला असलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात जाण्याची खूप इच्छा होती... ती पूर्ण होणार होती...

सकाळीच भावेशची बहाद्दूर शेख नाक्यावर भेट झाली... लोटे परशुराम पायथ्या पर्यंतचा रस्ता ऑफ रोडिंग होता... पहाटेच्या अंधारातच परशुराम घाट पार केला... रामप्रहरी जास्तीत जास्त अंतर जायचे हेच ठरविले होते... पहिल्या दिड तासातच भोस्ते घाट पार करून खेड रेल्वे स्टेशन जवळ आलो तेव्हा उजाडायला सुरुवात झाली होती... सुर्यनारायणाचे दर्शन म्हणजे ऊर्जेचा स्रोत रोमारोमात घेणे होय... 

भरणा नाक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ फोटो काढले आणि जवळच्या हॉटेलमध्ये नास्ता करून  राईड सुरू केली...

पुढचा कशेडी पायथ्यापर्यंतचा सिमेंट काँक्रीटचा रस्ता अतिशय सरळ आणि चौपदरी असल्यामुळे सायकलींना वेग आला होता...  वाटेत खेडचे सायकलिस्ट पेठे यांनी पलीकडून पास होताना हात हलवून अभिवादन केले. 

रस्त्यावरून बरीच मुले शाळेत चालली होती... एकाची चप्पल तुटली म्हणून तो खुरडत चालला होता.. त्याला सायकलच्या कॅरीयर वर बसविले... रोहन जबरदस्त खुश झाला... आपल्या मित्रांना तो सायकलवरून टाटा करत होता... मेजर पवार हायस्कुलकडे रोहन उतरला... आणि उड्या मारत शाळेत गेला.

बोरघर जवळ प्रसादची भेट झाली तो महाड वरून मोटरसायकलने चिपळूणला निघाला होता... भेटण्यासाठी कशेडीकडे जाणाऱ्या रस्त्यात प्रसाद उभा होता... प्रसन्नचित्त प्रसाद बरोबर फोटो काढून पुढे प्रस्थान केले... 

वाटेत सतीचा कोंड विठ्ठल मंदिर लागले... भाचा सुनिल राहतो त्या खेर्डीतील भागाचे नाव सती आहे... रस्त्यात उभे असलेले गावकरी सतीचा कोंड हे नाव या मंदिराला कसे आले याची माहिती देऊ शकले नाहीत...

आता कशेडी घाट सुरू झाला. घाटातील वळणावळणाचा रस्ता बऱ्यापैकी मोठा असल्यामुळे विशिष्ट गतीने वर चढत होतो... घाटाच्या मध्यावर पोहोचलो...

येथून  पायथ्याला सुरू असलेल्या कशेडी घाट टनेल बायपास रस्त्याचे काम जोरात सुरू असल्याचे दिसत होते... गियर २-५ वर सेट करून विशिष्ट वेगाने घाट चढत होतो... भावेश भराभर पुढे जाऊन पुढच्या वळणावर वाट पहात थांबत होता... टॉपचे सुप्रसिद्ध बाकदार वळण घेतले आणि मंदिराकडे जाणाऱ्या छोट्या रस्त्याजवळ थांबलो... प्रचंड झाडी आणि हिरवागार परिसर पाहून पेडलिंगमुळे घामाने ओथंबलेले शरीर एकदम शीतल झाले...

मंदिराकडे जाणारा छोटा रस्ता आणि अंगावर येणारा चढ पार करायचा होता... सायकल मागच्या रस्त्यावर थोडी खाली उतरवून १-१ गियर लावून टान्स घेतला... आणि दमदारपणे ती अवघड वाट चढू लागलो... गियर १-१ वर येत नाहीत म्हणून भावेशने सायकलला धक्का मारणे पसंत केले... शेवटच्या अतिशय चढाच्या आणि बाकदार वळणावर सायकलचे पुढचे चाक वर उचलले गेले. परंतु एकाग्रता जराही भंग होऊ न देता दीर्घ श्वास घेऊन पेडल करीतच राहिलो…  होय... कामगिरी फत्ते झाली होती... मंदिराजवळ पोहोचलो... मागोमाग  सायकल ढकलत भावेश वर आला... 

पहिल्या मजल्यावर श्री स्वामी  समर्थ महाराजांचे मंदिर आहे... मंदिरात प्रवेश करताच मन एकदम प्रसन्न झाले... वडाच्या झाडाखाली श्री स्वामी समर्थांच्या पद्मासनात बसलेल्या मूर्तीचे तेजोवलय डोळ्यात सामावून घेऊ लागलो... श्री स्वामी समर्थ महाराजांची दाढी असलेली आणि राजबिंड्या पोशाखातली पद्मासनात बसलेली मूर्ती प्रथमच पाहत होतो.  मंदिरात पाच मिनिटे ध्यानमग्न झालो... मंदिरातील शांत आणि धीरगंभीर वातावरणाचे तरंग मनात उमटले... त्या प्रसन्न वातावरणामुळे चित्तवृत्ती आनंदमय झाल्या... आनंदाचा ठेवा मनात साठवत मंदिरातून बाहेर आलो...

