Tuesday, August 25, 2020

धुतपापेश्वर राईड

धुतपापेश्वर राईड

२३ ऑगस्ट, २०२०

धुतपापेश्वर मंदिराचे नाव बऱ्याच वर्षांपासून ऐकून होतो  पण पाहणे झाले नव्हते. त्यामुळे आज धुतपापेश्वर राईड करायची हे नक्की केले.

वाल्ये गावातून राईड सुरू झाली. आज कोंडये गावाकडे जाणारा चढाचा रस्ता निवडला होता. चिंचोळा रस्ता आणि पावसात डांबर-खडीची धूप झाल्यामुळे रस्ता ऑफ रोडिंग झाला होता. गियर एक बाय दोन लावून अतिशय संथ गतीने घाट चढून गेलो. अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. डोंगराच्या वर सपाटीला पोहोचताच, जोरदार पाऊस सुरू झाला. पावसाच्या जलधारा मध्ये घाम आणि शीण दोन्हीही वाहून गेला. 

पठाराच्या दोन्ही बाजूला बेधुंद हिरवळ आणि काजूची झाडे दिसत होती. पाणथळीमध्ये पडलेले झाडांचे प्रतिबिंब निसर्गाचे आगळे वेगळे प्रतिरूप दाखवत होते.  

आणखी दोन चढ-उतार केल्यावर वाल्ये गावाची हद्द संपून पन्हाळे गाव सुरू झाले. वेशिवरच्या एका टपरीवर पाचसहा वयस्क बसले होते. त्यांना रामराम करताच, सर्वांनी ऊभे राहून मला प्रति नमस्कार केला. सायकलने घाट चढून आल्याचे आश्चर्य सर्वांच्या चेहऱ्यावर जाणवत होते. धुतपापेश्वरला जाणार हे सांगितल्यावर, एक आजोबा म्हणाले, 'सायकलने',  'हो' म्हणताच त्यांनी तोंडभरून आशीर्वाद दिले.

कोंडये गावाच्या चढउताराची वाट पार करून हायवेला आलो. पाऊस अजूनही लपंडाव खेळत होता. कोंडये गावाचा चढ लागला आणि पेडलिंग करताना घामाच्या धारा वाहत होत्या. पुन्हा उताराला पावसाचा मारा सुरू झाला. अतिशय मजेत सफर सुरू होती. "सुहाना सफर और ये मौसम हसी" हे गाणे आपसूकच ओठावर आले. हायवेच्या दोन्ही बाजूला पसरलेली झाडे आणि भाताची शेती पाहून सायकल थांबविली आणि गाणे गात निसर्गाबरोबर संवाद साधला. 

भाताची हिरवीगार पाने डोलून साथ देत होती. लाल पिवळी गवतफुले एकमेकांशी दांडिया रास करीत डोलत होती. फुलांच्या ओढीने फुलपाखरे त्यांच्याशी हसत खेळत लपंडाव करीत होते. जगाला आनंद देण्यासाठी उमललेली ही क्षणभंगुर फुले, चिरकाल मनाच्या गाभाऱ्यात दरवळत होती.

जुवाटी फाटा पार केला, त्या नंतर जैतापूरला जाणारा हातीवले फाटा लागला. फाट्यावरच्या उदय जानवलकरच्या टपरीवर आलो.  अर्धा डझन केळी घेतली. दोन खाल्ली आणि बाकीची पाठपिशवीत ठेवली. केळी म्हणजे सायकलिंग साठी बूस्टर डोस असतो. 
आरेकर वाडी बस स्टॉप पार केल्यावर टोल नाका लागला. तेथून पुन्हा चढला सुरुवात झाली. हॉटेल अंकिता पॅलेस हॉटेलपर्यंत चढ चढल्यावर उतार सुरू झाला. हायवे सोडून उजव्या बाजूला गंगातीर्थाकडे वळसा घेतला. 

राजपुरचे गंगातीर्थ ऐतिहासिक महत्वाचे आणि पवित्र स्थळ आहे. 
छत्रपती शिवाजी महाराजांनी विजयापुरच्या (बिजापूर) बादशहावर स्वारी करून राजापूर ताब्यात घेतल्यावर या गंगातीर्थाला भेट दिली होती. कविवर्य मोरोपंतांनी भेट देऊन  राजापूरच्या गंगेचे महात्म्य सांगणारे  "गंगा प्रतिनिधीर्थ कीर्तन" काव्य रचले आहे. गंगातीर्थाच्या जीर्णोद्धारासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी भरीव देणगी दिली आहे. 

दर तीन वर्षांनी आगमन होणाऱ्या गंगातीर्थाला महाराष्ट्राच्या इतिहासात मनाचे स्थान आहे. येथे एकूण चौदा कुंड आहेत, त्यातील काशीकुंड आणि मूळ गंगा कुंड  'प्रमुख कुंड' आहेत.

