Tuesday, May 26, 2020

सायकलिंगचा श्री गणेशा 26.05.2020

सायकलिंगचा श्री गणेशा

26.05.2020

जवळ जवळ दोन महिने सायकलिंग पासुन वंचित राहिलो होतो. सुरवात कधी पासून करणार काहीच कळत नव्हते. कुठेतरी ही कोंडी फोडावी असे विचार मनात सुरू होते.

परवा विजयचा फोन आला. आपण मंगळवारी सकाळी सायकलिंगचा श्री गणेशा करायचा. विजयच्या आत्मविश्वासाला दाद द्यायला हवी. 
होय, जाऊया आपण, पण कुठपर्यंत जायचे, माझा प्रश्न. 
आपण जिल्हा ओलांडायचा नाही मुलुंड चेक नाक्यावरून परत मागे फिरू.
कार्यक्रम नक्की झाला. 
या रस्त्यावर दोन चेक पोष्ट होते. एक दादरला चित्रा सिनेमा जवळ आणि  दुसरा सायनला. 
विजयला सांगितले, झाडी मारून ये.
काल विजय सायकलवरून सायनपर्यंत जाऊन आला. 
रात्री विजयाचा फोन आला "All is Well" 

आज पहाटे चार वाजता विजयने फोन केला.  Good Morning.

मी उठलोच होतो. प्रातर्विधी  आटपून पावणे पाच वाजता बिल्डिंगच्या खाली उतरलो. सकाळीच रस्त्यावरील झाडामधून कोकीळ सूर येऊ लागले. कुहू... कुहू.... आवाजाने मन प्रसन्न झाले. आजची राईड झकास होणार याचा शुभ संकेत होता.

दादरच्या प्रीतम हॉटेलजवळ  विजयची भेट झाली. सर्व तयारीनिशी आला होता विजय.
तब्बल दोन महिन्यानंतर आम्ही दोघांनी स्टार्ट अप घेतला होता. काल ईद पार पडल्यामुळे चेकपोष्ट निवांत होते. आम्ही सुद्धा सोशल डिस्टनसिंग व्यवस्थित पालन करून पेडलिंग करत होतो.

आल्हाददायक वातावरण, अतिशय तुरळक वाहतूक  असल्यामुळे निसर्गाचा आनंद घेत निवांतपणे सायकलिंग करत होतो.  एका तासात विक्रोळी गाठले. हायड्रेशन ब्रेक साठी पाच मिनिटे थांबलो.

इतक्यात एक सायकल स्वार पुढे पास झाला. अतिशय साधी सायकल, तिच्या मागील कॅरियरला मोठे बोचके, पाठीवर भरलेली सॅक आणि  हँडलच्या सहाय्याने हातात धरलेली  झाडाची फांदी. आम्हाला हाताने टाटा करून हसतमुखाने तो पुढे गेला. 

 बरोबर सहा वाजून पाच मिनिटांनी  आम्ही मुलुंड चेक नाक्यावर पोहोचलो होतो.

 चेक नाक्यावर पुनःश्च त्या सायकल स्वाराची भेट झाली.  पाणी प्यायला थांबला होता तो. विजयने त्याची चौकशी सुरू केली.  

अंधेरीच्या एका हॉटेल मध्ये वेटरचे काम करणारा "संजय प्रजापती" उत्तर प्रदेशातील प्रतापगड या गावाला निघाला होता. मुंबई ते प्रतापगड 1600 किमी आहे आणि  पाच दिवसात गावाला पोहोचायचा त्याचा मानस आहे. रेल्वेला पैसे नाहीत म्हणून तो सायकलवर बोजाबिस्तरा लादून गावाला निघाला होता.  रस्त्यातील कुत्र्यांना हाकलण्यासाठी त्याने झाडाची फांदी सोबत घेतली होती.

विजयने त्याला मसाले दूध दिले तर मी ड्रायफ्रूट दिले. विजय आणि मी मिळून त्याला पैशाची मदत केली. ही मदत घेताना त्याचे डोळे भरून आले होते.  
त्याच्या सोबत फोटो काढून त्याला शुभेच्छा दिल्या.
हातून खूप चांगले काम झाले याचे मानसिक समाधान विजयच्या चेहऱ्यावर झळकत होते. 

चेक नाक्यावरील पोलिसांना सुद्धा दूध हवे काय विचारले. परंतू त्यांनी हसत नकार दिला.

आता परतीचा प्रवास सुरू झाला. ऐरोली-मुलुंड पूल ओलांडल्यावर मिठागरे लागली.
एका बाजूला मिठाचे मोठे मोठे डोंगर उभारले होते.   त्या पाणथळ भागात फ्लेमिंगो पक्षांचे थवे आकाशात विहार करत होते. 

थोडे पुढे आल्यावर  विक्रोळीच्या  गोदरेज  परिसरात हायवेच्या मध्यभागात सुंदर पांढऱ्या फुलांचे भरगोस ताटवे फुलले होते. धूर आणि धूळ विरहित प्रदूषण मुक्त वातावरणात ती पांढरी शुभ्र रानटी फुले हिरव्या झुडपांवर लहान लहान फुलपाखरासारखी  दिसत होती. ढगांच्या दुलाईवर आकाशाचा निळा रंग सुद्धा खुलून आला होता. उंच नारळाचे झाड या निसर्ग चित्रात भिरभिरे झाले होते.

हरी हरी वसुंधरा पे नीला नीला ये गगन...

कि जिसपे बादलो की पालकी उड़ा रहा पवन...

दिशाएं देखो रंग भरी चमक रहीं उमंग भरी...

ये किसने फूल फूल पे किया श्रृंगार है...

ये कौन चित्रकार है ये कौन चित्रकार....

ये कौन चित्रकार है.

हे  गाण्याचे बोल सहज तरळून गेले.

विजय सोबत, खूप दिवसांनी निसर्गामध्ये रममाण झालो होतो. या निसर्गाला भरभरून मनात साठवून तरंगतच घरी पोहोचलो.
तीन तासात साठ किमी राईड झाली होती. याचे सर्व श्रेय विजयचे आहे.

सायकलिंगचा श्री गणेशा अतिशय बहारदार झाला होता.


सतीश विष्णू जाधव

16 comments:

  1. मामा दोन महिन्याची मरगळ एका दिवसात झटकून टाकली तुमच्या कडून प्रचंड प्रेरणा मिळते #huge inspiration 👍👍👍

    ReplyDelete
  2. मस्त, जबरदस्त

    ReplyDelete
  3. मित्रा मस्त बरे वाटले तुम्हा दोघां पाहून

    ReplyDelete
  4. मित्रा मस्त बरे वाटले तुम्हा दोघां पाहून

    ReplyDelete
  5. मित्रा मस्त बरे वाटले तुम्हा दोघांना पाहून
    दिनेश कुडतरकर

    ReplyDelete
  6. मस्तच सर.आता आमचेही पाय शिविशिवायला लागले आहेत

    ReplyDelete
  7. Vikhrioli ला आला होतात तर भेटायचे होते ना सतीश सर

    ReplyDelete
  8. संजय,

    आता करोना सहच जगायचे आहे.

    सुरू करा सायकलिंग

    ReplyDelete
  9. भन्नाट,
    सायकलिंग ओके पण अपरिचित व्यक्तीला मदत करायला हरकत नाही तरीही सोशल डिस्टंसिंग आवश्यक आहे असे वाटते. काळजी घ्या

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद मनापासून!!!

      आता करोना सह जगायचे आहे तेव्हा प्रचंड काळजी आणि सोशल डिस्टनसिंग अनिवर्याच आहे.👍

      Delete