Saturday, April 26, 2025

अलिबाग राईड आणि आदरतिथ्य ८.०२.२५

अलिबाग राईड आणि आदरातिथ्य... रवी, रिद्धी आणि राम जोशी... दि.. ०८.०२.२५

रिद्धीला अनाहुत पत्र...

तुझी आणि रवीची... माझे सर्व सायकलिस्ट मित्र तोडभरून तारीफ करत होते... 

रवी काल रात्री... राम जोशींना घेऊन कार्ले खिंडीत आला... आणि आमचा सन्मान केला... 

तसेच तुझ्यामुळे आमची राहण्याची अतिशय फर्मास व्यवस्था झाली...

मुंबई ते अलिबाग अशी जवळपास 142 किमी सायकलिंग केल्यामुळे आम्ही दमलेलो होतो... अशा वेळी तुम्ही दोघांनी केलेली सर्व सोय आणि बडदास्त आमच्यासाठी संजीवनी होती...

आणि भोजन सुद्धा अतिशय अप्रतिम होते... पनीर बिर्याणी आणि गुलाबजाम खाल्ल्यावर तृप्तीची निवांत झोप झाली... सकाळी ताजेतवाने होऊन आज  95 किमी राईड सुद्धा झाली... 

तू तर घरी पाहुणे आले असताना सुद्धा आवर्जून आम्हाला भेटायला आली होतीस... 

रवी तर सकाळी आमच्या सोबत रेवदंड्या पर्यंत राईड पण करायला आला होता...

एकमेका करू सहाय्य अवघे धरू सुपंथ... या तुकाराम महाराजांच्या उक्ती प्रमाणे... जीवनातील छोटे छोटे आनंद आपण एकमेकांना देतो तेव्हा जीवन अतिशय सुकर होते... आणि एक सामाजिक काम केल्याचा आनंद मिळतो...

हा आदरभाव आणि प्रेम हेच जीवनाचे चिरंतन मूल्य आहे...

यालाच म्हणतात आदरातिथ्य... 

तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा आणि अनंत आशीर्वाद... 

जय श्री राम... 


सतीश जाधव सायकलीस्ट 

 7977690693


Monday, April 21, 2025

मित्र भेटींसाठी सायकल राईड... २० एप्रिल २०२५...

मित्र भेटींसाठी सायकल राईड...

२० एप्रिल २०२५...

 सकाळी साडेपाच वाजता घरातून निघालो  सायकल राईड करत... हवेत सुखद गारवा होता... एकट असताना सुंदर गाणी सुचतात... आणि ती गुणगुणत सायकलिंग करणे म्हणजे आनंदाचा परमावधी असतो... त्या आनंदाचा आस्वाद घेत रमत गमत सायकलिंग सुरू होती... वाटेतील स्वातंत्रवीर सावरकरांच्या स्मारकाला भेट दिली...

 

सात वाजता भांडुप मुलुंड पंपिंग स्टेशन हायवे जवळ समीरची भेट झाली... पुढे दोन तास तो साथीने राईड करणार होता...


तेथून राईड करत गेलो उपवनच्या समर्पयामि शॉपी मध्ये... समीरची ओळख करून दिली... माझा सायकल गुरु मयुरेश डोळस बरोबर... एकदम खुश झाला पठ्या... येथे भेट झाली सायकल डॉक्टर हिरेन आणि उभरती सायकलिस्ट सुवर्णाची...

सर्लीच्या छोट्या कामासोबत... समीरच्या सुद्धा सायकलचे काम सायकल डॉक्टर हिरेनने सफाईदारपणे केले... उपवन येथून राईड करत सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाकडे आलो...


आज या  महाविद्यालयाच्या स्टुडिओ मध्ये  पॉडकास्टच्या माध्यमातून मुलाखत होणार होती... ती घेणार होता सुप्रसिद्ध व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणजेच आवाजाचा जादूगार... सुमेध समर्थ... 

मुलाखत होती... आजपर्यंत झालेल्या इंटेंस टुरिंग सायकलिंग बाबत... ती झाल्यावर  समीर  ऐरोलीच्या मित्रां समवेत माझी भेट घालून देणार होता... ऐरोली स्पोर्टस कॉम्लेक्सच्या लाउंज मध्ये...

मुलाखत पूर्ण झाली आणि तडक निघालो ऐरोली स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये...   गंमत झाली... समीर ज्या दोस्तांची भेट घालून देणार होता... ते माझे जुने दोस्त निघाले... डॉ सत्वशील राणे आणि डॉ अरुण औटी ह्यांच्या सोबत सायकल राईड केल्या होत्या... संदीप कोरडे आणि संदीप जाधव तसेच कमलेश भाई क्षणार्धात माझे मित्र झाले...

सुरू झाली गप्पांनी मैफिल...  नुकत्याच झालेल्या विश्वविक्रमी काश्मिर ते कन्याकुमारी सायकल वारी बद्दल सर्वांना माहिती दिली... 

आतापर्यंत झालेले जागतिक विक्रम... मी केले नाहीत... तर ते परमात्म्याने माझ्याकडून करून घेतले... मी तर निमित्त मात्र होतो...  कोणत्याही विक्रमासाठी सायकलिंग केली नाही...  टुरिंग सायकलिंग पूर्ण केल्यावर विक्रम झाला आहे हे कळले...

  सेव्हन सिस्टर सायकल वारी... नर्मदा सायकल परिक्रमा... आदी कैलास ओम् पर्वत सायकल वारी मुंबई कन्याकुमारी, मुंबई दिल्ली सायकल वारी... मनाली लेह लडाख सायकल वारी... या मध्ये प्रदूषण मुक्त भारत ह्या संकल्पनेचा प्रचार प्रसार केला... याबाबत सर्वांना माहिती दिली...

आतापर्यंत पूर्ण झालेल्या ७८ हजार किमी सायकल वारी मध्ये अनुभवलेल्या गमती जमती...  भारतातील जनतेचा मिळालेली उस्फुर्त प्रतिसाद... आलेल्या अडचणी शिकण्याची संधी समजून सोडविण्यासाठी केलेले अथक प्रयत्न... यांचे किस्से सांगताना तीन तास कधी गेले कळलेच नाही... 

डॉ औटी आणि डॉ राणे तसेच त्यांच्या मित्रमंडळींनी शाल आणि शिवाई फाऊंडेशनचा पंढरीची वारीचा मोमेंटो देऊन सन्मान केला...

ही डॉक्टर मंडळी पंढरीच्या वारीत करत असलेल्या मोफत वैद्यकीय सेवेची माहिती मिळाली... जनसेवा हीच ईश्वर सेवा... हा भाव दिसला... या जुन्या मित्रांची नव्याने ओळख पटली...

तेथून समीरच्या चष्म्याच्या दुकानात गेलो... सौ ब्रीद यांचा परिचय झाला... आजच्या मित्र भेटीने समीर एकदम भारावून गेला होता... त्याने छानसा फास्ट ट्रॅक बायकिंग गॉगल भेट दिला... समीर ऐरोली वेशीपर्यंत सोडायला सुद्धा आला होता...

सकाळी साडेपाच वाजता सुरू केलेली सायकल वारी दुपारी  साडेतीन वाजता पूर्णत्वाला गेली ... आता भर उन्हात सुद्धा सायकल चालविणे... सहज साध्य झाले आहे... झालेली ८५ किमी सायकल वारी आज भेटलेल्या सर्व मित्रांना अर्पण...

२०१६ पासून सुरू झालेल्या सायकल वारीने दिला प्रचंड मित्र परिवार आणि जीवन जगण्याचा नवा दृष्टीकोन...

 प्रत्येक क्षणाचा मध चाखायला शिकलो आहे...

 भरभरून मिळणारे प्रेम पाहून एकच अवस्था झाली आहे... 

अनंत हस्ते कमलावराने देता...

किती घेशील दो कराने...

म्हणूनच या प्रेमाची मुक्त उधळण सुरू आहे... निरपेक्ष मनाने...


सतीश जाधव, सायकलिस्ट

7977690693


Friday, April 11, 2025

शारदाश्रम 1974 मित्र भेट

18.08.2019

*शारदाश्रम 1974 मित्र भेट*

आज संध्याकाळी सर्व शाळकरी मित्रांची पुन्हा एकदा पार्क क्लब मध्ये भेट झाली. ही भेट  शाळेतील जुन्या आठवणींचा खजिना उघडण्यासाठी होती.  मी सायकल घेऊन क्लबवर पोहोचलो.