मंदिराच्या टेकडीवरून कशेडी टॉप वरील हॉटेल श्री राम भुवन मध्ये आलो... चमचमीत मटकी उसळचा कटवडा पुढ्यात आल्यावर रसना उद्यपित झाली... 

समोर तीन कुत्रे टक लावून बसले होते... त्यांना बिस्किटे दिली... उदराग्नी शमल्यावर तृप्तीचा ढेकर दिला...समोरच श्री स्वामी समर्थ मंदिराचा कळस आणि निसर्गरम्य परिसर दिसत होता... परिसराचे फोटो काढले आणि परतीचे पेडलिंग सुरू झाले...

 घाटमाथ्यावरून उताराची राईड भन्नाट वेगात सुरू झाली... भावेशसुद्धा दणक्यात खाली उतरू लागला... सहा किमी अंतर दहा मिनिटात खाली उतरलो... पुढचा भरणा नाक्या पर्यंतच्या रस्त्यावर हायब्रीड आणि mtb यांची जणू शर्यतच लागली होती... कधी हायब्रीड पुढे तर कधी mtb पुढे तासाभरात भरणे नाका गाठून ऊस रसवंती गृहाजवळ थांबलो... 
 
ऊसाचा ताजा रस पिताना तेथील स्वच्छतेने मन वेधून घेतले... ऊस गुऱ्हाळची मशीन ऑटोरिक्षा गाडीवर बसविली होती... रसवंती मावशी म्हणाल्या ग्राहक आल्यावरच ऊसाचा रस कडून आले लिंबू मसालेदार रस दिला जातो... रस काढण्या अगोदर भांडे धुवून घेतले गेले... भांडी आणि ग्लास धुण्यासाठी प्रथम सर्फचे पाणी आणि नंतर स्वच्छ फिल्टर पाणी अशी चार घमेली ठेवली होती... 
 समाजाला स्वच्छतेची शिकवण देणाऱ्या गाडगे बाबांची आठवण झाली. एनर्जी देेणारा उसाचा रस पिऊन; त्या माऊलीला पोटभर शुभेच्छा देऊन भोस्ते घाटाकडे निघालो...

भोस्ते घाटात रहदारी वाढली होती...  न थांबता घाट चढण्याचे निश्चित केले... चणचणीत भावेश पुढे सटकला... घाट चढून उतरलो... लोटे गावात पोहोचलो तरी भावेश कुठे दिसेना... पाणी संपले म्हणून जवळच्या पेट्रोल पंपावर वळलो... बाटलीत पाणी भरताना भावेश पेडलिंग करत पुढे जाताना दिसला... परशुराम घाटाच्या अगोदर त्याला गाठले... लवेल गावाजवळ पुलाचे काम चालू होते तेथेच चुकामुक झाली होती... 

लोटे घाट उतरल्यावर चिपळूण बायपासकडे भावेशला बायबाय करून खेर्डीकडे प्रस्थान केले... घरी पोहोचायला दुपारचे तीन वाजले होते.

सकाळची थंडी... घाट चढामुळे ओलेचिंब झालेले कपडे... घाटात झालेले सूर्यनारायणाचे दर्शन... शाळकरी मूले... प्रसादची अचानक गाठ... श्री स्वामी समर्थांची भेट... दुपारचे आल्हाददायक ऊन.. रसवंती माऊली.. आणि सोबत भावेशची साथ... या मुळे आजची तीन घाटातून केलेली एकूण १२० किमीची राईड  अविस्मरणीय झाली होती...


सतीश जाधव
मुक्त पाखरे...

Wednesday, December 8, 2021

माझे गुरू धुरू... दि. ८ डिसेंबर २०२१

माझे गुरू धुरू....

दि. ८ डिसेंबर २०२१

काल फोन करून भेट नक्की झाली... परिपाठाप्रमाणे पहाटे सायकल राईड सुरू झाली... आज सकाळी मुंबापुरीचे वातावरण धुरकट होते... म्हणून पश्चिम द्रुतगती महामार्ग टाळून माहीम नंतर स्वामी विवेकानंद मार्गाने पेडलिंग केले...

रमतगमत बरोबर साडेसात वाजता गोरेगाव मधील मिठानगर येथील धुरू साहेबांच्या घरी पोहोचलो... वहिनी आणि धुरू साहेबांनी सुहास्य स्वागत केले... टीशर्ट घातलेले धुरू साहेब १५ वर्षांपूर्वी मुंबई महापलिकेतून सेवानिवृत्त झाले आहेत... हे कोणीही म्हणणार नाही... पन्नाशीच्या व्यक्तीलाही लाजवेल अशी त्यांची देहबोली होती... सकाळी योगासन करणे... बागेत फिरायला जाणे... वहिनी सोबत संध्याकाळी फेरफटका मारणे अथवा बाजारहाट करणे... हा त्यांचा परिपाठ...

