Friday, January 19, 2024

मेघालय मधील व्हिसलिंग गांव काँगथॉंग

मेघालय मधील व्हिसलिंग गांव काँगथॉंग 

मेघालयची राजधानी शिलॉंगपासून साठ किमी आणि सोहरा पासून पन्नास किमी अंतरावर वसलेल्या काँगथॉंग या गावाला सखिसह भेट देण्याचा योग आला... 

 सोहरा (चेरापुंजी) येथून पहाटे साडेपाच वाजता भर थंडीत आणि धुकाळ वातावरणात सायकलिंग सुरू झाली... पहिले पंचवीस किमी चढाचा रस्ता पार करायचा होता... वळणदार आणि बाकदार रस्त्यावर थंडी सोबत हेड विंड सुध्दा शरीराचा आणि मनाचा कस लावत होता... संपूर्ण चढ संपल्यावर मावजरॉंग गाव लागले... आणि सुरू झाला ऑफ रोडींग चढ आणि उतार...

रत्याची कामे चालली असल्यामुळे जवळपास २५ किमीचा ऑफ रोडींग डाऊन हील रस्त्यावर सायकलिंग करताना बोट चालविल्याचे फिलिंग येत होते... अशा वेळी कंबर, पाठ, मणका शाबूत राहण्यासाठी सीट वर न बसता कंबर थोडी वर उचलणे आवश्यक असते... परंतु त्याच वेळी पेडलवरचे पाय जमिनीला समांतर असावे लागतात... अशा ऑफ रोडींग मध्ये वळणावर अतिशय सावध राहावे लागते... डाऊन हील ऑफ रोडींग करायला MTB सायकल आणि हायड्रॉलिक डिस्क ब्रेक शिवाय पर्याय नाही... या ठिकाणी सायकलिंग मधलं सर्व कसब कामाला आले... समर्पयामि मधून घेतलेल्या  ट्रेनिंगमुळे या डाऊनहीलचा पुरेपूर आनंद घेतला... आणि  आनंदाच्या लाटेवर स्वार होऊन काँगथॉंग गावात पोहोचलो...

भले मोठे भव्य प्रवेशद्वार... त्यावर  गावाचे नाव आणि त्याची ओळख लिहिलेली होती... "Kongthong the Vhistling Village" 

 सातशे लोकसंख्या आणि दिडशे घरांचे हे छोटेसे गाव  भारतातील सर्वात मनोरंजक ठिकाणांपैकी एक आहे... नितांत सुंदर निसर्ग सौंदर्यने नटलेले  मेघालयातील एक उत्कृष्ट पर्यावरण असलेले पर्यटन स्थळ आहे.

 परंतु या गावाची आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे येथील आगळीवेगळी प्राचीन परंपरा.  गावातील प्रत्येक रहिवाशाला सांगितीक नाव आहे... तसेच  ही  विलोभनीय परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे.

  मेघालयातील शिट्टी वाजवणारे गाव म्हणून केंद्र शासनाने त्याला "टुरिझम विलेज" चा दर्जा दिला आहे...

प्रवेशद्वारा जवळच मुंबईच्या रवी सबरवालची भेट झाली... मुंबईची माणसं जेव्हा भेटतात तेव्हा घरातील माणूस भेटल्याचा आनंद होतो... 

गेटजवळ गावातील गाईड "बाकेन" याने स्वागत केले...  गावाची तसेच येथील पूर्वापार चालत आलेल्या परंपरेची ओळख करून दिली... त्याचे विसलींग शॉर्ट नाव आहे  "कु कू उई"... आणि मोठे नाव आहे "कुकू कुकू कुऊsss कुकू कुकुकुकू..." आहे ना गंमत...

खासी भाषा बोलणारे गाव त्यांच्या खासी जेवणासाठी आणि घरांसाठी प्रसिद्ध आहे... 

येथेच टेन्टवाली गाडी घेऊन आलेले दिल्लीचे रम्या आणि शिवम गोयल कुटुंबाची भेट आणि परिचय  झाला... गावात गावकऱ्यांनी सहकारी तत्त्वावर खासी परंपरा जपलेली घरे "ट्रॅव्हलर्स नेस्ट"  कॉटेजची निर्मिती केली आहे...


...ती सुद्धा आदिवासी खासी झोपडी सारखी...


अद्ययावत सुखासोईनी युक्त अशा घरात आणि निसर्गरम्य हिरवळीच्या सान्निध्यात राहणे म्हणजे जीवनाची  पर्वणी होती...  एका दिवसाचे भाडे २००० रू असल्यामुळे... ५०० रुपयात सखी सोबत टेन्ट मध्ये राहणे पसंत केले...टेन्टच्या घरात बसून निसर्गात विरघळून जाण्यात एक वेगळीच खुमारी होती..

 

स्लीपिंग बॅग बरोबर असल्यामुळे रात्रीची थंडी जाणवली नाही... सकाळचा ब्रेड आम्लेट आणि चहाचा नाष्टा कॉंम्प्लिमेंटरी होता... या कॉटेजेसच्या केअरटेकरचे नाव होते फिडींगस्टार... हे नाव सुद्धा सांगीतिक आहे...