अशोक परब, आणि शरद शिंदे पहिल्यांदा उद्यान गणेश मंदिरात बाप्पाचे दर्शन घेऊन आले. मागोमाग सतीश कामेरकर, सतीश जोशी, विकास होशिंग,दिलीप काळे, नरेंद्र मोहिते चौपाटीवर आले. एवढ्यात संजीव पणशीकरचे आगमन झाले आणि सर्व लवाजमा पार्क क्लब मध्ये स्थानापन्न झाला.

 थोड्याच वेळात शिरीष देसाई आणि कैलास गौडचे सुद्धा आगमन झाले. पण आमचे उत्सव मूर्ती  शरद पाटील आणि कुणाल ठाकूर  अजून उपस्थित झाले नव्हते.  शरद  गणपती आगमनाच्या गराड्यात टिळक ब्रिज जवळ, तर कुणाल नातेवाईकाच्या दहाव्यात अडकला होता. सुहास राऊत आणि गिरीश उर्फ मकरंद चव्हाण रमत गमत आले. 
 
गोरा आणि तगडा दिनेश नाडकर्णीचे हसत हसत आगमन झाले. दिनेश नुकताच श्रीनगर-लेह-मनाली मोटरसायकल सफर करून आला होता. त्याच्या देहबोलीतून त्याचा आत्मविश्वास जाणवत होता. मोठी लढाई जिंकून आलेला राजा जसा आपल्या नगरात अभिमानाने प्रवेश करतो, तसेच छाती काढून दिनेशने आगमन झाले होते.

आज विकास होशिंग जाम खुशीत दिसत होता. अमेरिकेहून चॉकलेट्स आणली होती.  ती सर्वांना प्रेमाने वाटत होता. पांढऱ्या रंगाची आणि त्रिकोणी ढंगाची चॉकलेट्स तोंडात ठेवताच क्षणी विरघळत होती. या विकासची एक बाब प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे त्याचे हास्य आणि लाघवी बोलणे. पठया घरातून निघताना चॉकलेट्सच आख्खे पाकिटच खाऊन आला असावा. 

एक कृश व्यक्ती  नरेंद्रच्या बाजूला बसला होता.  डोक्याला टक्कल पडलेले, भुवया पांढऱ्या झालेल्या आणि थकल्या सारखा वाटणारी ती व्यक्ती कोण, हे विचारताच तो माझ्या जवळ आला आणि म्हणाला मी रामकृष्ण मुतालिक. ओ.... हो.. हो..  मी मुतालिकला ओळखलेच नव्हते. त्याला हर्षभराने मिठी म्हटली. माझा शाळेतील परम मित्र होता तो. रामकृष्ण पार्ट टाइम भिक्षुकी करतोय. आता तो सुद्धा सायकल घेऊनच आला होता. 

सतीश कामेरकर हातात इंपोर्टेड खाऊची पिशवी घेऊन आला होता. तो खाऊ संजीवच्या हातात दिला. दर्दी मंडळींचा खाऊ होता तो. पण थोड्याच वेळात भ्रमनिरास झाला. बाहेरचा खाऊ क्लब मध्ये खाण्यास मनाई होती.

आता मैफिलीला सुरुवात झाली तेव्हढ्यात शरद आणि कुणालचे आगमन झाले. गिरीश आणि सुहास राऊत पण आले. 

सतीश कामेरकर क्लबमध्ये पहिल्यांदाच आला होता. मागच्या वेळी तो अमेरिकेत होता. दोन पेग पोटात गेल्यावर सतीश कामेरकरने सगळ्या मैफिलीचा ताबा घेतला आणि शाळेतील आठवणींचा फुलबाजा तडतडू लागला.  

सतीशने कमेरकरने बापट बाईंच्या सायन्स पिरियडचा किस्सा सांगितला. सायन्स विषयाचा पुनरुत्पादन हा धडा शिकवून बाईंनी घरी वाचायला सांगितला होता. परंतु दुसऱ्या दिवशी मी (सतीश जाधव) तो धडा परत शिकवा असे बाईंना सांगितल्यावर, मला पट्टीने चोपले होते.  जीत बाई स्लीवलेस घालून यायच्या मराठीच्या तासाला बरीच मुले बाईंकडे टक लावून बघायचे. तळवलकर बाई इंग्रजी शिकवायच्या आणि सहदेव आंब्रेने उत्तर दिले म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना धडा समजला असा त्यांचा विश्वास होता. हे सगळं ऐकताना आम्ही शाळेच्या वर्गात पोहोचलो होतो.

शरद शिंदेने किस्सा सांगितला,  विद्यार्थ्यांच्या शारीरिक तपासणीला आलेल्या डॉक्टरांचा.  त्यांनी गुप्तांगाची  कातडी कशी वर करायची आणि त्याची निगा कशी राखायची याची माहिती दिली. पण डॉक्टरांनी प्रात्यक्षिक करून दाखवावे ही शरदची इच्छा होती. 

सतीश कमेरकरचे तंबाखू विडीचे दुकान शाळेजवळच होते.  त्यात तो उंचीने बुटका, त्यामुळे त्याला शाळेत "तोकडी विडी" म्हणायचे. 

मी लठ्ठ असल्यामुळे मला सर्वजण "डबी" म्हणायचे. पहिल्यांदा तळवलकर बाई वर्गात आल्यावर सुद्धा मी मस्ती करत होतो आणि मुले मला डबी म्हणून चिडवत होते, ते नाव बाईंनी ओझरते ऐकले, त्यांना माझे आडनाव वाटले आणि मला "डबीर" इकडे ये, असे म्हटल्यावर सर्व वर्ग जोरजोरात हसला होता. मुले का हसतात हे बाईंना कळलेच नाही. मी मात्र केविलवाणा चेहरा करून, मान खाली घालून उभा होतो. हा किस्सा कैलासने सांगितला.

सतीश कामेरकर पुढे सांगत होता, "मी दारू प्यायला कसा शिकलो". तर मकरंद चव्हाणने पहिला बियरचा ग्लास माझ्या हातात दिला. मला ती कडवट लागली, पण थोड्याच वेळाय झिंग आली, तेव्हा मजा आली. त्यानंतर पानाच्या गादीच्या गल्ल्यातून  दहा रुपये लंपास करून घरातील नोकराला घेऊन चार रुपयांची बियर हॉटेलमध्ये जाऊन सतीश प्यायला होता. मला दारू प्यायला शिकविणारा मकरंद 1997 पासून व्यसन मुक्त झालाय. पण मी अजूनही पितोय, असे सतीश म्हणाला.

दिनेश  आणि उमेश नाडकर्णी हॉस्टेल मध्ये राहत होते. त्याच्या हॉस्टेलचे किस्से तर औरच होते. 

सतीश जोशी म्हणाला परीक्षेला मी नेहमी सतीश जाधवच्या मागच्या बेंचवर असायचो, कारण दोघांच्या वडिलांचे नाव विष्णु होते.

दिलीप काळे चेउलकर बाईंबरोबर केलेल्या पिकनिक बद्दल हिरीरीने सांगत होता. तर शरद शिंदे  171 नंबर बसचे किस्से सांगत होता. वरळी वरून दादरला शाळेत येणारी ती एकमेव बस होती. 

कुणाल ठाकुरने सुद्धा सांगितले, मकरंदने माझ्या दारू पिण्याचा श्रीगणेशा केला.

शालेय जीवनात केलेले प्रताप आणि त्याची आठवण सर्वांना विद्यार्थी दशेत घेऊन गेले.

कैलासने ड्रिंक अँड ड्राइव्हचा किस्सा सांगितला. त्याचे वडील भाऊ ना म जोशी मार्ग पोलीस स्टेशन मध्ये सिनियर इंस्पेक्टर होत.  तेथूनच "जीवन आणि कैलास" शाळेत यायचे. 

शरद प्रत्येकाच्या टेबलवर जाऊन हवे नको ते विचारत होता तर कुणाल, 74 आणि 75 बॅच मधला  फरक सांगत होता. गृप मध्ये गोंधळ घालणाऱ्या दोस्तांना शरदने डिलीट केले होते. संजीव पणशीकर माझ्या सायकलिंगची तारीफ भरभरून करत होता. कैलासने मला ड्रिंक ऑफर करताच, मी म्हणालो " आज नाही घेणार उद्या घेईन" परंतु तो उद्या  माझ्या जीवनात अजूनपर्यंत आलेला नाही. 

कुणालची तऱ्हा तर औरच आहे, जेवणानंतर त्याला प्यायला आवडते. तर शरद पाटील जन्मल्या पासून प्याला नाही. अशोक परबने दोन पेग झटक्यात संपवले होते आणि तल्लीन झाला होता.