खरं तर धुरूंना ट्रेकिंग आणि फिरण्याची प्रचंड आवड... मनपा सेवेत असताना मोठे मोठे ग्रुप घेऊन ते सहल आयोजित करायचे... त्यांच्यासह युथ हॉस्टेलचा चंद्रखणी ट्रेक केला होता... खिलाडू वृत्तीचे धुरू माझे ट्रेकिंग आयकॉन आहेत... 

आज त्यांच्याशी गप्पा मारताना... ट्रेकिंग... सहली... नवनवीन ठिकाणे याची चर्चा झाली... कोची पासून जवळ असलेल्या लक्षद्वीप बेटा बद्दल त्यांनी माहिती दिली... भारतातील हे अतिशय निसर्गरम्य ठिकाण जरूर पहावे... ही इच्छा जागृत झाली...

सायकलिंग बद्दल चर्चा झाली... सायकलने केलेल्या नर्मदा परिक्रमेत आलेल्या अनुभूतींची माहिती धुरू कुटूंबाला दिली... गुढगेदुखीचा आजार असून सुद्धा नर्मदा परिक्रमा बसने का होईना.. करणार... असा आत्मविश्वास वहिनींच्या चेहऱ्यावर दिसला... लडाख सायकल यात्रेत आलेले अनुभव शेअर करताना धुरू साहेबांनी त्यांचा काश्मीर सफरीच्या आठवणी सांगितल्या...

गप्पा मारता मारता... वहिनींनी गरमागरम कांदापोहे आणले... सोबत बेकरी बिस्कीट... ब्राऊनी... गुलाबजामुन... असा खासा बेत होता... बोलता बोलता... सर्व पदार्थ भुकेल्या पोटात विसावले... वर फक्कड गुळाचा चहा आला...

गप्पांच्या ओघात शहा साहेब, खानोलकर साहेब, कोठारी साहेब, यांच्या आठवणी निघाल्या... नार्वेकर... मेहेर हे मित्र आठवले... डोंगरे साहेब... परांजपे साहेब... सिनलकर साहेब... कस्पळे साहेब यांची आठवण झाली... धुरू साहेबांच्या घरची आजची सायकल भेट... जुन्या आनंददायी आठवणींची उजळणी करण्यासाठीच होती...

वहिनी सुद्धा गप्पात हिरीरीने सामील झाल्या होत्या... एव्हढ्यात दारात कोळीण बाई आल्या... साहेबांचा आग्रह सुरू झाला... आता जेऊन जायचं... परंतु  खाण्यापिण्यापेक्षा भेटणं आणि बोलणं याच व्रत घेतलंय... तसेच आठवड्यात सायकलने दोन व्यक्तीच्या घरी जाऊन भेट घेणे... ही बाब त्यांना खूप आवडली...

 प्रदूषण मुक्त भारत  या संकल्पनेसह आनंदासाठी भेटीगाठी  हाच आता ध्यास आहे...

साहेबांना वाचनाची आवड आहे... त्यांना सुधा मूर्ती यांच पुस्तक भेट दिलं... तर साहेबांनी ऑट्रेलियाचे सोव्हेनियर... छोटाशी आयफेल टॉवर किचेन आणि बाप्पाची छोटी मूर्ती भेट दिली...

 गप्पांमध्ये तीन तास कसे गेले हे कळलेच नाही... नुकतीच धुरू साहेब आणि वहिनींनी लग्नाची पन्नाशी जोरदार साजरी केलीय... 

दोन्ही उभयतांचे आशीर्वाद मिळाले;  पुढच्या सायकल राईड साठी... सोबत सहकुटुंब जेवणाचे आमंत्रण सुद्धा मिळाले... दोघांच्या चेहऱ्यावरचे आनंदी भाव... खूप ऊर्जा देऊन गेले... 

धुरू कुटुंबाला आरोग्यदायी दीर्घायुष्याबरोबर... त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत... ही प्रार्थना परमेश्वराकडे करून... आज सायकलिंगची शंभरी पार करायची हे मनात ठरवून घोडबंदरकडे प्रयाण केले... तसेच पुढे जाऊन चिंचोटी फाटा गाठला...

परतीचा प्रवास पश्चिम द्रुतगती मार्गावरून करताना प्रचंड रहदारीला सामोरे जावे लागले... दहिसर टोल नाक्याजवळ ट्राफिकची झुंबड उडाली होती. तर अंधेरी फ्लायओव्हरवर दोन गाड्या बंद पडल्यामुळे दुपारच्या उन्हाचा चटका सहन करावा लागला... परंतु मनात असलेल्या आजच्या भेटीच्या सुखद आठवणी... उन्हात सुद्धा शीतलता देत होत्या...

आजची ११५ किमीची राईड... ह्या सुखद आठवणींना अर्पण....

सतीश जाधव
मुक्त पाखरे...



Monday, November 29, 2021

आनंदाचा मार्ग... २८ नोव्हेंबर २०२१

आनंदाचा मार्ग....

