Thursday, May 28, 2020

सायकलिंग एक पॅशन

 28.05.2020

सायकलिंग एक पॅशन

सायकलिंगचे असेच आहे. एकदा का सुरुवात झाली की थांबवणे कठीण असते. परवाच मुलुंड झाले, इस्टर्न एक्सप्रेस हायवे पाहिला. आता वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला काय परिस्थिती आहे, हे पाहण्याचा विचार डोक्यात आला आणि अतुल ओझा आठवला.

अतुलला फोन लावल्यावर सायकलिंगसाठी तो का... कु...  करायला लागला. त्याला समजावले आता आपल्याला करोनासहच जगायचे आहे. व्यवस्थित काळजी घेऊन राईड करायला काहीही हरकत नाही. तयार झाला अतुल.

माझे मुंबई ते कन्याकुमारी सायकलिंग सहकारी दिपक नीचित आणि अभिजीत गुंजाळ यांना सुद्धा सायकलिंगबाबत विचारले. त्यांच्या वैयक्तिक अडचणीमुळे त्यांनी नकार दिला.

विशेष म्हणजे विजयने;  अतुल भेटणार म्हणून कामावरून दोन तासाची सवलत घेतली.

आज पहाटे पण कोकीळ गान चालू होते त्यात हिरव्याटंच पोपटांचे स्वर सुद्धा कानावर पडत होते.

सकाळी चार वाजून पन्नास मिनिटानी सेनाभवन जवळ  विजयची भेट झाली. सुसाटत निघालो. दहा मिनिटात बांद्रावरून हायवेला पोहोचलो.

वातावरण कुंद होते. बांद्रावरून हायवेला वळताना  मशिदीतून जोरदार अजान कानावर पडली. पण मशिदीत जाणारे कोणीही दिसत नव्हते.

हायवेला गाड्यांची वर्दळ कमी होती बांद्रा कॉलनी जवळच पाहिले चेकपोष्ट लागले. परंतु गाड्या निवांत हळूहळू पास होत होत्या. जोगेश्वरी येई पर्यंत तीन चेकपोष्ट लागले. पण तपासणी किंवा चौकशी चालू नव्हती.  सर्व आलबेल होते. अंधेरी फ्लायओव्हर चढतानाच अतुलचा फोन आला. त्याला घरातून निघायला सांगितले.

पाऊण तासात जोगेश्वरी हायवेला पोहोचलो. हायवेलाच  I Love Jogeshvari   बोर्ड लागला. उजडायला लागलं होत. कमी प्रकाशातच तेथे फोटो काढले. थोडे पुढे आल्यावर मुंबई दर्शनचे  भलेमोठे मनमोहक चित्र लावले होते. तेथे सुुद्धा  फोटो काढले.



गोरेगाव आरे कॉलनी गेट जवळ अतुल आमची वाट पाहत होता. केसरी रंगाची एस्किमो घालतात तशी डोक्यात टोपी घालून आला होता. येथे ही   I Love Goregaon  बोर्ड लावला होता. बाजूलाच प्लास्टिक गुंडाळलेले बिबट्या आणि हरणाच्या पुतळ्या मागे I Love Aarey हा बोर्ड होता. ह्या  आयलँडचे उदघाटन  झाले नव्हते.

असे जागोजाग *I Love* चे बोर्ड लावून संबंधितांना काय साधायचे आहे?

गोरेगाव आरे कॉलनीत राईड सुरू झाली चारी बाजूला हिरवाई दाटली होते. आरे कॉलनीचे एक वैशिष्ट्य आहे. आतमधे शिरलं की एखाद्या अरण्याच्या वाटेवरून जातोय असाच भास होतो. रहदारी बिलकुल नाही. "हम तींनो निसर्ग प्रेमी सायकल घुमाते चले".

एक धावणारा  मॅरेथॉनपटू दिसला.  आमच्या सायकली पाहताच रस्त्याच्या खाली उतरून आम्हाला जाण्यासाठी रस्ता मोकळा करून दिला.