 बोलक्या आणि प्रेमळ गोयल कुटुंबासोबत गावात फेरफटका मारला...

खासी पद्धतीच्या जेवणाचा सुद्धा आस्वाद घेता आला... अतिशय तिखट मिरची आणि मसालेदार मोमो खायला मिळाले...

 टुरिस्ट कॉटेजचा केअरटेकर "फिडींगस्टार"  गावातील  एका वयस्क महिलेच्या घरी घेऊन गेला... तिने "खुबलय" म्हणजे नमस्ते म्हटले... 

फिडींगस्टारने गावाची खासियत सविस्तर सांगितली...

मेघालय मधील एक आकर्षक आणि मनोरंजक असे हे गाव ... ते त्याच्या आगळ्या वेगळ्या अतिशय पुरातन परंपरेमुळे नावारूपाला आले आहे... या गावातील प्रत्येकाला स्वतःचे एक संगीत नाव आहे... 

कोंगथॉन्ग गावात जेव्हा मूल जन्माला येते तेव्हा आई मुलासाठी एक आगळीवेगळी सूरमयी शिट्टीची धून तयार करते. ते सुंदर सुरच त्या मुलाचे नाव बनते... लहानपणापासून आई बाळाला या सूरमयी शिट्टीने हाक मारते...साद घालून पुकारते...

ह्या विसलिंग नावाचं संगीत कँपोझिशन बाळाची आई करते... गावातील प्रत्येक व्यक्तीला असे युनिक व्हिसलिंग नाव आहे... 

  येथील प्रत्येक गावकरी एकमेकांना या अनोख्या सुरांच्या शिट्टीने हाक मारतो... तसेच  प्रत्येकाचे नाव एकमेकांना माहीत असते... ते सहजपणे उच्चारतात...

या सुंदर परंपरेला "जिंग्रवाई लॉबेई"  म्हणतात... याचा अर्थ आहे... कुळातील पहिल्या स्त्रीचे गाणे...

केवळ माताच आपल्या मुलाला असे अद्वितीय नाव देऊ शकते. मातेचे प्रेम आणि ममत्व या नावासोबत जन्माला येते...

पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही परंपरा केवळ नाव घेण्यासाठी आहे असे नाही... तर जंगलातील प्राणिमात्र, पक्षी, पर्यावरण यांना त्रास न होता... माणसांना लांब अंतरावर एकमेकांशी संवाद साधण्यास याने मदत होते... व्हीसलने ज्याचे नाव घेतले जाते... तोच त्याला प्रतिसाद देतो...

जंगलात अन्न, कंदमुळं, औषधी झाडपाला आणि जीवनावश्यक वस्तू गोळा करण्यात त्यांचा बहुतांश वेळ जातो... अशा वेळी शिट्टीने एकमेकांना साद घालणे सोपे होते...  या अद्वितीय मार्गाने समोरची व्यक्ती काय म्हणत आहे हे सुद्धा समजून येते...

या गावातील प्रत्येक व्यक्तीच्या सूरमयी शिट्टीच्या नावाचे दोन प्रकार असतात...  एक मोठे नाव आणि एक लहान...  दोन्ही  नावे जन्माच्या वेळी दिलेली असतात... लहान नाव सामान्यतः घरी वापरले जाते... तर मोठे नाव जंगलात वापरले जाते... मोठ्या नावाचे स्वर सुद्धा वरच्या पट्टीत असतात... 

कोंबडा या गावाचा ग्रामीण पक्षी आहे...  कोबड्याच्या बांगे सारखीच ही नावे असतात... त्यामुळे यांच्या नावात 'क' ची बाराखडी सापडते...

सूरमयी सांगीतिक नाव ही या गावातील खासी जमातीच्या आदिवासींची  प्राचीन परंपरा आहे आणि ती त्यांनी अजूनही जपली आहे... भारत सरकारने या परंपरेची नोंद घेऊन... या गावाला टुरिझम व्हिलेज म्हणून मान्यता दिली आहे... त्यामुळेच येथील घरे आता होम स्टे मध्ये बदलत आहेत... रस्ते सुधारण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे... 

मेघालय मधील एक प्रेक्षणीय गाव म्हणून काँगथॉंग उदयाला आले आहे...  विशेष म्हणजे येथे खासी जेवणाचा स्वाद घेता येतो...  पर्यटन गावाचा दर्जा मिळाल्यामुळे या गावात प्रवेश करताना ५० रुपये पर्यटन कर भरावा लागतो...

रात्र झाल्यावर चांगलीच थंडी जाणवू लागली होती... रात्री आठ वाजताच जेवणाची शिट्टी वाजली... उघड्या माळरानात टेबलावर जेवणे शक्य नव्हते म्हणून शेजारच्या किचन कॉटेज मध्ये आम्ही तिघे जेवायला बसलो... हुडहुडत गरमागरम सूप प्यायलो आणि जरा बरे वाटले... भाजी, कालवण आणि भातावर ताव मारला... दोन खासी चटण्या आणि पापड फस्त केले... त्यानंतर बराच वेळ शेकोटी जवळ बसून गप्पांचा फड रंगविला... दोघेही वकील आणि ट्रेकर असलेले गोयल कुटुंब... सायकलिंगच्या गमतीजमती मध्ये मस्त रमून गेले होते... 