२८ नोव्हेंबर २०२१

आनंदाचा मार्ग पोटातून जातो... हे ऐकलं होतं... आज अक्षरशः अनुभवलं... नागावच्या निवांत कॉटेज मध्ये...

 मुंबई ते दिल्ली सायकल वारी झाल्यावर सर्व कुटुंबासमवेत  M2M,  रो रो ने अलिबागला जायचे ठरले... अलिबाग परिसरातील कॉटेजेस, होम स्टे धुंडाळत असतानाच... परममित्र संजयने सहकुटुंब  सहलीसाठी निवांत कॉटेजचं नाव सुचविले... कॉटेजचे नाव गुगल वर धुंडाळले पण सापडले नाही...   मालक विकास गावकरचा नंबर संजयने दिला... विकासला फोन केला... सहा जणांचं बुकिंग केले... पैसे थोडे जास्तच वाटले... दुपारचा जेवणात काय काय हवे... हे आधीच कळविले होते... मन थोडे साशंक होते...

आज रो रो ची सफर एकदम फर्मास झाली... मांडव्या वरून तडक नागावचे निवांत रिसॉर्ट गाठले... अंमळ सकाळी साडेदहा वाजताच पोहोचलो होतो... बाराचे चेक इन होते... त्यामुळे थांबावे लागणार होते... बाहेरील लॉन मधल्या कॅन्टीन मध्ये बसलो... काही हवंय का... ताबडतोब चहा आला... घरगुती टच असलेला अप्रतिम चहा... तो ही मग भरून... इतक्यात रुम तयार झाल्याची वर्दी मिळाली... अकरा वाजताच रुम ताब्यात मिळाला होता... विशेष म्हणजे नियमांचा बागुलबुवा कुठेही जाणवला नाही...

बॅगा रुमवर ठेऊन पाच मिनिटाच्या अंतरावर असलेल्या नागाव बीचवर डुंबायला गेलो... खूप गर्दी होती बीचवर...  वेगवेगळ्या वॉटर स्पोर्टसाठी बीचवर खूपच झुंबड उडाली होती...  नातू आणि नाती बरोबर नागाव समुद्रामध्ये दोन तास मनसोक्त डुंबल्यावर कडकडीत भूक लागली होती... 

रिसॉर्टवर आल्यावर सोलरच्या गरम पाण्यात आंघोळ करून तडक हिरवळीवर मांडलेल्या जेवणाच्या टेबलवर स्थानापन्न झालो... कालच जेवणाचा मेन्यू सांगितल्यामुळे... पुढ्यात काय काय येते त्याची वाट पाहू लागलो...

सर... "आता तुम्हाला आमच्या कडेचे कॉम्प्लिमेंटरी डिश घेऊन येतोय"... बऱ्याच हॉटेल्सचा अनुभव होता... कॉम्प्लिमेंटरी डिशच्या नावाखाली भुसार माल खायला घालून... मेन कोर्स मध्ये हात आखडता घेतला जातो... त्यामुळे जरा नाखूष झालो... 

सुरुवात झाली... क्रिस्पी बोंबील बॉम्बने... बोंबीलाचे छोटे छोटे पीस मॅरीनेट करून... गरमागरम पुढ्यात आले... त्याचा चरचरीत वास नाकात गेला... आणि भूक खवळली... एक डिश संपते न संपते तो पर्यंत दुसरी डिश आली... सर्वजण तुटून पडले होते... ताबडतोब... कोळंबी कोळीवाडा आले... मोठमोठे टायगर  प्रॉन्ज पाहताच तोंडाला पाणी सुटले... डिप फ्राय केलेली कोळंबी एकदम चमचमीत आणि सॉफ्ट झाली होती... शेजवान चटणी आणि टोम्याटो  सॉस बरोबर कोळंबीचा दहा मिनिटांत सर्वांनी फडशा पडला... मागोमाग घोळ मासा फ्राय तुकड्या आल्या... एका प्लेट मध्ये चार तुकड्या अशा दोन प्लेट पुढ्यात आल्या... घोळ फ्राय चवीने खाता खाता समजले...  आता पर्यंतचे सर्व पदार्थ कॉम्पिमेंटरी होते... तुम्ही दिलेली ऑर्डर आता येतेय...

स्तिमित व्हायची पाळी आमच्यावर आली... दोन मोठया डिश खेकडे( क्रॅब) सागुती... एका डिश मध्ये दोन मोठे खेकडे आणि चार डेंगे होते... दोन प्लेट मटण...  आणि दोन मोठे फ्राय पापलेट... सुरमई फिश मसाला... तीन तीन तांदळाच्या भाकऱ्या... एक एक वाटी सोलकडी... 

एक गोष्ट लक्षात आली ... एव्हढं सगळं आम्ही नाही संपवू शकणार... त्यामुळे प्रत्येकाने दोन दोन भाकऱ्या काढून ठेवल्या... 