सतीश कमेरकरला ड्रिंक्स घेताना सिगारेटची तलफ आली होती. त्यातच त्याने चार सिगारेट ओढल्या.  तर कैलास आल्या पासून सिगारेट ओढत होता. दिनेश आणि संजीवची पिण्याची जुगलबंदी लागली होती. तर शिरीष देसाई आणि सतीश जोशी त्यांना साथ देत होते. खाण्यापिण्याचे टिपण मी करत होतो.

मधेच शिरीष मला म्हणाला सतीश तू काहीच बोलत नाहीस, मी म्हणालो " कोणीतरी ऐकणारा पाहिजे ना"

रामकृष्ण, सुहास, मकरंद, नरेंद्र आणि शरद कोपऱ्यातील टेबलवर बसले असल्यामुळे त्यांचे बोलणे ऐकायला येत नव्हते. 

मी सायकलने मनाली - रोहतांग पास - लेह  केल्याबद्दल दिनेश माझी खूप तारीफ करत होता. लेह सायकलिंगचे किस्से मला सांगायचे होते. पण आज सर्वच जोशात होते, भरभरून बोलत होते. म्हणून पुढील मिटिंग मध्ये मनाली लेह किस्से सांगायचे मी ठरविले.

सतीश जोशी, " सिद्धी शिवाय प्रसिद्धी" कामाची नाही हे सांगत होता. पण पूरग्रस्तांना मदत करण्याचा मूळ उद्देश त्यामुळे बाजूला पडला होता. शरद शिंदेच्या चेहऱ्यावर म्हणून नाराजी पसरली होती.

आज खाण्यापेक्षा पिण्याचे बिल जास्त झाले होते. पण खाण्याबरोबर सर्वजण पोट भरून बोलले होते. एकमेकांना भेटल्याचे समाधान त्यापेक्षा जास्त होते. 
मैत्रीची नशा सोबत घेऊनच प्रत्येक जण पार्क क्लबच्या बाहेर पडला.

एका गोष्टीची प्रकर्षाने जाणीव झाली, ती म्हणजे या वयात कोणाच्या सवयी बदलणे कठीण काम आहे. परंतु साठी नंतरचे बोनस आयुष्य मस्त मजेत जगायचे असेल तर,  ज्या सवयी आपल्या शरीराला घातक आहेत. तसेच पुढील उतार वयात त्याचा जास्त त्रास होऊ शकतो, त्यांना आवर घालणे आवश्यक आहे. याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. मरेपर्यंत मस्त मजेत जगायचं असेल तर कुणालची, शरदची, दिनेशची लाईफ स्टाईल पहावी.

या वयात अंथरुणात खिळून राहणे कोणालाही आवडणार नाही. त्याची काळजी आताच घेणे महत्वाचे आहे.

*जीवन अनमोल आहे आणि ते उपभोगण्यासाठी शरीर संपदा राखणे आवश्यक आहे.*

प्रत्येक जण सुज्ञ आहे !!!

मंगल हो !!!


सतीश विष्णू जाधव

लेख नववा... काश्मिर ते कन्याकुमारी... दि. १७ ऑक्टोबर २०२४...

लेख नववा... काश्मिर ते कन्याकुमारी

 दि. १७ ऑक्टोबर २०२४...

सकाळी मनाच्या त्या संमोहित अवस्थेत बसमध्ये  असतानाच पावसाचा वर्षाव होऊ लागला... डोळे मिटले... आणि माझा सायकल (सखी) सोबत असलेला जीवनपट तरळला... 

आनंद अन् खुशीचा  मामला

सायकलवर जीव टांगला

पहाट झाली  जाग आली

वाट फुटली सायकल चालली

सोबत सायकल साथीदार

निसर्गाची रंगत बहारदार

आज इथे तर उद्या तिथे

सायकल जाई हवी तिथे

सकाळी ५.४८  वाजता कन्याकुमारी ११०९ चा बोर्ड लागला... आता सायकल रेस अंतिम टप्प्यात आली होती... 

पाऊस पडल्यामुळे रस्ता ओला झाला होता... संपूर्ण आसमंतात लालिमा पसरली होती... हळू हळू सूर्यनारायणाने दर्शन दिले... ते लालबुंद तेजोवलय डोळ्याच्या कॅमेऱ्यात साठवून घेतले... ऊर्जेचे संक्रमण होत होते..

वाटेत ६.१० वाजता चेंज ओव्हर झाले... अंबरीशच्या जागेवर ताजातवाना उल्हास आला... अजयच्या साथीला...

पुढील तासाभरात दोघांनी २२ किमी सायकल पळवली होती... हायवेला अजयच्या सीट खालील सायकलचा मागचा पेडल सैल झाला होता... तो घट्ट करून दिला...

सकाळी पावणे आठ वाजता...पुल्लार टोल प्लाझाच्या पुढे (राष्ट्रीय महामार्ग ४४) हैद्राबाद बंगलोर महामार्गावरील हॉटेल अतिथी  मध्ये लखन नाष्टा करायला घेऊन आला... खास उडुपी पद्धतीची न्याहारी म्हणजे इडली वडा सांबार... एका मोठ्या भांड्यात दोन इडल्या आणि एक मेंदू वडा त्यावर  झकास सांबार आणि एका छोट्या वाटीत चटणी.... जोडीला मोठ्या चौपात्रात भरभरून सांबार... हवे तेवढे घ्या... एका डिश मध्येच पोट भरले...

त्यावर पुष कॉफी... म्हणजे उकळत्या पाण्यात नुकत्याच कुटलेल्या चिकोरी कॉफीची पुरचुंडी धरल्यावर कॉफी अर्क पाण्यात उतरतो... त्या पाण्यात गरम दूध टाकल्यावर कडवट टिंच असलेली कॉफी तयार होते... एका पेल्यात आवश्यकते नुसार साखर घेऊन त्यावर हा कॉफीचा प्याला रीता केला जातो... प्याला आणि पेला यात कॉफी वर खाली केल्यावर फेसाळलेली ही पुष कॉफी पुढ्यात आली... प्रदेश बदलला कॉफीची रीत बदलली... स्वाद बदलला... आणि त्याचा आस्वाद घेणे... हे भटक्याचे कर्तव्य होते...

अतिथी उडुपी हॉटेलच्या बाहेर ताज पॅलेस हॉटेल मध्ये पत्र्याच्या ड्रम पासून बनवलेले  टेबल आणि बसायचा सोफा बनविला होता... तसेच पत्र्यापासून बनविलेली मोठी नाव होती ज्यात  बसण्याची सुध्दा व्यवस्था होती...

मोठी बस सकाळी अकरा वाजता सुरू झाली... पुढे गेलेल्या सायकलीला बॅक अप सपोर्ट आणि आवश्यक ती मदत देण्यासाठी सायकल स्वारांना गाठणे आवश्यक होते... पुल्लूर गाव सोडले आणि आता तेलंगणा मधून आंध्र प्रदेशात बसने प्रवेश केला... कृष्णा नदीच्या पुलावरून पार झालो... महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे उगम पावणारी कृष्णा नदी या दोन राज्यांना जोडते...

साडेअकरा वाजता दोन्ही सायकलिस्टना मोठ्या गाडीने गाठले... उल्हासला आणखी अर्धा तास पेडलिंग करायचे होते...  मागे बसलेल्या अजय स्ट्रोकरच्या डाव्या पायाखालचा पेडल निखळून पडला होता... मागचा अर्धा तास अजय फक्त एका पेडलने सायकल चालवत होता...

मागील क्रॅंकच्या स्पिंडलचे थ्रेड स्लीप झाले होते... त्यामुळे दुसऱ्या सायकलचा क्रॅंक तातडीने काढला... तो लावला... त्यावर पेडल बसवला... खराब झालेली चेन बदलली... तसेच मागच्या चेनला ऑईलिंग केले... या सर्व कामासाठी माझ्यासह सुशिल आणि शिवम यांचे हात लागले...

 सायकल  अप टू डेट करून उल्हास आणि अजयच्या ताब्यात दिली... उल्हासने सायकलचे पेडल मारण्यास सुरुवात केली... आणि सायकल छान तयार झाली या आनंदाच्या भरात अजयने सायकलवर उडी मारली... परंतु त्याचा सीटवर बसण्याचा नेम चुकला आणि सायकलवर पुढे  बसलेला उल्हास हडबडला... अजयचे सायकलवर उडी मारून बसणे हे आततायीपणाचे होते...