चौदाव्या शतकात राजा रुद्रप्रताप यांनी चौदा कुंडांचे बांधकाम केले. विशेष म्हणजे या कुंडांतील प्रत्येक जलाचे तापमान वेगवेगळे आहे. 

या गंगातीर्थाला सवाई माधवराव पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर यांनी भेटी दिल्या आहेत. जेव्हा गंगा अवतीर्ण होते तेव्हा येथे मोठी यात्रा भरते. भारतवर्षातील अनेक भाविक या गंगा 
तीर्थाला भेट देतात. सध्याच्या परिस्थितीमुळे मंदिर बंद होते. बाहेरून सायकलसह फोटो काढून उन्हाळे गावाकडे प्रस्थान केले. 

या उन्हाळे गावात गरम पाण्याची पवित्र कुंड आहेत. बाजूलाच ग्रामदैवत महालक्ष्मीचे भव्य मंदिर आहे. 


हिच्या चरणामधून या पवित्र गरम झऱ्यांची निर्मिती झाली आहे. भाविक या कुंडात स्नान करणे म्हणजे मातेचा कृपा प्रसाद मानतात. अर्जुना नदीच्या वाढलेल्या पाण्यामुळे गरम पाण्याचे कुंड भरून गेले होते. 

जवळच स्वामी समर्थांचा मठ आहे. तेथे स्वामी समर्थांच्या पादुका आहेत. उन्हाळे गाव आणि मठ नारळी, पोफळी, आंबा, फणस, काजूंच्या झाडांमध्ये वसलेले आहे. बाजूने वाहणारी अर्जुना नदी, हिरवागार निसर्ग, रम्य शांत वातावरणामुळे मन भावविभोर झाले.

 खरच... सायकलिंगमुळे कोकणातील निसर्गरम्य तिर्थस्थळे पाहण्याचा योग जुळून आला होता. येथून जवळच कोकण रेल्वेचे राजापूर स्टेशन आहे. 
 
 आता सुरू झाली राजापूरकडे सायकल राईड.  अर्जुना नदीच्या पैल तीरावर राजापूर शहर वसलेले आहे. हे शहर ऐतिहासिक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या "आज्ञापत्रात" राजपुरचा उल्लेख आहे.  महाराजांच्या दूरदर्शीपणामुळेच इंग्रजांना समुद्र किनारची बंदरे वापरासाठी न देता तीस किमी आत  खाडी मध्ये व्यापारासाठी राजापूर बंदर वापराची परवानगी दिली होती. जेणे करून त्यांच्या सर्व व्यापारउदिमावर बारकाईने नजर ठेवता येईल.
 
राजापूर शहरात प्रवेश केला आणि खाडी 
किनाऱ्याने  दोन किमी आत आल्यावर खाडी ओलांडून घुतपापेश्वर घाट चढायला सुरुवात केली. चार किमीचा अतिशय कठीण चढ होता. सुरुवातीला  एक बाय दोन आणि नंतर एक बाय एकवर गियर लावून घाट पार केला. येथे  पावसाच्या साथीमुळे  न थांबता,  न थकता, एका दमात घाट पार केला. 

धोपेश्वर गावात प्राचीन धुतपापेश्वर मंदिर आहे. श्री शंकराचे स्वयंभू शिवलिंग धबधब्या खालील छोट्या गुंफेत आहे. 
तसेच  या शिवलिंगावर धबधब्याचा जलाभिषेक होत असतो. यालाच कोटीतीर्थ म्हणतात. आज पडत असलेल्या जोरदार पावसामुळे धबधब्याला खूप पाणी होते, त्यामुळे शिवलिंगपर्यंत जाणे अशक्य होते.

ह्या निसर्गरम्य धबधब्याच्या तीन स्टेप्स आहेत. त्याचा धीरगंभीर आवाज, आजूबाजूला घनदाट अरण्य, खाली जाणारी खोल दरी, नारळ, पोफळी केळीच्या बागा,  हे अप्रतिम वातावरण पाहिल्यावर शिवशंकर महाराज येथे का आले असावेत, याची प्रचिती येते.
धबधब्याच्या बाजूला धुतपापेश्वराचे मंदिर सुद्धा आहे. मंदिर खुले होते. परंतू एकच कुटुंब देवदर्शनाला आले होते. मुख्य गर्भ गृह बंद होते.धबधब्याचे व्हिडीओ आणि फोटो काढून बाहेर आलो. 