मेन कोर्सचा आस्वाद घेणे सुरू झाले... नातू मटणावर... तर नात खेकड्यावर तुटून पडली... पापलेट चवीने खाता खाता... मध्येच सुरमई करी टेस्ट करत होतो... प्रत्येक मासा ताजा तर होताच... त्याच बरोबर ते मसाल्यात परफेक्ट मॅरीनेट केलेले होते... तेल प्रमाणबद्ध तर होतेच... तसेच पदार्थ योग्य स्पायसी होते... त्यामुळे लहान आणि मोठे सर्वजण प्रत्येक पदार्थाचा झक्कास आस्वाद घेत होते...  मनसोक्त खाणे काय असते त्याचे प्रत्यंतर आम्ही घेत होतो.. प्रत्येक पदार्थ चवीने खाता खाता आता दमायला झाले होते... पण गावकर कुटुंब आनंदाने वाढताना दमत नव्हते... 

दिलेली एक एक वाटी सोलकडी संपली म्हणून सोलकडी मागितली... तर तांब्याभर सोलकडी आली... आम्ही हैराण... फिनीशिंग फूड म्हणून सोलकडी भात जेवलो... पोट आणि मन तृप्त झाले होते... दुपारच्या जेवणातच आम्ही आनंदाने तुडुंब भरलो होतो....  आणखी काही हवं काय ह्याची विचारणा झाल्यावर... हात जोडून आनंदाची पोच पावती दिली....

संध्याकाळी काय जेवणार... खरंच दुपारचेच जेवण एव्हढे अप्रतिम झाले होते... की संध्याकाळी काय जेवण घ्यावे हा प्रश्न पडला... काहीतरी वेगळं म्हणून अलिबागचा फेमस जिताडा मासा... प्रॉन्ज पकोडे आणि कोळंबी बिर्याणी राईस ऑर्डर दिली...

दुपारी थोडी विश्रांती घेऊन पाच वाजता पुन्हा नागाव चौपाटीवर डुंबायला गेलो...  डुंबल्यामुळे दुपारचे जेवण बऱ्यापैकी जिरले होते...

सायंकाळी सात वाजता रिसॉर्ट वर आल्यावर हिरवळीवर लाईट्स लावले होते... समोर कापडी स्क्रीन लावून प्रोजेक्टर द्वारे त्यावर गाणी दाखविली जात होती...

आठ वाजता सुरू झाली... रात्रीच्या जेवणाची मैफिल... आता रिसॉर्ट वर आमचा सहा जणांचाच ग्रुप होता... 

मसाले पापड... मुलांसाठी चिकन लॉलीपॉप... प्रॉन्ज पकोडे... ह्या कॉम्प्लिमेंटरी डिश आल्या... त्या नंतर दोन डिश जिताडा मासा फ्राय... कोळंबी फ्राय... प्रॉन्ज बिर्याणी, जिताडा करी... भाकऱ्या भात आणि सोलकढी आली... आता एक एकच भाकरी सांगितली होती... संगीताच्या तालावर जवळपास दोन तास जेवणाचा आस्वाद घेत होतो... 

सकाळी भुर्जी आणि आमलेट पाव, ब्रेडबटर, कांदापोहे तसेच चहा कॉफी दुध घेऊन... विकास गावकर यांच्याशी गप्पा मारल्या... त्यांच्या तुडुंब जेवायला घालण्याचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला... एकच कळलं... त्यांना येणाऱ्या पाहुण्याला आनंदाने जेवायला घालण्याची प्रचंड हौस आणि आवड आहे... त्याला त्यांच्या पत्नीची भरभरून साथ आहे... गावकर स्वतः किचन सांभाळतात... फिश आयटम स्वतः बनवितात... रिसॉर्ट सांभाळण्याचा आणि जेवायला घालण्याचा चौदा वर्षाचा अनुभव त्याच्या गाठीला आहे... त्याची पत्नी आणि मुलगी सुद्धा यात हिरीरीने लक्ष घालतात...

त्यांच्याकडे सेवा देणाऱ्या मावशी,  खानसामा काशिनाथ;  तसेच काम करीत असलेली  अभिजित, सरोज आणि अमित ही मुले शिक्षण घेता घेता या रिसॉर्ट मध्ये प्रेमाचा आनंदाचा आणि समाधानाचा टच देत आहेत... 

मालक विकासने मुलांना एक गोष्ट सांगितली आहे... ती प्रचंड भावली... कोणालाही नाही म्हणायचे नाही... तसेच दिलेली ऑर्डर नीट ऐकायची जेणे करून ग्राहकाला परत सांगावे लागू नये... 