आकाशात सजलेले तारांगण... पानांची सळसळ... रातकिड्यांचा किर्र किर्र आवाज... आणि थंड वाऱ्याचा येणारा झोत... या सर्व निसर्ग संगीतासह  टेन्टमध्ये  सूरमयी गावाचे गुण गुणगुणत कधी निद्राधीन झालो ते कळलेच नाही... 

पहाटे चार वाजता जाग आली... ती कोंबड्याच्या "कुकूsss च कू" आवाजानेच...

मित्रांनो... खाली व्हिडिओ लिंक दिली आहे... संगीतमय नावे ऐकण्यासाठी...

https://youtu.be/A6iZ-T-IUNE?si=KD9EHq7hwFqo3r8s

मंगल हो...!!!

Tuesday, January 2, 2024

सखिची शिकवण... तीन सुखिया ते तेजू दरम्यान...


सखिची शिकवण... तीन सुखिया ते तेजू दरम्यान...

कालच गाडीने आजारी सखीला तीनसूकियाला आणले होते... 

सखीचा एक पाय आणि पायाची हाडे पूर्ण निकामी झाली होती... मेजर ऑपरेशन होते... मॅकेनिक डॉ. राजू संपूर्ण दिवस ऑपरेशन करत होता आणि सायंकाळी  सखीची सर्जरी पूर्ण झाली होती...

रीकव्हारी वॉर्ड मध्ये आणल्यावर... थोडा वेळ तिच्या हाताला धरून फिरवून आणले... अजूनही मागच्या पायातून  खुडखुड आवाज येत होता... डॉ. राजुने पुन्हा एक मायनर सर्जरी केली... आता सखी तयार झाली होती... कीबीतूला  सफर करत जायला... 

पण त्या आधी प्लेन रस्त्यावर तिला टेस्ट राईड द्यावी लागणार होती... मग ठरले तीनसुकिया ते तेझू ही १३४ किमीची सफर सखीने बारा तासात पूर्ण करायची... तरच ती किबीतू साठी क्वलिफाय होणार होती...

सकाळी सहा वाजता विवेकानंद केंद्र तीनसुखिया येथून सखीची टेस्ट राईड  सुरू झाली... सकाळीच विवेकानंद केंद्र शाळेचा काही स्टाफ हजर होता...

सखिबरोबर फोटो काढायला... तो गेटवरचा शिपाई सुद्धा फोटो काढायला पुढे होता... केवढा सन्मान सखीचा...

पहिला पडाव तीस किमीवरचे डुमडूमा गाव होते... त्याच्या पाच किमी अलीकडेच डुमडूमाचे सायकलिस्ट राजेंद्र आणि अनिल कुमार यांची भेट झाली...

थोड्याच वेळात डुमडूमा गाठले... पावणे दोन तासात हा पडाव आरामात पार झाला होता ... तेथे राजेंद्रने नाष्टा खाऊ घातला...

नंतर अनिलने फुलाबारी पर्यंत... तर राजेंद्रने काकोपठार पर्यंत सायकल साथ दिली... पुन्हा राजेंद्रने काकोपठार येथे नाश्त्याची ट्रीट दिली... सोबत खूप फोटो काढले...


केंद्र शासनात सचिव असणारे राजेंद्र आणि अनिल दोघेही भारावून गेले होते... त्यांच्या सायकलिंगच्या संकल्पना बदलून गेल्या होत्या...

पुढे काकोपठारच्या अभिरुची क्लबने आसामी गमचा देऊन सन्मान केला... खर तर हा सखीचा सन्मान होता...

कारण आज ती पुन्हा जोमाने तयार झाली होती किबीतू साठी...

अरुणाचल चेक पोष्टवर पोलिसांनी आगळा वेगळा सन्मान केला... केळ्याचा घड आणि किलोभर संत्री... आणि पाण्याच्या तीन बाटल्या दिल्या...


विशेष म्हणजे केळी आणि संत्र्याचे पैसे पोलिसांनी ताबडतोब त्या गाडीवाल्या फळ विक्रेत्याला दिले... सखी बरोबर फोटो काढायचा मोह पोलिसांना सुद्धा आवरता आला नाही... आज सखीची चंगळ होती...

पुढे नामसाई येथील विवेकानंद शाळेत सखीचे स्वागत झाले... तिला पाहायला शाळेतील सर्व मुले गोळा झाली होती...


मुख्याध्यापक पिल्लई सर आणि सर्व स्टाफनी सखीसोबत फोटो काढले... बालगोपाळ तर जल्लोष करत होते... 

अलुबारी पुलावर येऊन निसर्गात रमली सखी... लोहित ब्रह्मपुत्र नदीवर असलेल्या या पुलावर थोडा वेळ विसावली...


जवळपास शंभर किमी राईड केली होती सखीने... 

अंधार पडायच्या आत पोहोचायचे होते तेजूला... सखीला सांगितले मला थोडी विश्रांती देशील काय... सखी गालात हसली... चौखम येथे मला केक आणि चहा पाजला... 