अकरा वाजता मोठी गाडी निघाली... पावसाला नुकतीच सुरुवात झाली होती... वातावरणात गारवा आला होता... अशा वेळी सायकलिंग करणे मजेशीर असते... रायडर्सना थोड्याच वेळात गाडीने गाठले...

दुपारी १२ वाजता चेंज ओव्हर झाले... उल्हासच्या जागेवर शिवम पायलट म्हणून आला... सकाळी सहा पासून दुपारच्या बारा वाजेपर्यंत उल्हासची ८२ किमी राईड झाली होती...  अजय आणि शिवमची राईड सुरू झाली आणि बराच वेळ दोन्ही गाड्या सायकलिस्टच्या मागे होत्या... 

अजयच्या सूचनेनुसार आता मोठी गाडी २५ ‍किमी पुढे जाऊन थांबणार होती... गाडी पुढे निघाली... वाटेत सव्वा बारा वाजता कन्याकुमारी १००५ बोर्ड लागला...

गाडी अम्माकथाडू टोल प्लाझा वरून पुढे निघाली... आता आम्ही आंध्र प्रदेशात होतो... धोने गावाच्या हायवे वर आरटीओने मोठी गाडी अडवली... ड्रायव्हर अमितकडे कागदपत्रे मागितली... महाराष्ट्र आरटीओ ने दिलेले परमिट त्या पोलीस शिपायाला दाखवले... तो कानडीत काही बोलत होता... आणि अमित हिंदीत... संकेत आणि सुशील खाली उतरले...आरटीओ पोलीस शिपायांचे काय म्हणणे आहे तेच कळत नव्हते... त्या शिपायाने धोने गावातील आरटीओ ऑफिस मध्ये गाडी नेण्यास भाग पाडले...

तेथील आरटीओ अधिकारी कुमार याने सांगितले... तुमची टुरिस्ट कमर्शिअल गाडी आहे... आणि तुमच्याकडे फक्त महाराष्ट्रात कोठेही फिरण्याचा परवाना आहे... महाराष्ट्र आरटीओ ने तुम्हाला इतर सर्व राज्यात जायला परवानगी दिली आहे परंतु प्रत्येक राज्यात गाडीने प्रवेश करण्या आधी त्या राज्याचा रोड टॅक्स भरणे हा नियम आहे... कन्नूर शहरापासून आंध्र प्रदेशची हद्द सुरू होते त्या आधी तुम्हाला  ९००० टॅक्स  भरणे आवश्यक होते... तो भरला नाही म्हणून पाच पट दंड रक्कम मिळून आता ६४७०० एव्हढा दंड आणि टॅक्स भरावा लागेल...   तो पर्यंत गाडी डीटेंड करण्यात येईल... 

सुशिल तसेच सागरने बरीच फोनाफोनी केली आंध्रप्रदेश जिल्हाधिकाऱ्याने पण कुमारला फोन केला... शेवटी आरटीओ अधिकारी कुमारने गाडी सोडली... पण एकच सांगितले... सिस्टिम मध्ये दंड रकमेची नोंद झाली आहे तेव्हा तुम्हाला ही रक्कम नंतर सुद्धा भरावीच लागेल... 

गाडी घेऊन तेथून निघालो... पण या प्रसंगात दीड तास पोलीस स्टेशन मध्ये आम्ही अडकून पडलो होतो... 

पावणे सहा वाजता रायडर बदलले अजय आणिl शिवम यांच्या बदल्यात सागर आणि सुशील यांनी चार्ज घेतला...

 दोघांनी पाच किमी वरील टोल प्लाझा ओलांडल्यावर  घाटाचा रस्ता लागला... तो त्यांनी सहज पार केला...

अर्ध्या तासात गाडी अनंतपुर शहरातील टाईम स्टेशनकडे आली... या ठिकाणी आराम करण्यासाठी खोली होती... तेथे शिवमची रगडून मालिश केली... जवळपास पाऊण तास त्याची मालिश आयुर्वेदिक तेलाने केली... आता शेवटच्या टप्प्यातील सायकलिंग मध्ये त्याची महत्त्वाची भूमिका होती...  त्याचे सर्व स्नायू मुलायम झाले... हे  त्याला ताबडतोब लागलेली झोप यावरून लक्षात आले... 

सुशीलने सागरला ७१ किमीची साथ दिली.... त्यानंतर

अंबरीश ने १०१ किमी ची साथ दिली... सागरने तर कमालच केली बारा तासात १७२ किमी सायकल चालवली होती... आता सर्व लवाजमा बंगलोर जवळ फक्त ३० किमी अलीकडे पोहोचला होता... तेथून कन्याकुमारी शहर ७०० किमी अंतरावर होते...

पुढे अजय आणि उल्हासने सायकल रामरथ हाकण्यासाठी हॅण्डल रुपी दोरी हातात धरली... वाटेत सात घोड्यांच्या रथावर स्वार झालेल्या सूर्य नारायणाचे दर्शन झाले होते... त्याचेच हे रूपक होते...

वरील सर्व अंतरावरून एक लक्षात आले होते... ही सायकल रेस पूर्ण करण्यासाठी परवा  १९ ऑक्टोबरची पहाट उजाडणार होती...  माझे आणि महेश दाभोलकरांच्या विमानाचे तिकीट १८ ऑक्टोबर सायंकाळीं ८.२० वाजताचे होते... रत्नागिरीच्या रोलर कोस्टर सायकल शर्यतीचा ब्रँड आयकॉन संयोजकांनी मला बनविले असल्यामुळे १९ ऑक्टोबरला दुपारी ४ वाजेपर्यंत रत्नागिरी येथे पोहोचणे अगत्याचे होते... 

म्हणूनच या काश्मीर कन्याकुमारी रेस मधील सर्व सहकार्यांना प्रचंड शुभेच्छा देऊन... त्यांची रजा घेऊन आज बंगलोर वरून मुंबईला येतोय... त्यामुळे तिरुअनंपुरमचे ते मुंबई चे विमान तिकीट रद्द केले...

माझ्या टीम बरोबर शेवटचे आणि अतिशय उत्कंठा वाढविणाऱ्या दोन दिवसात मी नसणार याचे खूप वाईट वाटत होते... 

पण माझी टीम जागतिक विक्रम करणारा आहे हे निश्चित होते... 

निसर्गाच्या ओढीने आणि दोन दूरदृष्टी असणाऱ्या तरुणांचे स्वप्न साकारण्या साठीच हा प्रचंड प्रवास करत होतो...

गेल्या सोळा दिवसात सर्वांबरोबर अकृत्रिम जिव्हाळा आणि स्नेह यांचे बंध निर्माण झाले होते... आणि सर्वांच्या या निरपेक्ष प्रेमामुळेच मैत्रीचा खरा अर्थ समजला होता ...

आज सर्वांचा निरोप घेताना... अनामिक हुरहूर लागली जीवाला... त्यामुळे चाललो कुठे तें... पायांना कळत नव्हतें... 

बालपणी शाळकरी मित्रांच्या गराड्यात रंगलेला मी आजही माझ्या सेकंड इनिंगमध्ये माझ्यामध्ये मुक्काम करून आहे... हे या सायकल रेसमुळे कळले...

 मालिशवाला, सायकल मेकॅनिक, आचारी, हायड्रेशन सपोर्टर, वृत्तलेखनकार, गायक आणि समन्वयक  म्हणून एका अंतरंगाच्या रंगपटावर माझ्यातले किती मी रंगले आहेत... याचे आकलन करण्यात गर्क झालो... आणि बंगलोर विमानतळाच्या गराड्यात एकांतात गेलो...

एक नवा मार्ग, नवी दिशा आणि प्रफुल्लित झालेल्या चिरंतन आशा... हे काश्मीर ते कन्याकुमारी रेसने मला दिलेले प्रमाणपत्र होते...

 जय श्री राम...

सतीश विष्णू जाधव

सायकलिस्ट, मुंबई

7977690693

9869570266

Sunday, April 6, 2025

काश्मिर ते कन्याकुमारी सायकल वारीत भेटलेले व्यक्तिमत्व...१३ फेब्रुवारी २०२५...देवगडचा प्रफुल्ल...


काश्मिर ते कन्याकुमारी सायकल वारीत भेटलेले व्यक्तिमत्व...  १३ फेब्रुवारी २०२५

देवगडचा प्रफुल्ल...

देवगड मधील हॉटेल प्रपंचचा सर्वेसर्वा आणि माझा मित्र प्रफुल्ल भावे याने आज दुपारी जेवणाची फर्मास ट्रीट दिली...