मंदिराबाहेर एक अवलिया श्री वसंत ठाकूर यांची भेट झाली. 
यांच्या डाव्या हाताची नखे चार फूट लांब आहेत. यामुळे त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद आहे

एक नकलाकार, पक्षांचे, प्राण्यांचे, फिल्मी कलाकारांचे आवाज काढणारा, शिट्टीने गाणी म्हणणारा, तांदळावर दीडशे अक्षरे, गाईच्या केसावर गणपती काढणारा हा असामी जगावेगळा आहे. गेली ३५ वर्ष घालविली आहेत त्याने नखे वाढविण्यात.
 बाळासाहेब ठाकरे, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन यांचा फॅन आहे. सर्वांचे हुबेहूब आवाज काढण्यात पटाईत.  समर्थ रामदास स्वामींचा शिष्य समजतो स्वतःला, त्यामुळे पायात चप्पल घालत नाही, ब्रम्हचारी आहे आणि धोपेश्वर गावात आई सोबत राहतो. तसेच सतत नामस्मरण करीत असतो.
 
त्याच्या समवेत तासभर होतो. प्रत्येक क्षण मला हसवत होता, त्याच्या नकलांच्या साथीने.  निसर्गावर प्रेम करणारा, प्रचंड सकारात्मक दृष्टोकोन असणारा  हा माणूस ध्येय वेडा आहे. 

त्याला माहित आहे, चांगले बोलण्यामुळे आणि तसेच वागण्यामुळेच सांसारिक पाश नसताना सुद्धा  खूप मोठा मित्रपरिवार आहे त्याचा. वेडीच माणसे जगावेगळे छंद जोपासू शकतात, याची जाणीव झाली. 

सायकल भ्रमंती करताना अशी माणसे भेटणे हे खरंच माझे भाग्य होते.

वसंत ठाकूर यांनी सांगितलेले काही विचार  : - 

ज्या घरात म्हातारे आई वडील राहतात 

तो सर्वात मोठा  श्रीमंत माणूस. 

माणूस कमावलेल्या पैशाने श्रीमंत होत नाही

तर जमवलेल्या माणसांनी श्रीमंत होतो.

फुले नित्य फुलतात, ज्योती अखंड उजळतात

आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात.

कारण सांगणारे लोक कधीही यशस्वी होत नाहीत

आणि यशस्वी होणारी माणसे कधीही कारण सांगत नाहीत.

कालचा दिवस गेला,

उद्याचा दिवस अजून यायचा आहे,

आजचा दिवस तुमच्या हातात आहे,

चला कामाला लागा.

आजची डोंगर दऱ्यातील ५० किमी सायकल राईड  राजापूर परिसरातील प्रसिद्ध स्थळे, तीर्थक्षेत्र पाहण्यासाठी होती. पण त्या अनुषंगाने नकळत राजापूरच्या  धेय्यवेड्या माणसाची पण मैत्री झाली.

सतीश जाधव
आझाद पंछी...

 

10 comments:

  1. भाई तुझ्या या लिहीण्यान् आमच्या जीवाची काहीली होते
    जीवाची मंबई आहे लेका
    मजाच मजा

    ReplyDelete
  2. मस्तच छान प्रवासवर्णन ....साहेब या सर्व पर्वसवर्णनाचा एकत्रित संग्रह एकाचवेळी प्रकाशित करा सर्वांना छान माहिती मिळेल.
    ----स्वप्निल नागरे

    ReplyDelete
  3. सुंदर लिखाण, त्या निमित्ताने राजापूर पहायला मिळत आहे. धन्यवाद

    ReplyDelete
  4. सुंदरलिखाण, त्या निमित्ताने राजापूर पहायला मिळत आम्हाला. धन्यवाद

    ReplyDelete
  5. अप्रतिम लेखन

    ReplyDelete
  6. अप्रतिम लेखन

    ReplyDelete
  7. अत्यंत वाचनीय वर्णन. धुतपापेश्वर मंदिराचे पूर्वीचे बांधकाम हे पूर्णपणे लाकडी होते.अत्यंत कलाकुसरीने नटलेले खांब होते. मला वाटते सध्या ते सिमेंट चे बांधण्यात आले आहे. राजापूर शहर ते धुतपापेश्वर हा अत्यंत कठीण चढ आहे. तुम्ही तो सहज पार केला याबद्दल मला आश्चर्य वाटते.
    विजय कांबळे.

    ReplyDelete
  8. ईथला मध खुप प्रसिद्ध होता. अजुनही मिळतो का माहित नाही.ऊन्हाळे गायमुखातुन गरम गरम पाणी बाराही महिने पडायच. खुप आठवणी जाग्या झाल्या. माझा मित्र खाली बाजारपेठेत रहायचा. त्याच्याकडे सुट्टीत रहायला जायचो आणि तेव्हा साध्या सायकलने हे सर्व फिरायचो आम्ही. खुप छान लेख.

    ReplyDelete
  9. कोकणातील निसर्गाचे असे वर्णन केले आहे. आपण स्वत ःफिरतोय असे वाटते. छान

    ReplyDelete