आता शेवटचे ३४ किमी पार करायचे होते... अडीच वाजले होते... आणि अंधार व्हायच्या आधी तेजू गाठायचे होते...  सखीचा वेग वाढला...  एका दमात वीस किमी पार केले...  शेवटच्या १४ किमी पॅच मध्ये  जंगल लागले... चार वाजले होते... निबीड जंगलामुळे रस्ता अंधुकला झाला होता... थंडी वाढू लागली होती... मागची लाल ब्लिंकर लाईट चालू केली... अंगाशी  थंड वारे झोंबी करत होते... हिरवे विंड चीटर घट्ट बंद केले... पुढची पांढरी लाईट चालू केली... सखीचा वेग मंदावला होता... जंगल पार झाले... भूक लागल्यामुळे जवळच्या टपरीवर चहा आणि बिस्किटांवर ताव मारला...

 शेवटचे पाच किमी राहिले होते...  चहापान करून साडेपाच वाजता शेवटच्या पाच किमीची राईड सुरू केली... या पॅच मध्ये सतत स्पीड ब्रेकर होते... त्यावर मागचे कॅरियर डुगडूगू लागले आहे याची जाणीव झाली... त्यामुळे हॅण्डल सुद्धा डुचमळू लागले... सखीचे काही स्क्रू ढिले झाले आहेत काय याची तपासणी करणे  तसेच  तुटलेले कॅरियर रिपेअर करणे आवश्यक होते... 

तेजुमध्ये प्रवेश केला... पाठीवरच्या छोट्या बॅगेचा चेन रनर खराब झाला होता... तो सुद्धा बदलून घेतला...   

घड्याळ टॉवर चौकात किबितूच्या राईडसाठी  खाऊ घ्यायला थांबलो... तेथे रायडर आयुष साहूची भेट झाली...


मुलाखत घेतल्यावर त्याने चहासह नमकिन खाऊ घातले... म्हणाला "सर तुमच्यामुळे माझे हौसले बुलंद झाले आहेत... तेजू मध्ये काही मदत लागली तर सांगा"

सहा वाजता रमत गमत सखी विवेकानंद केंद्र शाळेत पोहोचली... आणि म्हणाली "मला उद्या विश्रांती हवी आहे... माझे सर्व ढिले झालेले स्क्रू आणि कॅरीयर उद्या दुरुस्त करून परवा सकाळी किबीतू राईड सुरू करूया"...

तिच्या आदेशाला मान देण्याशिवाय काहीही पर्याय नव्हता... 

"आज सखिने १३४ किमी पूर्ण केले होते आणि आजच्या टेस्ट ड्राइव्ह मध्ये  शंभर पैकी शंभर गुणांनी पास झाली होती...  सलाम तिच्या जिद्दीला"...

सखी कडून सतत काहीतरी शिकतो आहे... हेच आजच्या राईडचे फलित होते...

मंगल हो... !!!






Sunday, December 31, 2023

एका अपघाताची गंमत

एका अपघाताची गंमत

तेजुमध्ये मौशूमी दिदी,जयश्री ताई,  शिवांगी आणि प्रियाल यांना टाटा करून आज सकाळी सव्वा सहा वाजता राईड सुरू झाली... मौशूमी दिदीनेच करूणा ट्रस्टच्या गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती... 

आज पासून एक्सपिडिशन मधला महत्त्वाचा टप्पा सुरू झाला होता... किबीतू आणि हेल्मेट टॉप हे बकेट लिस्ट मधील हॉट स्पॉट होते... दिड महिन्यात त्रिपुरा, मिझोराम, मेघालय आणि आसाम पादाक्रांत करून शेवटच्या पंधरा दिवसात अरुणाचल मध्ये पेडलींग करायचे होते.

मागच्या दिड महिन्यात प्रचंड मित्र परिवार मिळाला होता तसेच शाळेतले बालगोपाल दोस्त झाले होते... या सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा घेऊन  या वर्षाच्या शेवटच्या दिवसाची रम्य सकाळी राईड सुरू केली होती.

सकाळचे थंड वारे हिरव्या विड चीटर मधून सुद्धा अंगाला बोचत होते... थोडा चाढाचाच रस्ता असल्यामुळे धीम्या गतीने सायकल रायडिंग सुरू होते... दोन्ही बाजूची वनराई आणि धुकटलेले वातावरण मनाला उभारी आणत होते...  पानांची सळसळ आणि पक्षांचा किलकीलाट... या निसर्ग संगीतात धुंद होऊन अलगदपणे पेडलींग सुरू होते...

चकचकीत निवांत रस्ता लोहित नदीच्या किनाऱ्याने पुढे पुढे सरकत होता...


डीमवे गावा नंतर खडी चढाई सुरू होणार होती... तिथेच न्याहरी करून  चढाईला सुरुवात करणार होतो... आज अमलियांग पर्यंत ८१ किमीची सफर पूर्ण करायची होती... मनात एक अनामिक ओढ होती... किबीतु पर्यंत पोहोचून भारतीय सैनिकांना सदिच्छा भेट देण्याची...

डीमवे गाव चार किमी राहिले होते... एव्हढ्यात मागे जोरदार बॉम्ब स्फोटासारखा ढुंम आवाज झाला... दोन फूट पुढे फेकला गेलो... माझ्या अंगावर सखी... दोन मिनिटे काय झाले मलाच कळले नाही... स्वतःला सावरले... पाय सायकलच्या सीट मध्ये अडकला होता... आणि मागचे चाक फ्रेम मधून निखळून तीन चार ठिकाणी वेडेवाकडे झाले होते...