कोकणात गाव असलेले, मुंबईचे एक मराठी कुटुंब नागाव मध्ये जे निवांत रिसॉर्ट चालवत आहे... त्याला तोड नाही... प्रत्येक टुरिस्टला गरमागरम जेवण घालण्याची हातोटी... एक वेगळेच आयाम गावकर कुटुंब आणि त्यांचे सहकारी यांना देत होते... कोठेही बोर्ड नसलेले निवांत रिसॉर्ट फक्त माऊथ पब्लिसिटी वरच चालते... येथे प्रत्येकाला हवं ते शाकाहारी जेवण सुद्धा अप्रतिम मिळते... त्याचा सुद्धा आस्वाद घ्यायला येणार आहोत...  खास खवय्यांनी या रिसॉर्टला जरूर भेट द्यावी... मालक विकास चा एकच ध्यास... रिसॉर्ट वर आलेला टुरिस्ट... तृप्त झाला पाहिजे... आणि पुढच्या वेळी आणखी चार टुरिस्ट घेऊन यायला पाहिजे...

यालाच म्हणतात, "आनंदाचा मार्ग पोटातून जातो"...

सतीश जाधव
मुक्त पाखरे...
श्री विकास गावकर
निवांत रिसॉर्ट, सोमेश्वर मंदिरा जवळ,
व्हाइट हाऊसच्या पुढे, नागाव बीच जवळ
भ्रमणध्वनी:-  8975 957334

Friday, November 26, 2021

सकारात्मक सुहास्य... २६ नोव्हेंबर २०२१

सकारात्मक सुहास्य... 

 २६ नोव्हेंबर २०२१

सेवानिवृत्त उपजल अभियंता श्री कोठारी साहेबांना भेटायची खूप इच्छा होती... ती आज पूर्ण झाली. जवळपास ११ वर्ष झाली कोठारी साहेबांना महापालिकेतून सेवानिवृत्त होऊन... 

काल कोठारी साहेबांना फोन केला... दिलखुलास हसत साहेब म्हणाले, 'या या जरूर या...'

बोरीवलीला जवळच निवृत्त प्रशासकीय अधिकारी श्री कस्पळे राहतात... त्यांचा सुद्धा होकार आला..

सकाळी सहा वाजता राईड सुरू केली आणि बरोब्बर सव्वा तासात कोठारी साहेबांच्या घरी पोहोचलो... खिडकीत वाटच पाहत होते साहेब...

अतिशय स्वच्छ, सुंदर आणि टापटीप घर एकदम भावले... साहेब सहकुटुंब स्वागतासाठी दारात उभे होते... नोकरीत असताना जसे होते...तसेच आज सुद्धा साहेब दिसले... तेच दिलखुलास हास्य... जीवनाबद्दल असणारी सकारात्मकता त्यांच्या हावभावातून आणि हास्यातून जाणवत होती...

हार्टचा त्रास झाल्यापासून खाण्यावर आलेले थोडे बंधन... तरीसुद्धा सकारात्मक ऊर्जा कोठेही कमी झाली नव्हती... इतक्यात वडील भाऊ सुरेश कोठारी साहेब आले... हे सुद्धा महापलिकेतून बारा वर्षांपूर्वी प्रमुख अभियंता म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत.. या साहेबांनी संपूर्ण भारत भ्रमंती आणि परदेश वाऱ्या  केल्या आहेत...

भाभीने प्रथम मसालेदार चहा दिला... आणि गप्पांसह साग्रसंगीत अल्पोपहाराला सुरुवात झाली... ढोकळा, फाफडा हे तर माझे आवडते पदार्थ.. त्यासोबत ठेपला, खाखरा, साजूक तूप, चुरमा लाडू, खोबरे चिक्की, जिलेबी, बेकरी बिस्कीट, चिवडा, खमण, भाजलेल्या शेंगा, चटणी, लोणच... सर्व एकदम गुजराथी थाट होता.. त्यानंतर ग्लासभर सुकामेवा मिश्रित मसाले दूध..  मग बिया काढून चंद्रकोर केलेलं संत्र आणि पेरू... आणि मुखवास म्हणून बडीशेप धणेदाणे सुद्धा...

जवळपास सत्तावीस किमी सायकलिंग झाल्यामुळे सपाटून भूक पण लागली होती... त्यामुळे प्रत्येक पदार्थ चवीने खाल्ला...  न्याहारी सुरू असतानाच... भटकंती... सायकलिंग... विपश्यना... रक्तदान... नातलग आणि मित्रमंडळी यांना सायकलिंग करत घरी जाऊन भेटण्याचा उपक्रम... या बाबत गप्पा झाल्या... भाभींना मेडिटेशन बद्दल जास्त आस्था होती...

कोठारी साहेब आणि सर्व कुटुंब मला फॉलो करतात हे ऐकून आनंद झाला... साहेबांनी संपूर्ण घर दाखविले तसेच गॅलरीतील त्यांच्या बैठकीजवळ फोटो काढले... गॅलरीत बसून समोरील झाडे पक्षी, हिरवळ तसेच रहदारी न्याहाळणे... तसेच संध्याकाळी वडील बंधू बरोबर फिरायला जाणे हा साहेबांचा उपक्रम... 

संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा ठायी ठायी जाणवली... वयोमानानुसार आलेले वार्धक्य आणि अनुषंगिक आजारावर सकारात्मक हास्याने मात केली होती... आनंद चित्रपटातील एक डायलॉग आठवला," बाबूमोशाय, जिंदगी बडी होनी चाहीये... लंबी नही...";   "किती जगलास या पेक्षा कसा जगलास" हेच महत्वाचे आहे..  संपूर्ण कोठारी कुटुंबाला जीवन जगण्याची कला अवगत झाली आहे, याची जाणीव झाली... 

येथूनच कस्पळे साहेबांना फोन लावला... कोठारी साहेबांशी बोलल्यावर कस्पळेंना खूप आनंद झाला...

कोठारी साहेबांचा निरोप घेऊन तडक दहिसरला कस्पळे साहेबांकडे गेलो... शक्ती नगर जवळ असणारे कस्पळेंचे घर सुद्धा शांत निवांत, निसर्गरम्य परिसरात आहे...

डाव्या बाजूचा अर्धांग वायू झाला असून सुद्धा चालणे बोलणे एकदम व्यवस्थित होते कस्पळे साहेबांचे...विशेष म्हणजे... आलेल्या आजारपणाचे सुद्धा सहर्ष स्वागत केले होते त्यांनी... कस्पळे साहेबांचा हसरा चेहरा... जीवनाबद्दल असणारा सकारात्मक भाव दाखवत होता... 

वहिनींनी पोहे चिवडा आणि थंड लिंबू पेय दिले... साहेबांनी सर्व घर दाखवले... खिडकीतून दिसणारा समोरचा बगीचा दाखवला... हे घर सुद्धा आनंद लहरींनी व्यापलेले जाणवले...  पाहुणचार घेऊन परतीच्या प्रवासाला सुरुवात केली...

दोन सेवानिवृत्त साहेबांना भेटण्याचा योग आज जुळून आला होता... दोघांकडून पुढील लांबच्या सायकल वारी साठी प्रचंड ऊर्जा मिळाली होती...

आजची ६६ किमीची राईड सकारात्मक ऊर्जेसाठी होती... निसर्गभ्रमणा बरोबर माणसांना भेटणे ही काळाची गरज आहे... 


सतीश जाधव...
मुक्त पाखरे....

Wednesday, November 24, 2021

लाडकी मुंबई दि. २४ नोव्हेंबर २०२१

लाडकी मुंबई 
दि. २४ नोव्हेंबर २०२१

सकाळीच वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स सायकल राईड करण्याचे ठरविले...  पहाटे मेडिटेशन केल्यावर राईड सुरू झाली... वरळी चौपाटी मार्गे सिद्धिविनायक, शिवाजी पार्क करून माहीम मार्गे वांद्रे रेक्लमेशनकडे वळलो...

 हल्ली  "आय लव्ह ...." अशी विभागाची नावे असलेल्या पाट्या जागोजागी दिसतात...  वांद्रे रेक्लमेशन वरील बगिच्यात "लव्ह मुंबई असा बोर्ड दिसला... थोडा वेळ थबकलो... उगवत्या सूर्याच्या लोकेशनवर त्या बोर्डाचे फोटो काढले... पाच मिनिटे तेथे थांबलो.... बरीच मंडळी बगिच्यात फेरफटका मारत होती... काही जॉगिंग करत होती... कोणी समुद्राकडे तोंड करून बसले होते...

खरंच माझे मुंबई वर प्रेम आहे काय ?   विचारांची शृंखला सुरू झाली... ढगाळलेले आकाश... घुरकटलेले वारे...  तेलाच्या तवंगासह समुद्राचे काळे पडलेले पाणी... सुर्यनारायणाचा निस्तेज पडलेला प्रकाश... यात पर्यावरणाचा समतोल कुठेतरी ढळला आहे... असे दिसत होते... याला मीच जबाबदार होतो... 

नुकतीच मुंबई ते दिली सायकल वारी करून आलो होतो... दिल्लीचे धुराने भरलेले... पर्यावरण दूषित  झालेले  वातावरण पाहिल्यावर... माझ्या लाडक्या मुंबईची आठवण झाली होती... दिल्लीच्या इंडिया गेट जवळ पोहोचल्यावर... पन्नास मीटर वरून सुद्धा धुरात काळवंडलेला इंडिया गेट धूसर दिसत होता... दिल्लीतील प्रत्येक चौकात दर दहा मिनिटांनी पाण्याचे फवारे मारण्यात येत होते.... वातावरणात पसरलेला घुसमट करणारा घुर काजळी रूपाने जमिनीवर बसावा म्हणून... 

आज पाहिलेल्या मुंबईत तेच दृश्य दिसले...  मग खरच मुंबईवर माझे प्रेम आहे काय... याला जबाबदार कोण... 

मिनेश कोळी, राजेश कांबळे, लक्ष्मण नवले, विकास चव्हाण, नितीन कुमार, निलेश फाळके, दिपक निचित हे सायकलिस्ट मित्र पर्यावरण प्रेमी आहेत... झाडे लावणे तसेच मोटारसायकल, स्कुटर, कार ऐवजी सायकल सफर करण्यासाठी समस्तजनांना सतत उद्युक्त करीत आहेत.   दिपक, नितीन तर मुलांमध्ये सुद्धा झाडे लावणे तसेच सायकल चळवळ चालवीत आहेत...