वसंत भालेकरचा लंगोटी यार माझा मित्र कधी झाला हे कळलेच नाही... आमच्या साठी हॉटेल मध्ये टेबल बुक होते... 

सुग्रास अशा सात्विक जेवणात दोन दोन ग्लास सोलकडी आणि घट्ट आणि वेलचीदार आमरस खाऊन मन तृप्त झाले...

विशेष म्हणजे मुंबईच्या ग्रँड हॉटेल मध्ये मुख्य शेफ असलेला प्रफुल्ल... किचन मध्ये बनियन घालून तव्यावर खुसखुशीत पोळ्या बनवत होता... शेफ मालक झाला तरी त्याची खरी ओळख किचन मध्येच असते... याचा प्रत्यय आला...

जेवण झाल्यावर प्रफुल्ल भेटायला आला... अतिशय विनम्र आणि चेहऱ्यावर सकारात्मक हास्य असलेला प्रफुल्ल खूप जवळचा भासला...

सर्वांबरोबर फोटो काढताना... त्याचा मुलगा समर्थची ओळख झाली... दोन वेळा पॉवर लिफ्टिंग मध्ये नॅशनल खेळला आहे समर्थ...

काश्मिर ते कन्याकुमारी सायकलिंग करताना कोकणचा स्वाद चाखायला मिळणे... आणि कोकणचे अंतरंग जाणून घेणे... ही तर पर्वणीच होती... 

कोकणतील माणसं साधी भोळी असतात आणि त्यांच्या काळजात शहाळी असतात... असे उगीच नाही म्हणत...

सतीश जाधव, सायकलिस्ट

7977690693

Sunday, March 30, 2025

काश्मिर ते कन्याकुमारी सायकल वारीत भेटलेले व्यक्तिमत्व... २१ फेब्रुवारी २०२५...केरळचा राजन अण्णा...

काश्मिर ते कन्याकुमारी सायकल वारीत भेटलेले व्यक्तिमत्व... २१ फेब्रुवारी २०२५

केरळचा राजन अण्णा...

केरळ मधील करीनकपारा गावात केळी घ्यायला थांबलो... सकाळचा ब्रेक फास्ट झाला नसल्याने केळी खाऊन दोन तास राईड करायची होती...

राजन स्टोअरचा मालक राजन अण्णा  गल्ल्यावरून उठून बाहेर आला... आस्थेने मल्याळम मध्ये चौकशी करू लागला... त्याचे मल्याळम आणि आमचे हिंदी इंग्लिश मेळ खात नव्हते... पण त्याच्या बोलण्यातली कणव जाणवत होती... तेवढ्यात दुकानात असलेला त्याचा मुलगा अनिरुद्ध बाहेर आला... त्याला इंग्लिश येत होते...

 एक किलो केरळी वेलची केळी सत्तर रुपयात दिली... किमान अठरा केळी आली असावी... गोड केरळी अप्पे सुद्धा घेतले... सर्वांनी केळी आणि अप्पे गटकावले... आणि तयार झाले पुढील दोन तास राईड करायला...

अनिरुद्धने आमची चौकशी करून मल्याळम व्यतिरिक्त कोणतीही भाषा न  समजणाऱ्या वडिलांना सर्व माहिती दिली... राजन अण्णा एकदम खुश झाला...केळीचे पैसे नाकारू लागला... बळेच पैसे दिले त्याला...

आम्ही पुढे निघालो... तर राजन अण्णा मागून स्कूटर वरून आला आणि थंड पाण्याची बाटली देऊन गेला... 

राजन अण्णाला आमचा काश्मीर ते कन्याकुमारी साहसी सायकलिंगचा  उद्देश समजला होता... या जागतिक विक्रमात त्याने सुद्धा खारीचा वाटा उचलला होता...

निरपेक्ष उद्देश आणि लोककल्याण... यातूनच प्रेमाचा मार्ग जातो... हेच राजन अण्णाच्या कृतीतून दिसते...


सतीश जाधव, सायकलिस्ट

7977690693

Tuesday, March 25, 2025

काश्मिर ते कन्याकुमारी सायकल वारीत भेटलेले व्यक्तिमत्व... २० फेब्रुवारी २०२५. कोझिकोडे येथील पेट्रोल पंप मॅनेजर मनोज...

काश्मिर ते कन्याकुमारी सायकल वारीत भेटलेले व्यक्तिमत्व... २० फेब्रुवारी २०२५

कोझिकोडे येथील पेट्रोल पंप मॅनेजर मनोज...

कोझिकोडे येथील HP पेट्रोलपंपावर मॅनेजर मनोजची भेट झाली... डोगरा रेजमेंटमधून हवालदार पदावरून निवृत्त झालेल्या मनोजने पेट्रोल पंप घराप्रमाणे स्वच्छ ठेवला होता... 

सर्व महिला कामगार होत्या पेट्रोलपंपावर... अतिशय हसतमुखपणे सर्व महिला पेट्रोल डिझेल भरण्याचे काम करत होत्या... एक महिला साफसफाईकडे बारकाईने लक्ष देऊन होती... 

टॉयलेटला गेल्यावर ताबडतोब टॉयलेट स्वच्छ केले जात होते... अपंगांसाठी स्वतंत्र बाथरूम होते... RO पाण्याचा कुलर होता... थंडगार पाणी बाटल्यात भरून घेतले आणि तृष्णा शांत केली...

फ्रिज मध्ये सॉफ्ट ड्रिंक्स ठेवले होते... ते सुद्धा MRP वर मिळत होते... मोटर सायकल आणि बस गाड्या पार्किंग साठी स्वतंत्र जागा होती... येथे गाडीचे ऑईल बदलले तर 10% सूट होती...

सायकलिस्ट मोटार बाईकर यांच्यासाठी राहण्याची, टेन्ट लावण्याची व्यवस्था होती... पंप मॅनेजर मनोजने आम्हाला सुद्धा राहण्याची विनंती केली... परंतु पुढील टप्पा गाठायचा होता...

पाच वाजता मागच्या बाजूला असलेल्या भगवती मंदिरातून  शारदा स्तोत्र सुरू झाले... वातावरण मस्त मंगलमय झाले... नमाजी केरळ मध्ये हिंदू भक्तिगीत ऐकून मन भावविभोर झाले...

मनोज केबिन मधून बाहेर येऊन आमची आस्थेने चौकशी करत होता... काश्मिर ते कन्याकुमारी सायकलिंग करत असल्याबद्दल त्याला खूप आनंद झाला होता...

आर्मी मध्ये असताना खूप ट्रेकिंग केले होते मनोजने... पण आता पाय दुखतात... असे म्हणाला... सायकलिंगमुळे पायाचे दुखणे नाहीसे होते आणि तब्बेत सुद्धा चांगली होते... त्यावर सायकलिंग करण्याचे त्याने आश्वासन दिले...

या रस्त्याने तुमच्या ओळखीचे कोणीही सायकलिस्ट आणि बायकर्स जाणार असतील तर त्यांना या पेट्रोल पंपाला आवर्जून भेट द्यायला सांगा... मनोज म्हणाला...

या सायकल सफरी मध्ये अशी आगळी वेगळी व्यक्तिमत्वे भेटत होती आणि आनंदाचा चिरंतन साठा देऊन जाता होती...

पाडगावकरांचे भावगीत ओठावर तरळून गेले...

कुठे कुणाच्या घडल्या भेटी...

गीत एक मोहरते ओठी...

त्या जुळल्या हृदयांची गाथा...

सूर अजूनही गाती...

अशी पाखरे येती... 

आणिक स्मृती ठेऊनी जाती...


सतीश जाधव, सायकलिस्ट

टीम लीडर, 7977690693

Monday, March 24, 2025

मुंबईच्या वरिष्ठ तरुण सायकलवीरांनी केली काश्मीर ते कन्याकुमारी सायकल वारी... आणि दिला 'प्रदूषणमुक्त भारत' चा संदेश....


 मुंबईच्या वरिष्ठ तरुण  सायकलवीरांनी केली काश्मीर ते कन्याकुमारी सायकल वारी... आणि दिला 'प्रदूषणमुक्त भारत' चा संदेश....

पाच सेवानिवृत्त मुंबईकरांनी 'प्रदूषणमुक्त भारत' चा संदेश देत काश्मीर ते कन्याकुमारी असा ४,१९८ किमीचा सायकल प्रवास सागरी महामार्गावरून पूर्ण केला.

प्रदूषण कमी करण्याच्या संदेशासोबत सुदृढ आरोग्य राखणे आणि वयस्कांमध्ये  सक्रिय जीवनशैलीबद्दल जागरूकता पसरवणे देखील होता.