ट्युब फुटून जोरदार धमाका झाला होता... मोटारसायकलने मागून येऊन जोरदार धडक मारली होती...
 

मोटार सायकल रायडर धावत आला... माझा अडकलेला पाय बाहेर काढून हिरवळीवर बसविले... डोक्यात हेल्मेट आणि हातात ग्लोव्हज असल्यामुळे हेड इंज्युरी आणि हात सोलपटण्यापासून बचावलो होतो... कुल्याला मुका मार लागला होता... 

मोटार सायकलस्वार रडत पाया  पडू लागला... त्याला म्हणालो अरे रडू नकोस... आपण दोघेही बचावलो आहेत... मला पोलीस स्टेशन आणि हॉस्पिटलमध्ये न्यायची जबाबदारी आता तुझी आहे... मागे असलेल्या वळणावरून तो पुढे आल्यावर सूर्याची किरणे त्याच्या हेल्मेटच्या विंड शिल्डवर पडली आणि त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली... त्यामुळे वेगात तो सायकलवर धडकला होता...

विवेकानंद केंद्र शाळेचे मुख्याध्यापक चंपक काकोती सरांना फोन लावला... तातडीने शाळेचा सदस्य प्रशांता पोलिसांची गाडी घेऊन आला. पोलिस स्टेशन मधून आम्हा दोघांनाही तडक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोलीस घेऊन आले... डॉक्टरांनी संपूर्ण तपासणी केली अंगावर कुठेही काळेनिळे डाग नव्हते... दुखऱ्या कुल्यासाठी मलम आणि गोळ्या दिल्या... आज दिवसभारासाठी आराम करण्याचा सल्ला दिला...

पुन्हा पोलीस स्टेशन मध्ये आलो... मोटार सायकलस्वार  दिलबहाद्दुरचे रडून डोळे लाल झाले होते... मजुरी करणारा दिलबहाद्दुर ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी बायकोमुलांना खाऊ-मिठाई घेऊन घरी  निघाला होता... लोहित पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सांगितले "मला कंप्लेंट किंवा FIR करायचा नाही... याला सोडून द्या"... दिलबहाद्दुर पैसे देत होता... त्याला सांगितले "तू माझ्या मुलासारखा आहेस... तुझी बायको मुले घरी वाट पाहत असतील... लवकर घरी जा..."

पोलिस स्टेशनच्या बाहेर  आल्यावर बायको आणि मुलीला अपघात झाल्याचे कळविले... तसेच सर्व गृपवर व्हॉट्स ॲपवर कळविले... 

जवळच सायकलचे दुकान होते... त्याला सर्व घटना सांगून काय मदत करता येईल ते विचारले... याचे रीपेअरींग तीनसुखिया येथे होईल याची माहिती मिळाली... गुगल वर तीनसुखियाच्या किला सायकल शॉपीचा नंबर मिळाला... फोन करून आणि सायकलचा फोटो पाठवून परिस्थिती सांगितली... मालक ऋषभने आश्वासन दिले आणि  सांगितले.."सर उद्या सकाळी सायकल घेऊन या... तुम्हाला टकाटक करून देतो...

आजचा अपघात हा अनपेक्षितपणें घडलेली घटना होती...  हेल्मेट  ग्लोव्हज  गॉगल  हे सेफ्टी गियर्स आणि अल्युम्यूनियम अलॉयच्या MTB  सायकलचा दणकटपणाच या अपघातातून काहीही इजा न होता मला वाचवू शकला... खरं तर सखीने माझ्यावर आलेला कठीण प्रसंग स्वतःवर घेतला होता... आता माझे कर्तव्य आहे तिला टकाटक करण्याचे होते...

तसेच तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आशीर्वाद... या सफरीत सर्वांनी दिलेले सहकार्यच... परमेश्वराच्या चरणी रुजू झाले होते...

म्हणूनच म्हणतात ना... "देव तारी त्याला कोण मारी"

हा अपघात म्हणजे...  एखाद्या सस्पेन्स चित्रपटात घडणाऱ्या घटनां सारखा होता... पुढे काय होणार याची काडीची ही कल्पना नाही... पण डोकं शांत ठेऊन निर्णय घेणे... हीच आजच्या घटनेची गंमत होती...

मंगल हो... !!!

Wednesday, December 13, 2023

डबल डेकर हँगिंग ब्रीज आणि रेनबो धबधबा

डबल डेकर हँगिंग ब्रीज आणि रेनबो धबधबा 

आजची सोहरा (चेरापुंजी) ते नॉनग्रियट ही १८ किमीची डाऊन हील आणि नंतर अप हील राईड अतिशय टफ होती... 


डाऊन हील राईड केल्यावर खोल दरीत उतरत साडेतीन  हजार पायऱ्या  उतरून लिव्हिंग रूट डबल डेकर ब्रीजकडे ट्रेक केला... झाडांच्या पारंब्यापासून तयार झालेला ब्रीज निसर्गाचा चमत्कारच होता...