 पर्यावरणाचे भान जर आपण राखले नाही तर... पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही... आज जसे पाण्याच्या बाटल्या विकत घेतो.... तसा प्राणवायू विकत घ्यावा लागेल...  

मुंबईवर प्रेम करणारा मुंबईकर ही वेळ मुंबईवर येऊ देणार नाही... 

मुंबईला प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी... आणि पुढील पिढीच्या स्वास्थ्यासाठी चला सहभागी होऊ ... प्रत्यक्ष कार्य करू... निरोगी मुंबईसाठी...

आजची वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स  २४ किमी राईड माझ्या लाडक्या मुंबईला अर्पण...


सतीश जाधव
मुक्त पाखरे...

Thursday, November 18, 2021

१०७ वे रक्तदान आणि शाळकरी मित्र

१०७ वे रक्तदान आणि शाळकरी मित्र

माझगाव डॉक मधील इंजिनीअरिंग वर्कर्स असोसिएशन आणि जिव्हाळा प्रतिष्ठान मुरबाड यांच्या वतीने फाउंडर युनियन लीडर माननीय डॉ दत्ता सामंत यांच्या ८९ व्या जन्मदिनाप्रीत्यर्थ  माझगाव डॉक येथे महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. वरील संस्थांचे जनरल सेक्रेटरी श्री संजय कोळवणकर माझे शाळकरी मित्र...

या रक्तदान शिबिराला संजयने अगत्याचे आमंत्रण दिले होते... शाळकरी मित्रांना सुद्धा बोलावले होते... गेली २४ वर्ष सलगपणे रक्तदान शिबिर आयोजित करणे आणि मुंबईतील पाच रक्तपेढ्यांना सुमारे १२०० रक्त पिशव्या मिळवून देण्याचे प्रचंड मोठे सामाजिक कार्य संजय आपल्या सहकारी मित्रांच्या सोबतीने करत आहे...

अशा महान कार्यात आज माझा खारीचा वाटा समाविष्ट होणार होता... आज रक्तदानाची १०७ वी वेळ होती... या उपक्रमात  KEM रक्तपेढीचा समावेश असल्यामुळे विशेष आनंद झाला... 

सकाळी साडेआठ वाजता माझगाव डॉकला सहकुटुंब पोहोचताच; संजय आणि त्याच्या मित्र परिवाराने सहर्ष स्वागत केले... KEM च्या रक्तपेढी अधिकारी श्रीमती ससाणे मॅडम यांची भेट झाली... त्यांनी रक्तदान करण्याचा फॉर्म आणि सर्व चाचण्या याची तातडीने पूर्तता केली... 

व्हाईस ऍडमिरल आणि माझगाव डॉकचे चीफ ऑफिसर श्री नारायण प्रसाद,  विद्यमान युनियन अध्यक्ष श्री भूषण सामंत तसेच उपाध्यक्ष श्री वर्गीस चाको आणि परममित्र, सरचिटणीस श्री संजय कोळवणकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून रक्तदान शिबिराला सुरुवात झाली...

संजयने युनियनच्या कार्याचा सर्वांना परीचय करून दिला... व्हाईस ऍडमिरल श्री नारायण प्रसाद यांनी माझगाव डॉकला आशियातील नंबर एक ची शिप बिल्डींग यार्ड बनविण्याचे ध्येय ठेवले आहे... श्री सामंत साहेबांनी युनियन तसेच सर्व कामगार यांचे प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य असेल असे आश्वासन दिले... संजयने माझ्या प्रदूषण मुक्त भारत  या सायकल वारीचा, नुकत्याच पार पाडलेल्या मुंबई ते दिल्ली सायकल वारीचा, तसेच १०७ व्या रक्तदान उपक्रमाचा परिचय सर्वांना करून दिला. या प्रसंगी शाळकरी मित्र कुणाल ठाकूर, दिलीप काळे आणि शरद पाटील सहकुटूंब हजर होते. याचा खूप आनंद झाला...

आता सुरू झाला रक्तदानाचा कार्यक्रम... सर्व मान्यवरांच्या आणि शाळेतील मित्रांच्या उपस्थितीत माझे १०७ वे रक्तदान पाच मिनिटात पूर्ण झाले... या वेळी व्हाईस ऍडमिरल श्री नारायण प्रसाद आणि अध्यक्ष श्री भूषण सामंत यांच्या समवेत रक्तदान करताना फोटो काढले...

रक्तदान पूर्ण झाल्यावर परममित्र संजयने शाल श्रीफळ देऊन सन्मान केला... शाळेतील मित्रांच्या उपस्थितीत केलेला हा सन्मान लाख मोलाचा आहे...

आजचा विशेष दिवस कायम स्मरणात राहील...

सतीश जाधव
मुक्त पाखरे...