वरिष्ठ सायकलिस्ट सतीश जाधव (६७) यांच्या नेतृत्वाखाली   जितेंद्र जैन (५६), मनोज चौगुले (६२), जयंती गाला (५५) आणि मंगल भानुशाली (६४)... हे  टूरिंग सायकलिंगच्या आवडीमुळे देशाच्या उत्तर टोकापासून दक्षिण टोकापर्यंतच्या  स्वप्नातील सायकलिंग सफर पूर्ण करण्यासाठी एकत्र आले होते.

संघप्रमुख सतीश जाधव यांनी जुलै २०२४ मध्ये जगातील सर्वात उंच मोटरेबल रस्ता उमलींगला पास सायकलने पादाक्रांत केला होता... तसेच त्यांच्या नावावर सायकलिंगचे दोन जागतिक विक्रम आहेत... संपूर्ण भारतात ७६,००० किमी सायकल सफर करणाऱ्या जाधव यांचा १०० वर्षापर्यंत सायकलिंग करण्याचा निर्धार आहे...

या वरिष्ठ तरुण सायकलवीरांनी  १६ जानेवारी रोजी श्रीनगरच्या लाल चौकातून आपला प्रवास सुरू केला 

पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी... प्रदूषण मुक्त भारताचा संदेश देत... जम्मू, पंजाब, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ मार्गे काश्मिर ते कन्याकुमारी हा ४१९८ किमीचा प्रवास ३९ दिवसात पूर्ण केला...

तसेच कोणत्याही सहाय्यक वाहनाशिवाय आणि सर्व सामान सायकलवर घेऊन  दररोज १०० किमी पेक्षा जास्त अंतर कापले आणि शेवटचा २३० किमीचा  टप्पा २२ तासांत  पूर्ण केला.

डिझेल पेट्रोल वाहनांच्या अतोनात वापरामुळे प्रदूषणाची होणारी प्रचंड वाढ थांबविण्यासाठी... आम्हाला लोकांमध्ये जागरूकता पसरवायची होती...

 सैनिक किंवा पोलिस प्रसंगी प्राणाची आहुती देऊन देशसेवा करतात... तसेच निवृत्ती नंतर देशसेवा करण्यासाठीच सायकलिंगने भारत भ्रमंती हा मार्ग आम्ही निवडला...

 सायकलिंगमुळे केवळ प्रदूषण कमी होईलच असे नाही तर व्यक्तीच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होईल. त्यासाठीच प्रत्येकाने सायकलिंगकडे वळणे महत्त्वाचे आहे.  तसेच सर्वांना सक्रिय जीवनशैली स्वीकारण्यास प्रेरित करणे हा आमचा उद्देश होता," असे जाधव म्हणाले.

 संपूर्ण मार्गावर विविध शाळा आणि महाविद्यालये आणि पोलिस स्टेशन मध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी आणि पर्यावरण संबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी  या चमूने व्याख्याने दिली.

 एका शहरातून दुसऱ्या शहरात पॅडलिंग करत असताना, विविध समुदाय आणि सरकारी अधिकाऱ्यांनी  त्यांचे स्वागत केले आणि त्यांच्या सायकल वारीला हिरवा झेंडा दाखवला.

वाटेत अनेक वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि संरक्षण दलातील माजी कर्मचाऱ्यांनी  आमचे स्वागत केले आणि आम्हाला अनेक प्रकारे मदत केली. विशेषतः काश्मीरमध्ये, आम्हाला एस्कॉर्ट वाहने देण्यात आली होती... तसेच  आमच्यासाठी रस्ता मोकळा केला होता त्यामुळे आम्ही या प्रदेशातून सुरक्षितपणे प्रवास केला... जितेंद्र जैन म्हणाले

आम्ही काश्मिरच्या बर्फवृष्टीतून तसेच केरळच्या कडक उन्हातून  सायकलिंग केली,  एकंदरीत सायकल वारीचा हा अनुभव अविस्मरणीय होता...  असे जाधव म्हणाले.

या सायकल वारीसाठी ठाण्याच्या आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन, घोडबंदर सायकल क्लब आणि समर्पयामि सायकल्स तसेच मुंबईच्या पेडल वॉरियर्स या सायकल संघटनांचे  विशेष सहकार्य लाभले.

काश्मिर ते कन्याकुमारी स्वप्न झाले साकार... दिनांक २४ फेब्रुवारी २०२५



काश्मिर ते कन्याकुमारी स्वप्न झाले साकार...

सर्व मित्रांना आणि कुटुंबियांना सादर प्रणाम...

जीवनात अनेक स्वप्न पहात असतो... पण किती साकारतात... स्वप्नांना प्रत्यक्षात आणायला अथक परिश्रमाची जोड द्यावी लागते... 

एकट्यानेच आपले स्वप्न साकार करणे... आणि आणखी चार जणांना सोबत घेऊन त्यांच्या स्वप्नांना पूर्णत्वाकडे नेणे... हे अतिशय खडतर असते... ते आज साध्य झालंय...

काल सकाळी 5.55 राईड सुरू केली केरळ मधील वंदनम शहरातून... आणि कन्याकुमारीला पोहोचलो आज पहाटे 4.30 वाजता...

23 तास सायकलिंग करून 230 किमी एका दिवसात पार केले होते... ते ही फक्त 39 दिवसात...

एका नवीन जागतिक विक्रमाला गवसणी घातली होती... या विक्रमातील महत्त्वाचे मुद्दे खालील आहेत...

प्रथमच काश्मिर ते कन्याकुमारी व्हाया सागरी महामार्ग करणारे 5 सितारे... या मार्गाने अजून कोणीही K2K राईड केलेली नाही... 

या मार्गाने राईड करणारे 55 ते 67 या वयाचे पाच वरिष्ठ तरुण...

ही संपूर्ण राईड सर्व सामनासहीत सेल्फ सपोर्ट होती...

एकूण 40 दिवस ठरवले होते परंतु राईड 39 दिवसात पूर्ण झाली... 

शेवटच्या  दिवशी 23 तासात 230 किमी सायकलिंग... करून कन्याकुमारी मध्ये पदार्पण केले...

यासाठी तुम्हा सर्वांच्या सदिच्छा आणि आशिर्वाद कामी आले..


सतीश जाधव...टीम लीडर

7977690693




हापूस आंब्यासारखी मधुर आणि मधाळ कोकणची माणसं... दि. १३ फेब्रुवारी २०२५

काश्मिर ते कन्याकुमारी सायकल वारी मध्ये भेटलेली व्यक्तिमत्वे...

 हापूस आंब्यासारखी मधुर आणि मधाळ कोकणची माणसं... दि. १३ फेब्रुवारी २०२५

कुणकेश्वरचे महादेवाचे दर्शन घेऊन पुढे निघालो... मेहुणा महेश बागवेचा मित्र गोविंद सावंत हे मुणगे येथे वाट  पहात थांबले होते...  त्यांनी भगवती देवीच्या मंदिरात श्रीफळ आणि प्रसाद देऊन सन्मान केला... कोकणातील टिपिकल हॉटेलातील  पिठाचे, खोबऱ्याचे, शेंगदाण्याचे लाडवांचा  आस्वाद घेतला... तो सावंतांचे पाहुणे म्हणूनच...

डोंगरातून येणाऱ्या गोमुख जलाचे आणि भगवती देवीचे दर्शन  घेतले... मंदिराजवळ मेहुणा संतोष आणि भाचे कंपनी श्री आणि श्रीकांतची भेट झाली... कोकणचे स्पेशल खडखडे  लाडू मिळाले... मुणगेकरांनी झकास आदरतिथ्य केले होते... संतोषाचा मेहुणा मुणग्यात रहाण्यासाठी आग्रह करत होता... पण आज पुढचा पल्ला गाठायचा होता...

राईड करताना अर्ध्या तासात सूर्य अस्ताला गेला... त्यामुळे रहाण्याची व्यवस्था पाहणे आता आवश्यक होते... महेश कडून आचरे येथील डॅफोडिल रिसॉर्टच्या निलेश सरजोशीचा नंबर मिळाला... त्याला फोन करून रहाण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली... 