त्यानंतर आणखी अडीच किमी खाली चढउताराच्या पायऱ्या पार करून गेल्यावर... रेनबो वॉटर फॉल पाहिला... नव्हे अनुभवला...

झाडांच्या पारंब्यापासून तयार झालेला पूल... आणि धबधब्याच्या पाण्यात दिसणारे इंद्रधनुष्य हे अनुभवणे एक पर्वणीच होती...

या दोन्ही निसर्गसुंदर गोष्टीं बरोबरच..  दरीत उतरण्याचे ट्रेकिंग करताना...पक्षांचा किलबिलाट... किड्यांचा किर् किर् आवाज... मधमाश्यांचा  गुंजारव...

                    मधमाश्यांच घरट 

पाण्याचा खळखळाट... झाडांचे वेगवेगळे प्रकार ... त्यांची सळसळ...   ऐकून... पाहून... मन एका निर्वात पोकळीत गेले... शांत झाले...

वाटेत भेटणारे कामकरी... टुरिस्टनां चालताना कोठेही अडचण होऊ नये म्हणून... खाली उतरणाऱ्या  रस्त्याची डागडुजी करणारे... आणि वाटेत प्लॅस्टिक  रॅपर्स, बाटल्या उचलणारे गावकरी... रस्ता स्वच्छतेची पुरेपूर काळजी घेत होते...

दोन्ही स्पॉट पाहून परतीचा अपहील ट्रेक पूर्ण करून दुपारी अडीच वाजता टॉपला पोहोचलो...  आता खरी कसोटी होती... अठरा किमीची अपहील सायकल राईड करणे... 

सायंकाळी पाच पूर्वी हॉटेल वर पोहोचायचा प्रयत्न होता... आठ किमीचा अवघड घाट चढायलाच अडीच तास लागले... त्या वेळी समोरच्या डोंगरा आड अस्ताला जाणाऱ्या सूर्य देवाच्या  दर्शनाने मन हरखून गेले...

पुढचा सुद्धा सोहारा (चेरापुंजी) पर्यंतचा चढाचाच होता... वाटेतच अंधार पडला आणि थंडी वाढली... एका छोट्या धाब्यावर  थांबून चण्याची भाजी, दोन उकडलेली अंडी खाल्ली... 

लाईट चालू करून शेवटची सात किमी राईड सुरू केली... या संपूर्ण ट्रेल मध्ये शरीराचा आणि मनाचा कस लागला... 

सकाळी पावणे सहा वाजता सुरू केलेली राईड रात्री सहा वाजता पूर्ण झाली होती... हॉटेलवर आल्यावर रूम हिटरने पाय शेकून काढले... 

या खोल दरीच्या सफरीत नेट उपलब्ध नसल्यामुळे कोणालाही फोन करता आला नव्हता... त्यामुळे रात्री सर्वांशी निवांत गप्पा मारल्या... 

आजचे मुख्य आकर्षण  होते...  डबल डेकर रूट हँगिंग ब्रीज आणि रेनबो धबधबा पाहणे...

 निसर्गाच्या अंतरंगात शिरायचे असेल तर... खडतर परिश्रम करून निसर्गा जवळ जाणे आवश्यक ठरते...

आपली मंदिरे सुद्धा डोंगर दऱ्यात वसली आहेत त्याचं कारण पण हेच असावे का...

Thursday, November 30, 2023

टप‌ टप‌ पडती अंगावरती प्राजक्ताची फुले....


टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले...

पारीजातक किंवा प्राजक्त... अतिशय नाजूक आणि आवडीचे फुल... मस्त सुगंध दरवळतोय वेचलेल्या हातामध्ये...

प्राजक्ताचे फुल इतके नाजुक की हळुवार स्पर्शानेही कोमेजून जाणारे... 

उन्हाचा ताप सहन करायला नको म्हणुनच  रात्री उमलणारे.... 

आज पहाटे फुलांनी बहरलेला प्राजक्त पाहिला...

हिरवळीवर पडलेला सडा...

जसा काही आकाशात  प्रकट झालेल्या असंख्य तारकांच...

पांढर्‍याशुभ्र पाकळ्या आणि केशरी रंगाचा देठ...  निसर्गाचा हा नाजुक अविष्कार...

एखाद्या सुंदर आणि मादक ललने सारखा...

प्राजक्त पाहिला की अलगद आठवतात त्या व. पु. काळे यांच्या ओळी...

पारीजातकाचं  क्षणभंगुर आयुष्य लाभलं तरी चालेल...

पण लयलुट करायाची ती सुगंधाचीच...

मंगेश पाडगावकरांची कविता तर हृदयातील अनमोल ठेवा आहे...

टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले 

भिर् भिर् भिर् भिर् त्या तालावर गाणे अमुचे जुळे !

कुरणावरती, झाडांखाली ऊन-सावली विणते जाळी...

येतो वारा पाहा भरारा, गवत खुशीने डुले !

दुर दुर हे सूर वाहती उन्हात पिवळया पाहा नाहती...

हसते धरती, फांदीवरती हा झोपाळा झुले !

गाणे अमुचे झुळ-झुळ वारा... गाणे अमुचे लुक-लुक तारा...

पाऊस, वारा, मोरिपसारा या गाण्यातुन फुले !