छोटा काश्मीरच्या गेट जवळ बरोब्बर सहा वाजता पोहोचलो. बाजूचा तलाव आणि त्यात पडलेले झाडांचे प्रतिबिंब पाहिले. जणूकाही  निसर्गच आपले मनमोहक प्रतिरूप पाण्याच्या आरशात पाहतोय असा भास व्हावा.

इथेच हायड्रेशन ब्रेक घेतला. विजयने आणलेले कागदी कप वाटेत कुठेतरी पडले. अतुलने ताबडतोब अतुलनीय कामगिरी केली. पाण्याची बाटली कापून तीचे ग्लास बनविले. मसाले दूध आणि सुकामेवा खाऊन परतीचा प्रवास सुरू केला.

आता अतुलला सुद्धा सांगितले आमच्यासह बांद्रा कलानगर पर्यंत राईड कर. आढेवेढे घेत तो तयार झाला.  आरे कॉलनीत झकास फुललेली बोगनवेल लागली. मन मोहरून गेले. येथे फोटो तर काढलाच पाहिजे.

अंधेरी ब्रिज ओलांडताना,  सहा-सात रोडिओ सायकलिस्ट गृपने आम्हाला ओव्हर टेक केले.  दोन महिला पण होत्या त्या गृपमध्ये. हे सर्व स्वार  सहार विमानतळाकडे जाणाऱ्या रस्स्यावरच्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ थांबले. त्यांना ओव्हर टेक करताना हात उंचावून अभिवादन केले. त्यांनी सुद्धा हसत प्रतिसाद दिला. आता सर्व सायकलिस्टनी बाहेर पडण्याचा संकेतच होता तो.

विलेपार्ले फ्लाय ओव्हर ओलांडल्यावर एक गमतीदार गोष्ट नजरेत आली आमच्या सावल्या बऱ्याच लांबलचक झाल्या होत्या, जणूकाही अमेरिकेच्या ट्वीन टॉवरच्या टोकावर  दोन ट्रेकर चढले आहेत.

अतुल आमच्या मागे मागे बांद्रा कॉलनी जंक्शन पर्यंत आला. गंमत म्हणजे आम्हा दोघांच्या बराच मागे राहून सायकलिंग करत होता. पुढच्या चेकपोष्ट वर आम्हाला जर पकडले तर मागच्या मागे गुल होण्यासाठी तो बराच मागे राहिला असावा. आम्ही माहीम कॉजवेला पोहोचलो तेव्हा त्याने बांद्रा कॉलनी जंक्शन वरून फोन केला, मी मागे फिरतोय म्हणून. खरंच करोनाची भीती जायला एकच उपाय आहे सोशल डिस्टनसिंग ठेऊन राईडसाठी बाहेर पडणे.

बरोबर सात वाजता विजयच्या माटुंगा येथील मद्रास चाळ चौकी जवळ पोहोचलो. विजयने ऑफिसमध्ये जाऊन दहा मिनिटांत त्याचे काम आटपले आणि मला शिवाजी पार्क पर्यंत कंपनी देऊन घरी गेला.

सकाळीच दादरला फिरून आवश्यक घर समान खरेदी केले आणि तडक घर गाठले. अडीच तासात 52 किमी राईड झाली होती.

अतुल आल्यामुळे राईडची मजा वाढली होती, तर विजयामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचे दर्शन झाले होते. मनात आता सायकलिंगचा नव्या वाटा फेर धरत होत्या.

सतीश विष्णू जाधव

6 comments:

  1. Great,स्वतः सायकलिंग करून आल्या सारखे वाटले

    ReplyDelete
  2. Great,स्वतः सायकलिंग करून आल्या सारखे वाटले

    ReplyDelete
  3. मामा तुमचा जोश लाजवाब आहे.

    ReplyDelete
  4. मस्त वर्णन आणी फोटोही सुंदर. ट्वीन टॉवर ची कल्पना मस्त

    ReplyDelete