मुणगे घाट चढलो... आणि वरच्या सड्यावरून पेडलिंग करत आचरा तिठा पार केला आणि डॅफोडिल रिसॉर्टवर पोहोचलो तेव्हा अंधार पडला होता... आज या रिसॉर्ट वर कोल्हापूरच्या शाळेतील मुलांची सहल आली होती... मुलांचा चिवचिवाट ऐकून एकदम मस्त वाटले...  सायंकाळी पक्षी घरट्यात येताना किलबिलाट करतात त्याची आठवण झाली... लहान मुलांबरोबर बालपणात जाता येते... मुलांच्या या खळखळाटाने सायकलचे श्रम एकदम नाहीसे झाले... त्याच बरोबर हिरव्यागार निसर्गाचे आसमंतात पसरलेले आवर्तन आवाक्यात आले ... आणि ऊर्जेत परावर्तित झाले...

 आडिवरे येथील तावडे वाड्यातून सकाळी आठ वाजता सुरू झालेली सायकल वारी रात्री साडेआठ वाजता आचरा येथील डॅफोडिल रिसॉर्ट मध्ये पोहोचली होती...  रिसॉर्टवरच सात्विक जेवणाचा आस्वाद घेतला... 

रात्री रिसॉर्टचे मालक निलेश सरजोशी बरोबर बोलणे झाले... फोन वर बोलतानाच जाणवले... नीलेशच्या आवाजात मार्दवता आणि हळुवारपणा आहे... मनोमन त्याला भेटण्याची इच्छा जागृत झाली... 

पाच पाच बेडचे दोन मोठे रूम आम्हा पाच जणांना उपलब्ध करून दिले निलेशने ... ते निव्वळ आम्ही पर्यावरण प्रेमी सायकलिस्ट आहोत आणि सकाळी लवकर निघण्यासाठी गैरसोय होऊ नये म्हणून होते...

सकाळी आश्चर्याचा सुखद धक्का बसला... उपमा चहा नाष्टा करतानाच निलेश सरजोशी रिसॉर्ट वर हजर झाला... पांढऱ्या शुभ्र सदरा झब्ब्यात असणारा... अतिशय साधी राहणी असलेला निलेश प्रथमदर्शनीच भावला...

तुझ्या आडनावात काय विशेष आहे... निलेश म्हणाला आमचे घराणे पुरोहितांचे आहे... बारा पंचक्रोशीच्या पुरोहित जोशींचे मुख्य म्हणून सरजोशी...

पर्यावरण प्रेमी निलेशने  आपल्या दहा एकर जमिनीत फक्त जंगल वाढविले आहे... ते निव्वळ वन्य प्राणी, पक्षी, पाने, फुले, जमीन आणि पर्यावरण यांचे संवर्धन आणि संगोपन होण्यासाठीच... 

वेदांचा गाढा अभ्यास असणाऱ्या निलेशला पर्यावरण पुरक सायकल यात्रे संबंधात बोलण्यास सांगितले...

 आपले प्राचीनतम शास्त्र ऋग्वेद हे निसर्गाशी निगडित आहे... आणि आपण सुद्धा निसर्गाचा एक भाग आहोत... म्हणूनच निसर्गाची काळजी घेणे हे आपले परम कर्तव्य आहे... आणि याच उद्देशाने समाज प्रबोधनासाठी तुम्ही वरिष्ठ तरुण प्रदूषण मुक्त भारत ही संकल्पना घेऊन प्रदूषणमुक्त वाहन सायकल वरून काश्मिर ते कन्याकुमारी या साहसी वारी वर निघाला आहात... याचे कौतुक वाटते आहे... सरजोशी कुटुंबीय आणि डॅफोडिल परिवारातर्फे  या पर्यावरण वारीला प्रचंड शुभेच्छा.... तुम्ही ही सायकल वारी यशस्वीरित्या पूर्ण करणार याची खात्री आहे...

निलेशचे ते विद्वतप्रचूर कवन ऐकून धन्य झालो... या पुढे सायकल सफर करणारे माझे सहकारी... सायकल क्लब यांना निलेश सरजोशीचा संदर्भ देण्याची मनोमन ठरवून डॅफोडिलचा निरोप घेतला...

कोकणातील मन मोहून टाकणाऱ्या मधाळ माणसांच्या भेटीगाठी वारीच्या सफलतेसाठी अतिशय पूरक होत्या...


सतीश जाधव

सायकलिस्ट...टीम लीडर

7977690693




Thursday, March 20, 2025

मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि मेडिक्लेम एक दुष्टचक्र...

मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि मेडिक्लेम एक दुष्टचक्र...

कॉम्प्युटरवरच्या प्रतिमा जरा भुरकट  दिसायला लागल्या तेव्हा लक्षात आले... चष्म्याचा नंबर वाढला आहे... म्हणून लालबागच्या प्रसिद्ध मारू रुग्णालयात डोळे तपासायला गेलो... 

 डोळ्यात औषध टाकून डोळे तपासले...  तेव्हा डॉक्टर म्हणाले मोतीबिंदू झाले आहे... शस्त्रक्रिया करून मोतीबिंदू काढावे लागेल.... लगेच त्यांनी रक्ताचे रिपोर्ट ECG, XRay इत्यादी टेस्ट करायला सांगितल्या... तसेच इंपोर्टेड लेन्स बसवायची असेल तर 35000 रुपये खर्च सांगितला... सर्व रिपोर्ट आणि ऑपरेशन इत्यादीचा  खर्च मिळून एकूण साठ हजार रुपये लागतील असे सांगितले...

मेडिक्लेम काढलेल्या SBI general insurance कंपनी कडे चौकशी केल्यावर त्यांनी सांगितले...  मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी कॅशलेस फॅसिलिटी नाही... ऑपरेशन झाल्यावर पैसे परत मिळतील... 

याच शस्त्रक्रियेसाठी हिंदुजा रुग्णालयात चौकशी केल्यावर माहिती मिळाली... लेन्स साठी 75 हजार रुपये तसेच सर्व टेस्ट आणि ऑपरेशन मिळून दिड लाख रुपये खर्च येईल...

 फेब्रुवारी महिन्यात काश्मिर ते कन्याकुमारी सायकल वारी असल्यामुळे डॉक्टर ना विचारले मार्च महिन्यात ऑपरेशन केले तर चालेल काय... त्यांनी होकार दिला...

टॅक्स प्लॅनर मित्र महेंद्रला सांगितले... मेडिक्लेम फेब्रुवारी अखेरीस  संपतोय तो रिनिव्ह करावा लागेल...  कन्याकुमारी सायकल टुरवर असताना sbi जनरल इन्शुरन्स कडून मेसेज आला... अगोदरचा रु 10500 प्रीमियमचा मेडिक्लेम आता इलिट मेडिक्लेम मध्ये परावर्तित करावा लागेल आणि त्याचा प्रीमियम 93000 रुपये आहे... हे समजल्यावर महेंद्रला सांगितले... सध्याचा मेडिकल दुसऱ्या कंपनीत पोर्ट कर... परतू ती सोय सुद्धा sbi जनरल इन्शुरन्सने ठेवली नव्हती... त्यामुळे सतत पाच वर्ष सुरू असलेलेला मेडिक्लेम मार्च महिन्यात बंद झाला...

 वयाच्या पासष्टी नंतर कोणत्याही कंपनीचा नवीन मेडिक्लेम घ्यायचा तर सर्व टेस्ट कराव्या लागणार होत्या तसेच प्रीमियम सुद्धा पन्नास हजारापेक्षा जास्त होता... तेसेच कोणत्याही मेडिक्लेम मध्ये 100 टक्के पैसे कधीच मिळत नाहीत... याचा अनुभव घेतला होता... नवीन मेडिक्लेम काढल्यावर मोतीबिंदू ऑपरेशन करण्यासाठी एक वर्ष थांबावे लागणार होते... त्यामुळे मेडिक्लेमचा नाद सोडून दिला..  आणि स्वतःच्या पैशांनी मोतीबिंदू ऑपरेशन करायचे नक्की केले...

मुंबई महापालिकेच्या sogo संगीत मैफिलीमुळे नायर रुग्णालयात सध्या कार्यरत असलेल्या सिस्टर प्रिया आणि साक्षी यांची मैत्री झाली होती... त्यांनी सांगितले  नायर मध्ये डॉ नयना पोतदार यांच्या युनिटच्या opd मध्ये  डोळे तपासा... म्हणजे सेकंड ओपिनियन पण होईल आणि ऑपरेशन आवश्यक असेल तर अतिशय कमी खर्चात होईल... (खाजगी रुग्णालयात आवश्यक नसताना सुद्धा ऑपरेशन केली जातात आणि मेडिक्लेम द्वारे पैसे उकळले जातात... अशी बरीच प्रकरणे झाली आहेत...)