फुलांसारखे सर्व फुलारे... सुरात मिसळुनि सुर चलारे... 

गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे !

तसेच सुवर्णतुला संगीत नाटकातील विद्याधर गोखले यांचे  पद आठवले...

अंगणी पारिजात फुलला ।

बहर तयाला काय माझिया प्रीतीचा आला ॥

धुंद मधुर हा गंध पसरला

गमले मजला मुकुंद हसला

सहवासातुर मदिय मनाचा कणकण मोहरला ॥

सुनिताबाईंच्या "आहे मनोहर तरीही"  ग्रंथामधला प्रसंग आठवला...

पहाटे  सुनिताबाई प्राजक्ताची  फुले वेचत असताना पु.ल. नीं हळूच झाड हलविले आणि सुनिताबाईंवर प्राजक्ताचा वर्षाव झाला... 

प्रेमाला वय नसतं... हेच प्राजक्त सांगतो...

त्यामुळे बालपणीचा काळ आठवला आणि जुन्या मधुर आठवणी चाळवल्या...

माझा बालमित्र... सकाळी प्राजक्त वेचुन घरी आणताना हाताच्या उष्णतेने कोमेजतात... म्हणुन ही फुले आणण्यासाठी ओला रुमाल अंगणात घेऊन जायचा...आणि घरात आणल्यावर घंगाळ्यात पाणी घालुन त्यावर  प्राजक्त तरंगत ठेवायचा... त्यामुळे संपूर्ण दिवसभर प्राजक्ताचा मंद दरवळ घरात असायचा...

त्यामुळे नेहमी वाटायचे जिण असावं तर प्राजक्ता सारखं...

या संदर्भात आनंद चित्रपटातील डायलॉग आठवला...

बाबू मोषाय... जिंदगी बडी होनी चाहिए... लंबी नाही...

किती जगलास यापेक्षा कसा जगालास हेच महत्त्वाचे आहे...

प्राजक्तांच्या फूलाबाबत फार सुंदर कथा आहे...

 रुपनगरच्या राजकन्येचं सुर्यावर निरतिशय प्रेम होत... लग्नाच्या दिवशी सुर्यदेव मांडवात येत नाहीत...म्हणुन राजकन्या रुसून... रागावुन... धगधगत्या होमकुंडात स्वतःला झोकुन देते... 

तेथे प्रकट होते प्राजक्ताचे रोपटे...

सुर्यदेवावर राग म्हणुन हे प्राजक्ताचे फुल दिवसा फुलत नाही...

दिवस उजाडला आणि सूर्य देव आसमंतात वर येऊ लागला की प्राजक्त  कोमेजून जाते... 

परंतु पहाटेचा मंद सुगंधीत दरवळ तिच्या निस्सीम प्रेमाची साक्ष देतं राहते...

लहानपणी आजीच्या गावाला गेल्यावर  प्राजक्ताच्या फुलांच्या माळा हातात घालून लपंडाव खेळायचो... 

प्राजक्ताचे केशरी देठ चुरडले की सुगंधित केशरी रंगाने हात गंधित व्हायचे...

फुलांचा पाऊस पहायचा असेल तर पहाटे प्राजक्ताचं झाड हळुवार हलवायचं आणि त्या सड्यात न्हाऊन जायचं...

श्री कृष्ण आणि सत्यभामेची कथा सुद्धा प्रसिद्ध आहे...

श्री कृष्ण हे झाड स्वर्गातून पट्टराणी रुक्मिणीसाठी आणत असताना... वाटेत सत्यभामेन हट्ट धरला... प्राजक्त माझ्या अंगणातच लावायचा... तिच्या हट्टाखातर श्री कृष्णाने तिच्या अंगणात प्राजक्त लावला... 

रुक्मिणी रुसली... श्री कृष्ण हसला आणि म्हणाला... उद्या सकाळी माझ्याबरोबर अंगणात ये... प्राजक्ताचा सर्व सडा रुक्मिणीच्या अंगणात पडलेला होता... 

शाळेत मंदारमाला वृत्त शिकविताना गुरुजींनी वरील कथा सांगितली होती... या वृत्तात बावीस अक्षरे असतात.. तसेच त्याचे उदाहरण अजूनही लक्षात आहे...

मंदारमाला रमालाच लाभे उभा वृक्ष तो सत्यभामांगणी

पहाटेच्या प्राजक्ताने आठणींचा खजिना उघडला...  सर्वांना भरभरून वाटण्यासाठीच...

मंगल हो... !!!



Tuesday, November 28, 2023

१७.११.२३... आगरतळा सायकल सफर... दुसरा दिवस

१७.११.२३...  आगरतळा सायकल सफर...

आगरतळा येथे रात्रभर पाऊस पडत होता... रात्री गारठा वाढला होता... पूर्वेकडच्या प्रांतात पहाटेच उजाडते... ब्रम्हमुहूर्तावर श्री  जगन्नाथाची काकड आरती सुरु झाली...  प्रातर्विधी आटपून ध्यानधारणा झाली... परमेश्वराचे दर्शन घेऊन जाकीट कानटोपी आणि रेनकोट घालून चौकात चहा प्यायला गेलो... पाऊस सुरूच होता...