स्वतः माजी महापालिका कर्मचारी असल्यामुळे रिपोर्ट किंवा ऑपरेशन यासाठी काही खर्च येणार नव्हता... 

आठवड्यापूर्वी डॉ नयना पोतदार यांच्या opd मध्ये औषध घालून डोळे तपासले... जवळ जवळ सात आठ वेळा वेगवेगळ्या मशीन खाली दोन्ही डोळे तपासण्यात आले... पुन्हा औषध घालून सुद्धा तपासणी झाली... डॉ दिप, डॉ शिवानी, डॉ श्रुती, डॉ माधव या सर्वांनी डोळे तपासल्यावर मुख्य डॉ अनुजा यांनी डोळ्याची पाहणी केली... आणि मोतीबिंदू फर्स्ट स्टेज मध्ये आहे... याचे निदान झाले... डॉक्टर म्हणाले नंबर थोडा वाढला आहे... त्यामुळे नवा चष्मा घेऊन सहा महिने ऑपरेशन पुढे ढकलू शकता... सायकलचे इव्हेंट सतत चालत असल्यामुळे कुटुंबियांच्या सहमतीने ताबडतोब ऑपरेशन करायचे नक्की केले... 

डॉक्टरांनी XRay, ECG, रक्ताचे वेगवेगळे रिपोर्ट, HIV, BP, मधुमेह इत्यादीचे रिपोर्ट आणायला सांगितले... नायर रुग्णालयातील सिस्टर्स गायिका प्रिया आणि साक्षी मुळे सर्व रिपोर्ट्स दोन दिवसात मिळाले...  तेही कोणताही खर्च न होता... 

दोन दिवसांनी पुन्हा OPD मध्ये डॉक्टर अनुजा यांना दाखविले तर त्यांनी सांगितले पुढच्या आठवड्यात ऑपरेशनची तारीख नक्की करूया... पुन्हा येथे  प्रिया आणि साक्षी यांची ओळख उपयोगाला आली... त्यामुळे दुसऱ्या दिवशीच ऑपरेशन करायचे नक्की झाले... 

डॉक्टरांनी सांगितले इंपोर्टेड लेन्स बाहेरून विकत घ्यावी लागते... या लेन्स साठी सात हजार रुपये खर्च येईल... तसेच ऑपरेशनच्यावेळी लागणारी काही इंजेक्शन आणि औषधे बाहेरून आणावी लागतील... ताबडतोब होकार दिला... 

रात्री रुग्णालयात भरती झालो... दर दोन तासांनी डोळ्यात टाकण्यासाठी ड्रॉप्स देण्यात आले... हाताच्या पंजाला स्काल्प व्हेन लावण्यात आली... रात्री अलर्जीचे इंजेक्शन देण्यात आले... नायर रुग्णालयात सायंकाळी सात वाजता अतिशय सात्विक जेवण आणि रात्री आठ वाजता पेलाभर दूध मिळाले... 

दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजल्यापासून दर अर्ध्या तासांनी डोळ्यात टाकण्यासाठी ड्रॉप देण्यात आले...  चार नंबर वार्डची स्वच्छता वाखाणण्या सारखी होती... रात्री दहा वाजता वॉर्ड मध्ये झाडलोट आणि मॉपिंग करण्यात आले... त्यामुळे निवांत झोप झाली... 

सकाळी पाच वाजता नावाची अनाउन्समेंट झाली... डॉक्टरांनी पुन्हा BP पल्स रेट आणि मशीन वर डायबिटीज चेक केले... थिएटरचे पांढरे ढगळ कपडे देण्यात आले... कमरेला बांधायला सॅनिटरी पॅड देण्यात आला... तोंडाला आणि डोक्याला मास्क, तसेच थिएटर मध्ये जाताना चप्पल काढण्यावर पायात घालायचे प्लास्टिक मोजे देण्यात आले...

संघवी इंटरप्रायसेस कंपनीचा माणूस लेन्स घेऊन थिएटर बाहेर उभा होता... लेन्सचा बॉक्स हातात घेऊन त्यावर असणारी लेन्सची किंमत पहिली... त्यावर   17109 रुपये किंमत होती... आणि त्याचे नायर रुग्णालयाच्या नावाने 6935 रुपयाचे बिल होते... पैसे देऊन लेन्स ताब्यात घेतली... 

मारु रुग्णालयात 35000 रुपये, हिंदुजा मध्ये 75000 रुपये आणि नायर मध्ये  फक्त 6935 रुपये किंमत...  या लेन्सच्या किमतीचे  गौडबंगाल पाहून डोळे पांढरे व्हायची वेळ आली...

ऑपरेशन थिएटर मध्ये सुद्धा ओळखीमुळे पहिला नंबर होता... डॉ श्रुतीने डाव्या डोळ्याला भूल दिली... पाच मिनिटात डोळा सुन्न झाला... तेव्हढ्या वेळात डॉक्टरांनी माझ्या काश्मिर ते कन्याकुमारी सायकलिंग बद्दल माहिती विचारली...  डोके न हलवता डॉक्टरांबरोबर बोलण्याची परवानगी होती..

लेझर सर्जरी सुरू झाल्यावर कानात... डोळा कापण्याचा टरर् टरर् आवाज येत होता... सर्जरी सुरू असताना ऑपरेशन थिएटर मध्ये मधुर भक्ती संगीत चालू होते... माझ्या सायकलिंग बद्दल सुद्धा चर्चा सुरू होती... पेशंट एकदम रिलॅक्स असावा... त्याला कोणताही ताण येऊ नये म्हणूनच सर्व काळजी घेण्यात आली होती... 

दहा मिनिटात ऑपरेशन पूर्ण झाले... मोतीबिंदू काढलेल्या डाव्या डोळ्याला पट्टी लावून रिकव्हरी रूम मध्ये पाच मिनिटे बसविण्यात आले... डॉ अनुजा यांना विचारले... काढलेला मोतीबिंदू पाहायला मिळेल काय... डॉक्टर हसल्या आणि म्हणाल्या आता ऑपरेशन लेझरद्वारे डोळ्याला सूक्ष्म छिद्र पडून केले जाते... त्यामुळे मोतीबिंदू बर्स्ट करून बारीक चुरा करून बाहेर काढला जातो... आणि त्या जागेवर नवी लेन्स बसविली जाते... ती लेन्स त्या सूक्ष्म छिद्रातून आत सरकवली जाते... मग डोळ्याच्या रेटिना मध्ये ती छत्री सारखी उघडते... त्यामुळे तिला डोळ्याच्या योग्य जागेवर बसण्यास थोडा वेळ लागतो... म्हणूनच ऑपरेशन नंतर दर दोन तासांनी डोळ्यात ड्रॉप टाकणे आणि डोळ्यात धूर, धुळ जाऊ नये किंवा ताण येऊ नये याची काळजी घ्यावी लागते...

डॉ अनुजाने दिलेली माहिती खूपच उपयुक्त होती...

संध्याकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला... तसेच सर्जरी लवकर बरी व्हावी यासाठी पाच प्रकारच्या गोळ्या आणि ड्रॉप देण्यात आले...

दर दोन दिवसांनी फॉलो अप साठी बोलावण्यात आले... या ऑपरेशन कार्यक्रमात बायको स्वप्नाची साथ सुरुवातीपासून शेवट पर्यंत होती... 

 मोतीबिंदू ऑपरेशन आणि बाहेरून आणावे लागणारे औषध गोळ्या यांचा एकूण खर्च आला 7840 रुपये आला होता...

मित्रांनो... आता सांगा मेडिक्लेमच्या नावाखाली खाजगी रुग्णालये किती लूटपाट करत आहेत... असलेला मेडिक्लेम पास झाला तरी पंचवीस टक्के रक्कम रुग्णाला भरावी लागते.... सरकारी रुग्णालयात प्रत्येक ठिकाणी रांग लावावी लागते... तुमच्याकडे वेळ आणि संयम असेल तर खरोखर सरकारी रुग्णालयातील अतिशय चांगली सेवा आपण मिळवू शकतो...

खाजगी रुग्णालयातील रुग्णाच्या पैशाची लुटपाट, ऑपरेशनचे दुष्टचक्र आणि मेडिक्लेमचे मायाजाल पहिले की मन विषण्ण होते....

ठरवले आहे... आता दरमहा पाच हजार रुपये मेडिकलसाठी SIP करायची आणि सरकारी रुग्णालयात... ट्रीटमेंट किंवा ऑपरेशन साठी आपलेच पैसे खर्च करायचे... 


सतीश जाधव

सायकलिस्ट

7977690693