चहाची नवीन रेसिपी पहायला मिळाली... चहाची पावडर पाण्यात उकळवून घेतली होती. एका ग्लासात दोन चमचे दुधाची पावडर आणि एक चमचा साखर घेऊन त्यात उकळते चहाचे पाणी ओतले... आणि चमच्याने मस्त घुसळले... झाली फक्कड चहा तयार... काही जण काळी चहा पीत होते...

सात वाजता देबाशिश मुजुमदार भेटायला येणार होता...  देबाशिशचा फोन आला... सतत पाऊस सतत पडत असल्याने त्याचे भेटणे पुढे गेले होते.  नंदूची सायकल असेंबल करायची होती. प्रथम प्लॅस्टिक रॅपर फाडून काढले... टॅग कापून सायकलचे  सर्व भाग सुटे केले. छोटा बटू गोविंद वल्लभदास सायकल जोडायला मदत करत होता...

त्यानंतर हक्काने माझ्या मोबाईलवर सुपर सॉनिक कार्टून पाहत होता...

पाऊस पडत असल्यामुळे बाहेर जाणे शक्य नव्हते. त्यामुळे मंदिरातच न्याहरी करायचे ठरविले... न्याहारीला गरमागरम डाळखिचडी मिळाली... पातळ खिचडी बोटांनी खाणे आणि ती अंगावर न सांडणे याला वेगळे कसब लागते... बाजूला बसलेल्या बाबूजीचे खिचडी खाणे पाहिले आणि यातली मेख कळली. तो हाताच्या पंजाने पातळ खिचडी ओरपत होता... यासाठी सराव करावा लागणार होता... म्हणून तूर्तास कागदी पानच तोंडाला लावले आणि खिचडी पिऊन टाकली.. तूपातील खिचडीमूळे मन तृप्त झाले...

नंदुची सायकल जोडून तयार झाली. आता दोन्ही सायकल अप टू डेट झाल्या होत्या. ... लोकल साईट पहायच्या होत्या पण पाऊस काही थांबायचे नाव घेत नव्हता. आज संपूर्ण त्रिपुरा पावसात चिंब झाले होते. मंदिरात आलेल्या देवांश बरोबर ओळख झाली. 

त्रिपुरा मधील महत्त्वाच्या स्थळांची माहिती मिळाली... "जवळच असलेला उज्जयंता महाल आणि रविंद्र भवन आठवणीने पाहा" देवांश म्हणाला...

दुपारी महाप्रसादाचा लाभ घेतला... येथे सर्वजण भात खातात... जेवण वाढण्याची नवीन पद्धत कळली. भातावर प्रथम पालक वाटाण्याची सुकी भाजी आली. ती भाजी आणि भाताचे चार घास खाल्ले... मग वरण वाढले गेले... पण भातावर नाही तर पत्रावळीच्या एका बाजूला... थोडासा डाळ भात खाल्ल्यावर केळीची भजी आली.. मग आली मिक्स भाजी त्यात पनीर पण होते... मग आली फ्लॉवरची भाजी... त्यानंतर आंबटगोड पायसम आणि शेवटी खीर... सर्व जेवणात भात कॉमन होता... हवा तेवढा घ्या... प्रत्येक पदार्थ गरमागरम खाण्यासाठीच ही पद्धती असावी... जेवणाची ही पद्धती विलक्षण भासली... आणि भावली सुद्धा...

अखंड पडत असलेल्या पावसामुळे आज आराम करण्याशिवाय गत्यंतर नव्हते...जोरदार थंड वारेसुद्धा वाहत होते... कानटोपी आणि जाकीट घालूनच मच्छरदाणीत  बसलो होतो...

सायंकाळी पुन्हा भोजन प्रसादीचा लाभ घेतला... जेवणासोबत गो मातेचे दूध मिळाले... सात्विक जेवण झाल्यावर सर्वांना फोन करण्याचा आनंद घेतला...

 परममित्र नवनीतला  फोन केला तेव्हा तो भरभरून सांगत होता...  रशिया वरून एक सायकलिस्ट सायकलिंग करत... मुंबईतील वरळी किल्ला पाहायला आला होता.  त्याला घरी घेऊन गेलो आणि त्याचा पाहुणचार केला...रशियन  ॲबीशी  आता जिगरी दोस्ती झाली आहे... या घटनेचा  झालेला आनंद नवनीतच्या बोलण्यातून ओसंडून वाहत होता...  

मित्र गजानन तर फोनवर तासातासाची खबर घेऊन... हवामान अंदाज आणि आवश्यक माहिती देत होता... मुंबईची बॅक अप टीम  त्रिपुराच्या महत्त्वाच्या बातम्या पुरवत होत्या...

आज सायकलिंग करायला मिळाले नाही म्हणून नंदू थोडा नाराज झाला होता...

आले देवाजीच्या मना... तेथे कोणाचे चालेना...

तुका म्हणे उगेचि राहा... होईल ते सहज पाहा...

शांत रहा... वृत्तीने स्थिर रहा... भगवंताच्या इच्छेने जे जे घडते ते साक्षी रूपाने पाहा.. निष्कारण अस्वस्थ होऊ नका... 

हेच त्या जगन्नाथाला सांगायचे होते काय...

*मंगल हो...*